प. पू. ब्रह्मयोगी सीताराम महाराज

प. पु सिताराम टेम्बे स्वामी महाराज
प. पू. ब्रह्मयोगी सीताराम महाराज

प. पू. ब्रह्मीभूत श्री सीताराम महाराज टेंबे यांचा जन्म माणगांव येथे त्यांचे घरी चैत्र शुध्द पंचमी या दिवशी झाला. श्री प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे ते सर्वात लहान बंधू होते. ते सर्वांत लहान (शेंडेफळ) असल्याने सर्वांचे लाडके होते. स्वामी महाराज व सीताराम महाराज यांच्या वयात साधारणत: २० ते २२ वर्षांचे अंतर असावे. 

लहानपणी त्यांना भलू असे म्हणत असत. वासुदेवशास्त्री त्यांचे खूप लाड करीत असत. त्यांना दूध भात फार आवडत असे. एखादे दिवशी घरात दूध नसेल तर ते दूध भातासाठी हट्ट करीत असत. घरी दुभती गाय नसल्याने केव्हा केव्हा आणलेले दूध संपून जात असे व भलोबांचा बाल हट्ट पूर्ण करण्यासाठी वासुदेवशास्त्री किंवा त्यांची आई शेजा-यांकडून दूध आणून देत व त्यांचा हट्ट पुरवित. दुध न मिळाले तर उपाशी रहात. लहानपणीच्या बालस्वभावामुळे इतर मुलांबरोबर ते खेळायला जात असत. खेळायले गेले की घरी येण्याचे भानही राहत नसे. त्यामुळे जेवणासाठी वासुदेवशास्त्री किंवा इतर घरातील मंडळी त्यांना शोधून आणत असत. लहानमुले धीट असली तरी बागुलबुवा आला म्हटले की भीत असत, तसेच भलोबांना सुध्दा बागुलबुवांची भीती दाखवून घरी आणत असतं. 

आठव्या वर्षी श्री वासुदेवशास्त्र्यांनीच त्यांचा उपनयन संस्कार केला. त्यानंतर वासुदेवशास्त्री त्यांना नित्यसंध्या, पुरुषसुक्तादि  सुक्ते, देवपूजा, वैश्वदेव वगैरे वेदाध्ययन करण्यास शिकवित असत.लहानपणी भलोबांना तबला वादन व गायनाची आवड होती. कुठेही गायन भजन असले कि ते तिथे जाऊन बसत व तबला वाजवित असत. गायन वादनाची आवड पाहून श्री वासुदेवशास्त्र्यांनी संगीत शिकविण्यासाठी एका पगारी शिक्षकाची नेमणूक केली होती. पुढे ते उत्तम तबलावादक व गायक झाले होते. भलोबांना लहानपणापासूनच शानशौकीने राहण्याची खूप आवड होती. उत्तम कपडे घालायला आवडत असत. लहानपणीच धोतर, अंगरखा, टोपी व उपरणे असा त्यांचा पोशाख असे. त्याची ही आवड पाहून वासुदेवशास्त्री त्यांच्यासाठी वेलबुट्टी असलेला अंगरखा, कलाकुसर केलेली, गोंडे व रंगीत चकत्या लावलेली जरीची टोपी बनवून घेत असत. ती टोपी व पोशाख घालून भलोबा मिरवत असत. त्यामुळे भलोबांना फार आनंद वाटत असे. भलोबांना स्वामी महाराजांच्या बद्दल फार आदर व विश्वासही होता. ते स्वामी महाराजांच्या शिवाय राहत नसत. घरातील इतर मंडळींपेक्षा सुध्दा वासुदेवशास्त्र्यांवर त्यांचा फार लळा होता. त्यांना ते आपल्या गुरुस्थानी मानत असत. स्वामीशिवाय त्याला व त्याच्याशिवाय स्वामीना करमत नसे. 

श्री प. प. वासुदेवशास्त्र्यांनी श्री दत्त मंदिरची स्थापना केल्यानंतर तिथे होणा-या उत्सवात तसेच नित्यनियमित होणा-या पूजा–अर्चा, भंडारा, पालखी वगैरे कार्यक्रमांत श्री भलोबा अत्यंत आपुलकीने, प्रेमाने व निष्ठेने टेंब्ये स्वामीना मदत करत असत. 

वासुदेवशास्त्र्यांबरोबर नृसिंहवाडीहून श्री दत्त महाराज सात वर्षे राहण्यासाठी माणगांवी आले होते. सात वर्षे पूर्ण झाल्यावर वासुदेवशास्त्र्यांना दृष्टांताद्वारे सांगितले की “आज पूजा नैवेद्य झाल्यावर उत्तरेकडील दिशेस जाण्यासाठी निघायचे आहे.” ही बातमी हा हा म्हणता सर्वत्र पसरली. स्वामीनी आपल्या आईलाही सांगितले. ते एकून तिला फारच वाईट वाटले व रडू कोसळले. स्वामीनी दत्तमहाराजांचा आदेश असल्याने जाणे भाग आहे असे सांगून तिची समजूत घातली. भलोबालाही ही बातमी समजल्यावर तो तर रडू लागला व तो तुमच्याबरोबर येणार यासाठी हट्ट धरुन बसला. त्यावेळी त्याचे वय साधारणत: १२ ते १५ वर्षांचे असावे. लहानपणापासून त्याचे सर्व बालहट्ट पुरविले होते. पण हा हट्ट पुरविण्यासारखा नव्हता. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले,  तू अजून लहान आहेस, शिवाय तुला दररोज दूधभात लागतो, उत्तम पोशाख लागतो तो कोण देणार आहे? मी पायी व अनवाणी प्रवास करणार आहे. शिवाय माझा प्रवास खडतर असणार आहे, तो तुला झेपणार नाही तसेच तू घरी राहून आईची सेवा कर वगैरे उपदेशपर गोष्टी सांगून कशीबशी समजूत काढली व आपण पत्नीसह प्रवासास निघा  वासुदेवशास्त्री श्री दत्तआज्ञेने घरातून निघून गेल्यामुळे सीताराम बुवाना फारच वाईट वाटले. गुरुआज्ञा म्हणून ते मातृसेवा करण्यास घरी राहिले. पण त्यांचे मन मात्र वासुदेवशास्त्र्यांकडेच लागलेले होते. निदान पाच वर्षे तरी आईची सेवा करावी असा निश्चय करुन ते घरी राहिले. पूर्वीप्रमाणे ते हरी उर्फ दत्ताराम यांचेसह देवपूजा, नैवेद्य वैश्वदेव, सायंकाळी धुपारती, पंचपदी इतर पदें भजन म्हणणे वगैरे सर्व नियमितपणे सुरु होते. पण त्यांचे मन मात्र वासुदेव दर्शनासाठी आसुसलेले होते. 

प. पू. ब्रह्मीभूत श्री सीताराम महाराज टेंबे
प. पू. ब्रह्मीभूत श्री सीताराम महाराज टेंबे

गुरुआज्ञेने मातृसेवेसाठी सीताराम जरी माणगांवी राहिले असले तरी त्यांची वासुदेव दर्शनाची ओढ कमी झाली नव्हती. कशीबशी पांचवर्षे राहून आईला सतत सांगून श्री वासुदेव दर्शनाची परवानगी मिळविली. एक दिवस उत्तम पोशाख करुन बाहेरगावी जात आहे असे शेजारच्या लोकांना सांगून सीताराम महाराज निघाले. रानाच्या आड वाटेत गेल्यावर कपडे टोपी वगैरे सर्व काढून फेकून दिले व फक्त लोटा लंगोटी व दंड घेऊन सीताराम बुवा अनवाणीच निघाले. तेथून ते नरसोबावाडीस आले. तेथे त्यांना नारायण दिक्षित वगैरे भेटले. त्यांनी त्यांचे स्वागत केले. तेथे स्वामी गंगाखेड येथे असल्याचे समजले. तेथे गेल्यावर उज्जयिनी येथे मार्गस्थ झाल्याचे समजले. म्हणून सीताराम महाराज उज्जयिनीस जाण्यास निघाले. तेथे पोहचल्यावर सध्या स्वामी महाराज नक्की कोठे आहेत यासंबधी माहिती मिळेना. तेथे सीताराम महाराजांना कोणीच ओळखत नव्हते. भलोबा तेथून ग्वाल्हेरला गेले. राजाश्रयामुळे तेथे संस्कृत वेदपाठशाळा होत्या. तेथील ब्राह्मण समाज सुध्दा सनातन वर्णाश्रम पध्दतीने वागणारा होता. हे पाहून भलोबाना खूप आनंद झाला. या धर्मक्षेत्रात काही काळ राहून शास्त्राध्यायक करावे असा विचार मनात आला व ते अध्यापकाना भेटून त्यानी आपला मनोदय सांगितला. गुरुजीनीही त्यांची वेदपाठशाळेत राहण्याची व्यवस्था केली. तेथे राहून रोज स्नानसंध्या, जपजाप्य, गुरुचरित्रवाचन वगैरे नित्यक्रम करुन झाल्यावर पवित्रपणाने गुरुजींपाशी अध्ययनांस सुरुवात केली. १२ वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या तीन वर्षात पूर्ण केला. गुरुजीनाही खूप आनंद वाटला. त्यांनी त्यांना आणखी काहीवर्षे आपल्याकडे राहून पुढील ग्रंथाचे अध्ययन करावे असे सुचविले. पण लौकिक प्रेम किंवा पुरुषार्थाला महत्व न देणारे सीताराम आपल्या अंतिम ध्येयाला चिकटून राहिले व गुरुजींचा निरोप घेऊन वासुदेव यतींच्या दर्शनाच्या ओढीने निघाले. 

काही दिवस जंगलात एकटेच राहून योगाभ्यास केला. पण हठयोग अभ्यास सदगुरु सानिध्यातच होणे योग्य आहे असे समजून पुढे निघाले. सुख दु:ख, थंडी वारा, ऊनपाऊस याची पर्वा न करता अनवाणी चालतच “शाब्दे परेच निष्णात ब्रह्ममूर्ती भगवान वासुदेव“ अखंड डोळ्यासमोर ठेवून गंगातिरी मठात मंदिरात श्री वासुदेव यतींचा शोध घेत घेत हरिद्वार करुन ब्रह्मावर्तास पोहोचले.  तिथे गेल्यानंतर वासुदेवशास्त्रींची चौकशी केली. श्री राममंदिरात त्यांचे प्रवचन चालू असल्याचे समजले. महाराज श्री राम मंदिरात राहत असत. दुस-या दिवशी सीताराम महाराज मंदिरामध्ये वासुदेवानंद सरस्वतींना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी प्रवचन सुरु होते. त्यामुळे ते मंदिराच्या एका कोप-यात बसून राहिले. प्रवचन झाल्यानंतर महाराज त्यांना न भेटताच आपल्या मठीत गेले. दुस-या व तिस-या दिवशीही तसेच झाले. महाराज त्यांना पाहत असत. ते महाराजाना पाहत असत. चौथ्या दिवशी महाराजांनीच त्यांना बोलावून घेऊन त्याची व घराकडील आपुलकीने चौकशी केली. आईचे देहावसान झाल्याचे त्यांना समजले. त्यांना वाईट वाटले व त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी स्नान करुन येतो असे म्हणून आईसाठी नदीवर जाऊन स्नान करुन आले. त्यानंतर सीताराम महाराजाना आपल्याकडेच ठेवून घेतले. त्यांचे आन्हिक व प्रवचन श्रवणाचा कार्यक्रम रोज होत असे. 

एक दिवस सीताराम महाराज सायंकाळच्या वेळेस शिरोळचे शंकरराव कुलकर्णी यांचेबरोबर सायंसंध्या करण्यासाठी नदीवर स्नानासाठी गेले होते. शिरोळचे शंकरराव कुलकर्णी वेदांतशास्त्राचे अध्ययन करणेसाठी वासुदेवशास्त्र्यांकडे  ब्रम्हावर्तास गेलेले होते. सीताराम महाराज व कुलकर्णी दोघेही स्वामींकडे वेदांताचा पाठ घेत असत. त्या दिवशी अचानक वादळ सुरु झाले. संध्या करायला बसले असता त्या वादळात हे दोघेही सापडले. त्या वादळाला त्या देशात “अंधी“ असे म्हणतात. अंधीत सापडलेला मनुष्य त्याच्या नाकातोंडात, कानाडोळ्यात वाळू शिरुन गुदमरुन मरतो व वा-याबरोबर उडून जाऊन गंगाप्रवाहात किवा कोठेही वारा नेईल तिकडे कोठेही जाऊन पडतो. असा अंधीचा महाभयंकर परिणाम मनुष्याला भोगावा लागतो. अशा या मरणप्रसंगात सापडलेले सीताराम महाराज व कुलकर्णी मृत्यूमुखीच पडले असते पण त्यांचे पाठीराखे वासुदेवानंद सरस्वती यांचेवर नितांत श्रध्दा असल्याने व गुरुकृपेने ते या संकटातून तरुन गेले. 

ब्रह्मावर्ताला मुक्काम असतांना वासुदेवानंद सरस्वतींनी सीताराम महाराजाना गायत्री पुरश्र्चरण करण्यास सांगितले होते. सीताराम महाराज म्हणाले, आपण इथे राहत असल्यास मी गायत्री पुरश्र्चरण करीन. त्यामुळे महाराजांचे सलग तीन चार्तुमास ब्रह्मावर्तास झाले. सीताराम महाराजाना यज्ञयाग करण्याची फार आवड होती. जिथे जात तेथे ते यज्ञयाग करीत असत. राजूर मुक्कामी त्यांनी संहिता स्वाहाकार केला होता. सीताराम महाराजाना गुरमहाराजानी यज्ञाला प्रारंभ करा. आपण येऊ असे सांगितले होते. भक्तमंडळींच्या सहाय्याने जय्यत तयारी सुरु होती. ऋग्वेद संहिता स्वाहाकारासाठी विद्वान ब्राह्मणांना पाचारण करण्यात आले होते. स्वत: वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, दिक्षीत स्वामी, गोविंदराव पंडीत (क्षिप्रीकर), गांडा महाराज (योगानंद सरस्वती) तसेच दाजीशास्त्री टाकळीकर व अनेक यतिमहाराजपण उपस्थित असत. हा यज्ञ सर्वात मोठा यज्ञ पार पडला. दहा हजार माणसांच्या पंक्ती एका वेळी जेवून ऊठत असत. हा यज्ञातच गुरुशिष्य पंचायतानाचा फोटो काढण्यात आला होता. 

श्री सीताराम महाराजांनी आरंभिलेला राजूरचा ऋग्वेद संहिता स्वाहाकार संपल्यावर गुरुमहाराज वासुदेवानंद सरस्वती तिथून निघाले. सीताराम थोरले स्वामींबरोबर येण्याचा आग्रह करत होते. तेव्हा महाराज म्हणाले, “हा पसारा टाकून तू कसा येणार आहेस? मी इथे राहिलो तर लोक आणखी येतील. येथील हवा बिघडून लोकांना उपद्रव होईल. तू येथेच रहा. आम्ही तूला पुन्हा भेट देऊन तुझे मनोरथ पूर्ण करु.” असे अभिवचन देऊन ते निघून गेले. नंतर सीताराम महाराजांनी राजूरलाच मठ बांधला. लोकांना उपदेश करुन त्यांची दु:खे दुर करु लागले. लोकांच्या उपाधी दूर करु लागले. केव्हा केव्हा भक्तांच्या आग्रहास्तव हिंगोली, नरस किंवा अन्नगावी जात व परत राजूरला येत. नंतर तिथल्या सर्व वस्तू सर्वांना वाटून टाकल्या. निराच्छ मनाने ते तापी किनारी बासलिंग क्षेत्री वास्तव्य करु लागले. तेथे असताना श्री वासुदेवानंदाचा मुक्काम गरुडेश्र्वरी होता. आषाढ शुध्द प्रतिपदेस गुरुस्वामीनी देह ठेवला. ही वार्ता एकून महाराजांच्या मनावर वज्राघात झाला. गंगेवर जाऊन स्नान करुन आले व सुन्न मनाने बसून राहिले. नेत्रातून दु:खाश्रुंचा पूर वाहू लागला. आपले मायबाप आपल्याला कायमचे अंतरले. मला त्यांची भेट होणार नाही, या विचाराने अस्वस्थ झाले. तुला मी पुन्हा भेट देऊन तुझी ईच्छा पूर्ण करीन असे अभिवचन थोरले स्वामी महाराजांनी त्यांना दिले होते. त्याचे काय? महाराजांनी माझी ईच्छा पूर्ण केली नाही. त्याना या अभिवचनाचा विसर कसा पडला? त्यानी माझ्यावर अनंत उपकार करुन माझे जीवन आनंदमय केले होते. त्यांचा मी कसा उतराई होऊ या विचारांनी त्यांचे मन विषण्ण झाले. त्यांना आणखी दहा वर्षे आयुष्य मर्यादा पत्रिकेत स्पष्ट असताना इतक्या लवकर गुरुनी देहविसर्जन का केला? आपण निरामय आनंद स्वरुपात बसून मला मात्र असे दु:ख समुद्रात लोटून दिले. त्याचे काय कारण असावे? माझा अधिकार नाही म्हणून त्यांनी माझी उपेक्षा केली का? अशा अनेक प्रकारचे चिंतन करीत सीताराम महाराज तापी नदीच्या तिरावर काळ कंठत फिरत राहिले. फिरता फिरता, बारालिंग क्षेत्रामध्ये मुकुंदराज योग्यांचे समाधी मंदिर जंगलात आहे. तेथे एकटेच बसून राहू लागले. सदैव गुरुमहाराजांचे नाम घेऊन त्यांना आठवून शोक करीत बसावे, खाणे पिणे सोडून दिले होते. ब्रह्मज्ञानी पुरुषाला सध्या अज्ञानी जनाप्रमाणे साकार स्वरुपाचे इतके प्रेम असणे हे भगवंताचे लक्षणच मानले आहे. आपले गुरु आपल्याला लवकर दर्शन देत नाहीत म्हणून मनाला फार तळमळ लागून राहिली होती व अत्यंत कासावीस होत होते व आता धीर सुटू लागला होता. वासुदेव वासुदेव... असा कंठशेष करुन लेकराप्रमाणे रडायला सुरुवात केली व थोड्याच वेळात मूर्च्छित झाले.  मूर्च्छा ही अर्धी मरणावस्थाच होय. एवढ्याच गुरु महाराज गरुडेश्र्वरहून धावत येऊन सीताराम ! ऊठ मी आलो आहे. माझ्याकडे डोळे उघडून बघ म्हणून हाक मारली. हाक मारावी अन झोपेतून जागे व्हावे तसे ते एकदम सावध झाले व डोळे उघडून पहातात तर आपली आराध्य मूर्ती आपल्यासमोर उभी ! आपण स्वप्न तर पाहत नाही ना ! असे वाटले. तोच भल्या, सीताराम ! तू शुध्दीवर आहेस ना? मग असा संशयात का पडलांस? तुला मी पुन्हा भेट देईन व तुझी कोणती ईच्छा असेल ती पूर्ण करीन असे अभिवचन दिले होते ना? ते पूर्ण करण्यासाठींच मी आलो आहे. तुझी काय ईच्छा आहे? तुला काय विचारायचे आहे? सांग, विचार ! असे म्हणून त्यांनी सीतारामाना ह्रदयाशी घट्ट आवळून धरले. दोघाही देवभक्तांना परमानंद झाला. 

योगी पुरुष जिवंत असताना कारण पडल्यास दुसरा देह धारण करतो. देह विसर्जन केल्यावर तसा तो करीत नाही. पण श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वतीनी गरुडेश्र्वरी देह विसर्जन करुन माझ्यासाठी आज दुसरा देह किंबहुना दुसरा अवतारच धारण केला आहे. कलियुगात असा दुसरा अवतार घेणारा एक श्री दत्तभगवानच आहे. श्री वासुदेवानंदानी त्यांची समजूत घालून सांत्वन करुन ५ घटिका आत्मबोध उपदेश केला व त्यांचे मन शांत केले व महाराज अदृश्य झाले. श्री सीताराम महाराजाना बालपणापासून केवळ सदगुरुची भक्ती केली व मी सदगुरुंचा सेवक असून त्याची मी सेवा करीत आहे. अशा बुध्दीने सदगुरु संतोषनार्थच सर्व कार्य केले. 

सलोकता, समीपता, स्वरुपता स्पयुज्य अशा चार मुक्ती शास्त्रात सांगितल्या आहेत. सायुज्य मुक्तीत पूर्वीच्या तीन अंतरभूत असतातच. देही असून विदेहस्थिती प्राप्त होणे ही सायुज्य मुक्ती होय. गुरुदर्शना नंतर सीताराम महाराजानी आपली रहाणी बदलून टाकली. संताना देहाभिमान नसतो तर दीनाभिमान असल्यामुळे आपदग्रस्तांचे काम करतांना त्यांना लौकिकाची चाड नसते. व-हाड प्रातांत हिंगोली येथे हेमराज मुंदडा नामक मारवाडी सावकार होता. तो श्री वासुदेवानंद सरस्वतींचा एकनिष्ठ भक्त होता. त्यांनी टेंब्ये स्वामींच्या आशीर्वादाने व अनुज्ञेने तेथे एक सुंदर श्री दत्त मंदिर बांधले आहे. हिंगोलीच्या गुरुभक्तांच्या आग्रहावसन श्री सीताराम महाराज श्रीदत्तजयंतीच्या उत्सवास तिथे आले होते. तेथील उत्सव उरकून पुढे जाण्याच्या त्यांचा मानस होता. त्याप्रमाणे ते निघाले. पण  हेमराजा आकस्मिक रोगाने एकाएकी भयंकर दुखणाईत पडला व आसन्नमरण झाला. श्रीमंतीच्या जोरावर पुष्कळ वैद्य डॉक्टरांकडून उपचार घेऊनसुध्दा बरा होण्याची लक्षणे दिसतात. 

सीताराम महाराजांनी अनेकांना असाध्य दुखण्यांतून बरे केल्याचे हेमराजने एकले होते. त्यामुळे त्याने सीताराम महाराजांनाच शरण जाण्याचे ठरविले.  सेवकानी त्याला उचलून सीताराम महाराजांच्या समोर आणून अंथरुणावर झोपविले. हेमराज असाध्य दुखणाईमुळे प्रेततुल्य मरणोन्मुख झालेला होता. त्याने महाराजांना केविलवाण्या नजरेने पाहिले व दीनमुख पसरुन हात जोडून म्हणाला, दयावंत महाराज आपण मज दिनावर दया केलीत तरच मी गुरुमहाराजांची सेवा करीन न पेक्षा परलोकांत जाईन. मला या आजारातून बरा करण्यास आपणांवाचून दुसरा कोणीही समर्थ नाही. असे म्हणून महाराजांची अनन्यभावे प्रार्थना केली. 

सुधिय: साधवो लोके नरदेव नरोत्तम: । नाभिद सह्यति भूतेभ्यो यर्हिनात्मा कलेवरम् ।।

मनुष्यांपेक्षा किंवा देवांपेक्षाही ज्यांचा अधिकार थोर आहे असे सुबुध्द साधुसंत महात्म्ये कोणाही प्राणिमात्राचा द्रोह, मत्सर बिलकुल करीत नाहीत. कारण हरी वाईट कृती ही जड कलेवराकडूनच होत असते. ती आत्म्याची कृती नसते. म्हणून संत हे निर्वेर बुध्दीचे असतात असे व्यास म्हणतात  हेमराजांची कष्टी, दु:खी, दीन अवस्था पाहून व दीनवाणी एकून सीताराम महाराज द्रवले, हळहळले व त्यांचेकडे पाहून  करुणापूर्ण दृष्टीने अतिशय गोडवाणीने त्याचे समाधान करुन त्याला धीर दिला. तुम्ही मलाजी विनंती करत आहात ती आम्हा दोघांच्याही पाठीराख्या श्री वासुदेवानंद  सदगुरुनांच करा व त्यांचे तीर्थ व अंगारा प्रेमपूर्वक सेवन करीत जा. ते तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून ओढून काढती हेमराजांनी सांगितले ते आणि तुम्ही वेगळे नाहीतच, एकच आहात. असे म्हणून पुन: पुन: आपणांस पूर्ण बरे करण्याबद्दल विनवणी केली. मी पूर्ण बरा झाल्याशिवाय आपण इथून जाऊ नये असे सांगितले. 

गुरुवर पध्दतीर्थे पातकें त्यांची नाशी । कळत असुनही मृत्यू खास त्याचा मनाशी ।। 
अधिकृत करी त्याला स्वायुते घ्यावयाला । वदत मुखी बरा हो, तीर्थ दे प्यावयाला ।।

रोग्याचे मरण समजले तरी वैद्याने रोग्यास ते न सांगता उपचार करीत रहावे. तसे त्यांना श्री वासुदेवनंदाच्या पादुकांने तीर्थ दिले व आपल्या झोळीतील भस्म दिले व बरा होशील असा आशीर्वाद देऊन घरी जाण्यास सांगितल. हेमराज म्हणाले मला रोज येथे येणे शक्य होणार नाही तेव्हा माझ्या घराला आपले पावन चरण कमल लावून मला निजदर्शन देऊन आनंद द्यावा ही विनंती आहे. त्याप्रमाणे सीताराम महाराज रोज त्यांचे घरी जाऊन औषध बदलून देऊ लागले. आयुष्य संपत आल्यावर एक दिवस आधी हेमराजाला सांगितले व भगवत नामस्मरण करीत रहा असे सांगितले. त्यानेही मला १०-१५ वर्षे गुरुसेवा करण्याची ईच्छा प्रदर्शित केली व काकुळतीने विनवणी केली. महाराज आपल्या मुक्कामी गेले व वासुदेवानंदाची मनोमन प्रार्थना केली, ते प्रगट होऊन सीतारामा! नसलेला भेदभाव मानून अज्ञानाप्रमाणे तू वागतोस याचे मला नवल वाटते. तू निर्बल नाहीस पण व्यर्थ अज्ञानात शिरु नको व यमाचे निवारण कर, म्हणून माझ्यामागे पोराप्रमाणे लागू नको. आम्ही सर्व भानगडी सोडल्या आहेत. तुला जसे वाटेल तसे तू करु शकशील. पुन्हा आम्हाला अशी गळ घालू नको. तुला सर्व अधिकार दिले आहेत. तू जे मनांत आणशील ते होईल असे म्हणून ते गुप्त झाले.

इकडे सीताराम महाराजांना याची मृत्यु घडी जवळ आल्याने याला आता कसे जगवावे याच्या विचारात मग्न होते त्यामुळे त्यांना येण्यास उशीर झाला. नंतर मनाशी एक निश्चय करुन ते शेटजींकडे जाण्यास निघाले. शेवटचा दिवस उजाडला. शेटजी खुपच बेचैन होऊ लागले. मधून मधून मुर्च्छा येऊ लागली. सीताराम महाराज न आल्याने बेचैन झाले व त्यांना पुन्हा पुन्हा बोलावणे पाठवले. थोड्या वेळाने ते आले. व शेटजींची मुर्च्छावस्था पाहून अंगारा लावला व मोठ्याने कानात महाराज आल्याचे सांगितले. तेव्हा शुद्धित आले व शेटजी परिस्थिती कशी आहे असे विचारले. तेव्हा ते म्हणाले महाराज, मला नेण्याकरिता कोणी तरी दिव्य पुरुष आले असून मला पाशांनी बांधले आहे. त्यांचे वर्णन करण्यास महाराजांनी सांगितले. शेटजी म्हणाले- ते शिवचिन्ह धारण केलेले आहे. महाराज म्हणाले, ते शिवदूत आहेत. तुमचा दक्षिणेकडील यम मार्ग बंद झाला आहे. तुम्ही भाग्यवान आहांत. नंतर शिवदुतांशी महाराजांनी संभाषण करुन एक घडी याला मुक्त करा किंवा थांबा असे सांगितले पण शिवदूत म्हणाले एकदा वेळ टळली कि आम्हांला स्पर्श करतां येणार नाही व आताच सोडले तर शिवजी आम्हाला शिक्षा करतील यास्तव आम्ही याला घेऊनच जाणार. 

महाराज म्हणाले यांच्या पत्रिकेवरुन अजून १६ वर्षे आयुष्य आहे. शिवदूत म्हणाले आम्हालाही पत्रिका ज्ञान आहे. आजच त्यांच्या आयुष्य समाप्तीचा दिवस आहे. शिवदुतांना महाराज म्हणाले आमच्या विचाराने तो खोटा आहे. शिवदूत म्हणाले खोटा कसा ते दाखवा, म्हणजे आम्ही याला पाश मुक्त करतो. असा बराच संवाद झाला  हेमराजला महाराजांनी विचारले तुला गुरुसेवेसाठी जगण्याची इच्छा आहे ना? तो होय म्हणाल्यावर ती तुझी इच्छा आज आम्ही पूर्ण करणार असे निर्धाराने म्हणाले. मी माझी उर्वरीत सोळा वर्षे तुला अर्पण करतो. 

त्याला उठवून बसवले व उजवा हात पुढे कर म्हणून आमच्या पंचपात्रातील पाणी मी माझे राहीले ते १६ वर्षांचे आयुष्य हेमराजला अर्पण करत आहे असा मोठ्याने संकल्प करुन हेमराजाच्या हातावर पाणी सोडले व शिवदुतांना म्हणाले कि याचा आयुष्य लेख पहा. त्यांनी पाहिल्यावर आणखी १६ वर्षे आयुष्य वाढल्याचे दिसून आले. सीताराम महाराजांनी शिवदुतांचा लेख खोटा करुन  दाखविला व आता तरी त्याला पाशमुक्त करा असे सांगितले एवढी मोठी महती होती त्यांची. शिवदुतांनी लगेच त्याला पाशमुक्त करुन महाराजांना नमस्कार करुन १६ वर्षांनी परत न्यायला येतो असे सांगितले. महाराज म्हणाले, तोपर्यंत वासुदेवभक्त वासुदेव (विष्णू) स्वरुप झाला नाहीतर या आणि याला शिवरुप बनवा. 

श्री सीताराम महाराजांनी हेमराजाला निमित्त करुन आपला अवतार समाप्त केला. हेमराजाला महाराजांचे उपकार कसे फेडावे तेच समजेनासे झाले, तो म्हणाला- 

खरा तेजस्वी तूं अससी । जगीं अज्ञान हरणा ।। खरा ओजस्वी तूं भजक । जन मृत्यु प्रहरणा ।। 
खरा दाता तुंचि वितरशी । निजायुष्य सगळे ।। तुला सीतारामा स्मरती । तदहंता पुरी गळे ।। 

सीताराम महाराजांना सांगितल्या प्रमाणे त तिथे असतानांच त्यांच्या समक्ष श्री वासुदेवानंद सरस्वती व श्री दत्तमंदिरासाठी पुजा-अर्चा, नैवेद्य वगैरे खर्चाकरिता सर्वे नं.८ ची जमीन तसेच एक पुष्पवाटिका व एक रु. पन्नास हजार चे कापड दुकान श्री गुरुचरणी अर्पण केले. त्यामुळे श्री सीताराम महाराजांनाही आनंद वाटला. हेमराजाला “तुम्ही दुखण्यातून बरे झाल्यावरच मी इथून जाईन तोपर्यंत इथे राहीन” असे अभिवचन दिले होते. त्याची पूर्तता स्वतःचे उर्वरित आयुष्य त्याला देऊन केली, व पुढे निघुन गेले. सर्वांना वाईट वाटले. हेमराजाला सुद्धा आतां तुम्ही जा असे म्हणता येत नव्हते.

महाराज हुसंगाबादला जातो म्हणून निघाले मार्गात थकवा फार आला, ज्वर येवू लागला तरी हळुहळु चालत चालत हुशंगाबाद वरुन बढणेरीस आले बढने-याला एका भक्ताने दिलेले ताक घेतले त्याला आशिर्वाद दिला व वडाच्या झाडाखाली बसून राहिले. उरलेले आयुष्य दान केल्याने आता त्यांना त्राण राहीले नव्हते. श्रीवासुदेवांचे चिंतन व नामस्मरण करीत उत्तराभिमुख बसून समाधि लावली, व योगमार्गाने सच्चिदानंद ब्रह्मपदी विराजमान झाले तो दिवस होता फाल्गुन शु. ८ शके १८४०. या दिवशी त्यांनी आपले अवतार कार्य संपवून ब्रह्मानंदी लीन झाले. 

।। अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।।