स्थान: कडगंची (कर्नाटक राज्य)
आई/वडील: ज्ञात नाही
गुरु: श्री नृसिंहसरस्वती
विशेष: वंशजाकडून श्री गुरुचरित्र लिखाण
‘गुरूचरित्रात नृसिंहसरस्वतींचे सिध्द झालेले चरित्र हे त्यांचा पट्टशिष्य असलेल्या सायंदेव साखरे (राहणार कडगंची, कर्नाटक राज्य) यांच्या पाचव्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांनी लिहिले आहे. तशी पूर्वसूचना नृसिंहसरस्वती यांनीच सायंदेवांना ‘वंशोवंशी माझी सेवा तुझ्या कुळात घडेल’ असे आशीर्वचन देऊन केली होती. सायंदेवांकडून त्यांनी गुरूसेवा कशी करावी, हे सांगत असताना त्यांची परीक्षाही घेतली आहे. ‘परीक्षेशिवाय कृपा नाही’ हा दत्तसंप्रदायांचा दंडकच आहे. परीक्षेत उर्त्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सायंदेवांना गाणगापुरी येऊन राहण्यास सांगितले. तेथील विविध कथा-प्रसंगाचे सायंदेव हे साक्षी आहेत. सायंदेव हे त्यांचे पट्टशिष्य बनले. त्यांनी उत्कटपणे श्रीनृसिंहसरस्वती यांची सेवा केली. सरस्वती गंगाधर यांनी कडगंची इथेच ‘गुरूचरित्र’ लिहिलेले ग्रंथाची मूळप्रत कडगंचीतच आहे. तेथील भुयारात दोन सर्प चरित्रग्रंथाचे रक्षण करीत आहेत, असे प. पू.दंडवते महाराज (सोलापूर) वै.दादा जोशी (पुणे) यांनी अंतदृष्टीने सांगितले असल्याने तेथे श्री दत्तमूर्तीची स्थापना व ‘सायंदेव साखरे संस्थान’ या विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
‘सप्तशती गुरूचरित्रसार’ आणि ‘गुरूचरित्र’ या दोन्ही ग्रंथात चौदाव्या अध्यायातच सायंदेवांची कथा आली आहे. हा अध्याय मेरूदंडाचा म्हणून मानला जातो. कित्येकजण फक्त चौदावा अध्याय नित्य वाचतात. ‘दुष्ट यवनास शासन’ असे या अध्यायाचे नाव आहे. हा अध्याय विशेष महत्वाचा मानला जातो. त्यात प्रापंचिक दु:ख-संकटातून भक्तांना मुक्त करून त्यांनी भक्तिपरंपरा पुढे कशी चालवावी आणि तो परमार्थ प्रवृत्त होऊन त्यास गुरूकृपा कशी प्राप्त व्हावी? याची उत्तरे त्यात मिळतात. ‘सप्तशती गुरूचरित्रसार’ मध्ये पूज्य टेंबेस्वामींनी पाच ओव्यात ही कथा मांडली आहे. ‘गुरूचरित्र’ ग्रंथात हा अध्याय एकावन्न ओव्यांचा आहे. गुरूस्मरणाने गुरूकृपा कशी होते? गुरूकृपेने दु:ख, संकटे कशी दूर होतात? या विषयीची भक्तिसूत्रे त्यात प्रकटली आहेत.
श्रीनृसिंहसरस्वतींचे पूजन आणि त्यांना वंदन करून सायंदेवाने त्यांच्यासमोर आपली एक व्यथा प्रकट केली आहे. सायंदेव म्हणतात, ‘तुम्ही त्रिमूर्तीचा अवतार आहात. तुम्ही विश्वव्यापक आहात. भक्तजनांचा उध्दार करण्यासाठीच तुमचा अवतार आहे. म्हणून माझे एक मागणे आपण पूर्ण करावे.’ वंशपरंपरागत अढळभक्ती आणि इहलोकी पुत्रपौत्रांचे सौख्य याबरोबरच आणखी एका गोष्टीसाठी सायंदेवांनी श्रीगुरू नृसिंहसरस्वतींना विनविले की, ‘मी एका यवनाची सेवा करतो. तो यवन अत्यंत क्रूर आहे. दरवर्षी कोणा एका ब्राम्हणाचा तो घात करतो. आता त्यासाठीच त्याने मला बोलाविले आहे. तो माझा प्राण घेईल.’ श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून चिंता करू नकोस, तू त्याला भेट. तो तुला आमच्याकडे परत पाठवेल. तू येईपर्यंत मी इथेच थांबतो, असे अभिवचन त्यांनी दिले.
श्री गुरूंच्या आज्ञेवरून सायंदेव तेथून यवनाकडे गेले. सायंदेवास पाहून यवन क्रुध्द झाला व पाठमोरा होऊन घरात गेला. इकडे सायंदेवाने श्रीगुरूंचे सतत स्मरण सुरू केले. ज्याला गुरूकृपा प्राप्त झाली, त्याला दुष्ट यवन काय करणार? पू. टेंबेस्वामींनी हा प्रसंग थोडक्यात सांगितला असला तरी गुरूचरित्रात गुरूकृपा, गुरुशक्ती, गुरूसेवा, गुरूश्रध्दा, गुरूमाहात्म्य या अनुशंगाने काही महत्वपूर्ण भक्तिसूत्रे प्रकटली आहेत. त्या द्ष्टीने त्यातील संदर्भ थोडया तपशीलाने इथे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. ‘गुरू हाच देव’ याची इथे प्रचिती येते.
आता, गुरूवचनाची फलश्रुती पाहू. श्रीगुरूंकडील अपार श्रध्देने आणि त्यांचे सतत स्मरण करीत सायंदेव यवनराजाकडे गेले. पण घडले असे की, तो यवन राजाच संभ्रमित होऊन घरात गेला. राजाला गाढ झोप लागली. मात्र त्याला वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तो जागा झाला. त्याला काहीच आठवेना. उलट कोणीतरी ब्राम्हण आपल्यावर शस्त्र घेऊन धावून आला आहे, तो आपले अवयव छाटून टाकत आहे, असेच त्यास दिसले. मग त्याला सायंदेवांचेच स्मरण झाले. तो सायंदेवाजवळ आला. त्यांच्या पायावर लोळण घेऊन म्हणाला, ‘तुम्हीच माझे स्वामी आहात. तुम्हाला येथे कुणी बोलावले? तुम्ही आपल्या घरी परत जा.’
सायंदेवांना घरी परत पाठविताना यवनराजाने त्यांना वस्त्रे-आभूषणे दिली. परत आल्यावर त्यांनी श्री गुरूंचे दर्शन घेतले. ‘आता आम्ही तीर्थयात्रेस निघतो’ असे श्रीगुरू म्हणताच सायंदेव म्हणाले, ‘हे कृपासिंधू देवा, मी आता एक क्षणभरही तुमचे चरण सोडणार नाही. मी तुमच्याबरोबर येतो.’ त्यावर ‘दक्षिणेकडे जी तीर्थक्षेत्रे आहेत तेथे काही विशिष्ट कार्याकरिता जाणे भाग आहे. पंधरा वर्षांनंतर तुझी-माझी भेट होईल. त्या वेळी आम्ही तुमच्या गावाजवळच राहण्यास असू. त्यावेळी पत्नी, मुले, भाऊ यांच्यासहीत येऊन भेटावे. चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे व दु:खी नाहीशी झाली आहेत’ असे श्रीगुरूंनी त्यांना सांगितले. पुढे श्रीगुरू वैजनाथ क्षेत्री येऊन तेथेच गुप्तरूपाने राहिले. तीर्थक्षेत्री जाण्याने पापे दूर होतात. उपासनेचे अपूर्व फळ मिळते, असेही त्यांनी सांगितले. श्रीशैलपर्वतावर पुन्हा आपली भेट होईल, असे अभिवचन त्यांनी सायंदेवांना दिले.
श्री नृसिंहसरस्वती यांनी श्रीशैलपर्वतावरील पाताळगंगेतून पुढे कर्दळीवनात जाऊन अवतार समाप्ती केली असली तरी पाताळगंगेतून कर्दळीवनात जाताना ज्या नावेतून ते पलीकडे गेले, तेथून त्यांनी चार प्रसाद पुष्पे पाठविल्याचे नावाडयाने पाहिले व सांगितले. त्यातले एक प्रसाद पुष्प सायंदेवांना प्राप्त झाले. श्री नृसिंहसरस्वती यांनी ‘मठी ठेवितो आपुल्या पादुका’ असे सांगून त्यांचे दर्शन घेणाऱ्यास व संगमावरील अश्वत्थवृक्षातळी बसून ग्रंथपारायण केल्यास ‘मनोकामना पूर्ण करू’ असे अभिवचनही दिले आहे. तसेच ‘श्रीगुरूचरित्र’ ग्रंथाचे पारायण केल्यास ‘दत्तदर्शन व बाधानिरसन’ होईल, असेही वचन त्यांनी भक्तांना दिले आहे.
आजही औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर तसेच कडगंची येथे उपासना केल्यास अनुक्रमे ज्ञानप्राप्ती, वैभवप्राप्ती, कर्मनाश व कृपादष्टी यांचा लाभ होईल, असे या चारही स्थानांचे विशेष महत्व आहे. ‘भाव तसा देव’ आणि ‘उपासना तसे फळ’ हा सिध्दांत असून भक्तांना आज्ञा, स्वप्नदष्टांत, संकटमोचन आणि कृपालाभ होतो, असा भाविकांचा अनुभव आहे.
कडगंची येथील पादुका ‘करूणापादुका’ म्हणून प्रसिध्द आहेत. तिथे श्री नृसिंहसरस्वती यांनी सायंदेवास प्रसादपुष्प दिल्याने कृपादृष्टीचा लाभ होतो. औदुंबरला विमलपादुका (ज्ञानप्राप्ती), वाडीला मनोहरपादुका (वैभवप्राप्ती), गाणगापूर येथे निगृणपादुका (कर्मभोगनिवारण) ठेवल्या आहेत.
अलीकडे दत्तभक्त कडगंचीसही येऊ लागले आहेत. तेथेही पूजा, अभिषेक,पारायण, प्रसाद अशी उपासना केली जात आहे. श्री नृसिंहसरस्वती व सायंदेव यांचे नाते गुरूशिष्यांचे होते. सायंदेवही त्यांच्या कृपेला पात्र ठरले आणि वंशोवंशी त्यांच्या घराण्यात गुरूसेवा घडून पाचव्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांच्याकडून ‘श्रीगुरूचरित्र’ ग्रंथ सिद्ध झाला, हे फार मोठे कृपाफळ त्यांच्या घराण्यास प्राप्त झाले आहे. ग्रंथातील शब्द हे ‘मंत्रसिध्द’ असल्याने हा ग्रंथ वाचावा, एकावा, लिहावा असेही ग्रंथात म्हटले गेले आहे.
सायंदेवाचे गुरुमाऊलींनि रक्षण केले
श्री नरसिह सरस्वती सायंदेवाकडे भिक्षेस आले. तेथे अत्यंत उत्तम पाद्यपूजा करून भोजनही केले. श्रीगुरु प्रसन्न झाले. सायंदेव त्यांना नमन करून म्हणाले 'गुरु महाराज आपली महती मी काय सांगावी? माझे एक मागणे आहे की,
माझे वंशपरंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री अंतीं द्यावी सदगती'
इथे एकविशेष बाब लक्षात घेण्याजोगी आहे. ती म्हणजे स्वतः दुख।त असताना संकटांनी घेरलेले असताना प्रथम परमार्थाविषयी कृपाद्रीष्टी मागितली. गुरु चरित्रात इथे उत्तम दोन उपमा दिलेल्या आहेत,
गरूड।चिये पिलीय।सी सर्प कैसा डंसी । तैसे त्या ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरुंची । एखादे सिहासी ऐरावत केवी ग्रासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी कालिकाळाचे भय नाही । ज्याचे हृदयी गुरुस्मरणं भय कैसे तया दारुण । कालमृत्यू न जाण अपमृत्यू काय करील।।
या ओव्या म्हणजे सायंदेवालाच नाही तर सर्व भक्तांना दिलेले अभिवाचन आहे. गुरुवरील अपार श्रद्धेतून सायंदेव यवनाकडे गेला आणि राजाच संभ्रमित झाला, त्याला वेदना होऊ लागल्या, त्याला काहीच आठवेनासे झाले. त्याच्या पायावर लोळण घेऊन म्हणाला 'तूच माझा स्वामी आहेस तुला येथे कुणी बोलावले? तू आपल्या घरी परत जा.' केवळ इतके बोलूनच तो थांबला नाही, तर त्याने सायंदेवास वस्त्रे-आभूषणे देऊन परत पाठवले. सायंदेव परत आले व गुरु चरणी नतमस्तक झाले व वृत्तांत सांगितला. जेथे प्राण गामावण्याचं भय होते तेथे सन्मान मिळाला. सायंदेव श्रीगुरुंची चरणकमळे सोडण्यास तयार नव्हता. तेव्हा श्रीगुरुंनि पुनरभेटीचे आश्वासन दिले व १५ वर्षांनी पुन्हा भेट होईल तेव्हा आपण कलत्र पुत्रासामावेत भेटीस यावे असे सांगितले. तू आता चिंता करू नकोस तुझी सर्व संकटे व दुःख आता संपली असे सांगितले. श्रीगुरुंची कृपादृष्टी प्रसाद पुष्पांच्या रूपाने कृतज्ञता व्यक्त केली.
आजही दत्त संप्रदायिक अधिकारी सत्पुरुषांना श्री गुरुचरित्राची मूळ प्रत व त्यावरील शेवंती पुष्पांचे दर्शन घडते. महाराजांनी सायन्देवास आपल्या पादुकाही दिल्याचे काही ग्रंथात उल्लेख आढळतो.
धन्य ते श्रेष्ठ सद्गुरू नृसिंहसरस्वती महाराज आणि धन्य त्यांचा पट्ट शिष्य सायंदेव साखरे !
महान सतगुरु भक्त सायंदेवांस २२ वर्ष प्रदीर्घ काळ श्रीगुरुसेवेचा व सहवासाचा लाभ
श्रीगुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी वयाच्या ८ व्या वर्षी कारंजा सोडुन काशीला प्रयाण केले. ३० वर्षांनी महाराज कारंजास परत आले व मातापित्यांस दर्शन देउन, पुजा स्विकारुन महाराज त्रिंबकेश्वर येथे आले व महाराजांनी गोदावरी परिक्रमा सुरु केली. आंध्र प्रदेशात वासर ब्रम्हेश्वर ग्रामी (निर्मल) महाराजांनी सायंदेवांस प्रथम दर्शन दिले.महाराजांनी त्यांच्या घरी पुजा,माधुकरी भिक्षा स्वीकारली. येथे सायंदेवांनी श्रीगुरुचरणांची नित्य सेवा मागितली असतां महाराज म्हणाले की,
"कारण असे आम्हा जाणे । तिर्थे असती दक्षिणे ।
पुनरुपी तुम्हा दर्शन देणे । संवत्सरी पंचदशी ।।
आम्ही तुमचे ग्राम समिप।वास करु हे निश्चीत ।
कलत्र पुत्र ईष्ट भ्रात । तुम्ही आम्हा भेटावे ।।"
-श्रीगुरुचरित्र, अध्याय १४ वा.
सायंदेवांचे मुळ गाव म्हणजे गाणगापुर जवळ कडगंची. म्हणुन महाराज त्यांना म्हणाले की मी तुमच्या गावाजवळच राहणार आहे व तुम्ही पन्नासाव्या संवत्सरात-अनल नाम संवत्सरात (१४३६ साली) (संवत्सरी पंचदशी-पन्नासावे संवत्सर) गाणगापुरी यावे. यानंतर महाराजांनी गोदावरीच्या दुस-या काठावरुन परत गोदावरीच्या उगमाकडे त्रिंबकेश्वरकडे परिक्रमा सुरु केली तेंव्हा महाराज परळी वैजनाथ, अंबाजोगाई क्षेत्रात एक वर्ष गुप्त राहिले. नंतर महाराज कृष्णाकाठी औदुंबर क्षेत्री चार महिने राहिले. नंतर महाराज बारा वर्ष वाडीक्षेत्री राहुन गाणगापुर येथे भिमा-अमरजा संगमावर प्रकटले. महाराज २४ वर्ष गाणगाग्रामी राहिले. महाराजांच्या गाणगापुर आगमनानंतर दोन वर्षांनी महाराजांच्या आज्ञेनुसार पन्नासाव्या "अनल" नाम संवत्सरात गाणगाग्रामी आले व महाराजांच्या परिक्षेत उत्तीर्ण होउन २२ वर्ष, बहुधान्य नाम संवत्सरात महाराज कर्दळी वनांत गुप्त होईपर्यंत महाराजांच्या सेवेत होते. आता पर्यंतच्या दत्तावतारांत सर्वांत प्रदीर्घ काळ गुरुंची सेवा लाभलेले सायंदेव जेष्ठ श्रेष्ठ गुरुसेवक असावेत.
सायंदेव कथा
क्रूरयवन शासन - सायंदेव वरप्रदान
नामधारक सिद्ध्योग्यांना नमस्कार करून जयजयकार करून म्हणाला, "अहो योगीश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथाभाग सांगा. त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राम्हणावर श्रीगुरू प्रसन्न झाले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे. "नामधारकाने अशी विनंती केली असता, सिद्धयोगी म्हणाले, "बा शिष्य ऐक. श्रीगुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे. श्रीगुरुंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायंदेव ब्राम्हणावर ते प्रसन्न झाले. ते सायंदेवाला म्हणाले, "तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुज्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील." श्रीगुरुंनी असा आशीर्वाद दिला असता सायंदेवाला अतिशय आनंद झाला. श्रीगुरुंच्या चरणांना पुनःपुन्हा वंदन केले. श्रीगुरूंचा जयजयकार करीत तो म्हणाला, "गुरुदेव, आपण त्रयमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता. तुमचे माहात्म्य वेदांनाही समजत नाही.तुम्ही प्रत्यक्ष ब्रम्हा-विष्णू-महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेष धारण केला आहे. मी तुमचे माहात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे. माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्रपौत्रादी सर्व सुखे प्राप्त होवोत. शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो." अशी प्रार्थना करून सायंदेव म्हणाला, "गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवाचाकरी करतो. तो अत्यंत क्रूर, दृष्ट बुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राम्हणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरविले आहे. त्यासाठीच त्याने मला बोलाविले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरणदर्शन झाले असतानाही मला त्या यवनाकडून मरण कसे येणार ? सायंदेव असे म्हणाला असता श्रीगुरू त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, "तू कसलीही काळजी करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवील. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी येथून जाईन. तू माझा भक्त आहेस. तुला वंशपरंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील. तुझ्या कुळातील सर्वजन शतायुषी होतील." श्रीगुरुंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायंदेव त्या यवनाकडे गेला.
सायंदेवाने त्या यवनाकडे पहिले तो काय ? तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायंदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना. अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला. त्याला चक्कर येऊ लागली. तशा स्थितीत तो आडवा झाला. त्यला झोप आली. तशा स्थितीत त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राम्हण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे." अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला. तेथे भयभीत होऊन म्हणाला, "आपल्याला इकडे कोणी बोलाविले ? आपण कृपा करून परत जा." अशी विनंती करून त्या यवनाने सायंदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सायंदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते. तो मनात श्रीगुरुंचे चिंतन करीत होता. ज्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही. त्याला मृत्यूचीही भीती नसते. ज्याच्यावर श्रीगुरूंची कृपा असते त्याला यमाची भीती असत नाही.
त्या यवनाने सायंदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायंदेव धावतच श्रीगुरुंना - म्हणजे श्रीनृसिंह-सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदीतीरावर सद्गुरु श्रीनृसिंह-सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते.सायंदेवाने श्रीगुरुंच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याने श्रीगुरुंचे स्तवन करून त्यानं सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी "आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत." असे श्रीगुरुंनी सांगितले. हे ऐकताच सायंदेव हात जोडून म्हणाला, "गुरुदेव, मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आपणच रक्षणकर्ते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली, त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल आहात. मग माझा त्याग का करता ? आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच." असे म्हणून सायंदेवाने श्रीगुरुंच्या चरणांना मिठी मारली." सायंदेवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले श्रीगुरू नृसिंहसरस्वती त्याला समजावीत म्हणाले, "सायंदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. मग तू आपल्या पुत्रकलत्रासह मला भेटावयास ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत." असे आश्वासन देऊन श्रीगुरुंनी सायंदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. मग ते आपली शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथक्षेत्री आले. तेथे ते गुप्तपणे राहिले.
भक्तराज सायंदेवाची कठोर परीक्षा
गुरुचरित्राच्या एकेचाळिसाव्या अध्यायात सायंदेव आणि श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज यांची भेट पंधरा वर्षांनी झाली. अत्यंत आनंदाने आणि भक्तीने सायंदेवाने गुरुमहाराजांना वंदन केले. गुरुमहाराजांनाही त्याला भेटून आनंद झाला. महाराजांनी विचारले, तुझे स्थान कोणे देशी | कलत्र पुत्र कोठे असती || सायंदेवाने या प्रश्नावर आपले आणि आपल्या कुटुंबाचे क्षेम कुशल सांगितले आणि तो पुढे म्हणाला, करुनि सेवा श्रीगुरूची | असें स्वामी परियेसी | ऐसा माझे मानसी | निर्धार असे देवराया || अहो गुरुमहाराज, आता या पुढे आपली सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. यावर गुरुमहाराज म्हणाले, आमुची सेवा असे कठीण | आम्हा वास बहुता ठायी || अरे आम्ही कधी अरण्यात तर कधी गावात असतो, आमच्याबरोबर राहिल्यास कष्ट आहेत. तरीही सायंदेवाचा निर्धार पाहून गुरुमहाराज म्हणाले, दृढ असेल मनी भक्ती | तरीच करी अंगिकार ||
एके दिवशी गुरुमहाराजांनी मनात सायंदेवाची परीक्षा पाहावी असा विचार केला. गुरुमहाराज संगमस्थळी बसले होते. सूर्यास्त झाला होता आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंदेव बरोबर होताच. पावसामुळे त्यांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. अत्यंत वेगाचा वारा आणि पाऊस पडत होता.
पर्जन्य दोन याम असा या ठिकाणी उल्लेख आहे. आपल्या कालमापनात दिवसाचे आठ प्रहर आहेत. पूर्वान्ह, मध्यान्ह, अपरान्ह, सायंकाल हे दिवसाचे प्रहर आणि प्रदोष, निशिथ, त्रियामा, उषा हे रात्रीचे चार प्रहर. प्रत्येक प्रहर हा तीन तासाचा मानला जातो. याम आणि प्रहर हे एकच मापन आहे. दोन याम म्हणजे सहा तास. असा मुसळधार पाऊस सहा तास पडला तर वातावरण थंड होणे स्वाभाविक आहे. गुरुमहाराज म्हणाले, तुवा जावोनी मठासी | अग्नि आणावा शेकावया || मात्र जाताना सायंदेवाला महाराजांनी हसत हसत ताकीद दिली. आपल्या मागे दोन्ही बाजूस मात्र पाहू नकोस.
चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात सायंदेव गाणगापूरच्या वेशीपाशी गेला आणि व्दारपालाकडून विस्तव घेऊन येताना त्याने विचार केला गुरुमहाराज मला दोन्ही बाजूस पाहू नकोस का म्हणाले असतील? आणि सहज त्याने दोन्ही बाजूस पाहताच दोन पाच फण्यांचे नाग सोबत येताना दिसले. अत्यंत घाबरून गुरुमहाराजांचे स्मरण करीत त्याने संगमाकडे धाव घेतली. दुरून त्याला गुरुमहाराज सहस्त्रदीपज्योतींप्रमाणे तेजस्वी दिसले आणि अनेक विप्र आजूबाजूला वेदपठण करीत असल्याचा वेदध्वनी ऐकू आला. जवळ जाऊन पाहताच गुरुमहाराज एकटेच बसले होते. सायंदेवाने अग्नी प्रज्वलित केला, ते दोन सर्प श्रीगुरुना वंदन करून निघून गेले. गुरुमहाराज म्हणाले, का घाबरलास? ते दोन्ही सर्प आम्हीच तुझ्या रक्षणाकरिता पाठविले होते. आमची सेवा कठीण आहे तेव्हा आपल्या मनाशी विचार कर आणि सेवेस राहा.