जन्म: ज्ञात नाही. फलटण येथे प्रकटले तेव्हा वय अंदाजे ४० वर्षे.
प्रकट दिन: शके १७९७ अश्विन शुद्ध द्वादशी.
आई/वडील: ज्ञात नाही.
गुरु: विशेष प्रभाव श्री स्वामी समर्थ.
समाधी: माघ शुध्द एकादशी शके १८२० (सन १८९८) रोजी सायंकाळी साडेचार वाजता
शिष्य: लाटे. आईसाहेब मोरे
॥ श्री सद्गुरू हरीबाबाय नमः ॥
भक्तजनांचा कल्पवृक्ष- श्री हरिबाबा महाराज
(शके १९७९-१८२०) इ. स. १८९८
‘संभवामि युगे युगे’ या भगवंताच्या वचनानुसार भगवंत जगात वेळोवेळी माणसाचा देह धारण करुन येत असतो. क्वचित वेळी तो अवतार म्हणून येतो, तर इतर वेळी संत म्हणून जन्म घेऊन समाजाला स्वतःच्या वागण्यातून आदर्श जीवनाचे धडे देत असतो. परमेश्वराचं नाम घेणं हा प्रत्येक संताच्या उपदेशाचा गाभा आणि जीवनाचा मंत्र असला तरी प्रत्येक संताची ते सांगण्याची पध्दत वेगवेगळी असते. श्रीरामदासस्वामींनी कडकडीत वैराग्य पाळून रामनामाचा घोष केला, तर श्री तुकाराम महाराजांनी संसारात पडूनही विठ्ठलाच्या भक्तीसाठी सर्व सुखांवर तुळशीपत्र ठेवलं. श्रीगोंदवलेकर महाराजांनी संसाराकडे एका वेगळया नजरेनं पहात रामनामाची कास कशी धरावी हे शिकवलं, तर वेगवेगळे व्यवसाय वाट्याला आलेल्या श्री गोरा कुंभार, श्री सावतामाळी, श्री नरहरी सोनार यांच्यासारख्या अनेक संतांनी आपल्या कामाच्या माध्यमातून परमेश्वराचं अनुसंधान कसं ठेवायचं हे समाजाला शिकवलं.
वेगवेगळया प्रांतांत आणि वेगवेगळया वातावरणात अशा संतांनी जन्म घेतला तरी त्यांची स्वतःची अशी वेगळी जीवनपध्दती असते. तिच्या प्रमाणेच राहून ते लोकांवर संस्कार घडवतात. विरक्ती हा त्यांच्या जीवनाचा आत्मा असतो. लोकांकडून त्यांना काहीच अपेक्षा नसते. उलट लोकांनाच भरभरून देण्यासाठी ते आलेले असतात. फलटणच्या पवित्र भूमीत अशाच एका संतानं फलटणवासियांना अचानक दर्शन दिलं ते इथल्या मारूतीच्या मंदिरात. तो सुवर्णदिन होता आश्विन शुध्द द्वादशी शके १९७९. काही संताचा जन्म कुठे आणि कधी झाला, त्यांचे आई-वडिल कोण इ. गोष्टी सगळ्यांना माहीत असतात. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस आपण जयंती म्हणून साजरा करतो. परंतू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, शेगावचे श्री गजानन महाराज किंवा शिर्डीचे श्री साईबाबा यांच्यासारख्या ज्या विभूतींच्या जन्माबद्दल काहीच माहिती नसते, त्या ज्या दिवशी लोकांसमोर प्रकट झाल्या तो दिवस आपण त्यांचा प्रकटदिन म्हणून साजरा करतो. फलटणचे श्रीहरिबाबा हे याच मालिकेतले संत असल्यामुळे आपण त्यांचा प्रकटदिन उत्सव मोठया जल्लोषात साजरा करतो.
तर त्या दिवशी माध्यान्हीला मारूती मंदिरात फलटणकरांना ज्या संताचं दर्शन झालं त्याचं नावही त्याना कळू शकलं नव्हतं. कारण त्यांनी नाव विचारल्यावर त्यांना भलतंच उत्तर मिळालं होतं. हळूहळू गावात ही बातमी पसरल्यावर कुणी उत्सुकतेनं, तर कुणी गंमत म्हणून, कुणी दर्शनासाठी; तर कुणी टर्रर् उडवण्यासाठी म्हणून तिथं येऊन गेले. पण संध्याकाळ झाली तरी हा महात्मा सकाळी घातलेल्या सिध्दासनातच स्थिर होता. संध्याकाळी फलटण संस्थानाचे अधिपती मुधोजीराजे नाईक निंबाळकर हे त्यांच्या नित्यक्रमाप्रमाणे मारुतीच्या दर्शनाला आले असताना हा दिव्यात्मा त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी जवळ जाऊन अतिशय विनम्रपणे त्यांचं दर्शन घेऊन राजवाड्यावर चलण्याची प्रार्थना केली. राजाच्या आणि फलटणनगरीच्या पूर्वपुण्याईमुळेच जणु हा महात्मा इथं आलेला असल्यामुळे राजाच्या प्रार्थनेला त्वरित मान देऊन राजमंदिरात जाता झाला. राजानंही अतिशय भक्तिभावानं पूजन करुन सुग्रास भोजन अर्पण केलं. राजवाड्यातला कण न् कण आज धन्य झाला होता!
हळूहळू या महात्म्याविषयी सर्वत्र चर्चा सुरु झाली तेव्हा हे कळालं की फलटणला प्रकट होण्याअगोदर हा महात्मा पणदरे या फलटणपासून जवळ असलेल्या गावी लोकांना दिसला होता. त्यानंतर नातेपुते आणि पंढरपुर या पुण्यक्षेत्री काही काळ राहून नंतर शिखर शिंगणापुर या महादेवाच्या तीर्थक्षेत्री बराच काळ रमला. आणि त्यानंतर मात्र फलटणक्षेत्री आपलं नियोजित जनउध्दाराचं कार्य करण्यासाठी मानवरूपातला हा शंकर त्याचाच अंशावतार असलेल्या मारुतीच्या मंदिरात प्रकट झाला. पूर्वी या महात्म्याला पाहिलेल्या भाविकांकडूनच त्याला ’हरिबाबा’ या नावानं ओळखतात हेही कळालं. फलटणक्षेत्री प्रकट झाले त्यावेळी हरिबाबांचं वय साधारणपणे ४० वर्षांचं असावं. परंतु अशा विभूतींच्या वयाचं आणि क्षमतेचं गणित बांधणं हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं असतं.
राजानं हरिबाबांना राजवाडयात नेलं खरं, पण वैराग्य हाच अलंकार घालून वावरणारे हरिबाबा त्या ऐश्वर्यात थोडेच रमणार होते! सोनं, चांदी, पैसे आणि ऐश्वर्य यांचं अप्रूप सामान्य माणसाला. हरिबाबांसारख्या योगिराजाला त्याचं काय! लोकांना या गोष्टीची प्रचिती वेळोवेळी पहायला मिळत असे. राजानं नेसवलेलं किंमती वस्त्र दुसर्याच क्षणी काढून टाकून आपल्या नेहमीच्या दिगंबर अवस्थेत जाणं, त्यानं कौतुकानं दिलेलं चांदीचं भांडं कुठेही भिरकावून देणं या वैराग्याची झलक दाखवणार्या गोष्टींच्या जोडीलाच कधी एखाद्याच्या घरात शिरून तिथले कपडे बाहेर फेकून देणं, घरात लहान मूल असेल तर त्याला उचलून त्याचे मुके घेणं, कधी मध्यरात्रीला रस्त्यात उभं राहून भजन करणं, तर कधी शिव्याच देत सुटणं, कधी दगड गोळा करुन त्यावर आपण स्थानापन्न होणं, तर कधी तापलेल्या वाळूवर शांतपणे आडवं होऊन वर तल्लीनपणे विठ्ठलाचं भजन करणं अशा लीला लोकांना पहायला मिळत. हे भजनही द्रविड, तेलंगी, कानडी अशा वेगवेगळया भाषांमधलं असायचं. तरीही त्या गाण्यामध्ये असा भाव आणि तल्लीनता असायची की ऐकाणार्यानं भाषा कळली नाही तरीही स्वतःला विसरुन जावं. भजनाचा शेवट ’पुंडलीक वरदा हरिविठ्ठल‘ अशी गर्जना करुन होत असे.
श्री हरिबाबा कधी कधी देवळात येत. तेव्हा कधी देवाचं दर्शन घेऊन निघून जातं, तर कधी तिथं चालू असलेलं कीर्तन, प्रवचन ऐकायलाही थांबत. आणि कधी तर तिथं चक्क झोपी जात. कधी ते शांत वाटत, तर कधी त्यांची मुद्रा उग्र भासत असे. या उग्र मुद्रेमुळे मुलं हरिबाबांना फार घाबरत असतं. आणि मुलंच काय, मोठी माणसं सुध्दा हरिबाबा येताना दिसले की घराची दारं पटापट लावत असत. कधी कधी हरिबाबा एखाद्याच्या घरी जाऊन खायला भाकरी मागत. ज्याच्या घरी हरिबाबा गेले ती व्यक्ती श्रध्दावान असेल तर व्यवस्थित सगळे पदार्थ वाढलेलं ताट बाबांसमोर येई, परंतु बाबांनी सगळे पदार्थ एकत्र कालवून खायला सुरुवात केली की यजमान पहातच राही. आता विकारांचा मागमूस नसलेल्या त्या महात्म्याला जिभेच्या चोचल्या मध्ये कुठून रस असणार!
एखाद्यानं हरिबाबांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकलं की बाबांनी त्याच्या डोक्याचं पागोटं काढून स्वतःच्या डोक्यावर ठेवावं हा प्रकारही काही वेळा बघायला मिळे. कधी हरिबाबा अचानक खदाखदा हसायला लागत, तर कधी एकदम मौनसुध्दा धारण करत. समाज म्हटल्यावर सगळया प्रकारची माणसं असणारच. कधी हरिबाबांना कौतुकानं दूध पाजणारा भाविक जसा भेटायचा, तसा कधी दारू पाजणारा किंवा गांजा ओढायला देणारा रसिकही भेटायचा. परंतु या सगळयाच्या पलिकडे गेलेल्या बाबांना त्यानं काय फरक पडणार! समोर ठेवलेल्या पैशांना, वस्तूंना आणि अर्पण केलेल्या वस्त्रांना देखिल हाच न्याय मिळत असे. हरिबाबा गावातून हिंडत असताना त्यांच्या हातून घडणार्या कृतीतून काही वेळा नुकसान होत असे. ते टाळण्यासाठी राजानं बाबांच्या मागेमागे फिरायला स्वतःचे सेवक ठेवले होते. परंतु काही दिवसांतच ‘हे जमणं शक्य नाही’ हे लक्षात आल्यामुळे राजानं ती योजना बासनात गुंडाळून ठेवली.
साधू-संतांची योग्यता सर्वसामान्य माणसाला समजू शकत नाही. कारण तो बाह्यरुपावरुन ती ठरवण्याचा प्रयत्न करतो. पण हिर्याची पारख करायला जसा रत्नपारखीच लागतो, तसा संत आणि साधूंना ओळखणं हे फक्त साधूंनाच शक्य असतं. बाकीच्यांच्या लक्षात फक्त त्यांचं विचित्र वागणंच रहातं. खरं तर हे विचित्र वागणं त्यांनी एवढयाकरताच धारण केलेलं असतं की त्यामुळे फक्त स्वार्थासाठीच त्यांच्याकडे येणार्या लोकांना जरब बसावी. सर्वसामान्य माणूस हा त्याच्या पूर्वकर्मांची फळ भोगत भोगत जीवन जगत असताना अगदी जेरीस आलेला असतो. संत सत्पुरूष त्याचं हे जगणं सुसह्य करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करायला आलेले असतात. पण माणूस त्या सत्पुरूषाला ‘आपल्या इच्छा पूर्ण करणारं यंत्र’ समजून स्वतःमध्ये काही सुधारणा करण्याऐवजी त्यालाच सारखा मागत राहतो. सत्पुरुष हे साक्षात् परमेश्वरस्वरुप असल्यामुळे काहीही द्यायला समर्थ असतात. पण माणसाचं ‘हे हवं ते हवं’ हे कितीही मिळालं तरी न संपणारं असल्यामुळे सत्पुरुष ते नियंत्रणात ठेवायला शिकवण्याचा प्रयत्न करत असतात.
‘चित्त शुध्द ठेवून प्रत्येक काम करा‘ अशा सोप्या शब्दांमध्ये हरिबाबा उपदेश करत. चित्त शुध्द असल्याशिवाय आपली कोणतीही सेवा देव सुध्दा स्वीकारत नाही असं सांगत असताना दांभिकपणे, म्हणजे प्रदर्शन करुन सेवा करणार्या लोकांवर ते परखडपणे टीका करत. एकदा पणदर्यात राहणार्या धोंडी वाणी यांच्या घरी गेले असताना हरिबाबा तिथं जमलेल्या भाविकांना रात्रभर उपदेशाचं अमृत देत होते आणि सारे भाविकही कानांमध्ये प्राण आणून ते स्वीकारत होते. बाबांच्या पणदर्यात त्या दहा वर्षांच्या वास्तव्यामध्ये घडलेला तो एकमेव प्रसंग होता की जेव्हा बाबा सलग एवढा वेळ भक्तांना आयुष्य सार्थकी लावण्याचा कानमंत्र देत होते.
सत्पुरुषांच्या नुसत्या कृपादृष्टीनं सुध्दा समोरच्या व्यक्तीला झालेल्या रोगापासून मुक्ती मिळते. हा अनुभव हरिबाबांच्या बाबतीत सुध्दा असंख्य लोकांनी घेतला. अगदी असाध्य झालेल्या आणि डॉक्टरांनी सुध्दा हात टेकलेल्या रोग्यांना देखिल बाबांकडून संजीवनी मिळाल्याची उदाहरणं त्या पंचक्रोशीमध्ये नेहमीच घडत असत. आपलं दुःख दूर करणारी व्यक्ती आपल्यासाठी देवासमान असते. इथं हरिबाबा तर साक्षात् देवच होते. पण देवाला ओळखणं एवढं सोपं थोडंच आहे! त्यामुळे घरी आलेल्या बाबांना धक्के मारुन बाहेर काढणारे अज्ञानी जीव सुध्दा काही कमी नव्हते. परंतु विकारांवर ताबा मिळवलेले हरिबाबांसारखे दयासागर त्या अज्ञानी जीवांच्याही कल्याणासाठी प्रयत्न करतच रहातात.
आपल्या पूर्वजांकडून आपल्याला अनेक पारंपारिक व्रतवैकल्यं समजतात. वेगवेगळया गोष्टी साध्य होण्यासाठी वेगवेगळी व्रतं असतात. पण असा अनुभव येतो की एखादं पारंपारिक व्रत एखाद्या सत्पुरूषानं करायला सांगितलं की त्यामध्ये फलप्राप्ती अगदी त्वरित होते याला कारण म्हणजे त्या सत्पुरूषाच्या वाणीमध्ये असलेलं अपार सामर्थ्य. एखादा पारंपारिक मंत्र सुध्दा सत्पुरूषाकडून मिळाला की तो जपल्यावर त्वरित फळ देतो. त्यामागेही हेच कारण असतं. श्रीहरिबाबांनी एका स्त्रीला सोमवारचं व्रत करायला सांगितल्यानंतर तिला पुत्रप्राप्ती झाली. संतमहात्मे हे खरं तर स्वतःचं सामर्थ्य त्यामागे लावून अशा व्रताचं महात्म्य वाढवत असतात!
रोग्याच्या अंगाला लावायला माती देणं किंवा त्याच्या अंगावर थुंकणं हा प्रकार इतर अनेक संतांप्रमाणेच श्रीहरिबाबांच्या चरित्रातही पहायला मिळतो. माती किंवा थुंक्याच्या माध्यमातून रोगमुक्तीचा अतिशय प्रबळ आणि पवित्र संकल्पच ते संत त्या रोग्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि तो संकल्प सिध्दीला जाणं म्हणजेच त्या रोग्याला रोगापासून मुक्ती मिळणं असतं.
सत्पुरूषांकडे काय मागावं हे सामान्य माणसाला कळत नाही. त्यामुळे बहुतेक वेळा कल्पवृक्षाला भाजीसाठी भोपळा मागण्याचा प्रकार घडतो. परंतु संसारातल्या म्हणजे व्यवहारातल्या गोष्टी कितीही मागून घेतल्या तरी कायमस्वरुपी समाधान कधीही मिळत नाही आणि मग माणूस एकामागून एक मागण्या करत असतानाच त्याचं आयुष्य संपतं. पण त्यापासून इतर कोणी सहसा धडा शिकताना दिसत नाही. श्रीहरिबाबांनी अशा व्यवहारातल्या गोष्टी मागायला आलेल्या कित्येक लोकांच्या इच्छा पूर्ण करुन ते मागणं कसं अपूर्ण, म्हणजे चुकीचं आहे हे दाखवून दिलं.
प्रेतामध्ये परत प्राण आणणं हा चमत्कार इतर अनेक संतांप्रमाणे श्रीहरिबाबांच्या चरित्रातही दिसतो. पण हे एवढं सरळ असतं तर संतांनी सगळयांनाच मरणाच्या पाशातून सोडवलं असतं. पण असं घडत नाही. कारण नैसर्गिक म्हणजे काळमृत्यूच्या बाबतीत संत कधीही हस्तक्षेप करत नाहीत. अपमृत्यू, म्हणजे गंडांतर असेल तरच समोरच्या परिस्थितीनुसार संत निर्णय घेऊन त्या व्यक्तीला जीवनदान देतात. काही वेळा अशा व्यक्तीकरता नियतीनं काही विशिष्ट कार्य राखून ठेवलेलं असतं त्यामुळे त्या व्यक्तीला मिळालेलं जीवनदान हीही नियतीचीच योजना असते.
‘प्राणीमात्रांवर दया करावी’ हा संदेश संत हे मनुष्यप्राण्यावर दया करुन खर्या अर्थानं आचरणात आणतात. कारण स्वार्थ, कृतघ्नता, शौर्याच्या नावाखाली केलेलं क्रौर्य हे दुर्गुण माणसाइतके इतर कुठल्याच प्राण्यात नसावेत. तरी ते मानवसमाजासाठी आपला देह सतत झिजवत राहतात. सापासारखा प्राणी हा दिसला की त्याला ठार मारायचं ही आपल्या डोक्यात पक्की असलेली कल्पना. पण आपण त्याला त्रास दिला नाही तर साप काहीही उपद्रव करत नाही, हे हरिबाबांनी एकदा एका सापाला मारायला निघालेल्या लोकांना पटवून दिलं.
असह्य आणि असाध्य झालेली पोटदुखी रोग्याला काहीतरी खायला देऊन बरी करणं ही गोष्ट बर्याच संतांच्या चरित्रात का बघायला मिळते, याचा विचार केला तर या किंवा मागच्या कुठल्या तरी जन्मात दुसर्याच्या पोटावर अन्याय करण्यामुळे त्याला ही पोटदुखी जडलेली असते हे संतांच्या लक्षात येतं. कर्म जाळण्याचं सामर्थ्य असणारे संत स्वतःची शक्ती खर्ची घालून दुःखितांचे दुःख दूर करतात. देवाला मलिदा अर्पण करण्याचा नवस पूर्ण न करण्यामुळे एका जणाला लागलेली असह्य पोटदुखी श्रीहरिबाबांनी अंतर्ज्ञानानं ओळखून त्याच्याकडून तो नवस पुरा करुन घेऊन बरी केली. सगळं ज्यानं आपल्याला दिलंय त्या देवालाच ‘मी तुला अमकं-तमकं अर्पण करीन’ अशी लालूच दाखवणं आणि काम होताच दिलेलं हे वचन सोयिस्करपणे विसरणं ह्या दोन्ही गोष्टी लीलया करणार्या माणसाच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच!
श्रीहरिबाबांनी नुसता स्पर्श केल्यामुळे रोग बरा होणं, विषबाधा दूर होणं वगैरे अनुभवही खूप लोकांनी घेतले. पण एकदा खुद्द हरिबाबांनाच पोटदुखीचा असह्य त्रास होऊ लागला. तेव्हा भक्तांनी बाबांना औषध घेण्याचा आग्रह केला. त्यावर बाबा म्हणाले, ‘अरे औषधानं रोगाचा नाश होईल, पण कर्मांच्या नाशाचं काय?‘ यातून बाबांना हेच सांगायचं होतं की कर्मांच्या फळातून माझीही सुटका नाही. अर्थात ही कर्म बाबांनी भक्तांच्या सुटकेसाठी त्यांची स्वतःच्या अंगावर घेतलेलीच कर्म बहुताशांनं असायची. हातानं काम करावं, पण मनात विठ्ठलाचं नाम असावं, संसार मनापासून करावा पण देवाचं विस्मरण होऊ नये, सुख किंवा दुःख; दोन्हीही जास्त मनात ठेवू नये, कोणाचाही अनुभव घेतल्याशिवाय त्याला चांगला किंवा वाईट ठरवू नये, आपल्या पूर्वकर्मांमुळे आपलं चित्त मलीन झालेलं असतं. त्यामुळे आपल्याला सत्पुरुष ओळखता येत नाही. अशा अगदी सोप्या शब्दांमध्ये हरिबाबा उपदेश करत.
सीताराम करंजकरांचा पांगळा मुलगा हरिबाबंानी त्याच्या डोक्यावर हात ठेवताच उठून पळू लागला हा लोकांना चमत्कार वाटला, परंतु संसारात पांगळे झालेल्या किती लोकांना बाबांनी उभं केलं त्याची गणती कोण करणार! बाबांच्या आशीर्वादानं पीक शतपटीनं वाढलं हा चमत्कार लोकांनी अनुभवला, पण बाबांनीच पेरलेलं भक्तीचं पीक किती पिढयाचं कल्याण करणारं ठरणार हे कोण बरं सांगू शकेल! मान-सन्मान, सोपस्कार या गोष्टी योगी माणसाचं नुकसान करायला कारणीभूत होतात. त्यामुळे योगी सत्पुरुष हे नेहमी आपण खुळे आहोत असाच सार्यांचा समज व्हावा असं वागतात. श्री हरिबाबांनीही तेच केलं. त्यामुळे त्यांना खर्या अर्थानं ओळखणार्या लोकांनीच त्यांच्यावर खरं प्रेम केलं. काहींनी त्यांची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तर कित्येकांनी त्यांच्या बाह्यरंगावरुनच त्यांना बाद ठरवून टाकलं. प्रत्यक्षात जीवनाची परीक्षा उत्तिर्ण होण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करणार्या गुरूंचीच परीक्षा घेणार्या लोकांची कीव करावी तेवढी थोडीच. पण अज्ञानी माणूस कोणत्या थरापर्यंत चुका करेल हे सांगणं अशक्य असतं. असो.
तर अशा रितीनं श्रीहरिबाबांचं जनकल्याचं कार्य त्या पंचक्रोशीमध्ये अविरतपणे चालू होतं. स्वतःच स्वतःचे मालक असलेले हरिबाबा त्यांच्या मनात येईल तसा सर्वत्र संचार करत. परंतु समस्या असलेल्या घरासमोर बोलावणं धाडल्याप्रमाणे अचानक दत्त म्हणून उभे रहात आणि त्या व्यक्तीला उपाय सांगून लगेच दिसेनासेही होत. हरिबाबा हे लोकांना प्राणवायुसारखे झाले होते. कारण समस्येचं निराकरण म्हणजे हरिबाबा हे सूत्रच झालं होतं. आणि समस्या नाही असा या जगात कोण बरं आहे? दिवसेंदिवस हरिबाबांचे भक्त वाढत चालले होते. आणि बाबांनीही लोकांची दीन अवस्था बघून आपल्या दयेचं आणि कृपेचं छत्र जास्तीत जास्त लोकांवर धरण्याचा प्रयत्न ठेवला होता. पण शेवटी मानवी देह धारण केला की सत्पुरुषांच्या जीवनालाही मर्यादा येतात. देहाचे सर्व भोगही त्यांना भोगणं क्रमप्राप्त होऊन जातं. बाबांची सेवा करणारेही खूप लोक होते. पण वयोमानाप्रमाणे देहाला येणारा थकवा कसा बरं दूर होणार? बाबा हे देहात असूनही विदेही अवस्थेत होते हे खरं असलं तरीही देहाच्या आधारानंच आत्मा काम करत असल्यामुळे देहाची कमी कमी होत जाणारी कार्यक्षमता सत्पुरुषांच्या कार्यावर परिणाम घडवतेच.
हल्ली हरिबाबांचा मुक्काम फलटण शेजारच्या मलठणमध्येच होता. काया थकलेली होती. त्यामुळे भ्रमंती जवळजवळ थांबली होती. कधी फिरायला जावसं वाटलं तर बाबा कुठल्या तरी भक्तांच्या खांद्यावर बसून जात. हरिबाबा धर्मशाळेत एका खोलीत रहात. त्या खोलीत भक्तमंडळी सतत भजन करत असत. श्रीहरिबाबांच्या आज्ञेप्रमाणे भक्तांनी रथसप्तमीच्या दिवशी धार्मिक कार्यक्रम करुन उत्सव साजरा करायला सुरुवात केली होती. पहिल्या वर्षी भक्तांनी भजन, अन्नदान आणि इतर धार्मिक कार्यक्रम करुन तो उत्सव साजरा केला. दुसर्या वर्षी रथसप्तमी जवळ आल्याबरोबर भक्तांना मागच्या वर्षीची आठवण झाली आणि मग सारे उत्साहानं कामाला लागले. सुंदर असा मंडप उभारला गेला. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्याचं पूजन करण्यात आलं. अळीअळीतून भक्तांच्या दिंडया निघाल्या. सारे निघाले होते उत्साहानं आणि भक्तिभावानं त्यांचं आराध्य दैवत असलेल्या श्रीहरिबाबांच्या दर्शनाला. दिवसभर त्या उत्सवमूर्तीसमोर भजनादी कार्यक्रम झाले. दुसर्या दिवशी महाप्रसाद झाला. भात, सांबार, लापशी असा बेत होता. आकंठ प्रसाद घेऊन सारे भक्तगण तृप्त झाले. तिसर्या दिवशी म्हणजे नवमीला संध्याकाळी रावजींचे चिरंजीव नारायणबुवा यांचं संत एकनाथ महाराजांच्या आख्यानावर कीर्तन झालं. पुढे दशमीला दहीहंडीचा कार्यक्रम होऊन या भक्तिजागराची सांगता झाली.
दुसर्या दिवशी म्हणजे एकादशीला श्रीहरिबाबांच्या खोलीमध्ये बाबांचा सेवक बाबांचे पाय चेपून देत होता. बाकीचेही काही भक्त बाजूला बसले होते. पण एका क्षणी अचानकच बाबांचे पाय एकदम गार वाटू लागले. एकानं, दुसर्यानं, तिसर्यानं हे पाहिल्यावर सगळेच हादरले. एका जणानं पटकन जाऊन वैद्यांना बोलवून आणलं. पण वैद्यांनी तपासताक्षणीच खिन्न आवाजात सांगितलं, ‘बाबांनी देह कधीच सोडलाय.....‘ ते शब्द तिथं असलेल्या शिष्यांच्या कानात उकळलेल्या शिसाच्या रसागत पडले अन् त्या खोलीत एकच रडारड सुरु झाली. रथसप्तमीच्या उत्सवाची कालच सांगता झाली. आणि सारे आनंदाचे डोही तरंगत असताना....... ही एकच लाट सार्यांना दुःखसागराच्या तळाशी घेऊन गेली? कुणालाच काही सुचत नव्हतं. तिथं आता दुःख आणि विरहाशिवाय काहीच नव्हतं. इतकी वर्ष फलटण आणि परिसरातल्या लोकांचा आधार बनलेला तो महापुरूष त्याच्या साम्राज्यात परत गेला होता....... अशक्य ते शक्य करणारा ईश्वरी जादुगार आज गुप्त झाला होता..... भक्तजनांचा कल्पवृक्ष आज अचानक सुकला होता...... अगदी साध्या भाषेत जीवनाचं तत्वज्ञान सांगणारा संत स्वधामाच्या वारीला गेला होता....... या देहाचं चीज सत्कर्म करण्यामध्येच आहे हे सांगणारा दिगंबर स्वतःचा सुगंध घराघराला देऊन स्वतःच्या घरी गेला होता........ दिसल्यापासून आजतागायत कुणालाही न उलगडलेला हा परमेश्वर आता अचानक आला तसाच अचानक गेला होता.
हळूहळू डोंगरावरच्या वणव्यासारखी ही बातमी सार्या भक्तांची मनं होरपळून काढत सर्वदूर पसरली, आणि काही वेळातच मलठणच्या दिशेनं लोकांचे लोंढेच लोंढे वाहू लागले. भजन-दिंडयाही येऊ लागल्या. भगवंताच्या आणि हरिबाबांच्या नामघोषानं मलठण दणाणून निघालं. पूर्वेच्या बाजूला हरिबाबांचा देह आसनस्थ करून ठेवण्यात आला होता. थोडयाच वेळात तिथं मुंगीलाही शिरायला जागा मिळणार नाही एवढी गर्दी झाली. आणि एक एक करुन सारे जण त्या दैवताचं अंत्यदर्शन डोळयांमध्ये साठवू लागले. खुद्द मालोजीराजे निंबाळकर हे देखिल दर्शन घेऊन गेले. त्यांनी केलेल्या सूचनेबरहुकूम पर्वतराव निंबाळकर यांनी त्रिजटेश्वराच्या आणि पुंडलिकाच्या मंदिराच्या मध्यावर सुंदर अशी समाधी बांधून घेतली. श्री मुधोजीराजे निंबाळकर हेही दर्शन घेऊन गेले.
त्यानंतर भक्तांनी बाबांना स्नान घालण्यासाठी पाणी तापवलं. गोविंदराव कानडे यांनी पुरुषसुक्त म्हणून बाबांना पंचामृताचा अभिषेक घातला. मंगलस्नान घातलं, त्यानंतर बाबांच्या डोक्यावर टोपी आणि अंगावर कफनी घालण्यात आली. कपाळावर केशराचा टिळा लावण्यात आला. त्यावर अक्षता लावल्या गेल्या. गळयात फुलांच्या माळा घालण्यात आल्या. टोपीवर तुळसीपत्रं ठेवली गेली. नंतर बाबांची पूजा आणि आरती झाली, आणि मग ढोल, ताशे, झांजा, शंख, शिंग, तुतारी, घंटा, दुंदुभी अशा वाद्यांच्या गजरात फुलांच्या विमानात बसवून त्या योगमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. पुंडलिकांच्या आणि त्रिजटेश्वराच्या मंदिराला उजवी घालून ती मिरवणूक समाधीस्थळी आली. समाधीच्या आतमध्ये उत्तम आसन तयार करण्यात आलं. त्यावर श्रीहरिबाबांना बसवण्यात आलं. शेजारी दोन नंदादीप जळत होते. सर्व विधी पूर्ण झाल्यावर जेव्हा समाधी बंद करण्यात आली, तेव्हा!‘ सद्गुरु हरिबुवा महाराज की जय’ च्या गगनभेदी घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला, समाधीच्या वरच्या भागावर महाराजांच्या कोरलेल्या पादुकांचंही पूजन करण्यात आलं. माघ शुध्द एकादशी शके १८२० (इ.स.१८९८) ला दुपारी ४.३० वाजता जरी हा सोहळा संपन्न झाला, तरी पुढे कितीतरी वेळ भक्तमंडळी या ठिकाणी खिळून होती!
श्रीहरिबाबांच्या दर्शनाला नित्यनेमानं येणारे लोक जरी खूप होते आणि हरिबाबांनी अगणित लोकांवर जरी कृपा केलेली असली, तरी समर्थ रामदासस्वामींना जसे कल्याण किंवा श्री गोंदवलेकर महाराजांना जसे केतकर बुवा तशा हरिबाबांना लाटे गावच्या मोरे घराण्याची सून झालेल्या गोजिराबाई या अधिकारी शिष्या होत्या. भक्ती आणि अधिकार या पूर्णपणे वेगवेगळया गोष्टी आहेत. भक्ती करणारे खूप भक्त किंवा शिष्य असले तरी तेवढा अधिकार प्राप्त केलेला शिष्य हा फार विरळा असतो. गोजिराबाईंना सारेजण ‘आईसाहेब’ या नावानं ओळखत आणि त्यांनीही असंख्य लोकांचं कल्याण करुन लाटे या गावीच देहत्याग केला. धन्य गुरु हरिबाबा आणि धन्य शिष्योत्तमा आईसाहेब.
शब्दांकन, संत साहित्याचे अभ्यासक श्री माधव उंडे
योग सम्राट श्री सद्गुरू हरीबाबा महाराज प्रकठी करण।ची पार्श्वभूमी
१) थोर भाग्य त्या फलटण नगरीचे. अयोध्येच्या वैभवाचे आणि पावित्र्याचे वरदान मिळालेली फलटण नगरी तू धन्य आहेस. महान तपस्वी फल्गु ॠषीची तू पवित्र भूमि आहेस. हटयोगाने परमपदाची प्राप्ति करून घेणाऱ्या योग पुरुषांची महान निर्वाणे तू पहिली आहेस. घन अरण्ये अस्मान् भेदी वृक्षराजी आणि फळाफुलांनी नटलेली लतापल्लावीची नयन मनोहर नितांत शोभा त्याकाळी इथेच विलासात होती. तपोनिधींचे हे अश्रामस्थान, गोधने,शिष्यामेळ।, हा त्यांचा परिवार,इथेच विहरताना दिसत होता. रामप्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेली हीच ती माती. वनवासात असताना राजा रामचंद्राने याच ठिकाणी बाणगंगेवर पितृतर्पण केले. कृष्ण लीलेच्या गुणसंकीर्तानाने भारावून गेलेल्या महानुभाव पंथाच्या लाल्स्त्जा[अलाच्जो. स्वामी चक्रधरांची तू कर्मभूमि हिंदवी साम्राज्याला जन्म देणाऱ्या श्री शिवाछ्त्रपतिनी आपली सुकन्या तुझ्या राजकुळात अर्पण करून विजयनगरच्या राजकुळाची नाती उजळली. आणि ती सगुणामाता! स्रीपावित्र्याचे ते सगुण रूप, राजयोगिनी, राज्या वैभवाचे ते सौभाग्य, निर्मल चारित्र्याच्या रूपाने इथेच अमर झाले. आणि तो फलटण राजकुलोत्पांन्न, पुण्यश्लोक, प्रजाहितदक्ष, मुधोजीराजा याच तुझ्या कुशीत जन्मला.
राजा मुधोजी तू धन्य आहेस. तुझी कीर्ती निष्कलंक आणि तू धर्मराजा म्हणूनच तुझ्या चरणांचे तीर्थ घेताच, माय् माउली, वेदनामुक्त होऊन सुखाने प्रसूत होत. राजा, लोक् कल्याणाची जाणीवच केवळ तुझ्या शासनांत प्रतिबिंबित होत होती आणि न्याय! न्याय म्हणावा तर पोटाच्या पुत्राचे बलिदान करून न्यायनिष्ठुरा, तू न्याय देवतेचा दर्प उतरविलास. असा हा राजा, राजधर्माचे पालन करी, प्रजा प्रजाधार्माचे पालन करी आणि साऱ्या राज्यात कुलधर्म,कुलाचार,नांदत असे. रामरूप प्रजा मानून वैभव निरासाक्तीने, त्या रामभक्त राजाने इथेच रामराज्य केले पावित्र्याच्या भाग्यश्रीने नटलेल्या, या पार्श्वाभूमुवर,योगासाम्राट हरी आले आणि हरीलीलेने तुझे जीवन भरून गेले. रामायण काळात श्रीराम आणि सीतामाई वनवासात असताना, एक वेळ अशी आली कि, सीतामाईना तहान लागली. त्यांनी रामरायाना, पाणी पिण्यास मागितले. परंतु जवळपास कोठेच पाणी नाही, असे पाहून त्या लोकाभिरामाने आपले धनुष्य सरसावून धरणीवर बाण मारला. त्या बाणाच्या प्रहाराने धरणातील खडक दुभंगून एक जलाचा ओघ निर्माण झाला. हीच ती शरगंगा, म्हणजेच बाणगंगा नदी! याच शरगंगेच्या तीरावर पुण्यपुरातन फलटणनगरी वसलेली आहे.
या फलटण नगरीचे आणि या नगरीच्या लोकोत्तर निंबाळकर राजघराण्याचे आद्य कुलदैवत श्रीराम नगरीच्या मध्यभागी भक्तांच्या सोहळ्यात, प्रसन्न मुद्रेने सदैव उभे ठाकले आहे. या राजनगरीच्या पुर्वापारीसरात, ज्याला उघडा मारुती म्हणतात, तो महारुद्र हनुमान उभा आहे. या मारुतीजवळ शके १७९७ (अश्विन शुद्ध द्वादशी) या दिवशी, इथे एक आगळीच घटना घडली. डोळे दिपवून टाकणारा प्रकाश येथे झळाळू लागला. जणू दुसरा सूर्यच. दिशा हेच ज्याचे वस्त्र, असा कोणी मुनीश्वर या उघड्या मारुतीजवळ सिद्धासन घालून, ध्यानमग्न स्थितीत बसलेला दिसला. एकाच ठिकाणी इकडे रुद्रावतार मारुती तर इकडे शेजरिओ चैतन्यमय वैश्नव हर, दुसरा हरी. दोन भिन्नाकुर्ती पण एकच प्रकृती. एकच अंतर्याम. या आगळ्या घटनेची वार्ता सर्व नगरीत पसरली आणि फलटण राज्याचे पुण्यश्लोक, राजाधिराज, मुधोजी महाराज, त्याचप्रमाणे फलटण नगरीची तमाम जनता या ठिकाणी धावून आली आणि त्य विदेही पराब्रम्हच्या दर्शने धन्य झाली. दर्शन घेतल्यानंतर, राजकुलभूषण मुधोजी राजे, आसनस्थ योगीराज,हरीबुबा समीप, समोरे आले, आणि दोन्ही कर जोडून,लवून, अत्यंत श्रद्धायुक्त आर्तवाणिने ते योगीराजाला म्हणाले "हे सिद्धपुरुषा. तुझ्या दर्शनाने माझी सारी नगरवासी जनता आणि मी धन्य झालो. तुझ्या नयनातून, विद्दुल्लतेसारखी तेजोवालये स्फुरताना पाहून आम्हास असे निश्चित वाटते कि तू साक्षात गौरीहरच येथे प्रगट झाला आहेस. देव आणि दैत्य समुद्र मंथन करीत असता, त्यात अत्यंत जहाल अशा हालाहल विषाची निर्मिती झाली. ते हालाहल देव दैत्यांनी तुला प्रासन करण्याची प्रार्थना केली. विराटपुरुषा ते विश्वदाहक विष, विश्व रक्षणासाठी तू प्राशन केलेस, आणि तुझ्या देहाचा दाहदाह होऊ लागला. शरीरातील तो दाह शांत करण्यासाठी तू कपाळी शीतल चंद्रमा धारण केलास. जटेत गंगाजले धारण केलीस, पण व्यर्थ. तुझ्या देहाला शांती लाभेना. शेवटी, रामनामाच्या जपानुष्ठानाने चिरंतन शितलतेची अवस्था तू अनुभविलीस. त्याच त्याच तुझ्या प्रभूरामचंद्राचा मी दासानुदास तुझी प्रार्थना करतो कि माझी पर्णकुटी तुझ्या चरण स्पर्शाने पावन कर."
हा महिपालक म्हणजे जगाचे पालन करणारा, तर तो महितारक, म्हणजे जगाचा उद्धार करणारा, हा राजवैभवाचा उपभोगशून्य स्वामी, तर तो भोगातीत, वासानाशुन्य स्वामी. हा राजयोगी,तर तो शुक्रयोगी. असे दोघेही एकाच अश्वराथात बसले आणि प्रासादाकडे निघाले. सनईच्या कोमल सुरातून स्फुरणाऱ्या रागदारीतून उमटणाऱ्या मंगल लहरी, जनमानसावर सात्विक प्रसन्नतेची वलये पसरवू लागल्या. झांज गरजू लागले. धोलीचे तांडवनाद घुमू लागले. शिपाई,प्यादे,घोड्याची पलटण, शिस्तबद्ध चाल, दाखवीत आणि मानकरी मंडळी आनंदी मुद्रेने हरीनाम गात दिमाखाने चालू लागले. रथावर भगवा ध्वज डुलू लागला. टाळ मृदंगाच्या तालावर भजने सुरु झाली. संतांच्या परमपावन अभंगवाणीने सारा परिसर दुमदुमून गेला. जनसागर आनंदाच्या भरतीने हेलावून गेला. अशा अभूपूर्व सोहळ्यात हरी राजगृही आला. हरीयोगी महाप्रासादात आला. भव्य आणि वैभवशाली त्या वस्तुत त्याला उंच शुभ्रसानावर बसविले. झगमगणाऱ्या दिपप्रकाशाने सारी वास्तू चमकू लागली. आसनाच्या चारीबाजूस सुवर्ण समयांचे विशाल दीप तेवू लागले. निरांजनाच्या माला निरामय वातावरणात शांत प्रकाश उजळू लागल्या. हरीला पंचामृताने आणि शुद्धोदकाने स्नान घातले. त्याच्या विशाल भाळावर सुगंधित केसरी गंधाचे विलेपन केले. उंची वस्त्रे नेसविली, आणि नानंविध फळे सेवानार्थ अर्पण केली. पण ! विकाराचा खंडन केलेल्या त्या विदेहीचा देह, वस्त्रे काय झाकणार ! ज्याची तहान आतली, भूक विटली, अशा त्या निर्विकार, निरांजनाची तहानभूक निराविण्यास विविध फळांच्या राशी रसहीन ठरल्या. नंतर त्या योगीराजाने आपला एक पाय मुधोजी राजांच्या मांडीवर ठेवला. राजाच्या मांडीवर योग्याचा पाय ! अनन्य भक्तीच्या पाठीवर मुक्तीच जणू विसावत होती. स्पर्शानुग्रह झाला. परस्पर भान उचंबळले. हा यती, हा भूपति, हा द्वैत भाव, मावळला! अव्दैत भावना स्फुर्त झाली. आणि भूपतीने सात्विक प्रेमाश्रुनी हरीचरणावर अभिसिंचन केले. नामजपाच्या सुमनमाला वहिल्या. अनन्य भावाच्या वस्त्राने हरी झाकून टाकला. या पूजेने मात्र हरी तृप्त झाला.
फलपत्तनाच्या पश्चिम परिसरात म्हणजे मलठणमध्ये आता या योगीपुरुशाचा आश्रम सजला. संत सज्जन आणि योगीजन भ्रांतमानवाच्या उद्धारासाठी या जगात अवतीर्ण होतात. हरीचे लीला कौतुक आता येथून सुरु झाले. फ वेडे ब्रम्ह दगडाचे टाळ करून विठ्ठलनामाचा अखंड घोष करीत उभे राही. विठ्ठलनामाचा चाळ लागून विठ्ठल विठ्ठल, हे अमृतबोल त्याच्या जिव्हेवर निरंतर नाचत असत. हरीच्या लीलार्ण्वात भाविक जीव नित्य रमू लागला. या वैराग्य मूर्तीची कोणी अनन्य भावाने सेवा करी तर कोणी अभाविक याची निन्दानालास्ती करीत. याला त्रास देत. असाच एक दिवस! हा परमहंस सहज लीलेने विठ्ठल नामाच्या घोषात बाण गंगेच्या डोहात अभावितपणे दगड भिरकावीत होता. त्यावेळी त्याच्या पाण्यात दगड टाकण्याने, जवळच धुणे धुणार्या मोलकरणीच्या अंगावर पाणी उडाले. हे वृत्त त्या मोलकरणीने आपल्या ब्राम्हण मालकास सांगताच, तो ब्राम्हण संतापून तेथे आला. त्याने हरीच्या दोन्ही हचाची बोते एका दगडावर पालथी ठेवली आणि दुसर्या दगडाने त्या बोटावर प्रहर करून बोते फोडली. हरीची बोटे फुटली. त्यातून घळघळा रक्त वाहू लागले. हे पाहून जवळच असणाऱ्या चार भाविकांनी हरीला नेऊन राजा मुधोजीपुढे उभे केले.ते दृश्य पाहून राजाही कळवला आणि त्याने हरीला, वेड्या परब्रम्हाला प्रस्न केला. योगीमहाराज, कुणी हो तुमची बोटे फोडली? या प्रश्नाला उत्तर आले– विठ्ठल! विठ्ठल! विठ्ठल! राग, द्वेष, सूड, सर्व काही हरीने हद्दपार केले होते. आणि उरला होता तो एक– विठ्ठल! विठ्ठल! विठ्ठल! वसंत ऋतूच्या तप्त उन्हाळ्यात अग्निकानासारख्या तप्त वाळूवर हा वेदना आणि संवेदानातील हर शांतपणे झोपी जाई. तो स्वयेच पंचतत्व झाला. त्याच्यापुढे अग्नीचा काय पदिभार!
आणि एकदा काही नास्तिकांच्या कारवाईने राजाशासनाला या लीला ब्राम्हला बंदिशाळेत जखडून ठेवावे लागले. परंतु नंदर पाहतात तो काय १ हरी बंदिशाळेत नाही. शासनसंस्था चकित झाली. जन्म मृत्यूची विशाल कोंडी फोडणाऱ्या सिद्ध पुरुषाला टी बंदिशाला, टी शृंखला, रोधू शकत नाही. काही म्हणत हा वेडा! पण ऐहितक्तेच्या वेडाने झपाटलेल्या वेड्यांचे वेड काढणारा हा देवर्षी, आणि भाविकावर कृपेचे अमृत सिंचन करणारा हा महान कृपासिंधु. जे जे हरीला शरण गेले त्यांचे मनोरथ हरीने पूर्ण केले.
योग सम्राट श्री सद्गुरू हरीबाबा महाराज (मलठण) हरिलीला
१) फलटण नगरीच्या पश्चिमेला नांदल गावाचे एक लहानसे गाव. त्या गावात, त्या वाली बळराम मुजुमले नावाचा वाणी रहात होता, त्याच्या पत्नीचे नाव सखुबाई आणि पुत्राचे नाव शंकर. शंकर हा मुका, पंगु, आणि वेडा होता. असा तो पुत्र. आणि तोही एकच. त्या दिन्दुबाल्या दाम्पत्याला वाटे– प्रपंच गद्याची धुरा पुढे ओढून नेणारा समर्थ पुत्र आपल्याला झाला नाही, आणि यापुढे होण्याची आशाही नाही. पुढे प्रपंचाचे कसे होणार? आम्ही उभयता पुढे वृध्द झालो, थकलो, आणि बसली जागा उठवेनसे झाल्यावर, आम्हाला तांब्याभर पाणी कोण देणार! या चीन्ताज्वालानी त्या भोळ्या भाबड्या जीवांचे जीवन करपून चालले होते. अशा वैफल्याच्या मनस्थितीत निराश जीवन चालले असता एक दिवस सखू आपल्या पतीला म्हणाली, माझ्या मनात आज एक विचार आला आहे. हरीयोग्याची खंड ण पडता भक्ती भावाने वारी केली तर, आपला मनोरथ पूर्ण होऊन आपल्याला सुपुत्र होईल. मला वारी करायला परवानगी द्याल का? पत्नीची हि आर्त आणि श्रद्धाळू याचना एकूण बळराम संतुष्ट झाला, आणि म्हणाला, पतिव्रते, जा, भक्तिभावाने हरीची वारी कर. साधू चरणी तुझे चित्त जडो, पती पत्नीचे असे मंगल नाते आहे. जिथे पती आणि पत्नी एकमेकांना पूज्य मानतात, पत्नी पतीला देव मानते आणि पती, पत्नीला देवता मानतो. अशा दाम्पत्याच्या संसारात सुखसमृद्धीची गंगा अखंड वाहात राहील.
सखू हरीची वारी करू लागली. भाबड्या महिलेची ती भोळी भक्ती पाहून हरीमाउली प्रसन्ना झाली. आणि म्हणाली "माई तुझे मनोरथ पूर्ण होतील. फलटणचा रामभक्त राजा मुधोजी अवतारी पुरुष आहे. त्यांच्या पायाचे तीर्थ घे. जा. तुला सुपुत्र होईल." हि वरवाणी एकूण सखूने सद्गुरुचारणावर मस्तक ठेविले. आणि तडक घरी येऊन झालेली सर्व हकीकत तिने आपल्या पतीला सांगितली. त्या भाविक पुरुषाने पुण्याप्रताप मुधोजीराजांच्या चरणांचे तीर्थ आणून सखुबाई हिस प्राशन करण्यास दिले. दिवसा दिवस गेले. साखुची श्राद्धावेल पल्लवित होऊ लागली. आणि एक दिवस त्य वेलीला फळ लागलेले दिसले. हरीकृपेने सखुला पुत्ररत्न झाले.
२) ब्रम्हचैतन्य हरीबुवाच्या दिव्या दृस्तिक्षेपाने आणि स्पर्शाने, मृत्यूचे फर्मान घेऊन दारी उभा थकलेला कृतांत यमही मागे फिरला. फलटण नगरीत आबा गोसावी नावाचा हरिदास वृत्तीचा एक ब्राम्हण राहत होता. त्याला महामारीचा आजार झाला. निरनिराळे वैद्य झाले. निरनिराळी औषधे झाली. पण रोग हटेना. तो जास्तच विकोपाला गेला. सर्व उपाय हरले. आणि शेवटी, अबाचा क्षीण देह धरणीवर निश्चेष्ट पडला. काळाच्या शरसंधानाने आबाचे पंचप्राण कासावीस केले. घरातील सर्व कुटुंबीय, आप्त, मित्र, आणि इतर जन त्या निश्चेष्ट देहाभोवती गोळा झाले. त्याच्या पत्नीने हंबरडा फोडला. ती टाहो फोडून म्हणाली, देवा, तू का रे डोळे झाकालेस? देवा, पतीच्या निधनाने मी अनाथ नारी होईन, आणि उपेक्षित म्हणून! दुःखाच्या सागरात बुडू लागल्यावर मला कोण रे वर काढील? माझ्या पतीच्या मृत्यूचे फर्मान मागे फिरविण्यास, हरी योग्य, तूच समर्थ आहेस. यतिराज, स्री जातीचा शापित लेण म्हणजेच या जगांत वैधव्याच जिण जगणे ! उभय कुळातील मान, इभ्रत, जागविण्यासाठी विधवेला रोज जिवंत मरणच जगावी लागतात हो! हरी परब्रम्हा, मला चुडेदान दे, दिन अनाथ आणि भाविक जीवासाठी आपल्या कृपेचे अमृत सिंचन करून, भाजकाचे कल्याण करणारा दिनादायाळू हरी तेथे धावत आला. आबाच्या निश्चेष्ट देहावरून त्याने हात फिरविला आबा शुद्धीवर आल्याप्रमाणे जागा झाला. विप्रपत्नीने हरीचरणावर लोटांगण घातले.
सद्गुरू हरी तुझा महिमा धन्य आहे!
योग सम्राट श्री सद्गुरू हरीबाबा महाराज (मलठण) यांच्या महान शिष्या आईसाहेब लाटे
फलटणहून सुमारे ६ मैलावर बारामती तालुक्यांत नीरा नदीच्या उत्तर तीरावर लाटे हा गाव आहे. या गावचे त्या वेळचे श्रीयुत रघुनाथराव उर्फ दादा मोरे यांच्याशी एका बाल कन्येचा वयाचे पाचवे वर्षी विवाह झाला. त्या बाल कन्येचे माहेरचे नाव गजराबाई. आणि दादा साहेबांच्या आईचे नाव बयाबाई. या बाय बाईची हरीयोग्यावर निस्सीम भक्ती होती. हरीयोगी पनदारेस जाताना वाटेत लाटे मुक्कामी त्यांचेकडे थांबत असत. असेच एकदा श्री हरीयोगी अचनक लाटण्यास श्री मोरे यांचे घरी आले. त्यावेळी जवळच बयाबाई हिची सून बाल सुवासिनी गजराबाई उभ्या होत्या. त्यांनी सद्गुरूला नमस्कार केला. त्यावेळी श्री हरीने गजराबाई हिच्या डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर योगीराजाचा हात स्थिरावताच गजराबाई हिचे अंग थरारले, वाणी स्तब्ध झाली, डोळे मिटले, षटचक्र जागृत झाली आणि निर्मोह, निरासक्त, निरन्जान्वृत्ती गजराबाई हिचे ठाई उदित झाली. ती बाल सुवासिनी आता बाल योगिनी झाली. भक्तांची माउली झाली. सद्गुरूचा अनुग्रह होताच नाती तुटली. चीदानंदामय काया झाली. जन्म मरणाची खंत सरली. आणि हरी संकीर्तन गात, गात, आई हरिपदी लीन झाली. आई तुझे चरित्रे गाता गाता, आमची वाणी कुंठीत होते.
निरामाई म्हणजे नीरा नदी. घावत आली आहे. तिला सौभाग्य आहेर आणा. हळद, कुंकू लावा. हि कोकणची माया ! देशावर नांदायला आली. कोकण तिचे माहेर. देश तिचे सासर, ती माहेराहून सासरी येत आहे. हिने माहेरची म्हणजे कोकणाची सर्व संपत्ती लुटली, आणि सासरी म्हणजे देशावर आणून भरली. हिने सासरचा संसार एवढा वाढविला कि हिची संपत्ती पाहून कुबेराने लाजावे. हिच्या सासरी म्हणजे देशावर मोत्या पोवळ्यांच्या राशी रानोरान पसरल्या आहेत. हे श्रीमान, सुजलाम आणि सुफलाम, निराबाई तुझ्या कलीच हरीयोग्याच्या अनुग्रहाने, महान स्वाधीपद प्राप्त झालेली आई समाधिस्थ झाली आहे. ती वैराग्यदेवता. देवाहून देव जर कोणी रंजले गांजले असतील, ते या आईच्या पायी धाव घेतात आई, तुझा लाटेगाव म्हणजे आमच्या घरी आलेली कशी, आणि तुझे पाय म्हणजे आमच्या सौभाग्याच्या राशी.
संपर्क:
श्री सद्गुरू हरिबुवा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट
फलटण, जिल्हा सातारा.
फोन: ०२१६६-२२०३३४.
अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज श्री सद्गुरु हरिबाबा महाराज की जय !