जन्म: रत्नागिरी महाराष्ट्र येथे. सोमवार २१ नोव्हेंबर १८९८. कार्तिक शुद्ध नवमी कुष्मांड नवमी, दशग्रंथी ब्राम्हण कुटुंबात
आई/वडील: रुख्मिणी/विठ्ठल पंत.
गुरु: श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी.
कार्यकाळ: १८९८-१९६८.
वाङ्मय: गुरु लिलामृत, दत्तबावनि, श्री गुरुमुर्ती चरित्र, गुरुचरित्र गुजराती मध्ये, वासुदेव सप्तशती अनेक ग्रंथ संस्कृत मध्ये.
विशेष: नारेश्वर तीर्थ क्षेत्र वसवले, संपूर्ण गुजरात मध्ये दत्तसंप्रदायाचा प्रसार.
समाधी: १९ नोव्हेंबर १९६८, संवत २०२५च्या कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या मंगळवारी, दत्त चरणी हरिद्वारला देह ठेवला, अंत्येष्ठी व समाधी नारेश्वर येथे.
जन्म व बालपण
महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्र्वर तालुक्यात असलेल्या देवळे गावचे अबिगोत्रोत्पन्न पवित्र दशग्रंथी ब्राह्मण जयराम भट्ट यांचे तृतेय पुत्र विट्टलपंत वाळामे अणि त्यांच्या परमपत्नी रुक्मिणीबाई गुजराथमध्ये गोधरास्थित श्री विठ्ठल मंदिरात पुजारी म्हणून राहिले. या नवदांपत्याच्या घरी मिती कार्तिक शुद्ध नवमी, कुष्मांड नवमी संवत १९५५च्या सोमवारी ता. २१ नोव्हेंबर सन १८९८च्या पवित्र दिवशी प्रदोष समयी पंढरपूरचे स्वयं विठ्ठलनाथ भगवान पित्यास स्वप्नदृष्टांत देऊन प्रकट झाले आणि नवनाम धारण केले, पांडुरंग. हा दिवस सत्ययुगाच्या आरंभाचा दिवस होता. ते जन्मताच गोधऱ्यात पसरलेले भीषण अग्निकाण्ड शमून गेले. जगताच्या त्रिविधतापास शमविण्यासाठीच जणू या बालकाचा जन्म झाला, असे प्रकृतिमाता सुचवित होती.
श्रीमत् वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामी गुजरातेत दत्तभक्तीची गोडी निर्माण करून श्रीक्षेत्र गरुडेश्वरी ब्रह्मस्वरूपी लीन झाले. ही दत्तभक्तीची परंपरा त्यांचे शिष्य श्रीरंग अवधूत महाराजांनी वाढीला लावून गुजराती जनतेच्या ह्रदयात अढळ स्थान मिळविले. ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ भजनाने अवघा गुजरात घुमू लागला. दत्तभक्तीचा सुगंध जिकडेतिकडे दरवळू लागला. पैसा, मान, किर्ती यापलीकडे देखील एक आनंददायी विश्व आहे, याची जाण अधिकाधिक गुजराती जनतेला होऊ लागली.
त्या श्रीरंग अवधूत महाराजांचे पूर्वाश्रमींचे नाव पांडुरंग विठ्ठल वालामे. श्रीमहाराजांचे वडील विठ्ठलपंत हे धर्मपरायण, वेदपरायण व दशग्रंथी विद्वान् ब्राह्मण. गुजारातेतील गोधरा या शहरात श्री. सखारामपंत सरपोतदार यांच्या विठ्ठलमंदिरात देवपूजेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील ‘देवळे’ या गावाहून आले. विठ्ठल व रुक्मिणी या भाग्यशाली मातापित्यांच्या पोटी श्रीरंग अवधूत महाराज कार्तिक शुद्ध अष्टमीला गोपाष्टमीला जन्मले. (विक्रमसंवत १९५५)
बालपणापासूनच श्रीमहाराजांना जिज्ञासावृत्ती स्वस्थ बसू देईना, एकदा. दारावरून प्रेत चालले होते. वडिलांना त्यांनी अनेक प्रश्न विचारले. शेवटचा प्रश्न होता, ही जन्ममरणाची उपाधी दूर होण्यास उपाय कोणता? वडिलांनी सांगितले, श्रीरामनामामुळे उपाधी दूर होते. श्रीमहाराजांनी मनाशी खूणगाठ बांधिली. श्रीरंग अवधूत महाराज गुजरातील लिहितात ---
‘नाममंत्र मोटो छे जगमां, जगम-मरण भूत जाय;
मुक्ति सुंदरी दौडी आसे आकर्षण एवूं थाय !
हरिना नामनो सौथी मोरो छे आधार ।’
दिव्य, तेजस्वी अशा या योगभ्रष्ट आत्म्याला पूर्वजन्माची अपूर्व साधना पूर्ण करण्याची तीव्र तळमळ लागली; ईश्वराच्या भेटीची उत्कंठा साधनेच्या पायऱ्या भराभर चढू लागली. पांडूरंग ५ वर्षांचे व धाकटे नारायण २॥ वर्षांचे असतानाच माता रुक्मिणीबाईच्या पदरात ही दोन बालके टाकून विठ्ठलपंत प्लेगला बळी पडून विठ्ठलचरणी विलीन झाले. पांडुरंग ८ वर्षांचे झाले. देवळे गावी व्रतबंध झाला. उपनयनविधीनंतर श्रीनृसिंहवाडीला श्रीवासुदेवानंदसरस्वती महाराजांच्या दर्शनाला आले. श्रीटेंबेस्वामी म्हणाले, ‘हा बाळ तर आमचाच आहे.’ हे शब्द ऐकताच पांडुरंगांनी कपडयासकट श्रीचरणांवर मस्तक अर्पण केले. मार्ग स्पष्ट झाला. साधनेला धार चढू लागली.
‘धाव धाव दत्ता किती वाहूं आता । चैन नसे चित्ता येई वेगी ॥’ असे आर्त स्वर निघू लागले.
‘धेनु जेवीं वत्सा धाव दत्ता तैसा । तुजविण कैसा राहूं जगी? ॥’ म्हणून डोळ्यांतून प्रेमाश्रू येत.
आणि त्या करुणानिधान परमात्म्याला करुणा आली. कानी शब्द पडले. ‘पोथी पहा !’ मामांच्याकडे श्रीगुरुचरित्राची पोथी होती. त्याची अखंड पारायणे सुरू केली. मन शांत झाले.
श्रीरंग अवधूत महाराजांची बुद्धी तेजस्वी, स्मरणशक्ती तीव्र होती. मराठी, गुजराती, इंग्रजी, हिंदी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. पदरी लहान भाऊ, विधवा माता यांच्या पालन पोषणाची जबाबदारी होती. म्हणून बी. ए. ची परीक्षा दिली. काही काळ शिक्षकाची नोकरी पत्करली. पण मन रमेना. मूळची वृत्ती फकिरी.
तपोभूमी नारेश्वरकडे रवाना
धाकटा बंधू नारायण आता मातेचे पोषण करण्यास समर्थ झाला, हे पाहून रुक्मिणीमातेची आज्ञा घेऊन श्रीपांडुरंग आध्यात्मिक तपाकरिता घराबाहेर पडले.
तपसी छोड दिया संसार । जैसी सूकर विष्ठा भाई ।
तैसे भवसुख भुजमन आई । दत्त दिगंबर मन लुभाई ।
तपसी छोड दिया संसार ॥
वैराग्याने संतप्त झालेल्यांना शांत करणार्या नगाधिराज हिमालयाच्या कुशीत विसावण्याकरिता स्वारी विघाली. पण ईश्वरेच्छा बलीयसी ! कानांवर शब्द आले. ‘मागे फीर, मागे फीर.’ अर्थ कळेना. पण श्रीसदगुरुवासुदेवानंद सरस्वतींची इच्छाच ‘मागे फीर’ म्हणत होती. गुजरातेत अपूर्ण राहिलेले दत्तसंप्रदायाचे काम पूर्ण कर, हाच आदेश तो होता, आणि म्हणून साधक-मुमुक्षूंची माता नर्मदाबाई जिच्या दोन्ही तटांवर असंख्य तीर्थक्षेत्रे आहेत, अशा एका तीरी श्रीगणेशांनी जेथे श्रीशिवलिंग स्थापन केले आहे, अशा श्रीनारेश्वर क्षेत्री त्यांनी निवास केला.
एक साधू तपश्र्चर्या करण्यासाठी जागेच्या शोधात होता. त्यांस मार्गदर्शन करताना काही अधिकारी संतांनी सांगितले होते की, “बाळ, तू उपासनेसाठी नर्मदा किनारीच जागा शोधून काढ.”
तो साधू हिमालयात तपश्र्चर्येसाठी निघाला होता. तेव्हा त्याच्या कानात “मागे फिर, मागे फिर” असे शब्द ऐकू आले. ही आपल्या गुरूंचीच आज्ञा आहे. असे समजून तो मागे फिरला. हिमालयाच्या कुशीत गेला नाही.
त्यांना एकाने नर्मदा किनारी नारेश्र्वराची जागा सुचवली. दोन-तीन व्यक्ती त्यांचेबरोबर त्यावेळी होते. त्या साधूस ही जागा पसंत पडली. त्याने आपल्या बरोबरच्या मित्रांना सांगितले की, “आज रात्रभर मी येथे राहतो. तुम्ही तुमचे घरी जा. ही जागा मला पसंत पडल्यास मी येथे वास्तव्य करीन. तुम्ही उद्या या. मी उद्या तुम्हाला निश्र्चित सांगेन.”
त्याची मित्रमंडळी आपल्या घरी परत गेली. तो साधू तेथेच मुक्कामास राहीला.
सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने ती जागा भयानक होती. आजूबाजूच्या ८-१० गावांची स्मशानभूमी येथे होती. पिशाच्चांचे तेथे वास्तव्य होते. उंचच उंच वृक्षांतून सूर्यकिरणे क्वचितच दृष्टोत्पत्तीस पडत होती. रात्री तर भयंकर अंधार असायचा. उजेड नाही. खोली किंवा पर्णकुटी नाही. दिवसा ढवळ्यासुद्धा लोक येथे येण्यास धजत नसत. त्यांच्या असे लक्षात आले की, हिंस्त्र प्राणी, विंचू, इंगळ्या, पाणविंचू, मोर, सर्प इत्यादी तेथे राजरोस फिरत असावेत. या साधूने तेथे तशीच एक रात्र काढली. रात्री त्याला शंख फुंकण्याचे आवाज तेथे ऐकू आले. डमरूचे डम डम आवाज ऐकू आले. सुमधूर गायनाचा गंधर्वांचा कार्यक्रम चालू असून, त्यांचा उल्हसित करणारा आवाज, त्यांच्या कानावर ऐकू आला. साप-मुंगूस, मोर व साप हे जन्मजात शत्रू असलेले प्राणी तेथे गुण्यागोविंदाने एकत्र आनंदाने खेळत असलेले त्याला दिसले. मंदिरातील घंटेचे आवाज त्यास स्पष्ट ऐकू येत होते. वरील सर्व गोष्टींचा विचार करून देखील त्या साधूने ठरविले की, आपण याच जागेवर तपश्चर्या करायची. येथेच उपासना, अनुष्ठान करायचे. दुसरे दिवशी त्याचे मित्र नारेश्वरी आले. त्यांना त्या साधूने सांगितले की, “मला ही जागा पसंत आहे. तपश्र्चर्येसाठी येथेच वास्तव्य करण्याचा माझा विचार आहे”.
विक्रम संवत १९८१ च्या मार्गशीर्ष महिन्याच्या हेमंत ऋतूचे दिवस, कडाक्याची थंडी, कृष्णपक्षाची अंधारी रात्र, अशा वेळी मियागामकडून कोरलकडे जाणाऱ्या गाडीतून मालोद स्टेशनवर (हल्लीचे नारेश्वर रोड) श्रीमहाराज उतरले. नारेश्वर हिमालयाची वाट चालू लागले. नारेश्वर शिवालयाचे समोर कडूनिंबाच्या झाडाखाली थांबले. नजर टाकली. काय होते तेथे? जेथे आज हजारो लोक उत्तम धर्मशाळेत राहतात, भोजनगृहात भोजत घेतात, नर्मदामाईच्या घाटावर स्नान करितात, रात्री विद्युतदीपांनी आसमंत उजळून जातो, अशा आजच्या नारेश्वरी ४५ वर्षांपूर्वी होते एक निबिड अरण्य ! जेथे दिवसा लोक जावयास भीत, ते होते आजूबाजूच्या गावांचे स्मशान ! मोठमोठी वारूळे, विषारी सर्प, विंचू , हिंस्र पशू यांचा वास असे ! नर्मदामाईच्या किनाऱ्यावर जावयास साधी पायवाट्देखील नव्हती. अशा निवासाचा लोभ त्यांना जडला.
नियमितता, प्रामाणिकता आणि तेजस्विपणाच्या प्रखर लखलखाटामुळे महात्मा गांधी आणि काका कालेककरांसारख्या अनेक महानुभवांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले. वारंवर स्वास्थ्य बिघडत असतानाही लोकसंग्रहार्थ जीवन समर्पित करण्यासाठी २०व्या वर्षी गृहत्याग केला. साधनेसाठी एकांत स्थळाच्या शोधात निघाले. मार्गात तीन संतांचा संपर्क झाला. त्यांनी नर्मदाकिनारी स्थिर होण्याचा आदेश दिला आणि १९२५ च्या डिसेंबर महिन्यात संवत १९८२च्या मार्गशीर्ष वद्य चतुर्थीस ब्रह्मचारी पांडुरंगानी (बापजी) नारेश्र्वरात आसन स्थिर केले. नारेश्र्वराच्या निबिड जंगलात जेथे हिंसक पशूंचे भय आणि पिशाच्चयोनीचा त्रास होता, तेथे साधना काळाच्या प्रारंभी अनेक अडचणी सहन करून नर्मदातीरी मांडी ठोकून भूमी हलवून टाकली आणि सात गावांच्या स्मशानास नंदनवनाप्रमाणे सिद्ध तपोभूमीत रूपांतरित केले. ज्या निंबवृक्षाखाली चाळीस वर्षापर्यंत रक्ताचे पाणी करून तपश्र्चर्या केली आणि उघड्या डोळ्यांनी भगवान श्री दत्तात्रेयांचा साक्षात्कार प्राप्त केला, त्या निंबाने स्वत:चा कडूपणा सोडून तो मधुर झाला आणि खाली झुकून त्याने जमिनीला स्पर्श केला. परमपूज्य श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराजांनी केलेल्या स्वप्नादेशानुसार दत्तपुराणाच्या १०८ पारायणांचे अनुष्ठान पूर्ण करून त्यांच्या उद्यापन रूपाने १०८ दिवसांत पायी श्रीनर्मदामैय्याची परिक्रमा केली. गृहत्यागानंतर अवधूतजींनी (बापाजी) कधीही द्रव्यास स्पर्श केला नाही आणि चुकूनसुद्धा जर कोणी त्यांच्यासमोर पैसे ठेवले तर ते स्वत: उपवास करीत. कधीही भाषण प्रवचन न करणे, प्रचार न करणे आणि देवाचे कार्य देवच करतो, “श्र्वासे श्र्वासे दत्तनाम स्मरात्मन् न मातु: परदैवतम् भक्तीर्दम्भी विना भावम् परस्परदेवो भवम्” सारख्या अनेक उच्च सिद्धांतांना जीवनात उतरवून दाखविले. स्वत: उच्च कोटीचे सिद्ध संत असूनही स्वत:च्या आईच्या आज्ञेशिवाय पाऊल उचलत नसत, मातेच्या स्मृतिप्रीत्यर्थ नारेश्र्वरात मातृस्मृतिशैल स्मारकाची रचना केली. गुजराथमध्ये दुसरे मातृतीर्थ उभे केले.
श्री रंग अवधूत स्वामींचे कार्य
अवधूतजींनी नारेश्र्वर आश्रम संपूर्णपणे वैदिक परंपरेचा ठेवला आणि निष्कामभक्तीचा मूक प्रचार केला. अनेक नास्तिकांना आस्तिक केले, कित्येकांची घरे केली, कित्येकांची घरे भंगताना वाचविली, कित्येकांना आधिव्याधि उपाधीमधून मुक्त केले, कित्येक आंधळ्यांचे डोळे आणि पंगूंची काठी झाले, कित्येकांची व्यसने सोडविली, कित्येकांना आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर आरूढ केले. जिज्ञासू भक्तांचे पथदर्शक झाले. कित्येकांना दृष्टिमात्राने ज्ञानाची दिशा दिली, कित्येकांची जीवने सुधारलेली, कित्येकांचे मरण सुधारले, कित्येकांना असाध्य जीवघेण्या रोगांमधून वाचवून जीवनदान दिले. अनेक स्त्रियांना संतानप्राप्ती करवून वांझपणाच्या टोमण्यातून वाचविले. त्यांची प्रेरणा आणि आशीर्वादाने कित्येक डॉक्टर, इंजीनिअर, प्राध्यापकांनी अनेक सिद्धींचे सोपान सर केले. राजा किंवा रंक, अबुद्ध किंवा ज्ञानी सर्वांनाच त्यांनी भक्तीच्या रंगाने रंगविले. अवधूतजींचे उपास्य दैवत भगवान दत्तात्रेयांची लीला ग्रथित करणारा १९००५ दोह्यांचा एक महाकाव्यासारखा वरद आणि औपासनिक ग्रंथ श्रीगुरुलीलामृताची रचना करून आपल्याला मृत तत्त्वातून अमृत तत्त्वाकडे जाण्याची उपासना दिली आणि प्रत्यक्ष जीवन जगण्याची कला शिकविली. या महान पवित्र ग्रंथाचे पाठ पारायण नियमितपणे करून अनेक लोक स्वत:चे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण साधत आहेत.
अवधूतजी संस्कृतचे प्रकांड पंडित होते. त्यांनी अनेक देवदेवींच्या प्रार्थनेची स्तोत्रे आणि संकीर्तने संस्कृतात रचली जी ‘रंगहृदयम्’ नावाने ग्रंथस्थ झाली. त्यांचे अनेक साहित्य प्रसिद्ध झाले. त्यांच्या साहित्यात वेदान्ताचे तत्त्वज्ञान भरपूर भरलेले असूनही सामान्य मनुष्य या साहित्याचा आनंद घेऊ शकेल अशी अद्भुत सरलता त्यात आहे.
संवत १९९१च्या माद्य शुद्ध प्रतिपदेस सोमवारी ता. ४/२/१९३५ रोजी उत्तर गुजरातच्या कलोल तालुक्याच्या सईज गावी स्मशानाजवळील सिद्धनाथ महादेवांच्या मंदिरात श्री. कमलाशंकर त्रिपाठी नावाच्या एका भक्ताच्या धर्मपत्नी सौ. धनलक्ष्मीबाईना पिशाचपीडेतून मुक्त करण्याच्या अवधूतजींनी ५२ ओळींची जी स्तुती रचली तीच आपली श्रीदत्तबावनी. खरोखर तर सौ. धनलक्ष्मीबाई निमित्त करून अवधूतजींनी समस्त मानवजातीवर अहुतकी कृपा वर्षाविली आहे आणि आपल्याला हे अमोघ संकटविमोचनस्तोत्र प्राप्त झाले जे आज श्रीरंगपरिवारात आधि-व्याधि-उपाधीच्या निवारणासाठी दत्तबावनी निश्र्चितपणे फलदायी स्तोत्र ठरले आहे.
अवधूतजींनी उत्सव साजरे करण्यास नवी दिशा दिली. स्वकष्टार्जिताचा आनंद कसा असतो त्याचा अनुभव करविला. स्वत:च्या तन, मन, धनास देवचरणी स्वेच्छेने समर्पित करून कोणासमोरही हात पसरल्याशिवाय मानवमेळे भरण्याच्या त्यांच्या शक्तीस राष्ट्रकवि झवेरचंद्र मेघाणीनीसुद्धा गौरविले. पैसा आणि प्रसादाचा संबंध तोडला. श्रीमंतांचे स्वागत झाले पाहिजे पण पैशाच्या लालचीने खुशामत होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन जेथे कुठे मुक्काम कराल तेथे समोरच्याचा विचार करून तो ज्या स्थितीत ठेवेल, त्या स्थितीस अनुकूल होऊन रहा, या नियमाप्रमाणे सर्वांबरोबर व्यवहार केला. राजाच्या महालाच्या साहेबीत जो आनंद तोच आनंद गरिबाच्या झोपडीतसुद्धा खरा असे स्वत: जगून समजावून दिले. पूज्य श्री रंगावधूत गुरुमहाराज म्हणजे परब्रह्माचे मूर्त स्वरूप. श्रोत्रिय, ब्रह्मानिष्ठा, शांत, सच्चिदानंदमग्न असूनही सामान्य मानवाबरोबर सामान्यासारखे होऊन राहिले.
जीर्ण शिवालयासमोरील निंबवृक्षाखालची भूमी हेच निवासस्थान! अनुष्ठानाला सुरुवात झाली. खाण्यापिण्याची काळजी त्या भगवंताला “तन की सुधि न जिसको, जनकी कहाँसे प्यारे?” परमसदगुरु श्रीवासुदेवानंदसरस्वती महाराजांच्या ‘श्रीदत्तपुराणाची’ अष्टोत्तरशत पारायणे पूर्ण झाली. उद्यापनास द्रव्य नाही. सद्गुरुची आज्ञा झाली, १०८ दिवसांत नर्मदा-प्रदक्षिणा पुरी कर, म्हणजे तप:प्रधान उद्यापन होईल.
नर्मदाप्रदक्षिणेचा निश्चय ठरला. पण कानांत शब्द घुमू लागले, ‘ब्रह्मचारी, तू दक्षिणेकडे जा.’ गुरुमहाराजांची आज्ञा मानून चालू लागले. इकडे श्रीवासुदेवानंदसरस्वतींचे मराठी चरित्र ‘गुरूमूर्तिचरित्र’ गुजराती शिष्य श्री गांडामहाराज यांनी लिहिले होते. त्यांना सांगितले. ‘तू काळजी करू नको; एक ब्रह्मचारी तुझ्याकडे येत आहे.’ दोघांना अंतरीची ओळरव पटली. मराठी प्रत शुद्ध करण्याचे काम अंगावर घेतले. बारा ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर येथून नर्मदा प्रदक्षिणेस सुरुवात झाली. रोज २५-३० मैल चाल होत असे. एकदा तर एका दिवसात ५६ मैल चालून गेले. ‘तेरो नाम ही गावत जाऊं, धाऊं रूप विशाल; कानोंमे तेरी ही चर्चा, और न शब्द विचार! मुर्दा बन के फिरूं जगतमें, सार खराब निहार! निर्विकार सदा नि:संगी, डरूँ न देखत काल!’ कशाची भिती, कशाची पर्वा, ना तहान, ना भूक! गूळपाणी हाच पोटाला आधार! बरोबरीचे लोक म्हणत. महाराज, कशाला हा कष्टप्रद प्रवास करता आहात? महाराज म्हणत, मला तर कष्ट वाटतच नाहीत; जिकडे तिकडे आनंदच आनंद भरून राहिलेला दिसतो. नर्मदाप्रदक्षिणा म्हणजे दिव्यच आहे. एकदा बरोबरीच्या लोकांबरोबर चालले असताना लोक म्हणाले, ‘महाराज अस्वल आले.’ लोक घाबरले. महाराजांनी ‘गुरुदेव दत्त’ ही आरोळी ठोकल्याबरोबर अस्वल उडया मारीत निघून गेले.
पूर्वसंकल्पित श्रीगुरुआज्ञेप्रमाणे १०८ व्या दिवशी नर्मदाप्रदक्षिणा पूर्ण करून उद्यापनाची सांगती केली. यानंतर पूर्वी ठरल्याप्रमाणे श्रीगांडामहाराजांनी लिहिलेला ‘श्रीगुरुमूर्तिचरित्र ग्रंथ’ संशोधन करून भडोच शहरी छापला, आणि तेथेच १०८ श्लोक असलेले ‘वासुदेवनामसुधा’ हे श्रीटेंबेस्वामींचे जीवनचरित्र संक्षिप्त रूपाने लिहिले. नारेश्वरी श्रीमहाराजांचा कीर्तिसुगंध दरवळू लागला. आर्त, मुमुक्षू यांची रीघ लागली. जंगलचे मंगल झाले. श्रीदत्तजयंतीकरिता हजारो लोक येऊ लागले. पण नारेश्वराला खरे महत्त्व प्राप्त झाले ते श्रीरंग अवधूत महाराजांच्या पूज्य मातोश्रींच्या करिता ! संवत् १९९२ मध्ये पू. मातोश्री नारेश्वरी राहण्यास आल्या. धाकटे बंधू नारायणराव हेही आजारी अवस्थेत नारेश्वरी आले. परंतु प्रभूची इच्छा निराळीच होती. नारायणरावांचा नश्वरदेह श्रीदत्तचरणी विलीन झाला.
नारेश्वरी दत्तकुटी तयार झाल्यावर बरेच आश्रम, धर्मशाळा बांधून तयार झाल्या. महाराजांचे गुजराती भक्त त्यांना राजैश्वर्यात ठेवत होते. पण महाराजांची वृत्ती अत्यंत विरागी ! फक्त एक लंगोट हेच वस्त्र. द्रव्यस्पर्श सहन होत नसे.
प्रतिवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमा-गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुद्वादशी, गुरुप्रतिपदा, दत्तययंती तर फारच थाटात होत असे. पुढे पुढे दरवर्षी महाराज एरवाद्या गावी जाऊन तेथे दत्तजयंती साजरी करीत. यामुळे अनेक गावांतील लोकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळे. कार्तिक शुद्ध नवमी (कूष्मांडनवमी) हा महाराजांचा जन्मदिवस. रंगजयंती या नावाने गुजरातमध्ये हा दिवस प्रसिद्ध आहे. दरवर्षी निरनिराळ्या गावी हा होत असतो. डाकोर, द्वारका व नारेश्वर येथील ६० वी रंगजयंती तर फारच थाटाची झाली. ह्जारो भक्त या रंगजयंतीत सामील होत. मोठया प्रमाणावर अन्नदान होते. महाराजांना फुलांचे निरनिराळे पोषाख करून घालणे हा तर गुजराती भक्तांचा आवडता छंद ! श्रीकृष्णाकडे जसे व्रजवासी आकर्षित होतात. तसे सर्व गुर्जर बंधु-भगिनी श्रीमहाराजांकडे आकर्षित होत असत. महाराज कधी प्रवचन करीत नसत. अनेक वेळा तर त्यांचे मौनच असे. पण सहज बोलता बोलता भक्तांना मार्गदर्शन होई,
महाराजांचा तीर्थक्षेत्री प्रवास
महाराजांच्या मातोश्रींची तब्येत बरी नसे. अनेक भक्त प्रवासासाठी त्यांना विचारत. आमच्या गावी या, हा लकडा लागे. पण ‘मातृदेवो भव’ हा भाव मनी असल्यामुळे आईची परवानगी घेतल्याखेरीज ते कोठेही जात नसत.
महाराजांनी काही गुजराती भक्तांबरोबर १९५० साली गाणगापूर, नृसिंहवाडी. औदुंबर, पंढरपूर, अक्कलकोट वगैरे तीर्थक्षेत्री यात्रा केली. यानंतर त्यांनी तर माणगावी श्रीटेंबेस्वामींच्या जन्मग्रामी मोठया प्रमाणात श्रीदत्तजयंती साजरी केली. श्रीटेंबेस्वामींच्या समाधिस्थानी-गरुडेश्वरी-तर दर आषाढ शुद्ध प्रतिपदेला उत्सवासाठी ते जात. श्रीमहाराज ज्या दिवशी हरिद्वारला समाधिस्थ झाले. त्याच दिवशी पहाटे गरुडेश्वरी सदगुरूच्या समाधीच्या दर्शनासाठी आलेले तेथील एका सेवकाने पाहिले. श्रीमहाराज भक्तांची कामना पूर्ण करण्यासाठी गुजरातेतील अनेक गावी जात. मुंबईला १९६५ साली मोठा दत्तयाग माधवबागेत झाला, त्यावेळेस ते तेथेच उपस्थित होते. १९६७ साली श्रीमहाराज आफ्रिकेतील भक्तांच्याकरिता नैरोबी, कंपाला या ठिकाणी ४-६ महिने जाऊन आले.
संवत २०२३च्या ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध एकादशीस त्यांच्या मातोश्री ब्रह्मलीन झाल्या म्हणजे अगदी मुक्त झाल्या. १९६७मध्ये आफ्रिकेच्या प्रवासास जाऊन एका भक्ताची इच्छा पूर्ण केली. भक्तांना दिलेली वचने पूर्ण करीत करीत कपडवंजहून जयपूरला आले. जयपूरमध्ये ७१व्या रंगजयंतीच्या वेळी आशीर्वादात्मक श्लोक रचून सर्वांचे कल्याण इच्छिले. त्यांच्या प्रवचनात जपयोगपरायण व्हावयास सांगितले. ज्यायोगे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होता येईल. जयपूरहून हरिद्वारला आले. गंगाकिनारी आर्यानिवासात मुक्काम केला. संवत २०२५च्या कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या मंगळवारी म्हणजे ता. १९/११/१९६८ रोजी पूज्य अवधूतजींनी देहलीला आवरती घेतली आणि ॐ ॐ ॐ असा तीनवेळा उच्चार करून ब्रह्मलीन झाले. त्यांच्या पार्थिव देहास नारेश्र्वरला आणण्यात आले आणि मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया ता. २१ नोव्हेंबर १९६८ रोजी गुरुवारी रात्री अंत्येष्टि संस्कार झाले. योगानुयोगाने ती त्यांची जन्मतारीख होती. त्याच स्थळी श्रीरंगमंदिर निर्माण झाले.
केवळ लोकसंग्रहार्थच ज्यांना प्रादुर्भाव आहे अशा पूज्य श्रीरंगावधूतजींनी दोन महत्त्वाची सूत्रे दिली.
१) श्र्वासे श्र्वासे दत्तनाम स्मरात्मन्
२) परस्परदेवो भव:।
आजच्या संघर्षयुगात विश्र्वशांतीचा एकमेव उपाय जर काही असेल तर तो परस्परदेवो भव आहे. एकमेकांकडे देवदृष्टीने पाहिल्यावर हे नर्कागारासारखे जगत एक दिवशी नंदनवन बनून जाईल असे त्यांचे अमोघ आशीर्वाद आहेत.
महाराजांची ग्रंथ संपदा
महाराजांनी गुजराती, मराठी व हिंदी भाषांत विपुल साहित्य निर्माण केले. मराठीत गुरुचरित्रग्रंथ आहे. त्याचप्रमाणे गुजरातीत त्यांनी ‘गुरुलीलामृत’ ग्रंथ लिहिला. यामध्ये श्रीगुरुचरित्र, (सरस्वती गंगाधर) श्रीगुरुमूर्तिचरित्र, (गांडामहाराज) यांचा समावेश आहे. हा ग्रंथ ज्ञान, कर्म व उपासनाकांड या तीन भागांत आहे. गुजराती भक्त याची अखंड पारायणे करतात. दत्तबावनी-श्रीगुरुचरित्राची ५२ श्लोकांची ही गुजराती दत्तबावनी फक्त तीन मिनिटांत म्हणून होते. लाखो गुजराती भक्त दररोज ही दत्तबावनी म्हणतात. एका भक्ताचे संकट निवारण्यासाठी श्रीमहाराजांनी ही द्त्तबावनी लिहिली. भक्ताचे संकट दूर झाले व तीच दत्तबावनी संकटकालात लाखो श्रद्धावान् भक्तांचा आज आधार बनली आहे. या दत्तबावनीच्या जोरावर भक्तांमध्ये अपूर्व आत्मविश्वास निर्माण होऊन कोणत्याही संकटातून पार पाडण्याचे सामर्थ्य अंगी येते. जेथे जेथे गुजराती दत्तभक्त आहेत तेथे तेथे दत्तबावनी आहेच. महाराजांनी अनेक गुजराती भजने प्रासादिक भाषेत लिहिली आहेत. हजारो भक्त दररोज ती म्हणतात. अवधूती आनंद, अवधूती मस्ती, ग्राम अवधूत, ऊभो अवधूत, बेठो अवधूत त्याचप्रमाणे हिंदी अवधूती मौज हे भजनांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. दत्तनामसंकीर्तन, श्रीदत्तपंचपदी, उष:प्रार्थना; या छोटया पुस्तिका नित्य उपासनेसाठी आहेत. उपनिषदोनीवातो, पत्रगीता, संगीतगीता, आत्मचिंतन, दत्तउपासना, अबुध अवधूत, नित्यस्तवन, अष्टगरबी, डाकोरमाहात्म्य, हालरडा वगैरे पुस्तके प्रसिद्ध आहेत.
महाराजांनी मराठीत श्रीवासुदेवसप्तशती ही ७०० श्लोकांची पोथी लिहिली आहे. रंगतरंग हे भजनाचे पुस्तक आहे. अभंग तर अत्यंत रसाळ आहेत. आर्त भाव व्यक्त होतो, देवापाशी मागणे हेच की,
‘न मिळो अन्न, वस्त्र प्रावरण । परि दत्त जाण अंतरीं ना ॥ कवडीमोल धन होवो नि:संतान । न राहो निशान कोण रडे ॥ हेंचि मागो देवा दे गा संतसेवा । अंतरीं केशवा ठाण देईं ॥’
संस्कृत भाषेत त्यांनी अनेक स्तोत्रे लिहिली आहेत. रंगह्रदयम् या सुप्रसिद्ध ग्रंथात त्यांनी अनेक स्तोत्रे लिहिली आहेत. श्रीवासुदेवनामसुधा, दत्तनामसंकीर्तन, सद्बोधशतकम्, बोधमालिका, दत्तनामस्मरणम्, स्तोत्रषट्कम् वगैरे पुस्तके संस्कृतमध्ये आहेत.
श्रीमहाराजांनी काळाची पावले ओळरवून अनेक लोकोपयोगी कार्यक्रम नोरश्वरी घडवून आणले. त्यांपैकी एक म्हणजे १९६५ साली पाकिस्तानशी युद्ध सुरू झाल्यावर रायफल क्लब चालू करून एक शिबीर भरविले. दुसरे शिबीर म्हणजे. शस्त्रक्रिया-शिबीर. गुजरातमधील नामांकित शस्त्रवैद्यांकडून गोरगरीबांच्या अनेक शस्त्रक्रिया मोफत करविल्या.
मातोश्रींच्या प्रकृतीला आराम पडेना, अनेक उपाय झाले. ‘न मातु: परदैवतम्’ म्हणून अनेक प्रकारे त्यांनी सेवा केली. आईसाठी म्हणून श्रीमहाराज नारेश्वरपासून फारसे दूर कधी गेलेच नाहीत. अखेर निर्जळा एकादशीच्या दिवशी पू. मातोश्री श्रीविठ्ठलचरणी लीन झाल्या. महाराजांनी सर्व विधी यथासांग केले.
यानंतर भक्तांच्या इच्छेप्रमाणे आफ्रिकेला जाऊन परत आल्यानंतर त्यांनी मातोश्रींचे प्रथम वर्षश्राद्ध केले. पू. मातोश्रींच्या मुळे गुजरातला श्रीरंगअवधूत महाराजांचा लाभ झाला. म्हणून पू. मातोश्रींना भक्त फार मान देत, प्रथम वर्षश्राद्धदिनी २०-२५ हजार भक्तांनी महाप्रसाद घेतला.
श्री रंग अवधूत स्वामींचे निर्वाण
श्रीमहाराजांचे सर्व लौकिक पाश तुटले. ‘हम सदा नि:संगी हैं’ म्हणणारे महाराज निर्वाणीची भाषा काढू लागले. १९६८ मधील ऑक्टोबर महिन्यात त्यांनी नारेश्वर सोडले ते कायमचेच. हरिद्वारला जावयाचे म्हणून महाराज निघाले.
अवधूतआश्रमाचे ट्रस्टी श्री. मोदीकाका, एक महान् भक्त, कार्यरत सेवक यांना काय कल्पना की, महाराजांचा पार्थिव देह येथे नोव्हेंबरमध्ये परत येणार आहे. नारेश्वर सोडताना महाराज म्हणाले, मी नारेश्वरी आलो तेव्हा एक लंगोटी अंगावर होती. आता जातानाही फक्त लंगोटी अंगावर आहे. सर्व वैभव, राजविलासी ऐश्वर्य सोडून ममत्व न ठेवता महाराज निघाले अनंतात विलीन व्हावयाला ! नारेश्वरनंतर अनेक गावी भक्तांना दर्शन देत देत गुरुद्वादशीला ते अरेरा गावी आले. नडियादजवळ हे गाव आहे. नंतर कापडगंज वगैरे गुजरातेतील गावांनंतर जयपूरला आले. एक भक्त म्हणाला, मी हरिद्वारला तुमच्याबरोबर येतो. महाराज म्हणाले, हरीच्या दारी गेलेला परत येत नाही. यावयाचे असेल तर या ! हरिद्वारला फक्त ४-५ भक्त बरोबर होते. सर्व तीर्थे बघितली. सकाळी साधूंना भोजन दिले. १९ नोव्हेबर, मंगळवारी १९६८ ला रात्री ९ वाजता भक्तांना सांगितले, घशात काहीतरी होत आहे. भक्त मंडळींना कल्पना येण्याच्या आधीच श्रीमहाराज श्रीदत्तचरणी विलीन झाले. लाखो भक्तांचा लाडका संत समाधिस्थ झाला. बडोदा, अहमदाबाद, नारेश्वरला ट्रंक लागले. त्याच दिवशी दिल्ली, अहमदाबाद, बडोदा रेडिओने बातमी दिली. अवघा गुजरात ढसढसा रडावयास लागला. रात्रभर भक्तांना चैन पडेना. श्रीमहाराजांचे अंतिम दर्शन कसे व्हावयाचे याची चिंता लागून राहिली. हरिद्वार शेकडो मैल दूर ! ट्रस्टींनी ठरविले की, महाराजांचा पार्थिव देह नारेश्वरी आणावयाचा ! काही मंडळी हरिद्वारला विमानाने गेली. दिल्लीहून अहमदाबादपर्यंत विमानाने आणले व अहमदाबाद ते नारेश्वर शृंगारलेल्या ट्रकवर आणून लाखो भक्तांना दर्शन दिले. अहमदाबाद, बडोदा, सुरत, नडियात, आणंद कडून दिवसभर २५ हजार भक्त आले. रात्री १२ ला नर्मदामाईच्या स्नानानंतर चंदनकाष्ठावर देह ठेवून अग्निसंस्कार केला. कडक थंडी, पण भक्तांचा महापूर लोटला होता. भक्तांना अंतिम दर्शन मिळाले. १२-१३ दिवसांपर्यंत लाखो भक्त नारेश्वरी य़ेऊन श्रद्धांजली वाहून गेले.
श्रीमहाराजांच्या प्रथम वर्षश्राद्धदिनी भक्तांनी सुंदर मंदिर बांधले आहे. मातृमंदिरासमोरच मातृभक्त पुत्राचे मंदीर ! श्रीमहाराज लौकिक अर्थाने समाधिस्थ झाले. पण भक्तांच्या ह्रदयात ते आहेत.
हजारो गुजराती बांधवांच्या तोंडी रंग अवधूत खालील धूनेच्या स्वरूपात आहेत.
रंग अवधूत रे. रंग अवधूत रे ॥
नारेश्वरनो नाथ मारो रंग अवधूत रे ॥
गाणगापूरमां वसे मारा नरसिंह सरस्वती रे ।
अक्कलकोटमां वसे मारा स्वामी श्रीसमर्थ रे ॥
गरुडेश्चरमां वसे मारा वासुदेवानंद रे ।
शिरडीमां वसे मारा साईनाथबाबा रे ॥
रंग अवधूत रे, रंग अवधूत रे ।
नारेश्वरनो नाथ रंग अवधूत रे ॥
प.पू. रंग अवधूत महाराज एक संस्मरणीय आठवण
प. पू. रंग अवधूत महाराज हे क्रांतीकारी संत होते. ते मूळचे कोकणातले. परंतु गुजरातमध्ये “प. पू. रंग अवधूत महाराज” म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचे कार्यक्षेत्र गुजरात राज्य होते. त्यांची एक लहानपणाची आठवण खूपच संस्मरणीय आहे. पांडुरंग मॅट्रीकमध्ये शिकत होता. त्याची व वर्गातील इतर विद्यार्थ्याची तोंडी परीक्षा सुरू झाली. पांडुरंग निर्भय व धाडसी होता.
रॉबर्टसन हा युरोपियन साहेब तोंडी परीक्षा घेत होता. पांडुरंगाचा नंबर आला. तो शांत चित्ताने साहेबासमोर जाऊन उभा राहिला. रॉबर्टसन साहेबांनी त्यांच्या शरीरावर चौफेर नजर फिरवली. डोक्यावरील सर्व केस काढलेले, डोक्यावर शेंडी, कपाळावर गंध, तेज:पुंज डोळे, शरीरावरील कांती, भारतीय वस्त्रे नेसलेला पाहून साहेबांना खूपच आनंद वाटला. साहेबांनी आतापर्यंत बऱ्याच मुलांच्या तोंडी परीक्षा घेतल्या होत्या. पण ह्या तेज:पुंज मुलाला पाहून तो आनंदीत झाला. साहेबांचे व पांडुरंगाचे प्रश्न व उत्तरे खालीलप्रमाणे झाली. त्यांचे संभाषण इंग्रजी भाषेतून झाले.
रॉबर्टसन : तू ब्राह्मण आहेस?
पांडुरंग : होय साहेब.
रॉबर्टसन : तू गळ्यात जानवे का घालतोस? रॉबर्टसनच्या नजरेस नजर भिडवून स्मित हास्य करून पांडुरंगाने साहेबांस विचारले.
पांडुरंग : आपल्या प्रश्नाचे उत्तर मी प्रश्न विचारून आपणास दिले तर चालेल काय?
रॉबर्टसन : होय, तुझ्या इच्छेप्रमाणे तू उत्तर दे.
पांडुरंग : सर, आपण कॉलरवर टाय का घालता?
रॉबर्टसन : आमच्या ख्रिश्चन धर्माचे हे चिन्ह आहे.
पांडुरंग : तर साहेब, जानवे हे आमच्या हिंदू धर्माचे, ब्राह्मण धर्माचे चिन्ह आहे.
रॉबर्टसन : ऐक. तू जर गळ्यात जानवे घातले नाही, तर तुझे ब्राह्मणत्व नष्ट होईल का?
पांडुरंग : साहेब, तुम्ही जर कॉलर टॉय घातले नाही, तर तुम्ही ख्रिश्चन धर्माचे नाही असे होईल का?
रॉबर्टसन : नाही. कॉलर व टॉय घातल्याने मी ख्रिश्चन धर्माचा आहे, याची मला आठवण राहते. आमच्या धर्मात जे निषिद्ध म्हणून सांगितले आहे, ते न करण्याची व चांगले जीवन जगण्याची मला प्रेरणा मिळते.
पांडुरंग : बरोबर, त्याचप्रमाणे जानवे मला आठवण करून देते की मी ब्राह्मण आहे आणि उत्तम ब्राह्मणासारखे जीवन जगण्याची ते मला प्रेरणा देते.
रॉबर्टसन : तू डोक्यावरचे सर्व केस का काढले आहेस? चमनगोटा का केलास? डोक्यावर शेंडी का ठेवली आहे?
पांडुरंग : साहेब, आमचा देश गरीब आहे. मी केलेली हजामत एक आण्यात होते. आपल्याप्रमाणे केस कापल्यास चार आणे लागतात. आम्ही चार आणे कोठून आणायचे?
रॉबर्टसन : डोक्यावरचा चमनगोटा केल्याने, सर्व केस वस्तऱ्याने काढून टाकल्याने दुसरा काही फायदा होतो काय?
पांडुरंग : होय साहेब, डोक्यावरचे सर्व केस काढल्याने डोके शांत, हलके व थंड होते. मनात चांगले विचार निर्माण होतात.
रॉबर्टसन : बरोबर.
पांडुरंग : साहेब, तुम्ही माझ्याप्रमाणे केस कापून पाहा. डोके किती शांत, थंड राहते याचा अनुभव घेऊन पहा. आपले डोके शांत न राहिल्यास, तुम्ही मला नापास करा.
रॉबर्टसन साहेबांना खूप हसू आले. पांडुरंगाचे साहस, धाडस, हिम्मत, धार्मिकता व निर्भिडपणा पाहून त्यांना खूपच आनंद वाटला.
रॉबर्टसन : जा. तू परीक्षेत पहिल्या नंबरने पास झालाय.
पांडुरंगाने रॉबर्टसन साहेबांना नमस्कार केला व तो परीक्षेच्या हॉलमधून बाहेर पडला. वरील प्रश्नोत्तरावरून असे दिसून येते की आत्मश्रद्धा, प्रभुपरायणता व सत्य इत्यादी हे सद्गुण पांडुरंगाचे अंत:करणात मुळापासूनच पूर्णत्वाने वसत होते.
अवधूतवृत्ती
अवधूतवृत्ती प्राप्त होणे ही बाब अतिशय कठीण आहे. ही वृत्ती धारण करणाऱ्यास कोणतीही आसक्ती नसते, आशा नसतात. हे हवे, हे नको ही वृत्ती नष्ट झालेली असते. सदा सर्वकाळ तो निर्मळ असतो. नेहमी आनंदात समाधानी असतो.
प. पू. रंग अवधूत महाराज यांची अवधूत वाणी
“शुद्ध भाव असलेल्या भक्ताने या अवधूताबरोबर पाच मिनिटे जरी चर्चेत घालवली असतील, त्याला परमेश्र्वर कधीच विसरणार नाही. बाकी अवधूत हा एक पत्थर आहे. तुमची जर या अवधूतावर खरी निष्ठा असेल तर, या पत्थरात देवत्व प्रगटेल. मोठ्या भीतीपासून भक्तांचे रक्षण होईल. निर्मळ दृष्टी प्राप्त होईल. यांबद्दल बिलकूल शंका घेऊ नका.”
अवधूत समस्या
“अवधूत निरामय आहे. निष्पाप आहे. निर्विकार आहे. अज आहे. अक्षर आहे. अविचल आहे. खरोखरच अवधूतांचे दर्शनाने, स्मरणाने जन्ममरणाचे फेरे चुकतात. धन्य आहेत ते भक्त ज्यांना अशा अवधूतांचे आशीर्वाद लाभले. अवधूताचेच स्मरण, अवधूताचेच मनन, अवधूतांचेच चिंतन, अवधूतांचेच स्नान, अवधूतांचेच ध्यान, अवधूतांचेच कीर्तन करून स्वत: अवधूत हो”.
दत्तबावनी
महिजी भगत यांनी प. पू. बापजींना विनंती केली की, “मला आपल्या सेवेची संधी द्या.” प. पू. बापजींनी सांगितले, “होय”.
भगत रोज पहाटे उठत. ती जागा झाडून स्वच्छ करीत. पूजेसाठी ताजी फुले आणीत. रतनलाल भिक्षा मागून आणीत असे. असे २-४ दिवस गेले. मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट ऐकून सर्व जण घाबरले. रतनलाल व भगत प. पू. “श्रीं”ना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी धावत आले. अशा भीषण परिस्थितीत प. पू. रंग अवधूत महाराज शांत चित्ताने ब्रह्मानंदात मग्न होते. महाराज म्हणाले मी येथे सुरक्षित आहे. तुम्ही आता येथून परत जा. त्या भीषण रौद्रस्वरूपात प. पू. बापजींना ब्रह्म दर्शन होत होते. त्या दोघांना प. पू. बापजींनी परत पाठवले. स्वत: रात्रभर तेथेच निसर्गाचे तांडव नृत्य पाहण्यात दंग झाले होते. ते अवधूत निश्र्चल होते. त्यांचे अंथरूण-पांघरूण भिजून चिंब झाले होते. मंदिरात व भोवतीही नर्मदेचे पाणी शिरले.
सकाळी प. पू. बापजींना नेण्यासाठी महिजी व रतनलाल तेथे आले. पावसाचा जोर वाढत चालला होता. प. पू. बापजींना हसू आले. ते म्हणाले, नर्मदा मातेच्या मांडीवर मूल सुरक्षित असते. संरक्षणासाठी कोठे जाणार? नर्मदेनेच सामावून घेण्याचे ठरवले असेल, तर तसे होवो.
नर्मदेचा पूर वाढला. सर्वजण भयभीत झाले. गावाकडे पळू लागले. महिजी व रतनलाल हेही भयभीत झाले. प. पू. बापजी म्हणाले, “तुम्ही दोघांनी घरी जावे. नर्मदा मातेचा रौद्ररूपाचा आनंद मला घ्यावयाचा आहे. महिजी प. पू. बापजींना म्हणाले की, “महाराज तुम्हांला येथे सोडून आम्ही कसे जाऊ? आमचे काहीही होवो, आम्ही येथेच राहणार. आपल्या सेवेत, आमचा देह पडला तरी पर्वा नाही.” असे म्हणून ते दोघे प. पू. बापजींच्या चरणांजवळ बसले. पूर आल्याने नर्मदेच्या पाण्याची पातळी भराभर वाढत होती. आकाशात विजांचा कडकडाट चालू होता.
नर्मदा मातेचे बाह्य रूप क्रोधाविष्ट होते. पण तिच्या माझ्याजवळ भाड्यासाठीपण पैसे नाहीत. मी मुंबईस कसा जाणार?” प. पू. बापजी त्यांना म्हणाले, “तुम्ही घरी जा. जाण्यापूर्वी नर्मदा नदीत डुबकी मारून नंतर घरी जा.” प्रेमजीभाई नर्मदा किनाऱ्यावर आले. पाण्यात डुबकी मारली. स्नान केले. डोके पाण्यात बुडवून, भिजवून बाहेर काढले असे पुन:पुन्हा केले त्यांची डोकेदुखी पूर्णपणे नाहीशी झाली. नंतर रुग्णांची सेवा करण्यासाठी प्रेमजीभाई स्वयंसेवक म्हणून २७ दिवस शिबीरात राहिले. दरिद्री नारायणाचे सेवेतच गुरुसेवा घडते. हा प. पू. बापजींचा उपदेश त्यांनी अंमलात आणला. शिबिर संपल्यानंतर डॉक्टरांनी प्रेमजीभाईंना पुन्हा तपासले. डॉक्टर त्यांना म्हणाले की, “आता तुम्हाला कोणतीच व्याधी नाही. प. पू. अवधूतांनी तुमची व्याधी रेवाजलात बुडवून टाकली.” तरीपण प्रेमजीभाई म्हणाले की, “घरी गेल्यावर शिवण यंत्रावर बसल्यानंतर डोके दुखावयास नको.” मोदी काकांनी तेथे शिबिरातच सेवकांकडून शिवणयंत्र आणले. प्रेमजीभाईंना शिवणयंत्रावर बसवले. त्यांनी ३६ चादरी शिवल्या. वेदनांचे दु:ख ते पूर्णपणे विसरले होते. प्रेमजीभाई प. पू. अवधूतांचे अनन्य भक्त झाले.
प. पू. रंगावधूत महाराजांचा उपदेश-
• प्रत्येक श्र्वासावर दत्तनाम घ्या.
• अंत:करणात श्रद्धा भाव नसताना केलेली भक्ती म्हणजे दंभ होय.
• आपण स्वत: आचरणात आणलेले सत्कर्म हेच आपल्यासाठी आशिर्वाद असतात.
• आईसारखे दैवत नाही. माता पित्याची सेवा करा.
• ऐहिक सुखापेक्षा आत्मदर्शनाचे सुख अनंत पटीने जास्त असते.
• सर्व विश्र्वात चराचरांत प्रभु दत्तात्रेय भरलेले आहेत. त्यांचे दर्शन घ्या. गुरुकृपेचे ऐश्वर्य सुखे ऐश्वर्य ही कवडी मोल आहेत.
महाराज म्हणत असत “अभ्यास आणि अनुभव दोन्हींत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर आहे. एक कण अनुभव हजारो खंडी अभ्यासाहूनही अधिक मूल्यवान आहे. एखाद्याने वैदिक वाङमयाचा खूप अभ्यास केला. त्यासाठी बराच वेळ व पैसा खर्च केला. पण त्यातील ज्ञान, तत्त्वे, उपयोग नाही. उत्तम प्रवचन करणे भरपूर ज्ञानाचा साठा असणे ऐकताना तल्लीन होणे हे चांगले आहे. पण त्याचबरोबर ते ज्ञान, ती तत्त्वे, तो उपदेश प्रत्यक्ष आचरण्यात आणणे सुद्धा आवश्यक आहे.
प. पू. महाराज हरीद्वार येथे जाण्यासाठी निघाले एका भक्तांने विचारले, “बापजी आपण हरिद्वारहून कधी परत येणार? अरे हरिच्या दारी जो जातो तो कधी परत येतो का? महाराज विनोदी होते भक्तांना वाटले की त्यांनी विनोद केला. ते हरिद्वार येथे व समाधिस्त झाले. नारेश्र्वर येथे देह आणण्यात आला व सर्व विधी येथे केले गेले. येथे त्याचे समाधी मंदिर आहे. भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे.
गुरुपरंपरा
श्री नृसिह सरस्वती
।
श्री वासुदेवानंद सरस्वती
।
श्री रंगावधुत स्वामी
।। श्वासे श्वासे दत्तनाम स्मरात्मन् ।।