चातुर्मास... वृतस्थ जीवन आहे

चातुर्मास
चातुर्मास... वृतस्थ जीवन

आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चार मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात. मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो, म्हणजेच देवांची रात्र चालू होते. कर्क संक्रांत आषाढ मासात येते; म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस ‘शयनी एकादशी’ म्हटले आहे; कारण ‘त्या दिवशी
देव झोपी जातात’, अशी समजूत आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी’ असे म्हणतात. वस्तूतः दक्षिणायन सहा मासांचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी; पण बोधिनी एकादशीपर्यंत चारच मास पुरे होतात. याचा अर्थ असा की, एक तृतीयांश रात्र शिल्लक आहे, तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात.’ ‘नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असतांना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो, असे समजतात. 

हिंदू धर्मकल्पनांनुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चतुर्मास म्हणतात. मात्र, काहीजण चुकीने चातुर्मास असेही म्हणतात. धर्मकल्पनेनुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. 

चतुर्मास कालावधी 

चतुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चतुर्मासाची सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चतुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस 'प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला चतुर्मास नसतो. जैनधर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी मानतात. चतुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी कल्पना आहे.

ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो.

शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात, अश्विनात पिकांची तोडणी होते, कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची वेळ येते.

चातुर्मासात हिंदूंचे विवाहमुहूर्त नसतात.

व्रत-उपासना

या काळात हिंदू व जैन धर्मांत अनेक व्रत-उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार, विवाह, दीक्षा ग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत. भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हंटले जाते. संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य, चंद्र, वायु, विष्णु अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो.

पौराणिक संदर्भ 

चतुर्मासाला पौराणिक कथेचा संदर्भ आहे. काळात शेषशायी विष्णू जलाशयात निद्रा घेतात असा समज आहे.

पौराणिक कथा

मांधाता नामक एका चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांडपुराणातील कथा या संदर्भात सांगितली जाते. नारदाने विचारले, 'पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे?' ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग आवडणार्‍या मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते, व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही, त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. हृषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले. व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन आदि व्यवहार बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, 'राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला 'नारा' असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंतांचे घर-आयन-आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या ह्रदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्यरूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. 'हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर.' राजा म्हणाला, 'प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळेच स्थिर आहे. सर्व भूतमात्र-प्राणिमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की, राजांच्या अनाचारामुळे प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन.' राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिर ऋषी दिसला. त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय, असे वाटत होते. त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्यापुढे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगांविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, 'मुनिश्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी, याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्याशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा. अंगिरा ऋषी म्हणाला, हे राजा, तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर.' मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा (म्हणजेच शयनी) एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले. राजा, त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. हृषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पद्मा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले.

व्रते व आचरण

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चतुर्मासात अत्यंत कल्याण करणार्‍या आहेत, असा समज आहे.

‘नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असतांना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो, असे समजतात. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.’
देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते –

वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः ।
व्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।।

अर्थ: प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते.’
या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते.
पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला.
मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.
परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.
चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात
महालय श्राद्धे करतात.’
चातुर्मासात (चार मास) व्रतस्थ राहायचे असते.

व्रते

‘सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (न मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजननियम करता येतात.’ ‘कित्येक स्त्रिया चातुर्मासात ‘धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसर्या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात. काही एकभुक्त रहातात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात.’

वर्ज्य

१. ‘प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळूंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ़
२. मंचकावर शयन
३. ऋतूकालावाचून स्त्रीगमन
४. परान्न
५. विवाह किंवा अन्य तत्सम कार्य
६. चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे, असे धर्मसिंधुत आणि इतरही काही धर्मग्रंथांत सांगितले आहे.

अवर्ज्य

चातुर्मास्यात हविष्यान्न सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, समुद्रातले मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावीत. (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.)

जिवती पुजन

श्रावणी शुक्रवार व जिवती पुजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे.
श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षीणा देऊन सत्कार केला जातो. ह्या विधीस "सवाष्ण करणे" म्हणतात. श्रावण महीन्यात चारी शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी- कुंकवाला बोलवून त्यांना दुध्-साखर चणे-फुटाणे द्यावेत.प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारे पुरण्पोळी करून सवाष्ण जेवावयास घालावी. तिला दक्षीणा द्यावी.
श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करतात. ही पुजा संततीरक्षणार्थ मानली जाते.
जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देव्हार्याजवळ भिंतीवर लावावा. त्याची पुजा आठवड्यातून चार दिवस करावी.
श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीमातेची तसेच जिवतीची पुजा करावी.
फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, हळद्-कुंकू लावलेले २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र, गंध, हळदि-कुंकू, अक्षता लावून जिवतीची पुजा करावी.
पुरणाचे ५ / ७ / ९ असे दिवे करून लक्ष्मीमातेची व जिवतीची आरती करावी. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी वफळ ठेवून दुध्-साखरेचा व चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. 
त्या दिवशी स्वयपाकांत मुख्य म्हणजे पुरण घालतात. बाकी स्वयंपाक वरण्-भात्-तूप, लिंबू, भाजी, पुरण, खीर, चटणी, कोशिंबीर, तळण, वाटली डाळ, आमटी ई. करावा.
ह्या दिवशी मुलांना वाण म्हणून "आरत्या" किंवा" मुरण्या" देतात त्या कराव्या.
(आरत्या- कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकेरीत तळलेया पुर्या. मुरण्या- पिकलेल्या केळ्यात रवा गुळ खोबरे घालून छोटे छोते तळलेले गोळे.)
देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा. सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी.

जेवावयास बसण्यापुर्वी पानापुढे विडा दक्षीणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा-नारळाने ओटी भरावी.
जिवतीची पुजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना पण औक्षण करावे.
कुंकू अक्षता लावून चणे साखर फुटाण्याचे व आरत्यामुरण्यांचे वाण देऊन, निरांजनात ५ वाती (तेलवाती घ्याव्या फुलवाती असू नये) ठेऊन त्याने औक्शण करावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, व दिर्घायुश्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी. परगावी जर मुलं असतील तर चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्या सारखे होईल. त्या दिवशी देविची ओटी भरतात.

दीप पूजा (दीप अमावस्या)

आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या. या अमावास्येला गटारी अमावस्या म्हणूनही म्हणले जाते, पण ही दिव्यांची अमावस्या म्हणून ही लक्षात ठेवावी! 

घरातील दिव्यांना दुध पाण्याने धुउन स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून ठेवावेत त्यांची पूजा करावी. आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरु होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी. गोडाचा नेवैद्य अर्पण करावा. आपल्या घरातील छोटा / छोटीला औक्षण करावे. वंशाचा दिवा असतो न म्हणून आता मुलगा मुलगी हा भेद करत नाही त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पणतीचे नक्की औक्षण करावे.

दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतिक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्ज्वलित करून त्याची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात. ती प्रार्थना अशी, 

‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌ | गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥

त्याचा अर्थ असा ‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’ त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते. असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे. या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे.

तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्‌ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा’’. राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही. अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले.

अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली आहे.

पिठोरी अमावस्या माहिती

पुत्रवती आईने आपल्य मुलाचे आयुष्यवाढवण्यासाठीचा हा सण म्हणून मातृदिन !
श्रावण मास अमावस्या या दिवशी दोन सण साजरा करण्यात येतात पाहिला म्हणजे या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात,म्हणून या अमावस्येला 'पिठोरी अमावस्या' म्हणतात. वरीलप्रमाणे पूजा मांडून "अखंड सौभाग्य आणि दिर्घायु पुत्र" यासाठी प्रार्थना करतात. घरातील मुलांसाठी खीरपुरीचे किंवा पुरणपोळीचे जेवण करतात. पूजा करुन झाल्यावर पु्रणाची आरती करतात, खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात नंतर पूजा करणारी स्त्री ते आपल्या खांद्यावरुन मागे नेत विचारते, "आतीत कोण?" ( अतिथी कोण?) तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगुन तो नैवेद्य हातातुन घेतात. अशा प्रकारे पूजा पूर्ण करतात.स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी ही अमावस्या आहे.

ज्या संस्कृतीत गुरुची पूजा होते. प्राण्यांची पूजा होते इतकेच काय पण निर्जीव वस्तूंचीदेखील पूजा होते ती संस्कृती मातेला कशी विसरेल. अशा या मातृत्वाचा गौरव करण्याचा, स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या होय. दुसरा सण बैल पोळा या विषयावर दुसर्‍या लेखात माहिती देतो. श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ज्या स्त्रियांची मुले अल्पायुषी ठरतात किंवा जीला अपत्यसुख लाभत नाही, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत ठेवतात. हे व्रत पूजाप्रधान असून चौसष्ठ योगिनी या  त्याच्या देवता आहेत.
श्रावण अमावास्येला उपवास करून सायंकाळी सर्वतोभद्रमंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना करावी, त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्तीदेवतेच्या मूर्ती स्थापाव्यात. तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ सुपाऱ्या मांडून योगिनींचे आवाहन करावे. या  चौसष्ठ योगिनी म्हणजे उपजीवेकेसाठी उपयुक्त चौसष्ठ कलाच आहेत. त्याचीच ही प्रतिके आहेत. त्यांचीच पूजा करावी. व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात.
अशी ही स्त्रीला पुत्रवती बनविणारी अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. श्रावण वद्य अमावास्येलाच  ‘दर्भग्रहणी अमावस्या’ म्हणतात.
आपल्या संस्कृतीत मातेला फार महत्व आहे, तिचा मोठा गौरव केला आहे. आई ही केवळ मुलांचीच नव्हे तर त्यांच्या संस्कारांचीही जननी आहे. आई ह्या दोन अक्षरी छोटयाशा शब्दात विश्वाला गवसणी घालण्याचे अतूट सामर्थ्य आहे. वात्सल्य वं त्यागाची मूर्ती म्हणजे आई होय. अशी ही आई एखाद्या देवतेपेक्षा कमी नाही. म्हणूनच तिला ‘माऊली’ असे आदराने म्हणले जाते.

समाजात स्त्रियांचे महत्व समजण्यासाठी घरोघरी भाऊबीज, रक्षाबंधनाप्रमाणे  मातृदिन साजरा झाला पाहिजे. जी माता आपल्या मायेने, त्यागाने, ममत्वाने मुलांची, घरादाराची सेवा करते तिच्याविषयी योग्य ती जाणीव समाजाला होऊन तिच्याप्रती आदर व्यक्त झालाच पाहिजे.
जर आपण नागपंचमी थाटात साजरी करू शकतो तर आपल्याला जन्म देणाऱ्या जननीच्या त्यागाचा, सेवेचा, समर्पणाचा, ओदार्याचा मातृदिन उत्साहात साजरा करून तिच्या चरणी कोटी कोटी प्रणाम अर्पूया हाच मातृदिनाचा खरा संदेश आहे.
ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला घडवते, जगात उभं राहण्यासाठी सक्षम करते. या चौसष्ट कला ज्यांमुळे उपजिवीका होते त्यांची पूजा आपली आई करते. तेपण आपल्याच दीर्घायुष्य व आरोग्यासाठी म्हणून. तर  या दिवशी 'मातृदिन' साजरा करवा!

श्री हरीतालिका पूजन

भाद्रपद शुध्द तृतीयेचे हरीतालिका हे व्रत कूमारीकांनी मनासारखा पती मिळावा म्हणून व सौभाग्यवतींनी पतीराज दिर्घायूषी , आरोग्यवान व्हावे म्हणून आवर्जुन करावे असा प्रघात आहे. हरितालिका हे श्री पार्वती मातोश्रींचेच एक नाव, त्यांनी आपल्या प्रबळ इच्छेने खडतर तपश्चर्या करून श्री महादेवांना प्राप्त केले.,याचीच आठवण म्हणून या व्रताचे आचरण केले जाते.

  • या व्रताचे दिवशी सूर्योदयाआधी उठून आवळ्याचे तेल व उटण्याने स्नान करावे.
  • शूभ्र वस्त्र परीधान करावे.
  • उगवत्या सूर्यनारायणांना अर्घ्य देऊन "ॐ असवादित्य ब्रह्म" म्हणत स्वतः भोवती ३ प्रदक्षिणा घालाव्या.
  • आपल्या घरातील देवपूजा व नित्यसेवा पूर्ण करावी.

पूजेची मांडणी

  • पूजेची जागा झाडून व गोमूत्राने स्वच्छ पूसून घ्यावी, सर्वत्र गोमूत्र शिंपडावे.
  • स्वच्छ केलेल्या जागेवर बेलपत्राची रांगोळी काढून त्यावर चौरंग कींवा पाट ठेवावा त्यावर पांढरे सूती/रेशमी वस्त्र अंथरुन मधोमध नदीच्या वाळूची श्री महादेवांची पिंड करावी.
  • त्या पिंडीच्या पूर्वेला एक दूसरी छोटी पिंड (श्री हरितालिका/श्री पार्वती मातोश्रींची) करावी.
  • छोट्या पिंडीच्या समोर दोनही बाजूंना २ शाळूंका (श्री जया व श्री विजया) कराव्यात.
  • श्री महादेवांच्या पिंडीसमोर विड्याच्या जोड पानांवर श्री गणेशांची मूर्ती/सूपारी ठेवावी, श्री गणपतींसमोर एका छोट्या वाटीत गूळखोबरे ठेवावे.
  • श्री गणेशांच्या उजव्या बाजूला घंटी व डाव्या बाजूला शंख ठेवावा.
  • मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पांढरे कापड अंथरून त्यावर श्री हरितालिका व्रत कथेची पोथी ठेवावी. पूजेभोवती रांगोळी काढावी.
  • अष्टगंध, अक्षता, भस्म, हळदी-कुंकु, पूजनाची फूले, पत्री, दूर्वा, निवडलेले बेलपत्र- १३०, धूप, शूध्द तूपाचे निरांजन, खडीसाखर, तांब्याचा तांब्या, ताम्हण, पळी, पेला, विड्याची पाने, खारीक, बदाम, सूपारी, सूटी नाणी, यथाशक्ती दक्षिणा, खण, गळेसरी, बांगड्या इ. साहित्य पूजेच्या ठिकाणी जमवून ठेवावे.

पूजनाचा क्रम

मंगलतिलक

"ॐ भद्रं कर्णेभि:..." शांतीमंत्र म्हणत कपाळाला हळदी-कुंकू लावावे.

आचमन

प्रथम ३ नावांनी उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्राशन करावे, 
१) ॐ केशवाय नमः !
२) ॐ नारायणाय नमः !
३) ॐ माधवाय नमः !

पूढील २ नावांना पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडावे,
४) ॐ गोविंदाय नमः !
५) ॐ विष्णवे नमः !

पूढील नावे ध्यानपूर्वक म्हणावी,
६) ॐ मधूसूदनाय नमः !
७) ॐ त्रिविक्रमाय नमः !
८) ॐ वामनाय नमः !
९) ॐ श्री धराय नमः !
१०) ॐ ऋषीकेषाय नमः !
११) ॐ पद्मनाभाय नमः !
१२) ॐ दामोदराय नमः !
१३) ॐ संकर्षणाय नमः !
१४) ॐ वासूदेवाय नमः !
१५) ॐ प्रद्यूम्नाय नमः !
१६) ॐ अनिरुद्धाय नमः !
१७) ॐ पूरूषोत्तमाय नमः !
१८) ॐ अधोक्षजाय नमः !
१९) ॐ नारसिंहाय नमः !
२०) ॐ अच्यूताय नमः !
२१) ॐ जनार्दनाय नमः !
२२) ॐ उपेन्द्राय नमः !
२३) ॐ हरये नमः !
२४) ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः !

प्राणायाम

गायत्री मंत्र म्हणत १ प्राणायाम करावा.

विधीवत् संकल्प

उजव्या तळहातावर पाणी, अक्षता व बेलपत्र घेऊन पूढील संकल्प म्हणावा,

सौभाग्यवतींसाठी

मी (अमूक) गोत्रात उत्पन्न (अमूक) नावाची मला जन्मोजन्मी अखंडीत सौभाग्य प्राप्त व्हावे, धन-धान्य-पूत्र-पौत्रादिंची अभिवृध्दी व्हावी, दिर्घायूष्यादि सकल कार्यसिध्दीसाठी... ,

कूमारीकांसाठी

मी (अमूक) गोत्रात उत्पन्न (अमूक) नावाची मला मनेप्सित निर्व्यसनी, सच्चारीत्र्यवान, धार्मिक असा शोभन गूणमंडीत पती प्राप्त होण्यासाठी... ,
प्रतिवार्षिक विहीत श्री हरितालिका व्रत अंगभूत यथाशक्ती यथाज्ञानाने यथामिलीत उपचारांनी श्री उमा महेश्वर प्रीत्यर्थे श्री वालूका शिवलिंगांचे पूजन करीत आहे! निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिध्दी सिद्धी सहीत श्री महागणपती पूजन तसेच कलश, शंख, घंटी, दिप पूजन करीत आहे! 

गणपतींचे पूजन

श्री गणेशांना "ॐ गं गणपतये नमः!" या मंत्राचा जप करत गंध-अक्षता-हळदीकुंकु लावावे, लालफूल व दूर्वा वहाव्यात, धूप-दिप ओवाळून खडीसाखर किंवा गूळ-खोबर्याचा नैवेद्य दाखवावा. हात जोडून नमस्कार करावा.

शुध्दीकरण

  • शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करत खालील कृती कराव्यात,
  • आपल्या आसनाला नमस्कार करावा.
  • दाही दिशांना नमस्कार करावा.
  • पूजेच्या कलशात गंध-अक्षता-फूल-बेलपत्र-हळदीकुंकु वाहून नमस्कार करावा.
  • शंख धूवून पूसून पाणी भरुन जागेवर ठेवावे, त्यांना गंध-फूल व बेलपत्र वाहून नमस्कार करावा.
  • घंटी धूवून पूसून जागेवर ठेवावी, त्यांना गंध-अक्षता-फूल-हळदीकुंकु व बेलपत्र वाहून नमस्कार करावा,घंटी वाजवावी.
  • प्रज्वलित निरांजनाला गंध-अक्षता-फूल-हळदीकुंकु व बेलपत्र वाहून नमस्कार करावा.
  • शंखातील थोडे पाणी कलशात टाकावे व कलशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर व स्वतःच्या अंगावर शिंपडावे.

श्री वालूका शिवलिंगांचे पूजन

प्राणप्रतिष्ठा

एक बेलपत्र तूपात बूडवून शिवलिंगावर ठेवावे. डोळे मिटून एकाग्रचित्ताने १५ वेळा "ॐ" म्हणावा.

ध्यान

हात जोडून खालील ध्यान म्हणावे,

ॐ पीतकौशेय वसनां हेमाभां कमलासनाम् ! भक्तानां वरदां नित्यं पार्वतीं चिंतयाम्यहम् !!
विधाय वालूकालिंगम् अर्चयंतीम् महेश्वरम् ! पूर्णेन्दुवदनां ध्यायेध्दरितालीं वरप्रदाम् !!
मंदारमाला कुलितालकायै कपालमालांकित शेखराय ! दिव्यांबरायै च दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय !!
ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ध्यायामी नमस्काराणि समर्पयामी !!

आवाहन

खालील नाममंत्राने दोनही वालूकालिंगांना बेलपत्र वहावेत,

ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !
आवाहनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामी !!

आसन

खालील नाममंत्राने चौरंगावर बेलपत्र वहावे,

ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !
आसनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामी !!

अभिषेक

खालील नाममंत्राने दोनही वालूकालिंगांना गंधाक्षता फूल वाहून नमस्कार करावा,

ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !
अभिषेकार्थे गंधाक्षता पूष्पाणि समर्पयामी !!

खालील स्तोत्र मंत्र म्हणत फूलाने पाणी शिंपडत अभिषेक करावा,

श्री गणपती अथर्वशिर्ष - १ वेळा
श्री रात्री सूक्त - १ वेळा
श्री रूद्राध्याय - १ वेळा

ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !
अभिषेकं समर्पयामि !

यज्ञोपवित

अभिषेकानंतर खालील मंत्र म्हणत दोनही वालूकालिंगांना जानवे वहावे,

ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !
यज्ञोपवितं समर्पयामि !

वस्त्र

खालील मंत्र म्हणत दोनही वालूकालिंगांना यथाशक्ती वस्त्र किंवा अक्षता वहाव्यात,

ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! 
वस्त्रं/वस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि !

दोनही वालूकालिंगांचे खालीलप्रमाणे पंचोपचार पूजन करावे,

१) दोनही वालूका लिंगास गंध-भस्म-अक्षता-हळदीकुंकु वहावेत.

ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !
विलेपनार्थे चंदनम्, भस्मं ! अलंकारार्थे अक्षतान् ! हरिद्रां-कुंकूमम् सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि !!

श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीला गळेसरी, बांगड्या इतर सौभाग्य द्रव्य व अलंकार खालील मंत्राने अर्पण करावे,

ॐ श्री उमायै नमः !
कंठसूत्रं, कंकणादि नानाविध सौभाग्य द्रव्याणि अलंकाराणि समर्पयामि !

२) दोनही वालूका लिंगांना सूगंधी फूले वाहावीत. 

ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !
ऋतू कालोद्भव पूष्पाणि समर्पयामि !

मुख्य विशेष पूजा

अथ अंगपूजनम्

श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर प्रत्येक नाममंत्राने त्या-त्या अवयवांची भावना करत अक्षता वहाव्यात.

  • ॐ श्री उमायै नमः ! पादौ पूजयामि ! (पाय)
  • ॐ श्री गौर्यै नमः ! गुल्फौ पूजयामि ! (पोटर्या)
  • ॐ श्री पार्वत्यै नमः ! जानुनी पूजयामि ! (गूडघे)
  • ॐ श्री जगध्दात्र्यै नमः ! जंघे पूजयामि ! (मांड्या)
  • ॐ श्री जगत्प्रतिष्ठायै नमः ! ऊरू पूजयामि ! (ऊर)
  • ॐ श्री शांतिरूपिण्यै नमः ! कटी पूजयामि ! (कंबर)
  • ॐ श्री हरायै नमः ! गुह्यं पूजयामि ! (गुह्य भाग)
  • ॐ श्री माहेश्वर्यै नमः ! नाभिं पूजयामि ! (नाभि)
  • ॐ श्री शांभव्यै नमः ! ह्रदयं पूजयामि ! (ह्रदय)
  • ॐ श्री शूलपाणये नमः ! कंठं पूजयामि ! (कंठ)
  • ॐ श्री पिनाकधृषे नमः ! बाहूं पूजयामि ! (बाहू)
  • ॐ श्री शिवायै नमः ! मुखं पूजयामि ! (मुख)
  • ॐ श्री पशुपतिप्रियायै नमः ! नेत्रे पूजयामि ! (नेत्र)
  • ॐ श्री गंगायै नमः ! ललाटं पूजयामि ! (कपाळ)
  • ॐ श्री महालावण्यायै नमः ! शिरः पूजयामि ! (डोके)
  • ॐ श्री सच्चिदानंदरूपिण्यै नमः ! सर्वांगं पूजयामि ! (सर्व अंग)

अथ पत्री पूजनम्

श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालीलप्रमाणे समंत्रक पाने / पत्री वहावीत,

  • ॐ अशोकाय नमः ! अशोक पत्रं समर्पयामि ! (अशोकाचे पान)
  • ॐ जगध्दात्र्यै नमः ! धात्री पत्रं समर्पयामि ! (आवळीचे पान)
  • ॐ माहेश्वर्यै नमः ! दूर्वांकूरान् समर्पयामि ! (दूर्वा)
  • ॐ कपर्दिन्यै नमः ! करवीर पत्रं समर्पयामि ! (कन्हेराचे पान)
  • ॐ कपालधारीण्यै नमः ! कदंबपत्रं समर्पयामि ! (कदंबाचे पान)
  • ॐ पार्वत्यै नमः ! ब्राह्मी पत्रं समर्पयामि ! (ब्राह्मीचे पान)
  • ॐ धूर्जटायै नमः ! धत्तूर पत्रं समर्पयामि ! (धोत्र्याचे पान)
  • ॐ त्रिपूरांतकायै नमः ! अपामार्ग पत्रं समर्पयामि ! (आघाड्याचे पान)
  • ॐ सर्वेश्वर्यै नमः ! नानाविध पत्राणि समर्पयामि ! (पंचपल्लव)

अथ पूष्प पूजनम्

श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालीलप्रमाणे समंत्रक फूले वहावीत.

  • ॐ चतुर्वर्गप्रदायै नमः ! चंपक पुष्पं समर्पयामि ! (चाफ्याचे फूल)
  • ॐ बुध्दिप्रियायै नमः ! केतकी पुष्पं समर्पयामि ! (केवडा)
  • ॐ कौमार्यै नमः ! करवीर पुष्पं समर्पयामि ! (कण्हेराचे फूल)
  • ॐ कुमार्यै नमः ! बकुल पुष्पं समर्पयामि ! (बकुळीचे फूल)
  • ॐ धनदायै नमः ! धत्तूर पुष्पं समर्पयामि ! (धोतर्याचे फूल)
  • ॐ शांभव्यै नमः ! शतपत्र पुष्पं समर्पयामि ! (सूर्यफुल)
  • ॐ चामुण्डायै नमः ! पद्मं समर्पयामि ! (कमळाचे फूल)
  • ॐ जगध्दात्र्यै नमः ! जपाकुसुमं समर्पयामि ! (जास्वंदाचे फूल)
  • ॐ माहेश्वर्यै नमः ! मल्लिका पुष्पं समर्पयामि ! (मोगर्याचे फूल)
  • ॐ मेरूमंदारवासिन्यै नमः ! मांदार पुष्पं समर्पयामि ! (पांढर्या रूईचे फूल)


श्री महादेवांच्या पिंडीवर श्री शिव अष्टोत्तरशत नामावली म्हणत १०८ बेलपत्र अर्पण करावेत.

३) दोनही वालूका लिंगांना खालील मंत्र म्हणत धूप ओवाळावा. 

ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !
धूपं आघ्रापयामि !

४) दोनही वालूका लिंगांना खालील मंत्र म्हणत शूध्द तूपाच्या निरांजनाने ओवाळावे.

ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !
दिपं दर्शयामि !

५) दोनही वालूकालिंगांना फळे व खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा तसेच विडा, दक्षिणाही अर्पण करावी.

ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !
नानाविध फलानी शर्करा खंड खाद्यानी नैवेद्यं समर्पयामि !
पूगीफलं स तांबूलं तथाच दक्षिणां समर्पयामि !

  • श्री हरीतालिका व्रताची कथा वाचावी.
  • कथा वाचल्यानंतर श्री गणपतींची, श्री हरितालिकेची व श्री शंकरांची अशा क्रमाने आरती करावी.
  • आरतीनंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्रपूष्पांजली म्हणून फूले-बेलपत्र दोनही वालूकालिंगांवर अर्पण करावी...*
  • विशेष अर्घ्य:- पळीत पाणी घेऊन त्यात गंध-अक्षता-फूल-सूटे नाणे व सूपारी ठेवावी.


पूढील प्रत्येक मंत्राला वरीलप्रमाणे अर्घ्य आपल्या उजव्या हाताने ताम्हणात सोडावे,

१) ॐ शिवरूपे शिवे देवि शंकर प्राणवल्लभे!
उमे सर्वार्थदे देवी गृहाणार्घ्यं नमोsस्तुते !!
"ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !"
इदमर्घ्यं समर्पयामि !

२) ॐ नमस्तेsस्तु मृडानीश अपर्णा प्राणवल्लभ !
भक्त्याssनीतं मया हीदं गृहाणार्घ्यं नमोsस्तुते !!
"ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !"
इदमर्घ्यं समर्पयामि !

३) ॐ व्रतसंपूर्ति सिद्धयर्थं यथाशक्ती मयाssह्रतम् !
आलिभि: सहिते देवी गृहाणार्घ्यं नमोsस्तुते !!
"ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !"
इदमर्घ्यं समर्पयामि !

हात जोडून मनोभावे पूजेत झालेल्या चूकांबद्दल क्षमा मागावी. खालील प्रार्थना म्हणावी.

हरितालिके नमस्तेsस्तु सशिवे भक्तवत्सले !
संसारभय भीताsहम् त्वमेव शरणं मम !
जन्मजन्मनि सौभाग्य मक्षय्यं देहि मेsव्ययम् !!

शेवटी हातात पाणी घेऊन "मी माझ्या ज्ञानानूसार व मिळालेल्या उपचारद्रव्यांनी श्री हरीतालिका व्रतानिमित्त केलेले श्री वालूकालिंगार्चन श्री उमा महेश्वरांना प्रिय होवो." असे म्हणून पाणी ताम्हणात सोडावे.

  • या दिवशी व्रतस्थ महीलांनी अन्नग्रहण करू नये केवळ फलाहार करावा.
  • सायंकाळी पूजेस धूप दिप ओवाळून दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा.
  • मध्यरात्री पर्यंत शिव शक्तींचे नामस्मरण करत जागरण करावे.
  • मध्यरात्री पून्हा श्री गणेश, श्री हरितालिकेची व श्री महादेवांची आरती करून रूईच्या स्वच्छ पानावर थोडे दही घालून ते पान चाटावे.
  • दूसर्या दिवशी पूजेवरील सर्व निर्माल्य काढून दोनही वालूकालिंगांना गंध, भस्म, अक्षता, हळदी-कुंकु, फूले व बेलपत्र वहावेत; धूप, दिप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा.
  • श्री गणपतींची, श्री हरितालिकेची व श्री शंकरांची अशा क्रमाने आरती करावी.
  • आरतीनंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्रपूष्पांजली म्हणून फूले-बेलपत्र दोनही वालूकालिंगांवर अर्पण करावी.
  • विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही-भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवाहात विसर्जीत करावी.
  • पतीराजांचे पाद्यपूजन करून उपवास सोडावा.

गणपती उत्सव

गणपती का बसवतात?

एक मतप्रवाह; आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही. आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिन्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालेल आणि त्या मुळे गणपती ला थकवा येईल, आणि पाणि ही वर्ज्य होते अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नए म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती अकडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात शिरवले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली. या काळात गणपती ला आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवताे.

श्रीगणराया मुर्ती कशी असावी?

गणेशमूर्ती शाडू माती असावी. तसेच ती ९ ते ११ इंचच उंचीची असावी. त्याचप्रमाणे ही गणेशमूर्ती निवडतानासुद्धा अथर्वशीर्षांत वर्णिलेल्या गणेशासारखीच असावी.

एकदन्तं चतुर्हस्तम् पाशमं कुशधारिणम् ॥ रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् । रक्तम् लम्बोदरं शूर्पकर्णकं

म्हणजेच- एकदन्तम्- एक दात असलेला, चतुर्हस्तम्- चार हात असलेला, पाशमंकुश धारिणम्- पाश व अंकुश ही दोन शस्त्रे दोन हातांत धारण केलेला, व उर्वरित हातात एकात तुटलेला दात तर दुसऱ्या हातने प्रसादमुद्रा करून भक्तांना वर प्रदान करणारा, मोठे सुपासारखे कान, लंबोदर, मूषकासहित अथवा मूषकावर स्वार असणारा, अशी गणेशमूर्ती असावी. 

गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी तयार करण्यात येणारी मूर्ती कशी असावी?

पुराणांत गणपती हा मळापासून बनला असल्याचे सांगितले आहे. चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलीली असावी. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो. घरच्या प्रमुख व्यक्तीने शकत्यो (बिना चप्पल) घालता गणेशमूर्ती आणावी. त्याकरिता घरातून निघतानांच एक तबक, गुलाल व नवीन मोठा रुमाल घेऊनच निघावे. त्यानंतर वरती वर्णिल्याप्रमाणे गणेशमूर्ती घ्यावी. गणेशमूर्ती आवडली की प्रथम त्या मूर्तीवर थोडासा गुलाल उधळावा व ‘मंगलमूर्ती मोरया’ असा गजर करीत, आणलेल्या तबकात मूर्ती घ्यावी व त्यावर रुमाल झाकावा व मुलाबाळांसहित अत्यंत आनंदाने ‘श्रीं’सह घरी यावे.घरी आल्यानंतर दरवाजातच थांबावे. घरच्या लक्ष्मीने अखंड पोळी त्या मूर्तीवरून ओवाळून बाहेर ठेवावी वश्रीगणरायाची सोन्याने देवाचे औक्षण करावी व पतीच्या, मुलांच्या कपाळाला गुलाल लावून ‘गणेशा आपले सहर्ष आगमन असो’, असे म्हणून टाळ्यांच्या कडकडाटात श्रींना घरात घ्यावे. ज्या जागी स्थापना करायची, त्या जागेवर थोडय़ाशा अक्षता ठेवून त्यावर गणेशमूर्ती ठेवावी. विशेष नोंद करावी की, कृपया श्रीगणरायाच्या मुर्तीचे मोल हे अनमोल आहे जी मुर्ती आपणास आवडेल ती मुर्ती आपण घ्यावी देवाची मुर्तीची किंमत (भाव) कृपया करू नये.

*हल्ली  फेसबुकवर गणपती संदर्भात एक कथा फिरत आहे की व्यासांनी गणपतीच्या अंगाला चिखल लावला आणि दहा दिवसांनी पाण्यात ठेवला वगैरे . मित्रांनो या कथेला कुठलाही आधार नाही. सत्यकथा मी मुद्दाम येथे देत आहे.*

भाद्रपदि गणेश जन्म कथा 

एकदा सत्यलोकी सर्व देवांची सभा भरली होती, अध्यक्ष स्थानी ब्रह्मदेव होते, सभा बराचवेळ रेंगाळली त्यामुळे अध्यक्षानाच म्हणजे ब्रह्मदेवाला भलीमोठी जांभई आली आणि जांभईतुन एक अंगुष्टमात्र पुरुष बाहेर आला आणि बघता बघता अक्राळ विक्राळ झाला.

*ब्रह्म्यास जृंभा सहजात आली*|

*वक्त्रातुनी मूर्ती तदा निघाली*||

*तो दैत्य जृंभासुर  उग्र झाला*|

*तू कोण धाता पुसतो तयाला*||

जांभईतून निर्माण झालेल्या अक्राळविक्राळ लालभडक शेंदुरा सारख्या रंगाच्या दैत्याला ब्रह्मदेवाने विचारले , who are you ? तू कोण आहेस ? तो म्हणाला कोण म्हणून काय विचारता ? आहो मी तुमचा मुलगाच आहे.मी तुमच्या जृंभेतुन म्हणजे जांभईतून निर्माण झालो आहे म्हणून मला जृंभासुर म्हणतात आणि माझा रंग लालभडक शेंदूरासारखा आहे म्हणून मला शिंदुरासूर असे म्हणतील . मी तुमचा मुलगा असल्यामुळे मला वरदान द्या.  *क्रोधे मदालिंगन होय ज्यासी*|

*तो मृत्यू पावो वद या वरासी*||

*लोकत्रयी सुंदर योग्य नारी*|

*ती प्राप्त व्हावी मज सौख्यकारी*|| 

असे वरदान त्या दैत्याने ब्रह्मदेवाला मागीतले आणि ब्रह्मदेवाने त्या दैत्याला वरदान दिले.

त्या दैत्याने आपल्याला मिळालेला वर खरा का खोटा ? हे पडताळून पहावे म्हणून तेथील देवांकडे तो पाहू लागला की यातील कोणाला मिठी मारून मारायचे ? ज्या ज्या देवाकडे त्याने पहायला सुरूवात केली तो तो प्रत्येकाने खाली मान घातली, एका बाजूला नारद उभे होते . नारदाकडे पाहुन नारदाना मिठी मारण्यासाठी हा दैत्य निघाला, नारदाला मिठी मारणार एवढ्यात नारदमहर्षी म्हणाले जृंभासुरा मला मारून तुझेच नुकसान होणार आहे तेंव्हा  विचार कर ? तेंव्हा जृंभासुर म्हणाला मग तुच सांग मी कुणाला मिठी मारु ? नारद म्हणाले अरे ! असे वर कधि खरे आसतात का? तुला दिलेला वर खरा का खोटा याची सत्यता पडताळून पहायची असेल तर ज्यांनी वर दिला त्यानाच मिठी मार . हे ऐकल्यावर जृंभासूर ब्रह्मदेवालाच मिठी मारायला निघाला . पुढे काय घडले पुढील लेखात पाहु -

राष्ट्रीय कीर्तनकार 

*हभप.श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे

भाद्रपदि गणेशजन्म कथा

नारदाला जेंव्हा जृंभासुर मिठी मारायला आला तेंव्हा नारदानी ब्रह्मदेवाला मिठी मारुन वराची सत्यता पडताळून पहाण्याचा सल्ला दिला.त्याप्रमाणे जृंभासुर ब्रह्मदेवाकडे निघाला त्याबरोबर ब्रह्मदेव पळाले व वैंकुंठात जावुन लपुन बसले.बाकीचे सर्व देव पण पळून गेले.जृंभासुर वैकुंठात आला आणि विष्णुला म्हणाला मी माझ्या वडिलांना मारणार आहे त्याना माझ्या ताब्यात द्या. तेंव्हा विष्णु म्हणाले अरे! बाबा मुलांनी बापाला मारुनये.( तो काळ पुढे २० व्या शतकात येईल मुलं आपल्या जन्मदात्या आईबापाला मारतील व वृद्दाश्रमात टाकतील.)

जृंभासुर म्हणाला मला वराची सत्यता पडताळून पहायची आहे.

विष्णु म्हणाले मी तुला असे एक ठिकाण सांगतो की ज्या ठिकाणी  तुला दोन्ही वर पडताळून पहाता येईल.तू कैलास पर्वतावर जा, तिथे त्रिभुवन सुंदर पार्वती आहे  ती तुला मिळेल आणि शंकराला मिठी मार म्हणजे ते मरुन जातील . 

जृंभासुर कैलास पर्वतावर आला, भगवान शंकर ध्यानीअवस्थेत होते, जृंभासुराने शंकराला जागे करण्याचा प्रयत्न केला पण शंकर जागे झाले नाहीत, जृंभासुराने पार्वतीला उचलले व पळु लागला. तिथे असलेल्या नंदि व सर्व गणभैरवाने शंकराला जागे करण्या करता जोरात गर्जना केली *पार्वती पळवली धर धर महादेव* (या वरुन पुढे गर्जना सुरु झाली *पार्वती पते हर हर महादेव*) कोलाहल ऐकून शंकर भानावर आले , घडलेला प्रकार कळला , शंकराने जृंभासुराला गाठले व शिवजी म्हणाले अरे मूर्खा बल्लात्काराने अशी दुसऱ्याची पत्नी पळवणे योग्य नव्हे, तो काळ पुढे येणार आहे. 

दैत्य म्हणाला माझ्या मनगटात बळ आहे म्हणून त्या बळावर मी हिला पळवतो आहे, असेल हिंमत तर माझ्याशी दोन हात कर मी जर हरलो तर हिला घेवून जा, तू हरलास तर मी घेवून जाईन, असे म्हणून असुराने पार्वतीला खाली ठेवले व शंकराशी भिडला , शंकराचा पराभव झाला दैत्य पुन्हा पार्वतीला घेवून पळू लागला. पार्वतीने आता मात्र संरक्षण मंत्री भगवान विष्णुचा धावा सुरू केला, तात्काळ संरक्षण मंत्री ब्राम्हण रुपात प्रगट झाले.

श्लोक कामदावृत्तः-

*श्रीहरि तदा शीघ्र धावला*|

*पार्वतीपुढे वेगी पातला*||

*विप्र होउनि पावला हरि*|

*दैत्य तिष्ठवि शीघ्र यावरी*||

विष्णु म्हणाले बाबारे! हे तू काय करतोस , हे चांगले नाही. तो म्हणाला मी जिंकलो आहे.आता ही माझी पत्नी आहे.विष्णु म्हणाले याला पुरावा काय? साक्षिदार कोण आहे? तेंव्हा तू माझ्यासमोर परत एकदा युद्ध कर जो जिंकेल त्याची ही पत्नी. दैत्याने पार्वतीला पुन्हा खाली ठेवले आणि शंकरासोबत युद्ध सुरु केले.शंकराचा पुन्हा पराभव होतो आहे हे पाहून पार्वतीने पुन्हा विष्णुचा धावा सुरु केला.

ब्राह्मणरूपात आलेल्या विष्णुने दैत्याच्या डोक्यावर परशुनावाचे शस्त्र फेकून मारले त्यामुळे तो बेशुद्ध पडला.पार्वतीने विष्णुला ओळखले,नमस्कार करुन आपले खरे रूप प्रगट करण्याची प्रार्थना केली,विष्णु मुळस्वरूपात प्रगट झाले व पार्वतीस म्हणाले मी प्रसन्न आहे काय हवेते माग ! तेंव्हा पार्वती म्हणाली देवा तुम्हीच आता या दैत्याला ठार मारा. विष्णु म्हणाले तथास्तु  लवकरच मी तुझ्या पोटी जन्माला येवुन अवतार घेवुन या दैत्याला ठार मारेन.

पुढे भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. हा विष्णुने घेतलेला अवतार आहे म्हणून तर फक्त याच दिवशी गणपतीला तुळस वहातात.अन्य दिवशी गणपतीला तुळस वाहीली तर पाप लागते.

भाद्रपदी गणेशजन्म कथा

कालच्या लेखात आपण पाहीले की ,भगवान विष्णुने जृंभासुराच्या डोक्यावर परशु फेकुन मारला त्यामुळे तो बेशुद्ध पडला. पार्वतीला आशीर्वाद दिला.पार्वतीने वर मागुन घेतला की या दैत्याचा वध करण्यासाठी तुम्हीच अवतार घ्या, विष्णु म्हणाले तथास्तु ... पुढे शंकर पार्वती कैलास पर्वतावर आले. इकडे जृंभासुर शुद्धीवर आला, तो प्रचंड घाबरला आणि तिथुन पळुन गेला. कालांतराने पार्वतीला दिवस गेले उदरात गर्भ वाढत होता, जृंभासुराला बातमी कळली की त्याला मारण्यासाठी विष्णू पार्वतीच्या उदरी जन्म घेणार आहे.मायावी जृंभासुराने सूक्ष्म देह धारण करून पार्वतीच्या उदरात प्रवेश करून बाळाचे मस्तक कापून नर्मदा नदित फेकुन दिले,तेंव्हा पासून नर्मदेतील दगड लाल रंगाचे व गणपतीच्या आकाराचे झाले.

ओवीः-

*नर्मदोदकी त्यागिले शिराप्रती|* *त्याचे झाले नर्मदे गणपती ||*

भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी दुपारी पार्वती प्रसूत झाली पण मस्तक नसणारा मुलगा जन्माला आला. या ठिकाणी अशी एक कथा प्रचलित आहे की पार्वतीने आपल्या अंगावरचा मळ काढून एक मुलगा बनवला, त्याला दारात बसवून ती अंघोळीला गेली,शंकराला त्या मुलाने आडवले, आणि शंकराने त्याचे डोकं उडवले वगैरे ही दंतकथा सांगितली जाते. हे ऐकल्यावर मला एक प्रश्न पडायचा की , पार्वतीच्या अंगावर एक मुलगा तयार होईल एवढा मळ साठला होता का? इतका मळ साठे पर्यंत अंघोळ केली नव्हती का ? आणि आमच्या देवता एवढ्या घाणेरड्या असतात का? पण हे असे नाही तर सत्यकथा ही आहे की जृंभासुराने या बाळाचे मस्तक तोडले होते.

ओवीः-

*भाद्रपदमासीचा शुक्ल पक्ष *चतुर्थीस जन्मला सर्वाध्यक्ष|*

*ऐकताचि पातला शंभु दक्ष *शिरहीन देखिला तो||*

नुकतेच भगवान शिवाने गजासुराचा वध केला होता. त्याना बातमी कळली की पार्वतीच्या पोटी मस्तक नसणारा मुलगा जन्माला आला आहे, ते तात्काळ तिथे आले, सर्व देवता तिथे आल्या, मस्तकहीन मुलगा पाहून ब्रह्मदेवाला हसु आले तेंव्हा पार्वती म्हणाली,

*ब्रह्म्या तुला भ्रांति अशी नसावी| ही कोण मूर्ती मनी ओळखावी*

तेव्हा मस्तकहीन मुलाच्या देहातून आवाज आला की , नुकतेच माझ्या पित्याने गजासुराला ठार मारले आहे त्याचे मस्तक माझ्या शरीरास लावा.माझ्या आईने मला उचलुन थिथे न्यावे.त्या प्रमाणे गज म्हणजे हत्ती ,अनन म्हणजे मस्तक.असे ते मस्तक लावले म्हणून गजानन नाव पडले. हा भाद्रपदी सिद्धगणेश अवतार आहे. याच गजाननाने सिंधुरासुराचा वध केला म्हणून या गणपती व्रत पार्थीवगणेश पूजा व्रत म्हणून आपण करतो.ही पूजा घराघरात केली जात होती.स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लोकमान्य टिळकांनी या घरातील गणपतीव्रताला सार्वजनिक स्वरूप देऊन त्या द्वारे मेळे, सभा घेऊन स्वराज्या करिता क्रांतीची ज्योत पेटवली.पण आज आमचे दुर्दैव असे की भाऊ रंगारी का टिळक या वादात आम्ही अडकलो आहोत.

राष्ट्रीय कीर्तनकार 

*हभप.श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे*

7887534167 ,9420177506 

लेख माझ्या नावासकट पुढे पाठवावा.स्वतःच्या नावावर अथवा माझे नाव वगळून लेख प्रसिद्ध करणे कायद्याने गुन्हा आहे.

श्रावणातील औक्षण अर्थात ओवाळणे (आधुनिक व पारंपरिक याचा सुवर्ण संगम)

Energy can neither be created nor destroyed; rather, it transforms from one form to another. असे सांगितल्यास उत्तर येईल “हो न्यूटन चा नियम, माहीती आहे”, पण;

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
हे पूर्ण आहे आणि तेही पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढून घेतले असता पूर्णच उरते.
असे सांगितल्यास उत्तर येईल “हो माहीती आहे - एक पूजापाठ करताना म्हणायचा मंत्र आहे, I don’t believe this” 

अहो, न्यूटन तेच सांगतोय जे हजारो वर्षांपूर्वी ईशावास्य उपनिषद कर्त्यांनी सांगितलं. देव किंवा परमात्मा म्हणालो तर आमचा विश्वास नाही आणि एनर्जी म्हणालो तर चालते काय ? एनर्जी ला उगम नाही आणि अंतही नाही हे पटते ! सत् - चित्-आनंद याचाही अर्थ तोच असून यावर विश्वास नाही! परमात्मा म्हणा वा एनर्जी – दोन्ही एकच “अनादीअनंत”. 

“माझा देवावर विश्वास नाही” हे आताशा चालतं. पण "माझा उर्जेवर विश्वास नाही" असे एखाद्या शास्त्रज्ञांच्या परिषदेत म्हणून पहा.हकालपट्टीच होईल खास! असो. मनुष्य हा एक अनंत उर्जेच्या कणांनी बनलेला उर्जेचा गोळामात्र आहे. त्याचे अस्तित्वही उर्जा आणि त्याच्या भोवतालीही एक उर्जाच विद्यमान आहे. ज्या उर्जेला नाव आहे “ऑरा”. हा ऑरा जर संतुलीत असेल, तर आपले अस्तित्व संतुलीत! हे कसे जमेल? यावर विचार करत असताना (कदाचित्)आपल्या पूर्वजांना अनंत मार्ग सापडले – जसे स्तोत्र-मंत्र पठण, रुद्राक्ष व मंत्र धारण, अलंकार धारण, औषधी वनस्पती धारण. गंध व भस्मलेपन इ. त्यातीलच एक महत्वाचा ’ऑरारक्षक’ उपाय म्हणजे ’ओवाळणे’ अर्थात् ’औक्षण करणे’.

कुणाचा वाढदिवस असेल, कुणी परीक्षेला चाललं असेल,कुणी महत्वाच्या कामावर चाललं असेल, कुणी काही विशेष पराक्रम करून परतलं असेल तर ’ओवाळणे’ हा एक अगदी हमखास करावयाचा वैज्ञानिक विधी होता. आताही आहे, पण त्याचे अस्तित्व आता अंध: श्रद्धेपुरते राहीले आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की जीवजंतू-बाधा-अरिष्ट यांपासून मानवाचे संरक्षण करणे हे औक्षण विधीचे काम आहे.

प्रतिकारक क्षमता अल्प असलेली लहान मुलं,सतत कामानिमित्त बाहेर असणारी घरातली कर्तीमंडळी यांना So called Exposure पुष्कळ आहे. परीणामी त्यांच्या भोवतालचे उर्जावलय क्षीण होते.त्यामुळेच महाप्रचंड उर्जेचे लघु-रूप असलेल्या निरांजनाने – अक्षता-सुवर्ण-सुपारी इ. उर्जावस्तू वापरून अत्यंत सकारात्मकतेने आणि विशेष प्रेमादराने ज्यांचे हृदय ओथंबून आले आहे अशाच व्यक्तीने जर त्यांना ओवाळले तर आभावलय पुन्हा मजबूत होते आणि शरीरातील उर्जाकेंद्रे आणि सप्तचक्रे पुन्हा Activate होतात आणि व्यक्ती बरी होते, दुरूस्त होते आणि बाधामुक्त होते. वारंवार आजारी पडणार्‍या आणि प्रतिकारशक्ती कमी असणार्‍या मुलांना अथवा मोठ्यांनासुद्धा या उपायाने आराम पडताना दिसतो. जरूर अनुभव घ्यावा.

श्रावणातलं पावसाळी वातावरण, आभाळी हवा आणि जीवजंतू व रोगराई यांचे वाढलेले प्रमाण, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी-शुक्रवारी मुलांना ओवाळणे तसेच काही ना काही निमित्ताने पुन्हा-पुन्हा ओवाळणे हे विशेष संयुक्तीक आहे.
आयुष्यवान – आयुष्यमान – आयुष्यवंत अशा शब्दातून कदाचित् औक्षण आणि औक्षवंत असे शब्द तयार झाले असावेत. त्यामुळे घरातल्या सर्वांचे जर खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर अगदी डोळसपणे काही प्रथा आपण पाळाव्यातच ! असे माझे स्वच्छ मत आहे.
त्यामागचे वैज्ञानिक तथ्य समजेपर्यंत कदाचित् उशीर होतो.म्हणून श्रावणाच्या पार्श्वभूमीवर ’औक्षण’ या विषयी लिहावेसे वाटले.

जिज्ञासू आणि आक्षेप कर्त्यांचे स्वागत! पण ‘Electro-somatographic scaning’ या Test मधून प्राप्त निष्कर्षांचा अभ्यास असेल तर!

बाकीच्यांनी आवर्जून ओवाळून घ्या! ओवाळा! मोठं उर्जादायी काम आहे ते! उर्जा अमूल्य आहे! आणि हो ओवाळणीही घाला मोबदल्यात!

बैल पोळा
बैल पोळा 

बैल पोळा सण माहिती

श्रावण वद्य अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखला जातो. बैलपोळा, नंदी पोळा आणि बेंदूर असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत. नंदी किंवा नंदीबैल पूजनिय असतो. त्याचे कारण म्हणजे तो शिवाचे वाहन आहे. शिवाचे वाहन असणारा नंदी हा पुढे मार्तंड भैरवरूप खंडोबाचे वाहन घोडा झाला. त्या विषयाचा उल्लेख असा;

'शिवाने मार्तंड भैरवाचा अवतारा घेतला तेव्हा तो नंदीवर बसून आला होता. परंतु पुढे मणी दैत्याचा वध केल्यावर त्याने मणीच्या विनंती वरून मणीचा अश्वासहित रूपाचा स्वीकार केला. आणि म्हणून घोडा हे खंडोबाचे वाहन म्हणून प्रचिलीत झाले. प्रस्तुत माहात्म्य कथेतही सप्तर्षीनी व देवांनी बनविलेल्या मल्लारी-मार्तंडाची मूर्ती अश्वसहित असल्याचे म्हटले आहे. इतर काही माहात्म्यकथांत असे ही सांगितले आहे की, गुरूद्रोहामुळे शापित झालेला चंद्रमा जलरूप झाला. परंतु पुढे 'शिव जेव्हा भैरवरूप धारण करतील तेव्हा वाजित्व प्राप्त होईल`अशी आकाशवाणी झाली. आणि म्हणून चंद्राच्या विनंती वरून मार्तंड भैरवाने चंद्राचा तुरंगरूपात स्वीकार केला.

ग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकरी‍यांच्या दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण आहे. अमावस्येच्या आदल्या दिवशी खांदमळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळण्यात येते त्याला खांदमळणी असे म्हणतात. या दिवशी शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची प्रथा आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन नविन बैलाच्या नाकात घातली जाते. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. वर्षभर शेतात राबणारा बैल पोळयाच्या दिवशी मात्र नवरदेव असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. पोळ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा प्राचीन काळापासून आजतांगायत चालू आहे. गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी त्याला सोडीत. आश्विन व कार्तिक महिन्यांच्या पौर्णिमेला होणार्‍या उत्सवात मुख्यत्वे पोळा सोडीत. सोडण्यापूर्वी त्याला धुवीत, रंगवीत, सजवीत आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गाई आणून उभ्या करीत. मग त्याच्या कानात 'तू वासरांचा पिता` अशा अर्थाचा मंत्र म्हणत. 'हा तुमचा पती आहे.` अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत. पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वषिंड मोठे, शेपटी मऊ व लांब केसांची, गाल कोवळे, पृष्ठभाग रूंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकेदार, बांधा डौलदार, डरकाळी मेघगर्जनेसारखी असावी व त्याच्या तोंडात अठरा दात असावे, असे मत्स्य पुराणात सांगितले आहे.

दहा गायींच्या कळपात किमान चार बैल असावे, असे अर्थशास्त्रात सांगितले गेले आहे. बैल विकत घेताना प्रथम त्याचे वय विचारात घ्यावे. दात आणि शिंगे यांच्यावरून बैलाच्या वयाचा अदमास घेता येते. बैल चांगला की वाईट ते ठरवण्याची अनेक लक्षणे आहेत. काळा बैल उत्तम, काळया-तांबडया संमिश्र रंगाचा माध्यम व केवळ शुभ्र वर्णाचा त्याज्य समजावे. ज्याचा पार्श्वभाग रोडावलेला आहे. ज्याचा कान व शेपूट तुटलेली आहे असा बैलही अग्राह्यच. ज्याचे खुर बैगणी तो बैल मजबूत व ज्याच्या खांद्यांचा वर्ण निळा, तो बैल मर्द समजावा. शेपटीचा गोंडा काळा व ज्याच्या कानावर केस असतील तो बैल भाग्यवान असतो. लांब शिंगांच्या बैलाविषयी एका लोकगीतात म्हटले आहे, ते असे-

बडसींगा जनी लीजौ मोल । कुएँमे डारो रूपिया मोल ।

असा हा बैल महिमा आहे. बैलपोळयाच्या दिवशी रणहलगी, शिंग, ढोल, लेझीम अशी वाद्ये वाजवून गावभर बैल मिरविले जातात. शेतकरी विविध क्रीडागीते, लोकनृत्ये सादर करतात.

आपला भारत देश हा शेती प्रधान देश असल्यामुळे पोळा हा बैलांचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. आपल्याला शेती करताना बैल अत्यंत महत्वाचा उपयोगी प्राणी असून नांगरणे, वखरणे, मळणी वगैरे सर्व गोष्टी बैलाच्या मदतीनेच करतात. श्रावण वद्य अमावस्येला हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी बैलाला न्हाऊ माखू घालून सजवतात व त्याची पूजा करतात. त्याच्या साठी मुद्दाम गोडाचे जेवण तयार करतात व वाजत गाजत त्याची मिरवणूकही काढतात. 

आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण केला जातो.

नागपंचमी

श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘ नागपंचमी ’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य असते. या सर्व गोष्टींमागील इतिहास आणि शास्त्र आपण जाणून घेणार आहोत.

१. तिथी
नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो.

२. इतिहास
अ. सर्पयज्ञ करणार्या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता.
आ. ‘शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो. तो पाताळात राहातो. त्याला सहस्र फणे आहेत. प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. त्याची उत्पत्ती श्रीविष्णूच्या तमोगुणापासून झाली, असे म्हटले जाते. श्रीविष्णु प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो. त्रेतायुगात श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापर आणि कली या युगांच्या संधीकाळात कृष्णाचा अवतार झाला. त्या वेळी शेष बलराम झाला.

इ. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.

ई. पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

३ नागपूजनाचे महत्त्व

अ. ‘नागांतील श्रेष्ठ जो ‘अनंत’ तोच मी’, अशी गीतेत (१०.२९) श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो.

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् । शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं, कालियं तथा ।।
अर्थ: अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही.

४. नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व

सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. ‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते.

५. नवीन वस्त्रे आणि अलंकार घालण्याचे कारण

सत्येश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्वरी समाधानी झाली. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात.

६. मेंदी लावण्याचे महत्त्व

नागराज सत्येश्वराच्या रूपात सत्यश्वेरीच्या पुढ्यात उभा राहिला. ‘तो निघून जाईल’, असे वाटून तिने त्याच्याकडून, म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले. ते वचन देतांना सत्येश्वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातांवर मेंदी काढते.

७. नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्यामागील इतिहास

पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसर्या दिवशी सत्येश्वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो – जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत.

८. नागपंचमी साजरी करतांना करावयाच्या प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभ

अ. नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्यालहरी आकर्षित होतात.
आ. झोका खेळल्याने क्षात्रभाव आणि भक्तीभाव वाढून त्यातून सात्त्विकतेच्या लहरी मिळतात.
इ. उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते.
उ. ‘जी स्त्री नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करते, तिला शक्तीतत्त्व प्राप्त होते.
ऊ. या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे ‘भाऊ’ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते.
ए. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे नागदेवतेस प्रसन्न करून घेणे.
ऐ. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जिवाला ३६४ दिवस उपयुक्त ठरतात.

९. नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करायची प्रार्थना

नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते, त्या बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते. त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या दिवशी ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना करावी.

१०. निषेध

नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे आणि तळणे या क्रिया निषिद्ध असण्याचे कारण

कापणे, चिरणे आणि तळणे, या प्रक्रियांतून रज-तमाशी संबंधित इच्छालहरी, म्हणजेच देवताजन्य इच्छालहरींच्या कार्याला अवरोध करणार्या लहरी वायूमंडलात ऊत्सर्जित होण्याचे प्रमाण जास्त असल्याने या दिवशी नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो. या कारणास्तव नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते; म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे, तळणे, तसेच भूमी उकरणे, नांगरणे, या कृती निषिद्ध मानल्या आहेत.

नारळी पौर्णिमा (श्रावण पौर्णिमा)

वरुणदेवतेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर सदैव रहावी, यासाठी समुद्रकिनारी रहाणारे आणि समुद्राच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवणारे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. या दिवशी समुद्राचे पूजन केले जाते. नागपंचमीनंतर श्रावण महिन्यात येणारा हा दुसरा महत्त्वाचा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. ‘या दिवशी आपतत्त्वरूपी वायूमंडलाचे प्रमाण सागरी किनारा, तसेच नदीकाठ यांठिकाणी जास्त प्रमाणात असते. म्हणून तो प्रदेश पूजाविधीसाठी जास्त उपयुक्त मानला जातो. या दिवशी वरुणदेवतेचा आशीर्वाद मिळवून ब्रह्मांडातील अधिकतम प्रमाणात आपतत्त्वस्वरूप लहरी ग्रहण करण्याचा प्रयत्न केला जातो.’ श्रावण पौर्णिमेला समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. यादिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम आणि संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. ‘सागरे सर्व तीर्थानि’ असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो. ‘नारळी पौर्णिमेच्या अगोदर समुद्राला भरती येणे, तसेच लाटांचे प्रमाण अधिक असणे, यांमुळे समुद्र खवळलेला असतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रदेवतेला नारळ अर्पण करतात. तसेच ‘तुझ्या रौद्ररूपापासून आमचे रक्षण होऊ दे आणि तुझा आशीर्वाद प्राप्त होऊ दे’, अशी प्रार्थनाही करतात. त्यामुळे समुद्राला येणार्‍या भरतीचे प्रमाण अल्प होते.’ नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही; त्यामुळे तो भावपूर्ण हळुवारपणे पाण्यात सोडावा अन् वरील प्रार्थना करावी! नारळी पौर्णिमेला नारळाचे पुजन करुन श्रीफळ समुद्राला अर्पण करण्यापूर्वी त्याचे पूजन करण्यात येते. श्रीफळाचे पूजन केल्याने त्यात परमेश्वरी तत्त्वाचे वलय कार्यरत होते. समुद्रदेवतेला शरणागत भावाने नारळ अर्पण केल्यामुळे चैतन्याचा प्रवाह समुद्राकडे प्रक्षेपित होतो.समुद्रदेवतेचे भावपूर्ण पूजन केल्यामुळे परमेश्वरी तत्त्वाचा प्रवाह समुद्रात आकृष्ट होतो.

जानवे (यज्ञोपवित)

श्रावण महिन्यात आपण जानवे (यज्ञोपवित) बदलतो परंतु जानवे (यज्ञोपवित) का बदलावे व यज्ञोपविताचे धर्म शास्त्रीय स्वरुप काय? हे पाहू. यज्ञोपवीत हे देखील हिंदू धर्मातील प्रत्येक पुरूष व्यक्तीचे व्यवच्छेदक चिन्ह (लक्षण) मानले जाते. यज्ञोपवितास ब्रह्मसूत्र, यज्ञसूत्र, जानवे, जनेउ अशा विविध संज्ञा आहेत.

९६ चौन्गे (१ चौन्गा - चार अंगुळे) लांबी असलेल्या सूतास कोठेही न तोडता त्रिगुणिकरण करून व त्यास ब्रह्मगाठ मारुन यज्ञोपवीत तयार केले जाते. शास्त्रोक्त यज्ञोपवितामध्ये तीन मुख्य पदर, प्रत्येक मुख्य पदराचे तीन उपपदर आणि प्रत्येक उपपदराचे तीन सूक्ष्मतंतू दिसतील. हा सूक्ष्म तंतू म्हणजेच मूळचा ९६ चौन्गे लांबी असलेला मुख्य धागा होय. 

वास्तविक, शास्त्रानुसार स्वत: किंवा स्वकुटुंबातील स्त्रीनेच यज्ञोपवीत तयार केले पाहिजे. अन्य व्यक्तीने तयार केलेले यज्ञोपवीत स्वत: साठी वापरता येत नाही. तथापि, सांप्रतकाळी बाजारात तयार यज्ञोपविताची उपलब्धि असल्यामुळे ते घेण्याकडेच बहुतेक जणांचा कल असतो. अनिवार्यपक्षी ते घेण्यास हरकत नाही. पण सूत कातून घरच्या घरीच यज्ञोपवीत तयार करणे ह्यास प्राधान्य दिले पाहिजे. सूत कातणे शक्य नसेल तर ते विकत घेणे क्रमप्राप्त ठरते. ब्रह्मगाठ कशी मारावयाची हे शिकून घेतल्यास यज्ञोपवीत तयार करणे सहज शक्य आहे. त्यामुळे वर्षातून निदान एकदा तरी (विशेषत: श्रावणीच्या दिवशी) जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली स्वत: तयार केलेले यज्ञोपवीत घालतात.

यज्ञोपविताच्या सुताची लांबी ९६ चौन्गे असण्यामागे अनेक कारणे असून त्यापैकी काही कारणे पुढील प्रमाणे आहेत - प्रथम म्हणजे ' चतुर्वेदेषु गायत्री चतुर्विन्शत्येकाक्षरा | तस्मात् चतुर्गुणं कृत्वा ब्रह्मसूत्र मुदिरयेत् ||' २४ अक्षरयुक्त गायत्री चारही वेदांमध्ये आलेली असल्यामुळे त्यानुसार ब्रह्मसूत्राची लांबी (२४ जे ४ = ९६) असते. 
दुसरे म्हणजे - तिथीवारं च नक्षत्रं तत्ववेदगुणांन्वितम् | कालत्रयम् च मासाश्च ब्रह्मसूत्रं हि षण्णाव ||’ अर्थात - ' ४ वेद + ३ काल + २५ तत्वे + ३ गुण + १५ तिथी + ७ वार + २७ नक्षत्रे + १२ महिने = ९६; ह्या सर्वांच्या येणाऱ्या बेरजेनुसार लांबी असते. तिसरे म्हणजे, सामुद्रिक शास्त्रात पुरुषाचे प्रमाण स्वत:च्या अंगुलांनी ८४ ते १०८ पर्यंत असते. त्यांची सरासरी ९६ अंगुळे येते. ह्यावरून ब्रह्मसूत्राची लांबी ९६ चौन्गे असावी हे निष्पन्न होते. यज्ञोपवितातील तीन मुख्य पदर पुढील त्रयिन्चे प्रतिनिधित्व करतात. 

ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ हे तीन आश्रम; गार्हपत्य, दक्षिणाग्नि, आहवनीय हे तीन अग्नी; सत्व , रज, तम हे तीन गुण आणि पृथ्वी, अंतरीक्ष, द्द्यू हे तीन लोक. 

यज्ञोपविताच्या प्रत्येक पदरात एकूण नउ सूक्ष्मतंतू असतात व त्यांवर अनुक्रमे ॐ कार , अग्नी, नाग, सोम, पितृ, प्रजापती, वायू, सूर्य आणि विश्वदेव ह्या जगाच्या उत्पत्तीकारक देवता अधिष्ठित असतात. 

प्रत्येक पदरावर (दोरकावर) अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद आणि ब्रह्मग्रंथीवर अथर्ववेद अधिष्ठित असतो. त्यामुळेच - ‘यज्ञोपवितं परमं पवित्रं प्रजापतेर् यत् सहजं पुरस्तात् | आयुष्यमग्र्यं प्रतिमुन्च शुभ्रम यज्ञोपवितं बलमस्तु तेज: ||' अर्थात, यज्ञोपवीत हे अत्यंत पवित्र असून ते पुरातन काळी ब्रह्मदेवाबरोबरच उत्पन्न झालेले 
आहे. ह्या यज्ञोपविताकडून माझ्या ठायी उत्तम व किर्तीयुक्त आयुष्याची तसेच बलाची व तेजाची स्थापना होवो'. असे म्हटले जाते. परमपवित्र अशा यज्ञोपवितातील नउ सुतांच्या आधारे स्वर्गादिकांची प्राप्ती होऊ शकते.' सुतावरून स्वर्ग गाठणे' ह्या मराठी म्हणीतील सूत (ब्रह्मसूत्र) ते हेच.

यज्ञोपवितातील लांबी जास्तीतजास्त कमरे पर्यंत असावी आणि कमीतकमी बेंबीपर्यंत असावी. ही लांबी उपरोक्त प्रमाणात यावी म्हणूनच यज्ञोपविताच्या मुख्य सुताची लांबी ते धारण करणार्या व्यक्तीच्या अंगुलीप्रमाणानुसार असावी असे शास्त्र सांगते. जानवी किती घालावीत ह्या विषयी शास्त्रसंकेत असा की, ब्रह्मचार्याने एक आणि गृहस्थ व वानप्रस्थिय ह्यांनी दोन जानवी घालावीत. आंघोळीच्या वेळेस जानवे खांद्या वरुन खाली न येऊ देता हाताने घासून स्वच्छ करवे. रजस्वला, ओळी बालंतीण, मृतदेह, चिताकाष्ठ, चिताधूम ह्यांचा शरीराला स्पर्श झाला असेल तर शीतोदकाने सचैल स्नान करून अभीमंत्रणपूर्वक नवीन जानवे घालावे व पूर्वीचे जानवे काढून विसर्जन करावे. एरवी देखील कोणतेही कारण नसेल तरी दर चार महिन्यांनी जानवे बद्लावे असे शास्त्र सांगते. 'निवीती दक्षिणकर्ने यज्ञोपवितं कृत्वा मुत्रपुरीषे विसृजेत |' ह्या शास्त्र वचनानुसार शौचसमयी व मुत्रविसर्जनाच्यावेळी जानवे उजव्या कानाभोवती लपेटणे आवश्यक आहे. आपली अशुचि अवस्था सूचीत करण्यासाठी देखील ही कृती उपयोगी पडते. हातपाय धुऊन चुळा भरल्यावर जानवे कानावरुन काढावे. ह्यामागे शास्त्रीय कारण म्हणजे, शरीराचा नाभिप्रदेशापासून वरचा भाग धार्मिक क्रियांसाठी पवित्र व त्याखालील भाग अपवित्र मानला गेलेला आहे. शास्त्रात उजव्या कानाचे महत्व सांगितलेले असून आदित्य, वसू, रुद्र, अग्नी, धर्म, वेद, आप, सोम, सूर्य, अनिल प्रभ्रूती देवतांचा वास उजव्या कानात असल्यामुळे उजव्या कानाला उजव्या हाताने केवळ स्पर्श केला तरी आचमनाचे फळ मिळते. दुसरे म्हणजे उजव्या कानाला सुत्राने लपेटल्यावर शुक्रनाशापासून बचाव होतो हे आयुर्वेदशास्त्र दृष्ट्या सिध्द झालेले आहे.

तात्पर्य, केवळ शास्त्र म्हणून नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने यज्ञोपवीत घालणे हे उपकारक असल्यामुळेही यज्ञोपवीत सदा धारण केलेले असावे.

चातुर्मासात कांदा लसूण खाण्यास मनाई का असते याचे पौराणिक कारण

त्या मागे एक पौराणिक कथा आहे. की समुद्रमंथनातून निघालेले अमृत मोहिनी रूप घेतलेल्या विष्णु भगवान जेव्हा सर्व देवाना वाटत होते. तेव्हा एक राक्षस देव बनून त्याच्यात येऊन बसला होता, विष्णूने त्यास देव समजून अमृत दिले. पण तेव्हा त्यास सूर्य व चंद्राने  बघितले की हा राहू आहे. तेव्हा भगवान विष्णुने लगेच त्याचे मस्तक धडा वेगळे केले. पण राहूच्या मुखात ते अमृत पोहचले होते त्यामुळे राहू अमर झाला होता. भगवान विष्णु द्वारा राहूचे मस्तक कापल्यावर त्याच्या तुटलेल्या मस्तकातून काही अमृताचे कण जमीन पडले त्यापासून कांदा आणि लसूणाची निर्मिती झाली. हे अमृताच्या थेंबापासून बनले म्हणून यामुळे अनेक रोग बरे होऊ शकतात, हे दोन्ही कंद फार अौषधी आहेत. पण हे अमृताचे थेंब राक्षसाच्या मुखातून होऊन खाली पडले आहेत म्हणून या कांदा व लसणाला उग्रदर्प आहे. व हे कंद राक्षसाच्या अंगातून पडल्या तयार झाले म्हणून कांदा लसूण अपवित्र आहेत. म्हणून भगवंताच्या नैवेद्यासाठी याचा वापर केला जात नाही. असे म्हटले जाते की जो कोणी कांदा लसूण खातो त्याचे शरीर राक्षसासारखे मजबूत होते. व त्याच बरोबर त्याची बुध्दी, विचार राक्षसासारखे दूषित होतात. हे कांदा लसूण मांस समान मानले आहे. जो कांदा लसूण खातो त्याचे मन व शरीर तामसिक स्वभावाचे होते. हे जास्त खाल्ल्यामुळे ध्यान भजन पूजेत मन लागत नाही. सर्व सेवा पतन होते. म्हणून कांदा लसूण खाणे शास्त्राने मनाई केली आहे.