श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज)

श्री बाळाप्पा महाराज
श्री बाळाप्पा महाराज

जन्म: ज्ञात नाही 
आई/वडील: ज्ञात नाही 
गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट
शिष्य: गंगाधर महाराज 
समाधी: १९१०

बाळाप्पा महाराज हे मूळ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील. ते ब्राह्मण कुळातील असूनही सावकारी व्यवसायात होते. ते सोनारी व्यवसायाही करीत. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना संसारात विरक्ती आली आणि सद्गुरूंच्या शोधात ते श्रीक्षेत्र गाणगापूरी रवाना झाले. तसे तर ते गावात एक धनाढ्य म्हणून नावारूपाला आलेले होते.

थोरल्या मुलीचा विवाह व मुलाची मुंज आटोपून घरदाराचा त्याग करून सद्गुरू शोधार्थ ते बाहेर पडले. मुरगोडहुन गाणगापूरला गेले. अनुष्ठान केले. एका ब्राम्हणाने बाळाप्पाना स्वप्नात येऊन सांगितले. 'तुम्ही अक्कलकोटी जाऊन स्वामी समर्थांची सेवा करावी.' अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी एक पैशाची खडीसाखर घेतली. स्वप्नात पाहिलेल्या मूर्ती प्रमाणेच स्वामींची मूर्ती पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्रीनाही खूप आनंद झाला. त्यांनी या झाडास मिठी म।र अशी कृती करुन दाखवली व बाळप्पावरील प्रेम व्यक्त केले.

मार्गात जात असता चिदंबर क्षेत्री ते श्री शिवस्वरूपी चिदंबर दिक्षीतांना भेटले. चिदंबर दिक्षितांनी केलेल्या एका यज्ञात श्रीस्वामी समर्थांनी तूप वाढण्याची सेवा घेतलेली होती. मुरगोड मुक्कामी तीन दिवस राहिल्यानंतर श्री बाळप्पा गाणगापूरकडे रवाना झाले. तेथे त्यांनी मठ व संगमस्थानी श्रीगुरूची सेवा केली. श्री बाळप्पा दुपारी मादुकरी मागून संपूर्ण दिवसभर श्री सेवेत घालवीत. एकदिवशी त्यांना दृष्टांत झाला. ‘सध्या अक्कलकोटी आहे तेथे ये’ त्यांनी दृष्टांत झाला व आज्ञाच झाली. ताबडतोब अक्कलकोटी निघून ये. ते ताबडतोब निघाले श्रींच्या पादूकांचा निरोप घेतला. निघाल्यापासून अनेक शुभशकून झाले.

बाळाप्पा महाराज जेव्हा अक्कलकोटी पोहोचले. त्यांची खात्री झाली दिगंबर अवस्थेतील जे सत्पुरूष त्यांना स्वप्नदृष्टांत देत होते तेच श्रीस्वामी. जीवा शिवाची भेट झाली. बाळाप्पांनी स्वामींचे चरणी धाव घेतली व चरण घट्ट पकडले. गुरुशिष्याची भेट हा अनमोल क्षण होता आणि बाळप्पा अक्कलकोटी स्थिरावले. त्यांनी आपले तन मन आत्मा स्वामी चरणी समर्पण केले. श्रीस्वामी राजवाड्यात ८ दिवस राहण्यास होते. बाळप्पांचे दर्शन होईना. मंदिरातच त्यांनी तपश्र्चर्या व जपसेवा सुरू केली. एकदा दर्शनाची संधीही मिळाली. पण महाराजांनी त्यांना प्रसाद दिला नाही. बाळाप्पा दु:खी झाले ते सोडून सर्वांना स्वामींनी प्रसाद दिला. नंतर त्यांना समजले स्वामींना जे जावेत असे वाटत त्यांना ते प्रसाद देऊन बोलवीत असत. हे समजल्यावर त्यांना अधिक आनंद झाला व त्यांनी सेवेची व्याप्ती व एकनिष्ठता वाढवली. त्यांना आनंद वाटे की दत्तावतारी स्वामींची सेवा करण्याची संधी मिळत आहे. एकदा फुले तोडताना काटा बोटाला टोचला. हाताला जखम झाली त्यात पाणी झाले व हात सुजला. स्वामींच्या सेवेत अंतर पडत असल्याने त्यांनी स्वामींना दुखण्याबाबत विनंती केली. स्वामींनी गोमुत्र लावण्यास सांगितले. त्यांनी ताबडतोब फरक पडला. वेदना कमी झाल्या व बाळप्पा स्वामींचे सेवेत रूजू झाले. एकदा बाळाप्पांना खूप ताप भरला. पण स्वामींचे कृपादृष्टीने ताबडतोब उतरला व स्वामीसेवेत खंड पडला नाही. 

श्री बाळाप्पा महाराज
गुरु मदीर अक्कलकोट

श्री स्वामी महाराजांचे सानिध्यात बाळाप्पाना नित्य बोधमृत मिळत असे. महाराज सेवेकऱ्यांना अत्यंत प्रेमाने वागवत. सेवेकरी उंचावर बसल्यास खाली बैस म्हणून सांगत. एकदा स्वामी बाळप्पास म्हणाले कारे 'तुला गावास जावयाचे आहे काय?', 'समुद्र भरला आहे त्यातून घेवेल तितके घ्यावे', 'आळशी माणसाचे तोंडही पाहू नये.' बाळाप्पा श्रीमंत आणि खानदानी घराण्यातील असल्याने पाणी आणणे, स्वयंपाक करणे ही कामे कराण्याची प्रथम लाज वाटे, तेव्हा स्वामी म्हणाले, 'निर्लज्जो गुरुसान्निधो'. गुरुंची सेवा करताना लाज बाळगू नये. निस्सीम भक्ती कशी असावी हे दाखवण्या साठी 'श्री' नी बाळप्पास एक पोथी दिली. त्यामध्ये हंसध्वज राजाने श्रीकृष्ण भक्तिस्तव आपल्या स्त्री पुत्रांकडून शीर कसे कापून घेतले हा चरित्राचा भाग होता. 

एकदा स्वामी बाळप्पास म्हणाले," जे असेल ते द्या वा चालते व्हा " हि आज्ञा शिरसावंद्य मानून बाळाप्पा ने  भिकभाली, कांबळी, पडशी, तांब्या, पंचपात्रे वगैरे वस्तू स्वामीचरणी अर्पण केल्या व साष्टांग नमस्कार घातला. सुंदराबाई म्हणतात, 'त्यांना कांबळी असुद्यात'  तेव्हा स्वामी म्हणाले "त्यास शालजोडी मिळेल". कोठेही ममत्व न ठेवता सर्वसंग परित्याग कर, हेच स्वामींनी या द्वारे सूचित केले. बाळाप्पाची त्याच्या निष्ठेमुळे अध्यात्मिक प्रगती झाली. आणि एकदा बाळाप्पा स्वामींना प्रसन्नचित्ताने नमस्कार करीत असताना स्वामींनी आपली तुळशीची प्रासादिक माळ त्यांचा गळ्यात घातली व 'यात्रा झाली कारे' असा त्रिवार उच्चार केला व माळे द्वारे स्वामींनी आपल्या तापसमार्थ्याचा वारसाच बाळाप्पाना दिला. 

स्वामींचा निर्वाण काळ जवळ आला असता स्वामींनी आपल्या हातातील,"श्री स्वामी समर्थ" अक्षरे कोरलेली अंगठी बाळप्पाच्या बोटात घातली, जणू माझा शिक्का तू चालावं असा अशीर्वादच दिला. स्वामींनी आपल्या कंठातील रुद्राक्ष, छाटी, हातात निशाण दिले. प्रसाद पादुका दिल्या व मस्तकावर वरदहस्त ठेवला. शेवटी स्वामी म्हणाले औदुंबर छायेत बैस. श्रींचे अवतार कार्य बाळाप्पा कडे आले. मठ हीं बांधून झाला. बाळप्पानी श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज हे नाव धारण करून चातुर्थाश्रम स्वीकारला.

स्वामीचे चरणी मिळालेल्या मौल्यवान गोष्टी व स्टोअरची जबाबदारी बाळप्पांचे शिरावर होती. ते ती अत्यंत काटेकोरपणे संभाळीत होते. स्वामींना हव्या त्या गोष्टी ताबडतोब पुरवण्याचे काम ते अत्यंत तत्परतेने व प्रामाणिकपणे करीत. सुंदराबाईंचे दृष्टीने बाळप्पांना मिळालेली जबाबदारीने त्यांचा मत्सर वाढला. पण बाळप्पा स्वामींचे एकनिष्ठ सेवक ते कशाला इतरांची चिंता करणार. स्वामींनी आपल्या सहवासात आपल्या ह्या एकनिष्ठ भक्ताला गुरू म्हणजेच सर्वव्यापी परमेश्र्वराचे एक स्वरूप असल्याचे पटवून दिले. त्यांनी बाळाप्पाच्या कठीण परिक्षा घेतल्या. एकेदिवशी बाळप्पा स्नान करून आल्यावर त्यांनी एका क्षुद्राकडून पाणी आणण्यास सांगितले. बाळाप्पा नाखूश होते. पण स्वामींना ह्या एकनिष्ठ भक्ताला हे पटवून द्यायचे होते की परमेश्र्वरास सर्व समानच आहेत. भेदभाव काहीही नाही.

बाळप्पाना असे जाणवले की त्यांचे साधनेत एकाग्रता येत नाही. त्यांनी ही गोष्ट स्वामींना सांगितली. स्वामींनी पाठीवर हात फिरवला आणि काय आश्र्चर्य बाळप्पा ब्रह्मानंदी निमग्न झाले. ही भावसमाधी बरेच तास चालली. स्वामींनी त्यांना तुळशीची माळ देऊन त्यांनी जप करण्यास सांगितले. त्यानंतर बाळप्पांची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती होऊ लागली. स्वामीनी एकदा त्यांच्या नाव असलेली एक अंगठी बाळप्पांना भेट दिली व म्हणाले "साधनेत निमग्न रहा माझे आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत" या आश्र्वासनाने बाळाप्पा भारावले. आनंदाश्रुंनी श्री स्वामींच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक झाला. त्यांनी बाळप्पाला आशिर्वादाबरोबर आपली कफनी, पादुका, दंड व निशाण दिले व औदुंबराखाली स्वतंत्र मठ स्थापनेची आज्ञा दिली. हाच बाळप्पा मठ किंवा गुरुमंदीर नावाने प्रसिद्ध आहे.

श्री बाळाप्पा महाराज
श्री बाळाप्पा महाराज

बाळाप्पानी मठ स्थापनेपूर्वीच भारत भ्रमण केले व स्वामींच्या विचारांचा प्रसार केला. त्यांचा प्रवासात त्यांना भक्तांकडून आदर सन्मान मिळाला. गुरूमंदिरात या सर्व वस्तु दर्शनास उपलब्ध आहेत. भक्तजन ते अनुभवू शकतात.

स्वामींचे निर्याणानंतर बाळाप्पा खचले अत्यंत दु:खी होऊन जीवनाचा आधार व कार्यकारणच संपल्याचे भासले व समाधीसमोर अन्नत्याग करून बसले. तिसऱ्या दिवशी स्वामींनी स्वत: प्रकट होऊन बाळप्पाना सांगितले. मी येथेच आहे मी निराकार स्वरूपात आहे. मग बाळप्पांनी पादूकातच स्वामींना पाहण्यास सुरुवात केली. 

पादूकांचीच सेवा एकनिष्ठेने करू लागले. ते आजारी असतानाच त्यांनी त्या पादूकांची सेवा कधी सोडली नाही. आपल्या नंतर विलासपूरच्या गंगाधरांवर आपल्या कार्याची जबाबदारी झोपवून बाळप्पा महाराज १९१० मध्ये समाधिस्त झाले. स्वामी समर्थांच्या निर्याणानंतर बाळप्पा जवळजवळ ३२ वर्षे होते. त्यांनी स्वामींचे विचार ओरीसा कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, बंगाल या प्रांतात पसरविले. तेथे त्यांनी भेटी दिल्या.

श्री गंगाधर महाराज त्यांचे उत्तराधीकारी झाले व त्यांनी या कार्याची ध्वजा हाती घेतली. याच पीठावर पुढे श्री गजानन महाराज (अक्कलकोट) हे उत्तराधिकारी झाले. बाळाप्पा महाराजांप्रमाणे एकनिष्ठ व प्रामाणिक सेवक विरळाच. श्री गुरू लिलामृत व श्रीस्वामीचरितामृत या दोन्हीही स्वामी समर्थाचे चरित्र ग्रंथात श्री बाळाप्पा महाराजांचे समर्थ चरित्रातील योगदानास विशेष महत्त्व दिल्याचे आढळते.

ब्रह्मनंदांचा निर्वाणीचा दिवस येताच त्यांनी विलासपूर येथील शिष्य श्री गंगाधर महाराज यांना बोलावून घेतले. त्यांना विधिपूर्वक सर्वाधिकार देण्यात आले. अज्ञापत्रात म्हणले होते," श्री स्वामी समर्थानी आम्हावर कृपा केली. आम्ही जसे श्री समर्थांचे नाव चालवले असे आमची ज्या शिष्यवर्गापैकी कोणावर कृपा होईल तो मठ चालवेल. शिष्यमंडळी म्हणाली, 'महाराज आमचे कसे होणार?' ब्रह्मनंद म्हणत. 'अरे मी कोठेही जात नाही फक्त या आसनावरून उठून आत जाऊन बसेल'.

गुरुपरंपरा 

श्री दत्तात्रेय 
   ।
श्री स्वामी समर्थ 
   ।
श्री बाळाप्पा 
  । 
श्री गंगाधर स्वामी 
  ।
श्री गजानन महाराज 

श्री स्वामी समर्थ- बाळाप्पाची सेवा, गोसाव्याची मनोकामना पूर्ती

स्वामी निद्रेत असतात आणी बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात, तितक्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट मनाने स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळप्पा प्रांजळपणानी स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात.
स्वामी म्हणतात: "भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असं मानुन, तन मन आणि धनानि केलेलं समर्पण म्हणझे भक्ती." तिकडे एक गोसावी जलोधर रोगाने ग्रस्त होता. त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदेव कळा निघायच्या. पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती, गोसावी मृत्यू आधी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करू, असा निश्चय करतो. गोसावी पोटदुखीच्या प्राणांतिक वेदना सहन करत द्वराकेसाठी निघतो. द्वारकेला जातांना रात्री स्वामी, संन्यासाच्या रुपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलवतात. गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो. स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात- "क्यो द्वारका जा रहे थे ना? यहा अक्कलकोट कैसे पहुचे? गोसावी विस्मित होतो. स्वामी म्हणतात: हमने ही बुलाया था! खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्या शिवाय आम्ही कशे राहणार?

गोसाव्याला स्वामींच्या जागी द्वारकानाथ कृष्णाचे दर्शन होते. गोसावी धन्य होतो, तो स्वामींना रणछोडदास इत्यादी नावाने संबोधित करतो. गोसावी म्हणतो: माझी इच्छा पूर्ण झाली आहे, आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही. स्वामी म्हणतात: ती वेळ अजून आली नाही आहे. मग गोसाव्याला एका झाडाचा पाला देऊन म्हणतात- "हा पाला रोज वाटून खात जा". काही दिवसांनी गोसावी येउन पूर्ण रोग मुक्त झालो अशी स्वामींना सूचना देतो. स्वामी  म्हणतात- 'अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते. ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच.' श्री स्वामी समर्थ बाळाप्पाना हाच धडा देतात.

स्वामी आणि बाळप्पामधील प्रारब्धाबद्दल संवाद होतो.

स्वामी, 'बाळ्या, अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते.'

बाळप्पा, 'स्वामी, यावर काही उपाय नाही का?'

स्वामी, 'अरे, एकदा पापाचे विपरीत-प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगाला मागे-पुढे करू शकतात, पण ते प्रारब्ध भोगावेच लागते. अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. मनुष्याच्या हातून कळत-नकळत परिस्थितीवश होऊन पापं घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत-प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्‍वरभक्ती करायची असते.' 'लोग कहते हैं की, भगवान के यहा न्याय मे देर हैं। अरे, भगवान सबको समय देता हैं अपने पाप नष्ट करने का. कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नहीं माने, तब उनका संहार किया!'

बाळप्पा, 'स्वामी, मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे?'

स्वामी, 'अरे, जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो, आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो, पण जेव्हा दु:खाचे वारे सुटते, तेव्हाच ईश्‍वराची कास सोडते. म्हणतो, 'मी देवाचे एवढे करतो, पण माझ्यावर हे संकट का आले? बाळ्या, पण तो हे विसरतो की, देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली, ती जर केली नसती, तर आणखी भयाण संकट आले असते.'

त्यामुळे सर्व सेवेकरी बांधवांनी स्वामींवर  विश्वास ठेऊन  स्वामी कार्य करत राहावे.

श्री  बाळाप्पा महाराज व श्री स्वामी समर्थ प्रसादाची अद्भुत लीला

स्वामी सेवेत अनेक सेवेकरी होते. ते त्यांच्यापरीने सेवा करीत पण यात थोर असलेले श्रीमद्सद्गुरु श्री बाळाप्पा महाराज या बद्द्लचा हा प्रसंग आहे. यांनी स्वामीसेवेची निट व्यवस्था ठेवली होती. किंबहुना असे म्हणु की स्वामींची सेवा कशी करावी याचाच परिपाठ यांनी सर्वांना घालुन दिला जो आजही कार्यरत आहे. 

रोज सकाळी भुपाळीने सुरवात करुन स्नान वगैरे जी सेवा असायची यात बाळाप्पा, भुजंगा, चोळाप्पाचे जावाई श्रीपाद स्वामी, सुंदराबाई, हे व ईतर जण असावयाचे. प्रत्येकाकडे कामे ठारलेली असायची यात ढवळा ढवळ चालायची नाही. कुणाचीही हिमंत नसायची ढवळा ढवळ करायला. रोज आरती व्हायचीच मग स्वामी कोठेही असोत यात खंड पडला नाही. आरती झाली की मग भक्तांनी समर्पित केलेला जो काही नैवैद्द आसेल तो मात्र स्वामी स्वहस्ते वाटत. हेतु हा की सर्वांना स्वामींचे दर्शन मिळावे. हा प्रसाद वाटत असतांना बाळाप्पा नेहेमी प्रसादा करीता हात पुढे करीत पण स्वामींनी कधिही बाळाप्पाला प्रसाद दिला नाही. बाळाप्पा रोज मनात खट्टू होऊन त्यांच्या निवास स्थानी येत अन आज ही आपणास प्रसाद मिळाला नाही म्हणून रडत बसत. अशी बरीच वर्षे गेली. रोज बाळाप्पा हात पुढे करीत अन स्वामी काहिही देत नसत. एक दिवस मात्र बाळाप्पानीं ठरवले की काहिही होवो आज प्रसाद घेतल्या शिवाय परत फिरायचेच नाही आरती झाली अन दर्शन व प्रसाद घेण्या करीता नेहेमी प्रमाने भक्त गण स्वामींच्या भोवती गोलाकार ऊभे राहिले. स्वामी सर्वांना प्रसाद देऊ लागले. बाळाप्पानी काय केले असावे? एक भक्ताच्या दोन पाया मधुन हात घातला अन प्रसादाची वाट  पाहु लागले हेतु हा की मी स्वामींना दिसुच नये. (वास्तवीक स्वामीच या स्रुष्टीचे चालक पालक आहेत मग कुठलिही गोष्ट त्यांच्या पासुन लपणे शक्यच नाही पण लिलाच करायच्या म्हटल्या नंतर त्यांना कोण अडवणार नाही का?) 

असो स्वामी प्रसाद वाटत वाटत बाळाप्पांच्या हाता पर्यंत आले अन फक्त एक क्षण भरच ऽऽ स्वामी थांबले अन दुसर्याक्षणी बाळाप्पांच्या हतात भली मोठी खारीक प्रसाद म्हणुन पडली. बस्स एका क्षणात बाळाप्पांनी ती खारीक घट्ट पकडली तेथून धुम ठोकली न जाणो स्वामी पहातील अन मोठ्या कष्टाने मिळालेला प्रसाद स्वामी काढुन घेतील. बाळाप्पा आपल्या घरी आले, दरवाजा आतुन बंद केला, ह्रुदयाशी प्रसाद म्हणुन मिळालेली खारिक घट्ट धरली, अन डोळे बन्द करुन हमसुन हमसुन अतिशय आनंदाने ते रडू लागले." स्वामी का हो ईतुका वेळ लावलात या गरिबाला प्रसाद देण्यास. मज पामराकडुन असा काय अपराध घडला की मला येव्हढी वाट पाहावी लागली. हा हा मज पामराचे आज भाग्य ऊजळले मला स्वामींचा प्रसाद मिळाला," असे म्हणत म्हणत ते लहान मुलासारखे किती तरी वेळ तो प्रसाद न खाता रडत राहीले त्यांची भाव समाधी लागली होती अन एव्हढ्यात दर्वाजा जोर जोरात वाजु लागला. "बाळाप्पा दार ऊघडा". "बाळाप्पा दार ऊघडा". स्वामींनी तुम्हांला असेल तसे बोलावले आहे. झाले, बाळाप्पांनी ओळखले की स्वामींनी का बोलावले ते. त्यांच्या पुढे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. मान खाली घालुन बाळाप्पा स्वामीं पुढे हाताची मुठ धरुन ऊभे राहिले. 

"हरामखोर हमसे नजर चुराके परसाद लेके जाताय तु बडा जिंद है. ना तु मुझे छोडेगा, ना मै तुझे लाओ परसाद ला," बाळाप्पांनी ति खारीक स्वामींना देऊन टाकली. स्वामींनी ती खारीक घेतली अन बाळाप्पाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले "अरे तु या प्रसादाच्या मागे काय लागला आहेस जो प्रसाद तुला द्यायचा आहे तो मी कधिच दिला आहे माझ्या मांडीवर तुला घेतले आहे माझ्या मांडी शेजारीच मांडी घालुन बस हाच तुला प्रसाद." या नंतर बाळाप्पांनी कधिही प्रसादाचा हट्ट केला नाही
ओळखलात का? तो कुठला प्रसाद?  स्वामींच्या समाधी शेजारीच समाधी घेण्याची परवानगी! जी कोणालाही मिळाली नाही! धन्य ते स्वामीगुरु अन धन्य ते शिष्य बाळाप्पा! 

श्री बाळाप्पाना स्फुरलेला सिद्ध मंत्र 'श्री स्वामी समर्थ'

'श्री स्वामी समर्थ' हा जप किंवा मंत्र श्री बाळप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला, कारण त्यांचे पोट दुखायचे. नाभीस्थानांत एक छोटीशी विषाची पुडी अडकली आहे. ती सव्वा लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल. आता हा सव्वा लाख जप कोणता करायचा? असा प्रश्न श्री बाळप्पा आणि सौ. बाळप्पा यांना पडला. कोणी ग्रामदेवतेचा, तर कोणी कुलदेवतेचा सव्वा लाख जप केला, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी बाळप्पा श्री स्वामी समर्थां समोर भल्या पहाटे बसले आणि 'श्री स्वामी समर्थ' असे नामस्मरण मनातल्या मनात पुटपुटू लागले. श्री स्वामींनी मान हलवून होकार दिला. एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि सव्वा लाख जप कर, तू आपोआप बरा होशील. त्याप्रमाणे अक्कलकोट येथील हाफक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री. बाळप्पा गेले, तेथे सतत एक कलमी सव्वा लाख जप केला आणि नाभिस्थानातून विषाची बारीक पुडी बाहेर आली. म्हणून 'श्री स्वामी समर्थ', हा शास्त्र शुद्ध-स्वयंभू आणि स्वत: श्री स्वामी समर्थाची अनुमती असलेला जप मंत्र आहे.