जन्म: ७ फेब्रुवारी १८३६, नांदणी जिल्हा कोल्हापूर, भारद्वाज गोत्री ब्राह्मण
आई/वडिल: अन्नपूर्णा/ आप्पाभट
कार्यकाळ- १८३६ ते १९००
संप्रदाय: दत्त संप्रदाय
गुरू: अक्कलकोट स्वामी समर्थ
समाधी: श्रावण वाद्य १०, दिनांक २०-८-१९००, समाधी कुंभारगल्लीत कोल्हापूर
वड्गमय: श्रीकृष्णसरस्वती विजय सारामृत
जन्म पूर्व इतिहास
नांदणी गावात अप्पाभट नावाचा एक ब्राह्मण रहात होता. त्याला अन्नपूर्णा नावाची पत्नी होती. हा ब्राह्मण भारद्वाज गोत्रातील असून पंचांगांच्या आधारे लोकांच्या अडीअडचणी दूर करुन गावातील पूजाअर्चा वगैरे पुरोहिताचे काम करुन आपला उदरनिर्वाह करीत असे. या दोघांना देवाधर्माच्या कार्यात नेहमी गोडी वाटत असे. दर पौर्णिमेला व शनिवारी ब्राह्मण आपल्या पत्नीसह दत्ताच्या दर्शनासाठी वाडीस अगदी नियमाने जात असे व दोन दिवस राहून परत गावी येत असे. त्यांना कशाचीही कमतरता नव्हती; परंतु घरी संतान नसल्यामुळे अन्नपूर्णेस घर ओस वाटत असे. त्यामुळे तिने एकदा पतीस सांगितले की, ‘‘आपल्या घरात पैसा, अडका व धान्य मुबलक असले तरी आपणास संतान नसल्यामुळे ते सर्व काही व्यर्थ आहे. तरी श्रीदत्तचरणी प्रार्थना करुन माझी ही इच्छा पुरी करावी. तेव्हा शनिवारी श्रीदत्तगावी जाऊन त्या भक्तांच्या कैवार्यास विनंती करा. तो त्रिभुवनीचा राजा आपल्याला निश्चित पुत्र देईल व आपल्या संसारात सुख व आनंद निर्माण करील.’’ परंतु त्या ब्राह्मणाने तिचे बोलणे मनावर घेतले नाही.
या गोष्टीला बरेच दिवस लोटले. एके दिवशी वाडीस गेला असताना दर्शनाच्या वेळी त्याने आपल्या पत्नीची इच्छा ईशचरणी ठेवली. तसेच देवाचे गुणगान गाऊन व स्तोत्र म्हणून तो भोजन करुन झोपी गेला. त्या रात्री त्याने स्वप्नात साधूच्या वेषात एका पुरुषास पाहिले. तो साधू त्यास म्हणाला, ‘‘हे ब्राह्मणा, सावध हो. तू उगाच मनाला काळजी लावून घेत आहेस. तू सर्व चिंता सोडून निष्काळजी रहा. मी स्वत:च तुझा पुत्र म्हणून तुझ्या घरी येईन.’’ ते स्वप्न पाहून तो ब्राह्मण जागा झाला व संगमात स्नान संध्या आटोपून तो आपल्या गावी परत आला. त्याने स्वप्नात पाहिलेला सारा वृत्तांत आपल्या पत्नीस सांगितला. ते ऐकून त्याच्या पत्नीस संतोष झाला.
या गोष्टीला तीन महिने उलटून गेले. अन्नपूर्णेस आपण गरोदर असल्याची चिन्हे दिसू लागली. त्यामुळे तिला फारच उल्हास वाटू लागला. तिला सारखे बलभीमाचे दर्शनाला जावे, एवढेच नव्हे तर सारखे देवळातच बसून रहावे असे डोहाळे लागले. तसेच एखाद्या शोभिवंत सिंहासनावर बसून संसारात गांजलेल्यांची सोडवणूक करावी, पालखीत बसावे असे वाटू लागले. याप्रमाणे दिवसामागून दिवस, आठवड्यामागून आठवडे व महिन्यांमागून महिने लोटू लागले आणि शके सतराशे सत्तावन्नच्या माघ महिन्यात कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी मकर लग्न व पावन नक्षत्र असताना रविवारी प्रात:काळी अन्नपूर्णा प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. ती गौरवर्णीय देहाची सुंदर मूर्ती पूर्वजन्मीची सर्व पुण्ये घेऊन घरी आली. जन्मवेळी आईस जरादेखील प्रसूतीचा त्रास भगवंताने दिला नाही व अशा तर्हेने पुराण-पुरुषाने मानवावतार घेतला. त्याचे नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आले.
भगवंताचा अनुग्रह
श्रीकृष्ण मातेच्या परवानगीने कुलदैवताच्या दर्सनास मंगसोळीस पोहचला. कुलस्वामीचे दर्शन होताच त्याने साष्टांग नमस्कार केला. देवाचे स्तुतिस्तोत्र गाइले व तो म्हणाला, ‘‘तुझ्या साक्षात् दर्शनाची हाव धरुन मी येथे धाव घेतली आहे. तू माझा कुलस्वामी व मी तुझा अज्ञानी नोकर. तेव्हा तुझ्यावर दृष्टी ठेवून मी लिंबाच्या झाडाखाली तू जोपर्यंत भेट देत नाहीस तोपर्यंत जेवणखाण सर्व सोडून बसून राहीन.’’ या बालकाची ती प्रार्थना ऐकून तेथे एक ब्राह्मण आला. थोड्याच वेळात त्या ब्राह्मणाचा देह पालटला व कपाळावर चंद्राची कोर असलेला भोळा शिवशंकर पार्वतीसह प्रगट झाला. जो नंदीवर आरुढलेला आहे; असा तो कैलासनाथ डोक्यावर वरदहस्त ठेवून कृष्णास म्हणाला, ‘‘तू माझाच अंश असताना उगाच हे अज्ञान का दाखवतोस? ’’ दीन गरिबांचा उद्धार करण्यासाठी तू हा अवतार घेतला आहेस. तेव्हा हे स्तोत्र पुरे करुन सत्वर स्वत:चे घरी जावे.
प्रथम अक्कलकोटी गावी सूर्याप्रमाणे तेजस्वी नृसिंहभान नावाचे प्रसिध्द स्वामी आहेत, त्यांच्या पायाला वंदन करावे. भक्तासाठी वारंवार त्रैमूर्तीच देह धारण करतात, तरी बुध्दी स्थिर करुन श्रीगुरुमहती वाढवावी.’’ बालक तेथपर्यंत जातो तोच इतके सांगून चटकन् भगवान अदृश्य झाले. आधीच त्रिमूर्तीचा अंश, त्यांत त्र्यंबकेश भेटल्यावर सर्वच रहस्य कळून आले व कृष्ण मंदहास्य करु लागला. नंतर तो गावी गेला व आईस दर्शन देऊन सुखी केले. मुलाला पाहून आईला अत्यानंद झाला.
श्री स्वामी समर्थांचे कृपादान
आईचा निरोप घेऊन श्रीकृष्ण जो घरातून निघाला तो थेट अक्कलकोटला जाण्यासाठी. कारण त्याला श्रीगुरुंच्या दर्शनाचा ध्यास लागला होता. तीन दिवस मार्गक्रमण केल्यावर तो अक्कलकोट गावी आला व त्याने बर्याच लोकांना विचारले की, ‘‘ श्रीगुरु कोठे आहेत?’’ त्यावर लोकांनी सांगितले की, ‘‘अक्कलकोटीचे प्रसिध्द साधू, ज्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे व ज्यांना नृसिंहभान म्हणतात, तेच श्रीगुरुंची मूर्ती आहेत.
बालवयातच कुलदेव खंडोबाचे आज्ञेने कृष्णा अक्ककोट स्वामी समर्थांकडे गेला. माझा कृष्णा येणार म्हणून स्वामी समर्थ सकाळपासून कृष्णाची वाट पहात होते. स्वामीनी कृष्णाला सांगितले, तु आणि मी एकच आहोत आणि त्याचे नाव गुरुकृष्ण ठेवले. कृष्णा आल्यावर ते त्याला घेऊन रानात एकांतात गेले व तेथे ते ३ दिवस राहिले. काही दिवसांनी स्वामींनी कृष्ण सरस्वतींना कोल्हापूरला जाण्याची आज्ञा दिली.
त्यांचे तेज म्हणजे जसा अपार सूर्यच. ते तेज पाहून कृष्णाचे मन आनंदमय झाले व त्याने सद्भावाने पाय वंदिले. दोन्ही हात जोडून ते नानापरीने स्तोत्र गाऊ लागले. ते सर्व ऐकून श्रीगुरु स्मितहास्य करीत म्हणाले, ‘‘हे पूजा, स्तोत्र वगैरे सारे पुरे कर व एक विचार सांगतो तो एक. कसला गुरु व कसला सेवक? अवघा एकच विचार कर की, जगाचा उद्धार करण्यासाठी आता आम्हांला व तुम्हांला अवतार घ्यावा लागला आहे. नीतिमत्तेची सीमा न ओलांडता मनाला एक मर्यादा आणून जगात संचार करावयाचा आहे व लोकांची संगत करुन जगाला मूर्खता दाखवून आपला हेतू साधावयाचा आहे. तेव्हा तुम्ही करवीरक्षेत्री जावे व तुमच्या अवताराचे कार्य साधावे; जे भक्त पुण्यभावाने भक्ती करतील त्यांना तारावे.’’ एवढे बोलून आपला कृपेचा हात श्रीगुरुंनी मस्तकी ठेवला. दोघांनाही फार आनंद झाला. ते दोघेही देहाचा व्यापार विसरुन गेले.
याप्रमाणे सात दिवस लोटले. नंतर आनंदाची ऊर्मी जिरवून नृसिंहभान सावध झाले व त्यांनी समोर कृष्णाला पाहिले. त्याच्या पाठीवर हात फिरवून ते म्हणाले, ‘‘ बाळा, सावध हो. अजून खूप कार्य करावयाचे आहे. तेव्हा आत्ताच हे उचित नाही. आजपासून आम्ही तुमचे श्रीगुरुकृष्ण असे नाव ठेवले. आता आमचे वसतिस्थान गाणगापुरी राहिले. आम्ही तेथे तीन महिने राहू. तुमच्याकडे एक सांगाती येईल. त्याला बरोबर घेऊन करवीर नगरीत जावे. तोपर्यंत येथेच रहावे.’’ साष्टांग नमस्कार करुन कृष्ण म्हणाला, ‘‘तुमची आज्ञा ती प्रमाण.’’ नंतर ती जगा सोडून दोघेजण गावात आले. यानंतर थोड्याच दिवसांनी सलग रात्रंदिवस याप्रमाणे दोन दिवस रस्ता क्रमीत श्रीगुरुनाथ करवीरक्षेत्रात आले व राममंदिरात त्यांनी वस्ती केली. अद्याप हे राममंदिर करवीरक्षेत्री आहे. तेथे त्यांनी एका स्त्रीची समंधबाधा दूर केल्याने फडणवीस नावाच्या एका गृहस्थाची भक्ती महाराजांचेवर बसली व त्याने स्वामींना आपल्या घरी नेले.
ताराबाई शिर्के ही कोल्हापूर येथील कुंभार आळीतील दत्तभक्त महिला पूर्वाश्रमी गाणिका होती. पोटशूळाने पीडीत होती. ती नित्य नियमाने नृसिंहवाडीची पौर्णिमा वारी करीत असे. अनेक वर्षाच्या एकनिष्ठ सेवेच्या फलस्वरूप श्रीदत्तमहाराजांनी स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की, मी तुझ्यावर प्रसन्न असून काही दिवसात तुझ्या घरी रहाण्यास येईल. त्यानुसार कृष्ण सरस्वती महाराजांनी आपले सर्व आयुष्य कुंभार आळीत ताराबाई शिर्के यांचे निवासस्थानीच व्यतीत केले. सदर भाग हा वेश्यावस्ती होती. स्वामीच्या निवासाने सर्व वस्ती पावन झाली. स्वामीजी अखंड बालभावात रहात असत. अनेक साधक सिद्धस्थान गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर येथे तप करीत असता ‘मी करवीर येथे, कुंभार स्वामी या नावाने अवतार घेतला आहे. तेथे जावे’ असे स्वप्नदृष्टांत झाले. स्वामीनी केव्हाही कोल्हापूर सोडून बाहेर गेले नाही. पण कित्येक वेळा भक्तांना नृसिंहवाडीस स्वामींची भेट होत असे.
‘‘आम्ही स्वत: सिद्धान्न मागत असता तुला का भ्रांत पडली? तू असे कसे केलेस? तुला चिंता कशाची पडली होती? आज तुझी व्यथा संपली. त्यामुळे आता येथे येऊ नको. घरीच श्रीकृष्णनाथाला आणून त्याच्या सेवेशी एकनिष्ठ व्हावे. तू त्वरित महिसाळ गावी गेल्यास तुला तेथे श्रीगुरु भेटतील. गेलेला क्षण पुन्हा येणार नाही. गुरुला घेऊन ये व या लोकी सौख्य साधनाचा लाभ घे.’’ ताराबाई जागी झाली. ती लगेच करवीरी आली व घोड्याचा रथ बरोबर घेऊन विलंब न करता गुरुंकडे गेली.
महिसाळकरांच्या घरी येऊन गुरुमाऊलीला साष्टांग वंदन केले व म्हणाली, ‘‘हे करुणाघन गुरुराया, तू घरी चालून आला असतानादेखील मी तुला ओळखले नाही. मी किती हीन स्त्री आहे व कसल्या मायेला भुलले होते कोण जाणे की, तुला ओळखले नाही. तरी हा अन्याय पोटी घालून श्रीगुरुराया घरी चलावे.’’ तिचा हात धरुन श्रीकृष्ण म्हणाले, ‘रथ तयार कर’ ते ऐकून तिला फार आनंद झाला व ती म्हणाली, ‘मी कृतकृत्य झाले.’
याप्रमाणे श्रीगुरूंनी ताराबाईंच्या घरी २५ ते ३० वर्षेपर्यंत वास्तव्य केले. या अवधीत कृष्णा लाड, ऐतवड्याचे देवगोंडा, कागलचे हरिपंत, मिरजेचे मल्लभट जोशी, सिदनेर्लीकर, वासुदेव दळवी, दादा पंडित, व्यास शास्त्री, रामभाऊ पुजारी, नामदेव चव्हाण, बाळकृष्ण राशिवडेकर वगैरे बरीच मंडळी महाराजांची परमभक्त बनली व त्यांची सेवा करू लागली. मध्यंतरीच्या काळात एकादोघांनी श्रीगुरूंना ताराबाईच्या घरातून काढून दुसरीकडे ठेवावे असा कट रचला; परंतु श्रीगुरूंनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की, ‘ताराबाईंनी श्रीहनुमानाची फार भक्ती केली आहे की, त्यामुळे श्रीहनुमान ताराबाईपुढे भक्तीमुळे जखडला गेला आहे व मी हनुमंताचा अंश असलेने येथे राहून तिच्या भक्तीच्या रुपयातील पंचवीस पैसेदेखील देणे भागवले जात नाही.’ या दृष्टांतामुळे महाराजांना कुंभारगल्लीतील ताराबाइंच्या घरातून हलविण्याचा विचार त्या लोकांनी रद्द केला.
स्वामींनी श्रावण वद्य दशमी दिनांक २० ऑगस्ट, इ.स. १९०० रोजी पहाटे देह विसर्जन केला. त्यांच्या पार्थिवाला वैराग्यमठीत समाधी देण्यात आली. श्री महाराज असेतोपर्यंत प. पू. ताराबाईंनी स्वामींची मनोभावे सेवा केली. रोज काकड आरती, धुपारती, शेजारती अशा आरत्या करित असत. जेवण झाल्यावर सुवासिक विडाही अर्पण करीत. सदर गल्लीला सध्या श्री दत्तमहाराज गल्ली असे नाव आहे. सदर स्थान जागृत असून श्री स्वामी आजही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
नंतर शिष्यमंडळींनी भजनासाठी दुसरी मठी निर्माण केली. तिचे स्थान जवळच गंगावेस येथे असून ती निजबोधमठी म्हणून ओळखिली जाते. वैराग्यमठीपासून हे ठिकाण चालत १० मिनिटांच्या अंतरावर आहे. स्वामींचे शिष्य व्यास यांनी या मठी निर्माणासाठी पुढाकार घेतला, या कारणाने तिला व्यासमठी असेही म्हणतात.
श्री स्वामींचे संपूर्ण चरित्र ‘श्री कृष्ण विजय’ या नावाने कोल्हापूरातील शिष्य नारायण मुजुमदार यांनी २ भागात लिहिले आहे.
अशी घेतली श्री कृष्णा सरस्वती महाराजांनी ताराबाईंच्या घरी महासमाधी
आषाढा नंतर श्रावणातील पंधरवडा ही संपून गेला, श्री भगवान् कृष्णजन्माची गोकुळअष्टमी आली. नेहमी मठीत श्री स्वामींच्या सहवासामध्ये हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या थाटामाटात भजन-पूजन करुन संपन्न केला जात असे. याही वेळेस नेहमी प्रमाणे सर्व भक्त जनांनी उत्साहाने एकत्र येऊन हा उत्सव सुरु केला. स्वामींची प्रकृती ठीक नसतानाही त्याप्रसंगी काही काळ ते आपल्या सिंहासनावर येऊन बसले. नेहमीचे श्रीकृष्णजन्माचे भजन चालू होते. भगवान् श्रीकृष्णांच्या जन्माची वेळ जवळ येऊ लागताच सर्वांना गुलाल-फुले उधळण्यासाठी वाटली गेली. परंतु यावेळी श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या वेळेपूर्वीच श्रीस्वामींनी फुले व गुलाल उधळून दिला व ते आपल्या सिंहासनावरुन उठून त्वरीत आत पलंगावर जाऊन निजले. स्वामींची ही कृती सर्वांच्याच चर्चेचा विषय बनली. स्वामींना सोडून इतरत्र जाणेच भक्त मंडळीना सुचेना. दिवस रात्र भक्त मंडळी सोबतच राहू लागली. स्वामींचा परमभक्त नामदेव श्रीक्षेत्री गाणगापूरी गेला होता. तिकडे त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांस स्वामींनी अगदी लवकरात लवकर वैराग्य (ताराबाईंच्या घरी) मठीत येण्यास सांगितले. त्या आज्ञेनुसार नामदेवही तेथून श्रीदत्तप्रभूंच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेवुन थेट स्वामींच्या सगुण दर्शनाच्या ओढीने करवीर नगरीत आला. धावत पळतच कुंभारगल्लीतील वैराग्यमठी त्याने गांठली तेथे स्वामींचे दर्शन घडताच त्याचे समाधान झाले. एकंदरीत सर्व समाचार ऐकून परमभक्त नामदेवांना स्वामींनी दृष्टांत देऊन गांणगापूरातून त्यांचे चरणी बोलावून घेतल्या बद्दल मनोमन धन्यता वाटली. त्याने स्वामींच्या चरणी वंदन केले. इतके दिवस दिवसरात्र श्रीस्वामी सोबत राहून थकलेल्या भक्तजनांनी त्या दिवशी नामदेवालाच स्वामींच्या जवळ रात्री बसण्यास सांगितले. ते ही आनंदाने श्रीस्वामी सेवेत नामस्मरण करीत त्यांचे शेजारीच बसून राहिले. इतर भक्तजन थकून गेल्यामुळे गाढ निद्राधीन झाले. स्वामी व नामदेव दोघेच मठीत जागे होते. हळू हळू रात्रीचा समय संपून, मध्यरात्रही उलटून गेली. ब्राह्म मुहुर्तांची पहाट उगवली श्रावण वद्य दशमी शके १८२२ सोमवार दि. २० ऑगस्ट १९०० रोजीची ही पहाट होती. हलक्या आवाजा मध्येच परमपूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या लाडक्या शिष्यास ‘नामा’ म्हणून हांक मारली, शेजारीच बसलेले नामदेव अगदी तत्परतेने उठून श्रीस्वामींना अत्यंत आर्जवाने होकार देत विचारु लागले. “स्वामी, काय आज्ञा आहे?” त्याच समयी जगत् जननी श्रीमहालक्ष्मी अंबामातेच्या मंदिरातील पहाटे चारच्या कांकड आरतीचा परम मंगल घंटानाद श्रीक्षेत्र दक्षिण काशी करवीर नगरीमध्ये सर्वत्र निनादू लागला. नेमके त्याच वेळी श्रीस्वामींनी परमभक्त नामदेवास कापूर लावण्याची आज्ञा केली. स्वतःस त्यांनी त्या कापूर आरतीने ओवाळून घेत आपली सगुण साकार अवतार लीला संपन्न केली.
श्रीस्वामींची जीवनज्योत त्या पहाटेच्या कापूर आरतीतील ज्योती प्रमाणेच आपल्या चरित्र कार्याचा सुंदर सुंगध सर्वत्र पसरवित बघता बघता अदृश्य झाली. नामदेवानी हे पाहून करुण अंतःकरणाने जोराचा हंबरडा फोडला. त्याचा आवाज ऐकून सर्व भक्तजन धांवतच तेथे आले. आपल्या प्राणप्रिय श्रीस्वामींची जीवन ज्योत मालवल्याचे पाहून सर्वजन विरह व्यथेने व्याकुळ झाले. सर्वांचाच आधार नाहिसा झाल्यामुळे जो तो दुःखाने आक्रंदू लागला. कोणी, कोणाचे सांत्वन करावे? हाच मोठा प्रश्न होता. मठीतील हे वृत्त हळूहळू सर्वत्र करवीर नगरी व आजू बाजूस दूर पर्यंत पोहचले. ज्याला समजेल तो तो अगदी धांवत पळत आपली सर्व कामे सोडून मठीत श्रीस्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागला. आलेला प्रत्येक जन लहान-थोर, स्त्री-पुरूष, श्रीस्वामींच्या सहवासाला आता आपण मुकलो या भावनेने डोळ्यातून अश्रू गाळू लागला. सारे भक्तजन विरह दुःखाने शोक सागरी जणू बुडून गेल्या प्रमाणेच दिसू लागले. सदभक्त ताराबाईस दिलेल्या वचना नुसार स्वामींनी आपल्या समाधीसाठी कुंभारगल्लीतल्या वैराग्यमठीत (ताराबाईच्या घरी) पुढील व्यवस्था करण्याची प्रेरणा सर्व भक्तजनांना दिली. त्यानुसार त्यावेळचे कोल्हापूरचे लोकप्रिय राजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीही श्रीस्वामींचा महिमा जाणून सर्व भक्तजनांच्या इच्छेनुसार त्यास्थानी समाधी देण्याची परवानगी दिली. पूर्व नियोजित स्थळी भूगर्भामध्ये व्यवस्थित जागा करुन परमपूज्य श्रीस्वामींचा परमपवित्र देह यथावकाश त्याजागी पद्मासनस्थ केला. वेदमंत्र घोषामध्ये नाम-संकीर्तनाच्या गजरामध्ये अत्यंत सदभावनेने अखेरची पूजा अर्चा केली गेली. स्वामींच्या पुण्यदायी पावन देहाभोवती मीठ-कापूर भरून त्या जागी समाधिस्त केला गेला. समाधीसाठी वापरण्यात आलेला पाषाण हा श्री क्षेत्र जोतीबा डोंगराचा असून त्याला चंद्रमौळी पाषाण असे म्हटले जाते त्यावर श्रींची प्रतिमा सर्व विधीयुक्त भावभक्तीने स्थापन करण्यात आली व भजन-पूजन-अन्नदानादी यथासांग संपन्न झाले. स्वामींच्या पूर्वीच्या स्पष्ट शब्द संकेतानुसार श्रीस्वामी देहाने नसूनही त्यांच्या अस्तित्त्वाची प्रचिती भक्तजनांना येऊ लागली. विरह दुःखाने व्याकुळ झालेल्या भक्तजनांना त्यांच्या असण्याचा अनुभव वेळोवेळी विविध घटनांतून येऊ लागला. त्यामुळे सर्व भक्तजन श्रीस्वामींच्या समाधीस्थानी दर्शन घेऊन पूर्ववत् भक्तीप्रेमात रंगून त्यांचे नामस्मरण करीत आपापले कर्तव्यकर्म पार पाडू लागले.
शिष्यपरंपरा
कृष्णा लाड, वासुदेव दळवी, रामभाऊ, रामभाऊ फारिक, म्हादबा, वेणीमाधव (रांगोळी महाराज), व्यास, बाळकृष्ण राशीवडेकर, महादेवभट, नामदेव महाराज, अनंत आळतेकर हे स्वामीजींच्या अंतरंग शिष्यांपैकी होत. हल्लीच्या काळात माधवराव टिकेकर, देवनार, मुंबई (१३ जून, इ.स. १९२९ - ४ मे, इ.स. २००१) यांनी स्वामी आज्ञेने अनेक लोकांना या संप्रदायाची दीक्षा दिली. पूज्य नामदेव महाराजांचे शिष्य स्वर्गीय श्री नानासाहेब गद्रे (पुणे), श्री नाना परांजपे (लोणावळा), श्री ज्ञानेश्वर काटकर (प्रज्ञापुरी कोल्हापूर) यांनीही स्वामिभक्तीच्या प्रसाराचे कार्य केले.
१)कृष्ण तारा निवास (वैराग्यमठी) - दत्त गल्ली, महाद्वाराजवळ , महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत.
२)व्यास मठी (निजबोधमठी)- गंगावेस, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत.
३)नामदेव महाराज मठी, शुक्रवार पेठ, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत.
४)स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र, आपटा फाटा, मुंबई - गोवा महामार्ग तालुका रायगड, महाराष्ट्र, भारत.
५)श्री कृष्ण सरस्वती सेवा मंडळ - बद्रीनाथ अपार्टमेंटस , शिवाजी नगर, दहिवली, कर्जत, रायगड, महाराष्ट्र, भारत.
६)श्री कृष्ण सरस्वती सेवा मंडळ - दगडी बंगल्यासमोर, नेरळ, रायगड, महाराष्ट्र, भारत.
श्रद्धाकल्पना
सांप्रदायिक श्रद्धेनुसार स्वामी दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानले जातात.
श्रीपाद श्रीवल्लभ
।
नृसिंह सरस्वती
।
स्वामी समर्थ अक्कलकोट
।
कृष्ण सरस्वती दत्त महाराज
श्री कुंभार स्वामी दत्त मंदिर पत्ता:
श्री दत्तमंदीर,
१४७ डी वार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य.
श्री कुंभार स्वामी समाधी मंदिर पत्ता:
श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज टेंपल
२१६९/१-२, निजबोध (व्यास) मठी, गंगावेश, कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य.
श्रीकृष्ण सरस्वती ! एक अद्भुत दत्तसंप्रदायिक सत्पुरुष
कुलदैवत श्रीखंडेरायाने मूळ रूपात, साक्षात् शिवरूपात प्रकट होऊन पुढील वाटचालीविषयी बोध केल्याने समाधान पावलेला श्रीकृष्ण त्याच्या नांदणी गावी परतला. कृष्णबाळाच्या मुखावरील अपार तेज पाहून मातापिता चकित झाले. श्रीकृष्णाने घडलेला समग्र वृत्तांत कानी घातला त्यास ऐकून मायबाप कृतार्थ झाले असले तरीही कृष्णबाळ श्रीगुरुदर्शनार्थ पुन्हा एकदा घराबाहेर निघणार असल्याचे समजल्यावर ते चिंतित झाले, कासावीस झाले. मात्र श्रीकृष्णाने त्याच्या मातेस, ‘तुम्ही चिंता करू नका. श्रीदत्तमहाराजांवर श्रद्धा ठेवून निश्चिंत राहा. मी योग्य वेळी तुम्हाला भेटावयास येईन.’ असे निःसंदिग्ध वचन दिले आणि तो अक्कलकोटास प्रयाण करता झाला. अप्पाभटजी आणि अन्नपूर्णाबाई या उभयतांनी आपल्या या जगावेगळय़ा बालकास साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला.
मातापित्यांचा निरोप घेऊन श्रीकृष्णाने नांदणीहून प्रयाण केले. सतत तीन दिवस, तीन रात्र अथक आणि अविश्रांत पायपीट करून श्रीकृष्णाने अक्कलकोट नगरीची थोरली वेस ओलांडली. अक्कलकोट नगरीत तो पहिल्यांदाच येत असला तरीही अक्कलकोटमधील काही मूठभर मंडळींना त्याच्या आगमनाचे वृत्त आधीच समजले होते. प्रज्ञापुरीत प्रकटलेले, मनुष्यदेहात सामावलेले आणि ‘श्रीस्वामी समर्थ’ ही नाममुद्रा धारण केलेले ‘परमेश’तत्त्व, त्यादिवशी पहाटेपासून, ‘माझा कृष्णा येणार. आज माझा कृष्णा येणार’ असा घोषा लावत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला अत्यानंदाने श्रीकृष्णाच्या आगमनाविषयी सूचित करीत होते. श्रीस्वामी समर्थ महाराजांचा वात्सल्याने ओसंडून वाहणारा चेहरा पाहून त्यांचे भक्तगणदेखील त्या अनामिकाच्या येण्याविषयी आतुर झाले होते.
श्रीकृष्ण श्रीस्वामी दरबारात पोहोचला. त्यास समोर उभे पाहताच श्रीस्वामीरायांनी दोन्ही हात पसरून त्याचे स्वागत केले. श्रीकृष्ण लगबगीने त्याच्यापाशी गेला तोच श्रीस्वामी समर्थांनी त्यास प्रेमाने जवळ घेत पोटाशी कवटाळले. श्रीकृष्ण गहिवरला, त्याचा कंठ दाटून आला. श्रीस्वामीरायांनी कृष्णबाळाच्या गालावरून, पाठीवरून हात फिरवीत त्याच्यावर मायेचा अपार वर्षाव केला. त्याच्या दोन्ही गालांचे वारंवार मुके घेतले. हे दृश्य पाहून तेथील भक्तमंडळींनी ‘हा नक्कीच कुणीतरी अवतारी सत्पुरुष आहे’ याची नोंद घेतली. एवढय़ात अचानक श्रीस्वामी समर्थ उठले आणि श्रीकृष्णाचा हात धरून तेथून निघाले. अवचितपणे घडलेला हा प्रकार पाहून क्षणभर गोंधळलेली भक्तमंडळी भानावर आली तोवर श्रीस्वामीराय श्रीकृष्णासह तिथून वायुवेगाने दूर जात दिसेनासे झाले.
श्रीस्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटपासून बऱयाच दूरवर, विस्तीर्ण व घनदाट वृक्षांनी व्यापलेल्या एकांतस्थळी श्रीकृष्णास आणले आणि तेथील एका सपाट कातळावर ते बसले. लागलीच श्रीस्वामीचरणी लोटांगण घालून श्रीकृष्ण त्यांची अपरंपार स्तुती करता झाला. श्रीस्वामीरायांची मनोभावे प्रार्थना करून त्याने ‘आपल्यावर पूर्ण कृपा करावी’ अशी त्यास विनंती केली. त्यावर श्रीस्वामी म्हणाले, “बाळ, तू अन् आम्ही काही वेगळे नाही. तू माझाच अंश आहेस. अनादी अनंत अशी ही श्रीगुरुपरंपरा पुढे नेण्यासाठी तू जन्म घेतला आहेस तेव्हा काही काळ मजपाशी राहावे. तद्नंतर पुढील कार्य करण्याच्या हेतूने तू करवीरक्षेत्री जावे आणि अवधूतस्वरूप धारण करून तेथे जगदुद्धाराचे कार्य करावे. या कारणे मूळ रूप त्यागून बालोन्मतपिशाच्च वृत्ती धारण करणे योग्य ठरेल. तुझा अवतार विशिष्ट कार्यासाठी झाला आहे बरे!’’
श्रीस्वामी समर्थ महाराजांनी अतिशय वात्सल्याने श्रीकृष्णाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि ते म्हणाले, “आम्ही आमचेच तत्त्व आपल्यामध्ये पाहतो आहोत, आम्ही तुम्हांस अधिकारपद देत आहोत, आजपासून आपली ओळख सर्वत्र सर्वदूर ‘श्रीकृष्ण सरस्वती’ या नावाने होईल.’’ श्रीस्वामीरायांचा स्पर्श बुद्धिग्रामास घडताच श्रीकृष्ण भावसमाधीत दंग झाला. त्या दिव्य भावावस्थेत असतानाच त्यास श्रीस्वामीरायांनी नियोजित अवतारकार्याचे रहस्य आणि प्रयोजनाविषयी अवगत केले. यात बराचसा काळ सरला. त्यानंतर समाधीवस्थेचा परमानंद लुटणारा श्रीकृष्ण जागृतावस्थेत आला तेव्हा ‘श्रीकृष्ण सरस्वती’ या संबोधनाचे वलय त्याच्या सभोवती दिमाखाने विलसत होते.
या घटनेनंतर श्रीस्वामी समर्थ महाराजांनी श्रीकृष्ण सरस्वतींसह पुन्हा अक्कलकोटात येणे केले. तेथे काही दिवस श्रीकृष्ण सरस्वतींचे राहणे झाले. एकेदिवशी श्रीस्वामीरायांनी भक्तमंडळींना सांगून श्रीकृष्ण सरस्वतींकरिता पंचपक्वान्ने तयार करविली, मोठा समारंभ घडवून आणला आणि आनंदाचा सोहळा घडवीत श्रीकृष्ण सरस्वतींना आपल्यासोबत बसवून जेऊखाऊ घातले. अशातच काही दिवस गेले. या अवधीत श्रीकृष्ण सरस्वतींनी श्रीस्वामीमाऊलींचे वात्सल्यसुख पुरेपूर अनुभवले.
एकेदिवशी गाणगापुरास गेलेला कुणी एक कुष्ठरोगी ब्राह्मण श्रीदत्तप्रभूंच्या दृष्टांत सूचनेनुसार अक्कलकोटी आला. श्रीस्वामीमहाराजांच्या चरणांशी लोळून त्याने त्याच्या त्या असाध्य रोगातून मुक्त करण्याची विनंती श्रीस्वामींपाशी केली. तेव्हा श्रीस्वामीरायांनी त्यांच्या शेजारीच बसलेल्या श्रीकृष्ण सरस्वतींकडे बोट दाखवून त्या कुष्ठरोग्यास “अरे, आता तू या श्रीकृष्णगुरूंसमवेत करवीर (कोल्हापूर) येथे जाऊन त्यांचीच सेवा कर म्हणजे तुझे कुष्ठ नाहीसे होईल.’’ असे सांगितले. श्रीस्वामीरायांचे हे बोलणे ऐकून कुष्ठरोगाने त्रस्त झालेला तो ब्राह्मण श्रीकृष्ण सरस्वतींकडे जाण्यास कां कू करू लागला. हे पाहून श्रीस्वामी समर्थांनी त्या ब्राह्मणास आपल्यापाशी बोलावून त्यास श्रीकृष्ण सरस्वतींचा महिमा व श्रेष्ठत्व सांगितला. इतकेच नाही तर ‘श्रीकृष्ण सरस्वती यांच्या रूपाने साक्षात श्रीदत्त महाराज करवीर क्षेत्रामधील त्यांच्या अवतारकार्याला प्रारंभ करणार आहेत.’ असे सांगून आश्वस्तदेखील केले.
श्रीस्वामी समर्थ महाराजांचा ‘खडावा’रूपी कृपाप्रसाद घेऊन श्रीकृष्ण सरस्वती करवीरग्रामी (कोल्हापूर) परतले. श्रीगुरू श्रीस्वामीमहाराज यांचा उल्लेख श्रीकृष्ण सरस्वती अखेरपावेतो ‘मालक’ या संबोधनाने करीत असत. अक्कलकोटहून कोल्हापुरास येते वेळी त्यांच्यासोबत तो कुष्ठरोगी भक्तदेखील होता. या परतीच्या प्रवासात श्रीकृष्ण सरस्वती यांनी काही अद्भुत आणि अतार्किक लीला दाखविल्याने कुष्ठरोगी ब्राह्मणाचा श्रीकृष्ण सरस्वतींबद्दलचा आदर आणि आत्मियता कित्येक पटींनी वाढली.
करवीरनगरीचे आद्य दैवत, श्रीमहालक्ष्मी आईसाहेबांच्या मंदिर परिसरातील ओवरीमध्ये श्रीकृष्ण सरस्वतींनी मुक्काम केला. येथे येता क्षणीच त्यांनी अनेक भाविकांना संकटमुक्त केले त्यात अक्कलकोटहून आलेल्या कुष्ठरोगी ब्राह्मणाचा देखील समावेश होता.