सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या जन्मगावी अंतापूर येथे एक छानसे मंदिर आहे. या मंदिरात गर्भगृहामध्ये श्रीशंकरमहाराजांच्या मूर्तीसह शिवलिंग स्थापन्यात आले आहे. गर्भगृहाच्या उजव्या बाजूस स्वतः श्रीशंकरमहाराजांनी भूमीतून वर काढलेली श्रीगणेशमूर्ती, शिवलिंग व नंदी स्थापिले आहे. तर मारुतीराया स्वतंत्रपणे या मंदिरासमोरच एका छोट्याशा मंदिरात विराजमान आहेत. सध्याच्या मंदिराचे जे गर्भगृह आहे त्याच्या डाव्या बाजूस फार पूर्वी मोठी चिंच होती. त्याच्या मुळाशीच श्रीगणेश, नंदी व श्रीमारुती सापडले, तो प्रसंगही फार विशेष आहे.
महाराजांचे अंतापूरमधील एक वंशज गोविंद हिरे यांना श्रीशंकरमहाराज एकदा म्हणाले की, चल! तुला डबोल काढून देतो. हे ऐकताच गोविंद हिरे एकदम आशातूर झाले. डबोल म्हणजे फार मोठा लाभच होणार व दारिद्र्य विवंचना संपणार असे गृहीत धरून ते महाराजांसमवेत निघाले. काही गावकरीही आले. महाराजांनी सर्वाना चिंचेखाली खणण्यास सांगितले. काही फुटांवरच या मूर्ती सापडल्या. गोविंद हिरेंच्या कल्पनेतले डबोले मिळाले नाही तरी देवता मूर्ती सापडल्याने सर्वच हरखून गेले. मग मूर्ती वर काढण्याचा प्रयत्न सुरु झाला. मारुतीरायाची मूर्ती काही केल्या वर येईना. तेव्हा त्या मूर्तीला दोरखंड बांधून पुढे दोन रेड्यांस खेचण्यासाठी जुंपण्यात आले. पण मूर्ती तसूभरही हलेना. एका बाजूस स्वानंदमग्न अवधुतमुर्ती श्रीशंकरमहाराज सारी गंमत न्याहाळत होते. ते पुढे होऊन खड्यात उतरले. त्यांनी मूर्तीला केवळ आपली करांगुली लावली. मग काय ! पुढच्याच मिनिटात श्रीमारुतीराया खड्याबाहेर दाखल झाले! अन्य मुर्तीनाही श्रीशंकर महाराजांनी स्पर्श करताच त्या विनासायास बाहेर निघाल्या.
जय शंकर !