संतश्रेष्ठ श्री देवमामालेदार तथा श्री यशवंतराव महाराज

नाव: श्री यशवंत महादेव भोसेकर (कुलकर्णी)
जन्म: भाद्रपद शुक्ल ९, १३ सप्टेंबर १८१५, पुणे येथे ओंकार वाड्यात, श्रीप्रवरी कश्यप गोत्र, अश्वलायन शाखा.
कार्यकाळ: १८१५ - १८८७
गुरु: स्वामी निर्मालाचार्य
गुरु गृहीचे नाव: श्री सिद्धपदाचार्य

श्री देव मामलेदार
संतश्रेष्ठ श्री देवमामालेदार 

श्री यशवंत महाराजांचा जन्म एका दत्तभक्त कुटुंबात १३ सप्टेंबर १८१५ ला पुण्यात ओंकार वाड्यात झाला. त्यांचे मूळ गाव भोसे पंढरपूर, तालुका जिल्हा सोलापूर. त्यांचा जन्म अश्वलायन शाखेच्या कश्यप गोत्री ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांच्या घराण्यात दत्तसेवा पूर्वापार चालत आलेली होती. ते स्वामी समर्थांची उपासना व सेवा करीत असत प. पू. देव मामलेदार १८ व्या शतकातील एक महान संत म्हणून ओळखले जातात. 

श्री यशवंत राव महाराज यांचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गोरगरीब, निराधार महिला व मुलेे आजारी व व्याधीग्रस्त यांना मदत कारताना आपले सर्व आयुष्य वेचले. त्या सर्वांना ते आपले कुटुंबियाच मानीत असत. इ. स. १८२९ ते १८७२ तब्बल ४३ वर्षे महसूल खात्यात विविध पदावर नोकरी केली. त्यांनी महाराष्ट्राचे विविध भागात नोकरी केली.

इ. स. १८७०-१८७१ महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला. माणसे व जनावरे अन्नांन्न करून मृत्युमुखी पडत होती. श्री यशवंत महाराज त्यावेळी बाळगणं तालुक्यात तहसीलदार होते. गरीब व वंचितांसाठी त्यांनी आपली सर्व मालमत्ता विकून टाकली व सर्व रक्कम लोकांमध्ये वाटून टाकली. पण दुष्काळ स्थिती पाहता हि रक्कम अगदीच कमी होती. हे देव मामालेदारांना जाणवले, ते तालुका तहसीलदार होते. त्यांनी सरकारी तिजोरीतील रोख रक्कमही गोरगरिबांमध्ये वाटून टाकली. हि रक्कम थोडी नव्हती, ती होती १२७००० त्याकाळी. हि वार्ता त्यांचे वारिष्टाना कळली व ते ट्रेझरीत तपासणीस आले. आणि काय अभिनव घडले? तपासणीत सर्व रक्कम ट्रेझरितच मिळाली. एक पैशाचाही फरक मिळाला नाही. या ठिकाणी भगवंताने चमत्कार तर केलाच पण भगवान महाविष्णूनी यशवंत महाराजांना साक्षात दर्शन दिले. बाळगणं तालुक्यातील लोकांनी दुष्काळात आपल्या मदतीला येणाऱ्या या तहसील दाराला देवत्व बहाल केले व तेव्हापासून यशवंत महाराज देव मामलेदार याच नावाने ओळखले जाऊ लागले.

त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनंत लीला केल्या. हजारो लोकांना मदत केली व त्यांचे जीवन उद्धरून टाकले. श्री देव मामलेदार यांचा उल्लेख तत्कालीन अनेक संत व सत्पुरुषांचे चरित्रात आढळतो. श्री देव मामलेदार यांनी हा मर्त्यदेह २७-१२-१८८७ रोजी सटाणा येथे पंचत्वात विलीन केला. या महान दत्तभक्ताचा समाधीचा दिवस होता मार्गशीर्ष कृष्ण ११. त्यांची समाधी नाशिकजवळ सटाणा येथे आहे. येथे दरवर्षी पुण्यतिथी उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रातून आजही हजारो भक्त या विदेही दत्तभक्तांचे समाधी दर्शनास येतात. हा सोहळा १५ दिवस चालतो. यशवंत महाराजांचे कृपेने त्यांची सर्व मनोरथे पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे. सटाणा हे देव मामालेदारांचे निवासस्थान होते. त्यामुळेच त्यांचे एक सुंदर मंदिर सटाणा येथे आहे. भक्तांनी या स्थानी जाऊन श्रींचे दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा हि विनंती.

श्री देव मामलेदारांनी अनेक अद्भुत लीला केल्या त्यानंतर अनेकजण शिष्य झाले. त्यांचे शिष्यापैकी ३ शिष्य महान अधिकारी शिष्यांची नावे खालील प्रमाणे,
१) श्री सदानंद स्वामी, काशी.  
२) श्री नारायण स्वामी, गोदातीर 
३) पद्मनाभ स्वामी, मुंबई, महान सिद्ध पुरुष.                      

श्री पद्मनाभस्वामी आपल्या गुरु विषयी स्वामीच्या लीला वर्णिताना म्हणतात,

|| श्री उर्वाच्य  || अभंग विषम चरणी ||

निपुत्रिका पुत्र I निर्धनासी धन I चिरंजीव जाण I मज केले II
याचकांसी तृप्त I स्वपत्नीचे दान I अज्ञाना सज्ञाना I केले जणे II
राजकीय धन I राजा ज्ञे वांचून I ब्राह्मणासी दान I ज्याने दिले II
योग्यचि हिशोब I साहेबा दाविला I अर्धा आणा दिल्हा I वाढ जेणे II
नवसा पावणे I पाखांड्याचा छळ I करी घननिळ I जयासाठी II
मांसाची मालिका I पुष्पवत केली I गळ्यात घातली I पाखांड्याच्या II
मार्गाने चालतां I मांस पूर्ववत I दाविले गळ्यांत I पाखांड्यासी II
छीथू सर्व ज्यनी करोनी पाखांड्या I म्हणाले कां वेड्या I केला छळ II
हजारो रुपये I कर्जाव काढून I याचकासी दान I ज्याणे दिले II
मेलेला बालक I ज्याणे उठविला I त्या स्वामींची लीला I वाणू काय II
सत्र्या पाटलाचे I पांचशे रुपये I घेवोनिया स्वयें I दान केले II
धुळ्यात मालेगावीI जातां पाठवीन I दिधले वचन I पाटलासी II
परी विसरले I आठवण नाहीI ईशे लवलाही I फेडियले II
पद्मा म्हणे ईशे I भैयाजी होऊनI स्वामींचे वचन I पूर्ण केले II
नवसा पावले I सत्य तें वच्यन I असत्य भाषण I मुळी नाही II
अजुनी पावतीI करिता नवस I परी भाव त्यास I समर्पिता II
पद्मनाभ म्हणे I गुरु यशवंता I नवस बहुतां I लोकी केले II

प. पु. देव मामलेदार व सौ. आईसाहेब
प. पु. देव मामलेदार व सौ. आईसाहेब 

परमपूज्य देव मामलेदार यशवंत महाराज एक सिद्धपुरुष, चरित्रचिंतन

श्रीदत्त भक्तीमध्ये रममाण असणारे व आपल्या भक्तीने इतरांचे कल्याण व्हावे ही सदिच्छा असणारे जे अधिकारी सत्पुरुष आहेत व ज्यांच्या चरणाशी आपली कायमच शरणागत अवस्था असावी, त्यामधील प. पू. देव मामलेदार महाराज (१८१५ - १८८७) यांचेही महत्व मोठे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमद प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी अगदी सुरवातीच्या काळामध्ये आपल्या मातोश्रीबरोबर नाशिक येथे प. पू. देव मामलेदार महाराज यांचे दर्शन घेतले होते. श्रीमद प प वासुदेवानंद महाराज यांच्या मुखाकडे बघून  "हे फार मोठे अधिकारी योगी आहेत" असे कौतुकाचे भावोद्गार प. पू. देव मामलेदार महाराज यांनी काढले होते. पुण्यामध्ये श्री महाराजांना लहानपणापासूनच श्रीदत्तभक्तीची ओढ लागली. १८७० च्या काळामध्ये  सटाणा नाशिक येथे सरकारी अधिकारी असताना त्यांचा "मामलेदार' हा हुद्दा होता. पण वेळोवेळी त्याचा उपयोग त्यांनी गरजू व अडचणीत असलेल्याना धन व धान्य देऊन केला.
   
जसे "देवाने" अडचणी सोडवण्यासाठी धावून यावे तसे श्री महाराजांचे वागणे. सर्व जनासाठी असे हे "देव मामलेदार" होते. याबरोबरच श्रीदत्त उपासना व "श्रीदत्तात्रेयांचे" प्रत्यक्ष दर्शन झाल्याने श्रीदत्तभक्तीचे तेज होतेच. त्यामुळे आपल्या भक्तीअधिकाराने सर्वांच्या अडचणी सोडवाव्यात असे करुणाकर वागणे असल्याने "प. पू. देव मामलेदार यशवंत महाराज" या नावानेच प्रसिद्ध्द झाले. या मायेच्या संसारामध्ये प.पू. देव मामलेदार यशवंत महाराज यांची पुण्यतिथी हा एक देहसोहळा श्रीदत्तलींन होणे हे जन्माचे सार्थकच. पण प. पू. देव मामलेदार यशवंत महाराज इथेच सभोवार आहेत असे प्रत्येक भक्तांचा विश्वास

आहे.

प. पू. देव मामलेदार यशवंत महाराज यांच्या चरणी शरणभाव ठेवून कोटी कोटी वंदन!

श्री स्वामी  समर्थ व  गजानन  महाराज व श्री यशवंतराव महाराज

अक्कलकोट चे श्री स्वामी समर्थ महाराज यांनी गजानन महाराज यांना शेगाव ला व यशवंत  महाराज यांना सटाणा या गावी जाऊन कार्य सांभाळा अशी आज्ञा केली व तेच हे यशवंतराव महाराज तहसीलदार होते म्हणूनु लोक देवमामलेदार म्हणू लागले‬ सटाणा गावात तहसीलदार म्हणून आले व देव झाले.  १८०० मध्ये जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा यांनीच सरकारी तिजोरी मधून अमाप संपत्ती गोर गरिबांना वाटली पण जस जसे महाराज संपत्ती वाटायचे पण की काहीच कमी नाही व्हायची तेव्हा लोकांना कळले की हे साधारण मानव नसून दैवी अवतार आहेत. पण त्यांनी स्वामीवर विश्वास ठेवून गुरु आज्ञेप्रमाणे कार्य  चालूच ठेवले.

संतश्रेष्ठ श्री देवमामालेदार
संतश्रेष्ठ श्री देवमामालेदार 

श्रीदेव मामलेदार, चरित्र चिंतन 

सोलापुर जिल्हातील पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावी महादेवपंत देशपांडे नावाचे ॠग्वेदी त्रिप्रवरी अश्वलायनी शाखेचे एक ब्राम्हण गृहस्थ राहात होते. त्यांची पत्नी म्हणजे पुणे परगण्यातील जिवाजीराव सरकार पेशवे यांचे दिवाण माणकेश्वर यांचे कारभारी बाळाजी मकाजी बाजपे यांची कन्या हरीदेवी. दोघेही उभयता धर्माचरण करणारे, भाविक, संत व अतिथींची पूजा व सेवा करणारे होते. अशा या सदाचारी-संपन्न कुटुंबात शालीवाहन शके १७३७, भाद्रपद शुद्ध दशमी, सुर्योदयसमयी, बुधवारी, दि. १३/९/१८१५ रोजी यशवंतरावांचा जन्म झाला. 

महादेवपंत देशपांडे यांना दादा, यशवंत, मनोहर, आबा, रामचंद्र, प्रल्हाद, वासुदेव व बलराम ही आठ पुत्ररत्ने व सखू नावाची कन्या झाली. त्यांचे दुसरे पुत्ररत्न यशवंतराव हेच पुढे देव मामलेदार म्हणून ओळखले गेले. जन्मानंतर दोन वर्षातच यशवंतराव सज्ञानी माणसाप्रमाणे वागू लागले. त्यांचे तेज पाहून आई-वडिलांना यशवंतरावांमधील दैवी सामर्थ्याची ओळख पटली. वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे शके १७४६ जेष्ठ वद्य प्रतिपदेला त्यांचे उपनयन केले गेले. यशवंतरावांचा विवाह टेंभूर्णी येथील जिवाजी बापुजी देशपांडे यांची मुलगी सुंदराबाई हिच्याशी शके १७४६ फाल्गुन वद्य सप्तमी, शुक्रवार रोजी झाला. त्यावेळी सुंदराबाई अवघ्या सहा वर्षाच्या होत्या. 

यशवंतराव कोपरगाव येथे मामांकडे राहू लागले. इ. स. १८२९ मध्ये मामांनी खटपट करुन त्यांची बदली कारकून म्हणून येवले येथे तात्पुरती नोकरी मिळवून दिली. १८३१ मध्ये त्यांचे चोख काम व मोत्यासारखे अक्षर पाहून त्यांची नियुक्ती कारकून म्हणून दरमहा दहा रुपये पगारावर झाली. वयाच्या सोळाव्या वर्षी मिळालेली नोकरी जणू त्यांच्या योग्यतेची पावतीच होती. लवकरच यशवंतरावांना पाच रुपये पगार वाढ होवून पारनेर तालुका कचेरीत बदली झाली.पारनेर येथे त्यांनी पाच वर्षे जबाबनीस म्हणून चांगल्या प्रकारे काम केले. तेथील वास्तव्य त्यांच्या जीवनात क्रांतीकारक ठरले. नोकरीच्या निमीत्त नेहमी परगावी राहावे लागणार हे जाणून त्यांची पत्नी सुंदराबाई पारनेरला राहू लागली. यशवंतरावांना परमार्थ कार्यातही सुंदराबाईंची साथ मिळू लागली. 

एके रात्री झोपेत असतांना यशवंतरावांना एक तेजस्वी महापुरुष समोर बसलेला दिसला. आजानूबाहू, दिगंबर, भव्य कपाळ, डाव्या मांडीवर उजवी मांडी ओढून धरलेली, पायांचे तळवे जमिनीला टेकलेले, डोळ्यात विलक्षण तेज आसलेली व्यक्ती त्यांना म्हणाली, "बेटा घबराओ नही. ये ले काम की चिज" पुढे यशवंतरावांच्या हातावर शाळीग्राम ठेवून ती व्यक्ती म्हणाली, इसकी भक्तीभावसे पूजा करना तुम्हारी मनोकामना पूरी होगी. असे म्हणून ती व्यक्ती अंतर्धान पावली. यशवंतरावांना लगेच जाग आली. जागृतावस्थेत त्यांनी पाहीले तर त्यांच्या हातात एक शाळीग्राम होता. याला स्वप्न म्हणावे की सत्य हेच त्यांना उमजेना, स्वप्न म्हटले तर त्या दिव्य सत्पुरुषाने दिलेली वस्तू प्रत्यक्ष त्यांच्या हातात होती. तो एक साक्षात्कार होता.