|| रुद्राक्ष ||

रुद्राक्ष
रुद्राक्ष

रुद्राक्षाच्या वृक्षालाच रुधिरवृक्ष असे म्हणतात. त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव 'एलिओकार्पस स्फेरिकस' असे आहे. हा सदाहरित वृक्ष हिमलयाच्या पायथ्याच्या डोंगराळ प्रदेशाच्या जंगलात आढळतो. साधारणतः समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवर ही झाडे कपारित चांगली वाढतात. रुद्राक्षाचे झाड ८ ते १२ मीटर उंच असते. त्याची साल गडद करडी असते. या झाडाचे लाकूड, हलके, मजबूत व चिवट असते. फळ्या, खोकी, कपाटे बनवण्यास त्याचा उपयोग होतो. या झाडाची पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी पण टोकदार, थोडी, लांब असतात. या वृक्षाला पानांच्या बंगलेत लोंब्या येऊन पांढरीशुभ्र, मंद वासाची फुले येतात. एप्रिल ते जुलै या काळात या वृक्षाला बोराच्या आकाराची गोल, जांभळट रंगाची फळे येतात. या फळातील गर आंबट चवीचा पांढुरका व चिकट असतो. मेंदुचे विकार व अपस्माराचे झटके या विकारावर तो औषध म्हणून उपयोगी आहे. ही फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात. आतील बी ला रुद्राक्ष म्हणतात. ती कठीण आवरणाची व नक्षीदार असते खर्‍या रुद्राक्षाला आरपार भोक असते. त्याला वाहिनी म्हणतात. रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो पक्का असतो. हा पाण्यात टाकल्यास सरळ खाली जातो. त्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म असतात. टांगलेल्या स्थितीत ते दक्षिणोत्तर दिशा दाखवतात. त्यांना किड लागत नाही. रुद्राक्ष हातात धरला तर स्पंदने जाणवतात. उच्च रक्त दाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रुपात परिधान केला जातो. अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे. हिंदू, बौद्ध, शीख व मुस्लिम धर्मामध्येही रुद्राक्ष पवित्र मानतात. कोणत्याही देवतेचा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ वापरतात. 

रुद्राक्ष
रुद्राक्ष

रुद्राक्ष महिमा व इतिहास

नारद-नारायण संवाद

रुद्राक्ष-महिमा आपल्या अनेक शास्त्रांतून सांगितला आहे. 'देवी भागवतात सांगितले आहे की स्नानादीने निवृत्त होऊन शुध्द वस्त्र परिधान कराव व भस्म लावून रुद्राक्षमाला धारण करावी. नंतर विधिसहित मंत्र जप करावा. जर बत्तीस रुद्राक्ष गळ्यात, चाळीस मस्तकाभोवती, सहा सहा दोन्ही कानात, बारा बारा दोन्ही हातात, सोळा सोळा दोन्ही भुजात, एक शेंडीत, तसेच एकशे आठ रुद्राक्ष वक्षस्थळी धारण केल्यास, धारण करणारा स्वतः नीलकंठ शीव बनतो .रुद्राक्षास सोने किंवा चांदीच्या तारेत ओवून शेंडीत व कानात धारण करावे. यज्ञोपवीत, हात, कंठ व पोटावर रुद्राक्ष धारण करुन पंचाक्षर मंत्र 'नमः शिवाय' चा जप करावा.विद्वान पुरुषाने प्रसन्न मन व निर्मल बुध्दीने रुद्राक्ष धारण करावेत. कारण तोच शिव ज्ञानाचे प्रत्यक्ष साधन आहे. जो पुरुष रुद्राक्ष शेंडीत धारण करतो त्याच्यासाठी रुद्राक्ष तारक तत्त्वा (ओंकार) प्रमाणे महान आहे. दोन्ही कानात धारण केलेले रुद्राक्ष साक्षात शिव स्वरुप आहेत.यज्ञोपवीतामध्ये धारण केल्यास रुद्राक्ष वेदांप्रमाणे असतात. हातांत धारण केल्यास दिशाप्रमाणे, तसेच कंठात धारण केल्याने सरस्वती व अग्निदेवतेप्रमाणे महिमावान असतात .रुद्राक्ष धारणाचा निर्देश चारी आश्रमांत व चारी वर्णांत केलेला आहे. रुद्राक्ष धारण करतात ते साक्षात रुद्राक्ष बनतात. रुद्राक्ष धारण करणार्यांना निषिध्द दर्शन, निषिध्द श्रवण, निषिध स्मरण, निषिध्द वस्तूपासून दोष लागत नाही. जरी तो निषिध्द वस्तू हुंगेल, निषिध्द पदार्थ खाईल किंवा निषिध्द मार्गक्रमण करील तरी तो पापमुक्त रहातो. जरी रुद्राक्ष धारण केलेला मनुष्य कोणाकडे जेवला तर साक्षात रुद्राने जेवण केले असे मानावे. जो मनुष्य रुद्राक्ष धारण करणार्यास श्राध्दास जेवण घालतो त्यास पितरलोकाची प्राप्ती होते. जे लोक रुद्राक्षधारीचे चरण धुवून ते जल पितात ते सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोकात जातात. जे मनुष्य भक्तिसहित रुद्राक्षयुक्त स्वर्णाभूषण धारण करतात, ते रुद्रत्व प्राप्त करतात.

रुद्राक्ष
रुद्राक्ष 

रुद्राक्षोपाख्यान

रुद्राक्षाचा अशा प्रकारचा महिमा ऐकून नारदांनी प्रश्न केला "हे निष्पाप! आपण अशा प्रकारे रुद्राक्षमहिमा वर्णन केलात त्यात महान पुरुषद्वार त्याचे पूजन का करावे ते सांगा. "नारायणाने सांगितले" हे मुने ! जो प्रश्न आपण विचारीत आहात तोच प्रश्न एका वेळी भगवान गिरीजानाथाना कुमार स्कन्दाने विचारला होता. त्यावेळी भगवान शंकराने जे उत्तर दिले ते तुला सांगतो.

शुणु षण्मुख तत्त्वेन कथयामि समासतः । त्रिपुरो नाम दैत्यस्तु पुराऽऽसीत्सर्वदुर्जयः ॥
हे षण्मुख ! रुद्राक्ष तत्त्वाविषयी कथन करतो.प्राचीन काली त्रिपुरनामक एक दुर्जन दैत्य होता.

हस्तास्तेन सुराः सर्वे ब्रह्मविष्णवाऽदि देवताः ॥ सर्वेस्तु कथिते तस्मिंस्तदाऽहं त्रिपुरं प्रति ॥
जेव्हा त्याने ब्रह्मा विष्णू इत्यादी सर्व देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा त्या सर्व देवतांनी त्रिपुरासुरास मारण्याची मला विनंती केली.

अचिन्तयं महाशस्त्रमघोराख्य मनोहरम्सर्व देवमयं दिव्यं ज्वलंतं वीररुपि यत् ॥
तेव्हा मी एक सर्व देवतायुक्त, दिव्य, जाज्वल्यमान, वीरस्वरुप 'अघोर' संज्ञक मनोहर महाशस्त्राची कल्पना केली.

त्रिपुरस्य वधार्थाय देवनां तारणाय च । सर्वविघ्नोपशमनमघोरास्त्रमचिन्तयम् ॥ दिव्यवर्ष सहस्त्रं तु चक्षुरुन्मीलितं मया । पश्चन्ममाकुलाक्षिभ्यः पतिता जलबिन्दवः ॥
त्रिपुरासुरास मारणे, देवतांचे रक्षण करणे, तसेच सर्वं विघ्ने दूर करण्यासाठी उन्मीलित नेत्रांनी त्या अघोरास्त्राच्या रचनेविषयी विचार करीत असता माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .

तत्राश्रुबिंदुतो जाता महारुद्राक्ष वृक्षकाः । ममाज्ञया महासेन सर्वेषां हितकाम्यया ॥
नेत्रातील त्या अश्रूंचे रुद्राक्ष वृक्ष बनले. ते माझ्या आज्ञेने सर्व जीवांचे हित साधणारे आहेत.

बभूवस्ते च रुद्राक्षा अष्टत्रिंशत्प्रभेदतः । सूर्यनेत्र समुद्भूताःता कपिला द्वादशस्मृताः ॥
ते रुद्राक्ष ३८ प्रकारचे झाले. त्यात माझ्या सूर्य नेत्रा ( उजव्या नेत्रातून ) तून कपिलवर्णाचे बारा प्रकारचे रुद्राक्ष उत्पन्न झाले .

सोमनेत्रोत्थिताः श्वेतास्ते षोडशविद्याः क्रमात् । वन्हि नेत्रोद्भवाः कृष्णा दशभेदा भवन्ति हि ॥
माझ्या सोम नेत्रातून ( डाव्या नेत्रातून ) श्वेत वर्णाचे सोळा प्रकारचे व अग्निनेत्रातून (तृतीयनेत्र) कृष्णवर्णाचे दहा प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झाले .

श्वेतवर्णश्च रुद्राक्षी जातितो ब्राह्म उच्यते । क्षात्रो रक्तस्तथा मिश्रो वैश्यः कृष्णास्तु शूद्रकः ॥
श्वेत वर्णाचा रुद्राक्ष ब्राह्मण जातीचा, लाल रंगाचा रुद्राक्ष क्षत्रिय जातीचा, मिश्रित रंगाचा वैश्य जातीचा व काळ्या रंगाचा शूद्र जातीचा असतो.

एकवक्त्रः शिवा साक्षाद् ब्रह्महत्त्यां व्यपोहति ।द्विवक्त्रो देवदेव्यौस्याद् विविधं नाशयेदघम् ॥
एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवरुप तसेच ब्रह्महत्या दूर करणारा आहे. दोन मुखी रुद्राक्ष देवीदेवतास्वरुप तसेच विविध पापांचा नाशक आहे.

त्रिवक्त्रःस्त्वनलः साक्षात्स्त्रीहत्यां दहति क्षणात् । चतुर्वक्त्रः स्वयं ब्रह्मा नरहत्यां व्यपोहति ॥
तीनमुखी रुद्राक्ष अग्निरुप असून स्त्रीहत्यारुप पापांचा नाश ( भस्म ) करणारा आहे. चतुर्मुखी रुद्राक्ष स्वयं ब्रह्मास्वरुप व नरहत्यानाशक आहे .

पत्र्चवक्त्रः स्वयं रुद्रः कालाग्निनमिनामतः । अभक्ष्य भक्षणोद्भ्तैरगम्यागमनोद्भवैः ।मुच्यते सर्व पापैस्तु पंचवक्त्रस्य धारणात् ॥
पंचमुखी रुद्राक्ष स्वतः कालाग्निनामक आहे. तसेच अभक्ष्य भक्षण व अगम्या गमनाचे पाप दूर करणारा आहे. या रुद्राक्षाच्या धारणेने सर्वं पापे नष्ट होतात.

षड वक्त्रः कार्तिसेयस्तु सा धार्यो दक्षिणे करे । ब्रह्महत्यादिभिः पापैः मुच्यते नात्र संशय ॥
सह्य मुखी रुद्राक्ष कार्तिकेय स्वरुप असून उजव्या भुजेवर बांधावेत. हा ब्रह्महत्येपासून मुक्त करणारा आहे.

सप्तवक्त्रो महाभागो ह्यनंगो नाम नामतः । तध्दारणान्मुच्यते हि स्वर्णस्तेयादि पातकैः ॥
सप्तमुखी रुद्राक्ष अत्यंत भाग्यशाली तसेच अनंग नामक कामदेव स्वरुप असून, त्याचे धारण केल्यास स्वर्णचोरी इत्यादी पापांपासून मुक्ती मिळते.

आजकाल खोटे रुद्राक्षही विकले जातात. भद्राक्ष व विकृताक्ष नावाची झाडे असतात. त्यांच्या बिया रुद्राक्षाच्या झाडांसारख्याच असतात. पण या बियांना भोक नसते. ते सुईने पाडले जाते. तसेच यांना काताच्या पाण्यात ठेवून त्यांना तांबूस रंग दिला जातो. त्यांमुळे असे खोटे रुद्राक्ष पाण्यात ठेवले तर त्याचा रंग धुतला जातो. हे खोटे रुद्राक्ष पाण्यावर तरंगतात. आणि त्यामध्ये चुंबकीय गुणधर्म नसतात. तेंव्हा रुद्राक्ष विकत घ्यायचा झाल्यास वरील गुणधर्म पाहूनच विकत घ्यावा. विशिष्ट रोग निवारण्यास रुद्राक्षाच्या माळा गळ्यात,दंडात, मनगटात, कमरेभोवती घालतात. रुद्राक्षावर पाणी ओतून ते पाणी पितात. काही वेळा आजार्‍याच्या उशी खालीही ठेवतात. रुद्राक्षाबद्दल काही समजुती पुढीलप्रमाणे;

  • एकमुखी रुद्राक्ष--- ही रुद्राक्ष दुर्मिळ असून शिवाचे रूप समजला जातो. ही ज्याच्याजवळ असेल त्याला शत्रू असत नाहीत. व त्याच्या घरात लक्ष्मी निरंतर वास करते असे म्हणतात.
  • दोनमुखी रुद्राक्ष--- हा रुद्राक्ष म्हणजे शंकर पार्वतीचे एकत्र रूप समजले जाते. 
  • तीनमुखी रुद्राक्ष--- अग्नीरूपात असलेला हा रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही असे म्हणतात.
  • चारमुखी रुद्राक्ष --- याच्या पूजनाने धनप्राप्ती होते व असलेला पैसा अस्थानी खर्च होत नाही असे म्हणतात. 
  • पाचमुखी रुद्राक्ष--- हा रुद्राक्ष काळाचा शत्रू असून याच्या पूजनाने अकाली मृत्यु येत नाही 
  • सहामुखी रुद्राक्ष--- कार्तिकेय स्वरूपात याची गणना केली जाते व तो शक्तीवर्धक समजला जातो.  
  • सप्तमुखी रुद्राक्ष--- याच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात. 
  • अष्टमुखी रुद्राक्ष--- याला गणेश रूप मानून कार्यसिद्धीसाठी याची पूजा केली जाते. 
  • नऊमुखी रुद्राक्ष--- काळभैरवाचे स्वरूप समजून बाधा, पीडा, टळावी म्हणून याची पूजा केली जाते. 
  • दहामुखी रुद्राक्ष--- जनार्दन स्वरूपात याची गणना होते. 
  • अकरामुखी रुद्राक्ष--- याच्या पूजनाने इंद्रदेवता व अकरा रूद्र प्रसन्न होतात. 
  • बारामुखी रुद्राक्ष--- सूर्यस्वरूपी या रुद्राक्ष पूजनाने महाविष्णू प्रसन्न होतात. 
  • तेरामुखी रुद्राक्ष--- याच्या पूजनाने सिद्धी प्राप्त होते. 
  • चौदामुखी रुद्राक्ष--- रोगनिवारण होऊन इच्छा पूर्ती होण्यासाठी याची पूजा करतात. 
  • पंधरावा गौरीशंकर रुद्राक्ष--- एकाच देठावर दोन मणी काही वेळा सापडतात, किंवा एकाच देठावर तीन रुद्राक्ष येतात, त्यांना ब्रम्हा, विष्णू, महेश किंवा दत्तस्वरूप समजले जाते.

रूद्राक्ष माहिती

"जे रडणार्‍याकडून त्याचे दुःख घेण्याची आणि त्याला सुख देण्याची क्षमता असलेल रुद्र ± अक्ष’ या दोन शब्दांपासून रुद्राक्ष हा शब्द बनला आहे.

  • अक्ष म्हणजे डोळा. रुद्र ± अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो, (उदा. तिसरा डोळा) तो रुद्राक्ष. अक्ष म्हणजे आस. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो; म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात.
  • रुद्र म्हणजे रडका. ‘अ’ म्हणजे घेणे आणि ‘क्ष’ म्हणजे देणे; म्हणून अक्ष म्हणजे घेण्याची किंवा देण्याची क्षमता.
  • रुद्रवृक्ष (रुधिरवृक्ष, रुद्राक्षवृक्ष)

रुद्रवृक्ष निर्माण होण्याचे पौराणिक विवेचन

तारकापुत्र अधर्माचरण करू लागल्याने विषादाने शंकराच्या नेत्रांतून पडलेल्या अश्रूंचे ‘रुद्राक्षवृक्ष’ होणे आणि शिवाने तारकापुत्रांचा नाश करणे.
तडिन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष या तारकापुत्रांनी धर्माचरण अन शिवभक्ती करून देवत्व प्राप्त करून घेतले. काही कालावधीनंतर ते अधर्माचरण करत असल्याचे पाहून शंकर विषादग्रस्त झाला. त्याचे नेत्र अश्रूंनी डबडबले. त्याच्या नेत्रांतील चार अश्रूबिंदू पृथ्वीवर पडले. त्या अश्रूंपासून बनलेल्या वृक्षांना ‘रुद्राक्षवृक्ष’ म्हणतात. त्या चार वृक्षांपासून तांबडे, काळे, पिवळे आणि पांढरे रुद्राक्ष निर्माण झाले. नंतर शिवाने तारकापुत्रांचा नाश केला.’

शास्त्रात उल्लेख

देवीभागवत, शिवलीलामृत, शिवपुराण, स्कंदपुराण, पूरश्र्चरण- चंद्रिका, उमाम्हेश्र्वर तंत्र श्रीगुरुचारीत्र इत्यादी ग्रंथातून रुद्रक्षाचे विस्तुत वर्णन आढळते. याशिवाय रुद्राक्षजाबालोपनिषद नावाचे उपनिषद केवळ रुद्राक्षाच्या विविध पैलूवर प्रकाशझोत टाकते, परंतु या सर्व ग्रंथांतून त्याची उत्पत्ती, गुणधर्म, धारणविधी, उपचार पद्धती वैगेरे बाबतीत एकवाक्यता आढळत नाही आणि म्हणून नेमका कोणता ग्रंथ प्रमाणभूत मानावा असा अभ्यासकाच्या मनात संभ्रम निर्माण होतो.

श्रीगुरू चरित्र उल्लेख (आ. 33 वा)

श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो. त्याला कोणतेही पाप लागत नाही. रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे. त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही. जो मनुष्य एक हजार रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो. अशा माणसाला सर्व देव वंदन करतात. एक हजार रुद्राक्ष मिळू शकले नाहीत, तर एकशेआठ रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी. त्या माळेत नवरत्ने गुंफावीत.रुद्राक्ष हे सर्वपापनाशक आहेत. ते हातांवर, दंडावर, मस्तकावर धारण करावेत. रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजेसमान फळ देणारा आहे. एकमुखी, पंचमुखी, एकादश-मुखी, चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात. रुद्राक्ष खरे, अस्सल मिळाले तर उत्तमच. तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत. त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते.

रुद्राक्ष परीक्षा

१) पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठल्याही आकाराचे असले तरी पाण्यात टाकल्यावर बुडते. पाण्यामध्ये चटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही. जे पाण्यात हळुवार पणे बुडेल ते खोटे, अथवा हलक्या दर्जाचे समजावे.
२) रुद्राक्ष हे पाच-दहा मिनिटे तळहातात घट्ट दाबून धरले आणि नंतर हलवले तर त्यातून मंजुळ ध्वनी प्रतीत होतो. 
३) तांब्याच्या २ भांड्यामध्ये व तांब्याच्या २ पटत्यांमध्ये रुद्राक्ष ठेवले असता अस्सल रुद्राक्ष लगेचच हालचाल दर्शवतो. 
४) खरा रुद्राक्ष जसा तरंगत नाही तसा उकळत्या पाण्यात जर ६-८ तास ठेवला तरी त्याचे विघटन होत नाही. आणि रुद्राक्ष हे कुठल्याच बाजूने मोडत नाही वाकत नाही. 
५) अस्सल रुद्राक्ष बराच वेळ दुधात ठेवला तर दूध नासत नाही.
६) रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो. तो दिसायला काटेरी पण ते काटे बोथट असतात, खडबडीत, त्याचे काठिण्य भरपूर असते.

रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे. रुद्राक्षाचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. हिमालयाच्या परिसरात नेपाळ, भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आहेत. यांच्या फळांना रुद्राक्ष म्हणतात. झाडावर त्याच्यावर कवच असते. ते काढल्यावर आत जे बीज मिळते तो रुद्राक्ष. रुद्राक्षाचा अंगाचे छिद्र असते, पण ते नीट साफ करून घ्यावे लागते. आतल्या काड्या वगैरे काढाव्या लागतात. हा समुद्रसपाटीपासून तीन सहस्र मीटर उंचीवर किंवा तीन सहस्र मीटर खोल समुद्रात सापडतो. रुद्राक्षाची झाडे कपारीत वाढतात, सपाटीत वाढत नाहीत. याच्या झाडाची पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी; पण अधिक लांब असतात. त्याला वर्षाला एक ते दोन सहस्र फळे लागतात. हिमालयातील यती केवळ रुद्राक्षफळ खातात. याला अमृतफळ असेही म्हणतात. ते खाल्ल्यास तहान लागत नाही.

रुद्राक्षमाला गळ्यात इत्यादी धारण करून केलेला जप रुद्राक्षमाला धारण न करता केलेल्या जपाच्या सहस्र पटीने लाभदायक असतो, तर रुद्राक्षाच्या माळेने केलेला जप इतर कोणत्याही प्रकारच्या माळेने केलेल्याच्या दहा सहस्र पट लाभदायक असतो; म्हणूनच रुद्राक्षमाळेने मंत्र जपल्याविना किंवा धारण केल्याविना शीघ्र (पूर्ण) मंत्रसिद्धी प्राप्त होत नाही, असे शैव समजतात. रुद्राक्षमाळेचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी ती गळ्याजवळ दोर्‍याने तिचा गळ्याला अधिकाधिक स्पर्श होईल अशी बांधावी.
आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष आम्ल, उष्णवीर्य व आयूकफनाषक आहे.त्याचा रक्तदाबाच्या (ब्लड प्रेशरच्या) रोग्याला उपयोग होतो असे म्हणतात रात्री तांब्याच्या भांड्यात रुद्राक्ष ठेवून भांडे भरून पाणी घालावयाचे आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायले असता ब्लड प्रेशरवर उपयोग होतो असे म्हणतात. योगी लोकांच्या मते प्राणतत्त्व (किंवा विद्युत शक्ती) निमय करणारी शक्ती रुद्राक्षात (रुद्राक्ष माळेत) असते. रुद्राक्ष माळेने मंत्रसाधकाला मन:शक्तीवर नियंत्रण साधता येते.

रुद्राक्ष सर्व जाती, जमाती, स्त्रीपुरुष, मुले धारण करू शकतात. रुद्राक्षाची माळा एकशेआठ रुद्राक्षांची असते. सत्तावीस मण्यांचीही माळा गळ्यात घालतात. रुद्राक्ष धारण करणार्‍यांनी शुद्ध व पवित्र राहावे हे सांगायला नकोच. वळ्याएवढा, वजनदार, मजबूत व काटेदार रुद्राक्ष सतेज व उत्तम असतो, अस्सल उत्तम रुद्राक्ष पाण्यात बुडतो अशी त्याची परीक्षा ग्रंथात सांगितली आहे. त्याचप्रमाणे ग्रंथात असे सांगितले आहे की, दोन तांब्याच्या पात्रात रुद्राक्ष मधोमध ठेवला असता तो स्वत:भोवती हळूहळू फिरतो. रुद्राक्षाला मुखे असतात. मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरच्या छिद्रापासून खाल पर्यंत गेलेली तरळ रेषा. रुद्राक्षावर काटे असतात. त्यामधून ही सरळ स्पष्टपणे खाली गेलेली असते. या सरळ खालपर्यंत गेलेल्या रेषेस मुख म्हणतात. रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील तितक्या मुखी तो रुद्राक्ष आहे असे समजतात. नदी समुद्राला मिळते तीही अशाच अनेक प्रवाहाने समुद्राला मिळते, त्याला नदीची मुखे म्हणतात. तशीच ही रुद्राक्षाची मुखे होत. सध्या मिळणारे रुद्राक्ष एक ते चौदा मुखांचे असतात.रुद्राक्षाच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंगासारखा आकार असतो, तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष होय.

रुद्राक्षाचा मूळ भाग ब्रह्मा, नाळभाग (छेद) विष्णू व मुखभाग रुद्र आहे. तसेच रुद्राक्षात विद्यमान बिंदू (काटे) समस्त देवस्वरुप आहेत. कृमीने खाल्लेले, तुटलेले, काटे नसलेले, छिद्रयुक्‍त व अयोग्य रुद्राक्ष अशा प्रकारचे सहा रुद्राक्ष वापरणे योग्य नाही. रुद्राक्ष धारण करणार्‍या मनुष्याचे मद्य, मांस, लसुण, कांदा इत्यादी पदार्थांचे सेवन करु नये. सात्त्विक भोजन व शुद्ध दिनचर्या करावी. चित्तास (मनास) मिथ्या विषयांपासून व पापकर्मापासून दूर ठेवावे. शुद्ध विचार मनुष्याच्या मानसिक शांतीचे दाते आहेत . रुद्राक्ष-धारण सर्व मनोविकार दूर करुन परम शांती प्रदान करते.  अशा प्रकारे रुद्राक्ष धारण केल्यास सर्व अरिष्टे नाहीशी होतात.

रुद्राक्षाची वैशिष्ट्ये

१. जड (वजनदार) आणि सतेज
२. मुखे स्पष्ट असलेला
३. ॐ, शिवलिंग, स्वस्तिक इत्यादी शुभचिन्हे असलेला
४. मोठ्यात मोठा रुद्राक्ष आणि लहानात लहान शाळीग्राम उत्तम (मेरुतंत्र).
५. कवेत मावणार नाही, एवढा बुंधा असलेल्या, म्हणजे जुन्या झाडाचा रुद्राक्ष.
६. समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असलेल्या झाडाचा रुद्राक्ष आणि एकाच झाडाच्या वरच्या फांद्यांतील रुद्राक्ष: उंचीवरच्या रुद्राक्षांना वरून येणारे सत्त्वगुण अधिक प्रमाणात मिळतात; म्हणून ते अधिक प्रभावशाली असतात.
७. पांढऱ्या रंगाचा सर्वांत चांगला. त्यापेक्षा कनिष्ठ रुद्राक्ष अनुक्रमे तांबडा, पिवळा आणि काळा रंग असलेले असतात. पांढरे आणि पिवळे रुद्राक्ष सहसा आढळत नाहीत. तांबडे आणि काळे रुद्राक्ष सर्वत्र आढळतात.

रुद्राक्षाच्या मुख्यपरत्वे त्याचे प्रकार आणि त्याची देवता व गुणधर्म यांविषयी 

१ मुखी- अत्यंत दुर्मिळ समजला जातो. महान योगीच हा धारण करतात. यामुळे षड्रीपुंवर विजय मिळवता येतो. सर्व मनोकामनापूर्ती होते. याची देवता परमात्मा शिव आहे. व धारण करणारा काहीच दिवसात विरक्त होतो. 
२ मुखी- हा अर्धनारी नटेश्वरचे प्रतीक आहे. हा धारण केला तर व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल होतो. धारणकर्त्याची कुण्डलिनी जागृत करण्याचा मार्ग सुलभ होतो. तो समोरच्या व्यक्तीला क्षणार्धात वश करू शकतो..पती पत्नी मधील ऐक्य, वैवाहिक सौख्य, दु:ख नाश, मनः शांती, उद्योगधंदा व प्रगतीसाठी हा धारण करतात 
३ मुखी- अग्निदेवतेचे प्रतिक.  हा धारण करणार्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. तहान व भूकेवर विजय मिळवता येतो. बुद्धी कुशाग्र होते. 
४ मुखी- ब्रम्हदेवचे प्रतीक. याचा प्रभाव धारण कर्त्याच्या जिभेवर होतो.. अल्पावधीतच तो वक्ता साहेस्रेशू या पदविला पोहोचतो. स्मरणशक्ती तीव्र होते.... 
५ मुखी- पंचानन शिवाचे प्रतीक. पंच महाभूतंचा यात समावेश होतो. धारणकर्त्याला मनःशांती प्रदान करतो. यात सर्व रुद्राक्षाचे गुण विद्यमान असतात. सर्वार्थाने उत्कृष्ट असतो. तरीही सहज उपलब्ध होतो म्हणून याकडे कोणीही लक्ष देत नाही. अन्य रुद्राक्षाकडेच आकर्षित होतात. 
६ मुखी- कार्तिकेय स्वरूप. या वर माता पार्वती व माता लक्ष्मी ची सुद्धा कृपादृष्टी आहे. हा काही जण विष्णू स्वरूपही मानतात. व्यापारी लोक हा रुद्राक्ष वापरतात. या रुद्राक्षाने गल्ला कधीच रिकामा रहात नाही 
७ मुखी- सप्त मातृका, अनंत नागाचे प्रतीक. माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो. दिर्घायुष्य व अपघातापासून रक्षण करतो. याच्या धारणाने मस्तकशूळ, संधीवात, विषमज्वर बरा होतो. सर्पदंशा पासून रक्षण होते. 
८ मुखी- गणेशाचे प्रतीक. याला चिंतामणी रुद्राक्ष सुद्धा म्हणतात. याला अष्टमातृका, त्रिदेवांचा आशीर्वाद लाभला आहे. तांत्रिक लोक याला कुण्डलिणीजागृतीचे साधन मानतात. हा जवळ असेल तर समयसूचकता अंगी बाळगते. अनेक कलामध्ये नैपुण्य येते. 
९ मुखी- भैरवाचे प्रतीक. दुर्गेचा पूर्ण आशीर्वाद. हा रुद्राक्ष धारण करणार्याच्या आसपास दु:ख दैन्य दारिद्र्य कधीच फिरकत नाही. 
१० मुखी- यमराज चे प्रतीक. अष्टदीक्पाल चा आशीर्वाद. हा धारण केला तर तामसी शक्तिंपासून रक्षण होते. अनिष्ट ग्रह शांत होतात, 
११ मुखी- ११ रुद्रांचे प्रतीक. इंद्राचे प्रतिकही मानतात. हा अतिशय दुर्मिळ असून धारण कर्त्याचा अल्पावधीतच भाग्योदय होतो. 
२ मुखी- महाविष्णू तसेच १२ ज्योतिर्लिंगाचे प्रतीक. हा धारण केला असता व्यक्तिमत्व तेजपुंज होते. शत्रूघात व अपघातपासुन रक्षण होते. 
१३ मुखी- कामदेव स्वरूप. याला इंद्राचा आशीर्वाद लाभला आहे. हा श्राध्याच्या वेळी धारण केला तर पितरांना सद्गती प्राप्त होते. 
१४ मुखी- हनुमानाचे प्रतीक. हा शेंडीत धारण करतात. योग विद्येत नैपुण्य प्राप्त करण्यासाठी हा गळ्यात धारण करतात. 
गौरी शंकर रुद्राक्ष- हे दोन रुद्राक्ष नैसर्गिक रित्या एकमेकांना चिकटलेले असतात, धारण कर्त्याला शिव-शिवाच्या अनुग्रहाने पूर्ण सुखशांती लाभते. हा धारण न करता देवघरात ठेवतात. 
त्रिभुजी रुद्राक्ष- हा अतिशय दुर्मिळ समजला जातो. ३ रुद्राक्ष एकमेकांना चिकटलेले असतात. याला ब्रम्हा-विष्णू-महेशाचे प्रतीक समजले जाते. हा रुद्राक्ष धारण करर्त्याला काहीही कमी पडू देत नाही.

धारण विधान

पक्ष-
शुक्ल पक्ष- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. 
तिथीं-
द्वितीयेला, पंचमी, सप्तमी, दशमी, त्रयोदशी, पौर्णिमा या तिथींना. 
नक्षत्र-
हस्त, रोहिणी, स्वाती, उत्तरा, उत्तराषाढा उत्तराभाद्रपदा, श्रवण, धनिष्ठा इत्यादी नक्षत्रावर. 
लग्न-
मेष, कर्क, तूळ, मकर कुंभ लग्नावर रुद्राक्ष धारण करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
राशी-
मेष- त्रिमुखी, वृषभ- षण्मुखी, मिथुन- चारमुखी, कर्क- दोनमुखी, सिंह- एकमुखी, बारामुखी, कन्या- चारमुखी, तुला- षण्मुखी, वृश्चिक- त्रिमुखी, धनु- पाचमुखी, मकर- सातमुखी, कुंभ- सातमुखी, मीन- पाचमुखी सर्व साधारण हे प्रचलित आहेत.