राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या प्रभावळीत फार फार मौल्यवान रत्ने, श्रीस्वामीकृपेनेच लाभलेल्या अपार तेजाने तळपताना दिसतात. या अनर्घ्य रत्नांपैकी, एक अलौकिक विभूतिमत्व म्हणजेच, सद्गुरु श्रीआनंदनाथ महाराज हे होत. श्रीआनंदनाथ महाराज हे तळकोकणातील वालावल गांवचे, म्हणून त्यांचे नाव पडले वालावलकर. पुढे ते वेंगुर्ले कॅम्प परिसरात स्वामी महाराजांचे मंदिर बांधून राहू लागले. तिथेच त्यांनी १९०३ साली आजच्याच तिथीला, ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला जिवंत समाधी घेतली.
श्रीस्वामी महाराजांची कीर्ती ऐकून श्रीआनंदनाथ महाराज अक्कलकोटी दर्शनासाठी निघाले. इकडे श्रीस्वामीमाउलीलाही आपले लाडके लेकरू कधी एकदा भेटते असे झाले होते. म्हणून श्रीस्वामीराज महाराज स्वत:च अक्कलकोटाबाहेर येऊन एका झाडावर वाट पाहात बसले होते. श्रीआनंदनाथ महाराज नेमके तेथेच येऊन जरा विसावले. झाडावरून उडी टाकून श्रीस्वामीराजांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना खूण दाखवली. आपली साक्षात् परब्रह्ममाउली समोर उभी राहिलेली पाहून श्रीआनंदनाथांनी गहिवरून त्यांचे श्रीचरण हृदयी कवटाळले. श्रीस्वामीरायांनीही आपल्या जन्मजन्मांतरीच्या या लाडक्या निजदासाच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून पूर्ण कृपादान केले. तसेच तोंडातून कफाचा बेडका काढून त्यांच्या ओंजळीत टाकला. त्या बेडक्यात इवल्याशा श्रीचरणपादुका स्पष्ट दिसत होत्या. हेच श्रीस्वामीमहाराजांनी श्रीआनंदनाथांना प्रसाद म्हणून दिलेले 'आत्मलिंग' होय. आजही ते दिव्य आत्मलिंग वेंगुर्ले येथे नित्यपूजेत असून दर गुरुवारी भक्तांना त्याचे दर्शन मिळते.
श्रीआनंदनाथांनी जवळपास सहा वर्षे अक्कलकोटात श्रीस्वामीसेवेत व्यतीत केली व नंतर श्रीस्वामीआज्ञेने ते प्रचारार्थ बाहेर पडले. येवल्याजवळ सावरगांव येथेही त्यांनी आश्रम स्थापन केला. मात्र पुढे ते वेंगुर्ले येथेच स्थायिक झाले. शिर्डीच्या श्रीसाईबाबांना सर्वप्रथम, जगासमोर आणण्याची श्रीस्वामीरायांची आज्ञा श्रीआनंदनाथांनी पूर्ण केली. साईबाबा हा साक्षात् हिरा आहे, हे त्यांनीच प्रथम लोकांना दाखवून दिले.
श्रीआनंदनाथ महाराज हे सिद्धहस्त लेखक व कवी होते. त्याच्या श्रीस्वामी महाराजांवरील अप्रतिम रचना 'स्तवनगाथा' मधून प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे "श्रीगुरुस्तवन स्तोत्र" तर असंख्य स्वामीभक्तांच्या नित्यपठणात आहे. त्यांनी रचलेला श्रीस्वामीपाठ देखील प्रासादिक असून स्वामीभक्तांनी नित्यपठणात ठेवावा, इतका महत्त्वाचा आहे. श्रीआनंदनाथ महाराजांवर श्रीस्वामी समर्थ महाराजांची पूर्णकृपा असल्याने त्यांचे सर्व वाङ्मय प्रासादिक, महिमाशाली व अतीव मधुर आहे. श्रीआनंदनाथांचा स्तवनगाथा फार सुरेख, भावपूर्ण आणि स्वामीस्वरूपाचे यथार्थ वर्णन करणारा आहे. आपल्या दोन हजारांहून जास्त अभंगरचनांमधून त्यांनी श्रीस्वामीस्वरूप व श्रीस्वामीनामाचे अलौकिक माहात्म्य सुरेख, भावपूर्ण आणि मार्मिक अशा शब्दांत स्पष्ट करून सांगितलेले आहे. त्यांच्या अपार प्रेमाने भारलेल्या या रचना वाचताना आपल्याही अंत:करणात स्वामीप्रेम दाटून येते व हेच त्यांना अपेक्षितही होते. "श्रीस्वामी पवाडा गाण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे," हे ते वारंवार सांगतात. त्यांच्या दिव्य रचना आज शतकापेक्षाही जास्त काळ झाला तरी स्वामीभक्तांच्या ओठी रंगलेल्या आहेत, हीच त्यांच्या अद्भुत स्वामीसेवेची पावती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. श्रीस्वामी महाराजांच्या विलक्षण अवताराचे माहात्म्य सांगताना ते म्हणतात,
अक्कलकोटीचा व्यवहारी ।
केली कलीवरी स्वारी ॥१॥
पायी खडाव गर्जती ।
भक्तवत्सल कृपामूर्ती ॥२॥
दंड कमंडलु करी ।
आला दासाचा कैवारी ॥३॥
कटी कौपीन मेखला ।
ज्याची अघटित हो लीला ॥४॥
करी दुरिताचा नाश ।
नामे तोडी माया पाश ॥५॥
आनंद म्हणे श्रीगुरुराणा ।
आला भक्ताच्या कारणा ॥११४.६॥
अक्कलकोटातील लीलावतारी श्रीस्वामीब्रह्म हे कलियुगावर स्वारी करण्यासाठी आलेले आहेत. पायी खडावा, हाती दंड कमंडलू घेणारी ही भक्तवत्सल कृपामूर्ती दासांचा कैवार घेण्यासाठीच आलेली आहे. कटी कौपीन धारण करणारे हे साक्षात् दत्तदिगंबर अत्यंत अघटित लीला करीत भक्तांचा सांभाळ करतात, त्यांचे भक्तिप्रेम आस्वादतात. श्रीस्वामीनामाच्या निरंतर उच्चाराने सर्व पापे नष्ट होतात व भक्तांवर मायेचा प्रभावच उरत नाही. आनंदनाथ म्हणतात की, आमचा हा परब्रह्मस्वरूप श्रीगुरुराणा भक्तांसाठीच अवतरलेला आहे. म्हणून जो यांची भक्ती करील, नाम घेईल, तो या कळिकाळातही सुखरूपच राहील. श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पंचदशाक्षरी ब्रह्मनामाच्या प्रेमभावे केलेल्या जपाचे महत्त्व सांगताना श्रीआनंदनाथ महाराज म्हणतात,
स्वामीनाम गाता मग भय नाही । सांगतसे पाही निजछंदे ॥१॥
निजछंदे बोल माझे हे अमोल । तारक ते खोल जगालागी ॥२॥
आनंद म्हणे वाणी सुखाच्या कारणी । बोलिलो निधानी एकोत्तरशे हो ॥३.३॥
श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पावन नाम सतत गायले असता त्या भक्ताला जगात कसलेच भय शिल्लक राहात नाही, हे मी माझ्या स्वानुभवाने खात्रीशीर सांगू शकतो. म्हणून हे अमोल असे तारक स्वामीनाम अतीव प्रेमाने निरंतर जपा. ते खोलवर मुरते आणि मग सर्वत्र त्या परमानंदमय स्वामीरूपाचीच प्रचिती येत राहाते. असे हे बहुगुणी स्वामीनामच सुखाचे एकमात्र कारण आहे. म्हणून आपली वाणी दुस-या कशातही न गुंतवता फक्त श्रीस्वामीनामातच गुंतवावी, म्हणजे मग आपले साधनही निर्विघ्नपणे पूर्णत्वास जाते.
श्रीआनंदनाथ महाराज अवघ्या बत्तीस ओव्यांच्या आपल्या श्रीस्वामीपाठात श्रीस्वामीनामाचे माहात्म्य फार चपखल शब्दांत सांगतात. या स्वामीपाठाला आशीर्वाद आहे की, जो याचा नित्य नियमाने पाठ करेल त्याच्यावर श्रीस्वामींची कृपा होईल व श्रीस्वामीमहाराज त्याच्या घरी निरंतर वास करतील. तो पाठ मुद्दामच येथे पूर्ण देत आहे, म्हणजे नित्यपठणासाठी सोपे जाईल.
।। श्रीस्वामीपाठ ।।
श्रीगुरुनामाने तरती हे जन ll
वाचे नित्यनेम ठेविलीया ll१ll
ठेविल्याने खरे चुकती हे फेरे ll
गर्भवास तो रे नाही तया ll२ll
नाही तया काही आणिक उपाधी ll
दूर होय व्याधी दुरिताची ll३ll
दुरिताचा नाश तोडी भवपाश ll
जाहलिया दास समर्थाचा ll४ll
समर्थाचा दास भवाचा हा नाश ll
तोडी मायापाश नाम गातां ll५ll
नाम गातां जन तरतील जाण ll
वचन प्रमाण कलयुगी ll६ll
कलयुगी माझे तारक नेमाचे ll
बोलणे हे साचे माना तुम्ही ll७ll
माना तुम्ही जन सोडा अभिमान ll
दुरिता कारण करू नका ll८ll
करू नका तुम्ही फुका ही धुमाळी ll
आयुष्याची होळी होत असे ll९ll
होत असे खरी नरदेह हानी ll
तारक निशाणी देतो तुम्हा ll१०ll
देतो तुम्हा घ्या रे अमोल मोलाचे ll
भवालागी साचे कामा येत ll११ll
कामा येत तुम्हां जडासी तारील ll
दु:खासी हारील शरण गेल्या ll१२ll
शरण गेल्या प्राणी वाया नाही गेला ll
पुरातन दाखला पाहा तुम्ही ll१३ll
पहावे तुम्ही तरी आत्मा निर्मळ ll
साधू हा व्याकुळ तुम्हांलागी ll१४ll
तुम्हांलागी बा हे नेतो भवपार ll
दंभाचा संसार करू नका ll१५ll
संसारासी जाणा कारण त्या खुणा ll
वेद तो प्रमाणा बोलियेला ll१६ll
बोलियेल्या तरी श्रुती निर्धारी ll
मौन्य झाले चारी म्हणोनिया ll१७ll
म्हणोनिया तुम्हा सांगतसे वाचे ll
प्रेम ते जीवाचे सोडू नका ll१८ll
सोडू नका तुम्ही आत्मींचा हा राम ll
श्रीगुरु आराम करी तुम्हां ll१९ll
करी तुम्हां खरे ब्रह्म निर्मळ ll
मग तो व्याकुळ जीव कैचा ll२०ll
जीव कैचा उरे आत्म एक पहा रे ll
ब्रह्म ते गोजिरे देखियेले ll२१ll
देखियेले डोळा आपणा आपण ll
झाले समाधान तया लागी ll२२ll
तया लागी नाही नाही भवचिंता ll
हरियेली व्यथा भ्रममाया ll२३ll
भ्रममाया सरे श्रीगुरू उच्चारे ll
चुकतील फेरे गर्भवास ll२४ll
गर्भवास नाही तयांसी हा जाण ll
तारक प्रमाण जीवालागी ll२५ll
जीवालागी जाहला तोचि तारावया ll
सद्गुरू माया जोडीयेली ll२६ll
दयेचे कारण शांतीते प्रमाण ll
विवेक विज्ञान जोडे तेथे ll२७ll
जोडे तेथे जोड ब्रह्मींची ही खुूण ll
देतो आठवण जगालागी ll२८ll
जगालागी माझी हिताची सूचना ll
तारक प्रमाणा कलयुगी ll२९ll
कलयुगी खरी हीच भवतरी ll
भावासी उतरी प्रेमछंदे ll३०ll
प्रेमछंदे घ्या रे वाचुनिया पहा रे ll
कुळ त्याचे तरे भवालागी ll३१ll
आनंद म्हणे तरी नित्यपाठ करा ll
स्वामी त्याच्या घरा वसतसे ll३२ll
अशा एकाहून एक सुंदर आणि अपार प्रेमभावयुक्त रचना करून जगात श्रीस्वामीनामाचा, श्रीस्वामीकीर्तीचा डंका पिटून अवघा स्वामीभक्तिरंग उधळणा-या या स्वनामधन्य श्रीस्वामीशिष्य-शिरोमणी श्रीआनंदनाथ महाराजांच्या श्रीचरणीं साष्टांग प्रणिपात!
श्री स्वामी समर्थ यांची पूर्णकृपा प्राप्तझालेले अनंदनाथ महाराजांचे मुखातून आलेले स्वामी माहात्म्य.
अखिल ब्रह्माण्डाचे एकमेव चालक, मालक आणि तारणहार परब्रह्म भगवान श्री स्वामी देवांचा विजय असो!
साधक जन हो, आपण सर्वजण खुप भाग्यवंत आहोत, त्यामुळेच आपल्याला स्वामी चरणांची प्राप्ती झाली आहे. स्वामी चरण हे साधेसूधे नाहीत, तर जेथे देवांचाही उद्धार होतो, असे ते मोक्षधाम आहेत. आपल्या अवतार समाप्तीनंतर देवता ज्या निजधामी जातात त्या निजधामाचा अधिपती हा आपला स्वामीदेवच आहे! सर्व सृष्टिनियंता स्वामीदेव हा अनाकलनीय आहे; तो आपल्या बुद्धिने कधीही जाणता येणार नाही. अन कधी त्यांनीच याची जाणीव करून दिली तर आपल्याला तीही झेपेलच असेही नाही. एवढे अगाध आणि गूढ स्वामी महाराज आणि त्यांचे सामर्थ्य आहे. अशा स्वामींना समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या स्वरूपाची ओळख पटलेल्या त्यांच्या एखाद्या अंतरंगातील शिष्यालाच शरण जावे लागेल. त्याशिवाय आपल्याला कधीही स्वामी महाराज कळणार नाहीत आणि त्यामुळेच आपण अशाच एका अंतरंगातील शिष्याच्या स्वानुभावातील स्वामी वैभव दर्शन पाहत आहोत. तेव्हा सुरु करूया आजच्या स्वामी वैभव दर्शनाला!
आजचा आपला अभंग हा सर्व सामान्य लोकांच्या कल्याणासाठी फार महत्वाचा आहे. सर्व सामान्य मनुष्याला त्याच्या रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर यात सहजपणे मिळतात. प्रपंचातून परमार्थाकडे वाटचाल होते. मनुष्याला संसार करत करत आध्यात्मिक प्रगती साध्य होण्यासाठीचा अंतिम तरणोपाय यात सांगितला आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा आपल्या सोबत आपल्या पूर्व जन्मातील बऱ्यावाईट कर्माची शिदोरी घेऊन जन्माला येतो. त्यानुसार त्याला सुख-दुःख हे भोगावे लागते. सुख तर आपण आनंदाने उपभोगतो. मात्र जेव्हा दुःख भोगायची वेळ येते तेव्हा आपला धीर संपतो, आपण खचून जातो. आपली विचार शक्ती खूंटते. मग येथूनच आपली भ्रमंती सुरु होते. सत्य काय असत्य काय? याचा सारासार विचार होत नाही. श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय ? याची शहानिशा केल्या जात नाही. इथेच मग बुवाबाजीला पेव फूटते. बुवा बाबांच्या नादाने मती ही खूंटते, आर्थिक लुबाडनूक ही होते आणि मग त्यांच्या सांगण्यानूसार अनेक स्थळी भटकंती ही सुरु होते! पण 'याने ना प्रपंच साधतो, ना परमार्थ सुधारतो!' 'आंधळ दळतय अन कुत्र पीठ खातय!' अशी आपली अवस्था होते. तेव्हा स्वतःची अशी अवस्था होऊ द्यायची नसेल किंवा झालेली अवस्था सुधारायची असेल तर श्री आनंदनाथ महाराजांचा खालील अभंग कायम ध्यानात ठेऊन, त्यानुसार वाटचाल करा! याने तुमचा प्रपंच व परमार्थ दोन्ही ही सहज तरतील!
गंगा, यमुना, काशी, गया, भागीरथी । आम्हा पायापाशी समर्थांच्या ॥१॥
सर्व तीर्थांचे ते खरे खरे मुळ । स्वामीनाम बळ एक होता ॥२॥
सर्व देवतांचा एके ठायी मान । पूजिले चरण समर्थांचे ॥३॥
सर्व पातकांची केली केली होळी । काळ पायातळी समर्थांच्या ॥४॥
आनंद म्हणे ऐसे जोडिले निधान । खरे पुर्वपुण्य कामा आले ॥५॥
आनंदनाथ महाराज आपल्या या अभंगात सांगतात की, बाबानों तुम्ही इतरत्र कुठेही फिरू नका, कुठेही भटकू नका. कुणाच्याही सांगण्याला भूलू नका. तुम्हाला स्वतःचे कल्याण साधायचे असेल तर फक्त आणि फक्त माझ्या स्वामींना शरण जा. बस्स! एवढ्यानेच तुमचे कल्याण होईल. बाकी काहीही करायची व कुठेही जायची गरज नाही. कारण तुमचे पातक नष्ट करणाऱ्या गंगा आणि यमुना यासारख्या सर्व पापनाशक नद्या, तुम्हाला मोक्ष मिळवून देणारे काशी, गया सारखे सर्व तीर्थक्षेत्र, भागीरथी सारखी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी भूमी, या अशा तन मन धनाचा अपव्यय करुण तुम्हाला महत्प्रयासाने प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टी आम्हाला आमच्या स्वामींच्या पायापाशीच अगदी सहजपणे मिळतात, विनासायास मिळतात. हे आमच्या स्वामींचे सामर्थ्य आहे. एवढा मोठा स्वामींचा अधिकार आहे. स्वामींच्या अधिपत्याचे नेमके वर्णन आनंदनाथ महाराज असे करतात,
चौदा विद्या पायापाशी । रिद्धि सिद्धि ज्याच्या दासी ।। चौसष्ट कला त्या अंकित । देव ज्यासी शरणागंत ।।
असे स्वामींचे श्रेष्ठत्व आहे. सर्व देवतांच स्वामींच्या अंकित असल्यामुळे सर्व तीर्थक्षेत्राचे आणि सर्वतीर्थांचे खरे मुळ मुळ ठिकाण हे स्वामींच्या चरणांपाशीच आहे. तेव्हा इतरत्र वायफळ फिरण्यापेक्षा केवळ स्वामींना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण करावे. स्वामी नामाच्या बळाने हे सर्व सहज प्राप्त होते.
स्वामी महाराज हे सर्व देवतांचे उगमस्थान व ऊर्जास्थान असल्यामुळे इतर देवांची वेगवेगळी पूजा अर्चा करण्यापेक्षा केवळ स्वामी चरणांची पूजा केली तरी सर्व देवतांचा आशिर्वाद सहज मिळतो. असे असताना देखील जर कोणी स्वामी सोडून इतर देवतांच्या मागे धावत असेल तर त्याच्यासारखा कपाळकरंटा तोच. असेच म्हणावे लागेल. तसेच गंगा नदी ही केवळ तिच्यात स्नान केलेल्या वेळेेपर्यंतचे पाप धुवून टाकते, त्यानंतरचे नाही. म्हणजे पाप मुक्तिसाठी गंगेत पुन्हा पुन्हा स्नान करणे आवश्यक ठरते. मात्र स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्याने सर्वच्या सर्व पातकांची होळी होते. हा मुख्य फरक या दोन्हीत आहे. अहो, एवढेच काय तर प्रत्यक्ष काळ हा सुद्धा स्वामींच्या पायाचा दास आहे. जन्म मरणाचा खेळ खेळनारा काळ हा कायम स्वामींच्या चरणी असतो. असा माझा परब्रह्म आहे. अन अशा पूर्ण परब्रह्म स्वामींची चाकरी करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले, हा करुणानिधि आम्हाला भेटला हि खुप परमभाग्याची गोष्ट आहे. आमचे अनंत जन्मीचे पुण्य फळाला आले तेव्हा आम्हाला हे सुख लाभले आहे. तेव्हा अशी ही दुर्मिळ संधी न दवड़ता सर्वांनी स्वामींना शरण जाऊन जीवनाचे सार्थक करावे. अशी प्रेमाची व आपुलकीची विनंती आनंदनाथ महाराज करत आहेत. अन हे स्वामी चरण आपल्याला कुठे भेटतील याची माहिती आपण आपल्या पहिल्या श्री स्वामी वैभव दर्शनात सविस्तरपणे पाहितलेले आहे!
त्यामुळे आता तरी स्वामी भक्तांनी जागे होऊन इतर फाफट पसाऱ्याच्या मागे न धावता स्वामी चरणी धाव घेऊन व तेथेच एकनिष्ठ राहून मुक्ति मिळवावी!
श्री स्वामी समर्थ मठ, वेंगुर्ला, एक प्रासादिक श्रद्धा स्थान
श्री स्वामी महारांजांचे श्रेष्ठ शिष्य सद्गुरू आनंदनाथ महाराज ह्यांची पवित्र संजीवन समाधी येथे आहे. शिर्डी च्या साईनाथाना जगतासमोर आणणयाचे कार्यात ह्यांचा मोलाचा सहभाग होता. श्री स्वामी माऊली ने स्वमुख़ातून काढून दिलेल्या आत्मलिंग पादुका देखील येथेच आहेत. श्री स्वामी गुरुस्तव स्तोत्र, श्री स्वामी चरित्रस्तोत्र, आत्मबोधगीता, भजनानंद लहरी, स्वामी समर्थ स्तवनगाथा (२७०० दिव्य अभंगांसहित) अशा स्वामी कृपेने भरलेल्या अदभुत दिव्य रचनांची निर्मिती करून संजीवन समाधिस्थ झाले. सद्गुरू आनंदनाथांचे नातू गुरुनाथबुवा वालावलकर यांनी आनंदनाथ यांचेस्वामी समर्थ कार्य नेटाने पुढे चालवले.
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय!
।। श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ।।
आनंदनाथ महाराजांचे आनंदपीठ
अखंड भरतखंड पवित्र सनातन भूमीवरील परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचे आदी "श्रीआनंदपीठ"
"सदगुरु श्री आनंदनाथ महाराज स्थापित श्री स्वामी समर्थ मठ, वेंगुर्ला (कोकण)"
श्री आनंदनाथ महाराजांना परब्रह्म श्रीस्वामीराजांनी आपल्या मुखातून खाकरून ज्या आत्मलिंग पादुका दिल्या होत्या त्या ह्याच मठात आहेत. ह्या मठात गेल्यावर प्रत्येक स्वामीभक्ताचे अष्टभाव जागृत होतात म्हणजे होतातच कारण परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्याच आज्ञेने हा मठ आनंदनाथ महाराजांनी स्थापन केला आहे. वेंगुर्ला म्हणजे श्री आनंदनाथ महाजांच्या तपश्चर्या साधनेने सिद्ध केलेली तपोभूमी आहे. येथेच श्री आनंदनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. प्रत्येक स्वामीभक्त गुरुभक्ताने येथे जाऊन अवश्य दर्शन करून आपले जीवन कृतार्थ करावे. आणि महत्वाची विलक्षण गोष्ट म्हणजे विख्यात चित्रकार श्री. शेखर साने जी ह्यांनी श्री स्वामींचे तैलचित्र वेंगुर्ले मठाला अर्पण केले आहे आणि ते गर्भगृहात पूजाविधी साठी स्थापन करण्यात आले आहे.