जन्म: ३ जुलै १९२७
आई/वडील: रमाबाई/यशवंतराव
गुरु: प.पु. लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज व श्री गुळवणी महाराज
विशेष:
१. प.पु.लोकनाथ तीर्थ ट्रस्ट ची स्थापना
२. दत्त महाराज काविश्वरांनंतरचे वासुदेव निवासचे प्रमुख विश्वस्त
वेद, उपनिषदे, पुराणे, अन्य धर्मग्रंथाचा अभ्यास करण्यार्या व्यक्ती पुढे ‘योगी’ संज्ञास प्राप्त होतात. या योग्यांच्या अध्यापन-अध्यासन केंद्राचा हळूहळू विस्तार होत जाऊन त्याचेच पुढे योगपीठात रूपांतर होते. ही सर्व त्या परमेश्वराचीच कृपा होय. ईश्वराच्याच इच्छा व आशीर्वादाने योगी पीठाधीश होत असतात.
परमपूज्य गुळवणी महाराज हे असेच महानयोगी, दत्तसंप्रदायातील अधिकारी व्यक्ती होत. त्यांची स्वत:ची साधना उच्चकोटीची होती. त्यांनी अनेकांना गुरुमंत्र दिला. हिंदूधर्म व भारतीय तत्वज्ञान याचे योग्यतेप्रमाणे ज्ञान दिले. अनेक प्रज्ञावंत शिष्य निर्माण केले. स्वत:च्या गुरूंच्या नावे वासुदेव निवास हा आश्रम बांधला. योग व भक्ति याचे ‘चिरंजीव पीठ’ तयार झाले. हे पीठ गुळवणी महाराज धर्मशास्त्राप्रमाणे चालवित. ते निजधामास गेल्यानंतर पूज्य दत्त महाराज कवीश्वर पीठावर आरूढ झाले. त्यांच्या विद्वत्तेत सारा संप्रदाय प्रभावित झाला. त्यानंतर या पीठाचा भार त्यांनी आपल्यानंतर आपणच निवडलेल्या काका महाराजांच्यावर सोपविला. योगसाधना करणारे, भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास असलेले ‘गुळवणी महाराज’ व ‘कवीश्वर महाराज’ यांच्या सान्निध्यात असलेले गोदावरी काठचे हे नररत्न या पीठावर विराजमान झाले.
सत्शील, धर्मपरायण अशा ढेकणे कुटुंबात काका महाराजांचा जन्म झाला. प.पू. नारायणकाकांचे वडील शाळा-मास्तर होते. ते धर्मपरायण तर होतेच पण कवीही होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. उत्तम बासरी वादक होते. रोज शिवमंदिरात जाऊन ते शिवप्रभूचे दर्शन घेत असत. एकदा एका साधूने त्यांच्या हातात पेढा दिला आणि सांगितले की, ‘मी तुझ्या पोटी जन्माला येणार आहे.’ नंतर सत्त्वशील धार्मिक व श्रद्धाळू अशा रमामातेच्या पोटी काका महाराजांचा जन्म झाला. मातृप्रेमी नारायण काका मातेच्या सान्निध्यात वाढू लागले. ते फार एकांतप्रिय होते. आईची पूजा, पठण, सणवार, व्रते या सर्वांचा नारायणाच्या बालमनावर परिणाम होत असे. हळूहळू नारायण मातेबरोबर पठण, पूजा, भजन यात भाग घेऊ लागला. आवाज गोड होता. आईने मुलाला प्रेमाने सर्व शिकविले. आई काय करते, घरात काय आहे, काय नाही यांच्याकडे त्यांचे लक्ष असे. चतुर व समंजस मूल सर्वांनाच प्रिय असते.
हे ढेकणे कुटुंब पुण्यात राहात होते. त्यांचे शिक्षण प्रसिद्ध नू.म.वि. शाळेत झाले. तेथे योगीराज गुळवणी महाराज ड्राँईग शिकवीत असत. वळणदार अक्षर, उत्तम ड्राँईग आणि नेमस्त स्वभाव यामुळे ते गुळवणी महाराजांचे लाडके शिष्य बनले. हा योग भगवंतांनीच जुळवून आणला. आपला गोड आवाज, बासरी वादन व अभ्यासात हुषार असा हा विद्यार्थी शाळेत व वर्गात प्रिय होता. कुशाग्र बुद्धी व बहुश्रुतता याचा मिलाप झाला. नारायण सर्व तुकड्यात पहिला येऊ लागला. मॅट्रीकच्या वर्गात असताना ते आजारी पडले. गुळवणी महाराज व इतर शिक्षक घरी जाऊन चौकशी करत असत. अशा परिस्थितीत परीक्षा देऊन नारायण पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला. यथावकाश त्यांनी पुणे विद्यापीठाची इंजिनियरिंगची पदवी संपादन केली व कलकत्ता विद्यापीठातून एम.ई. झाले. आई- वडिलांना फार आनंद झाला. नाशिकला ‘महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ मधे रिसर्च करू लागले. बरीच वर्षे ते नाशिकला स्थायिक झाले. काका महाराजांना रिसर्चसाठी पारितोषिके मिळाली. पुढे अधीक्षक अभियंता म्हणून मुंबई व इतरत्र उत्तम कामगिरी केली. हा निरिच्छ मुलगा विवाह विषयात अजिबात रुची दाखवत नसे. आई-वडिलांच्या हळूहळू ते लक्षात आले की आपला मुलगा विवाहबद्ध होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांना त्यात अडकावयाचे नाही असे ठरले. दत्तभक्ती व साधना यात ते जास्त रमू लागले. प. पू.वासुदेवानंद सरस्वती यांच्या प्रश्नावलीतून त्यांना मार्गदर्शन मिळाले. गुळवणी महाराज पण त्यांना मार्गदर्शन करीत असत. ‘प. पूज्य गुळवणी’ महाराजांनी त्यांच्यात योगमार्गाची आवड निर्माण केली. काका महाराज त्यांच्याकडे योगासने शिकत असत.
प. पू. लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांकडून अनुग्रह
‘प. पू. लोकनाथतीर्थ स्वामी महाराज’ ‘गुळवणी महाराजांच्या’ कडे येत असत. त्यांना काका महाराजांनी आसने करून दाखविली. नारायण काका महाराजांना ‘लोकनाथतीर्थांकडून' दिक्षा घ्यायची होती. लोकनाथतीर्थ महाराज म्हणत ‘‘ कॉलेजचे शिक्षण संपू देत मग बसू.’’ ‘गुळवणी महाराज’ व काका महाराजांचे मित्र वाकडे यांनी ‘लोकनाथतीर्थ महाराजांना’ नारायण काकांना दीक्षा देण्याची विनंती केली, पण योगच येईना, जणू काही त्यांची परीक्षाच घेतली जात होती. एक दिवस मार्गशीर्ष महिन्यात ‘लोकनाथतीर्थ स्वामी महाराज’ काकांना म्हणाले, ‘‘सकाळी लवकर उठून स्नान करून आई-वडिलांना नमस्कार करून त्यांना सर्व सांगून ये. तुला दीक्षा दिली जाईल.’’ भगवान श्रीकृष्णाना प्रिय असणार्या मार्गशीर्ष महिन्यात त्यांना दीक्षा मिळाली. आधीच सन्यस्त वृत्ती, गुळवणी महाराजांचे सान्निध्य व लोकनाथतीर्थांचा गुरुमंत्र असा त्रिवेणी संगम जुळून आला. अविरत साधना होऊ लागली. साधनावस्थेतून सिद्ध अवस्थेकडे वाटचाल चालू झाली. शिष्याचे रुपांतर गुरुमधे झाले. काका महाराजांना दिक्षाधिकार प्राप्त झाला. गुळवणी महाराज व कवीश्वर महाराज यांच्या नंतर पीठाधीश झालेले ‘पूज्य काका महाराज’ यांचे ॠणानुबंध अलौकिक होते. काका महाराजांनी आपले गुरु ‘लोकनाथतीर्थ महाराज’ यांच्या स्मरणार्थ नाशिकला आश्रम बांधला आहे. येथे कुंडलीनी जागृती, योगप्रसार व प्रचार व्हावा म्हणून कार्य सुरू केले आहे. ही विद्या राष्ट्रोद्धारक व पवित्र आहे. तिचा प्रसार सर्व माध्यमातून काका महाराज करीत.
स्वधर्मावर काका महाराजांचे गीतेप्रमाणेच सांगणे आहे. कवीश्वर महाराज म्हणत, ‘‘अभ्यासाच्या वेळी मानव ब्राह्मण असतो. कुटुंबाच्या रक्षणासाठी झटतो तेव्हा क्षत्रिय असतो. कुटुंबासाठी व्यवसाय करतो तेव्हा वैश्य असतो व इतर कामे वेळप्रसंगी आपण करीतच असतो.’’
शास्त्रोक्त आचार, निगर्वी वागणूक, अथक कष्ट, साधना, स्वत:च्या जबाबदार्या सांभाळणे, स्वत:चे भोजन स्वत: बनविणे, स्वत:ची सर्व कामे स्वत: करणे, नि:स्पृहता, स्वत:ला काही मिळाले तर वासुदेव निवासला देणे इतकी नि:स्पृहता त्यांच्यात आहे. ‘काका महाराज’ वेळ पाळण्याच्या बाबतीत अतिशय दक्ष असत. त्यांची सर्व कामे ठरलेल्या वेळेत होत असत.
‘स्वामी लोकनाथतीर्थ’ यांचे काशीत राहण्याचे हाल होत असत तेव्हा आपल्या गुरूंसाठी ‘काका महाराजांनी’ एक आश्रम बांधला. इतकी त्यांची गुरुभक्ती श्रेष्ठ आहे. समाजातील असंख्य लोक सिद्धयोग दीक्षित व्हावे असे त्यांना वाटते. त्यासाठी ते प्रयत्न करतात. सोप्या भाषेत सर्वांसाठी सिद्धयोग (महायोग) हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. विविध दत्तस्थानाच्या मदतीने त्यांनी सिद्ध योग-प्रबोधिनी स्थापन केली आहे. वासुदेव निवास मधे व्यवस्थापनेचा धडा घालून दिला आहे. औरंगाबादला लोकनाथतीर्थ जेथे आले होते तेथे आश्रम बांधला आहे व जेथे ‘गुळवणी महाराजांना’ दिक्षा दिली तेथे स्मारक बांधले आहे. सामान्य लोकांच्यासाठी महाराज झिजत. साधना, भक्ति, श्रद्धा व प्रेम याच्यायोगे मग जिंकण्याची कला त्यांना साध्य झाली आहे. ‘प. पू. काका महाराज’ साधक व गुरु होतेच पण सामान्य लोकांना मार्गदर्शन करणारी थोर व्यक्ति म्हणून प्रसिद्ध होते.
काका महाराजांनी भारतातच नव्हे तर युरोपीय देश व इतर देशात महायोग शक्तीपात दीक्षेचा प्रचार केला प्रबोधिनीची स्थापना केली व विस्तारही केला.
योगतपस्वी प.पू.श्री नारायणकाका महाराज एक समदर्शी सत्पुरुष आहेत।'समोSहं सर्वभूतेषु' या गीतावचनातही सम म्हणजे मी ईश्वर असा सगुणरूप ब्रम्ह असाच अर्थ केला आहे। समभावाचा अर्थ सर्वत्र ईश्वरभाव असा आहे। समाजातील आदर्शाची पूजा हीच खरी भक्ती आणि मानवतेची सेवा हाच खरा धर्म।असे सांगून~
हे समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा ओतला भावो ।
म्हणौनि भक्तामाजी रावो । आणि ज्ञानिया तोचि ।।
समस्तही वासुदेव बघण्याची दृष्टी श्रीकाकामहाराजांची आहे. माऊली म्हणतात,
" तरंगांनी पाणी नाही म्हणून आटावे किंवा किरणांनी दिवा नाही म्हणून आंधले व्हावे। तसे 'मी'च (परब्रम्ह) सर्व विश्वात असतानाही कुठे दिसत नाही म्हणून मला शोधावे हीच खरी भ्रांती आहे।"
ही भ्रांती घालवणे हेच श्रीकाकांच्या भक्तीचे खरे प्रयोजन आहे।
'विश्वात्मा तितुका मेळवावा । विश्वधर्म वाढवावा ।'
या ध्येयाने प्रेरित होऊन योगतपस्वी असलेले प. पू. श्री काकामहाराज विश्वाचा आध्यात्मिक विकास पहाणारे एक दृष्टे महात्मा आहेत.
ह्या योगिराज श्रीसद्गुरुंच्या चरणी शरण जाऊन एवढेच मागणे आहे की-
श्रीसद्गुरुंचे संकल्प, अपेक्षा, व ईच्छा पूर्ण करण्याच्या कार्यात आणि श्रीसदगुरु प्रणीत साक्षात्कारी जीवनसाधनेत त्यांची करुणा आणि कृपा,
आशीर्वाद आणि आत्मबल सर्वच साधक भक्तांना निरंतर लाभावे.
न गुरोरधिकं तत्वं न गुरोरधिकं तपः ।
न गुरोरधिकं ज्ञानं तस्मै श्रीगुरवे नमः ।।
गुरुर्मध्ये स्थित विश्वं
विश्वमध्ये स्थितो गुरुः ।
गुरुर्विश्व न चान्योस्ति
तस्मै श्रीगुरवे नमः ।।
प. पु. श्री सद्गुरू नारायण काका महाराज म्हणत!
मनुष्य देह म्हणजे त्याचे जे चैतन्याचे मूळ रूप आहे त्या मूळ रूपावर आलेली पटले-आवरणे दूर सारून मूळच्या चैतन्यमय प्रकाशाशी एकरूपता साधन्यासाठी दिलेली ईश्वरदत्त देणगीच होय. पूर्वीच्या जन्मातील शुभाशुभ कर्माचा परिपाक म्हणून आलेली अशा प्रकारची आवरणे ही कोणत्याही उपायांनी दूर करणे हेच आवश्यक आहे. कालांतराने सर्व आवरणे दूर होऊंन साधक आत्मसाक्षात्कारास पात्र होतात. सिद्धयोगात सदगुरुंच्या सिद्धसंकल्पाच्या प्रभावाने निरनिराळ्या प्रकारच्या यौगिक क्रिया होऊन ही आवरणे साधकाला विशेष कष्ट न होता आपोआप दूर होतात. अन्य मार्गानीही ही आवरणे दूर होऊ शकतात. परन्तु पूर्वी सांगितल्या प्रमाणे ह्या विहंगम मार्गाने ही आवरणे सहजगत्या दूर होतील व् आध्यात्मिक साधनेच्या परिपूर्णतेचा कालावधीही जवळ येईल.
।। श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ।।