श्री स्वामी समर्थ समाधी दिवस

अनंत हे अनंतात विलीन झाले.

समस्त जीवांस अक्कलकोट मध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्म मूर्ती चैत्र वद्य त्रयोदशी, सहवद्य चतुर्दशी, शके १८००, सन १८७८ला समाधी लीलेचे निमित्त करून पृथ्वी तला वरून गुप्त झाली.

प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे, याची जराही कल्पना कुणास नव्हती. मागील पंधरा दिवसांत काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवित होते खरे! बारा दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते. पण त्या दिवशी काकुबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली. मग त्यांना निजविले. तेव्हा बाळप्पांनी सुपारी दिली, ती घेतली. 

राणीसाहेबही तिथे होत्या. त्यांना अत्यानंद झाला. “आता माझ्या महाराजांस भय नाही,” असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या. पण त्या दिवशी समर्थकृपेने साधुत्वाला पोचलेल्या असंख्य साधकांचा हृदयाचा ठोका चुकला होता हे खरे!

पेठेतल्या चोळप्पांच्या घरात महाराजांची गाय व वासरू होते. तिथे भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती. वासरूही हंबरत होते. 

इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते, ते पहा- दुपारी १ वाजण्या च्या सुमारास श्रीस्वामी गुरूंनी आपल्या सर्व जनावरांस समोर आणण्याचे फर्मावले. हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले. लागलीच त्या प्राण्यांना श्रींसमोर आणण्यात आले. त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामीआज्ञा झाली. इतकेच काय, आपली वस्त्रेही श्रींनी त्या इमानी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले. त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभिर्य लक्षात आले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. नित्य सेवेत अंतर पडणार म्हणून सेवेक-यांचे हृदय पिळवटून निघाले होते. कसेतरी आवंढा गिळत, नजर चुकवित ते स्वत:शीच प्रार्थना करीत होते. 

ब्रह्मांडनियंता स्वेच्छेने लीला दर्शवित होता. त्यांच्या त्या वैचित्र्यपूर्ण लीलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते. श्रींनी स्वत: उठून जनावरांच्या अंगावर हात फिरविला नि पलंगावर येवून बसले. त्या हालचालींत नित्याचा आवेश नव्हता इतकेच. एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता.

महाराजांनी टेकून बसण्याकरीता तक्क्याच्या दिशेने खूण करताच सेवेक-यांनी तो दिला. महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले. ते तसेच किंचित मागे टेकले नि त्यांनी लगेचच नेत्र मिटले. आसपास वैदु मंडळी होतीच. कुणाच्याच जीवात जीव नव्हता. पुढे होवून एकाने नाडी पाहिली, तेव्हा तो गडबडला. नाडी मुळीच लागेना. त्याच्या व्यथित हाल चालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला.

सेवेकरी मिळेल तिथे डोके आपटीत होते. कुणी जमिनीवर लोळण घेतली. स्त्रीवर्गाने आकांत मांडला. कोणी आपलेच केस उपटत होता. स्थिरचित्त साधुवर्य आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते. धक्क्यातून न सावरलेले कित्येकजण श्रींची काही हालचाल होते आहे का, हे निरखत स्तब्ध झाले होते.

“हे गुरुमाय, अरे देवा, समर्थ सद्गुरु, श्रीस्वामी समर्थ देवा, भगवंता, आम्ही आता कोठे पाहावे, सांगा’’, अशा विविध शब्दांत समस्त जन आक्रंदन करीत होते. कुणीच कुणाला सावरू शकत नव्हता. अशा हल कल्लोळात थरथरणा-या अक्कलकोटास अचानक एक क्षणैक सुखद धक्का बसला. श्रींनी आपले नयन सहजच उघडले. प्रेमभावाने सर्वांस न्याहाळू लागले. सर्व गलबला थांबला. सारी लेकरे मायबाप सद्गुरुंच्या पलंगा सभोवती सरकली.

श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले. तेव्हा समर्थमुखातून श्रीकृष्णावतारा वेळी त्यांनी सांगितलेले अद्भूत वचन परत पुन्हा उच्चारले गेले.- अनन्याश्चिन्तयंतो मां ये जना: पर्युपासते ।। तेषांनित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। -जो अनन्य भावे शरण मजसी, पाहील मुक्तीचा सोहळा।। जिंकील जीवन कला। जो मजवरी विसंबला ।।

समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्रीस्वामी कृती कडे पाहत होते. श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शविण्यासाठी हस्त कमल उंचावले. पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. समर्थ निजानंदी निमग्न जाहले. अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशीएवढे तीन पांढरे दाणे बाहेर पडले.

नंतर, श्रीस्वामीदेह त्यांच्या इच्छा नुसार पेठेतील मठाच्या ध्यानगुंफेत (चोळप्पा यांचे घर) ठेवण्यात आला. वाजतगाजत मिरवणुकीने, ढोलताशांच्या गजरात, आतषबाजीत त्यांच्या या समाधीलीलेस अंतिम स्वरूप देण्यात आले! मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली.

मंगळवार, ३० एप्रिल १८७८, शके १८००, दुपारी २ वाजता चैत्र वद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरु झाल्यावर सायंकाळी ४.३० वाजता ही घटना घडली! 

पुढे हेच स्थळ आज अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ समाधी मठ नामे सुप्रसिद्ध आहे.

स्वामी समधीदिन म्हणजे नेमके काय ?

स्वामी समधीदिन म्हणजे नेमके काय? तर स्वामी महाराज यांनी या दिवशी आपला देह त्याग केला. आणि जाता जाता स्वामी भक्तांना  म्हणले, गाईला चारा द्या, मुक्या प्राण्यांना जीव लावा, भुकेल्याची तहान भूक भागवा, मी कुठेही जात नाही, शरीर म्हातारं होत, आत्मा नाही, आत्मा अमर असतो तो कधीच मरत नसतो मी, इथे कायम राहील सगुण रुपात, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, क्योंकी हम गये नही, जिंदा है अभी. 

शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो 

वटवृक्ष तळी नित्य माझा वास | ठेविता विश्वास मी भेटेन || २ ||
तुमचे नी माझे जुने खूप नाते | म्हणूनिया येथें आला तुम्ही || ३ ||
ज्याचे मुखी मंत्र "श्री स्वामी समर्थ" | धरितो मी हात त्याचा नित्य || ४ ||
माझे हाती आहे ब्रम्हांडाची गोटी | सकल ही सृष्टी माझे रूप || ५ ||
कांही न मागता देतो सर्व कांही | श्रीमंती अशी ही माझी न्यारी || ६ ||
माझे नाम घेता दारीद्र सरते | दुःख ही पळते दाही दिशा || ७ ||
खोटे नाटे मज खपणार नाही | माझी दृष्टी पाही सर्व कांही || ८ ||
जरी तुम्ही दूर समुंदर पार | होईन मी घार रक्षिण्यास || ९ ||
भिऊ नका तुम्ही मी तुमच्या पाठी | माझी कृपादृष्टी तुम्हांवरी || १० ||
स्वामी म्हणे करा देहाचे मंदिर | मग मी आतुर तेथें येण्या || ११ ||

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !  हम गया नहीं, जिंदा है !  निश्चिन्त जा, मी आहे !

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

अनंतकोटीब्रह्मांडनायक, राजाधिराज योगीराज, भक्तवत्सल भक्ताभिमानी, सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराज की  जय !

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||