श्री अनंतसुत कावडीबोवा (सन १७९७ – १८६३)

नाव: श्री विठ्ठल अनंत पिंपळगावकर
जन्म: ११/४/१७९७  पिसा पिंपळगाव, ता. पारनेर, जि.नगर, ऋग्वेदी अश्वलायन
आई/वडिल: राधाबाई / अनंतराम
शाखा: देशस्थ ब्राह्मण, भारद्वाज गोत्र  
कार्यकाळ: १७९७ - १८३६
समाधी: आषाढ शुद्ध ८, १८६३ बडोदा येथे
विशेष: प्रासादिक ग्रंथ लेखक- दत्तप्रबोध (६१ अध्यायांचा अनुसुयामातेला दत्तगुरुंचा उपदेश )

अलौकीक संत कावडीबुआ
अलौकीक संत श्री अनंतसुत कावडीबुआ

जन्म व बालपण 

श्रीअनंतसुत विठ्ठल ऊर्फ कावडीबोवा हे मूळ जिल्हा नगर तालुके पारनेरमधील होंगा नदीतीरावरील पिसा पिंपळगांवचे राहणारे होते. त्यांचा जन्म शके १७१९ चैत्र शुक्ल १५ बुधवार, दिनांक ११-४-१७९७ चा आहे. ते ऋग्वेदी आश्वलायन शाखीय देशस्थ ब्राह्मण होत. त्यांचे गोत्र भारद्वाज होय. ते पिसा पिंपळगावचे वतनदार कुळकर्णी होते. याशिवाय इतर तीन गावचे कुळकर्णीपणही त्यांचेकडे होते. त्यांचे संपूर्ण नाव विठ्ठल अनंत पिंपळगावकर असे होते. ईश्वरभजनात व देवसेवेत राहून ते कुळकर्णीपणाचे कामही पहात होते. ते पुंडलिक व श्रावणासारखे मातृपितृभक्त होते. मातापित्यांचा वृद्धापकाळ झाला, त्या वेळी पित्याने स्वत:स कावडीत बसवून काशीयात्रेस नेण्याची आज्ञा केली. आज्ञा शिरसावंद्य मानून विठ्ठलबोवांनी आपले वडील अनंतराम व मातोश्री सौ. राधाबाई यांना कावडीत बसवून बरोबर एक रामा नावाचा गडी व सामानासाठी एक घोडा यांसह ते काशीयात्रेस निघाले. मातापित्यांस कावडीत बसवून यात्रा करविल्या म्हणून त्यांचे नाव कावडीबोवा असे पडले.

यात्रा करीत असता त्यांच्या मातोश्री सौ. राधाबाई यांना विष्णुपदी देवाज्ञा झाली, ते पाहून आपण आता संसारमुक्त झाल्याने अनंतरावांनी प्रयागात येऊन ब्रह्मावर्तात आल्यावर संन्यास ग्रहण केला व ब्रह्मावर्तात ज्येष्ठ वद्य ५ स समाधे घेऊन ते नारायणस्वरूपी लीन झाले. त्यांना तेथे जलसमाधी देण्यात आली. तेथे त्यांचे और्ध्वदेहिक कार्य आटोपल्यावर त्या रिकाम्या कावडीत आता श्रीविठ्ठलरखुमाईच्या मूर्ती ठेवून कावडीसह विठ्ठलबोवांनी पुढील यात्रा सुरू केली. 

याप्रमाणे यात्रा सुरू असताना गालव क्षेत्री मुक्काम होता व त्या दिवशी श्रीदत्तजयंतीचीही पर्वणी होती. गावात दत्तजन्मासाठी कोणी कीर्तनकार मिळेना; म्हणून गावकऱ्यांनी बुवांस कीर्तन करण्यास विनंती केली. पण आपणांस कसे जमेल म्हणून ते मंडळीशी बोलत असता विप्ररूपाने येवून श्रीदत्तात्रेयांनी त्यांना कीर्तन करण्यास व ग्रंथ लिहिण्यास आज्ञा केली व प्रसाद खाण्यास दिला व मी तुजबरोबर आहे. काळजी करू नये असे सांगितले. कीर्तन आटोपले व पुढील यात्रा सुरू झाली. कीर्तन सर्वांस फार आवडले होते. ग्रंथरचना कशी होईल या विवंचनेत त्यांनी लेखनास सुरूवात केली नव्हती हे पाहून पुन्हा श्रीदत्तात्रेयांनी ब्राह्मणवेषाने येऊन ग्रंथ लिहिण्यास सांगितले व वरप्रदान दिले व मीच सर्वोतोपरी सहाय्य होईन असा आशीर्वादही दिला. याप्रमाणे वरप्राप्तीनंतर प्रवास चालू असताच त्यांचा मुक्काम उज्जैन क्षेत्री झाला. तेथे त्यांनी ‘श्रीदत्तप्रबोध’ या ग्रंथाचे चाळीस अध्याय लिहिले व पुढे द्वारावती (द्वारका) यात्रेस जाण्याच्या विचाराने यात्रा करून सन १८५६ च्या सुमारास बडोद्यास आले. प्रथम त्यांचा मुक्काम वाडीतील श्रीमंत राजे पांढरे यांच्या श्रीराममंदिरात झाला. बडोद्यातील त्या वेळच्या महान् संत-महंतांच्या भेटी झाल्याने त्यांना अतिशय आनंद वाटला. बडोद्यास या महान् मातृपितृभक्तशिरोमणी श्रीकावडीबुवांचे तत्कालिक अनेक शिष्यसमुदायही, त्यांचा उपदेश घेऊन झाला होता. त्यांपैकी एका शिष्याने त्यांना बऱ्हाणपुरा चौखडी रस्त्यावर एक श्रीराममंदिर बांधून देऊन त्यांना कायम राहण्याचा आग्रह करून ठेवून घेतले. याच श्रीरामाच्या मंदिरात कावडीत बसून आणलेल्या श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची त्यांनी स्थापना केली व संवत १९१५ मध्ये तेथे मुक्कामास आले. याच मंदिरात वास्तव्य केल्यानंतर श्रीदत्तप्रबोध ग्रंथाचे उरलेले २१ अध्याय त्यांनी लिहिले. असा हा ६१ अध्यायांचा ग्रंथ त्यांनी संवत १९१६ प्रजापती नाम संवत्सरी शके १७८२ चैत्र शुद्ध प्रतिपदा भ्रुगुवारी इ. सन १८६० मध्ये लिहून पूर्ण केला. प्रत्येक दत्तभक्ताने या ग्रंथाचे वाचन अवश्य करावे. दत्तमहाराजांनी आपल्या मातेला केलेला उपदेश अत्यंत प्रासादिक आहे.

याप्रमाणे बडोदे येथे श्रीसेवेत व चिंतनात काळ घालवीत असता, श्रीविठ्ठल-अनंतसुत ऊर्फ कावडीबोवा हे संवत १९१९ आषाढ शुक्ल अष्टमीस वैकुंठवासी झाले, तरी ते ग्रंथरूपाने अमर असून श्रीदत्तभक्तांस त्यांच्या साक्षित्वाचे अनुभवही येतात.

ग्रंथसंपदा 

श्रीदत्तप्रबोध ग्रंथाचे प्रथम प्रकाशन श्रीदामोदर सावळाराम यंदे यांनी सन १९०० मध्ये केले. श्रीगुरुचरित्र व श्रीगुरुलीलामृतप्रमाणेच हा महान् प्रासादिक ग्रंथ श्रीदत्तप्रसादे लिहिलेला आहे. श्रीगुरुचरित्रात श्रीगुरूंचे वर्णन आहे, तसेच श्रीगुरुलीलामृतात श्रीअक्कलकोटस्वामींचे वर्णन आहे. श्रीदत्तप्रबोध ग्रंथात श्रीदत्तात्रेयांनी आपली मातोश्री सती अनसूयेस केलेला अध्यात्मपर असा उपदेश आहे. हा प्रासादिक ग्रंथ असून श्रीदत्तात्रेयांनीच वदविलेली अशी ही श्रीदत्तस्वरूप वाग्मयीन मूर्तीच आहे. म्हणून तो सांप्रदायिक दत्तभक्तांना अत्यंत पूजनीय व संग्राह्य असा आहे. भाषा अत्यंत प्रेमळ व ह्रद्य-स्पर्शी अशी आहे. हा वरद ग्रंथ असल्याने वाचन, पाठ व सप्ताहरूपे अनुष्ठान करण्याने मन:कामना पूर्ण होतात, असा अनेकांचा अनुभव आहे. 

बडोद्यास श्रीकावडीबुवांचे श्रीराम व श्रीविठ्ठल-राही-रखुमाईचे असे मंदिर आहे. तेथे दरसाल श्रीदत्तप्रबोधकार अनंतसुत विठ्ठल ऊर्फ कावडीबोवा महाराज यांच्या पुण्यतिथीचा उत्सव आषाढ शु. १ ते ८ पावेतो होतो. पुण्यतिथी आषाढ शु. ८ स असते. या उत्सवात अखंड नामसप्ताह, श्रीदत्तप्रबोधपारायण, निरनिराळी संतमंडळींची कीर्तने, प्रवचने व भजने, श्रीगुरुचरित्र, सप्तशतीपारायणे, वेदपारायणे आदी विविध कार्यक्रम होत असतात. उत्सवसमाप्तीस अन्नसंतर्पण, महानुभाव अनेक रूपांची पाद्यपूजा, ‘संतपूजा’ होऊन संतांचे प्रवचन व महाप्रसाद होत असतो. पौर्णिमेस गोपालकाळा होऊन हा उत्सव पूर्ण होतो. तसेच चैत्राला श्रीरामजन्मोत्सवही होतो.

श्रीअनंतसुत विठ्ठलबोवांनी श्रीदत्तप्रबोध ग्रंथाशिवाय स्फुट अभंग, करुणा-शतक अभंग सांप्रदायिक सद्गुरुनमस्कारश्लोक व अभंग वगैरे वाङ्मय लिहिलेले असून बरेचसे अप्रसिद्ध आहे. ते जनार्दन-एकनाथ-निंबराज संप्रदायी असून त्यांचा आनंद संप्रदाय होय.

मंदिर व्यवस्थापन 

श्रीअनंतसुत विठ्ठल ऊर्फ कावडीबोवांनी बडोद्याच्या मंदिराची सेवा, पूजन, भजन व संप्रदाय चालविण्यासाठी आपले आते बंधू श्रीगोपाळबुवा यांना सहकुटुंब आपले गावाहून बोलावून आणून त्यांस प्रसाद व वरदहस्त ठेवून सर्व व्यवस्था सोपविली होती. श्रीगोपाळबुवाही अत्यंत लीन, प्रेमळ निस्सीम भगवद्भक्त असे होते. भजन व देवसेवेत राहून त्यांनी चारी धाम यात्रा केल्या होत्या व शेवटी चतुर्थाश्रम घेऊन फाल्गुन शुद्ध ३ दिनांक १५-३-१९१८ वय ७५ला समाधिस्थ झाले. त्यांची समाधी कावडीबोवांच्या समाधिमंदिरात आहे. हे गोपाळकाला उत्तम करीत असत. त्यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव श्रीशंकरबोवा हेही भजन व देवसेवा करून उत्सव-महोत्सव करीत असत. ते सुप्रसिद्ध कीर्तनकारही होते. श्रीमंत गायकवाड सरकारतर्फे बडोद्यास दर श्रावण मासात होणाऱ्या कीर्तनपरीक्षेचे ते परीक्षक म्हणूनही होते. कै. श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांचे धाकटे बंधू श्रीमंत संपतराव महाराज गायकवाड यांचे ते गुरू होते. श्रीमंत संपतरावांना त्यांनी भजन शिकविले होते. ग्वाल्हेरचे सरकार श्रीमंत माधवराव महाराज शिंदे यांच्या येथे प्रतिवर्षी श्रीगणेशउत्सवात नामसप्ताह होत असे. त्या वेळी श्रीमंत संपतराव महाराजांचा एक भजनाचा पहारा असे. त्या मेळ्याचे अध्यक्ष श्रीशंकरबोवाच होते. 

पुत्रवत् पालन केलेले त्यांचे भाचे श्री. सुंदरनाथ व जगन्नाथ राजापूरकर या उभय बंधूंस मंदिराचे पुढील कार्य एकविचारे चालविण्यास सोपवून व वरदहस्त ठेवून, सन १९५० शके १८७२ संवत २००६ कार्तिक शुद्ध पंचमीस सोमवारी उपवास सोडून, श्रीशंकरबोवा ह्र्दयविकाराने वैकुंठवासी झाले.

त्यांचे आज्ञेप्रमाणे हे उभय बंधू एकविचारे श्रींची पूजासेवा, आषाढी उत्सव, रामनवमी उत्सव आदी नित्य-नैमित्तिक कार्यक्रम पार पाडीत.

गुरुपरंपरा 

आदिनाथ  
  ।
अत्री  
  ।
दत्तात्रेय 
  ।
जनार्दन 
  ।
एकनाथ 
  ।
निंबराज 
  ।
अनंतराय 

अलौकीक संत कावडीबुआ, संतसाहित्य अभ्यासकांचे  नजरेतून !

केवळ ‘श्री दत्तप्रबोध’ हा असामान्य ग्रंथ लिहून संतपदापर्यंत पोहोचलेल्या अनंतसुत कावडी बुवा या सत्पुरुषाबद्दलची माहिती.

नगर जिह्याच्या पारनेर तालुक्यातील होंगा नोदीकिनारी वसलेल्या पिसा पिंपळगाव येथे ११ एप्रिल १७९७ रोजी अनंत आणि राधाबाई पिंपळगावकर यांच्या पोटी विठ्ठलपंतांचा जन्म झाला. हेच विठ्ठलपंत पुढे जाऊन श्रीदत्त संप्रदायात ‘कावडी बुवा’ या नावाने विख्यात झाले. ऋग्वेदी आश्वलायन शाखा, भारद्वाज गोत्राच्या या देशस्थ ब्राह्मण कुटुंबात परंपरागत चालत आलेले ‘कुलकर्णी पद’ होते.

विठ्ठलपंत मातृ-पितृभक्त होते. मायपित्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. बालपणापासूनच त्यांचा ओढा परमेश्वरभक्तीकडे असल्याने दिवसाचा बराचसा काळ देवपूजा आणि ध्यानधारणा यातच व्यतीत होत असे. पुढे कळत्या वयात देवभक्तीसोबत कुलकर्णी पदाचे कामही विठ्ठलपंत तितक्याच निष्ठsने करीत असत. विठ्ठलपंतांचा पूर्ण दिवस कामकाज आणि देवार्चनेमध्ये जात असला तरीही त्यांचे मातापित्यांकडेही तेवढेच लक्ष असे. आपल्या पोटी गुणवान पुत्र निपजला आहे याचे त्यांच्या मातापित्यांना कौतुक वाटत असे.

एकदा त्या वृद्ध मातापित्यांच्या मनात सर्व तीर्थक्षेत्रे पाहावीत असा विचार आला. मात्र वृद्धापकाळामुळे हे कितपत शक्य होईल याची भीती त्यांना वाटू लागली. त्यांच्या मनातील विचार जाणून घेत विठ्ठलपंतांनी तीर्थाटनाकरिता जाण्याचे ठरविले. सोबत एक गडी, सामानाचे ओझे वाहण्यासाठी घोडा आणि एका कावडीमध्ये आई-वडिलांना बसवून विठ्ठलपंतांनी बऱयाच तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. मुलाने आपल्या मनातील सुप्त इच्छेस पूर्णत्व दिल्याचे जाणून आईवडिलांच्या चेहऱयावर अपार आनंद दिसू लागला. तेथील पंचक्रोशीतही विठ्ठलपंतांचे सर्व स्तरांतून कौतुक होऊ लागले. विठ्ठलपंत हे आधुनिक पुंडलिक आहेत असे जो तो म्हणू लागला. कावडीत बसवून आईवडिलांना तीर्थक्षेत्र दर्शनाचे पुण्य प्राप्त करवून देणारे विठ्ठलपंत तेव्हापासून सर्वत्र ‘कावडीबुवा’ या उपनावाने परिचित होऊ लागले.

काही दिवसांनी अन्य शेष राहिलेल्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याकरिता विठ्ठलपंत नेहमीच्या जामानिम्यासह आईवडिलांसोबत निघाले. ही यात्रा सुरू असता एके दिवशी अचानकपणे विठ्ठलपंतांच्या मातोश्री राधाबाई यांना मृत्यूने गाठले. पत्नीच्या निधनामुळे आपणही संसारमुक्त झालो या भावनेतून विठ्ठलपंतांच्या वडिलांनी, अनंतरावांनी प्रयागक्षेत्री ब्रह्मवर्त येथे संन्यास ग्रहण केला आणि काही दिवसांत तेदेखील परमेश्वरचरणी लीन झाले. त्यांना जलसमाधी देण्यात आली. पित्याचे अखेरचे कार्य आटपून कावडी बुवा माघारी परतले. परतताना त्यांनी मायपित्याच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या कावडीत श्रीविठ्ठल-रखुमाईंच्या मूर्ती ठेवल्या आणि ते परतीच्या दिशेने निघाले. परतीचा प्रवासात कावडी बुवांचा मुक्काम ‘गालव’ या गावी होता. मार्गशीर्ष महिन्यातील तो दिवस श्रीदत्त जयंतीचा होता. या पुण्य दिवशी आपल्या गावात कीर्तन व्हावे असा गालवकर मंडळींचा हेतू होता. मात्र त्याकरिता कुणीही कीर्तनकार उपलब्ध होईना. या कारणाने ग्रामस्थांनी मंदिरात विसावा घेत असलेल्या कावडीबुवांच्या चेहऱयावरील तेज पाहून त्यांनाच कीर्तन करण्याची विनंती केली. कावडी बुवांनी याआधी कधीही कीर्तन केले नसल्याने त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली.

कावडी बुवा गावकऱयांशी चर्चा करीत असताना साक्षात श्री दत्तात्रेय ब्राह्मण वेष धारण करून तिथे अवतरले आणि चर्चेत सहभागी होत कावडी बुवांना म्हणाले, ‘‘तुम्ही कीर्तन आरंभ करा. जर काही चुकलेच तर मी तुम्हाला मदत करीन. काळजी करू नका.’’ आश्चर्य म्हणजे पूर्वानुभव नसतानाही कावडी बुवांनी केलेले कीर्तन फारच रंगले. ग्रामस्थांना कावडी बुवांचे कीर्तन फारच आवडले. कीर्तनाची सांगता झाल्यानंतर आश्चर्यचकित झालेल्या कावडी बुवांना पुन्हा त्या ब्राह्मणाने गाठले आणि ‘‘आपण श्री दत्तात्रेयांवर ग्रंथलेखन करावे’’ अशी सूचना केली आणि ‘‘काही अडचण असल्यास मी तुम्हाला सहाय्य करीन’’ असे आश्वासनही दिले. त्या ब्राह्मणवेषधारी श्री दत्तात्रेयांचा आशीर्वाद घेऊन कावडी बुवांनी‘ गाव सोडले आणि उज्जैन या क्षेत्री पोहोचले.

उज्जैन येथे गेल्यावर कावडी बुवांनी तिथे श्री दत्तात्रेयांच्या अवतारकार्यातील लीलाप्रसंगावर आधारित ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला आणि विस्मयकारकरीत्या त्यांच्या हातून श्री दत्तकृपेने एकामागोमाग एक अशा अर्थपूर्ण सुमधूर ओव्यांची निर्मिती होत गेली. पाहता पाहता अल्पावधीतच कावडी बुवांच्या हातून ‘श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे 40 अध्याय लिहिले गेले. ‘श्री दत्तप्रबोध’ या ग्रंथाचे लेखन करीत असतानाच कावडी बुवांच्या मनाने विरक्तीच्या दिशेने पावले उचलण्यास आरंभ केला. कसलेही पाश उरले नसल्याने त्यांनी दत्त संप्रदायाचा पुरस्कार करून आयुष्य व्यतीत करण्याचे ठरविले.

द्वारकेस जाणाऱया कावडी बुवांनी वाटेत बडोदे येथील श्रीराम मंदिरात मुक्काम केला. येथे त्यांना अनेक संतमंडळींचा सहवास लाभला. येथे प्रदीर्घ वास्तव्य झाल्यामुळे कावडी बुवांचा एव्हाना बराच शिष्यपरिवार निर्माण झाला. त्यातीलच एका शिष्याने कावडी बुवांना बुऱहाणपुरा चौखडी येथे एक भव्य श्रीराम मंदिर बांधून दिले आणि कावडी बुवांनी कायमस्वरूपी तिथेच राहावे अशी गळ घातली. भक्त मंडळींचा वाढता आग्रह पाहून कावडी बुवांनी या श्रीराम मंदिरात आपल्या कावडीमधून आणलेल्या श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींची स्थापना केली.

श्रीराम मंदिरात कायमस्वरूपी वास्तव्यास आल्यावर कावडी बुवांनी पुन्हा एकदा लेखणी सरसावली आणि ‘श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे उर्वरित २१ अध्याय पूर्ण केले. अशा रीतीने १४५०० ओव्यांतून साकारलेला ६१ अध्यायांचा ‘श्री दत्तप्रबोध’ हा ग्रंथराज चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १७८२ (सन  १८६०) मध्ये लिहून पूर्ण झाला. साक्षात श्री दत्तात्रेयांनी लिहवून घेतलेल्या या प्रासादिक ग्रंथाचे निर्माणकार्य पूर्ण होताच कावडी बुवांनी देह ठेवला. ‘श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे लेखन हेच कावडी बुवांच्या अवतारकार्याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे. श्री दत्त संप्रदायामध्ये प्रातःस्मरणीय व पूजनीय असलेल्या ‘श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाच्या वाचनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात असा समस्त दत्तभक्तांचा अनुभव आहे.

बडोदा येथे कावडी बुवा यांचे प्रख्यात श्रीराम मंदिर आहे. आषाढ शु. अष्टमीस कावडी बुवांच्या पुण्यतिथी औचित्याने सप्ताह संपन्न होतो. या सप्ताहादरम्यान श्री दत्तप्रबोध पारायण, कीर्तन-प्रवचने-भजन-पूजन, वेदपठणादी शास्त्रसंमत कार्ये संपन्न होतात. त्यासोबतच पौर्णिमा, गोपाळकाला आणि चैत्र मासामध्ये येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. अनेक अभंग व श्लोकांची निर्मिती करणारे अनंतसुत कावडी बुवा आज अजरामर ठरले आहेत ते श्री दत्त संप्रदायातील महत्त्वपूर्ण अशा ‘श्री दत्तप्रबोध’ या अप्रतिम ग्रंथाच्या निर्मितीमुळे.