प. पू. योगिराज श्री गुळवणी महाराज

प. पू. योगिराज गुळवणी महाराज
प. पू. योगिराज गुळवणी महाराज

जन्म: मार्गशिर्ष वाद्य १३, गुरुवार २३ डिसेंबर १८८६
आई/वडील: उमाबाई/दत्तभट गुळवणी
कार्यकाळ: १८८६ - १९७४ 
गुरु: 
प. पू . वासुदेवानंद सरस्वतींकडून अनंतचतुर्दशीला दिक्षा.
प. पू . लोकनाथतिर्थ स्वामींकडून शक्तिपात दिक्षा अधिकार. 
समाधी: पौष वाद्य ८, दिनांक १५ जानेवारी १९७४ ला दत्त चरणी विलीन. 
विशेष:
२७ जानेवारी १९६५ वासुदेव निवास वास्तुशांती.  
श्री वासुदेवानंद सरस्वती समग्र वाग्मय पुनर्मुद्रण 
शिष्यवर्ग: 
१) श्री दत्तमहाराज कविश्वर 
२) श्री मामासाहेब देशपांडे 
३) गुरुताई सुगंधेश्वर 
४) श्री केशवराव जोशी 
५) डॉ. हरिश्चंद्र जोशी 
आणि हजारो भक्त शक्तिपात दिक्षेने कृपांकीत 

कौटुंबीक पार्श्वभुमी 

गुरुमाऊली प. पू. योगीराज गुळवणी महाराजांचे पणजोबा गुळवणी कोल्हापूर जवळ कौलव ग्रामी परंपरागत वैदिक व्यवसाय करत होते. प. पू. नारायणस्वामीनी त्यांना अनुग्रह दिला होता, म्हणून प. पू नागेशरावांना जी पुत्र रत्न प्राप्ती झाली. त्याचे नांव त्यांनी नारायण ठेवले श्री नारायण भटजी ना जो पुत्र झाला त्याचे नाव त्यांनी दत्त ठेवले. श्री दत्तोपंत भटजी कुलाचार संपन्न व शास्त्रोक्त विधी निष्ठेने करणारे वैदिक होते. त्यांची दुसरी पत्नी उमा हिच्या सह श्री दत्तोपंतानी डोंगर उतारा वरील निसर्गरम्य अशा कुडुत्री गांवी स्थलांतर केले.

श्री दत्तोपंत भटजीं चा दिनक्रम - स्नान संध्या, पूजा-अर्चा, अग्निसाधना, रुद्र एकादशिनी, पंचसूक्त पवमान युक्त आभिषेक पूजा, गुरुचरीत्र पारायण भोगावती नदीवर ब्रह्मयज्ञ घरी नैवेद्य- वैश्वदेवा नंतर भोजन, दुपारी विष्णुसहस्त्र नाम, सायंसंध्या, अग्निसेवा व रात्री कुलगुरु नारायण स्वामींचे भजन, अशा परिपूर्ण धार्मिक कार्यक्रमांनी भरलेला असे. त्यांची व्दितीय पत्नी उमा ही देखील साध्वी, सात्विक, सदाचारी वृत्तीची व पतीच्या प्रत्येक धार्मिक कृत्यात तितक्याच उत्कटतेने साथ देणारी होती.

पादुकांचा कृपाप्रसाद 

प्रत्येक पौर्णिमेस श्री दत्तोपंत व सौ. उमामाता उभयता न चुकता नृसिंहवाडीस श्री दत्तप्रभूंच्या दर्शनास जात होते. त्या काळी वाहन व्यवस्था आजच्या सारखी नव्हती. श्रीदत्तोपंत भटजी व सौ. उमामाता उभयता घोड्यावरुन नृसिंहवाडीस पौर्णिमा वारीस येत असत. उभयतांची उत्कट इच्छा ही होती की, श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त प्रभूनी आपणांस कृपा प्रसाद रुपाने आपल्या पादुका द्याव्यात. त्यांच्या नृसिंहवाडी वारीस २० वर्षे पूर्ण झाली तरी श्रीदत्त प्रभूंच्या कृपाशिर्वादाचे फळ त्यांना अद्याप मिळायचे होते. या वीस वर्षात सौ. उमा दत्तोपंताच्या संसार वृक्षाचा विस्तार होऊन बापू नरहरी आणि गोविंद अशा तीन सुंदर फळांनी संसार वृक्ष लगडला होता. या खेपेस सौ. उमामाता पुन्हा गरोदर होत्या. त्यांना सात महिने झाले होते, म्हणून श्री दत्तोपंत एकटेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडीस गेले होते. अशा अवस्थेत सौ. उमामातानी श्री स्वामीच्या पादुका प्रसादाचा ध्यास घेऊन उत्कट भक्तीभावाने उपोषण सुरु केले. या उपोषणात परमेश्वराचा अखंड जप सुरु केला काही दिवस लोटल्यावर सौ. उमामातांना थकवा जाणवू लागला. तशाही स्थितीत देवापुढे अखंड जप चालूच होता. एके दिवशी, दुपारी १२ वाजता त्यांच्या कानी “नारायण” ध्वनी आला आणि कुणी संन्यासी जवळ आल्याची चाहूल लागली..! त्यांना आपल्या मांडीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि वस्तू मांडीवर पडल्याची जाणीव झाली. उमाबाईनी प्रयत्न पूर्वक डोळे (ग्लानीने घेरले असल्यामुळे) उघडले. मांडीवर एक कागदाची पुडी होती. पुडी उघडली आणि उमाबाईंचे अष्टसात्विक भाव जागृत झाले ! आपले उपोषण, आपली सेवा देवाला रुजू झाली. या अत्यानंदाने त्या भारुन गेल्या. कारण त्या पुडीत चांदीच्या पादुका होत्या. अष्टगंधाने माखलेल्या सुरेख पादुका ! पुडी कोणी टाकली हे पाहण्यासाठी उमाबाईनी मान वळवून पाहिले तो एका संन्याशाची भव्य आकृती लगबगीने जाताना दिसली हाक मारण्यापूर्वीच ते अदृष्य झाले.... आणि उमाबाईना पादुका प्रसाद मिळाला.

प. पू. योगिराज गुळवणी महाराज
प. पू. योगिराज गुळवणी महाराज

नृसिंहवाडीत बरोबर याच सुमारास श्री दत्तोपंत भटजीनाही एक साक्षात्कार झाला. श्री दत्त जयंती दिवशी ते श्री पादुकांवर पाणी घालत स्पर्श करताना- “मी  तुमच्यावर प्रसन्न आहे !” असे उद्गार कानी पडले. समोर कोणी नाही फक्त समोर श्री पादुका ! श्री दत्तोपंत मनोमन आनंदले.

या दोन्ही शुभ साक्षात्कारांचा प्रत्यय मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला शके १८१८ म्हणजे गुरुवार दि. २३ डिसेंबर १८८६ साली रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी पुत्ररत्न प्राप्तीने आला. सौ. उमामाता प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. सौ. उमामाता व श्री. दत्तोपंत भटजीनी श्री दत्त प्रभूंची जी अहर्निश सेवा केली. त्या सेवेचा कृपाशीर्वाद मिळाला, बाळाचे नाव ठेवले ‘वामन’ ! हेच आमचे परमपूज्य योगिराज गुळवणी महाराज !

बालपण व शिक्षण

प. पू. योगिराज गुळवणी महाराजांचे प्राथमिक ४ थी पर्यंतचे शिक्षण तारळे या छोट्याशा गावी झाले तालुक्यात पहिल्या नंबरने उत्तीर्ण झाल्यामुळे वामनला ४ थी ची स्कॉलरशिप मिळाली. बुद्धी एकाग्रचित्त, आकलनक्षम असून तिला तीव्रस्मरणशक्तीची जोड मिळाल्यामुळे एका प्रयत्नात सर्व कांही मुखोदगत होऊन जाई. कोल्हापूर येथील संस्कृत व्यासंगी जगदगुरु पंडित आपटे व वे. शा. सं. आत्मरामाशास्त्री पित्रे यांच्याकडे संस्कृतचे अध्ययन झाले. विद्यार्थी दशेत असताना वामनराव पोहायला शिकले. व्यायामाची व चित्रकलेची ही त्यांना आवड होती. इयत्ता नववीत असताना त्यांच्या कलाशिक्षकानी त्यांच्या ठायी असलेले कला गुण हेरले. चित्रकलेची फर्स्ट ग्रेड व सेंकडग्रेड वामनराव उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झाले. याचा त्यांच्या कला शिक्षकास सार्थ अभिमान होता. चित्रकलेची, थर्डग्रेड परीक्षा देण्यासाठी वामनरावानी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. याच वेळी मॅट्रीकला पण ते प्रविष्ट झाले. “कोणती परीक्षा द्यावी” ? हे द्वंद्व त्यांच्या मनात सुरु झाले. या द्वंद्वात मनस्वी कला विजयी झाली हे सांगणे नकोच ! मॅट्रीक नंतर नोकरीची शाश्वती असताना देखील वामनरावानी ती वाट सोडून दिली. याच निर्णयाचा त्यांच्या संपूर्ण जीवनावर परिणाम होऊन गुळवणी “ड्रॉईंग चे मास्तर” म्हणून विश्वविख्यात झाले. याच कलागुणामुळे त्यांना प.पू. टेंबे स्वामींचे दर्शन घडले.

नृसिंहवाडी येथे श्री सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी (थोरले महाराज) यांच्याशी भेट 

एकमुखी दत्तप्रभू
एकमुखी दत्तप्रभू

प. पू. योगिराज गुळवणी महाराजांचे थोरले बंधू शंकरशास्त्री यांनी प. पू. सद्गुरु टेंबे स्वामीना या विषयी सांगितल्यावर त्यांनी. “पत्रात लिही की येताना श्री दत्ताची प्रतिमा काढून गळ्यात श्लोकबद्ध हार घातल्यांचे दाखव आणि ते चित्र घेऊनच ये” श्लोक बद्ध हारासाठी महाराजानी श्लोक सुद्धा दिला. पत्रा प्रमाणे प. पू. गुळवणी महाराजानी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीचे ध्यान केले. त्या वेळी उत्कट भक्ती मुळे त्यांना एकमुखी दत्तप्रभूंचे हृदयात साक्षात दर्शन झाले. तेच चित्र त्यांनी कागदावर साकारले व प. पू. सद्गुरु टेंबे स्वामीनी दिलेल्या श्लोकाला एक सुंदर हाराचे स्वरुप प्रदान केले. फुलांच्या चार पाकळ्या, व मध्यभागी पराग प्रत्येक पाकळीत मध्ये एक-एक अक्षर लिहून श्लोक बद्ध हार एक मुखी मूर्तीच्या गळ्यात घातला. असे विशुद्ध भक्तीने भारलेले ते चित्र जेव्हा प. पू. टेंबेस्वामीनी पाहिले तेव्हा त्यांना अत्यानंद झाला, त्यांनी आपल्या परमशिष्यावर स्नेह दृष्टीने कृपावर्षाव केला. प. पू. टेंबे स्वामीनी प. पू. गुळवणी महाराजांची ही सेवा रुजु करुन घेऊन वामनरावांना हातात बांधण्यासाठी एक यंत्र करुन ते चांदीच्या पेटीत घालून ती पेटी स्वत:च्या हाताने वामनरावांच्या हातात बांधली. एक संरक्षक कवच प. पू. टेंबेस्वामीनी आपल्या परमप्रिय शिष्याच्या हातात बांधले ! हा दिवस होता नृसिंहवाडीकरांच्या परमभाग्याचा. तो म्हणजे गुरुव्दादशीचा ! या दिवशी प्राप्त झालेल्या या अनमोल ठेव्याची (संरक्षक कवचायी) आठवण सदैव रहावी म्हणून प. पू. गुळवणी महाराजानी प्रत्येक गुरुव्दादशीस नृसिंहवाडीस येण्याचा संकल्प सोडला.

हावनूर येथे प. पू. टेंबेस्वामींचे प. पू. गुळवणी महाराजाना अभूतपूर्व दर्शन

गाणगापूरहून निघून सतत दोन महिने बऱ्याच अंशी अनवाणी पायी प्रवास करत, कधी उपाशी तर कधी अर्धपोटी राहून बऱ्याच वेळा अन्नपाण्या विना ही राहून दर्शन भेटीचा ध्यास घेऊन पायपीट करीत योगीराज गुळवणी महाराज कर्नाटकातील हावनूर येथे तुंगभद्रेच्या काठी त्रिपुरांतकेश्वराच्या मंदिरात प. पू. टेंबेस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी पोहचले. स्वामी महाराजाना पहाताच प. पू. गुळवणी महाराजानी साष्टांग दंडवत घातले व आनंदाश्रूना वाट करुन दिली. सलग अकरा दिवस हे गुरु शिष्य एकत्र राहिले. तेथून परतताना प. पू. टेंबेस्वामीनी प. पू. गुळवणी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून कृपाशीर्वाद दिला प्रसाद नारळ, अंगारा देऊन सांभाळून राहण्याचा सल्ला दिला. जड अंत:करणाने प. पू. योगिराज गुळवणी महाराजानी प. पू. टेंबेस्वामीना निरोप घेताना विचारले, “महाराज, आता पुन्हा दर्शन” ?

ते ऐकून प. पू. टेंबे स्वामीनी मानेला एक ऊर्ध्व झटका देऊन भावपूर्ण स्वरात सांगितले. “हे असं लक्षात ठेव म्हणजे झालं !” समोर उभ्या असलेल्या वामनरावांना या वाक्या बरोबरच स्वामी महाराजांच्या शरीरातून निघालेली व्याघ्रांबरधारी एकमुखी श्री दत्त प्रभूंची मूर्ती साक्षात दिसू लागली. या मूर्तीचे चरण स्वामी महाराजांच्या हृदयाजवळ होते स्वामी महाराजांचे शरीर पारदर्शक होऊन त्या मध्येच व्याघ्रांबर पांघरलेली श्री दत्तप्रभूंची सुकोमल, प्रसन्न हास्य चेहऱ्यावर आसणारी मूर्ती वामनराव पहात होते त्या अवर्णनीय आनंदातून भानावर येत त्यानी स्वामीना पुन्हा साष्टांग नमस्कार घातला आणि वर पाहिले तर दत्तप्रभूंची मूर्ती नसून स्वामी महाराजच बसलेले आहेत.

“हे असं लक्षात ठेव म्हणजे झालं !” हे प. पू. टेंबेस्वामीचे शब्द व श्री दत्तप्रभूंची व्याघ्रांबरधारी मूर्ती चित्तात कोरुन, एके दिवशी याच मूर्तीला भगवान दत्तात्रेयांच्या मनभावन मनोहारी रूपात चित्रित केलं. एका चित्रकाराच्या अप्रतिम हस्त कौशल्याने जणू दत्तप्रभू कागदावर प्रकटले ! तेव्हाचा प. पू. गुळवणी महाराजांचा आनंद अप्रतिम, अवर्णनीय होता हे मात्र निश्चित !

प. पू. टेंबेस्वामी कडून मंत्र दीक्षा

नागपूर जवळ भंडारा जिल्ह्यात वैतगंगा नदीच्या काठी पवनी हे गाव वसलेलं आहे. या ठिकाणी प. पू. टेंबे स्वामींचा चातुर्मास सुरु होता. या क्षेत्री अनंत चतुर्दशीला प. पू. गुळवणी महाराजाना, त्यांच्या मातोश्री उमामाता व भगिनी गोदावरी सह मंत्र दीक्षा देताना प. पू. टेंबेस्वामीना खूप आनंद झाला.

प. पू. लोकनाथतीर्थ स्वामींकडून शक्तीपात दीक्षा

प. पू. गुळवणी महाराज दैनंदिन कार्यक्रमात प्राणायामाचा अभ्यास करत असताना एके दिवशी त्यांच्या स्वप्नात प. पू. टेंबेस्वामी महाराज आले. ते म्हणाले, “ही विद्या दत्त संप्रदायाची आहे. आम्ही एकच आहोत. तुझ्या हातून पुढे मोठे कार्य करुन घ्यावयाचे आहे. ही विद्या घे !” स्वप्नातून जाग आल्यावर प. पू. गुळवणी महाराजानी समोर स्वामी चिन्मयानंदाना पाहिले व त्यांना नमस्कार केला. (हे स्वामी चिन्मयानंद म्हणजेच कलकत्याचे श्री योगेश चक्रवर्तीजी - योग साधनेव्दारा, शक्तिपात दीक्षे मुळे ते स्वामी चिन्मयानंद सरस्वती झाले -  व कालांतराने गुरु दीक्षे मुळे ते प.पू. लोकनाथतीर्थ स्वामी झाले).

प. पू. टेंबेस्वामींच्या आदेश प्रमाणे प. पू. योगीराज गुळवणी महाराजानी प. पू. लोकनाथतीर्थ स्वामींच्या कडून शक्तिपात साधनेची दीक्षा घेतली. प. पू. लोकनाथतीर्थ स्वामींनी प. पू. गुळवणी महाराजांच्या मस्तकावर हात ठेवून परमेश्वर प्राप्तीचा हा मार्ग, अर्थात कुंडलिनी जागृती - शक्तिपात साधनेचा हा अमोघ ठेवा प्राप्त करुन दिला.

शक्तिपात साधना व्याप्ती : शक्तिपात (दीक्षा) साधना याचा सरळ सोपा अर्थ - गुरुकडून योग्य अशा शिष्याच्या निद्रिस्त शक्तीस जागृत करणे - त्याच्या वर गुरुकृपेचा वर्षाव करणे. कठीण गुरु साधनेसाठी शरीर वृत्ती तयार करणे, हा आहे.

अनेक गुरु भक्तांना प. पू. योगीराज गुळवणी महाराजानी शक्तिपात साधनेची दीक्षा दिली. ही दीक्षा देताना त्यांनी जात, धर्म पंथ, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद केला नाही. ढाक्याहून मुंबईस आलेल्या एका मुस्लीमधर्मीय व्यक्तीस, जो भिकाऱ्याच्या वेशात हिंडत होता त्याला देखील शक्तिपात दीक्षा देऊन त्याला चरीतार्थासाठी योग्य बनवले. शक्तिपात साधनेचे कार्य प. पू. गुळवणी महाराजांच्या संकल्प शक्तीने महाराष्ट्र प्रांत, संपूर्ण भारत- भारताबाहेर युरोप, अमेरिका, आफ्रिका इ. देशात पोहचले आहे. न्यूयॉर्क येथील श्री. वॉलकॉट यांना देखील पुण्यातूनच संकल्पाव्दारे प. पू. गुळवणी महाराजानी अनुग्रह दिला. हे त्यांचे शक्तिपात साधनेचे महान कार्य पाहून विष्णुतीर्थ स्वामी महाराजानी “शक्तिपात साधना” ही वेद प्राणित चैतन्यशक्ती दीक्षेच्या व्दारा गुरुकृपेच्या स्वरुपात या चैतन्यशक्तीचे संस्कारक्षम अनुभव प्रत्येक साधकाला येत असतात हे स्पष्ट करताना म्हटले की, या अंधकारपूर्ण युगात श्री गुळवणी महाराजांचा प्रभाव या प्रांतात चहू दिशांना सर्वत्र पसरत आहे, किंकर्तव्यमूढ होऊन भटकणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे कार्य आहे.

प. पू. योगिराज गुळवणी महाराजांचा नृसिंहवाडीशी ऋणानुबंध

प. पू. टेंबेस्वामी महाराजानी नृसिंहवाडी मुक्कामी प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या हातात गुरुव्दादशी दिवशी चांदीच्या पेटीत घालून एक यंत्रसंरक्षक कवच बांधले असल्यामुळे गुरुकृपेची आठवण सतत राहण्यासाठी प. पू. गुळवणी महाराजानी प्रत्येक गुरुव्दादशीस नृसिंहवाडीस येण्याचा संकल्प सोडला. मनोमन ठरवले. त्या नुसार ते प्रत्येक गुरुव्दादशीस न चुकता येत असत. त्या पवित्र दिवशी नृसिंहवाडीतील माता- भगिनी परंपरेनुसार प्रथम देवाला ओवाळून मग प. पू. गुळवणी महाराजाना देखील ओवाळत असत. प. पू. गुळवणी महाराज प्रत्येक सुवासिनीस एक रुपया ओवाळणी घालत. एका गुरुव्दादशीस ओवाळणीसाठी प. पू. गुळवणी महाराजांकडील पाचशे रुपये खर्च झाले. याचाच अर्थ त्या दिवशी सुमारे पाचशे सुवासिनीनी महाराजांना ओवाळले, औक्षण केले !

प. पू. योगिराज गुळवणी महाराज बालपणापासूनच नृसिंहवाडीस येत होते. नृसिंहवाडीतील त्यांचा दिनक्रम - पहाटे उठून कृष्णेचे स्नान करणे, श्री चरणांवर पाणी घालणे, माधुकरी मागणे, अनुष्ठान, महापूजा करणे, श्रीदत्तप्रभूंची यथाशक्ती सेवा करणे, अन्नदान करणे इत्यादि ते अंत:करणपूर्वक समर्पित भावनेने आनंदाने करीत असत.

परमपूज्य गुळवणी महाराजांचे नित्य कर्म
परमपूज्य गुळवणी महाराजांचे नित्य कर्म

एकदा तर देवस्थान समितीने वाडी बाहेरच्या कोणाही व्यक्तीला श्री स्वामीच्या चरणावर पाणी घालण्यासाठी बंदी केली होती. प. पू. गुळवणी महाराजाना ही बंदी म्हणजे एक प्रकारची शिक्षाच वाटू लागली. त्यांनी आपल्या मनातील ही खंत पुजारीजनांना बोलून दाखविली. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूनी पुजाऱ्यांना विचार प्रवृत्त करायला लावून प. पू. गुळवणी महाराजाना या कठीण नियमातून मुक्त करून आपल्या पादुकांवर पाणी घालण्याची इच्छा पूर्ण करुन घेतली. या बाबतीत पंडित श्री. आत्माराम शास्त्री जेरे पुजारी यांनी पुढाकार घेऊन प. पू. गुळवणी महाराजांची श्री पादुकावर पाणी घालण्याची नित्य सेवा अबाधित ठेवली. या वरुन श्रीदत्तप्रभूंचा प. पू. गुळवणी महाराजांवरील लोभच दृष्टोत्पत्तीस येतो. नरसोबावाडीस असताना प. पू. योगीराज गुळवणी महाराज रोजच्या पहाटेच्या काकड आरतीला न चुकता उपस्थित रहात. देवासमोरच्या खांबा जवळची जागा एक शिंपी न चुकता त्यांच्यासाठी धरुन ठेवत असे. त्या खांबा जवळून प. पू. गुळवणी महाराजाना दरवाजा उघडल्यावर श्री दत्तप्रभूंचे अगदी व्यवस्थित दर्शन घडत असे. त्या शिंप्यास ते प्रतिवर्षी धोतर जोडी प्रसाद म्हणून देत असत.

प. पू. योगीराज गुळवणी महाराजानी वंदनीय अशा नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिर व परिसरातील अनेक मंदिर वास्तूंचे जीर्णोद्धार केले. जुन्या ओवऱ्या पाडून नवीन प्रशस्त ओवऱ्या बांधल्या. श्रीराममंदिर, नारायणस्वामी, गोपाळस्वामी मंदिर, श्री ब्रम्हानंद स्वामी मठाचे नूतनीकरण केले. श्री उमामातेच्या स्वामी भेटीच्या जागी एक तुळशी वृंदावन उभे केले. प्रशस्त धर्मशाळा बांधली सर्वात उल्लेखनीय व अविस्मरणीय कार्य म्हणजे प.पू. योगीराज गुळवणी महाराजानी प्रदक्षिणा मार्गी बांधलेली गोलाकार शिल्प कृती ! सभा मंडप- उत्कृष्ट शिल्पकृतीचा एक नमूना ! मजबूत पायावर सोळा खांबावर आधारलेली कमळाच्या कोरीव कामाने सजलेली ३५० टन वजनाची मजबूत गोलाकार स्लॅब - बांधकाम क्षेत्रातील एक नवलच आहे ! भव्य दिव्य उत्कृष्ट शिल्पकृती ! हा सभा मंडप उत्तम नटलेला असून त्यात गुरुचरीत्रातील उल्लेखनीय प्रसंग चित्रित केले आहेत. प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या संकल्पातून साकारलेला हा गोलाकार प्रदक्षिणा मंडप पाहताना श्री दत्तचरणी लीन झालेले मन प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या देखील सुकोमल चरणांवर भक्तीभावाने मस्तक टेकते ! ज्यांच्या कडून काम करून द्यायचे असते त्याला प्रत्यक्ष श्री दत्त प्रभूच अशी प्रेरणा देतात हे वादातीत सत्य नृसिंहवाडीकर नित्य अनुभवत असतातच.

प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या मनी मानसी अहर्निश नृसिंहवाडीच वसली होती. कारण प्रत्येक वेळी वाडीस येताना पाट्याभरुन पिवळी शेवंतीची फुले ते श्रीचरणांवर अर्पण करण्यासाठी घेऊन येत असत. वाडीस असताना कित्येक वेळा पार्सलने देखील त्यांनी पिवळी शेवंती मागवून घेतली होती. नृसिंहवाडीहून कोणी व्यक्ती आली किंवा पुण्याहून कोणी वाडीस जाणारी व्यक्ती भेटली तर त्याच्याबरोबर प. पू. गुळवणी महाराज पिवळ्या शेवंतीची हाराभर फुले न चुकता पाठवत असत. सर्व काही आपल्या लाडक्या आराध्य दैवतासाठी ! स्वारींच्या पोशाखातील जरीची पगडी देखील प. पू. गुळवणी महाराजांनी मापा प्रमाणे बनवून वाडीस श्री स्वारींच्या सेवेस पाठवून दिली होती. देवासाठी उत्तमतेचा ध्यासच जणू प. पू. गुळवणी महाराजानी घेतला होता ! वाडीस दरवर्षी गुरुव्दादशीस जाताना श्री दत्त प्रभूना अर्पण करण्यासाठी उत्तम छाट्या बेळगांव, धारवाडच्या हातमाग वाल्यांकडून ते मागवून घेत. श्री दत्त प्रभूना अर्पण करण्याचे उत्कृष्ट केशर ते थेट काश्मिरहून मागवून घेत असत.

ऑगस्ट १९७३ मध्ये प.पू. योगीराज गुळवणी महाराजानी आपल्या जवळील सर्व चांदीची भांडी तसेच त्यांच्या रौप्य तुलेतून जमा झालेली सर्व चांदी मंडप शिल्पाचे इंजिनियर साहेब श्री. वि. मो. वैद्य यांच्याकडे दिली व सांगितले की ही सर्व भांडी आटवून वाडीच्या देवाचे दरवाजे चांदीने मढवा. हीच सर्व चांदी आटवून प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या इच्छेप्रमाणे श्री. दत्तप्रभूंचे दर्शनी दरवाजे चांदीने मढवलेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी आपल्या इष्टदेवासाठी सर्वस्व वेचले पण कुठे ही वाच्यता नाही ! जाहिरात नाही !

परमेश्वरांचेच परमेश्वराला । हीच पराकोटीची निस्वार्थी भावना
त्या मागे कार्यरत होती असेच म्हणावे लागेल !

Gulavani Maharaj
.

जन्मास येणे ही सूर्योदयाप्रमाणे एक नैसर्गिक घटना आहे. तद्वत मृत्यु हे सूर्यास्ता इतके गहिरे सत्य आहे. या दोन्ही घटनांच्या मधला काळ हेच मानवी जीवन व त्याचे कार्य मानावे लागेल. परमपूज्य योगीराज गुळवणी महाराजांचे संपूर्ण जीवन हे गुरुसेवेला वाहिलेले होते. एका मुमुक्षू जीवनाचे शक्तिपात साधनेने व अखंड भक्तीने एका शक्तिपाताचे महामेरु मध्ये रुपांतर झाले होते. प. पू. सद्गुरु टेंबे स्वामी महाराज व प. पू. लोकनाथतीर्थ स्वामींच्या या परमशिष्याने अनेकांचे संसार फुलवले अनेकांना शक्तिपात साधनेची प्राप्ती करून दिली. अनेक स्त्री - पुरुषांचे पारमार्थिक जीवन समृद्ध केले. शक्तिपात साधनेचा वारसा जपणारा शिष्य संप्रदाय यांच्याच कृपाशीर्वादाने निर्माण झाला. गुरुभक्तीची अवीट गोडी अनेक भक्तांना यांनी लावली. कित्येकांचे जीवन अक्षरश: सुवर्णकांती प्रमाणे उजळून टाकले. जो प. पू. गुळवणी महाराजांच्या सानिध्यात आला. त्याच्या ऐहिक व पारमार्थिक जीवनाचे विशुद्ध कल्याणच झाले ! प. पू. गुळवणी महाराजानी स्वत:कडे कांही ही शेष न ठेवता दोन्ही हातांनी भरभरून वाटले. परमेश्वरी कृपेचा खजिनाच जणू सर्व भक्तांमध्ये रिता केला !

दत्त म्हणता काय उणे ? उभी त्रिमूर्ती साक्षात ।
काळजाच्या पायावाटे उतरे काळजात  ॥

या उक्तीप्रमाणे देण्यासाठी जन्म आपुला ! दत्त म्हणजे दिले ! हेच प.पू. गुळवणी महाराजानी आपल्या जगण्यांतून सिद्ध केले त्यांचे जीवन कार्य हे श्री दत्तप्रभूंच्या कृपाशीर्वादाचेच फलित होते त्यांची दृष्टी, संकल्प, त्यांची स्वप्ने, त्या स्वप्नांची परिपूर्ती, सामान्यालाही असामान्य घडविणारी त्यांची कृपा दृष्टी सारे कांही अलौकिकच ! या सर्वांचे वर्णन करताना वाणी मूक होते, लेखणी मूक होते, अनिमिष नेत्रांनी नुसते पाहणेच उरते ! कारण दृष्य केवळ हृदय पटलावर अंकित करून नेत्र ही मूक होतात. मन हृदय तर या श्रेष्ठ विभूतीच्या सामर्थ्याच्या प्रभावाने अधीच भारून गेलेले असते, त्यामुळे ते ही मुके ! यासर्व मुक्या घटकांनी प. पू. गुळवणी महाराजांची थोरवी ती काय वर्णावी ? 

श्री गुळवणी महाराज म्हणतात, 

  • उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पागोष्टी करणे, चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व  क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि  संदर्भ असावा, हेच अनुसंधान.
  • भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंता कडे घेऊन जाते.
  • दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे तसे भगवंताचे अनुसंधान राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. 
     

नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे । स्वानंदामृततृप्त।य श्री वामानाय नमो नमः ।।

॥ श्री गुरु शरणम् ॥

महान दत्तयोगी प. पू. योगिराज श्रीगुळवणी महाराज
महान दत्तयोगी प. पू. योगिराज श्रीगुळवणी महाराज

महान दत्तयोगी प. पू. योगिराज श्रीगुळवणी महाराज सिद्ध चरित्र

गेल्या शतकातील अनेक साक्षात्कारी साधू-संतामध्ये दत्तसंप्रदायी प. पू. गुळवणी महाराजांचे विशेष स्थान आहे. त्यांचे जीवन व कार्य दोन्ही अविस्मरणिय आहेत. कोल्हापूर जवळील कुडूत्री या छोट्याश्या गावी श्री. दत्तात्रय नारायण गुळवणी व सौ. उमाबाई हे आचारसंपन्न व सात्विक कुटूंब राहात होते. सौ. उमाबाई यांच्या कडक उपासनेमुळे प्रसन्न होऊन श्री दत्तप्रभूंनी अष्टागंधयुक्त पादूका पुडीतून त्याच्या ओटीमध्ये घातल्या. कालांतराने सौ. उमाबाईनां दिवस गेले व वामनरावांचा १३ डिसेंबर १८८६ रोजी जन्म झाला. पुढे वामनरावांचे शिक्षण तारळे व कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल मध्ये झाले. लहान पणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. चित्रकलेच्या तिसऱ्या ग्रेडच्या परीक्षेसाठी त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश मिळवला. दिवाळीच्या सुटीत गावी आले. त्यावेळी प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींचे नरसोबावाडीला पहिले दर्शन लाभले. वामनरावांनी तयार केलेले दत्तप्रभूंचे चित्र टेंबे स्वामींना खूपच आवडले. वामनरावांच्या उजव्या मनगटावर स्वामींनी एक चांदीची मंत्रसिध्द प्रसादपेटी बांधली व ती आजन्म त्यांच्या सोबत होती.

पुनः पवनी येथील चातुर्मासांत वामनरावांना स्वामींचा सत्संग लाभला व मंत्रदीक्षा मिळाली. पुढच्या काळांत मुंबईहून गाणगापूरला जाऊन श्रीगुरुचरित्राचे त्यांनी ७ सप्ताह केले व सद्गुरुंच्या भेटीची त्यांना तळमळ लागली. तुटपुंज्या माहितीच्या आधारे त्यांनी शोध सुरु केला व तुंगभद्रा नदीच्या काठी बसलेल्या हावनूर या गावी स्वामींची त्रिपुरांत केश्वराच्या मंदिरांत भेट होऊन परम संतोष झाला. येथे ११ दिवसाचा दुर्मिळ सत्संग व सेवेचा लाभ झाला. आयुष्यांत कलाटणी मिळणारा अनुभवही आला. या भेटीत स्वामींनी आसने, प्राणायाम, अजपाजप, भगवद् गीतेचा पाठ व विष्णूसहस्त्रनाम हे सर्व शिकवले. निरोप घेताना, पुनः दर्शन कधी होणार? असे वामनरावांनी विचारल्यावर 'स्वामींनी हृदयाकडे बोट करुन हे लक्षांत ठेव' असे सांगितले. वामनरावांना त्याच क्षणी व्याघ्रांबरधारी दत्तप्रभूंचे दर्शन झाले. नंतर त्यांनी काढलेले चित्र आजही वासुदेव  निवासांत विराजमान आहे. नर्मदातीराच्या गरुडेश्ररी प. पू. टेंबेस्वामींचा शेवटचा चातुर्मास झाला व याच तीर्थस्नानावर स्वामींनी  १९१४ साली देह ठेवला.

पुढे वामनराव बार्शीला शाळेत ड्रॉईंग टीचर म्हणून कामाला लागले. पुढे योगाभ्यासा साठी ते होशंगाबाद येथे श्री. पंडित यांच्याकडे गेले. त्याच सुमारास योगायोगाने प. पू. लोकनाथतिर्थस्वामी होशंगाबादला आलेले होते. ते वेद दीक्षा देणारे अधिकारी पुरुष होते. वामनरावांचे ब्रह्मचर्यपालन, आचारसंपन्न जीवन, आसन, प्राणायामातील प्रगती पाहून प. पू. लोकतीर्थांना आनंद झाला आणि त्यांना शक्तिपात दीक्षा प्रदान केली. श्रेष्ठ दर्जाचा शिष्य मिळाला म्हणून स्वामींना आनंद झाला. विमनरावांचे प्रगतीचे टप्पे पाहिल्यावर स्वामींनी वामनरावांना दीक्षागुरुत्वाचा अधिकार दिला व वयाच्या ३८ व्या वर्षी ते गुळवणी महाराज झाले व ५० वर्षे गुरुपदी राहून शिष्यवर्ग सांभाळला. कालांतराने १९२६ साली बार्शीहून पुण्याला नू. म. वि. मध्ये ड्रॉईंग टीचर म्हणून रुजू झाले. व १९४२ पर्यंत नोकरीवर होते. त्यांच्या दैवी कार्याला आता वेग आला. महाराज जात्याच अबोल व मितभाषी, त्यांचा ऐकमेव लेख गोरखपूरच्या कल्याण मासिकामध्ये Transmission of SPiritual Power या नावाने प्रसिद्ध झाला. तदनंतर जिज्ञासू साधकांची गर्दी होऊ लागली. महाराजांनी खूप शिष्यांना शक्तिपात दीक्षा, काहींनि मंत्र दीक्षा व इतर काहींना दोन्हीही दिलेल्या आहेत. ही दीक्षा स्पर्श, शब्द, हृष्टी किंवा संकल्पानी देता येते. संपूर्ण शरणागती व समर्पणाच्या भावनेने साधकाने आसनावर स्वस्थ व दीर्घकाळ बसायचे. श्रीगुरुकृपेने साधकांना ज्यांच्या त्यांच्या पिंडप्रकृती प्रमाणे सूक्ष्मक्रिया, प्राणायाम, कुंभक, ओंकार वगैरे होऊन आल्हाददायक अनुभव येतातच. निरंतर अभ्यास झाल्यावर निर्विकल्प समाधी पर्यंत साधक पोचू शकतो.

पुढे २/३ वर्षानी महाराजांची प्रकृती बिघडू लागली. किरकोळ आजार ताप वगैरे वाढू लागले. भीष्माप्रमाणे महाराज उत्तरायण सुरु होण्याची वाट पाहु लागले. सारे क्लेश शांतपणे सहन करीत होते. विद्या नावाच्या मुलीचा उघड नयन देवा हा अभंग ऐकताना टेंबेस्वामींचे दर्शन होत आहे, असे महाराज म्हणाले आणि लगेचच १५/०१/१९७४ ला दुपारी पाऊण वाजता चिरविश्रांती घेतली. रेडिओवर बातमी आली. सगळीकडे हाहाकार झाला. दुसरे दिवशी अभूतपूर्व व प्रचंड अंत्ययात्रा निघाली व त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

प. पू. गुळवणी महाराजांकडून दैवीकृपेमुळे झालेली तीन महत् कार्ये

१) मुमुक्षू-आर्त-जिज्ञासू साधकांना मार्गदर्शन, शक्तिपात वा मंत्रदीक्षा देऊन त्यांचा उध्दार करण्याचा वसा ५० वर्षे निष्ठेने पाळला. लुप्त होत चाललेल्या शक्तिपात अथवा वेध दीक्षेला संजिवनी देण्याचे महत् कार्य त्यांच्या हातून घडले व हजारो साधक भक्तांना याचा लाभ झाला.

२) प. पू. टेंबेस्वामींचे आसेतु हिमाचल भ्रमण झाले व भारतात २३ ठिकाणी त्यांचे चातुर्मास झाले. त्यांचे मूळ गांव माणगांव व या विविध ठिकाणी केलेले प्रासादिक लिखाण प्रचंड आहे, हे जवळ जवळ १ लाख पृष्ठांचे लिखाण साक्षात् दत्तप्रभूंच्या कृपेने झालेले, ते सर्व एकत्र करण्यात आले. सव्यसाची व साक्षेपी असलेल्या प. पू. दत्तमहाराज कवीश्वर व इतर सभासदांनी ५ वर्षे अहोरात्र मेहनत घेतली. शिक्षात्रयम्, सप्तशती, श्रीदत्त महात्म्य, श्रीदत्तपुराण, द्विसाहस्त्री, श्रीगुरुदेव चरीत्र स्तोत्रादि संग्रह इत्यादी १० खंड तयार झाले. प. पू. टेंबेस्वामींच्या १९५४ मधील जन्मशताब्दीचे औचित्य साधून हे सर्व खंड हैद्राबाद येथे प्रसिद्ध केले. त्यामुळे ही प्रासादिक वाङ्मय सेवा चिरकाळ टिकणारी झाली. हे एक अभूतपूर्व असे कार्य झाले.

३) श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे पादुका स्थानावरा वर्तुळाकार सभामंडपाची निर्मिती अत्यंत कल्पक रीतीने भक्कम बांधकाम करुन पार पाडण्यात आली. देवाच्या मागे उंच व प्रशस्त ओवऱ्या बांधण्यात आल्या, यांचा उपयोग उत्सवाच्या स्वारीसाठी व पालखी साठी खुपच होतो. देवापुढील कट्टा वाढवून प्रशस्त बनविण्यात आला. तीनही ऋतु पासून बचाव होऊन भक्तांना १२ महिने प्रदक्षिणेसाठी अत्यंत आनुकूल झाले. 

गुळवणी महाराज व दत्तवातारी संत निरंजन रघुनाथ.

योगीराज श्री गुळवणी महाराज जेव्हा गिरनार यात्रेला गेले होते, तेव्हा त्यांना श्री निरंजन रघुनाथ यांचे स्मरण झाले. निरंजन रघुनाथ यांची कथा महाराजांनी अनेक वेळा अनेक जणांना सांगितली. ती कथा प्रासादिक व नाविन्यपूर्ण आहे, ती कथा अशी आहे.

श्री निरंजन रघुनाथ हे फार मोठे सत्पुरुष होऊन गेले, रघुनाथ हे त्यांच्या गुरूंचे नाव. निरंजन रघुनाथ एकदा कीर्तन ऐकत असताना त्यांना उपरती झाली आणि त्यांनी तिथेच अशी प्रतिज्ञा केली की भगवान दत्तात्रय यांचे शडभुज रुपी दर्शन एक वर्षात झाले नाही तर प्राणत्याग करीन. अश्या तऱ्हेने घोर प्रतिज्ञ करून दृढ निश्चयाने ते दत्त चिंतनात निमग्न राहू लागले. श्री दत्ताचे दर्शन व्हावे हा एकच ध्यास मनी घेतला होता. सर्वसंग परित्याग करून ते दत्तदर्शन साठी तळमळत होते. वर्षाचा अवधी संपत आला, थोडे दिवस उरले. सह्याद्री शिखरावर श्री दत्तात्रय यांचे पीठ म्हणजे बसायची जागा आहे हे ओळखून गिरनार पर्वता वर चढायला सुरुवात केली. सर्व पायऱ्या चढून ते चौथऱ्यावर आले, पादुकांचे दर्शन घेऊन सदगदीत अंतकरणाने प्रार्थना केली की, मी प्रतिज्ञा केली आहे आपले साक्षात दर्शन व्हावे, अन्यथा प्राणत्याग करीन. वर्ष संपण्यास ३ दिवसाचा अवधी उरला होता. वर चौथऱ्यावर जोराचा वारा, जास्त वेळ तिथे बसता येत नाही तिथे वस्तीला राहणे तर दूरच. निरंजन रघुनाथ यांचा निश्चय पक्का होता. त्यांनी रात्री तिथेच मुक्काम केला. तहान नाही, भूक नाही, झोप नाही, मनात एकच विचार, दत्तात्रय दर्शन फक्त. पहिल्या रात्री स्वप्न पडले, भगवान दत्तात्रय स्वप्नात आले व म्हणाले "कलियुगात प्रत्यक्ष दर्शन होत नाही, करिता हेच दर्शन समजून परत जावे!" निरंजन रघुनाथ परत फिरले नाहीत, मनात निश्चय एकच की प्रत्यक्ष दर्शन झाल्याशिवाय परत जायचे नाही, प्राणाची पर्वा नाही. दुसरे दिवशी स्वप्नात परत दत्तमहाराज आले आणि प्रसाद देऊन म्हणाले "हा प्रसाद घ्या आणि संतुष्ट व्हा, आणि माघारी फिरा!". प्रसाद होता खिचडीचा, स्वतः देवाने प्रसाद दिला तरीसुद्धा निरंजन रघुनाथ यांचा निश्चय कायम होता, प्रत्यक्ष दर्शन किंवा प्राणसमर्पण अश्या ठाम निश्चयाने तिसरे दिवशी तिथेच राहिले. 

तीन दिवस पुरे झाले आणि वर्षाचा अवधी संपला, दर्शन झाले नाही म्हणून निरंजन रघुनाथ प्राणत्याग करण्यास सिद्ध झाले. पाषाणाच्या पादुका तिथे होत्याच, जीव एकवटून मस्तक पादुकावर जोराने आपटले, डोक्याच्या कवटीची दोन शकले झाली. शडभुज मूर्ती भक्तवत्सल, भक्त अभिमानी राजाधिराज श्री दत्तात्रय प्रत्यक्ष रुपात अवतीर्ण झाले, मस्तकाला हस्तस्पर्श होताच मस्तक जोडले गेले. निरंजन रघुनाथ शुद्धीवर आले, श्री दत्तात्रेयांना स्वतःच्या डोळ्याने पाहिले, त्यांचे दर्शन घेतले आणि पायावर डोके ठेवले. भगवान दत्तात्रय म्हणाले, "कलियुगात असे दर्शन नसते, दुराग्रह धरू नये "! दर्शन देऊन भगवान दत्तात्रय अंतर्धान पावले. निरंजन रघुनाथांच्या मस्तकावर जखमेची खूण कायम राहिली. डोक्यावर कवटीला उभी सरळ रेष कायम दिसत होती. 

ही सर्व कथा महाराज काळजी पूर्वक सांगत कारण ही कथा अलौकिक आहे, अलीकडच्या काळात घडलेली आहे व उद्बोधक आहे. निरंजन रघुनाथांनि हे सर्व वर्णन आपल्या गुरू समोर बसून लिहले, म्हणून त्याला जास्त महत्व आहे. निरंजन रघुनाथ यांनी काही ग्रंथ रचना केली, निरंजन रघुनाथांच्या ग्रंथ म्हणून ती प्रसिद्ध आहे. मिरज येथून ते एकत्रीत प्रसिद्ध झाले होते. अमृताअनुभव वरील त्यांच्या ग्रंथात काही कूट ओव्यांचा अर्थ उलगडून दाखवला आहे. निरंजन रघुनाथांच्या पूर्व सुकृता मूळे व चालू जन्मातील साधने मुळे त्यांना दर्शन झाले. त्यांनी डोके फोडून घेतले तो प्रकार इतरांनी करणे हा आततायी पणा ठरेल, उत्तम उपासना करावी हेच उत्तम.

गुळवणी महाराजांकडून भक्तांस मुक्ती

गुळवणी महाराजांच्या चरित्रात सांगितलेला हा प्रसंग आहे. गुळवणी महाराजांचे एक शिष्य होते. त्या शिष्याचे एक नातेवाईक बरेच आजारी होते. जवळपास शेवटच्या घटका मोजत होते. महाराजांना जेव्हा त्या शिष्याने त्या नातेवाईकांना भेटायची विनंती केली तेव्हा महाराज लगेचच तयार झाले. जसे जसे महाराज त्या व्यक्तीच्या घराजवळ येऊ लागले तसे अस्वस्थ होऊ लागले. जणू काही कोणत्या तरी अज्ञात शक्तीशी त्यांचा संघर्षच चालला होता.

थोड्यावेळाने महाराज त्या आजारी व्यक्तीच्या घरी आले आणि तात्काळ त्या आजारी व्यक्तीस भेटावयास गेले. तिथे त्यांची आणि त्या व्यक्तीची भेट झाली. ती व्यक्ती काही बोलू शकत नव्हती फक्त पाहूच शकत होती. महाराजांनी त्या व्यक्तीला पुत्र प्रेमाने कॉफी पाजवली, नंतर गंगा देऊ गेली. त्या व्यक्तीच्या छातीवरून आणि डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायला सुरवात केली. मग डोक्यावरती हात ठेवून प्रेमाने डोके थोपटले. शेवटी त्या व्यक्तीकडे महाराज एकाग्र चित्ताने पण वेगळ्याच नजरेने पाहू लागले. हे जवळपास अर्धा तास चालले होते. त्यांनतर महाराज उठले आणि व्हरांड्यात फेऱ्या मारू लागले मग थोड्यावेळाने महाराज तेथील लोकांना येतो असं म्हणून परत आश्रमात निघण्यासाठी जाऊ लागले.

महाराज आश्रमात पोचले असतील नसतील तेवढ्यात त्यांना ती आजारी व्यक्ती गेल्याची बातमी घेऊन कोणीतरी आले. त्या व्यक्तीला कोणताही त्रास न होता शांतपणे मृत्यू आला. झोपेतच जणू काही प्राणपक्षी उडून जावेत अशा प्रकारचा सुखद मृत्यू त्यांना आला. ती व्यक्ती महाराजांना कधीही भेटली नव्हती पण महाराजांशी अंतकाळी भेट घडून यावी हे पूर्वपुण्याई गाठीशी असल्याशिवाय कदापिही शक्य नसावे. ती व्यक्ती सुद्धा तेवढीच पुण्यवान होती हे नक्कीच मान्य करावे लागेल.

पुढे त्या व्यक्तीच्या नात्यातल्या एक बाईंनी हा प्रसंग श्री काणे महाराज यांना सांगितला त्यावर त्यांनी जो खुलासा केला तो सामान्य माणसाच्या कल्पना शक्तीच्याहि पलीकडला आहे. ते म्हणाले "मृत्यू अटळ आहे हे जेव्हा महाराजांना समजले तेव्हा ते फार अस्वस्थ झाले. पण महाराजांच्या दर्शनाने, स्पर्शाने मृत्यूची वेळ शुभ झाली. शेवट अतिशय छान झाला आणि त्या व्यक्तीला पुनर्जन्म नाही. लोकांनी हेवा करावा असे भाग्यशाली मरण आले. प्राण सहजतेने निघून गेले. मृत्यू समोर असताना सुद्धा चित्त शांत झाले. चित्त शांतीमुळे वासना शून्य झाली. वासनारहित अवस्था ही पुनर्जन्म थांबवणारी असते."

गुरुपरंपरा 

श्री नृसिहसरस्वती 
   ।
श्री वासुदेवानंद सरस्वती 
   ।
श्री गुळवणी महाराज 

अनन्यभक्ती भक्ताची! प. पु. गुळवणी महाराजांचे शबरीचे कथेद्वारे प्रतिपादन

एकदा दुपारी भोजनानंतर गुळवणी महाराज बसलेले असताना. गुरुचरित्राचा विषय निघाला. तेव्हा एकाने विचारले. श्री गुरूंचे अनेक भक्त गुरुचरित्रात वर्णिलेले आहेत. त्यापैकी गुरूंना प्रिय भक्त कोणाचा? महाराज म्हणाले. "रजक" जो नवव्या अध्यायात वर्णिला आहे. जो पुढील जन्मात बिदर (विदुरानगर) येथील बादशहा झाला. त्या रजकाने एका राजाला सर्व लवाजम्यानिशी जाताना पाहिले. आणि इच्छा प्रदर्शित केली. की असे सुख प्राप्त होईल का? श्री गुरूंनी त्याची इच्छा पूर्ण केली. पुढील जन्मात तो यवन कुळात जन्म घेऊन राजा झाला. आणि सर्व सुखे प्राप्त करता झाला. हे ऐकून महाराजांना विचारले की इतर ज्ञानी यती भक्त असताना, या बादशहात काय विशेष होते? तेव्हा महाराजांनी टेम्बे स्वामी यांच्या ग्रंथातील काही ओळी म्हणून दाखवल्या. त्या यवनाची भक्ती श्रेष्ठ अशी सर्वस्व अर्पणाची अशी होती. त्यामुळे संतुष्ट होऊन श्रीगुरूंनी त्याला सदगती दिली. श्री गुरूंच्या अनेक शिष्याना त्यांनी उपदेश केला. ज्ञान दिले. स्वकर्माची जाणीव करून दिली. बिदरच्या बादशाहवर त्यांची विशेष मर्जी होती. त्यांनी यवनाची स्फोटक म्हणजे फोड बरा केला. त्याच्या घरी म्हणजे अंतपुरात जाऊन बायकामुलांना दर्शन दिले, व पापविनाशी तीर्थाशी मुक्ती दिली. यवनाची भक्ती अनन्य अशी होती. तेव्हा महाराजांना कुणीतरी विचारले अजून अशी भक्ती कुणीकुणी केली? तेव्हा महाराज म्हणाले "पुष्कळांनी अशी भक्ती करून परमेशवर प्राप्ती करून घेतली. त्यापैकी एक शबरी होती. शबरी हीन कुळातील होती. प्रभू रामचंद्रानी तिची भक्ती पाहून तिच्यावर कृपा केली. ही शबरी कोण? काय हिची कथा?", महाराज सांगू लागले;

शबरी पूर्वजन्मी एक महाराणी होती. राजमहालतात खुप सुख होते. पण ते शबरीला आवडत नसे. ती महाराणी असल्याने तिला पडदयात च राहावे लगे. त्या बाहेर जाऊ शकत नसे. त्यामुळे खुप दुःखी होत्या. कोणाही संतांची सेवा करू शकत नव्हत्या. कथाश्रवन करू शकत नव्हत्या. एकदा महाराणी शबरी प्रयागच्या कुंभमेळाला गेल्या संतांचे दर्शन होताच त्याना फार आनंद झाला. दर्शन तर झाले पण महाराणी असल्याने इच्छा असून सेवा करू शकत नव्हत्या. त्यामुळे अतिशय दुःखी झाल्या. आत्महत्या करण्याचा निश्चय केला. आत्महत्या हे महापाप आहे. पण प्रयाग त्रिवेणीत कोणी आत्महत्या केली तर पाप लागत नाही. म्हणून संगमात स्नान करता करता संतसेवा करण्याकरता मला पवित्र जन्म मिळेल अशी भावना ठेऊन आत्महत्या केली. ह्याच महाराणी पुढे शबरी झाल्या. एक भिल्ल राज्याचे घरी कन्यारुपाने प्रकट झाल्या. लहानपणापासून त्यांचे हृदय अति कोमल होते.प्रभुवर निरतिशय प्रेम होते.त्या मोठ्या झाल्या व त्यांचे लग्न नक्की झाले.त्यावेळी त्यांच्या वडिलांनी तीनशे बोकड मागवले.शबरीने विचारले"हे का मागवले? वडील म्हणाले "बेटा वऱ्हाडी मंडळींना भोजन द्यायला पाहिजे. "शबरींवर आघात झाला. माझ्या लग्नात या अनेक जीवांची हिंसा होणार! "मला लग्नच करायचे नाही" असा निश्चय करून त्या दिवशी रात्रीच ती घर सोडून पळाली. दक्षिणेस पंपासरोवरजवळ मातंग ऋषींचा आश्रम होता. तेथे पोचली तेथे शांत पवित्र सात्विक वातावरण होते. अनेक ऋषींचे तेथे आश्रम होते. शबरीला ते फार आवडले. तिने विचार केला. की मी ही भिल्लींन आहे. हीन जातीची आहे. कदाचित हे ऋषी माझी सेवा स्वीकार करणार नाहीत. तरी मी अज्ञात राहून त्यांची सेवा करीन. शबरी सबंध दिवस जंगलात फिरे. सुंदर सुंदर फळे फुले एकत्र करी व ऋषी जेव्हा झोपत तेव्हा एकेका ऋषीचया आश्रमात फुलें गुपचुप नेऊन ठेवी. ऋषी रोज पंपा सरोवरात स्नान करण्यास जात. त्यांना काटे बोचू नयेत म्हणून शबरी पहाटे अंधारातच "सीताराम सीताराम" असा जप करीत करीत रस्ता झाडून ठेवी. काटे खडे बाजूला सारी. अश्या रीतीने अज्ञात सेवा करू लागली. कोणासही कळत नव्हते. सर्व ऋषींना आसचर्य वाटे की ही फळे कोण आणतो? शबरी झाडावर झोप घेई दिवसभर अरण्यात फिरून फळे एकत्र करी. मतंग ऋषींना आसचर्य वाटले की कुणीतरी अज्ञात राहून सेवा करतय. त्यांनी निश्चय केला की आज रात्री झोपेचे नाटक करून शोधून काढू कोण ही फळे-फुले ठेवतो ते बघू. दर्भासनावर ऋषी झोपले होते. मध्यरात्रीच्या वेळ होती. त्यावेळी शबरो हळूहळू तिथे गेली व फळे ठेवली. मतंग ऋषी जागेच होते. त्यांनी विचारले "मुली तू कोण आहेस? जात लपवणे पाप आहे. शबरी घाबरली मी तर भिल्लींन आहे. माझ्या हातच्या फळांचा ऋषी आता स्वीकार करणार नाहीत. ते तर तपस्वी ब्राम्हण व मी तर हीन जातीतील शबरी थरथर कापू लागली. ऋषीस वारंवार वंदन करून सांगू लागली. की मी अपराधी आहे. मी तुमची दासी! ऋषींनी विचारले "रोज रात्री तू येतेस? सेवा तू करतेस? तेव्हा शबरी "हो" म्हणाली. मग ऋषींनी विचारले तू दिवसा का येत नाहीस? रात्री येतेस? तेव्हा शबरी म्हणाली "माझी सेवा कदाचित ग्रहण न होईल म्हणून मी रात्री येते". भक्ती हा अलौकिक धर्म आहे. त्याला गुप्त ठेवा. लौकिकात आणू नका. भगवनतास प्रसन्न करण्यासाठी भक्ती करा. सत्कर्माची जाहिरात केल्याने पुण्याचा नाश होतो. मतंग ऋषीस आसचर्य वाटले. की पहा कशी बोलते? ती कोणत्याही जातीची असली तरी हा जीव दैवी आहे. काही साधारण नाही. त्यांनी शबरीस विचारले "मुली तू कोण आहेस?" शबरी म्हणाली महाराज मी एक भिल्लींन आहे. हीन जातीची आहे. माझे नाव शबरी मतंग ऋषींनी विचार केला. जरी ही हीन जातीची असली तरी कर्महीन नाही. हा कोणी महान दैवी जीव भिल्ल योनीत आला आहे. ऋषींनी शबरीस सांगितले, "बाळा जात लपवू नये" कोणतीही जात हलकी नाही. जो स्वधर्म सोडतो. तो हीन तू कुठे राहतेस? शबरी म्हणाली जंगलात फिरते झाडावर राहते. ऋषींचे हृदय द्रवले. व म्हणाले, "पुत्री मी या आश्रमात लहानशी झोपडी बाजूला करवून घेईन तू आजपासून माझी मुलगी". शबरी करीत एक झोपडी करवली व तिला म्हणाले. "तुला सेवा करायची आहे ना? तू या झोपडीत राहा. शबरी शुद्ध होती. तरी कित्येक ऋषींनी विरोध केला. व म्हणाले "या भिल्लीनिस काय ठेवता? मतंग ऋषी म्हणाले, "मी हिला स्पर्श पण केला नाही. मी धर्माची मर्यादा तोडत नाही. तिची जात कोणतीही असली तरी मला वाटते हा जीव फार सुपात्र आहे. फार शुद्ध आहे. येथे एका बाजूला राहिली तर काय हरकत? यावर इतर ऋषी म्हणाले "महाराज हे योग्य नाही. कित्येक ऋषी मतंग ऋषीस म्हणाले. आम्ही तुम्हाला जातीबाह्य करू. मतंग ऋषी म्हणाले तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.

मतंग ऋषी रोज श्रीराम कथा सांगत. शबरी ती ऐके ऋषींना दया आली. त्यांनी कृपा करून शबरीस श्रीराम मंत्राची दीक्षा दिली. श्रीराम मंत्राचा अर्थ समजावीत मतंग ऋषींनी शबरीस सांगितले. की ओम काराचा भावार्थ श्रीराम नामात भरलेला आहे. ओंकारातील "ओम" पृथ्वी तत्वाचे अक्षर "म" हे आकाशतत्वचे अक्षर ते सूर्य आहे. "राम नामात "र" अग्नी तत्वाचे अक्षर "आ" वायुतत्वचे अक्षर सूर्य हे अग्नीतत्व "वाक" (वाचा) व वायू तत्त्व रुपी भावाचया सहयोगाने ओम चे उच्चार न होते.

मतंग ऋषींनी शबरीस सांगितले, मुली सबंध दिवस श्रीराम श्रीराम हा जप कर. हे वेदांचे सार आहे. हा मंत्र अतिदिव्य आहे. श्रेष्ठ आहे. गुरुदेवांनी दिलेल्या श्रीराम मंत्राचा जप शबरी सतत करी. व संतांची सेवा करी.हळूहळू पाप जळू लागले. मन शुद्ध झाले.शुद्ध मनात भगवनताच्या दर्शनाची भावना व तीव्र इच्छा जागृत झाली. एकदा असे झाले ब्राम्ह मुहूर्तावर शबरी झाडून साफसूफ करीत होती, अजून अंधार होता. एक ऋषी स्नान करून येत होते. त्यांचा पाय झाडूस लागला. ऋषींना फार क्रोध आला. त्यांनी शबरीचा तिरस्कार केला व बोलले. "ही भिल्लींन मला शिवली, व त्यांनी शबरीस लाथ मारली. तपसचर्येत भक्तीची साथ नसेल तर तपस्येचे पण पतन होते. भगवनतास ते आवडले नाही. ऋषी जेव्हा पुन्हा स्नान करण्यास गेले. तेव्हा पंपा सरोवराचे जल रुधिरा सारखे लाल झाले. व त्यात किडे पडले. मतंग ऋषींचा सत्संग शबरीस पुष्कळ दिवस घडला. नंतर मतंग ऋषीनि विचार केला. की माझी वेळ आता सम्पत आली आहे. या शरीराचे प्रारब्ध पूर्ण होत आले आहे. मला आता ब्रम्हलोकत जायचे आहे. त्यांनी शिष्यांना सांगितले की मी आता जातो. शबरीस हे कळताच ती धावत आली. तिने गुरुदेवांना वंदन करून म्हणले. की आपण जाणार मग माझे काय होणार? मतंग ऋषी म्हणाले मुली तू येथेच रहा तू तर माझ्यापेक्षाही भाग्यशाली आहेस. मी ज्ञानचक्षुनी राम दर्शन केले. पण तुला तर चर्मचक्षुनी प्रत्यक्ष भगवंतांचे दर्शन होणार आहे. श्रीराम तुझ्या घरी येतील. शबरीला अतिशय आनंद झाला. ती म्हणाली, "श्रीराम माझ्या घरी येतील ते अनंत कोटी ब्रम्हांडाचे नायक आहेत. जे लक्ष्मी मातेचे स्वामी आहेत. ते माझ्यासारख्या भिल्लीनी कडे? मी तर काही शिकलेली नाही. पैसे नाही., यावर ऋषी म्हणाले, "भगवंत तर प्रेम पाहतो. श्रीराम एक दिवस नक्की येतील. माझा तुला आशीर्वाद आहे.

मतंग ऋषी शबरीला भगवंत येतील अशी आशा देऊन ब्रम्हलोकात गेले. शबरी या आशेवर जिवंत राहू लागल्या.शबरी रामाची प्रतीक्षा करीत त्यांच्या करता सुमधुर फळे आणि.माझे राम आज येतील, उद्या येतील, अश्या आशेने सायंकाळ पर्यन्त रोज प्रभू रामचंद्राची प्रतीक्षा करीत. शबरी नियमितपणे चौफेर साफसफाई करी. मुखाने श्रीराम श्रीराम असा जप करी. स्वछतेचि सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असते. या सेवेने भक्तांचे चरणरज मिळते. ते वासनाचा नाश करते.पुष्कळ दिवस शबरीने अशी दिव्य तापसचर्या केली. तप करता करता शबरी आता वृद्ध झाली. शबरी महान योगिनी होत्या. श्रीरामाचे दर्शन झाल्याशिवाय मला मरायचे नाही. मनात निश्चय होता की राम दर्शन केल्यानंतरच मी प्राण सोडिन. शबरी विचार करत होती मी पात्र आहे का? रामराया एखाद्या ऋषीच्या आश्रमात येतील. तेव्हा मी त्यांचे दुरूनच दर्शन घेईन. पुन्हा शबरीला वाटे, नाही! गुरुजींनी मला आशीर्वाद दिला आहे. तेव्हा ते अवश्य येतील.

रघुनाथ फिरत फिरत पंपा सरोवरपाशी आले. मोठ्या मोठ्या ऋषींना हे कळले. व ते धावतच आले.हे ऋषी रामाच्या मागे लागले. व त्यांची मनधरणी करू लागले. की आपण आमच्या आश्रमात यावे. पण श्रीरामांनी सर्वांना विचारले. "शबरी कुठे आहे?" मला शबरीला भेटायचे आहे. मला शबरीच्या घरी जायचे आहे. ज्या दिवशी प्रभू आले त्या दिवशी शबरी घरातच श्रीरामाचा जप करत बसल्या होत्या. शबरीना आशा नव्हती. की श्रीराम त्यांच्या घरी येतील. शबरीला असे वाटले की आजपर्यंत वाट बघितली तरी ते आले नाहीत. पण मी ऐकले आहे. की ते या बाजूला आले आहेत. व त्यांना कोणी ऋषी त्यांच्या आश्रमात घेऊन जातील. श्रीराम माझे घरी येणार नाहीत. पण जे सर्व जीवन भगवंताला शोधतात त्यास एखादा दिवस भगवंतच शोधत शोधत त्याच्या घरी येतत्. बारा वर्षे तापसचर्या करतील. त्यास सिद्धी अवश्य मिळते. भगवंतांनी शबरीच्या चरित्रात बोध दिला आहे. की सर्व जीवनभर जे मला शोधतात त्यांना  एखादा दिवस मी शोधण्यास निघतो. व भेटतो. मला सतत शोधा., जे मला सर्व ठिकाणी सतत शोधतो. त्याला शोधण्यास मी येतो. मनुष्याचे जीवन पवित्र असेल तर भगवन्त आमंत्रण शिवाय त्याचे घरी येतील.

आज शबरीच्या आश्रमात राम लक्ष्मण आले आहेत. शबरीला अतिशय आनंद झाला. आणि वाटले जगाचा स्वामी अनंतकोटी ब्रम्हांडाचे स्वामी आज माझे घरी आले. श्रीराम लक्ष्मण यांचे दर्शन करता करता शबरी निशब्द झाल्या. प्रभूने वल्कलवस्त्रे धारण केली होती. डोक्यावर सुंदर जटाचा मुकुट आहे. अंग मेघासारखे श्याम. लक्ष्मण गोरे आहेत. शबरीने दर्भाची दोन आसने दिली. त्या आसनावर राम लक्ष्मण बसले. श्रीराम लक्ष्मणाचे दिव्य प्रेम पाहताच शबरी दर्शनात इतक्या तन्मय झाल्या. की त्यांचे डोळे अश्रूने भरून आले. शबरी श्रीरामासन्मुख बसली होती. व डोळे अश्रूंनी भरल्यामुळे नीट दर्शन करू शकत नव्हत्या. शबरी फार गरीब होती. ती द्रोणात पाणी घेऊन आली. शबरीने चांगली फळे बघून आणून ठेवली होती. रामासाठी आणलेली फळे रामाला अर्पण केली. आणि म्हणाली, "महाराज मी हीन जातीची अधम आहे. मला काही येत नाही. काही ज्ञान नाही. दिवसभर मी फक्त श्रीराम श्रीराम म्हणते. आपण मला आपली म्हणली. आज मी कृतार्थ झाले. माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही. पुष्कळ दिवसापासून एकच संकल्प. तुम्ही भोजन करा व मी माझ्या डोळ्याने पाहीन. माझी तुमच्या जवळ काही मागणी नाही. तुम्ही खावे मी दर्शन करावे. 

वेदात असे वर्णन आहे. की ईशवरला भूक लागत नाही. तहान लागत नाही. भगवन्त निष्काम आहे. भगवन्त खात नाही. तो तर जगास जेवू घालतो. जगाचे पोषण करतो. भगवन्त विषवमभर आहे. अरे भगवंताला भूक लागली तर जगात काय राहील.

ज्ञानी मानतात की भगवन्त निर्गुण निराकार आहे. तो काही खात नाही.ब्रम्ह खात नाही. बोलत चालत येत जात नाही. जे ज्ञानी असे समजतात त्यांना स्वतःला तर खावेच लागते. भगवन्त म्हणतात, "या ज्ञान्याच्या घरी राहून मला नित्य एकादशी करावी लागेल. ज्ञानी पुरुष स्वतः पोटाची पूजा करतात. परन्तु मला उपाशी ठेवतात. भगवन्त खात नाही हा वेदाचा सिद्धांत आहे. पण ते केव्हातरी जेवतात हे पण सत्य आहे. आनंदमय भगवंतालाही भक्ताचे प्रेम पाहून खाण्याची इच्छा होते. तर भगवन्त खातात ईशवर हा निष्काम आहे. पण शबरी सारखे प्रेम हृदयात प्रकट झाले असेल, तर ते प्रेम निष्काम ईशवरला सकाम करते. आज श्रीरामांना खूप भूक लागली आहे. शबरीची इच्छा होती की श्रीराम खातील व मी डोळ्याने पाहीन. रामप्रभुस खुप भूक लागली होती ते शबरीस म्हणले, "माते मी उपाशी आहे. मला काही खायला दे". भगवनतास तुम्ही जे अर्पण करता ते ते घेतात हे सत्य आहे. जेथे प्रेम असेल तेथे भगवन्त मागून घेऊन खातात. आज शबरीचे प्रेम पाहून भगवनतास भूक लागली. शबरी रघुनाथांस बोरे अर्पण करतात. शबरी ती चाखून देते. कदाचित एखादे आंबट निघू नये म्हणून. अतिशय प्रेमात. शबरीला आज भान राहिले नाही. की आपण उष्टी बोरे रामरायास खाऊ घालत आहोत. श्रीरामांनी उष्ठ्य बोराकडे पाहिले नाही. शबरीच्या शरीराकडे पण नाही. तिच्या हृदयातील भावाकडे पाहिले. शबरीचे शरीर दुर्बल आहे. कपडे मळके आहेत. कपडे मळके असले तरी हृदय शुद्ध आहे. आणि स्वछ आहे. रामानि शबरीच्या बोराची खुप प्रशनसा केली. शबरी कृतार्थ झाली.

श्रीराम मोठ्या मोठ्या ऋषींनच्या आश्रमात पण गेले नाहीत.परन्तु शबरीला कृतार्थ केले.कारण तिचे प्रेम भगवंतास प्रसन्न करण्याचे प्रेम हे एकमात्र साधन आहे. श्रीरामचंद्र यांनी विचारले. तुझी इच्छा काय आहे? शबरीने रामाला विनंती केली या पंपा सरोवराचे पाणी बिघडले आहे ते शुद्ध करा. आपण त्यात स्नान करावे म्हणजे ते शुद्ध होईल. एक ऋषीने शबरीस लाथ मारली म्हणून हे बिघडले. शबरीच्या महिमा वाढवा म्हणून रामाने जमलेल्या लोकांस सांगितले. की माझ्या स्नानाने काही होणार नाही. ते जल सुधारण्याची शक्ती माझी नाही. शबरीचे चरण धुवून ते जल सरोवरात टाकाल तर ते शुद्ध होईल. मग जलात स्नान केले. सरोवराचे पाणी स्वछ व शुद्ध झाले. मधुर झाले. नंतर तिने राम दर्शन करता करता योग अग्नीत स्वतःचे शरीर जाळून घेतले. शबरी कृतार्थ झाली.
श्रद्धा आणि सबुरी यांचे यापेक्षा अधिक उदाहरण असू शकत नाही.

(संदर्भ 'वेध वामनाचा", लेखक:- श्री. नारायण भालेराव)

तिसरा नेत्र ! 

प. पू. श्री गुळवणी महाराज.

साधकाने प्रश्न केला की, शिवाला व शक्तिमातेला तीन नेत्र का असतात? यावर महाराज म्हणाले, आपणा सगळ्यानाही तीसरा डोळा आहे. गुरुकृपेने हा उघडतो. यालाच ज्ञान चक्षु वा दिव्य चक्षु म्हणतात. आज्ञा चक्राचे स्थान हे ज्ञानचक्षुचे स्थान आहे. साधनेच्या अभ्यासाने आज्ञा चक्रात शक्ति व मन स्थिर करुन समाधीयोगात हि दिव्य ज्ञानदृष्टी प्राप्त होते. शिव आणि शक्ति अभिन्नआहेत, ज्ञानरुप आहेत. म्हणुन त्यांचा ज्ञानचक्षु हा तीसरा डोळा आहे. हा भ्रुमध्यात सुर्याप्रमाणे तेजस्वी व सुशोभित आहे. आज्ञा चक्र भेद म्हणजे दिव्य दृष्टी प्राप्ती.

योगीराज श्री गुळवणी महाराज, सद्गुरुवाणी, आठवणी व विचार

१) मनुष्याला सुख का वाटते तर त्याच्या पेक्षा मी मोठा, श्रेष्ठ आहे म्हणून, त्याला घर नाही मला बंगला आहे, तो नापास झाला, मी पास झालो, मी पहिला आलो. असे सुखाचे स्वरूप आहे म्हणून ते क्षणभंगुर आहे, अनित्य आहे. अश्या सुखाच्या मागे लागून अशांतीच मिळणार.

२) वाडीला एक मौनी तपस्वी होते. त्यांनी साक्षात्कारी शांताश्रम स्वामींना पाटीवर लिहून प्रश्न विचारला. "नामाने मोक्ष मिळेल का?" स्वामींनी तात्काळ उत्तर दिले. "तुला मिळणार नाही, कारण तुझी श्रद्धा नाही." साक्षात्कारी महापुरुषां पुढे जाऊन मनात प्रश्न असून न बोलता लिहून दाखवले सर्व संतांनी नाममहात्म सांगून त्यांचे वर विश्वास नाही, पुन्हा पुन्हा तीच शंका म्हणून हे उत्तर, भोळा भाव येणे ही फार मोठी पुण्याई आहे.

"गुरुचरित्रातील गोष्ट, वेश्येला भीक मिळाली नाही म्हणून शिवरात्र घडली, आणि तिच्या हातून बेलाचे पान चुकून पिंडीवर पडले तर तिला कैलासाहून न्यायला विमान आले, यावर तुमचा विश्वास आहे का" ? असा अकल्पित प्रश्न महाराजांनी स. कृ. ना केला. यावर स. कृ. "हो आहे" म्हणाले तेव्हा महाराज म्हणाले "काहीतरी काय सांगताय?, अहो माझी अद्याप तितकी श्रद्धा नाही, तर तुमची काय बसणार?", या अचूक दिगदर्शनाने स्वभावाचा सरळपणा वाटतो तितका सोपा नाही हे महाराजांनी दाखवून दिले. महाराज म्हणाले "इतका भोळा भाव आपला असू शकत नाही, भोळा भाव येणे ही फार मोठी पुण्याई समजावी "बुद्धी सरळ असली की आहे ते दिसते, जे लोक सांगतात ते खरेच आहे असे वाटते, लहान मुलांचे भाव पहा! प्राणी बोलतात या विधानावर त्यांच्या मनात शंका नसते, कुतर्क कुविचार लहान मुलांच्या मध्ये नसतातच, हा भोळा भाव आहे. लहान मुलांचे जगत स्वप्नांचे असते, म्हणून त्यांना काल्पनिक गोष्टी आपण सांगतो, त्या खोट्या असल्या तरी मुलांना खऱ्या वाटतात कारण ते भोळे आहेत, पण पुराणातील गोष्टी अश्या काल्पनिक रचलेल्या नाहीत. योग वशिष्ठ काल्पनिक भराऱ्यांचा ग्रंथ नाही. राक्षसाची कृत्ये, वर, आणि देवांनी केलेला राक्षसवध, या कल्पित गोष्टी नसतानाही माणसाचा स्वभाव चिकित्सक-संशयी-तार्किक असल्याने, या कथांवर सरळ विश्वास ठेवत नाही, काहीतरी अर्थ लावून मग बरोबर म्हणेल! आहे तसे मान्य करणे हा सरळपना बुद्धीच्या आत्यांतीक शुद्धतेवर अवलंबून असतो.

एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली त्याला ते म्हणाले "माणसाने मरायची इच्छा कधी करू नये, जगल तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे, आपल्या भोवतालच्या माणसाशी मिळून मिसळून राहावे लागते म्हणजे जीवनात त्रागा निर्माण होत नाही. सत्कर्म म्हणजे देवाचे करायचे, पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल, हो! नक्की होईल! केलं तर होईल! करून तर पहा, आणि मग सांगायला या!"

गुरूंचे मोठेपण आणि आपले सामान्यत्व साध्या साध्या बोलण्यातून व्यक्त होत असते.

प्रश्न:- महाराज! आपण लोकांच्या अडीअडचणी वर सांगता, म्हणजे आपल्याला अंतरदृष्टीने समजते हे खरे आहे ना?
महाराज:- छे! छे! मला कुठे काय समजते? अहो १०० माणस आली, आणि सगळ्यांना सांगितले पास होशील, मग जितकी माणस पास होतील त्यांना वाटत महाराजांनी सांगितले म्हणून झाले! सगळ्याच थोडाच काम होतंय! असे जर नक्की सांगता आले असते तर मग झालेच की! आम्ही म्हणतो इशवरच्यां कृपेने झाले.

प्रश्न:- "महाराज! प्रश्नावली कोणी केली? आपणही प्रश्नावली पहायला सांगता, आणि अनुभव येतो की ! ते कसे काय?
महाराज:- अहो! ते स्वामी महाराजांचे काम आहे, पवनीत फार गर्दी वाढली तेव्हा केली, आणि सितारामपंत महाराजां जवळ प्रश्नंवली करून दिली, कशी पहायची हे सांगितले, मग येणाऱ्यांना सितारामपंतांकडे जाण्यास सांगायचे. प्रश्नावली प्रमाणे केले म्हणजे होते हा स्वामीमहाराज यांचा अधिकार आहे, आम्ही सुद्धा म्हणत नाही आम्ही म्हणलं तर आमच्यावर जबाबदारी येईल, अहो ! फार काय? तुम्ही प्रश्नावली पाहून सांगितलं तरी लोकांचे काम होईल, "हो ! "हो ! "निश्चित होईल !! हा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या शब्दाचे सामर्थ्य आहे.

प्रश्न:- टेम्बे स्वामींचा आचरणाचा फार आग्रह असे, तो का?
उत्तर:- आचारधर्म कसा असतो हे लोकांना दाखवावं म्हणून त्यांनी अवतार घेतला होता. आचार प्रथमो धर्म ! नुसते लेखन प्रवचन करून थांबले नाहीत तसं वागून दाखवलं. निंदा स्तुती शरीराची असते, आपली नसते. मी चांगलही पुस्तक वाचीत नाही किंवा वाईट पण वाचत नाही कारण, चांगलं आपलं नाही तसं वाईटही आपलं नाही.

पातंजल योगसूत्राचा विषय चालू होता त्या वेळी,

प्रश्न:- पतंजली आधी की गीता आधी?
उत्तर:- आमच्या दृष्टीने पतंजली आधी ऋषी मुनी आधीच होते हो! आता माणसाची बुद्धी फिरलीये. हे सगळे २००० वर्षांच्या आसपास दाखवायचं.

प्रश्न:- दर्भावर पिंडदान करणे, श्राद्ध करणे या संबंधी आपले म्हणणे काय आहे.
उत्तर:- शास्त्र असे विचातील "तुला काय सांगितले होते"? कुठे शास्त्रकारांनी बुद्धी अन कुठे तुमची बुद्धी! तुमची भावना चांगली आहे मला कौतुक वाटते, पण ही भावना शास्त्रात टिकायची नाही. पिंडदान करण्याचा मुख्य हेतू पितृतृप्ती हा नाही, ईश्वराची प्रीती संपादन करणे हा आहे. सगळी कर्मे ईश्वरअर्पण बुद्धीने तत् प्रित्यर्थ करायची असतात. आता टेंबेस्वामी मुक्त आहेत, मग समाराधन काय त्यांच्या साठी असते काय? त्यांना काय जरूर आहे? कर्म आपल्या शुद्धीसाठी असतात, आपल्या शुद्धीने आपण ईश्वरप्रिय होतो.

गरिबी हटाव बाबतीत

भेद ईश्वर करून गेलाय. "गरिबी हटाव" ही भावना चांगली आहे, पण हे होईल ते तुमच्या हातात नाही. चांगलं करून वाईट टाकावं, पैसे सारखे वाटले अन एकाने दारूत उडवले व दुसऱ्याने चांगले सुविचाराने वापरले तर दारुबाज पुनः त्याचे पैसे विभागून मागेल. शिवाय रोग -आजारपण याचे वाटप कसे करणार? पाच मुले असतील तर त्यांच्यां आजारात पैसे गेले तर त्याचे वाटप कसे करणार?

आसने प्राणायाम बाबतीत प्रश्न विचारल्यावर महाराज म्हणाले, 

"सिद्धासन, हलासन, जालंदर आसन, प्राणायाम, सगळं एकच.

प्रश्न:- उदरकर्षयंरोगता, पश्चिमोतानासन याचे फळ काय? शिरशासनाचे फळ काय?
महाराज:- काय काय करणार तुम्ही? "विठोबाशी शरण जावे l निजनीष्टे नाम घ्यावे । हे सारं आहे सगळ्यांचे! सगळं कशासाठी करायचे? ईश्वरा साठीच ना मग ते झाले पाहिजे!

ब्राम्हण झळझळीत दिसला पाहिजे, हिंदुत्वाचा अभिमान पाहिजे.

शाळेत कॉमन रूममध्ये मी टोपी काढून मोकळी शेंडी ठेऊन बसायचो. एकदा तेलंग हेडमास्तर म्हणाले, "गुळवणी मास्तर शेंडी केवढी मोठी ठेवलीयेत? मी म्हणालो "अहो माझी शेंडी फार लांब होती, कमी झाली आता" शेंडी ठेवायची लाज कसली?जीवनाला एक निश्चित विचारांची बैठक नाही. मनातून सगळे हिंदुत्ववादी पण वर्तनात मात्र भित्रेपणा, आपल्याला आपली खात्री नसते म्हणून लोकांकडे पाहून वागण्याची बुद्धी होते. स्वराज्य मिळाल्या पासून सगळी माणस खाली आली आहेत.

आश्रम (वासुदेव निवास) झाल्यापासून टेंबेस्वामी बरेच दिवस स्वप्नात आले नाहीत म्हणून मी काळजीत होतो, वाटले आश्रम बांधून मी काही चूक तर केली नाही ना? पण एके दिवशी सकाळी, स्वामी वासुदेव निवासात आले, मागच्या हौदावर बसले आणि पसन्न हसले, हे पहाटे स्वप्नात पाहिले आणि समाधान वाटले.

मृत्यूची भीती गेल्या शिवाय निर्भयता येत नाही.

पुण्याचे इन्स्पेक्टर घाडगे यांची निर्भयतेची गोष्ट 

गुन्हेगारचा शोधात असताना एका रानात रात्री मुक्काम पडला. भोवती चार पोलीस पहारा देत होते. इन्स्पेक्टर ने विचार केला, लांबून गोळी आली तर पोलीस काय करणार ? प्रतिकार पण करता येणार नाही, मग त्याने निश्चय केला की मृत्यू केव्हाही येईल. भिवून लपून तो थांबणार आहे का? त्याने रक्षकांना सांगितले "तुम्ही जा झोपा मी पण झोपतो" त्या रानात सर्वजण झोपले, वेळ आली नव्हती.

प्रश्न:- अजपा जप म्हणजे काय?
महाराज:- अजपाजप म्हणजे जो श्वास चालला आहे, त्याचे कडे लक्ष ठेवणे, आपण तिकडे लक्ष ठेवणे हे आपले काम.
 
प्रश्न:- श्रीदत्त याच्या फोटोत गाय व कुत्री काढण्याचा प्रघात आहे?
महाराज:- ग्रंथात तसे वर्णन नाही. शटभुज मूर्तीजवळ कुत्री असण्याचे कारण नाही. प्राचीन मूर्ती जवळ कुत्री असल्याचे दिसत नाही.

परमार्थ व परोपकार

रामकृष्ण यांनी केशवचंद्र याना कालीची गोष्ट सांगितली, कालीचे दर्शन घ्यायला निघाला आणि वाटेत गरिबांना पैसे वाटत गेला, दान करीत बसला, तर मंदिराचे दरवाजे बंद होतील, आयुष्य संपेल पण वाटणे सम्पणार नाही. गरिबांना वाटप झाले पण मुख्य हेतू कोणता? आधी परमार्थ का परोपकार? परोपकार अवश्य करा पण आपल्याला परमार्थ साधला का? तुकोबांनी प्रथम आत्म साक्षात्कार करून घेतला आणि नंतर म्हणाले "तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता!" 

योगीराज श्रीगुळवणी महाराजांचा शक्तिपात दीक्षा प्रसंग

इ.स.१९२२ ची गुरुद्वादशी, होशंगाबाद

मागील भागात आपण १९०७ साली गुरुद्वादशीच्या दिवशी घडलेली प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि प.पू.श्रीगुळवणी महाराज यांच्या प्रथम भेटीचा प्रसंग पहिला. पुढच्या काळात १९२२ साली कुंडलिनीशक्ती जागरणाच्या इच्छेने प्राणायामाचा अभ्यास करण्यासाठी प. पू. श्रीगुळवणी महाराज नर्मदा किनारी होशंगाबाद या क्षेत्री आले आहेत. आणि याच काळात प. प. श्री चिन्मयानंद सरस्वती स्वामी (दंड ग्रहणा नंतर प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी) भगवती शक्तीच्या आदेशानुसार होशंगाबाद येथेच मुक्कामी आले आहे. दोन सत्पुरुषांची इथे गाठ पडली, स्वामीमहाराजांमधील गुरुत्व आणि गुरूमहाराजां मधील शिष्यत्व याची एकमेकाला ओळख झाली. एकमेकांबद्दल स्नेहभाव वाढीस लागला. आणि श्रीगुळवणी महाराजांनी स्वामी श्रीचिन्मयानंदांना होशंगाबाद मधील आपल्या निवास स्थानिक मुक्कामी आणले. श्रीचिन्मयानंद स्वामींना घरी आणल्यावर श्रीगुरुमहाराजांना स्वप्न पडले. प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुढे येउन उभे राहिले व म्हणाले, "आम्ही एकच आहोत. ही विद्या दत्तसंप्रदायाची आहे. तुझ्याकडून बरेच कार्य व्हायचे आहे." एवढे सांगूनअभयकर दाखवून अदृश्य झाले. या दर्शनाने श्रीगुरुमहाराजांनी ठरविलेल्या विचाराला आशीर्वादच मिळाला. 

स्वामींची प्रसन्नता पाहून श्रीगुरुमहाराजांनी स्वामींना विचारले, "स्वामी ! मला दीक्षा होईल का?" स्वामी म्हणाले, "हे पहा वामन ! सध्या तु प्राणायामाचा अभ्यास चालू ठेव. त्या अभ्यासाने सुद्धा कुंडलिनी शक्ती जागृत होते. तेव्हा आहे ते चालू ठेव. दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करणे बरे नाही. वेळ आल्यावर आपली दीक्षा जरूर होईल". आता श्रीगुरुमहाराज परमेश्वराच्या इच्छेची वाट पाहत होतो. पुढे ४/५ दिवसांनी  पहाटेच्या वेळी श्रीगुरुमहाराजांना स्वप्न पडले. हौशंगाबादच्या निवासस्थानात, श्रीगुरुमहाराज खाली सतरंजीवर बसलेले आहेत. स्वामी चिन्मयानंद सरस्वती एकदम उभे राहिले त्यांनी खांद्यावरची छाटी एका फटकाऱ्यात सारखी केली आणि ते गुरुमहाराजांच्या रोखाने हळूहळू येऊ लागले. आज स्वामी आपल्याकडे असे का येत आहेत हे त्यांच्या लक्षात आले नाही. पण स्वामींची दृष्टी व मुद्रा अतीव प्रसन्न व तेजस्वी दिसत होती. तेवढ्यात स्वामी गुरुमहाराजांच्या जवळ येऊन उभे राहिले. एकटक रोखून गुरुमहाराजांच्या कडे पहात  म्हणाले, "वामन ! बैठो !! आजही तुम्हे दीक्षा होगी ! अब देखो तुम्हारी कुंडलिनी शक्ती जागृत होती या नही ।" स्वामींची ही दोन वाक्ये कानावर पडतात न पडतात तोच श्रीगुरुमहाराजांचे भान हरपले. तेवढ्यात स्वामींचे आणखी एक वाक्य कानावर पडले. "आखे बंद करो" हे म्हणता म्हणताच स्वामींनी श्रीगुरुमहाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. मेरुदंडावरून खालून वरच्या दिशेने हात फिरवला तात्काळ श्रीगुरुमहाराजांच्या क्रिया सुरू झाल्या. क्रियांचा वेग क्षणाक्षणाने इतका वाढत चालला की त्या वाढत्या क्रियांच्या आवेगातच त्यांची झोप संपली. आणि त्यांनी डोळे उघडले. स्वामी कुठे आहेत म्हणून श्रीगुरुमहाराजांनी पलंगाकडे पाहिले. स्वामीजी पलंगावरच सिद्धासन घालून छाटी पांघरून ध्यानमग्न अवस्थेत बसलेले दिसले. तेव्हा श्रीगुरुमहाराजांच्या लक्षात आले एकूण हे स्वप्न आहे. घड्याळात ३.३० वाजले होते. स्वप्नाची वेळ उत्तम होती. यानंतर गुरु महाराजांना झोप आली नाही. पहाटे पडलेल्या स्वप्नांचा उल्लेख न करता श्रीगुरुमहाराजांचा नित्यक्रम सुरू झाला. स्वामी साक्षीभावाने सर्व काही पहात होते.

नेहमीप्रमाणे संध्याकाळ झाल्यावर स्वामींच्या बरोबर सर्व फिरावयास निघाले बरोबर श्री शंकरकाका होते. गावातूनही चार-दोन नित्याची मंडळी आली होती. सर्व जण स्वामीच्या अनुरोधाने चालू लागले ते नर्मदेच्या तीराने हळूहळू चालले होते. रोज खूप फेरफटका करणारे स्वामीजी आज मध्येच अचानकपणे म्हणाले, "आज घुमना बस्स हुआ । अब घर जायेंगे ।" सर्वांना वाटले स्वामींची प्रकृती ठीक दिसत नाही. स्वामींच्या इच्छेप्रमाणे सर्वजण परत फिरले. गावातील मंडळी आपला रस्ता आल्यावर स्वामींना वंदन करून निघून गेली. श्री शंकरकाका व श्रीगुरुमहाराज स्वामींच्यासह आपल्या निवासात आले. आज स्वामी लवकर आल्याचे उमामातोश्रींनाही जाणवले. स्वामी पलंगावर बसले. श्रीगुरुमहाराज आणि श्री शंकरकाका स्वामींच्या समोर असलेल्या सतरंजीवर बसले. श्रीगुरुमहाराजांनी नित्याच्या सवयीप्रमाणे सायंकाळी फिरून आल्यावर आईला, देवाला व स्वामींना नमस्कार केला. आज लवकर फिरुन परतल्यामुळे सायंसंध्यादी आन्हिकाला अवकाश होता. उमामातोश्री देवापाशी दिवा, उदबत्ती लावून जप करीत बसल्या होत्या. स्वामींनी श्रीगुरुमहाराजांची विचारपुस सुरु केली.

स्वामीजी: वामन ! प्राणायाम के अभ्यास से क्या लाभ होता है ।
श्रीगुरुमहाराज: शरीर हलके वाटते यापेक्षा विशेष नाही.
स्वामीजी: जिस उद्देशसे यह प्राणायाम का अभ्यास शुरु किया क्या इससे शक्ती कुंडलिनी जागृती हुई या नही?
श्रीगुरुमहाराज: अजून नाही
स्वामीजी: कितने कष्ट उठाते हो इसलिये ? बहुत सहनशील हो तुम । मुझे तुम्हारी दया आती है । कितने दिन ये करते रहोगे ?
श्रीगुरुमहाराज: आपल्या कृपेवर अवलंबून आहे मला येईल का तो अनुभव ?
स्वामीजी: अनुभव क्यो नही होगा ? जरूर होगा । सुरज देखने के लिए दियेकी क्या जरुरत । अभी अनुभव लो।  ऑखे बंद करो ।

स्वामींचे वाक्य संपण्याच्या आतच श्रीगुरुमहाराजांना शक्तीसंचाराने बेभान करून टाकले होते. ठिणगीला वाऱ्याचे सहाय्य मिळताच क्षणात साऱ्या वनप्रदेशात वणव्याचे लोळ उठावेत. त्याप्रमाणे झाले. चालू असलेल्या या कठीण तपश्चर्येच्या फळाला फक्त श्रीगुरुकृपारुपी शीतल वायूलहरीची गरज होती. ती मिळताक्षणीच श्रीगुरुमहाराजांच्या शरीरात शक्तीसंचाराने एकच कल्लोळ उडवून दिला. मेघमालांना क्षणार्धात चिरडून टाकणाऱ्या तळपत्या विद्युततेने आकाशच फाडुन टाकावे असा प्रचंड शक्तीसंचार झाला. प्राणायामाच्या अभ्यासाने श्री गुरुमहाराजांची प्रकृती नाजूक झाली होती शरीर फुलासारखे कोमल झाले होते इतकी मोठी हालचाल करण्याची कुवत त्यांच्या शरीरात नव्हती अशा स्थितीत सारे शरीर इकडून तिकडे घुसळले जात होते चक्राकार गतीने गरगर फिरत होते पद्मासनाने पक्य्या झालेल्या आसना सहित सारे शरीर तिच्या जागी प्रचंड उसळी घेऊन पडत होते अक्षरशः जमिनीपासून दीड दीड फुटाचे उसळी सारे शरीर घेत होते. श्वासोच्छ्वासाची गती लोहाराच्या ही भात्याला मागे सारण्याइतकी तीव्र झाली होती. श्रीगुरु महाराज या साऱ्या क्रिया स्वयंवेद्य अनुभूतीच्या डोळ्यांनी पाहत होते. सार्‍या क्रिया आपोआप होत होत्या. भस्त्रिकेचा जोर व लय नागाच्या फुत्काऱ्याप्रमाणे होता. घूर्णा व मानेची हालचाल चक्रिवादळाप्रमाणे होती. शरीराची आदळआपट भूकंपाची आठवण देणारी होती.

ज्या शक्तिजागृतीसाठी एवढी धडपड केली ती केवळ एका निमिषार्धाच्या कृपाकटाक्षाने, जागृत होऊ शकते हे गुरू महाराज अनुभवत होते. ज्या नर्मदामातेने प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांना आपल्यात सामावून घेतले. त्याच नर्मदामातेने थोड्याशा कालानंतर  श्रीचिन्मयानंद सरस्वती स्वामीमहाराजांना होशंगाबादेवरील तटावर आणून, तेथे गुरुमहाराजांना पाठवून, परस्परांची अपूर्व भेट घडवून, गुरुशिष्यांचा झालेला वियोग पुनरपी घडवून आणला. असा हा अपूर्व आणि अद्भुत प्रसंग.

गुरुमहाराज
गुरुमहाराजां

गुरुमहाराजांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा

श्री वासुदेवनिवास वास्तुशांतीनंतर, वयाची ८० वर्षे पुर्ण होऊन ८१ वे वर्ष लागल्यावर १९६७ च्या एप्रिल मध्ये महाराजांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा, शांती व सत्कार समारंभ मोठ्या थाटाने साजरा झाला. या सोहळ्यास संपुर्ण भारत भरातून महाराजांचे असंख्य भक्त हजर होते. श्री वासुदेव निवासात सहस्त्रदर्शनशांती, श्रीदत्तयाग, श्री सप्तशती चंडीहवन, वगैरे सर्व कार्यक्रम झाले सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा पाच दिवस चालू होता.

तत्पुर्वी महाराजांनी श्रीदत्त माला मंत्राचे अनुष्ठान केले. अनुष्ठान कालात मौन पाळले तसेच या कालात महाराजांची जटा व दाढ़ी वाढल्याने त्यांच्या तपस्वी अवस्थेचे दर्शन घेण्याचे भाग्य हजर असणा-यांना प्रत्यक्ष झाले. हजर नसणा-यासाठी त्यांना दर्शन व्हावे म्हणून फोटो ही काढले.

या समारंभास प. पू. श्री लोकनाथतीर्थ महाराजांचे गुरुबंधू प. पू. श्री विष्णुतीर्थ  महाराज होते. मुख्य समारंभापुर्वीच प पू श्री विष्णुतीर्थ महाराजांबरोबरच हत्तीवरुन भव्य मिरवणूक काढली. महाराजांची मुंबईची जी श्रद्धावान व कल्पकमंडळी होती त्यातील श्री थिटे यांनी महाराजांच्या दिनचर्येची फिल्म घेतली.

सत्कार समारंभ समयी लक्षात राहण्यासारखा एक प्रसंग म्हणजे शतायू श्री. दा. सातवळेकरांची भेट. खरे तर त्याच दिवशीं, त्याचवेळी दुसरीकडे पं. सातवळेकर यांचा १०० वर्षे पूर्ण झाली म्हणुन सत्कार समारंभ होता. पण वेळ पाळणारे पंडितजी स्वत:च्या  कार्य- क्रमास उशीर करुन महाराजांच्या दर्शनासाठी आले. महाराजांनी उठुन स्वागत केले व त्यांना नमस्कार केला. पंडितजींनी त्यांचे भाषणात स्वत: महाराजांपेक्षा मोठे असूनही अधिकाराने व योगमार्गातील आपले गुरु आहेत, त्यामुळे त्यांचा शिष्य  म्हणून आपण लहान आहोत असे सांगितले. त्याचप्रमाणे महाराजांना भरपूर आयूष्य मिळावे वह त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक मुमुक्षु साधकांचे शाश्वत कल्याण पर्याप्त करुन देणारा योग साधावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना केली. त्यांच्या या छोट्याशा भाषणाने हजर असणा-या भक्तांना गहिवरुन आले. याच प्रसंगी संकेश्वर करविरपीठाच्या  श्रीशंकराचार्य पीठाधीशांकडून महाराजांना 'योगचुडामणी' ही पदवीही  समर्पण करण्यात आली. अध्यक्षीय भाषण होऊन महाराजांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि विश्वस्थांनी पूढे काय काय करण्याचा संकल्प केला आहे हे सांगितले.