जन्म: २२/१२/१८१७ (श्रीदत्त जयंती) मोगलाईत, निजाम राज्यात लाडवन्ती कल्याण गावी, अश्वलायन देशस्थ ब्राह्मण
आई/वडील: बयादेवी/मनोहर नाईक
कार्यकाळ: १८१७ ते १८६५
संप्रदाय: सकलमत संप्रदाय
गुरु: दत्तावतार
समाधी: मार्गशीर्ष शुद्ध ११, शके १७८७, २९ नोव्हेंबर १८६५, गिता जयंतीच्या दिवशी माणिक नगर येथे.
माणिक प्रभू हे कल्याणीच्या मनोहर नाईकांचे पुत्र. आश्वलायनशाखीय देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण. त्यांचा जन्म मार्गशीर्ष शु. १४, श. १७३९ (श्रीदत्त जयंती) या दिवशी झाला. त्यांची माता-पिता दोघेही परमार्थप्रवण आणि सत्त्वसंपन्न असल्यामुळे ‘शुद्ध बीजापोटी’ या रसाळ फळाचा उद्भव झाला. माणिक प्रभू हे दत्तात्रेयाचे चौथे अवतार समजले जातात. प्रथम श्रीदत्तात्रेय, द्वितीय श्री श्रीपादश्रीवल्लभ, तृतीय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, चतुर्थ श्री माणिकप्रभु महाराज.
माणिकप्रभूंचा हा दत्तावतार हिंदू व मुसलमान धर्मात सारखाच लोकप्रिय आहे. दोन्ही धर्माच्या लोकात त्यांचे अनेक भक्त आहेत. हा अवतार मोगलाईत निजाम (हैदराबाद) राज्यात, कल्याण गावी मनोहर नाईक व बयादेवी/बयाबाई या दत्तभक्त दांपत्याच्या पोटी झाला. श्रीदत्त भगवानांच्या आशीर्वादाने त्यांना तीन मुलगे झाले.
१) हणमंत (दादासाहेब)
२) माणिकप्रभु व
३) नरसिंह (तात्यासाहेब)
मनोहर नाईकांना रामनवमीच्या दिवशी दृष्टान्त झाल्याप्रमाणे श्रीदत्तप्रभूंनी माणिकप्रभूंच्या रुपाने या दांपत्याच्या पोटी सन १८१७ मध्ये अवतार घेतला. बारशाच्या दिवशी त्या बालकाचे नाव ‘माणिक’ ठेवण्यात आले. त्याचे अनुपम तेज पाहून आजूबाजूचे लोक त्याच्या दर्शनाला येत असत.
बयादेवींचे बंधू (प्रभूंचे मामा) कल्याणच्या नवाबाच्या कचेरीत चाकरी करत असल्यामुळे मामांचा नवाबाशी घनिष्ट संबंध होता. नवाबांनी ज्यावेळी पहिल्यांदा प्रभूंचे दर्शन केले त्यावेळी त्याला प्रभूंच्या दैवीरूपाचे दर्शन झाले. आणि त्यामुळे नवाब साहेबांनी लाखो रुपयांचे अलंकार, दागिने व वस्त्राभूषणे प्रभूंना समर्पित केले. माणिकप्रभूंची देखभाल लहानपणापासून खूप प्रेमाने करण्यात आली होती. त्यांच्या अंगावर हजारो रुपयांचे हिरे माणकांचे दागिने असत. त्यांच्या रक्षणासाठी पाच सहा अरब रोहिले शिपाई नबाबांनी ठेवले होते. पाचव्या वर्षानंतर श्रीप्रभूंची खेळकर वृत्ती वाढत गेली. कल्याण गावात माणिकप्रभू नावाचा दत्ताचा अवतार झाला आहे अशी बातमी गावभर पसरली. दर गुरुवारी लोक दर्शनाला येऊ लागले. सातव्या वर्षी श्रीप्रभूंची मुंज मोठ्या थाटाने झाली. सर्व ब्रह्मकर्म श्रीप्रभूंना मुखोद्गत होते. हा चमत्कार पाहून शास्त्री, पंडितही थक्क होत असत.
प्रभु कधी शाळेत गेले नाहीत; परंतु लहानपणापासूनच त्यांना तेलगू, कानडी, फारशी, उर्दू, संस्कृत आणि मराठी इतक्या भाषा लिहिता, वाचता व बोलता येत असत. चार वेद, सहा शास्त्रे व उपनिषदे यातही ते पारंगत होते.
हे साक्षात ईश्वरी अवतार आहेत, अशी त्यांच्याविषयीची श्रद्धा त्यांच्या लहानपणापासूनच पसरत चालली होती. त्यांचे दर्शन, स्पर्शन आणि भाषण अमोघ असल्याचा प्रत्यय अनेकांना येत असे. त्यांना कानडी, फारशी, उर्दू, संस्कृत व मराठी या भाषा उत्तम तर्हेने अवगत होत्या. शास्त्रचर्चेंत पंडितही त्यांच्यापुढे फिके पडत. ‘जणू वयसेचिया गावां न जातां’ बाळपणीच सर्वज्ञतेने त्यांना वरले होते. अभिजात सिद्धींचा प्रत्यय अगदी लहानपणापासूनच येऊ लागल्यामुळे त्यांच्या साधुत्वाचा डंका लवकरच सर्वत्र झडू लागला. भालकी गावाजवळील एका जंगलांतील गुहेत ते एक वर्षभर समाधी लावून बसले होते. हुमणाबादेजवळील अरण्यात त्यांनी एका बेलाच्या झाडाखाली निवास केला. तिथेच त्यांच्या नावाने ‘माणिकनगर’ वसले.
माणिकप्रभूंचे कार्य
माणिक प्रभूंच्या दत्तोपासनेच्या परंपरेला ‘सकलमत संप्रदाय’ असे नाव होते. नावावरूनच हे स्पष्ट आहे की, या संप्रदायात समन्वयाचा मोठा प्रयत्न झालेला आहे. या संप्रदायाचा असा सिद्धांत आहे की, जगातील सर्व धर्म व संप्रदाय हे त्यांच्या त्यांच्या अनुयायांना परमेश्वराची प्राप्ती करून देणारे आहेत. तेव्हा प्रत्येकाने अन्य संप्रदायांना विरोधी वा त्याज्य न मानता समन्वयाच्या उदार दृष्टीने त्यांतील सत्त्वांश ग्रहण करावा. या संप्रदायाचे उपास्य श्रीचैतन्यदेव ( आत्मदे - या विश्वात भरून उरलेले चैतन्यतत्त्व) हे आहे. या संप्रदायांत श्रीदत्तात्रेयाचे स्वरूप मधुमती नामक शक्तिसहित आराधिले जाते. ‘‘हा संप्रदाय अद्वैती व सर्वव्यापी असल्यामुळे अमक्याच एका देवतेचा मंत्र घेतला पाहिजे, असा आग्रह मुळीच नाही. कारण आपले सद्गुरूच नाना वेशांनी या जगात नटलेले आहेत, सर्व स्वरूपे त्यांचीच आहेत; म्हणून बाह्यत: भेद दिसला, तथापि वस्तुत: सर्व देवता एकरूपच आहेत, असा निश्चय ठेवून मंत्र घेतल्यास बाधक होणार नाही.’’
श्री माणिकप्रभू मंदिर माणिक नगर
श्रीप्रभूंचे आंधळ्या पांगळ्यांवर, गरिबांवर जास्त प्रेम असे. हिंदू-मुसलमान दोन्ही भक्तांवर ते सारखेच प्रेम करीत. एके दिवशी कोणालाही न सांगता प्रभू घराबाहेर पडले. हुमणाबादपासून २० कोस दूर असलेल्या ‘मंठाळ’ गावात ते पोहोचले. हे कळताच श्रीप्रभूंच्या मातोश्री, तात्यासाहेबांना बरोबर घेऊन श्रीप्रभूंना भेटले. श्रीप्रभु आईंना म्हणाले की, श्री दत्तात्रेयांच्या साक्षात्काराप्रमाणे आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला. तुमचे मनोरथ पूर्ण केले. व्रतबंध होईपर्यत तुमच्या जवळ राहिलो. आता आम्हास सर्वत्र संचार करून भक्त जनांचा उद्धार करून अवतारिक कृत्ये केली पाहिजेत. तरी आमच्याविषयी दु:ख न करता घरी जाऊन दत्तसेवा करून कालक्रमणा करावी. मंठाळच्या अरण्यात अंबील कुंडाजवळील एका गुहेत ते गुप्तरीतीने राहिले. ही गुहा अद्याप तेथे असून तिला माणिकप्रभूंची गुहा असे म्हणतात.
नंतर श्रीप्रभु घरी आले लोकांना ही बातमी कळताच लोक दर्शनाला येऊ लागले. श्रीप्रभूंपुढे रुपयांचा ढीग पडू लागला. श्रीप्रभू ते सर्व पैसे गोरगरीबांना वाटून टाकत. मैलार गावी जाऊन प्रभूंनी त्यांच्या कुलदैवताची खंडोबाची महापूजा केली, त्याचे दर्शन घेतले व हजारो रुपयांचे वस्त्रालंकार देवास अर्पण केले. मैलारहून पुन: आपल्या गावी कल्याणला आले. त्या वेळी धाकटे बंधू तात्यासाहेब यांचे लग्न लावून दिले.
या उदार समन्वयदृष्टीने माणिक प्रभूंच्या अनुयायी वर्गात हिंदूंबरोबर मुसलमानांचाही मोठा भरणा होता. हिंदूंतील लिंगायत पंथही त्यांना मानीत असे. अतिथि-पांथस्थ, तडी-तापडी, पंगु- रोगी या सर्वांना प्रभूंचे संस्थान हे एक विश्रामस्थान झाले होते. गरिबांचे दारिद्र्य जावे, निपुत्रिकांस संततिलाभ व्हावा, रोग्यांना आरोग्य प्राप्त व्हावे, संसारक्लान्त जीव समाधान पावावे,’’ असे त्यांच्या परिसरांतील वातावरण होते. जंगमांचा संक्रांतिमहोत्सव, मुसलमानांचा मोहरम आणि ब्राह्मणांची दत्तजयंती या उत्सवांसाठी त्यावेळी माणिकनगरांत प्रतिवर्षी तीस लाखांवर रक्कम खर्च होई !
असे योगेश्वर कृष्णासारखे दिव्य जीवन व्यतीत करून माणिकप्रभूंनी मार्गशीर्ष शु. ११, श. १७८७ या दिवशी जिवंत समाधी घेतली. त्यांच्या अवतारकार्यामुळे दत्त संप्रदायाच्या प्रसाराला आणि प्रगतीला फार मोठी गती मिळाली. समन्वयाच्या वृत्तींतून निर्माण झालेली दत्तदेवता जणू समन्वयाचे प्रात्यक्षिक आचरण्यासाठी या भूतळावर माणिक प्रभूंच्या रूपाने अवतरली .
श्रीप्रभूंनी पुष्कळ प्रवास केला व चमत्कार केले. मुधोळ गावच्या पहाडातील गुहेत ते समाधी लावून बसत असत. मुधोळ संस्थानात फिरत असता एकदा एका वडार्याचा सर्पदंशाने मृत्यु झाला. श्रीप्रभूंनी आपल्या कृपाशीर्वादाने त्याचे प्राण वाचवले. एक ब्राह्मण कुटुंब श्रीप्रभूंच्या दर्शनासाठी येत होते. वाटेत चोरांनी त्यांना लुटले. ते श्रीप्रभूंची प्रार्थना करू लागले. चोरांनी ब्राह्मणाला मारण्यासाठी शस्त्र उगारले. पण त्यांचे हात वरचे वर थिजले. चोरांनी श्रीप्रभूंची प्रार्थना केली. ते श्रीप्रभूंना शरण आले. नंतर त्यांचे हात मोकळे झाले. श्रीप्रभूंनी त्या ब्राह्मण कुटुंबाचे कोटकल्याण केले.
श्रीप्रभु तेथे एका शिवालयात राहू लागले. सरकारी अधिकार्यांनी तेथे येऊन शिवालय व आजूबाजूची जागा स्वच्छ केली. श्रीप्रभूंच्या राहण्याची व्यवस्था केली. पाच दिवस मोठा समारंभ झाला. सरकारने कोठी लावून दिली. आलेल्या भक्तांची व्यवस्था केली. अशा रीतीने ‘माणिकनगर’ ची रचना झाली. कल्याणहून मातोश्री व तात्यासाहेब तेथे राहण्यासाठी आले, पण प्रभूंनी त्यांना परवानगी दिली नाही. आठवड्यातून फक्त एक दिवस शनिवारी किंवा गुरुवारी येण्याची आज्ञा दिली. इतर आंधळे, पांगळे, यात्रेकरु, सेवेकरिता राहिलेले रुग्ण यांची व्यवस्था भांडारखान्यातून केली. भक्तांनी श्रीप्रभूंची गादी स्थापन केली. भक्तांच्या आग्रहाखातर श्रीप्रभू त्या गादीवर बसू लागले. जवळच दत्तगादीही स्थापन केली होती. तेथेही नेहमी भजन, कीर्तन, प्रवचन होत असे.
माणिक प्रभूंच्या संप्रदायात,
‘श्रीभक्तकार्यकल्पद्रुम-गुरुसार्वभौम-श्रीमदराजाधिराज-योगीमहाराज - त्रिभुवनानंद - अद्वैत - अभेद - निरंजन - निर्गुण - निरालंब - परिपूर्ण - सदोदित - सकलमतस्थापित - श्रीसद्गुरूमाणिकप्रभुमहाराज की जय !”
असा जयघोष रूढ आहे. माणिक प्रभुंच्या पद-संभारात कृष्णपर पदांचा विशेश भरणा आहे. त्यांची पदे मराठी, हिंदी आणि कानडी अशी तीनही भाषांतील आहेत. त्यांच्या गीतांत मीरेच्या पदांसारखी माधुरी आहे. लोक त्यांना दत्तावतार समजतात, तरी ते मात्र म्हणतात :
श्री दत्तावतारी माणिकप्रभु
श्रीगुरु माझा दत्त दयाघन रे । अंतरचालक त्रिभुवनपालक ।
सकळांसी जीवन रे । अखंडअगोचर व्याप्त चराचर । शाश्वत चिदघन रे ॥
माणिकदासासि मिळविले स्वरूपासी । देऊनि उन्मन रे ॥
या उन्मनावस्थेत माणिक प्रभू म्हणतात :
आम्ही येथींचे तेथींचे । वेद जाणती नेतीचे ।
आम्हां नाही येणे जाणें । आम्ही पूर्णातीत पूर्ण ।
आम्हां गांव ठाव नाहीं । ठावातींत सर्वांठायीं ॥
आमचें नाम माणिक नोहे । आम्ही आम्हातीत होय ॥
श्रीप्रभूंच्या मनात कोणताही राजकीय हेतू नव्हता. त्यांच्या मनात केवळ परोपकार व दानधर्म करण्याचाच हेतू होता. वडील बंधू दादासाहेब व मातोश्री बयाबाई यांना निर्वाणाच्या वेळी ब्रह्मज्ञान दिले व त्यांना मुक्ती दिली. पुढे तात्यासाहेबांनी स्वत: गुरुचरित्राचे पारायण करून पुष्कळ दानधर्म केला. भजनपूजनादी सत्कर्मे करुन सर्वांचा निरोप घेऊन प्रभूंच्या चरणावर मस्तक ठेवले आणि मग योगासन घालून समाधी घेतली. श्रीप्रभूंनी त्यांचे चिरंजीव अप्पासाहेबांकडून सर्व उत्तरविधी शास्त्रोक्त करविला व हजारो रुपये दानधर्म केला.
श्री समर्थ अक्कलकोट स्वामी एकदा प्रभूंच्या भेटीला आले. प्रभूंची व त्यांची एकांतात भेट झाली, चर्चा झाली. नंतर एकदा शृंगेरीचे जगद्गुरु श्रीशंकराचार्य श्रीप्रभूंच्या भेटीस आले होते. जगद्गुरूंना सिंहासनावर बसवून त्यांची तात्यासाहेबांकडून यथासांग पाद्यपूजा करवली. त्यांना वस्त्रे, भूषणे, हत्ती, घोडे, पालख्या सर्व अर्पण केले. भोजनसमारंभही मोठ्या थाटाने झाला, त्यांना निरोप देताना श्रीप्रभू त्यांना पोहोचवण्यासाठी दोन कोसपर्यंत गेले होते.
श्री माणिकप्रभू समाधी मंदीर
यानंतर श्रीप्रभूंनी समाधी घेण्याचा निश्चय केला. समाधीचा दिवस मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा निश्चित केला. श्रीप्रभूंनी आपल्या तीन चार विश्वासू भक्तांना सांगितले की, समाधी घेतल्यानंतर चार दिवसांनी ही गोष्ट जाहीर करावी. कारण मुसलमान भक्त भावना विवश होऊन समाधीच्या कामात विघ्न आणतील. श्रीप्रभूंनी तात्यासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र – मनोहरप्रभु कडून आपली पूजा करवून घेतली गळ्यात हार घातला आणि त्यांना आशीर्वाद दिला. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी सन १८६५ सद्गुरू श्रीमाणिकप्रभू समाधिस्थ झाले.
‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ अशी सर्वांनी गर्जना केली व समाधी विवराला चिरा लावून समाधी विवर बंद केले. श्रीप्रभूंच्या विरहाने भक्तांच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. नंतर चार दिवसांची श्रीप्रभूंच्या समाधीची गोष्ट प्रकट करण्यात आली व भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात आले. पुढे सोळाव्या दिवशी श्रीमनोहरप्रभूंना त्यांच्या गादीवर बसवले.
सकलमताचार्य, अर्थात श्री माणीक प्रभू
ईश्वरी तत्त्वासमोर पंथ-संप्रदाय, जातपात, भेदाभेद, मंगल-अमंगळ, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा सर्व गोष्टी गौण आहेत हे सिद्ध करीत प्रभूंनी प्रमुख व प्रचलित धर्मातील जे जे उत्तम व उदात्त आहे त्यांचा स्वीकार करून त्यायोगे सकलमत संप्रदायाची स्थापना केली. ‘सकल’ म्हणजेच सर्वांच्या मतांना सामावून घेणारा संप्रदाय. कर्म, भक्ती, योग व ज्ञान या चारही मार्गांचा समुच्चय जिथे होतो असा हा संप्रदाय.
माणिकप्रभूंचे ‘ऐश्वर्य’ हा त्या काळी सर्वसामान्यांनाच नव्हे, तर राज्यकर्त्यांनादेखील अचंबित करणारा विषय होता. प्रभूंच्या समग्र अवतारकार्यामध्ये सतत आणि सर्वत्र संपत्तीचा ‘ओघ’ अविरत वाहत असल्याची वर्णने वाचावयास मिळतात. सन १८५७ च्या बंडातील अग्रणी नानासाहेब पेशवे यांना देखील माणिकप्रभूंनी त्यांच्या एका भक्ताकरवी आर्थिक मदत केल्याची घटना विदित आहे.
प्रभूंचे आगमन जिथे होत असे अथवा जिथे त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होत असे तेथील वातावरण ‘नित्यश्री नित्य मंगल’असे. प्रभूंचे आगमन झाले म्हणजे भक्तांची गर्दी उसळत असे. बाप्पाचार्य लिखित ‘माणिकप्रभाकर’ तसेच रामचंद्रबुवा सोलापूरकर-जीवनदास-गणेश टोळे यांनी लिहिलेल्या तत्कालीन ‘श्रीप्रभूचरित्रां’मध्ये वरील वर्णने तपशीलवार आली आहेत. राजेमहाराजांपासून अमीर-उमराव-अंमलदारांपर्यंत बडय़ा हस्ती प्रभूंसमोर नतमस्तक होत असत. प्रभुदर्शनासाठी तिष्ठत राहणाऱयांमध्ये अनेक बडे सरदार आणि धनवंतांचा समावेश असे. या धनिकांकडून प्रभूंसमोर दानस्वरूपात जी संपत्ती येत असे त्या सर्व संपत्तीचा विनियोग प्रभुदरबारात गोरगरीब आणि अडलेल्या-नाडलेल्या लोकांसाठी केला जात असे. दीनदुबळ्यांस आधार, निर्धनास धन, भुकेलेल्यास अन्न आणि ज्ञानार्थीयांस ज्ञान या रीतीने ज्याला जे हवे ते देण्याची ताकद प्रभूंच्या विशाल अंतःकरणात होती. असे असले तरीही ऐश्वर्य ल्यायलेला हा सत्पुरुष स्वतः मागून आणलेल्या ‘भिक्षेच्या झोळीत’ जे काही मिळेल त्यावर गुजराण करीत असे. लसणाची चटणी आणि भाकर हा त्याच्या तृप्ततेचा परमावधी होता. कुबेरासही हेवा वाटावा अशी श्रीमंती वागविणारा हा उपभोगशून्य स्वामी अंतर्यामी अतिशय विरक्त आणि अनासक्त होता. साक्षात निर्विकल्प, निर्विकार, निर्लोभी या शब्दांना अर्थ प्राप्त व्हावा इतकी विरक्तता प्रभूंमध्ये नित्य वास्तव्यास आली होती.
प्रभूंचे अवतारकार्य परमोच्च स्थानी बहरले असताना महाराष्ट्रामध्ये श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट) श्रीदेवमामलेदार (सटाणा), श्रीअण्णाबुवा (मिरज), श्रीकृष्णसरस्वती (कोल्हापूर), श्रीधोंडीबुवा (पळूस) आपापल्या प्रांतात स्थिरस्थावर होते आणि श्रीगजानन महाराज (शेगाव), श्रीपंत महाराज (बाळेकुंद्री), श्रीटेंबेस्वामी, श्रीबीडकर महाराज आदी सत्पुरुषांचे अवतारकार्य घडू पाहत होते. शिर्डीकर बाबासाई आणि ‘ब्रह्मचैतन्य’ गोंदवलेकर या दोघांनाही त्यांच्या कुमारवयात श्रीमाणिकप्रभूंचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. प्रभूंनी समाधीत प्रवेश केल्यानंतर अनेक सत्पुरुष अवतरले अन् स्थिरावले असले तरीही अवधूत संप्रदायाचे स्वरूप तथा आध्यात्मिक वैभव प्रभूंनी दिमाखाने पुढे आणले.
संतसत्पुरुषांच्या ठायी असलेले दैवी सामर्थ्य, त्यांचे विचार-शिकवण, तसेच त्यांचे लीला-चमत्कार बहुतकरून सारखेच असतात. मात्र त्यांनी स्वीकारलेल्या अध्यात्ममार्गातून त्यांच्यातील वेगळेपण जाणवते. सत्पुरुषांठायी सदैव जागृत असणारं अलौकिक तत्त्व आणि मानवी देह धारण केल्यामुळे येणाऱया मर्यादा माणिकप्रभूंमध्येही दिसणे स्वाभाविक होते. तरीही त्यांचे अवतारकार्य संतमांदियाळीमध्ये उठून दिसते ते ‘सकलमतसंप्रदाय’ स्थापनेतून.
‘सकल’ म्हणजेच सर्वांच्या मतांना सामावून घेणारा संप्रदाय. कर्म, भक्ती, योग व ज्ञान या चारही मार्गांचा समुच्चय जिथे होतो असा हा संप्रदाय. ‘श्रुतीधर्म रक्षुनी सकल मतांते वंदा। सर्वांतरी आत्मा नको कुणाची निंदा।’ असा उत्तुंग आशावाद प्रकट करणारा संप्रदाय प्रभूंनी निर्माण केला. ईश्वरी तत्त्वासमोर पंथ-संप्रदाय, जातपात, भेदाभेद, मंगल-अमंगळ, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा सर्व गोष्टी गौण आहेत हे सिद्ध करीत प्रभूंनी प्रमुख व प्रचलित धर्मातील जे जे उत्तम व उदात्त आहे त्यांचा स्वीकार करून त्यायोगे सकलमत संप्रदायाची स्थापना केली.
श्रीदत्तात्रेय हे श्रीमाणिकप्रभूंचे आराध्य दैवत. श्रीदत्ताने बऱयावाईटाची सांगड घालून अनेकविध गुरू केले, त्याच धर्तीवर श्रीमाणिकप्रभूंनी सकलमत संप्रदायाची स्थापना केली. मधमाशी ज्या सापेक्षतेने अनेकविध फुलांतील मध गोळा करते त्याच पद्धतीने सर्व संप्रदायांतील उत्तमोत्तम गोष्टींचा स्वीकार करून सकलमत संप्रदायाची ध्येयधोरणे निश्चित करण्यात आली. श्रीदत्त आणि मधुमती शक्ती यांना प्रमाण मानून सकलमत संप्रदायाची गादी स्थापन करताना प्रभूंनी त्यावर विशिष्ट देवतेची स्थापना न करता चैतन्यदेवाची स्थापना केली. हा चैतन्यदेव म्हणजे प्रत्यक्ष सगुण स्वरूपातील दैवत नसून तुमच्या-आमच्या आणि प्रत्येकाच्याच मनातील आराध्य देवतेचे चैतन्य आहे. प्रभूंच्या समाधीच्या मागील बाजूस चैतन्यदेवाची गादी स्थापन करण्यात आली आहे. प्रभू समाधीचे दर्शन घेताना आपणांस आपल्या आराध्य दैवतास त्या गादीवर स्थानापन्न करू देण्याइतका ‘उदार’मतवाद हे सकलमत संप्रदायाचे वैशिष्टय़ आहे.
प्रभूंच्या या सर्वसमावेशक संप्रदायाची धुरा पुढे त्यांचे पुतणे श्रीमनोहरप्रभू व श्रीमार्तंडप्रभू या सत्पुरुषांनी चालविली. त्यांच्या पश्चात या संप्रदायाला श्रीशंकरप्रभू व श्रीसिद्धराज प्रभू यांनी जोपासले आणि वृद्धिंगत केले. सध्या ‘सकलमताचार्य’ म्हणून श्रीज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांच्या खांद्यावर सकलमत संप्रदायाची धुरा आहे. श्रीमार्तंड माणिकप्रभूलिखित ‘ज्ञानमार्तंड’ हा संप्रदायाचा प्रसिद्ध ग्रंथ आहे.
येणाऱया प्रत्येक भक्ताला ‘माऊली’ रूपाने स्वीकारून, समानतेचा पुरस्कार करून, जगताला स्वतःचा संसार मानून, वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी संजीवन समाधीमध्ये प्रवेश करणाऱया या अलौकिक सत्पुरुषाचा विरह सहन न झाल्यामुळे शेकडो भक्तांनी स्वतःच्या छातीत सुरे खुपसून घेतले. दुःखातिरेकाचा आवेग सहन न झाल्यामुळे शेकडोंनी आत्मघात केला. कित्येकांनी आपली डोकी रक्तबंबाळ होईतोवर भिंतीवर आपटून घेतली. अशा त्या कनवाळू सत्पुरुषाबद्दल किती लिहावं हा प्रश्न आहे. भक्तांच्या प्रपंचासाठी परमार्थाचे शिंपण घालणारा श्रीमाणिकप्रभू नावाचा ‘अवलिया’ प्रातःस्मरणीय आणि वंदनीय होता, आहे आणि यापुढेही नित्य राहील.
‘जय गुरू माणिक’
दत्तावतारी माणिकप्रभु दिव्य चरित्र....संत साहित्य अभ्यासकांचे सिद्ध लेखणीतून
॥श्रीमाणिक्यप्रभुर्विजयते।।
वन्दे दत्तावधूतं विधिहरिशिवरूपात्मक देशिकाद्यम्।
श्रीपादश्रीशवाच्यं श्रितविपदपहं चिद्धनैक द्वितीयम्।
तार्तीयं श्रीनृसिंह यतिकुलतिलकं भक्तकार्यामरद्रुम्।
श्रीमाणिक्यप्रभु तं सकलमतगुरु शुद्धसत्त्वं चतुर्थम्।।
श्रीदत्तप्रभूच्या वरील अवतार मालिकेत वर्णिल्याप्रमाणे प्रथम श्रीदत्तात्रेय, द्वितीय श्रीश्रीपादवल्लभ, तृतीय श्रीनृसिंहसरस्वती व त्यानंतर भक्तांच्या मनोकामना पुरविण्यासाठी व विविध धर्म, मत, संप्रदायातील वैमनस्य दूर करून प्रेमाचे साम्राज्य स्थापन करण्यासाठी श्रीमाणिकप्रभूच्या रूपांत त्या शुद्धसवत्त्वाचे चतुर्थ अवतार झाले. परमेश्वराचे रामकृष्णादिक इतर अवतार रावणादि दैत्यांच्या नाशासाठी झाले असले तरी श्री दत्तात्रेय हे अज्ञानाचा नाश करण्यासाठी सद्गुरूंच्या रूपांत अवतार धारण करतात अणि श्रीमाणिकप्रभूच्या रूपांत अवतार धारण करून श्रीदत्तप्रभूनी ज्ञानदानाचे आपले कार्य प्रकर्षाने साधले आहे.
श्रीप्रभूचा जन्म मंगळवार, २२ डिसेंबर, १८१७ रोजी निजामाच्या राज्यातील लाडवंती या गांवी झाला. त्यांचे पिता श्रीमनोहर नाईक व माता श्रीबयादेवी हे दोघेही अत्यंत सात्त्विक व सदाचारशील दंपती होते. त्यांच्या घरी पूर्वीपासून रामोपासना होत असे. ई.स. १८१७च्या श्रीरामनवमीच्या रात्री त्या दोघांच्या स्वप्नांत श्रीदत्तप्रभु प्रकट झाले व मी तुमच्या उदरी जन्म घेणार असे सूचित केले, तदनुसार बरोबर नऊ महिन्यांनी श्रीदत्तजयंतीच्या दिवशीच श्रीप्रभूचा जन्म झाला.
बालपणापासूनच प्रभूच्या अंगी असलेल्या अलौकिक सामर्थ्याचा प्रत्यय लोकांना येऊ लागला. त्यांच्या बाललीलेतून अनेक अद्भुत चमत्कार सहज घडत असत. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील मनोहरपंत निवर्तले म्हणून त्यांची माता बयादेवी प्रभु व इतर दोन भावंडांना घेऊन कल्याणच्या नबाबाच्या पदरी नौकरीस असलेल्या आपल्या भावाजवळ कल्याणांस येऊन राहिल्या. लहानपणी प्रभु कुठल्याही शाळेत गेले नाहीत, प्रकृति हीच त्यांची पाठशाळा होती. सवंगड्यांना घेऊन रानांत दूर निघून जाणे, दरीत, गहेंत, प्रवाहाच्या ठिकाणी एकांतांत बसून राहणे, दोन-दोन तीन-तीन दिवस गुप्त होणे हा त्यांचा लहानपणीचा छंद होता. प्रभूनी विद्याभ्यास करावा, नांव-लौकिक मिळवावे, कुटंबाच्या योगक्षेमाची काळजी घ्यावी, असे त्यांच्या व्यवहारी असलेल्या मामांना वाटायचे. म्हणून त्यांनी प्रभूना एका जकातनाक्यावर नौकरीही मिळवून दिली होती. पण तिथेही तोच प्रकार झाला. दिवसभर जमा झालेली सरकारी रकम गोरगरीबांत वाटून प्रभु मोकळे होत असत. प्रभूच्या या स्वच्छंद वागणुकीने त्रस्त झालेल्या मामांनी वयाच्या तेराव्या वर्षी त्यांना घरांतून हाकलून दिले. प्रभु जणू यांच संधीची वाट पहात होते. त्यांनी नेसलेले धोतर फाडून त्याची लंगोटी केली, मामांना साष्टांग नमस्कार करून प्रभु घराबाहेर पडले. निघतांना प्रभुंनी आपले पहिले पदही रचले - 'प्रभुविण कोण कुणाचा वाली'. हेंच पद गुणगुणत प्रभु निघाले तें सरळ अमृतकुंड या तीर्थाच्या ठिकाणी प्रगट झाले. इथून सुरू झालेल्या तीर्थयात्रेचे पर्यवसान माणिकनगरच्या स्थापनेंत झाले. प्रभूनी बारा वर्षे एकटे पायी सबंध भारतवर्ष पालथा घातला. काशी, रामेश्वर, बदरी केदार, हरिद्वार, द्वारका, पुरी, तिरुपति आदि अनेक तीर्थाना प्रभूनी भेटी दिल्या. या तीर्थयात्रेत प्रभूनी अनेक रंजल्यागांजल्यांचा उद्धार केला. मतमतांतरांतील वैमनस्य दूर करून सर्व धर्म व संप्रदाय आपापल्या अनुयायांस परमेश्वराची प्राप्ती करवून देण्यांत समर्थ आहेत, हे तत्त्व प्रकर्षानें पटवून दिले. या यात्रेसाठी प्रभु जेंव्हा निघाले तेंव्हा ते एकटेच होते परंतु त्यांची ही यात्रा जेंव्हा समाप्त होण्यास आली तेंव्हा त्यांच्या सोबत हजारो माणसांचा समागम होता, त्यांत हिंदू होते तसेंच मुसलमान ही होते ; ब्राह्मण होते, तसेच अठरापगड जातीचे इतर वर्णीयजनहीं होते ; शैव होते, वैष्णव होते, शाक्त होते; एका सम्राटालाही लाजविणारे प्रभूचे ऐश्वर्य होते.
ई.स. १८४५ साली प्रभु हुमनाबाद नजीकच्या अरण्यांत आले, ही जागा प्रभूना फार आवडली व इथेच कायम वास्तव्य करण्याच्या दृष्टीने गवतांची झोपडी बांधून प्रभु इथेच राहू लागले. प्रभु राहिले म्हणून त्यांचे अनेक शिष्यही इथेच राहिले. अशा प्रकारे हुमनाबादच्या नजीक गुरुगंगा व विरजा ह्या दोन ओढ्यांच्या संगमावर माणिकनगरची स्थापना झाली. या ठिकाणी एका गवताच्या मांडवांत श्रीदत्ताच्या गादीची स्थापना होऊन त्या समोर प्रभूचा दरबार भरू लागला. प्रभु भक्तांची मनोकामना पुरविणारे कल्पवृक्ष होते, त्यामुळे आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी व ज्ञानी असे चारही प्रकारच्या भक्तांचा मेळावा त्यांच्या भोवती सतत असायचा. त्यांच्या मुसलमान भक्तांनी त्यांना महबूब सुबहानीचा अवतार मानून 'पीरानेपीर दस्तगीर' म्हणून त्यांना गौरवावें तर लिंगायत भक्तांनी त्यांना साक्षात् बसवेश्वराचा अवतार समजून त्यांची पूजा करावी, प्रभु हे सर्व धर्मीयांना आपलेंच वाटत होते.
त्यांच्या समकालीन विभूतीपैकी अक्कलकोटचे स्वामी, शिरडीचे साईबाबा, गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य आदि अनेक साधुसत्परुषांनी महाम माणिकनगरी येऊन त्यांची भेट घेतली होती. अक्कलकोटचे स्वामी तर तब्बल सहा महिने प्रभसन्निध राहिल्याचें चरित्रांत उल्लेख आहे. त्यांची व प्रभूची अनेक दिवस एकांतांत भेट व्हायची. स्वामींना अक्कलकोटी जाण्याबद्दल सूचना प्रभूनीच केली होती. स्वामी प्रभूना 'बड़े भाई' म्हणत असत. शिरडीचे साईबाबा तेरा-चौदा वर्षाचे असतांना प्रभूना भेटण्यासाठी दरबारांत येऊन गेल्याचा उल्लेख आहे. प्रभूची कीर्ति दूर शृंगेरी पर्यंत पोचली होती. शृंगेरी पीठाचे तत्कालीन जगद्गुरु शंकराचार्य प्रभूच्या भेटीसाठी माणिकनगरी येऊन गेल्याचाही उल्लेख चरित्रांत सांपडतो.
आपल्या भक्तांच्या आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक तापांचे निरसन करून प्रभूनी त्यांना ज्ञानयुक्त भक्तीचे धडे दिले. वेदांताच्या अद्वैत सिद्धांतावर आधारित 'सकलमत संप्रदाय' स्थापून प्रभूनी मततांतरांचे ध्येय एक परमेश्वर असून साधना पद्धतीत भिन्नता असल्याचे दाखवून दिले. प्रभूचे कुराणावर असाधारण अधिकार होते, ते पाहून त्यांच्या एका मुसलमान भक्ताने त्यांना मुसलमान होण्याची गळ घातली तेंव्हा प्रभु म्हणाले “अहो, कुराणांत परमेश्वराला रब-उल-आलमीन (विश्वाचा स्वामी) म्हटले आहे, कुराणांत कुठेही परमेश्वराला 'रब-उल-मुसलमीन' (केवल मुसलमानांचा स्वामी) म्हटलेले आढळत नाही, तसा दाखला तुम्ही मला दाखवल्यांस मी मुसलमान होण्यास तयार आहे. प्रभूचे हे उत्तर ऐकून तो मुसलमान भक्त आश्चर्यचकित होऊन गेला.
हैदराबादचा तत्कालीन निजाम अफजलुद्दौला हा निस्संतान होता. प्रभूची कीर्ति ऐकून त्यांच्याकडून पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी त्यांने साठ हजार रुपयांच्या जागीरीची सनद देऊन यशवंतराव अरब नांवाच्या आपल्या सरदारांस प्रभूकडे पाठविले होते. मूर्तिमंत वैराग्य असलेल्या प्रभूनी साठ हजाराच्या जागीरीची ती सनद फाडून फेकून दिली व म्हणाले, “आम्हीं फकीर, आम्हास या जागीरीचा काय उपयोग? आम्ही जिकडे दृष्टी वळवू तिकडे आमचीच जागीर आहे. माझ्या मालकांनी (परमेश्वरांनी) तुझ्या मालकांस (निजामास) जेवढे दिले आहे त्याहून अधिक हवे असल्यास त्याला इथे येऊन मागून घेऊन जाण्यास सांग." पुढे प्रभूच्या आशीर्वादानी निजामास मुलगा झाला, प्रभूच्या आज्ञेनुसार त्याचे नांव महबूब ठेवण्यात आले. पुढे हाच महबूब अली पाशा या नांवानी इतिहासांत प्रसिद्ध झाला.
गरीब - श्रीमंत, कुलीन - अकुलीन, स्त्री-पुरुष, हिंदू - मुसलमान असा कुठला ही भेद न बाळगता प्रभुंनी सर्वांना भरपूर प्रेम दिले, सर्वांच्या कामना पुरविल्या, सर्वांस सन्मार्गावर आणून सोडले. या प्रक्रियेत नित्य असंख्य अमानुष चमत्कार घडल्याचा प्रत्यय लोकांना सतत येत असे पण प्रभूनी कधीही कुठल्याही चमत्काराचा श्रेय आपल्याकडे घेतला नाही, हसून 'कर्ता करवीता दत्तप्रभू आहे', असे ते नेहमी म्हणत असत.
प्रभु कुठल्याही शाळेत गेले नाहीत तरी त्यांची मराठी, हिंदी, कानडी व उर्दू काव्यरचना पाहिली म्हणजे मोठमोठ्या विद्वानांना आश्चर्य होतो. प्रभूनी अनेक भाषेतून विपुल काव्यरचना केली असून वेदांतावर लिहिलेला त्यांचा 'आत्मरूपप्रतीति' हा ग्रंथ अप्रतिम आहे. शिवाय 'मल्हारी माहात्म्य', 'संगमेश्वर माहात्म्य', 'हनुमंत जन्म' आदि अनेक प्रकीर्ण ग्रंथ त्यांनी रचिले आहेत.
वयाच्या ४७व्या वर्षी प्रभूनी संजीवनी महासमाधि घेतली. मंगळवार २९ नोव्हेंबर १८६५ मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) ही तिथि सहा महिने आधीच समाधीसाठी निश्चित करण्यांत आली होती. फक्त अत्यंत विश्वासातल्या चार शिष्यांना अत्यंत गुप्तपणे समाधीची तयारी करण्याची आज्ञा झाली होती. ठरलेल्या दिवशी प्रात:काळी प्रभूनी विधिवत् संन्यास आश्रम स्वीकार केला, आपल्या कनिष्ठ बंधूच्या दोन्हीं चिरंजीवास आशीर्वाद दिला, ज्येष्ठ मनोहर (श्रीमनोहरप्रभु) यांना मंत्रदीक्षा देऊन आपला उत्तराधिकारी नेमला आणि मग समाधीत प्रवेश केला व शिष्यांस समाधी चिनून घेण्याची आज्ञा केली. श्रीप्रभूचा सगुण दिह जरी दृष्टिआड झाला तरी त्या समाधीच्या माध्यमातून त्यांची चित्शक्ती आजही भक्तांच्या हाकेला ओ देत आहे व पढे येणाऱ्या अनंत काळापर्यंत अशाच प्रकारे ओ देत राहील यांत तिळमात्र संदेह नाही.
श्री प्रभूच्या नंतर त्यांचे ज्येष्ठ पुतणे श्री मनोहर माणिकप्रभु हे वयाच्या सातव्या वर्षी या पीठावर विराजमान झाले. यांनीच प्रभूचे भव्य असे देवालय बांधून संप्रदायाची उपासना पद्धति निश्चित केली. यांनी संस्कृतसमेत अनेक भाषेतून उत्तम काव्यरचना केली आहे. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी प्रभूप्रमाणेच यांनीही संजीवनी समाधि घेतली. नंतर त्यांचे कनिष्ट बंधू श्री मार्तंड माणिकप्रभु हे वयाच्या सोळाव्या वर्षी गादीवर आले. हे खऱ्या अर्थांनी राजयोगी होते. वेदांत, संगीत व मंत्रशास्त्र या विषयावर यांचे असाधारण प्रभुत्व होते. यांच्या अद्वैत वेदांतांवरील 'ज्ञानमार्तंड' या ग्रंथावर लब्ध होऊन काशीस्थ पंडितांनी यांना 'अभिनव शंकराचार्य' ही उपाधि सादर समर्पित केली होती. यांनीच संप्रदायाचा आसेतुहिमाचल प्रसार केला व माणिकनगरांस सांप्रतचे भव्यरूप प्रदान केले. यांची काव्यरचना व ग्रंथरचना विपुल आहे. १९३६ साली महाराजांनी देहत्याग केला. या नंतर यांच्या बहिणीचे सुपुत्र श्री शंकरराव, में महाराजांच्या कारकीर्दीत श्रीसंस्थानचे कार्यवाह म्हणून काम पहात होते, हे श्री शंकर माणिकप्रभु या नांवानी प्रभूच्या गादीवर आले. यांनी आपल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत श्रीसंस्थानांत आज होत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचे बीजारोपण केले व संस्थानच्या व्यवस्थेमध्ये काळाच्या गरजेनुरूप अनेक सुधार केले. अद्वैत वेदांतांवर यांचा असाधारण अधिकार होता, तत्कालीन 'तत्त्वज्ञान मंदिर' या मासिकांतून यांचे अनेक लेख प्रकाशित झाले असून त्या सर्वांचे संकलन 'ज्ञानशांकरी' या नांवानी लौकरच प्रसिद्ध होत आहे. महाराजांनी १९४५ साली देहत्याग केला. या नंतर यांचे चिरंजीव श्री सिद्धराज माणिकप्रभु हे वयाच्या सहाव्या वर्षी प्रभूच्या या दिव्य पीठावर आरूढ झाले. यांचे शिक्षण ग्वाल्हेरच्या सुप्रसिद्ध सिंधिया स्कूल मध्ये झाले. आध्यात्मिक शिक्षणासोबत आधुनिक शिक्षणाचाही लाभ महाराजांना झाला होता. महाराजांनी स्वत:ला जसे शिक्षण मिळाले तसेंच किंबहुना त्याहूनही उत्तम शिक्षण माणिकनगर व समीपस्थ प्रांताच्या लोकांना मिळावे म्हणून आजीवन परिश्रम केले. माणिक पब्लिक स्कूल, माणिक विद्यालय, माणिकप्रभु वेद व संस्कृत पाठशाळा, अंध मुलांची पाठशाळा आदि संस्था स्थापून व त्या समर्थपणे चालवून महाराजांनी शिक्षणप्रसारासाठी भगीरथ प्रयास केला. संस्थानच्या धार्मिक व आध्यात्मिक कार्यकलापांस महाराजांनी नवीन वळण घालून दिले. श्रीदत्तजयंती महोत्सवाच्या वैभवांत यांनी मोलाची भर घातली. माणिकनगर या क्षेत्रांस भारताच्या आध्यात्मिक मानचित्रांत मानाचे स्थान मिळवून देण्याचे संपूर्ण श्रेय महाराजांचेच होय, सुदूर दिल्लीपासून थेट मद्रासपर्यंत यात्रा करून महाराजांनी संप्रदायाचा व्यापक प्रसार केला. वेदांत व संगीत हे त्यांचे आवडते विषय असून महाराजांनी अनेक रसाळ पदांची रचना केली आहे. २००९ साली महाराज स्वात्मानंदांत लीन झाले.
सांप्रत श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री ज्ञानराज माणिकप्रभु महाराज हे पीठाधीष्ठित आहेत. महाराजांनी श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराजांच्या कारकीर्दीत ३५ वर्षे श्री संस्थानचे सचिव या नात्यांनी महत्वपूर्ण अशी प्रभु-सेवा करून श्री संस्थानच्या सर्वतोमुख अभिवृद्धीस मोलाची भर घातली. काव्यशास्त्र व अद्वैत वेदांतावर श्रीमन्महाराजांचे असाधारण प्रभुत्व असून हिन्दी, मराठी व उर्दू भाषेत यांनी विपुल काव्य रचना केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात व विविध टी.व्ही. चॅनल्सच्या माध्यमाने आपल्या ओजस्वी व सारगर्भित प्रवचना द्वारे यांनी श्रीप्रभूच्या दिव्य संदेशाचे प्रचार व प्रसार करून जनसामान्यांना वेदांताची अत्यंत गूढ प्रमेये उलगडून सांगण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. यांच्या नेतृत्वात श्री संस्थान आपल्या विविध आध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यात यशाचे नवे शिखर गाठेल यांत तिळमात्र संदेह नाहीं.
माणिकनगर या दत्तक्षेत्राची आपली एक वेगळी विशेषता आहे. कुठल्याही दत्तक्षेत्रांत न दिसणरी अनादि अविच्छिन्न अशी गुरुपरंपरा या क्षेत्राला लाभली आहे. आद्य श्रीप्रभूपासून विद्यमान श्री ज्ञानराज माणिकप्रभूपर्यंत सर्व आचार्यांनी भक्तांच्या हृदयांत ज्ञानज्योति प्रज्वलित करण्याचे आपले काम अत्यंत दक्षतेने केले आहे.या क्षेत्राची दुसरी विशेषता म्हणजे इथे भगवान श्रीदत्तात्रेयांची उपासना ही शक्तिसहित आहे. मधुमती शक्तिसहित दत्तोपासना अन्यत्र कुठेही दिसत नाही. श्रीप्रभूची तपोभूमि असलेल्या या क्षेत्राचे पावित्र्य व शांतता अत्यंत काटेकोरपणे जोपासली गेली आहे. इतर क्षेत्रांसारखे धर्माचे बाजारीकरण या ठिकाणी नाही. इथली तिसरी विशेषता म्हणजे - अन्नदान. 'नित्यान्नदान सेवा' या योजनेखाली इथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या दोन्ही वेळच्या भोजनाची निःशुल्क सोय श्रीसंस्थानामार्फत केली जाते. निरंतर २०० वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा अत्यंत निष्ठापूर्वक जपली गेली आहे. श्रीदत्तजयंती सारख्या मोठ्या उत्सव-महोत्सव प्रसंगी तर एक-एक लाख लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात.
अन्नदानासोबत विद्यादानाचे महत्वपूर्ण कार्यही श्रीसंस्थान करीत आहे. श्री माणिकप्रभु वेद व संस्कृत पाठशाळेत सुमारे ८० विद्यार्थी वेदाध्ययन करीत आहेत तसेच श्री माणिकप्रभु अंध पाठशाळा या संस्थेच्या माध्यमातून सुमारे १०० अंध व विकलांग मुलांच्या शिक्षणाची नि:शुल्क सोय केली जात आहे. श्री माणिकप्रभु अनाथालय या संस्थेच्या माध्यमातून १०० गरीब व मागासवर्गीय अनाथ मुलांच्या भोजन, वसती व शिक्षणाची सर्व जबाबदारी श्रीसंस्थानने उचलली आहे. शिवाय सुदूर मेघालय या राज्यांत होत असलेल्या जबरी धर्मांतरास कंटाळलेल्या २५ गरीब मुलांना श्रीसंस्थाननी दत्तक घेऊन त्यांच्या भोजनशिक्षणाची सर्व व्यवस्था केली आहे. माणिक पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुमारे ४०० आवासी विद्यार्थी असून, अत्याधुनिक तंत्राप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची सोय केली गेली आहे. हे सर्व शैक्षणिक उपक्रम केवल भक्तजनांच्या उदार सहयोगाने चालविले जातात.
मार्गशीर्ष शुक्ल एकादशी पासून पौर्णिमे पर्यंत साजरा होणारा श्रीदत्तजयंती महोत्सव हा येथील सर्वात मोठा उत्सव होय. भारताच्या सर्व भागांतून लाखो भाविक या उत्सवासाठी इथे जमतात. या प्रसंगी महापूजा, अन्नदान आदि कार्यक्रम अत्यंत वैभवाने साजरे केले जातात. दसरा महत्वाचा उत्सव म्हणजे वेदांत सप्ताह, हा उत्सव फाल्गुन मासांत होत असतो. या शिवाय श्रीराम नवमी, श्रावणमास, गणेशोत्सव, देवी नवरात्र व गुरुआराधनादि इतर अनेक लहान-मोठे उत्सव वेळोवेळी आयोजित केले जात असतात.
माणिकनगरांत श्रीप्रभूच्या भव्य अशा देवालयाव्यतिरिक्त अनेक प्रेक्षणीय स्थळे भाविकांना आकर्षित करतात. नौबतखाना, भंडारखाना, मुक्तिमंटप, मधुमती श्यामला मातेचे देवालय, महबूब सुबहानी चा दर्गा, गुरुगंगा-विरजा संगम आदि अनेक स्थळे पाहण्यासारखी आहेत.
इथे येणाऱ्या भाविकांसाठी 'मार्तंड विलास', 'माणिक विहार', 'शंकर कृपा' आदि अनेक लहान-मोठे विश्रामगृह व भक्तनिवासांची सोय श्रीसंस्थाननी केली आहे. या निवासांमध्ये अत्याधुनिक सुखसाधनांनी युक्त अनेक प्रकारच्या खोल्यांची व्यवस्था असून श्रीसंस्थानच्या कार्यालयाशी संपर्क साधून खोल्यांचे आरक्षण करता येते. माणिकनगर हे उत्तर कर्नाटकातील बीदर जिल्ह्यांतील हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त १ कि.मी. अंतरावर आहे. सोलापुर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापुर पासून १४० कि.मी. व हैदराबाद पासून १६० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. मुंबई - बेंगळूरु किंवा मुंबई - मद्रास रेलमार्गावरील गुलबर्गा या स्टेशनापासून हुमनाबाद हे ६० कि.मी. अंतरावर असून गुलबर्गाहून हुमनाबादसाठी बसेसची उत्तम सोय आहे. हैदराबाद हे नजीकचे विमानतळ होय. तुळजापुर १३२ कि.मी, गाणगापुर १०४ कि.मी, अक्कलकोट १३८ कि.मी. व बीदर ५१ कि.मी हे अगदी जवळचे तीर्थक्षेत्र आहेत.
प्रभूच्या परमपावन अशा या माणिकनगरी आपणांसर्वांचे सहर्ष स्वागत आहे.