श्रीहरिनाथ महाराज मुखेड

प. पू. श्रीहरिनाथ महाराज मुखेड
प. पू. श्रीहरिनाथ महाराज मुखेड

नाव: हरिनाथ वामन कुलकर्णी
प. पू. श्रीहरिनाथ महाराज मुखेड  हे जोगन विठामाई यांचे हे सत्शिष्य आहेत

दत्तसंप्रदायात अतिशय भक्तीने म्हंटले जाणारे "जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना" हे पद संत हरिनाथ महाराज यांनी रचले आहे.

कुलकर्णी असे कुळ | वामन काशीबाई प्रेमळ |
त्यांचा पुत्र सोज्वळ | नाव असे हरिभाऊ ||१||

करिती सदा दत्तभक्ती | मोक्षदाते श्रीसद्गुरू मिळतील |
जोगन विठामाई असती | श्रीसद्गुरू हरिधाथांच्या ||२ ||

गोरक्षनाथांचा अंशावतार | प्रगटला सगुण साकार |
दीन- दुबळ्यांचे तारणहार | श्री हरिनाथ महाराज ||३ ||

श्रीगुरूप्रेमामृत ऐसा | उत्तम ग्रंथ रचिती खासा |
घेतला दत्तभक्तीचा वसा | श्रीहरिनाथ महाराजांनी ||४||

विठामाईंची करिती सेवा | देती नाथभक्तीचा मेवा |
विठामाईंसी नमस्कार करावा | ऐसे सांगती महाराज ||५||

विठामाईंपादुका उजव्या हाती | गोरक्ष मुद्रा कानी असती |
गळ्यात माळ धोतर नेसती | ऐसा वेश हरिनाथांचा ||६||

शुभराय मठ सोलापुरात | श्रीशंकर महाराज येत |
श्रीहरिनाथांसी म्हणत | तू गोरक्ष संप्रदायाचा ||७||

धनकवडी येथे मठात | हरिनाथ महाराज येत |
स्वरचित अभंग म्हणत | श्रीशंकर बाबांच्या समाधीपुढे ||८||

मार्गशीर्ष शुद्ध दशमीस | देह अर्पिती धरेस |
मुखेड येथे समाधीस | घेती हरिनाथ महाराज ||९||

आजि असे पुण्यतिथी | जागवू तयांची स्मृती |
दिधली संक्षिप्त माहिती | श्रीसद्गुरूकृपेने वैभवाने ||१० ||


©वैभव दातार


हरिनाथ महाराजांचे सोवळेओवळे अतिशय कडक असे. कुठेही गेले तरी ते देव्हारा मांडून पूजा करीत असत. प्रत्येक गोष्ट ते गुरूआज्ञा घेऊनच करीत. रोज दुपारचा नैवेद्य दाखविल्यानंतर तितकेच अन्न खाऊन ते दिवसभर राहत असत.
प.पू. जोगन विठामाईचे शिष्य हरिभाऊ कुलकर्णी म्हणजेच हरिनाथ महाराज. विठामाई नाथसंप्रदायातील महान योगिनी होत्या. त्यांचे चरित्र अवलियांचे जनस्थान या मालिकेत येऊन गेले आहे. त्यांचेच परमशिष्य म्हणजे हरिनाथ महाराज. काशीबाई व वामनराव या मातापित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. तारूखेडले हे त्यांचे कुलकर्णी वतनाचे गाव. तथापि त्यांचा जन्म आजोळी धामोरी, ता. कोपरगाव येथे अडबंगनाथाचे पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावी झाला. बालपणीचे शिक्षण कोपरगावी झाले येथेच त्यांना जोगन विठामाई भेटल्या आणि त्यांच्यावर कृपानुग्रह झाला.

लहानपणापासूनच त्यांच्या रोमारोमात दत्तभक्ती रुजली होती. आपल्यावर दत्त महाराजांची कृपादृष्टी व्हावी अशी ओढ त्यांना लागली होती. पुढे दैवयोगाने त्यांची शहाग्रामी विठामाईंशी पहिली भेट झाली. माईंच्या स्पर्शाने, कृपादृष्टीने ते भारावून गेले. पुढे काही काळानंतर पुन्हा एकदा कोपरगावला विठामाईंशी भेट झाली. गुरुभक्तीचा धागा अधिकच दृढ झाला. ही गुरू-शिष्याची जोडी म्हणजे समर्थ रामदास स्वामी व कल्याण, निवृत्तिनाथ व ज्ञानेश्वर यांच्यामध्ये जसा गुरूसेवेचा आणि गुरूप्रेमाचा अखंड झरा वाहत होता, तसेच यांच्याबाबत होते.

पुण्याचे योगी ज्ञाननाथजी रानडे सांगतात, ‘‘प.पू. जोगन विठामाई आणि हरिनाथ यांची गुरू-शिष्य परंपरा आणि तपश्चर्या माझ्या मनात खोलवर रुजलेली आहे. त्याचा आनंद मी वेळोवेळी घेत असतो. काही कामानिमित्त सोलापूरला गेले असता परमपूज्य शंभूनाथ महाराजांच्या मठात प.पू. शंकर महाराज आलेले असून, त्यांचा मुक्काम होता. महाराजांचे दर्शन घेतले. तेव्हा ते म्हणाले, ‘तू गोरक्ष संप्रदायाचा, तुझी एका दत्त गोरक्ष सांप्रदायी व्यक्तीशी ओळख करून देतो.’ ती व्यक्ती म्हणजे हरिनाथ महाराज होते. प.पू. शंकर महाराजांनी आमची ओळख करून दिली. लांब दाढी, मानेपर्यंत असलेल्या जटा, गळ्यापासून गुडघ्यापर्यंत रामदासी संप्रदायाप्रमाणे धोतर नेसलेले, गळ्यात रुद्राक्षाची माळ, उजव्या हातात पंचधातूच्या, जोगन विठामाईंच्या पादुका बांधलेल्या. कानाच्या पाळ्यामध्ये छोट्या मुद्रा. त्यावर ‘गोरक्ष’ असे शब्द आणि समोर एका लहानशा गादीवर प.पू. विठामाईंचा फोटो, दोन्ही बाजूला दोन उशा, समोर पूजेचे साहित्य तीर्थाचे पळीपंचपात्र असे हरिनाथांचे प्रथम दर्शन झाले.’’

हरिनाथ महाराजांचे सोवळेओवळे अतिशय कडक असे. कुठेही गेले तरी ते देव्हारा मांडून पूजा करीत असत. आपले सद््गुरू जोगन विठामाई आणि गुरुदेव दत्तात्रेय यांच्याव्यतिरिक्त त्यांचा कुठलाही भाव नव्हता. आपली प्रत्येक गोष्ट ते गुरूआज्ञा घेऊनच करीत. रोज दुपारचा नैवेद्य दाखविल्यानंतर तितकेच अन्न खाऊन ते दिवसभर राहत असत.

दुपारी जेवण झाल्यानंतर विश्रांतीच्या वेळी प्रत्यक्ष विठामाईच निजल्या आहेत या श्रद्धेने हरिनाथ महाराज त्यांच्या फोटोवर पांघरूण घालत असत. विश्रांती झाल्यावर चूळ भरण्यासाठी विठामाईंच्या फोटोसमोर पाण्याचे भांडे अदबीने धरीत. माईंनी चूळ भरली असे समजून मग स्वत: चूळ भरीत. माई तंबाखू खात असत. ती वेळ आली, की हरिनाथ महाराज तंबाखू आणि चुन्याची डबी माईंच्या फोटोसमोर धरीत, प्रत्यक्ष ते देत आहेत अशा आविर्भावात श्रद्धेने करीत. केवळ लोकांना देखावा म्हणून ते या गोष्टी करीत नसत. आजूबाजूला भक्तगण असोत अगर नसोत, त्यांचे हे काम श्रद्धेने व तन्मयतेने चाले. हरिनाथ महाराजांची गुरुभक्तीच यातून आपल्याला दिसून येते. हरिनाथांच्या गुरुभक्तीतल्या अनेक आठवणी आहेत. विठामाईंना आयुष्याच्या शेवटी हालचाल करणे अशक्य झाले होते. स्वत:चे स्वत: उठताबसता येत नव्हते. अशा वेळी सर्व प्रकारची सेवा त्यांनी केली. अशी निस्सीम गुरुभक्ती अलीकडच्या काळात पाहायला मिळत नाही. या दास्यभक्तीतूनच स्वत:ला ‘हरिनाथ सेवेकरी’ असे ते म्हणवून घेत.

हरिनाथ महाराजांनी ‘श्री गुरूप्रेमामृत’ हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाविषयी अद््भुत कथा आहे. आल्या सद््गुरूंनीच हा प्रासादिक ग्रंथ आपल्याकडून लिहून घेतला अशी त्यांची श्रद्धा होती. श्री गुरूप्रेमामृत ग्रंथ पूर्ण झाल्यावर तो सप्तशृंगगडावर जगन्मातेला वाचून दाखवावा या हेतूने ते गडावर गेले. परंतु देवीचा दृष्टान्त झाला, की ग्रंथ माझ्यासमोर न वाचता प्रथम दादांना वाचून दाखव. दादा म्हणजे मोरगाव क्षेत्रीचे मंगलमूर्ती गणराजदादा असा उलगडाही आईसाहेबांनी केला. त्यामुळे हरिनाथ महाराजांनी प्रथम मोरगावला मंगलमूर्ती गणेशासमोर ग्रंथाचे प्रथम वाचन केले आणि मग गडावर आईसाहेबांना हा ग्रंथ वाचून दाखवला. या ग्रंथाला मंगलमूर्ती गणराज व आईसाहेबांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. गुरुचरित्राप्रमाणेच पवित्र असा हा ग्रंथ असून, साधकांना साधनेमध्ये उपयोगी पडणारा आहे.

हरिनाथांनी अनेक आरत्या, मातृस्तवने लिहिली. ती नाथभक्तांमध्ये अत्यंत प्रिय आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात गाणगापूरच्या अनेक वाऱ्या केल्या, तसेच अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. मुख्य म्हणजे अनेक मुमुक्षूजनांना, आर्त जनांना त्यांनी सन्मार्गाचा सोपान दाखवून त्यांच्यात भक्तीचे बीजारोपण केले. ते म्हणत, ‘आपल्या सद््गुरूंवर अनन्य निष्ठा ठेवून आयुष्य मार्गक्रमण करा म्हणजे संकटे आली तरी ती पचविण्याचे सामर्थ्य तो देतो. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून जे चालले त्यांचे आयुष्यात कल्याणच झाले.’ प.पू.विठामाईंनी आपला देह शेवटी मुखेडलाच ठेवला आणि तेच हरिनाथ महाराजांचे श्रद्धास्थान व साधनास्थान झाले. मुखेडला सद््गुरूंचे लोकोद्धाराचे कार्य पुढे अनन्य निष्ठेने सुरू ठेवले. आजही तेथे गुरूंच्या दरबारात गोरक्षनाथांची निष्ठेने भक्ती सुरू आहे.

हरिनाथ महाराजांनी शेवटपर्यंत मनोभावे सद््गुरूसेवा केली आणि गुरुभक्ती शेवटच्या श्वासापर्यंत जपली. आयुष्यभर आपल्या गुरूंशी ते एकनिष्ठ राहिले. सद््गुरूंनी प्रसाद म्हणून दिलेल्या पादुका आयुष्यभर हातात बांधून ठेवल्या. त्यांच्या दर्शनासाठी कुणी आल्यास ते नमस्कार करू देत नसत तर सद््गुरूंच्या पादुका पुढे करीत असत. अशी ही गुरू-शिष्याची जोडी या युगात पाहायला मिळणे अवघड आहे. शेवटी आपला शेवटचा श्वासही त्यांनी आपल्या गुरुचरणी मार्गशीर्ष शु १०, इ.स. १९९४ मध्ये मुखेडला सोडला. या गुरू-शिष्य जोडीमुळे मुखेडला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले असून, दर्जाही मिळाला आहे. वर्षभराचे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. मुखेड हे ठिकाण नाशिक-औरंगाबाद हायवेपासून नाशिकपासून ७५ किमी अंतरावर आहे. जाताना डावीकडे मुखेडचा फाटा असून, आत अंतर ५ किमी आहे.

(अ. वि. पाठक यांच्या संग्रहातून)