जन्म: इ.स.१८०६
आई/वडिल: रमाबाई / रामशास्त्री
कार्यकाळ: १८०६-१८५५
गुरु: स्वयंप्रकाशी यति
समाधी: कार्तिक शुद्ध १३, १८५५
शिष्य: श्रीधर स्वामी (नरसिंहभट्ट अग्नीहोत्री)
जन्मकथा
तेलंगण व कर्नाटक यांच्या सीमेवर अनंतपूर नावाच्या गावी रामशास्त्री व रमाबाई यांना एकदा श्रीदत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला. ‘आम्हीच तुमच्या पोटी अवतार घेत आहोत’ अशी प्रेरणा या दांपत्यास झाली. या दांपत्याच्या पोटी पुढे कृष्णेन्द्रगुरू यांचा जन्म झाला. यांना लहानपणापासून ईश्वरभक्तीचा नाद होता. अनेक चमत्कारिक लीलाही यांनी करून दाखविल्या. एकदा एका वांझ गाईच्या कासेला कृष्णसर्पाचे मुख लावून यांनी त्याला स्तनपान घडविले. वैराग्य-सुंदरीशी आपण विवाह केला असल्याचे यांनी आपल्या आईवडिलांना सांगितले. त्यांनी तीर्थयात्रा आरंभिली. काशी येथे स्वयंप्रकाशयतींच्याकडून यांनी अनुग्रह घेतला. ‘तू श्रीकृष्णरूपी अनंतप्रसादाने जन्मला असून त्रैमूर्ती श्रीदत्तात्रेयांचा प्रत्यक्ष अवतार आहेस. तुझी श्रीकृष्णेन्द्रगुरू म्हणून प्रसिद्धी होईल. धारवाड जिल्ह्यातील सावणूर भागात कार्य करून अमर हो’ असा त्यांना आशीर्वाद मिळाला. काशीतही यांच्या भक्तांनी यांच्या नावे एक मठ बांधून त्यात श्रीकृष्णश्वरलिंगाची स्थापना केली. बंगाली व बिहारी या ठिकाणी प्रतिवर्षी उत्सव करतात. प्रयाग, हरिद्वार, गंगोत्री, बदरी करून ते हुबळीस आले. येथे एका जुन्या पडीक किल्ल्यात एक पुरातन श्रीदत्तमंदिर असून तेथे दत्तपादुकांची स्थापना वे. मू. नरसिंहभट अग्निहोत्री यांनी केलेली होती. गर्भमंदिरावर चक्राकार शिखर आहे. मागील बाजूस औदुंबर व अश्वत्थ वृक्ष आहे. कृष्णेन्द्रगुरूंचे हे कायमचे निवासस्थान झाले.
स्वामींचे चमत्कार
ते रोज तीन ते पाच घरी भिक्षा मागत. यांनी अनेक चमत्कार केले. मोठा परिवार जमा केला. ओसाड तलावात योगदंड आपटून पाणी आणणे, सर्पविषापासून गुरांचे प्राण वाचविणे, शिरसंगी देसायांचा उदररोग बरा करणे, कोणास पुत्र देणे, कोणासाठी सुवर्ण देणे; असे अनेक चमत्कार यांनी केले. गोकर्णास जाताना शिरसी येथे देवीच्या दर्शनास हे आले तेव्हा देवालयाच्या दाराची कुलपे आपोआप निखळून पडली ! देवीने यांना दर्शन दिले. रेणुका डोंगराजवळ एका गुराखिणीचा नवरा झाडावरून पडून मरण पावला असता यांनी त्याला जीवदान दिले.
अवतार समाप्ती
सर्व लोकांना मायेची पाखर देऊन, सर्वांना ज्ञानोपदेश देऊन यांनी शके १७७७ मध्ये कार्तिक शु. १३ रोजी आपल्या वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी अवतार संपविला. श्रीदत्तमंदिरातील सच्चिदानंद स्वामींच्या समाधीच्या डाव्या बाजूस यांची समाधी असून तीवर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्यापुढेच त्यांचे शिष्य श्रीधरस्वामी (नरसिंहभट अग्निहोत्री) यांची समाधी आहे. यांच्या पुण्यतिथीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. समाधीवर श्रीदत्तप्रभूंच्या रूपातील मोठी प्रेक्षणीय अशी दहीभाताची पूजा बांधतात.