श्री गजानन महाराज प्रकट दिन

गजानन महाराज यांच्या प्रकट होण्याची कथा 

श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. परंतु गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे:

"कोण हा कोठीचा काहीच कळेना।
 ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती।  
आलीसे प्रचिती बहुतांना॥"

जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, - "दंड गर्दन पिळदार। भव्य छाती दृष्टी स्थिर। भृकुटी ठायी झाली असे॥" 

जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी *तुर्या* अवस्थेत होते .तुर्या* अवस्था : जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणगे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात)  महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे:

"बंकटलालाचे घर। झाले असे पंढरपूर।  लांबलांबूनीया दर्शनास येती। लोक ते पावती समाधान॥,"

बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात. शेगांवात राहून महाराजांनी अनेक लीला करून लोकांचे कल्याण केले व त्यांना भक्तीमार्गाला लावले.

सद्‌गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्‌गुरू होते. या संदर्भात असे सांगितले जाते की ज्या दिवशी तरूण वयातील गजानन महाराज श्री स्वामींना भेटण्यास अक्कलकोटला येणार होते त्यादिवशी श्री स्वामी अतिशय आनंदात होते. तसेच दुरून गजानन महाराजांना (१७-१८ वर्षे वयाचे) येताना पाहून ते अतिशय आनंदाने उद्गारले, "गणपती आला रे!" त्यावर त्यांनी गजानन महाराजांना स्वतःच्या मांडीवर बसवून घेऊन त्यांचे प्रेमाने स्वागत केले. असे सांगितले जाते की केवळ एकच महिना गजानन महाराजांना स्वतःजवळ ठेऊन घेतल्यानंतर श्री स्वामींनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखविण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरूष देव मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्मविषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले . त्यांच्याच सूचनेनुसार महाराजांनी पुढे आपले कार्यक्षेत्र शेगांव येथे निश्चित केले.

देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले:

"मी गेलो ऐसे मानू नका। भक्तित अंतर करू नका।
कदा मजलागी विसरु नका। मी आहे येथेच॥" 
"दु:ख न करावे यत्किंचित। आम्ही आहोत येथेच। 
तुम्हा सांभाळण्यापरी सत्य। तुमचा विसर पडणे नसे॥."

त्यामुळेच जरी गजानन महाराजांनी समाधी घेतली तरी आजही त्यांच्या भक्तांना त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे. 

खरेतर१८७८मधली गोष्ट......

महाराज प्रकट कसे झाले?

शेगावच्या पातूरकरांच्या घरी एक कार्यक्रम होता. साऱ्या गावालाच जेवणासाठी निमंत्रण होते. पंचपक्वाने बनवली होती. पंगती सुरू होत्या. वापरुन झालेल्या पत्रावळी बाहेर एका ठिकाणी गोळा करून ठेवल्या जात होत्या.अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरला. त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते. तो त्या खरकटया पत्रावळीतील अन्न पदार्थ खाऊ लागला. त्याच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तुंब आणि मातीची चिलीम होती. परंतु चेहऱ्यावर अपार समाधान आणि शांती होती.

बंकटलाल अगरवाल आणि दामोदर पंत कुळकर्णी त्याचवेळी तिथून जात होते. त्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांना वाटले, “हा कोणी विक्षिप्त असावा” पण त्या तरुणाच्या मुद्रेवरील तेज विलक्षण होते.

सर्व सृष्टीत परमेश्वर

आगरवालांनी पातुरकरांकडून पंचपक्वान्नांनी भरलेले ताट आणले आणि त्या तरुणासमोर ठेवले. खूप आग्रह केल्यावर अखेर त्या तरुणाने सर्व पक्वान्ने एकत्र केली आणि खाऊन टाकली. नंतर तो जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागला.

"ते पाणी घाण आहे. ते पिऊ नका ". दामोदरपंत कुळकर्णी म्हणाले. " घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच. उष्टे, खरकटे व पंच पक्वांन्ने एकच. सर्व सृष्टीत परमेश्वर आहे. घाण पाणी म्हणजेच परमेश्वर, स्वच्छ पाणी म्हणजेही परमेश्वर आणि पाणी देणाराही परमेश्वर आणि पिणाराही परमेश्वरच." तो तरुण म्हणाला.

हे ऐकताच बंकटलालांची खात्री पटली की हा कुणी सामान्य तरुण नव्हे. हे कोणी विरागी साधू पुरुष आहेत. ते दोघे त्यांचे पाय धरण्यास धावले तोवर ते विरागी साधू अदृश्य झाले.

हे साधुपुरुष होते, साक्षात गजानन महाराज आणि ते शेगावात अवतरले तो दिवस होता शके 1800 मधील माघ वद्य सप्तमी अर्थात 23 फेब्रुवारी 1878. या दिवशी लोकांना त्याचे प्रथम दर्शन झाले. ते मूळ कोण, कुठले, कुठून आले याविषयी कुणालाही काहीही माहिती नाही. 

 महाराजांचा भक्ती उपदेश

श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा असे त्यांचे वर्तन होते. ते गूढी, परमहंस संन्यासी, जीवनमुक्त असे महान संत होते.'गण गण गणात बोते' हा त्यांनी दिलेला मंत्र होता. त्यामुळेच त्यांचे नाव गजानन महाराज पडले. महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले.

अक्कलकोट स्वामींचा उपदेश

असं म्हणतात की अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना आज्ञा केली “तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्व पटवून दे.नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि तिथल्या देव मामेलदारला भेट आणि मग पुढे जा.”

महाराज नाशिकला आले. श्रीराम मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. त्यांनी उंबरठयावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला. “हे असं भलतंच काय होतंय ?” असं मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले आणि फुले वाहिली.आश्चर्य म्हणजे श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. महाराजांनी त्याच्या डोक्यावरून आईच्या ममतेने हात फिरवला.

“अरे तुझे जीवन पिंजऱ्यातल्या पोपटासारखे झाले आहे. तुझ्या अंतरी अजूनही षडरिपु पशु बनून राहिलेले आहेत त्यांना दूर कर. अखंड श्रीराम नाम घे आणि मुक्त होऊन जा." पुजाऱ्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि उठून पाहतो तर काय ? ती दिव्य विभूती तिथून अदृश्य झाली होती.

 महाराजांचे भक्तिकार्य

आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगांवमध्ये व्यतीत केला. तरीही आवश्यकतेप्रमाणे ते अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या लहानमोठ्या गावातही जात.

उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत.

त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मगिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मगिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत.

अद्वैत सिद्धांतवादी महाराज

कुत्रा, गाय, घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले. एका भक्ताला त्यांनी प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडविले होते. महाराजांनी दिलेले तीर्थप्राशन केल्यानंतर जानराव देशमुख हे भक्त मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले.अनेक पाखंडी लोकांचे गर्वहरणही त्यांनी केले आहे. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले आढळतात.

महाराज हे अद्वैतसिध्दांतवादी होते. त्यांनी कोणालाही कधीच मंत्रदीक्षा दिली नाही. गजानन महाराज हे ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते . दांभिकतेचा त्यांना फार तिरस्कार होता.

विठोबा घाटोळ नावाच्या त्यांच्या सेवेकऱ्याने जेव्हा महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करून फसविणे असे प्रकार सुरू केले तेव्हा महाराजांनी त्याला धरून काठीने चांगलेच बदडून काढले.

महाराजांची देववाणी

कोणत्याही घटनेविषयी सांगताना ते अचूकपणे ओव्या व ऋचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. महाराज अंतर्ज्ञानी होते. मात्र त्यांनी कोणत्याही भक्ताशी थेटपणे फारसा संवाद साधला नाही. त्यांचे बोलणे भरभर, परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वत:मध्ये मग्न राहून ते बोलत असत.

त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते.

विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. 08 सप्टेंबर 1910 रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे संजीवन समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दुःखसागरात बुडाले.

महारांजाचे भक्तांवर अपरंपार प्रेम होते. देहत्यागानंतरही भक्तांना सांभाळण्याचे वचन महाराजांनी दिले आहे. देह त्यागुन महाराज ब्रम्हीभुत झाल्या कारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आर्शिवाद आणि मार्गदर्शन लाभते आहे.

महाराजांचे समाधीस्थान असलेले शेगाव संस्थान आज जगाच्या नकाशावर दिमाखात उभे आहे. सर्व मंदिर व्यवस्थापनांना शिस्त, स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापन यासाठी शेगाव संस्थानाने एक आदर्शच घालून दिला आहे.

गण गण गणात बोते । हे भजन प्रिय सद्गुरुते ।। या श्रेष्ठ गजानन गुरुते । तुम्ही आठवीत राहायाते ।।
हे स्तोत्र नसे अमृत ते । मंत्राची योग्यता याते ।। हे संजीवनी आहे नुसते । व्यावहारिक अर्थ न याते ।।