प. पू. काकांच्या बद्दलची माहीती घ्यायच्या अगोदर आपण काकांच्या जन्मा अगोदरची हकीकत बघू. शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी, या उक्ती प्रमाणे प. पू. काकांच्या जन्मा अगोदरच दत्तकृपेने धनागरे कुटुंब पावन झाले होते. प्रत्यक्ष श्रीदत्तअंशावतार श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी तथा टेंबे स्वामी महाराज यांचा प. पू. धनागरे काकांच्या आजी कै. हरिबाई धनागरे यांच्यावर गोरेगाव जवळील केनरा या गावी अनुग्रह झाला. स्वामींची पूर्ण कृपा त्यांच्यावर होती. अनुग्रह देता वेळी स्वामी महाराज हरीबाई यांना बोलले की तुमच्या पुढच्या पिढीतील एक जण आम्ही धर्मकार्यासाठी घेणार आहोत. याच आशिर्वादाने प. पू. काकांच्या स्वरुपात मुर्तीमंत रुप घेतले.
दत्तावतारी प. पू. टेंबे स्वामींचा सर्वत्र संचार असायचा. स्वामींनी दोन वेळा भारत भ्रमण केले. वाशिम परिसरात स्वामी चार वेळा आले. त्यांचा मुक्काम वाशिम येथे करुणेश्वराच्या देवळात असायचा. त्यावेळी प. पू. स्वामी महाराज भिक्षेसाठी श्री धनागरे यांच्या घरी येऊन गेलेत. त्यावेळी आज ज्या जागेवर वासुदेव आश्रम आहे त्याच ठिकाणी स्वामींची भिक्षा झाली आहे. तसेच काकांच्या मातोश्री यांना टेंबे स्वामींचे पट्टशिष्य श्रीमद् प. प. सद्गुरु श्री दिक्षीत स्वामी महाराज यांचा अनुग्रह होता. विशेष बाब म्हणजे काकांचे मामा ज्यांना बाळमामा असे संबोधत त्या बाळमामांनाही श्रीमद् प. प. टेंबे स्वामींचा प्रत्यक्ष अनुग्रह होता. बाळ मामांना स्वामी महाराजांची खुप सेवा घडली. विशेष बाब म्हणजे टेंबे स्वामींनी गरुडेश्वरी देह ठेवतांना बाळमामा हे प्रत्यक्ष हजर होते. तसेच श्रीमद् प. प. दिक्षीत स्वामींनी अयोध्या येथे देह ठेवतांना ही बाळमामा तेथे हजर होते आणि प. पू. टेंबे स्वामींचे पूर्वाश्रमीचे लहान बंधू प. पू. सिताराम महाराज टेंबे यांनीही अमरावती येथील झिरी ला देह ठेवतांना बाळमामा तेथेही हजर होते. अशा प्रकारे एका संत पुरुषाच्या जन्माअगोदरच धनागरे घराण्यावर सर्वस्वी दत्तकृपा होती. एव्हाना दत्तप्रभू स्वत:च या संस्कारांची पूर्वपिठीका तयार करवून घेत असावेत असेच म्हणावे लागेल.
अशा दत्तभक्तीत रंगलेल्या, कर्तृत्वसंपन्न, सदाचारी घरण्यात प. पू. पंडित काका यांचा जन्म सन १९४२ ला कूष्मांड नवमी या शुभ तिथीला झाला. काकांचे नाव दिनकर असे ठेवले होते. परंतु काकांच्या तासनतास देवपुजेत रमलेल्या बालमुर्ती मुळे सर्वांना आनंद होत असे व त्यामुळे सर्व लोक त्यांना पंडित या नावाने हाक मारत असत. आज त्यांना सर्व जण पंडितकाका याच नावाने ओळखतात. पुढे काकांनी लौकीक दृष्ट्या B. A. एवढे शिक्षण पूर्ण केले व कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी काकांनी नागपुर विद्यापिठात व ए. जी ऑफिसमध्ये नोकरी केली. परंतु हे करत असतांना प्रत्यक्ष टेंबे स्वामी महाराजांचे काकांना मार्गदर्शन व आदेश व्हायचे. नोकरीवर असतांना एक दिवस काकांना गुरु आज्ञा झाली व अनुष्ठानासाठी काका कुणालाही न सांगता अज्ञातवासात गेले. (प. पू. काकांच्या चरित्रात असे असंख्य प्रसंग आहेत जे आजवर अज्ञातच आहेच) सात महिन्यांच्या अज्ञातवासानंतर मार्च ७३ मध्ये काकांनी स्वेच्छेने नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर काकांनी थेट गरुडेश्वर (गुजरात मधील नर्मदा किनारी असलेले टेंबे स्वामींचे समाधी ठिकाण) गाठले. तो घटनाक्रम फारच विलक्षण व अनाकलणीय असा होता. स्वामी महाराजांनी आदेश देवून काकांच्या हातुन तेथे मोठे अनुष्ठान करवून घेतले. त्यानंतर काकांना नर्मदा परिक्रमा करण्याचा स्वामींनी आदेश दिला. काकांनी पूर्ण शास्त्र शुद्ध ३ वर्ष ३ महिने १३ दिवसाची नर्मदा परिक्रमा केली. प्रत्यक्ष दत्तप्रभू व नर्मदा मैयाने ती काकांकडून कृपापूर्वक पूर्ण करुन घेतली. परिक्रम पूर्ण झाल्यावर एक विलक्षण प्रसंग घडला तो असा की प. पू. काकांना टेंबे स्वामींनी संकेत दिला की आपले सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर, हे इंदूर येथे आहेत. तप:पुत, तेजस्वी काका नाना महाराजांना शोधायला इंदूर येथे गेले. प. पु. नाना व काकांची पहिली भेट ही इंदूर येथील हरिसीद्धी येथे झाली. तेव्हा प. पू. नाना महाराज काकांची वाटच पहात होते. प. पू. नाना महाराज पंडित काकांना म्हणाले, "या नर्मदे हर! तुमची परिक्रमा पूर्ण व्हायची होती म्हणून आम्ही गेली पाच वर्ष झालेत आपली वाट बघतोय. "पुढे प. पू. नाना महाराज पंडित काकांना म्हणाले, "जर कुणी विचारले तर सांगा की आमचा आणि तुमचा गेली तिन जन्म झाले गुरु-शिष्याचा संबंध आहे." अनुग्रहानंतर काकांना नाना महाराजांची सेवा, सानिध्य लाभले. थोड्याच कालावधीत काका नाना माऊलींचे प्रिय शिष्य बनले. (इथे सांगु इच्छितो की लौकीक दृष्ट्या बघितले तर इतर वेळी सद्गुरुंनी अनुग्रह केल्यावर तप करवून घेतात परंतु प. पू. काकांच्या बाबतीत तसे दिसुन येत नाही. काकांच्या हातुन प. पू. नानांनी आधिच कठोर असे अनुष्ठान, उपासना व तप करुन घेतले त्यामुळे आधिच तपाने तेजपुंज झालेले काका अनुग्रहानंतर अजुनच तेजस्वी झाले.)
प. पू. काकांनी थोड्याच कालावधीत पूर्ण गुरुकृपा संपादित केली. १९८७ च्या श्रीगुरुपौर्णीमेला प. पू. नाना महाराजांनी काकांना सांगितले की, "दत्तभक्ती संप्रदाय वर्धनाचे कार्य तुम्हाला आयुष्यभर करायचे असून त्यासाठीच तुमचा जिवीत हेतू आहे. तेव्हा आमचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहेतच परंतु त्याबरोबर मोठ्या महाराजांची (टेंबे स्वामींची) आज्ञा आहे असे समजावे" अशा प्रकारे सद्गुरु नानांनी सिंहासनाधिष्टित असतांना काकांना आज्ञा दिली. ती आज्ञा शिरसावंद्य मानून प. पू. पंडीत काकांनी आयुष्यभर ते कार्य अविरतपणे केले. नर्मदा मैयावर प. पू. काकांचे निरतीशय प्रेम होते, श्रद्धा होती. नर्मदा परिक्रमेनंतर `नर्मदा' ह्याच विषयावर काकांनी अखंड बारा वर्ष भाषण केले. जणू एक तपच त्यांनी अखंड नर्मदा मैयाची शब्द सेवा केली.बारा वर्ष काका फक्त आणि फक्त `नर्मदा' याच विषयावर बोलले.याद्वारे अनेक प्रांतात त्यांनी नर्मदा महात्म्य पोचविले. "नर्मदेसि अर्पियले जिव्हार" या त्यांच्या उपक्रमाला फारच छान प्रतिसाद लाभला. अशा प्रकारे काकांनी अखंड दत्त सेवा केली. काकांनी वाशिमला ज्या ठिकाणी प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची भिक्षा झाली होती त्या ठिकाणी पौ. शु. पंचमीला २५ डिसेंबर २००६ ला वासुदेव आश्रमाची स्थापना केली. आज त्याजागेवर भव्य असे दत्त नर्मदा मंदिर उभे आहे. जे सर्व साधकांसाठी एक श्रेष्ठ असे उपासना केंद्र आहे. काकांनी आपले संपूर्ण आयुष्य दत्तभक्तीचा प्रचार करण्यास समर्पित केले. जीवनात असंख्य यज्ञ संपन्न केले. प. पू. काकांचा ज्ञानपूर्वक कर्म करण्यावर विशेष भर होता. काकांनी आपल्या प्रत्येक भक्ताला वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करुन परमेश्वर प्राप्ती करण्याचा मार्ग दाखविला. प. पू. काका हे नैष्ठीक ब्रम्हचारी होते. प. पू. काकांचा आचार धर्मावर विशेष भर होता.
आचार प्रभवो धर्म: या उक्ती प्रमाणे प. पू. काकांचा कटाक्ष होता. आजही काकांनी आपल्या शिष्यांवर केलेले संस्कार आपल्याला वाशिमला वासुदेव आश्रमात पहावयास मिळतात. काकांनी आजिवन दत्त नर्मदा सेवा केली. काकांचे संपूर्ण आयुष्य हेच एक तप आहे. प. पू. पंडित काकांनी आपले शिष्योत्तम प्रिय अशा प. पू. विजय काका पोफळी यांना गुरुवार दि. १ नोव्हेंबर २००७ रोजी, अश्विन कृ. सप्तमी १९२९ (पूर्ण गुरुपूष्यामृत योग) गुरुपदी आरुढ केले. आपले उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले. आज प. पू. विजय काकांच्या रुपात प्रत्यक्ष काकाच कार्यरत आहेत याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. अशा थोर संत सद्गुरु श्री पंडित काका धनागरे महाराज यांनी माघ कृ. पंचमी शके १९३३ दि. १२ फेब्रुवारी २०१२ रोजी आपला देह ठेवला व काका दत्त चरणी लिन झाले.
काका माऊली आपली कृपाच हा एकच आधार मज पामराला आहे माझे सर्व अपराध पोटी घ्या आणि आपले कृपा छत्र सदैव आम्हा सर्वांसोबत असु द्या. आपल्या श्री चरणांची अखंड सेवा घडु द्या हेच मागणे मागतो.
प. पू. काका माऊली विजयते !!!
नर्मदे हर हर हर !!!!