श्रीसंत एकनाथ महाराज

श्रीसंत एकनाथ महाराज
श्रीसंत एकनाथ महाराज

जन्म: १५३३, पालनपोषण भानुदास महाराज (आजोबा)
आई/वडील: रुख्मिणी/सुर्यनारायण
कार्यकाळ: १५३३ ते १५९९
संप्रदाय: वारकरी
गुरु: जनार्दन स्वामी
समाधी/निर्वाण: इ. स. १५९९, फाल्गुन व ६, कृष्णकमल तीर्थात जाऊन आत्मा ब्रम्हांडात विलीन
वाड्गमय:
१. एकनाथी भागवत
२. भावार्थ रामायण
३. ज्ञानेश्वरी शुद्धीकर
४. रुख्मिणी स्वयंवर 

जन्म  व बालपण 

संत एकनाथांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राम्हणाच्या घरात इ.सन १५३३ पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले, तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. वयाचे सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठीचा.

एकनाथ गुरुगृही 

जनार्दन स्वामींनी समोर पाहिले तर एक बारा वर्षाचा मुलगा हात जोडून उभा असलेला दिसला. तेव्हा ते म्हणाले, “बाळा, तू पैठणहून माझ्याकडे आला आहेस. इतकच नव्हे तर तुझी सर्व माहिती मला माझे गुरू श्री दत्तात्रेय यांच्या दॄष्टान्ताकरवी समजली आहे. तुला मी माझे शिष्यत्व बहाल करतो.” आपल्या गुरूचे शब्द ऎकताक्षणीच एकनाथांना मोठा आनंद झाला. त्यांनी जनार्दनस्वामींना लोटांगण घातले. नकळत त्यांच्या वाणीतून शब्द बाहेर पडले.

अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता । चरणी जगन्नाथा चित्त ठेविले ।
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ।
एका जनार्दनी एकपणे उभा । चैतन्याची शोभा शोभतसे ।

त्यांनी जनार्दन स्वामींची मनोभावे सेवा केली.

त्यानंतर नाथ दौलताबादेच्या किल्ल्याशेजारीच असलेल्या शुलभंजन डोंगरावर तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. त्या ठिकाणी एका नागाने आपला फणा नाथांच्या डोक्यावर छ्त्राप्रमाणे धरला, तरी नाथांना त्याचा मागमूस लागला नाही. कारण ते एकाग्रतेने परमेश्वराचे चिंतन करीत होते. याच सुमारास कर्मधर्मसंयोगाने जनार्दन स्वामी नाथांची तपश्चर्या पाहण्यास आले असता त्यांना हे दृष्य दिसले. त्यांनी नागाला जाण्याची आज्ञा केली. स्वामींची आज्ञा प्रमाण मानून नाग त्वरीत निघून गेला. स्वामींनी एकनाथांना ध्यानातून जागे करून ते त्यांना म्हणाले, “एकनाथा, तुझ्या तपश्चर्येची आज जवळ-जवळ सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. परमेश्वराने तुझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवला असून आता तू घरी जावस ही माझी इच्छा आहे. एवढंच नव्हे तर लग्न करून गृहस्थाश्रम पत्कर. यातच तुझे कल्याण आहे. कारण संसारात राहूनच तू परमार्थ साधणार आहेस. भोळ्याभाबडया लोकांच अज्ञान दूर करणार आहेस. त्यासाठी तुझ्या हातून अमूल्य अशी ग्रंथरचना निर्माण होईल.”

एकनाथ महाराज दत्त दर्शन
श्री एकनाथांना झालेले दत्त दर्शन  

एकनाथांना झालेले दत्त दर्शन 

भगवतोत्तम, शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले होते. 

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा…. 
समाधि न ये ध्याना… हरली भवचिंता।। 

नाथ आपल्याला आवर्जून सांगत आहेत की, 
`श्रीदत्तात्रेय हे त्रिगुणात्मक आहेत. उत्पत्ती-स्थिती-लय या तीनही तत्त्वांचे मीलन या दैवतात झालेले आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश या दैवताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत.
दत्तात्रेयांचे वर्णन करणे चारही वेदांना शक्य झाले नाही. समाधी अवस्थेपर्यत पोहोचलेल्या योगी पुरुषांना, ऋषी-मुनींना, देवांनासुद्धा श्रीदत्तात्रेयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. ध्यानावस्थेमध्येसुद्धा दत्तात्रेयांचे दर्शन घडत नाही की, त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही. तो तर त्रैलोक्याचा राणा आहे. शब्दातीत आहे. 

( ॐ श्री सदगुरु देवाय नमः )

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त…. जन्म-मरणाचा पुरलासे अंत।।

श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना नाथ महाराज म्हणातात, `ब्रह्मा म्हणजे रज, विष्णू म्हणजे सत्त्व आणि शिव म्हणजे तम. अशा तीन मुख्य देवांचा हा त्रिगुणातीत अवतार आहे. जे हवे ते प्रेमाने देणारा श्रीदत्त प्रापंचिक भक्तांच्या सर्व प्रकारच्या चिंता मिटवणारा परमेश्वर आहे. म्हणून तर माझे हे प्राणप्रिय दैवत माझ्या आत आणि बाहेर तेज फाकून आहे’. 
नाथ आवर्जून एक गोष्ट सांगतात की, `श्रीदत्तात्रेय हे माझ्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून आहेत. 

परा-पश्यती-मध्यमा-वैखरी या चारही वाणी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करायला असमर्थ आहेत. त्या चारही वाणी अक्षरशः माघारी फिरल्या आहेत. परावाणीलासुद्धा दत्तात्रेयांचे वर्णन करणे जमले नाही. अशा या ब्रह्मांडव्यापी दत्तात्रेयांचे अवतार-रहस्य सामान्य वृत्तीच्या अभागी लोकांना कसे काय कळणार? ज्यांना श्रीदत्तात्रेयांचे अवतार-रहस्य कळेल, ते भव्य स्वरूप सततच्या चिंतनाचा विषय होईल, त्या भाग्यवान भक्तांच्या जन्म-मरणाच्या फेर्या निश्चित संपुष्टात येतील.

दत्त येऊनिया उभा ठाकला… जन्ममरणाचा फेरा चुकविला।।

नाथ समाधी लावून बसले होते. मुखात `दिगंबरा दिगंबरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा’।।
हा सिद्धमंत्र अक्षरशः घुमत होता. ध्यानावस्थेत असताना नाथांच्यासमोर भगवान श्रीदत्तात्रेय आपल्या अतिभव्य मूळ रूपात प्रकट झाले. नाथांना तर परमानंद झाला. सगुण साकार झालेल्या श्रीदत्तात्रेयांना नाथांन साष्टांग नमस्कार घातला. नाथांची ही अपूर्व भक्ती पाहूनच श्रीदत्तात्रेय नाथांवर प्रसन्न झाले होते. भगवान दत्तात्रेयांनी नाथांना अलगद उठवले आणि आपल्या छातीशी घट्ट धरले. आशीर्वाद दिला. नाथांच्या लक्षात आले की, आपली उपासना पूर्ण झाली. आपला जन्म-मरणाचा प्रवास पूर्णपणे संपुष्टात आला. प्रत्यक्ष दत्तगुरूंनी चौर्याऐंशी लक्ष योनींचा दुर्धर प्रवास एका क्षणात संपवला. नाथ भारावून गेले आणि पुन्हा पुन्हा वंदन करू लागले.

`दत्त दत्त’ ऐसें लागलें ध्यान। हारपले मन झाले उन्मन।
 `मी-तू’पणाची झाली बोळवण। एका जनार्दनीं श्रीदत्तध्यान।।

नाथांच्या मुखात `दत्त दत्त’ असे पवित्र नाम घुमू लागले. नाथांचे अवघे भान हारपले. 
सर्वत्र दत्तात्रेय व्यापून आहेत याचे भान नाथांना आले. मी-तूं पणाची भावना पूर्णपणे विलयाला गेली. आपले सद्गुरु हेच दत्तात्रेय आहेत याची सुखद जाणीव झाली. नाथ दत्तध्यानात पूर्ण विरघळून गेले. दत्तात्रेयांनी नाथांना अद्वैती अनुभव दिला होता.

गुरूंच्या आदेशानुसार एकनाथ पैठण मुक्कामी येऊन आजोबा-आजीला भेटले. तेव्हा आजोबा-आजीला परम संतोष वाटून त्यांनी लवकरच एकनाथाचे लग्न विजापूरचे देशस्थ ब्राम्हण सावकाराचे मुलीशी म्हणजेच गिरिजाबाईंशी लावून दिले. गिरिजाबाईंचा स्वभावही एकनाथांसारखा शांत व परोपकारी वृत्तीचा होता.

अशा रीतीने एकनाथांनी जरी संसार सुरू केला तरीसुद्धा ते नेहमी ईश्वरमग्नच असत. त्यांचा पारमार्थिक कार्यक्रम शिस्तबद्ध होता. सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे चिंतन करून मगच गोदावरी नदीत जाऊन स्नान करणे, स्नान केल्यानंतर घरी येऊन गीतेचे पारायण करणे, त्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणे आणि रात्री जनसमुदायासमोर देवळात कीर्तन करणे अशी होती त्यांची सर्वसाधारण दिनचर्या.

हातीं कमंडलु दंड । दत्तमूर्ति ती अखंड ॥१॥
ध्यान लागों माझें मना । विनवितो गुरुराणा ॥२॥
अंगी चर्चिली विभूति । ह्रदयीं वसे क्षमा शांति ॥३॥
तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥
एकाजनार्दनी दत्त । तद्रूप हें झालें चित्त ॥५॥

नाथांचा भक्तांना उपदेश 

नाथांनी लोकांना फार मोलाचा उपदेश केला तो असा की, अनुताप झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही. जेथे अर्थ आहे तेथे परमार्थ नाही. हरीनाम एकच शाश्वत असून शूद्रांनाही ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते. भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे आणि संतांची भेट होणे हे परमभाग्य होय. नाथांची शिकवण होती सर्व धर्म, पंथ, जाती-उपजाती सारख्याच आहेत. सर्व मानवजातीकडे सहिष्णू वृत्तीने पाहणे त्यांना अभिप्रेत होते. नाथांचे गुरू जनार्दन स्वामी दत्तभक्त असल्यामुळे नाथही दत्तभक्तीमध्ये रममाण झाले होते.

एक प्रसंग असा घडला, रणरणत्या उन्हात एका हरिजन स्त्रीचे मूल उन्हाच्या चटक्यांनी पाय पोळ्ल्याने थयथय नाचत होते. नाथांनी क्षणाचाही विचार न करता त्याला कडेवर घेऊन शांत केले. त्यांच्या विचाराप्रमाणेच त्यांचा आचार होता.

नाथांनाच स्वप्नात दृष्टांत झाला होता की, आळंदी येथील समाधिस्थ ज्ञानदेवांच्या गळ्याभोवती अजानवृक्षाच्या मुळ्यांचा विळखा पडला होता. नाथांनी प्रत्यक्षात तेथे जाऊन त्या मूळ्या कापून ज्ञानदेवांचा गळा मोकळा केला होता. त्यांनीच ज्ञानेश्वरी ग्रंथाची शुध्द प्रत तयार केली होती. नाथांच्या घरचा श्रीखंडया म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचाच (भगवान कृष्णाचाच) अवतार होता. नाथांच्या हातून ग्रंथनिर्मिती व्हावी म्हणूनच हा जणू त्यांच्या सेवेत आला होता.

श्रीमद्भागवतातील भक्तिप्रधान अशा अकराव्या स्कंधावर त्यांनी प्राकृत भाषेत एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला आहे. ह्या त्यांच्या ग्रंथास जनमानसात खूपच कीर्ती लाभली. नाथांनी काशी, रामेश्वरादी तीर्थयात्रा केल्या होत्या. रामेश्वरक्षेत्री त्यांनी तहानेने तळमळणाऱ्या गाढवाला गंगाजल पाजल्याची कथा सर्वश्रृत आहे. त्यासंबंधात ते म्हणाले होते, “सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी परमेश्वर भरला आहे. तहानेने तडफडणाऱ्या गाढवाला पाणी पाजणे हेही धर्मपालनच आहे.”

पैठण या तीर्थक्षेत्री नाथांच्या कीर्तनाला खूप मोठा जनसमुदाय लोटत असे. पंढरपूर या क्षेत्री देखील त्यांची कीर्तने वारकरी पंथात खूपच प्रिय ठरली होती.

नाथांची वाणी जेवढी रसाळ तेवढीच त्यांची लेखणीही ओघवती होती. कृष्णभक्ती आणि आत्मबोधाचे वर्णन असलेला ‘रूक्मिणी स्वयंवर’ हा ग्रंथही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतो. त्याच बरोबर ते बहुजन समाजात वावरत होते. त्यामुळेच वासुदेव, वाघ्या, मुरळी, कोल्हाटीण, विंचू, सर्प, दळण, कांडण, जोगवा, गोंधळ, कापडी, पांगळा अशा अनेक नित्य जीवनातील प्रकारांवर नाथांनी भारूड रूपात केलेले कवित्व खूप काही अध्यात्म सांगून जाते. भारूडांप्रमाणेच नाथांच्या अभंगातून तत्कालीन समाजाचे चित्रण उभे राहते. त्यांच्या आरत्या तर घरोघरी पोचल्या आहेत. ते अभंग अगर आरतीच्या शेवटी लिहीत, ‘एका जनार्दनी’ म्हणजेच आपल्याबरोबर ते आपल्या गुरूंचेही नाव जोडीत.

नाथ त्यांच्या घरी राहणाऱ्या श्रीखंडयाला म्हणाले होते “फाल्गुन वद्य षष्ठी हा माझ्या गुरूजींचा जन्मदिवस आणि निर्वाणदिवस आहे. तेव्हा आमचेही निर्वाण याचदिवशी होणार आहे कारण माझे कार्य आता संपलेले आहे” आणि खरोखरच इ.स.१५९९ मध्ये नाथांनी गोदावरी नदीत आत्मसमर्पण केले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ सहासष्ठ वर्षे जगले.

नाथांनी बहुजन समाजाला अध्यात्माचे ज्ञान व्हावे म्हणून प्राकृत भाषेत विपुल लिखाण केले. सर्वांभूती समभाव दाखविला मानवनिर्मित कृत्रिम भेदांना त्यांनी छेद दिला आणि मुख्य म्हणजे संसारात राहूनही परमार्थ साधता येतो हे स्वानुभवाने दाखवून दिले. अशा या थोर संताला आदरांजली वाहण्यासाठी आजही हजारो लोक फाल्गुन वद्यषष्ठीला पैठण मुक्कामी जातात आणि दर्शन, भजन-पूजन-प्रवचन व कीर्तन करून नाथांच्या नावाचा गजर करतात. 

नाथांचा शेवटचा उपदेश आहे :

एका जनार्दनी विनंती । येऊनी मनुष्य देह प्रती ॥
करोनिया भगवद्भक्ती । निजात्मप्राप्ती साधावी ॥
 

गुरु परंपरा

आदी नारायण
   |
ब्रम्हदेव
   |
अत्री
   |
दत्तात्रेय 
   |
जनार्दन स्वामी

   |
एकनाथ महाराज

संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज
संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज

संत साहित्यिकांच्या नजरेतून श्री एकनाथ महाराज

एखाद्या घराण्यात तेजस्वी व्यक्ती जन्माला यायची असेल तर त्या घराण्याची तेजस्वताही तशीच असावी लागते. सत्शील कुटुंबामध्येच सत्शील व्यक्ती जन्म घेतात. कारल्याच्या वेलाला काहीही केलं तरी द्राक्ष येऊ शकत नाहीत. तसं कोणत्याही असामान्य व्यक्तीच्या इतिहासाचा अभ्यास केला तर त्या व्यक्तीचं घराणं हे असामान्यच होतं असं आढळतं. संत एकनाथ महाराजांचा जन्म ज्या कुलकर्णी घराण्यात झाल ते ही याला अपवाद नव्हतं. भास्करपंत कुलकर्णी हे या घराण्याचे मूळ पुरुष. सावित्रीबाई या त्यांच्या सात्विक स्वभावाच्या पत्नीनं ज्या भानुदास महाराजांना जन्म दिला. तेच संत एकनाथांचे पणजोबा. चक्रपाणि आणि सरस्वती या त्यांच्या मुलगा व सुनेला एकनाथ महाराजांचे आजोबा आणि आजी व्हायचं भाग्य लाभलं. सूर्यनारायण या चक्रपाणिंच्या मुलाला रुक्मिणी व गोदावरी अशा दोन बायका  होत्या. पैकी रुक्मिणी ही एकनाथांची आई.

एकनाथांचा जन्म आणि बालपण याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पण त्यांचा जन्म साधारणपणे शके १४५० ते १४५५ (म्हणजे इ. स. १५३३-३४) या दरम्यान झाला असावा असा अभ्यासकांचा आणि इतिहास संशोधकांचा कयास आहे. पैठण हे नाथांचं जन्मगाव. त्याकाळी पैठणला प्रतिष्ठान म्हणत. 

त्यांच्या बालपणीच आई वडिल परलोकी गेले. त्यावेळी बिचाऱ्या लहानग्या नाथाला आपले आई वडिल वारले म्हणजे काय, हे देखिल कळत नव्हतं. आई वडिलांना पारख्या झालेल्या एकनाथाचं संगोपन आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती यांनी तळहातावरच्या फोडासारखं जपून केलं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्याची प्रचिती एकनाथानं अगदी लहानपणापासून आणून दिली. अगदीच लहान असतानाचा काळ सोडला तर एकनाथ इतर मुलांसारखा खेळण्यात कधीच रमला नाही. तो दगडाचा देव मांडून त्याला पानं फुलं वहात असे. इतकंच नाही तर फळी खांद्यावर वीणा म्हणून घेऊन देवापुढे भजन करण्यात तल्लीन होऊन जाई. आजोबा पूजा करू लागले की, पुजेचं साहित्य गोळा करून देई. बारीकसारीक गोष्टींमधून एकनाथाची चौकसबुद्धी, तीव्र स्मरणशक्ती आणि उत्कृष्ठ अशी पाठांतर क्षमता यांची प्रचिती येत असे. लहानवयापासून परमार्थाकडे ओढा असलेला एकनाथ पुराण कीर्तन एकाग्रतेनं आणि उत्सुकतेनं ऐकत असे. त्याची तैलबुद्धी पाहून पुराणिक बुवांना देखील आश्चर्य वाटत असे. आजोबांचा लाडका ‘ऐक्या’ वेळ मिळताच रामनामामध्ये दंग होऊन जाई. पण हे सारं करत असतांना सहाव्या वर्षी मौजीबंधन झालेला हा तेजस्वी मुलगा जेंव्हा आजुबाजुच्या घटनांचं निरिक्षण करी तेंव्हा त्याला खूप गोष्टींचं आश्चर्य वाटे आणि राग ही येत असे. त्या पैठणात भक्तांची सतत ये-जा चालू असे. भजन, कीर्तन, प्रवचन यांचा हलकल्लोळ चालू असे. अनेक साधुसंत, बैरागी, योगी, तपस्वी तिथे वावरत असत. परंतु एकनाथाला या साऱ्यांमध्ये कोरडेपणा, ढोंगीपणा, अंधश्रद्धा यांचीच रेलचेल दिसत असे. 

समाजाला मार्गदर्शन करायचं असेल तर मार्गदर्शकाला ईश्वराची प्रचिती असायला हवी. नाहीतर ती नुसतीच पोपटपंची व्हायची ही एकनाथांची पक्की धारणा होती. त्यामुळे त्या परमेश्वराची कृपा संपादन करुन घेण्याचा ध्यासच एकनाथानं घेतला. आता त्यासाठी गरज होती तशा समर्थ गुरुची! एकनाथानं त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू केले. एकदा असाच शिवालयात चिंतन - मनन करीत बसला असताना तिथं आलेल्या एका वृद्ध गृहस्थानं एकनाथाला “तुला आत्मज्ञान प्राप्त करुन घ्यायचं असेल तर देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांचेकडे जा” असं सांगितलं. नाथाच्या आनंदाला पारावार उरला नाही. ईश्वरप्राप्ती आणि नंतर समाजोद्धार या विचारांनी झपाटलेल्या एकनाथानं कशाचाही विचार न करता तडक देवगिरीचा रस्ता धरला. पैठणहून देवगिरी साधारणपणे ५० मैल लांब. पण ७-८ वर्षांचा कोवळा एकनाथ दिवस-रात्र, तहान, भूक या कशाचीही पर्वा न करता हे अंतर पायी तुडवून देवगिरीला पोहोचला.

एकनाथ महाराज तपाचरण, शूलभंजन डोंगर
एकनाथ महाराज तपाचरण, शूलभंजन डोंगर

जनार्दन स्वामींची नजर एकनाथाकडं वळताच ती बालमूर्ती स्वामींना साष्टांग दंडवत घातली झाली. पितृवत मायेनं स्वामींनी एकनाथाला उठवून जवळ घेतलं, त्याची विचारपूस केली. आई-वडिलांवर रुसून हा मुलगा पळून आला असेल असाच साऱ्यांचा समज होता परंतु एकनाथानं “चित्ताला अनुताप झाल्यामुळे” आपण आल्याचं सांगितल्यावर स्वामींनासुद्धा गहिवरुन आलं. एकनाथाची ती मुद्रा आणि बोलणं यांनी जनार्दन स्वामींच्या मनात एकनाथाबद्दल पहिल्या भेटीतच मायेचा झरा निर्माण केला. 

जनार्दनस्वामी हे परम दत्तभक्त. त्यांचा जन्म चाळीसगावचा. रमा व सावित्री या त्यांच्या दोन बायका. देवगिरीच्या परगण्याची जहागिरी त्यांचेकडे होती.जनार्दनस्वामींचा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आणि कर्तृत्वामुळेच त्यांना हा मान यवनांचं राज्य असतानाही मिळाला होता. मात्र सत्ता आणि संपत्ती हातात असतानाही जनार्दनस्वामी जीवनाच्या शाश्वत ध्येयाकडे नजर ठेवूनच प्रत्येक क्षण व्यतीत करत असत. भागवताच्या नवव्या अध्यायात :-

दत्तात्रेय शिष्यपरंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा 
तेणे जनार्दनु तिसरा । शिष्य केला खरा कली युगी ॥४३०॥

असा उल्लेख आहे. त्यावरून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती वरचा होता याची कल्पना येते तर अशा अधिकारी गुरुंकडे तशाच तयारीचा शिष्य येवून दाखल झाला होता. चिकाटी, अभ्यासू वृत्ती, चौकसबुद्धी, सदाचार आणि श्रद्धा या गुणपंचकाच्या बळावर एकनाथानं जनार्दन स्वामींना शिष्यत्व द्यायला भागच पाडलं. 

एकनाथाला सद्गुरु सेवेची मुळातच अतिशय आवड. तशी संधी प्राप्त झाल्यामुळे त्याला आता काय करु आणि काय नाही असं होऊन गेलं होतं. परमोच्च ध्येयानं झपाटलेल्या आठ वर्षांच्या या मुलाला सद्गुरुंशिवाय आता दुसरं काहीही सुचत नव्हतं. काही दिवस आपला गुरुंचा दिनक्रम पाहिल्याबरोबर एकनाथानं त्याला अनुसरुन आपला दिनक्रम ठरवला. जनार्दन स्वामी पहाटे उठत तर एकनाथानं त्याही अगोदर उठावं, वाडा झाडून काढावा, सडा घालावा, स्वामींचं स्नानाचं पाणी काढून द्यावं. संध्येची आणि देवपूजेची तयारी करुन ठेवावी, गंध उगाळून ठेवावं, कपडे धुवून आणावेत, पूजा वगैरे झाल्यावर स्वामी बाहेर जायच्या अगोदर त्यांचे जोडे समोर आणून ठेवावेत, जेवणाच्या वेळी वाढायला मदत करावी, रात्री स्वामींचं अंथरुण घालावं, त्यांच्या पायथ्याशी स्वत:चं अंथरुण टाकून स्वत: झोपी जावं, असा दिनक्रम या बालशिष्यानं बांधून घेतला. या गोष्टी तर रोजच्या झाल्या. पण या व्यतिरिक्त प्रसंगानं येणाऱ्या जबाबदाऱ्यांवर देखील एकनाथ झेपावत असे. आपणच गुरुसेवा या नात्यानं सर्वच्या सर्व कामं करावीत असं त्याला वाटत असे. 

मात्र एकीकडे ही सेवा चालू असतानाच दुसरीकडे हा गुणी शिष्य गीता, ज्ञानेश्वरी, ब्रह्मसूत्रे, भागवत, उपनिषदे या ग्रंथांमधलं ज्ञान आत्मसात करत होता. न्याय आणि मीमांसा ही शास्त्रही त्यानं अभ्यासली. पातंजल योगाचा देखील सखोल अभ्यास केला. मनापासून केलेली गुरुसेवा आणि आध्यात्मिक ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास यामुळे एकनाथ दिवसेंदिवस सर्वांगीणदृष्ट्या विकसित होत गेला. आध्यात्म आणि गुरुसेवा हे दोन्हीही साधत असताना एकीकडे तो तलवारबाजीही शिकला. जनार्दन स्वामींनी त्याची निष्ठा, हुशारी आणि कर्तव्यदक्षता पाहून त्याला स्वत:च्या कचेरीत न्यायला सुरुवात केल्यानंतर तारुण्यावस्थेत प्रवेश केलेल्या एकनाथानं काही काळातच तिथल्या खटले, तक्रारी, वाटण्या, संरक्षण व्यवस्था, लोकांच्या अर्जाची उत्तरं लिहीणं अशा सर्वच प्रकारच्या कामांमध्ये निपुणता संपादन केली. काही काळातच स्वामींच्या इतक्या जबाबदाऱ्या एकनाथानं उचलल्या की, जनार्दनस्वामींना आपल्या शिष्यराजाचं कौतुक कसं करावं हे ही समजेनासं झालं. 

एकनाथाकडे स्वामींनी हिशोब लिहिण्याचं एक महत्त्वाचं काम दिलेलं होतं. नाथाचा स्वभावच मुळी कशातही हयगय, कुचराई आणि ढिलेपणा खपवून न घेण्याचा असल्यामुळे एके दिवशी हिशेबात आलेल्या अधेलीच्या चुकीमुळे तो अतिशय अस्वस्थ झाला. कुठल्याही परिस्थितीत ही चूक आजच्या आज शोधून काढायची या निर्धारानं तो हिशोब तपासायला बसला. (त्याकाळी चवली, पावली, अधेली अशी नाणी चलनात होती आणि कमालीच्या स्वस्ताईमुळे कमीत कमी किंमतीच्या नाण्याला सुद्धा फार महत्त्वं होतं) होता होता मध्यरात्र उलटून गेली आणि चूक सापडल्या बरोबर “सापडली!” असं म्हणत नाथानं टाळी वाजवली. त्याचबरोबर जनार्दन स्वामी जागे झाले आणि नाथाच्या समोर पडलेल्या चोपड्या पाहून “काय सापडलं रे”? म्हणत उठून बसले. सारा वृत्तांत कळल्यावर कृतार्थतेनं नाथाच्या डोक्यावरुन हात फिरवत स्वामी म्हणाले, “एकोबा असंच मन लावून कृष्णभक्ती केलीस तर अवघं जीवन तेजानं उजळून जाईल.” नाथानं स्वामींचे पाय धरले. खरोखरच किती दिव्य प्रसंग हा!

एकनाथानं आपल्या गुणसंपन्नतेची झलक अजून एका प्रसंगी अशीच दाखवली. गुरुवार हा दत्तभक्तच काय, दत्तस्वरुप असलेल्या जनार्दन स्वामींच्या ध्यानाचा दिवस. त्या दिवशी ते इतर कोणतीच कामं करीत नसत. एकदा ही संधी साधून शत्रूनं गुरुवारीच किल्ल्यावर अचानक हल्ला केला. जनार्दनस्वामी ध्यानस्थ बसलेले. 

एकनाथ रखवालदाराचं काम करत उभा असतानाच दूतानं हल्ल्याची बातमी दिली. क्षणाचाही विलंब न करता एकनाथानं ध्यानस्थ स्वामींना वंदन करून तडक शस्त्रागार गाठलं. स्वामींचं चिलखत अंगावर चढवून, हाती तलवार घेऊन, स्वामींच्या घोड्यावर स्वार होऊन शीघ्रतेनं एकनाथ युद्धभूमीवर हजर झाला. सैन्य आदेशाची वाट पहात होतं. नाथाचा इशारा मिळताच सैन्य शत्रूवर तुटून पडलं. सहज म्हणून तलवारबाजी शिकलेल्या नाथाला आज तिचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची संधीच जणू चालून आली होती. रणांगणातल्या या वीराचा आवेश आणि रणकौशल्य पाहून शत्रूच्या सैन्याची अक्षरश: पाचावर धारण बसली. 

दिवसेंदिवस नाथाची दृढतर होत चाललेली भक्ती आणि त्याच्या आचरणात दिसून येत असलेले उच्चतम संस्कार पाहून जनार्दनस्वामींनी या साऱ्याला साजेसं फळ नाथाच्या पदरात घालायचं ठरवलं. देवगिरी पासून थोड्या अंतरावर एक टेकडी होती. अतिशय दाट हिरवीगार झाडी, रंगीबेरंगी फुलं आणि सर्वांवर कळस म्हणजे परम रमणीय असं सरोवर यामुळे हा परिसर कोणावरही मोहिनी घालेल असाच होता. या ठिकाणी साक्षात् दत्तात्रयांचा रहिवास होता. जनार्दन स्वामी बऱ्याच वेळा गुरुवारी तिथे जात असत. त्यांच्यात कितीतरी वेळपर्यंत सुखसंवाद चालत असे. अशाच एका गुरुवारी तिथे जाताना स्वामींनी नाथालाही बरोबर घेतलं. स्नानसंध्या झाल्यावर स्वामी ध्यानस्थ बसले. तेवढ्यात तिथे एक मलंग म्हणजे फकीर आला. खरं तर त्या स्थळी पोहोचल्या बरोबर जनार्दन स्वामींनी एकनाथाला सांगून टाकलं होतं की, एका दत्तात्रयांवाचून इथे दुसरं कोणीही येत नाही. परंतु संपूर्ण अंगभर कातडं पांघरलेलं विशाल आणि आरक्त डोळे आणि बरोबर एक कुत्री आणि तिची पिल्लं अशा अवताराला तो फकीर बघितल्यावर तर नाथाच्या डोक्यात तशी शंका देखिल आली नाही. त्या फकिराची आणि जनार्दन स्वामींची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर स्वामींनी पुढे होऊन त्या फकीराच्या चरणी माथा ठेवला. फकीरानं स्वामींना उठवून दृढ आलिंगन दिलं. दोघांची आत्मसुखाची बोलणी सुरू झाली. एकनाथ आश्चर्य चकित होऊन हे सारं पहात होता. तेवढ्यात त्या फकीरानं जनार्दन स्वामींना एक मातीचं भांड देऊन त्या कुत्रीचं दूध काढून आणायला सांगितलं. स्वामींनीही भांडे भरून दूध काढून आणून त्या फकीराच्या हाती दिलं. फकीरानं झोळीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढून त्या दुधात भिजविले आणि तो फकीर व जनार्दनस्वामी असं दोघंही एकाच भांड्यात जेवले. जेवताना जनार्दन स्वामींच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पाहून एकनाथ चक्रावून गेला. शिस्तीचे आणि स्वच्छतेचे भोक्ते असलेले आपले गुरु अमंगल वेशातल्या त्या फकीराशी एवढी सलगी कशी काय करत आहेत, हे नाथाला उलगडेना. पण तेवढ्यात स्वामींनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट आठवली, आणि हा फकीर म्हणजे साक्षात श्रीदत्तात्रयच असणार हे नाथानं ताडलं. तेवढ्यात त्या दोघांचं जेवण झालं आणि स्वामींनी नाथाला ते भांडं (कटोरा) धुवून आणण्यास सांगितलं. नाथान ज्ञानदृष्टीनं विचार करून धुण्यासाठी त्या भांड्यात घातलेलं पाणी घटाघटा पिऊन टाकलं आणि कटोरा स्वच्छ धुवून त्या फकीराच्या हाती दिला आणि क्षणाचाही विलंब न करता साष्टांग नमस्कार घातला. उठून पहातात तो काय, त्या फकीराच्या जागी “तीन शिरे सहा हात” असे साक्षात श्री दत्तात्रय उभे ! नाथांनी भारावलेल्या अवस्थेत पुन्हा नमस्कार घातला आणि श्री दत्तात्रय अंतर्धान पावले ! नाथाला धन्य धन्य वाटलं. साक्षात् दत्तदर्शनाचा महत्त्वाचा टप्पा झाल्यानंतर जनार्दन स्वामींनी एकनाथाला स्वतंत्रपणे काही साधना करायला लावली असा विचार केला. 

या देवगिरी पासून थोड्याच अंतरावर शूलभंजन नावाचा पर्वत आहे. मार्कंडेय ऋषींची ती तपोभूमी अतिशय रमणीय आणि पावन आहे. तिथे मौन धारण करुन एकाग्रतेनं आत्मसाधना कर आणि उद्धरेत आत्मना आत्मानम् या वचनाप्रमाणं स्वत:च कल्याण करून घे. लक्षात ठेव साक्षात्कारप्राप्ती करुन घेऊन मगचं परतायचं. जा बाळ, माझे आशिर्वाद आहेत. 

मोठ्या जड अंत:करणानं त्यांनी नाथाला निरोप दिला. आपल्या परमप्रिय गुरुचं रूप डोळ्यात साठवून घेऊन नाथांना शूलभंजन पर्वताकडे प्रयाण केलं. देवगिरीच्या वायव्येकडे असलेल्या या पर्वताचा परिसर पाहून नाथाला परमानंद झाला. नाथानं तिथे एक पर्णकुटी बांधली. रोज सकाळी लवकर उठून सूर्यकुंडात स्नान करावं आणि ध्यानस्थ व्हावं व त्यातच दिवसातला बहुतेक वेळ खर्च करावा असा दिनक्रम सुरू झाला. श्रीकृष्णाचं ध्यान करताच ध्यानात श्रीकृष्ण प्रगट होई आणि त्याची मानसपूजा करताना नाथाला बाह्य जगाचा पूर्ण विसर पडत असे. वेळ कसा आणि किती गेला याचं भानही उरत नसे. ध्यानातून बाहेर आल्यानंतर मिळतील ती कंदमुळं खायची आणि जगाच्या कल्याणाचं चिंतन करत बसायचं असा कार्यक्रम असे.

परमतत्वाचा साक्षात्कार झाल्यानंतर गुरुंच्या शब्दाप्रमाणे आता माघारी देवगिरीला जायला हरकत नाही असा विचार करुन एकनाथांनी पुन्हा देवगिरी गाठली. जनार्दन स्वामींना नमस्कार करून नाथ समोर उभे राहिले. त्यांच्या मुखकमलाकडे पहाताच ज्ञानी जनार्दन स्वामींनी सर्व काही ओळखलं. त्यांना परमसंतोष झाला. “एकोबा, तुझी आत्मसाधना सफल झाली. आता आपण बरोबरच तीर्थयात्रेला जाऊ असे एकनाथांना प्रेमभरानं म्हणून शुभमुहुर्तावर ते उभयता तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले. साक्षात्कार घडलेला परमात्मा सर्वसामान्य लोकांमध्ये पाहण्यासाठी आणि तीर्थक्षेत्रांच्या पावित्र्याला उजाळा देण्यासाठी खरं तर साक्षात्कारी महात्म्यांचा तीर्थयात्रा असतात.

तीर्थक्षेत्रा मागून तीर्थक्षेत्र करत ते गुरुशिष्य गोदावरी नदीच्या उत्तरेला असलेल्या चंद्रगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या चंद्रावती नामक नगरीत दाखल झाले. या नगरीत चंद्रभट नामाचे सत्वशील व तपस्वी असे सत्पुरुष रहात होते. ते चतु:श्लोकी भागवताचं नेहमी चिंतन करीत असत. त्यांच्याकडे हे गुरुशिष्य मुक्कामास थांबले असतांना स्वामींनी चंद्रभटांना चतु:श्लोकी भागवतावर निरुपण करण्यास सांगितलं. अभ्यासू चंद्रभटांनी केलेलं निरुपण स्वामींना आणि नाथांना खूप आवडलं. परंतु हे निरुपण संस्कृत भाषेत झालं असावं. कारण धर्मग्रंथामधल्या ज्ञानापासून उपेक्षित राहिलेल्या सर्वसामान्य जनतेचा कळवळा असलेल्या जनार्दन स्वामींनी त्यानंतर लगेचच एकनाथांना चतु:श्लोकी भागवतावर मराठीत ओवीबद्ध टीका लिहायला सांगितली. हे चतु:श्लोकी भागवत म्हणजे काय माहित आहे? तर मूळच्या ‘भागवत’ या संस्कृत ग्रंथांच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातल्या एकंदर ४३ श्लोकांपैकी क्र. ३२ ते ३५ या केवळ ४ श्लोकांमध्ये आदिनारायणांनी ब्रह्मदेवाला अध्यात्मरहस्य उलगडून सांगितलं आहे. या ४ श्लोकांनाच ‘चतु:श्लोकी भागवत’ असं म्हणतात. 

पुढे ब्रह्मदेवांनी हे अध्यात्मरहस्य नारदांना सांगितलं, नारदांनी ते व्यासांना सांगितलं, व्यासांनी या ४३ श्लोकांचा १२ स्कंधांमध्ये विस्तार केला. व्यासांकडून हा ग्रंथ शुकांनी श्रवण केला आणि शुकांकडून परिक्षीत राजाला ऐकायला मिळाला. व्यासांनी लिहिलेल्या १२ स्कंधाच्या भागवतामधील ११व्या स्कंधावर एकनाथांनी जनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून टीका लिहीली.

या ग्रंथालाच ‘एकनाथी भागवत’ म्हणतात. ११व्या स्कंधात १३६७ श्लोक आहेत तर नाथांच्या त्यावर लिहिलेल्या भागवतात १८११० ओव्या आहेत. यावरुन एक गोष्ट स्पष्टच दिसते की, नाथांनी ग्रंथ खूपच विस्ताराने लिहिलेला आहे. पैकी चतु:श्लोकी भागवत असलेल्या अध्यायात १०३६ ओव्या आहेत. १००व्या स्कंधात श्रीकृष्णाचं संपूर्ण चरित्र आलेलं आहे. तरीदेखील एकनाथांनी टीका लिहायला ११वा स्कंधच निवडला. कारण या स्कंधात श्रीकृष्णानं सांगितलेलं वेदांताचं निरुपण आहे. ११व्या स्कंधात ३१ अध्याय आहेत. आपल्या गुरुंच्या आज्ञेवरून एकनाथांनी ही टीकारुपी ग्रंथराज निर्माण केला. या बाबतीत कितीतरी गोष्टी अचंबित करणाऱ्या आहेत. एकतर हा ग्रंथ लिहितेवेळी एकनाथाचं वय केवळ १० वर्षांच्या जवळपास होतं. दुसरी गोष्ट, त्यांचा लिहीण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. तिसरी गोष्ट, मूळ ग्रंथचा एकनाथांनी खूपच विस्तार करून हा ग्रंथ तयार केला. जनार्दनस्वामींबरोबर चंद्रभटांकडे राहिले असताना एकनाथांनी ‘एकनाथी भागवत’ लिहायला सुरुवात केली. 

गुर्वाज्ञा प्रमाण असल्यामुळे एकनाथ महाराज एकटेच मधुरा, वृदांवन, गोकुळ, गया, प्रयाग, अयोध्या, बद्रीनाथ इ. असंख्य तीर्थक्षेत्री जाऊन शेवटी पैठणला परत आले ते वयाच्या पंचवीसाव्या वर्षी. पण वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीचा कोवळा पोर “एकनाथ” घराबाहेर पडल्यानंतर आता वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ‘एकनाथ महाराज’ म्हणून पैठणात परत येणं या संपूर्ण कालावधीमध्ये काय झालं ते काय सांगावं! पोरक्या एकनाथाच्या संगोपनाची जबाबदारी घेतलेले आजोबा चक्रपाणि आणि आजी सरस्वती यांना एकनाथाच्या निघून जाण्यामुळे वेडच काय ते लागायचं बाकी राहिलं होतं. उरलेली तीर्थयात्रा आटोपून एकनाथ महाराज पैठणला परत आले. एक दिवस माध्यान्हीला माधुकरी मागायला आले असताना आजोबाआजी आणि नाथांची नजरानजर झाली. सात वर्षांचा असताना पाहिलेला बाळ आता पंचविशीत गेल्यानंतर पुन्हा डोळ्यांसमोर येत होता. पण डोळ्यामध्ये प्राण आणून ते आपल्या एकोबाची वाट पहात असल्यामुळे त्यांच्या अंतर्मनानं एकनाथ समोर येताच सूचना दिली. एकनाथांनीही आपल्या आजोबा - आजींना ओळखलं. त्यांचं अंत:करण भरून आलं. नाथांनी पुढं होऊन आजीला मिठी मारली. बिचारी आजी थरथर कापत होती, डोळ्यातून आनंदाश्रू ढाळत होती.

काय बोलावं ते सुचत नव्हतं. एकनाथावर न सांगता गेल्याबद्दल रागवावं का परत भेटल्याबद्दल आनंदाचा वर्षाव करावा हे त्या माऊलीला कळत नव्ह्तं. आजी जरा सावरल्यानंतर नाथांनी आजोबांच्या पायावर डोकं ठेवलं. तेवढ्यात आजोबांनी जनार्दनस्वामींचं सांभाळून ठेवलेलं पत्र एकनाथाच्या हातावर ठेवलं. नाथांनी पत्र उघडलं. आतमध्ये लिहिलं होतं, “पैठणातच राहून जगदुद्धार करावा.” नाथांनी आज्ञा शिरोधार्थ मानून पैठणातच रहायचं ठरवलं. 

पैठण ही कर्मभूमी म्हणून निश्चित झाल्यानंतर नाथांनी लोकजागृतीच्या कार्याचा श्रीगणेशा कीर्तनानं केला. एकादशीच्या निमित्तानं नाथांनी स्वत: होऊनच हे कीर्तन केलं. आजवर पैठणातल्या लोकांना एकनाथ कीर्तन करतात हे देखिल माहीत नव्हतं. पण केलेला अभ्यास आणि आजवरच्या गुरुसेवेची पुण्याई यांच्यामुळे नाथ कीर्तनाला उभे राहिले की, साक्षात सरस्वतीच त्यांच्या मुखातून बोलत असे. अशी प्रासादिक वाणी त्या पैठणात लोकांनी यापूर्वी कधी ऐकलीच नव्हती. मग काय, बघता बघता नाथांची किर्ती फुलांच्या सुगंधाप्रमाणे दाही दिशांना पसरली. कीर्तनाला ही गर्दी होऊ लागली ! हळुहळू रोज कीर्तन आणि रोज वाढती गर्दी असं समीकरण झालं. लोकांचा वाढता प्रतिसाद बघून नाथांना समाधान वाटत होतं. नाथ लोकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. परंतु अहंकाराचा मात्र लवलेशही नाथांना शिवला नव्हता. आपल्या अंगी असलेलं सर्व काही त्या परमेश्वराची किमया आहे, त्यानं आपल्याला हे सारं लोकांच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी दिलेलं आहे अशा विनम्र भावानं नाथ लोकांच्या अंतरंगातला परमेश्वर जागृत करण्याचा घेतलेला वसा पाळत होते. आपण सारे त्या एका परमेश्वराचेच अंश आहोत त्यामुळे कोणत्याही जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या माणसापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असूच शकत नाही. माणसाचा मोठेपणा तो इतरांशी किती प्रेमानं वागतो त्यावरुनच ठरतो. हा त्यांच्या उपदेशाचा गाभा होता. अतिशय साध्या, सोप्या पण काळजाला भिडणाऱ्या भाषेमुळे विद्वानांबरोबरच महार, मांग, सुतार, लोहार, कासार, डोंबारी, कैकाडी, गारुडी, वासुदेव, कोल्हाटी अशा असंख्य जाती-जमातींचे लोक कानांत प्राण आणून नाथांचं कीर्तन ऐकत. प्रत्येकाला परमेश्वर आपल्या जवळचा वाटावा म्हणून नाथांनी निरनिराळ्या जातींची रुपकं वापरुन असंख्य अभंग आणि भारुडं लिहिली. नाथांचं कवित्व इतकं शीघ्र होतं की, कीर्तन चालू असताना देखील त्यांना अभंग सूचत आणि ते लगेचच त्या कीर्तनात वापरतही असत. 

गोकुळअष्टमीचा उत्सव संपन्न झाल्यावर जनार्दनस्वामी काही दिवस पैठणला राहिले. आपल्या प्रियतम शिष्यानं परमार्थामध्ये जसा आदर्श निर्माण केला तसाच प्रपंचामध्येही आदर्श लोकांसमोर ठेवावा असं स्वामींना वाटलं. योगायोगाने त्याच वेळी नाथांचे आजोबा आणि आजीही स्वामींना तेच सांगण्यासाठी आले. मग स्वामींनी एकनाथांना गृहस्थाश्रमी व्हायची आज्ञा दिली. “जशी स्वामींची आज्ञा” म्हणत एकनाथांनी होकार दिला. आजी आजोबांना हायसं वाटलं. नंतर जनार्दनस्वामी देवगिरीकडे परतले. 

काही काळ असाच लोटला आणि एक दिवस सुन्न करणारी ती बातमी आली. देवगिरीवरती जनार्दनस्वामींचं महानिर्वाण झालं होतं. नाथांना हे कळल्यावर क्षणभरच त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले आणि दुसऱ्या क्षणीच येत्या वर्षी स्वामींच्या महानिर्वाण दिनी म्हणजेच फाल्गुन वद्य षष्ठीला मोठा उत्सवर करण्याचा मनोदय व्यक्त केला. जन्म मरणाचं भय आपल्याला. ज्याला त्याचा खरा अर्थ कळला त्याला जन्म-मरणाचं सुखदु:ख कुठून असणार ? गुरुंच्या आज्ञेप्रमाणे गृहस्थाश्रम स्विकारायला नाथांनी तयारी दाखवताच आजोबा-आजी या वयातही उत्साहानं कामाला लागले. चारचौघांमध्ये त्यांनी हा विषय काढताच ही बातमी गावोगाव पसरली. आपले आवडते नाथ विवाहबद्ध होणार म्हटल्यावर प्रत्येकालाच आनंद झाला. पैठणच्या वायव्येला वैजापूर नावाचं गाव आहे. तेथे रहाणाऱ्या एका सुखवस्तू सद्गृहस्थाचा मित्र पैठणला राहणारा. त्यानं त्या गृहस्थांना त्यांची मुलगी नाथांसाठी दाखवण्याचा सल्ला दिला. नाथांची किर्ती अगोदरच कानावर असलेल्या त्या गृहस्थांनी तातडीनं नाथांच्या आजोबांची चक्रपाणींची भेट घेतली. नक्षत्रासारखी असणारी त्यांची गुणवंती मुलगी आजोबांनी लगेचच आपली नातसून म्हणून पसंत केली. झालं.लग्न ठरलं. पाहुणे मंडळी गोळा झाली, आणि ठरल्या मुहूर्तावर एकनाथ आणि गिरिजा यांचा विवाह मोठ्या थाटानं पार पडला. विवेक आणि शांती यांचा जणू संगमच तो. 

या विवाहाचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो नाथांच्या आजीआजोबांना. त्यांना आता इति कर्तव्य वाटू लागलं होतं. नाथांच्या लग्नाच्या निमित्तानं वैजापूरला राहणारा त्यांचा एक लांबचा नातलग लग्नाच्या काही दिवस अगोदर नाथांकडे आला, तो एकनाथांपायी आपलं उर्वरित आयुष्य वाहण्याच्या निर्धारानंच. उद्धव त्याचं नाव. श्री गोपाळकृष्णांनी निजधामी जाताना आपला परमप्रिय भक्त बद्रीनारायणाला लोकसंग्रहासाठी ठेवला होता. तोच हा उद्धव ! उद्धव आयुष्यभर नाथांबरोबर सावलीसारखा राहिला. एकनाथांनी जनार्दनस्वामींची सेवा केली त्याचीच पुनरावृत्ती उद्धवाच्या रुपानं पहायला मिळाली. त्याला नाथांशिवाय इतर कोणताच ध्यास नव्हता. 

नाथांच्या समत्व दृष्टीचं दर्शन घडवणाऱ्या घटना लोक पहात होते. एकदा नाथ स्नानासाठी गंगेवर गेले असताना दुपारच्या त्या रणरण उन्हात पाय भाजत असल्यामुळे जिवाच्या आकांतानं रडणारं महाराचं पोर नाथांनी पाहिलं. झपाझपा जाऊन नाथांनी त्याला कडेवर घेऊन शांत केलं. इतकच नाही तर महार वाड्यात जाऊन त्याच्या घरी पोहोचतं केलं. महाराच्या पोराला नाथांनी उचललं ही गोष्ट साऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला. पण महार वाड्यातल्या लोकांना त्यांचे आवडते नाथ महार वाड्यात आले म्हणून खूप आनंद झाला.

एकनाथ महाराज म्हणजे मूर्तिमंत दया, क्षमा, शांती आणि प्रेम. काम, क्रोध, लोभ, मोह, मोद, मत्सर या षड्रिरुप वर विजय मिळवणं म्हणजे काय हे नाथांच्या चरित्रावरुन कुणालाही लख्ख दिसावं. दया नाथांच्या नसानसामध्ये भिनलेली होती. गंगा तहानलेल्या गाढवाला पाजण्याच्या गोष्टीमध्ये नाथांनी भूतदयेचा केवढा महान आदर्श जगापुढे ठेवला ना !

जगाचा संसार करणाऱ्या नाथांना अर्धांगी गिरिजाबाईंची बरोबरीची साथ होती आणि कष्टांमध्ये कधीही कमी न पडणारे श्रीखंड्या आणि उद्धव हे तर घरचे आधारस्तंभच होते. नाथांना गोदावरी आणि गंगा या दोन कन्या तर हरी हा पुत्र झाला. हरी वेदशास्त्रांत पारंगत होऊन मोठेपणी हरिपंडित म्हणून लोकमान्य झाला.

नाथांच्या थोरल्या मुलीचा गोदावरी (लीला) चा विवाह पैठणातच राहणाऱ्या विश्वंभर (चिंतोंपंत मुद्गल) यांच्याशी झाला. त्यांचा मुक्तेश्वर नावाचा मुलगा सुरुवातीला बोलतच नसे. परंतु नाथांच्या कृपेनं तो बोलायलाच नाही तर काव्य ही करायला लागला. रामायण, महाभारत आणि भागवतावरही अजरामर अशा काव्यरचना करून तो महाकवी म्हणून प्रसिद्ध झाला. पुढे पंचगंगेच्या तीरावर तेरवाड या गावी त्यानं समाधी घेतली. 

नाथांच्या धाकट्या मुलीचं, गंगाचं सासर कर्नाटकातलं. तिचा मुलगा पुंडाजी हा देखील परमभक्त होता. अशा रितीनं अमृतवृक्षाला अमृताच्याच फळांचे घोस लागले होते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे एकनाथांचं परम श्रद्धास्थान. एकनाथांनी ज्ञानेश्वरीचा अतिशय सखोल अभ्यास केलेला होता याचं प्रत्यंतर त्यांच्या लिखाणात जागोजाग पहायला मिळतं. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी नाथांच्या स्वप्नात येऊन “आपल्या समाधीच्या ठिकाणी असलेल्या अजानवृक्षाची मुळी आपल्या गळ्याला लागत आहे ती काढावी’ असं सांगितलं. हे कळताच गहिवरुन गेलेले एकनाथ आपल्या बरोबर काही जणांना घेऊन आळंदीकडे त्वरेने रवाना झाले. यावेळी माऊलींनी नाथांना आणखी एक महत्त्वाचं कार्य करायला सांगितलं. ते म्हणजे ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचं. त्याकाळी हस्तलिखित पोत्थाच वापरत असल्याने एका पोथीवरून दुसरी प्रत लिहून काढताना होणार्या चुका तर होत्याच, पण काही माणसं अशा प्रती तयार करताना हेतुपुरस्सर त्यात स्वत:च्याही मोडक्या तोडक्या ओव्याही घुसडत असत.

पैठणला परत आल्यावर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या अनेक हस्तलिखीत प्रती जमवल्या. त्यांचा अभ्यास आणि संशोधन केलं, आणि शेवटी नितांत श्रद्धेनं, कष्टानं श्रीज्ञानेश्वरीची निर्दोष प्रत तयार केली. ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणानंतर एकनाथांनी तितक्याच तोलामोलाचं केलेलं दुसरं कार्य म्हणजे ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती. परकीय आक्रमणामुळे हवालदिल झालेल्या, स्वत्व विसरून गेलेल्या लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करण्यासाठी दुष्ट रावणाची रामानं कशी खोड मोडली याचं सकस वर्णन करून नाथांनी जनजागरणांच मोठ कार्य केलं. या दोन ग्रंथाशिवाय नाथांनी शुकाष्टक, रुक्मिणी स्वयंवर, आनंदलहरी, गीतासार, हस्तामलक, स्वात्मसुख गाथा असे एकापेक्षा एक लोकप्रिय ग्रंथ लिहिले. गाथेमध्ये अभंग, भारुड, गुरूस्तुती असे अनेक प्रकार आलेले आहेत. या सर्व ग्रंथांचा विचार केला तर नाथांनी लिहीलेल्या एकंदर पदांची संख्या जवळजवळ ७५ हजार एवढी प्रचंड होते. यावरून नाथांच्या प्रगल्भ प्रतिभेची कल्पना येते.

स्वत: एवढ्या उच्चकोटीच्या अवस्थेला जाऊनही नाथांना इतरांच्या उपासना मार्गाबद्दल नितांत आदर असे. कोणत्याही मार्गानं गेलं तरी एकमेकांवर प्रेम करणं आणि डोळसपणे त्या परमेश्वराला शरण जाणं याचं गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असं त्यांचं सांगणं होतं. समाजासाठी सर्व मार्गांनी उदंड कार्य करून कृतकृत्य झाल्यानंतर आता आपली जीवनयात्रा संपवावी असं नाथांना वाटू लागलं. उत्कृष्ठ ग्रंथरचना, आदर्श प्रपंच व उदंड ज्ञानदान अशा गुणालंकारांनी सुशोभित झालेलं नाथांचं जीवन कुणाचंही मस्तक विनम्रपणे झुकावं असंच होतं. देहाची आसक्ती माहितच नसलेल्या नाथांनी एकेदिवशी आपण देहत्याग करणार असल्याचं लोकांसमोर सांगितल्यावर क्षणभर लोकांचा आपल्या कानांवर विश्वास बसेना, आणि नंतर मात्र पुराच्या पाण्यासारखी सैरभर पसरत ही बातमी गावोगाव पोहोचली. आपण अनाथ होणार या कल्पनेनं सारे दु:खात बुडाले. 

एके दिवशी नाथांनी उद्धवाला बोलावून सांगितलं, “उद्धवा, मागे मी तुला फाल्गुन वद्य षष्ठीचं महत्त्व सांगितलं होतं ते आठवतंय का ?

एकनाथ महाराज पादुका, पैठण
एकनाथ महाराज पादुका, पैठण

“होय नाथ, त्याच दिवशी तुमच्या गुरूंचा जनार्दन स्वामींचा जन्म झाला, त्याच दिवशी त्यांना दत्तात्रयाचं दर्शन झालं, त्याच तिथीला स्वामींचं महानिर्वाणही झालं, आणि त्याच तिथीला स्वामींचा तुमच्यावर अनुग्रह ही झाला. होय नां ?”

उद्धवानं सारं बरोबर सांगितलं. “ त्याच वेळी मी तुला सांगितलं होतं की अजून पाचवी घटनाही त्याच तिथीला घडणार आहे म्हणून” नाथ म्हणाले. “ ती कोणती नाथ ”? उद्धवानं उत्सुकतेनं विचारलं. ‘‘येत्या फाल्गुन वद्य षष्ठीला आम्हीही जाणार ”! नाथ निर्विकारपणे बोलले. पण उद्धव मात्र  ओक्साबोक्शी रडू लागला. 

षष्ठीच्या आदल्या दिवशी नाथ कीर्तन करत करत मोठ्या जनसमुदायासह गोदावरी काठी वाळवंटात येऊन दाखल झाले. वाटेत जागोजागी आरत्या झाल्या. नाथांचं कीर्तन म्हणजे लोकांचं देहभान हरपण्याची पर्वणीच. नेहमीप्रमाणेच ते शेवटचं कीर्तनही रंगलं. भजनाचे फड पडले. नाथ हातात वीणा घेऊन नामस्मरण करू लागले. मध्यरात्र उलटून गेली. भजनाचे स्वरही मंद होत गेले. अशा सर्वजणांच्या अर्धनिद्रा अवस्थेत असण्याच्या काळात नाथांनी दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीत प्रवेश करून देहत्याग केला. लौकिकार्थानं बहुजनांचा त्राता गेला, पण तो विशाल भुमिकेतून सर्वांचा अदृश्य रूपानं वावरणारा पिता म्हणून वावरण्यासाठी. शके १५२१ मधल्या फाल्गुन वद्य षष्ठीच्या त्या रविवारी हा ज्ञानरवी अस्त पावला.

एकनाथ नावाचा कल्पवृक्ष भागवत, गाथा, भावार्थ रामायण, शुकाष्टक, रुक्मिणी स्वयंवर, आनंदलहरी यासारख्या फांद्यांनी विस्तारून समस्त जनांना सुखाच्या सावलीची व्यवस्था करून पुन्हा अकर्ता म्हणून उरला होता. अग्निसंस्कार होऊन दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा करायला आलेल्या हरिपंडिताला अस्थींच्या ठिकाणी एक तुळशीच रोप आणि पिंपळ पाहिल्यावर; आपलं निर्गमन म्हणजे मरण नव्हे, याची साक्ष देणाऱ्या त्या विभूतीला आमचे कोटीकोटी प्रणाम !

पिडा हारुनी दाविला दिव्य मार्ग ।
जनांसाठी भूमीवरी आणी स्वर्ग ।
सदा सर्व लोकां गमे एक नाथ ।
सुरां पूज्य जो धन्य तो एकनाथ ।
 

श्री. माधव उंडे
संत साहित्याचे अभ्यासक

श्रीसंत एकनाथ महाराज
श्रीसंत एकनाथ महाराज

एकनाथ महाराजांचे सामर्थ्य

पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य रहात होते. सर्व प्राणिमात्रात त्यांना परमेश्वर दिसे. ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत. त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने 'दंडवतस्वामी' म्हणत असत.

एकदा ते मार्गाने चालले असतांना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले. ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले. त्यांनी विचारले, ''काय हो दंडवत स्वामी, त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का ?'' ''त्याच्यातही परमेश्वर आहे'', असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला. त्यामुळे ते मेलेले गाढव ताडकन उठले आणि धावू लागले.

गाढव जिवंत झाले, ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या कानावर गेली. ते दंडवत स्वामींना म्हणाले, ''स्वामी तुम्ही गाढवाला प्राणदान दिलेत ही गोष्ट चांगली असली, तरी आता लोक तुम्हाला फार त्रास देतील. ज्यांचे नातेवाईक मृत होतील, ते तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील. तुमच्या सिद्धीला चुकीचे वळण लागेल. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब समाधी घ्या.'' ''जशी गुरूंची आज्ञा !'' असे म्हणून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवून डोळे मिटले. एकनाथांनी आपला आशीर्वादाचा हात त्यांच्या मस्तकावर ठेवला. क्षणातच स्वामींनी देह त्याग केला.

एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे. त्यासाठी त्यांनी प्रायश्चित घेतले, तरच शुद्ध होईल, असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित घ्यावे लागेल, असे सुचवले. एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, ''आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करीन.'' ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे; पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनीही देवालया समोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तास सिद्ध व्हावे, असे सुचवले. एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. '''हे देवा, तू आता हा गवताचा घास घे'', असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून खावू लागला. पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले. त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, ''देवा, आता आपणही येथे राहू नका. आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी.'' तो पाषाणाचा नंदी ताडकन् उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले.

एकनाथ महाराजांचा गुरू शोध व गुरुनिष्ठा

समाजाला मार्गदर्शन करायचं असेल तर मार्गदर्शकाला ईश्वराची प्रचिती असायला हवी. नाहीतर ती नुसतीच पोपटपंची व्हायची ही एकनाथांची पक्की धारणा होती. त्यामुळे त्या परमेश्वराची कृपा संपादन करुन घेण्याचा ध्यासच एकनाथानं घेतला. आता त्यासाठी गरज होती तशा समर्थ गुरुची! एकनाथानं त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू केले. एकदा असाच शिवालयात चिंतन - मनन करीत बसला असताना तिथं आलेल्या एका वृद्ध गृहस्थानं एकनाथाला “तुला आत्मज्ञान प्राप्त करुन घ्यायचं असेल तर देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांचेकडे जा” असं सांगितलं. नाथाच्या आनंदाला पारावार उरला नाही. ईश्वरप्राप्ती आणि नंतर समाजोद्धार या विचारांनी झपाटलेल्या एकनाथानं कशाचाही विचार न करता तडक देवगिरीचा रस्ता धरला. पैठणहून देवगिरी साधारणपणे ५० मैल लांब. पण ७-८ वर्षांचा कोवळा एकनाथ दिवस-रात्र, तहान, भूक या कशाचीही पर्वा न करता हे अंतर पायी तुडवून देवगिरीला पोहोचला.

जनार्दन स्वामींची नजर एकनाथाकडं वळताच ती बालमूर्ती स्वामींना साष्टांग दंडवत घातली झाली. पितृवत मायेनं स्वामींनी एकनाथाला उठवून जवळ घेतलं, त्याची विचारपूस केली. आई-वडिलांवर रुसून हा मुलगा पळून आला असेल असाच साऱ्यांचा समज होता परंतु एकनाथानं “चित्ताला अनुताप झाल्यामुळे” आपण आल्याचं सांगितल्यावर स्वामींनासुद्धा गहिवरुन आलं. एकनाथाची ती मुद्रा आणि बोलणं यांनी जनार्दन स्वामींच्या मनात एकनाथाबद्दल पहिल्या भेटीतच मायेचा झरा निर्माण केला. 

जनार्दनस्वामी हे परम दत्तभक्त. त्यांचा जन्म चाळीसगावचा. रमा व सावित्री या त्यांच्या दोन बायका. देवगिरीच्या परगण्याची जहागिरी त्यांचेकडे होती. जनार्दनस्वामींचा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आणि कर्तृत्वामुळेच त्यांना हा मान यवनांचं राज्य असतानाही मिळाला होता. मात्र सत्ता आणि संपत्ती हातात असतानाही जनार्दनस्वामी जीवनाच्या शाश्वत ध्येयाकडे नजर ठेवूनच प्रत्येक क्षण व्यतीत करत असत. भागवताच्या नवव्या अध्यायात :-

दत्तात्रेय शिष्यपरंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा 
तेणे जनार्दनु तिसरा । शिष्य केला खरा कली युगी ॥४३०॥

असा उल्लेख आहे. त्यावरून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती वरचा होता याची कल्पना येते तर अशा अधिकारी गुरुंकडे तशाच तयारीचा शिष्य येवून दाखल झाला होता. चिकाटी, अभ्यासू वृत्ती, चौकसबुद्धी, सदाचार आणि श्रद्धा या गुणपंचकाच्या बळावर एकनाथानं जनार्दन स्वामींना शिष्यत्व द्यायला भागच पाडलं. 

एकनाथाला सद्गुरु सेवेची मुळातच अतिशय आवड. तशी संधी प्राप्त झाल्यामुळे त्याला आता काय करु आणि काय नाही असं होऊन गेलं होतं. परमोच्च ध्येयानं झपाटलेल्या आठ वर्षांच्या या मुलाला सद्गुरुंशिवाय आता दुसरं काहीही सुचत नव्हतं. काही दिवस आपला गुरुंचा दिनक्रम पाहिल्याबरोबर एकनाथानं त्याला अनुसरुन आपला दिनक्रम ठरवला. जनार्दन स्वामी पहाटे उठत तर एकनाथानं त्याही अगोदर उठावं, वाडा झाडून काढावा, सडा घालावा, स्वामींचं स्नानाचं पाणी काढून द्यावं. संध्येची आणि देवपूजेची तयारी करुन ठेवावी, गंध उगाळून ठेवावं, कपडे धुवून आणावेत, पूजा वगैरे झाल्यावर स्वामी बाहेर जायच्या अगोदर त्यांचे जोडे समोर आणून ठेवावेत, जेवणाच्या वेळी वाढायला मदत करावी, रात्री स्वामींचं अंथरुण घालावं, त्यांच्या पायथ्याशी स्वत:चं अंथरुण टाकून स्वत: झोपी जावं, असा दिनक्रम या बालशिष्यानं बांधून घेतला. या गोष्टी तर रोजच्या झाल्या. पण या व्यतिरिक्त प्रसंगानं येणाऱ्या जबाबदाऱ्यांवर देखील एकनाथ झेपावत असे. आपणच गुरुसेवा या नात्यानं सर्वच्या सर्व कामं करावीत असं त्याला वाटत असे. 
मात्र एकीकडे ही सेवा चालू असतानाच दुसरीकडे हा गुणी शिष्य गीता, ज्ञानेश्वरी, ब्रह्मसूत्रे, भागवत, उपनिषदे या ग्रंथांमधलं ज्ञान आत्मसात करत होता. न्याय आणि मीमांसा ही शास्त्रही त्यानं अभ्यासली. पातंजल योगाचा देखील सखोल अभ्यास केला. मनापासून केलेली गुरुसेवा आणि आध्यात्मिक ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास यामुळे एकनाथ दिवसेंदिवस सर्वांगीणदृष्ट्या विकसित होत गेला. आध्यात्म आणि गुरुसेवा हे दोन्हीही साधत असताना एकीकडे तो तलवारबाजीही शिकला. जनार्दन स्वामींनी त्याची निष्ठा, हुशारी आणि कर्तव्यदक्षता पाहून त्याला स्वत:च्या कचेरीत न्यायला सुरुवात केल्यानंतर तारुण्यावस्थेत प्रवेश केलेल्या एकनाथानं काही काळातच तिथल्या खटले, तक्रारी, वाटण्या, संरक्षण व्यवस्था, लोकांच्या अर्जाची उत्तरं लिहीणं अशा सर्वच प्रकारच्या कामांमध्ये निपुणता संपादन केली. काही काळातच स्वामींच्या इतक्या जबाबदाऱ्या एकनाथानं उचलल्या की, जनार्दनस्वामींना आपल्या शिष्यराजाचं कौतुक कसं करावं हे ही समजेनासं झालं. एकनाथाकडे स्वामींनी हिशोब लिहिण्याचं एक महत्त्वाचं काम दिलेलं होतं. नाथाचा स्वभावच मुळी कशातही हयगय, कुचराई आणि ढिलेपणा खपवून न घेण्याचा असल्यामुळे एके दिवशी हिशेबात आलेल्या अधेलीच्या चुकीमुळे तो अतिशय अस्वस्थ झाला. कुठल्याही परिस्थितीत ही चूक आजच्या आज शोधून काढायची या निर्धारानं तो हिशोब तपासायला बसला. (त्याकाळी चवली, पावली, अधेली अशी नाणी चलनात होती आणि कमालीच्या स्वस्ताईमुळे कमीत कमी किंमतीच्या नाण्याला सुद्धा फार महत्त्वं होतं) होता होता मध्यरात्र उलटून गेली आणि चूक सापडल्या बरोबर “सापडली!” असं म्हणत नाथानं टाळी वाजवली. त्याचबरोबर जनार्दन स्वामी जागे झाले आणि नाथाच्या समोर पडलेल्या चोपड्या पाहून “काय सापडलं रे”? म्हणत उठून बसले. सारा वृत्तांत कळल्यावर कृतार्थतेनं नाथाच्या डोक्यावरुन हात फिरवत स्वामी म्हणाले, “एकोबा असंच मन लावून कृष्णभक्ती केलीस तर अवघं जीवन तेजानं उजळून जाईल.” नाथानं स्वामींचे पाय धरले. खरोखरच किती दिव्य प्रसंग हा!

एकनाथानं आपल्या गुणसंपन्नतेची झलक अजून एका प्रसंगी अशीच दाखवली. गुरुवार हा दत्तभक्तच काय, दत्तस्वरुप असलेल्या जनार्दन स्वामींच्या ध्यानाचा दिवस. त्या दिवशी ते इतर कोणतीच कामं करीत नसत. एकदा ही संधी साधून शत्रूनं गुरुवारीच किल्ल्यावर अचानक हल्ला केला. जनार्दनस्वामी ध्यानस्थ बसलेले. 

एकनाथ रखवालदाराचं काम करत उभा असतानाच दूतानं हल्ल्याची बातमी दिली. क्षणाचाही विलंब न करता एकनाथानं ध्यानस्थ स्वामींना वंदन करून तडक शस्त्रागार गाठलं. स्वामींचं चिलखत अंगावर चढवून, हाती तलवार घेऊन, स्वामींच्या घोड्यावर स्वार होऊन शीघ्रतेनं एकनाथ युद्धभूमीवर हजर झाला. सैन्य आदेशाची वाट पहात होतं. नाथाचा इशारा मिळताच सैन्य शत्रूवर तुटून पडलं. सहज म्हणून तलवारबाजी शिकलेल्या नाथाला आज तिचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची संधीच जणू चालून आली होती. रणांगणातल्या या वीराचा आवेश आणि रणकौशल्य पाहून शत्रूच्या सैन्याची अक्षरश: पाचावर धारण बसली. 

दिवसेंदिवस नाथाची दृढतर होत चाललेली भक्ती आणि त्याच्या आचरणात दिसून येत असलेले उच्चतम संस्कार पाहून जनार्दनस्वामींनी या साऱ्याला साजेसं फळ नाथाच्या पदरात घालायचं ठरवलं. देवगिरी पासून थोड्या अंतरावर एक टेकडी होती. अतिशय दाट हिरवीगार झाडी, रंगीबेरंगी फुलं आणि सर्वांवर कळस म्हणजे परम रमणीय असं सरोवर यामुळे हा परिसर कोणावरही मोहिनी घालेल असाच होता. या ठिकाणी साक्षात् दत्तात्रयांचा रहिवास होता. जनार्दन स्वामी बऱ्याच वेळा गुरुवारी तिथे जात असत. त्यांच्यात कितीतरी वेळपर्यंत सुखसंवाद चालत असे. अशाच एका गुरुवारी तिथे जाताना स्वामींनी नाथालाही बरोबर घेतलं. स्नानसंध्या झाल्यावर स्वामी ध्यानस्थ बसले. तेवढ्यात तिथे एक मलंग म्हणजे फकीर आला. खरं तर त्या स्थळी पोहोचल्या बरोबर जनार्दन स्वामींनी एकनाथाला सांगून टाकलं होतं की, एका दत्तात्रयांवाचून इथे दुसरं कोणीही येत नाही. परंतु संपूर्ण अंगभर कातडं पांघरलेलं विशाल आणि आरक्त डोळे आणि बरोबर एक कुत्री आणि तिची पिल्लं अशा अवताराला तो फकीर बघितल्यावर तर नाथाच्या डोक्यात तशी शंका देखिल आली नाही. त्या फकिराची आणि जनार्दन स्वामींची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर स्वामींनी पुढे होऊन त्या फकीराच्या चरणी माथा ठेवला. फकीरानं स्वामींना उठवून दृढ आलिंगन दिलं. दोघांची आत्मसुखाची बोलणी सुरू झाली. एकनाथ आश्चर्य चकित होऊन हे सारं पहात होता. तेवढ्यात त्या फकीरानं जनार्दन स्वामींना एक मातीचं भांड देऊन त्या कुत्रीचं दूध काढून आणायला सांगितलं. स्वामींनीही भांडे भरून दूध काढून आणून त्या फकीराच्या हाती दिलं. फकीरानं झोळीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढून त्या दुधात भिजविले आणि तो फकीर व जनार्दनस्वामी असं दोघंही एकाच भांड्यात जेवले. जेवताना जनार्दन स्वामींच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पाहून एकनाथ चक्रावून गेला. शिस्तीचे आणि स्वच्छतेचे भोक्ते असलेले आपले गुरु अमंगल वेशातल्या त्या फकीराशी एवढी सलगी कशी काय करत आहेत, हे नाथाला उलगडेना. पण तेवढ्यात स्वामींनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट आठवली, आणि हा फकीर म्हणजे साक्षात श्रीदत्तात्रयच असणार हे नाथानं ताडलं. तेवढ्यात त्या दोघांचं जेवण झालं आणि स्वामींनी नाथाला ते भांडं (कटोरा) धुवून आणण्यास सांगितलं. नाथान ज्ञानदृष्टीनं विचार करून धुण्यासाठी त्या भांड्यात घातलेलं पाणी घटाघटा पिऊन टाकलं आणि कटोरा स्वच्छ धुवून त्या फकीराच्या हाती दिला आणि क्षणाचाही विलंब न करता साष्टांग नमस्कार घातला. उठून पहातात तो काय, त्या फकीराच्या जागी “तीन शिरे सहा हात” असे साक्षात श्री दत्तात्रय उभे! नाथांनी भारावलेल्या अवस्थेत पुन्हा नमस्कार घातला आणि श्री दत्तात्रय अंतर्धान पावले!

एकनाथ महाराज समाधी पैठण

एकनाथ महाराज समाधी पैठण
 होलिका सायं भागीरथी पूजन, एकनाथ महाराज समाधी पैठण. 
जनी एका वणी एका | निरंजनी देखो एका || संतजना परी एका | जनार्दना परी एका ||  
एकनाथ महाराज समाधी पैठण
 होलिका सायं भागीरथी पूजन, एकनाथ महाराज समाधी पैठण. 
जनी एका वणी एका | निरंजनी देखो एका || संतजना परी एका | जनार्दना परी एका ||