श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आल्यानंतर त्यांची अहर्निश सेवा करण्याचे सद्भाग्य जर कुणाला मिळाले असेल तर ते फक्त चोळाप्पाला! स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटास प्रथम आले तेव्हा ते चोळप्पाचे घरीच प्रथम आले व तेथेच ते प्रथम जेवले. अक्कलकोट मधील सुरवातीच्या काळात स्वामीचे अधिकाधीक वास्तव्य चोळप्पाचे घरी झाले. तेथील वास्तव्यात चोळप्पा स्वामींचे अंतरंग शिष्य बनले. स्वामींच्या बाल लीलांचा त्रास होत असूनही चोळप्पाने त्याकडे कौतुकानेच पहिले. त्यासाठी त्यांनी कुटुंबाचा रोषही पत्करला. चोळप्पाचे आयुष्यात घडलेले काही प्रसंग खालील प्रमाणे
१) एक दिवस स्वामींनी चोळप्पाची खूप कठीण परीक्षा घेतली. स्वामी घरातून निघून हासापूर गावाकडे निघाले. चोळप्पा नेहमी प्रमाणे सावली सारखा त्यांच्या पाठीमागून जाऊ लागला. समर्थ एकदम रागावून चोळाप्पास म्हणाले 'आम्ही संन्यासी तुम्ही आमच्या पाठीमागे येऊ नये. आपण आपला प्रपंच सांभाळावा.' चोळप्पाचे डोळयातून अश्रूपात होऊ लागला व काकूळतीला येऊन, हात जोडून स्वामींना म्हणाले, " महाराज मी घरदार सोडीन पण श्रीचरण सोडणार नाही." त्याची ही दृढ श्रद्धा पाहून स्वामींनी आपल्या पायातील खडावा चोळप्पाचे अंगावर फेकून त्यास त्यांची पूजा करण्यास सांगीतली. चोळप्पाने अत्यंत आनंद झाला. त्यांनी त्या प्रसाद पादुकांची पूजा सुरु केली. अनेकांचे व्याधी निरसन, संकट निरसन या पादुकांच्या दर्शनाने झालेले आहे. आजही ह्या पादुका चोळाप्पाच्या वंशजांच्या ताब्यात असून समाधी मठात दर्शनास उपलब्ध आहेत.
२) चोळाप्पाचे धर्मपत्नीने पुरणासाठी डाळ रांजण।त साठऊन ठेवली. समर्थानी नकळत रोज थोडी डाळ गाईस खायला दिली. हे कृत्य समर्थांचेच म्हणून पत्नीने चोळाप्पास तक्रार केली. चोळाप्पानी समार्थास विचारले 'हमको क्या मालूम? तुम्हारी गऊ दाल खा गयी उनकू पुछ् जा'.
३) एकदा चोळप्पाचे बायकोच्या हाताला विंचू चावल्याने ती ओरडू लागली. ते ऐकून समर्थानी चटकन आपला जोडा तिच्याकडे फेकला व त्यात हात घालून ठेवण्यास सांगितले. तिने तसे करताच वेदना कमी होऊ लागल्या. तिला वाटले बरे होऊ लागले म्हणून हात जोड्यातून काढताच पुन्हा प्रचंड दुखू लागले. तेव्हा हात पुन्हा जोड्यात घालून ती झोपीच गेली.
४) अक्कलकोटचे महाराजे समर्थांचे भक्त झाले. राजवाड्यातून रोज समर्थांच्या साठी शिधा येऊ लागला, महिन्याचे ५ रुपये चोळाप्पाला मंजूर झाले. त्यानंतर समर्थ क्वचितच चोळप्पाचे घरी जेऊ लागले.
५) एकदा चोळप्पाचे बायकोचा प्रसूतिसमय नजीक आला होता. परंतु समर्थ खोलीचे दार कुणालाच लाऊ देईनात. त्यांनी मडक्याच्या उतरंडी उतरून घरभर पसारा करून ठेवला. येसूबाई प्रसूत होऊन कन्यारत्न झाले. जणू समर्थानी आपल्या कृतीतून कन्यारत्न प्राप्त होणार हे सुचतच करायचे होते काय?.
वरील सर्व प्रसंगांतून स्वामींचे चोळाप्पावरील निस्सीम प्रेम व चोळप्पाची स्वामी चरणी असलेला दृढ विश्वासच प्रकट होतो. चोळाप्पानी समर्थ्यांची अनन्य भावाने सेवा केली. समर्थानी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु द्रव्यलोभ व सुंदराबाईची कारस्थाने यामुळे त्याच्या समर्थ सेवेत दुर्दैवाने अंतर पडले. एरव्ही चोळप्पा इतका एकनिष्ठ भक्त दुसरा क्वचितच झाला असेल.
'श्री अक्कलकोट निवासी स्वामी महाराज चरित्र' यात श्री मुळेकर लिहितात, महाराज मणूरला गेले होते सोबत चोळप्पा हि होता. भीमा नदीच्या पात्रातून नौकेतून जात असता पुढे चितापूर गाव आहे. तेथे एक टेकडी व मंदिर आहे. तेथे स्वामी बसले व चोळाप्पाला म्हणाले, मनूरचे वाटेने काटेकुटे आहेत. गाईगुरे घेऊन ये आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. महाराजांचा म्हणण्याचा अर्थ चोळाप्पास समजला नाही. सकाळचे प्रहरी पुन्हा गाई गुरे आणण्यास सांगितले. परिणामाच्या जाणिवेने स्वामींचे डोळे पाणावले. महाराजांनी हातातील कडे चोळाप्पाकडे फेकून हातात घालण्यास सांगितले. सायंकाळी सहा वाजता चोळाप्पास वाखा झाला. हात पाय वळू लागले. आता मरणारच असे चोळाप्पास वाटू लागले. बाळप्पास ही समर्थांनी आज्ञा केली नाही. बाळाप्पाने एका संन्यासी मार्फत चरण तिर्थ पाठवले. मृत्यूसमयी स्वामींनी चोळाप्पास दर्शन दिले नाही यावरून चोळप्पाची भक्ती समर्थापेक्षा द्रव्याकडे अधिक होती. महाराज चोळाप्पास तसेच आजारी सोडून अक्कलकोटास गेले. चोळप्पा दुसरे दिवशी तिसऱ्या प्रहरी मरण पावला.
चोळाप्पानी स्वामी समाधीची जागा वाड्यातच नक्की करुन समाधी बांधून घेतली होती. "चोळ्या यात अगोदर तुला घालीन मगच मी जाईन" असे स्वमींनि चोळ्ळपास सांगितले. अगदी तसेच घडले. चोळाप्पाचा अंतकाळ स्वामींचे आधी ६ महिने झाला. चोळाप्पाबद्दल समर्थांच्या मनात विलक्षण प्रेम. त्याचे प्रत्यंतर चोळाप्पाच्या मृत्यूनंतर आले. समर्थांची पुष्पांसारखी प्रसन्न मुद्रा चोळापाच्या मृत्यूनी कोमेजून गेली.
धन्य तो शिष्योत्तम भक्त चोळप्पा!
यतीरुप दत्तात्रया दंडधारी ।
पदी पादुका शोभती सौख्यकारी ।।
दयासिंधु ज्याची पदे दुःखहारी ।
तुम्हावीण दत्ता मला कोण तारी ।।
श्री स्वामी समर्थ व भक्त श्रेष्ठ श्री चोळप्पा
श्री स्वामी समर्थांनी चोळाप्पाचे भविष्य यापूर्वीच सांगितले होते त्याप्रमाणे मध्यान्ह रात्रीच्या समयास चोळाप्पास उपद्रव झाला चोळाप्पाच्या आग्रहाखातर श्री स्वामी समर्थ थोरल्या मणूरास परतले तेव्हा तेथे पटकीची साथ होती. चोळाप्पा अत्यावस्थ होता श्री स्वामींनाही ताप भरला. नंतर देशपांड्यांनी समर्थास त्यांच्या बैलगाडीतून अक्कलकोटास आणले. इकडे चोळाप्पास अधिक त्रास होऊन तो शके १७९९ (इ. स. १८७७) अश्विन शुद्ध नवमीस इहलोक सोडून परलोकास गेला. त्यादिवशी महाराजांस चैन न पडून त्यांची वृत्ती उदास झाली.
श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील जीवन चरित्रात चोळाप्पाचे स्थान महत्त्वाचेच राहिले आहे. इतके की चोळाप्पा ज्या दिवशी परलोकी गेला त्या दिवशी श्री स्वामींची वृत्ती अतिशय उदासीन झाली होती. चोळाप्पाची संगत तुटली होती, त्यामुळे त्यांना तो वियोग सहन होत नव्हता. सात जन्माचा सांगाती गेला! असे ते त्या दिवशी सर्वांनाच सांगत होते. तो जरी त्यांचा सात जन्माचा सांगाती होता तरीही परमेश्वर स्वरुप असलेले श्री स्वामी त्याचे विधिलिखित बदलू शकत नव्हते. शक्यतो परमेश्वर कुणाच्याही जन्म मृत्यूच्या क्रमात ढवळा ढवळ करीत नाहीत. तसे केले तर जीवसृष्टीच्या अस्तित्वात मोठा गोंधळ निर्माण होईल. चोळाप्पाला थोरल्या मणूरला परतण्याची घाई झाली होती. तो श्री स्वामींस सारखा चला जाऊया चला जाऊ या असा म्हणत होता. तेव्हा श्री स्वामींनी त्यास पहिली सूचना दिली. चोळ्या मणूरच्या वाटेने काटे आहेत रे गाई गुरे घेऊन ये! आपण दुसऱ्या वाटेने जाऊ पण त्यास समर्थ सूचेनाचा अर्थ कळला नाही. दुसऱ्या दिवशीही मणूरच्या वाटेने जाण्याचा त्याचा आग्रह कायम होता. वास्तविक चोळाप्पास श्री स्वामी समर्थ कोण आहेत हे चांगले ठाऊक होते. त्यांचे गूढ वागणे बोलणेही त्याला समजायचे. इतरांना तो अनेकदा श्री स्वामींच्या विशिष्ट कृतीचा संकेताचा अथवा बोलण्याचा उलगडा करुन सांगत असे. त्याची स्वामीनिष्ठाही भक्कम होती. परंतु या सर्वांवर त्याच्या प्रपंचातील मोह मायेचा पगडा वरचढ ठरला. तो श्री स्वामींची सगुण भक्ती करीत होता, परंतु त्यांची निर्गुण निराकार भक्ती म्हणजे काय? त्या मार्गाने श्री स्वामींनी त्यास अनेकदा नेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो श्री स्वामींच्या सगुण भक्तितच अडकला. झापडबंद पद्धतीने तो ती करीत राहिला. परमेश्वराच्या सहवास व सेवेत विवेकानेच राहावे हे त्यास उमजले नव्हते. श्री स्वामी त्याच्या आग्रहाखातर थोरल्या मणूरात आले. देव जे नाही सांगायचे ते संकेत खुणांनी सांगतो दाखवतो. भक्तास ते कळले तर ठीकच, अन्यथा तो साक्षीभावाने बघतो यात ढवळा ढवळ करत नाही. श्री स्वामींनी त्यास सांगितले होते त्या वाटेने काटे फार आहेत रे गाई गुरे घेऊन ये, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. परंतु मोह ममता मायेने माखलेल्या चोळाप्पाला त्याक्षणी तरी श्री स्वामींची ही सांकेतिक भाषा समजली नाही. थोरल्या मणूरास पटकीच्या साथीचा जोर होता. संध्याकाळी त्याला (पटकीने/महामारीने) धरले. त्याला तापही खूप भरला. परंतु दयाघन श्री स्वामींनी तो ताप स्वतःच्या अंगावर घेतला. महामारीने होणारी त्याची तडफड श्री स्वामींना बघवेना. श्री स्वामींना अक्कलकोटला आणण्यात आले. दुसऱ्या दिवशी अश्विन शु.नवमी इ.स.१८७७ ला चोळाप्पाचे निधन झाले. चोळाप्पा श्री स्वामींच्या दर्शनास त्याच्या अखेरच्या क्षणी मुकला. पण बाळाप्पाने श्री स्वामींचे चरणतीर्थ अखेरच्या क्षणी चोळाप्पाच्या मुखात घातले ज्याची त्याची कर्मगती हा बोध!