देवगडचे श्री किसनगिरी महाराज (सन १९०७-१९८३)

देवगडचे श्री किसनगिरी महाराज
देवगडचे श्री किसनगिरी महाराज

जन्म: १३ सप्टेंबर १९०७, शबरी जातीच्या समाजात, नेवाश्यापासून १४ मैलांवर, मुरमेगावी
आई/वडिल: राहीबाई / मारुती
कार्यकाळ: १९०७-१९८३
गुरु: नाथ बाबा
समाधी: १९८१ देह विसर्जन
विशेष: श्री क्षेत्र देवगड दत्तस्थानांची निर्मिती  

अलीकडे प्रसिद्धीस आलेले एक दत्तस्थान म्हणजे देवगड होय. प्रवरा नदीच्या काठी नेवाश्यापासून चौदा मैलावर चावर मुरमे नावाचे एक छोटे गाव आहे. देवगड याचा उदय मुरमे येथेच झाला. सन १९०७ साली प्रवरेच्या काठी गोधे नावाच्या गावात शबरी जातीच्या समाजात एका कुटुंबात एक तेजस्वी मूल जन्मास आले. त्याच्या आईचे नाव राहीबाई व पित्याचे नाव मारुती असे होते. या मातापित्यांनी मुलाचे नाव किसन असे ठेविले.

हा किसन थोडा वयात येताच गावातील पाटीलांची मुले व शेळ्या सांभाळू लागला. किसनला एकांताची आवड होती. लहानपणापासून महादेवाची भक्ती तो करीत असे. बारा वर्षे महादेवाच्या पिंडीची पूजा केली. नंतर त्याने चार धामांची यात्रा करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे यात्रा करून किसन पंधरा दिवसांत परत आला. एवढ्या थोड्या अवधीत त्याने यात्रा कशी केली? अशी शंका लोकांना आली. पण किसन चार धामांचे वर्णन प्रत्यक्षात जसेच्या तसे करी. त्यापुढे किसन माधुकरी मागून सेवा करू लागला. लोकांचे आजार बरे करू लागला.

नेवासे येथील नाथबाबा यांचे शिष्यत्व त्याने पत्करले.

किसानबाबा देवगड
किसानगिरि महाराज मंदिर, देवगड

किसनबाबाने अपार कष्ट करून देवगडची भूमी उदयास आणली. या गावी त्याने एक मोठे देवस्थान उभे केले. दत्तमंदिर, शिवाचे मंदिर, पाकशाळा, धर्मशाळा असा या स्थानाचा पुढे विस्तार झाला. सन १९८३ मध्ये किसनगीरांचा देह दत्तचरणी विलीन झाला. यांचे एक शिष्य भास्करगिरी महाराज आता हे देवस्थान चालवीत आहेत.

किसनगिरी यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडले. मृत व्यक्ती जिवंत करणे. मुक्याला वाचा देणे, संतती देणे. विहिरीचे पाणी सांगणे, इत्यादी चमत्कार यांच्या जीवनात घडले आहेत. किसनबाबांचे काही अभंग प्रसिद्ध आहेत.

किसनगिरी महाराजांनी अनेक दुःखित पीडित लोकांना मार्गदर्शन केले. त्यांना सन्मार्गाला लावले. अनेकांचे दुःख समजून पारमार्थिक उपायांनी त्यांना ईश्वरभक्तीकडे वळवले. दत्तमहाराजांचे भजनी लावून त्यांचे अध्यात्मिक व भौतिक उत्थापन केले. येथील पालखी सोहळा पाहिले की असे म्हणावेसे वाटते,

दत्तसंस्थांन  देवगड
किसानगिरि महाराज मंदिर, देवगड

तुझी पालखी मी वाहिन ।
तुझा भोई मी होईन ।
तुझ्या कीर्तनी मी नाचेन ।
दत्ता तुझेच नाम मी गाईन ।
तुझी पालखी मी वाहिन ।।

श्री किसनगीरी महाराज अद्भुत संत ! व श्रीक्षेत्र देवगड !

नगर-नेवाशाचा परिसर खरे पाहता नाथ संप्रदायाशी निगडित आहे. आदिनाथ वृद्धेश्वरापासून ज्ञानेश्वरांपर्यंतची नाथ परंपरा येथे स्थापित आहे. श्रीमच्छिंद्रनाथांचे ‘मायंबा’, श्रीकानिफनाथांची ‘मढी’, श्रीसाईनाथांची ‘शिर्डी’ यांसारखी अनेक अलौकिक नाथक्षेत्रे येथील परिसराला पावन करती झाली आहेत. नाथ संप्रदायाचे आराध्य दैवत, श्रीदत्तात्रेयांची दोन अप्रतिम स्थाने नगर-नेवासे येथे आहेत. त्यातील एक प्रवरा नदीच्या काठी ‘श्रीदेवगड संस्थान’ या नावाने तर दुसरे दत्तस्थान सावेडी परिसरात श्रीरामकृष्ण महाराज क्षीरसागर यांनी निर्मिलेले आहे.

‘श्रीदेवगड संस्थान’चे कर्तेकरविते श्रीकिसनगिरी महाराज यांचा जन्म प्रवरेच्या काठावरील गोधेगाव येथे झाला. १३ सप्टेंबर १९०७ रोजी मारुती आणि राहीबाईच्या पोटी जन्मलेल्या या तेजस्वी बालकाने त्याच्या शबरी वंशाचा आणि पुढे अनेक पीडितांचाही उद्धार केला. सावळ्या वर्णाचा, लहानगा किसन लाजरा-बुजरा असला तरी धार्मिक वृत्तीचा होता. धर्मश्रद्धा हा उपजत संस्कार असल्याने किसनचे देवाधर्माविषयीचे प्रेम भवतालच्या मंडळींमध्ये कुतूहल निर्माण करीत असे. पुढे जसजसे वय वाढत गेले तसतसा किसनचा बुजरेपणा लोप पावला आणि त्याच्या बेदरकार वर्तनातून तऱ्हेवाईक वृत्तीचा अंमल सर्वांना जाणवू लागला. खेळणेबागडणे, घरातली गुरे, शेळ्यामेंढय़ा राखणे यात दिवस संपू लागला. लहानपणापासून किसन फक्त आईच्या हातचेच खात असे. मात्र पुढे वय वाढल्यावर त्याने स्वतःचे जेवण स्वतःच बनविण्यास सुरुवात केली. क्वचित प्रसंग सोडल्यास अखेरपर्यंत त्य़ाचे स्वतः तयार केलेले ‘जेवण’ जेवण्याचे व्रत कायम राहिले.

किसनच्या खोडय़ा आणि खेळ सारेच काही विलक्षण होते. जेव्हा तो मोठय़ा भावासोबत नदीवर मासे पकडण्यास जात असे तेव्हा त्याच्या भावाने महत्प्रयासाने पकडलेले मासे किसन एक-एक करून पुन्हा नदीच्या पात्रात सोडून देत असे. त्याच्यातील ही परोपकारी आणि प्रेमळ वृत्ती इतरजनांसाठी मात्र वेडगळपणाची ठरू लागली. किसनच्या वृत्तीचा आणि वागण्याचा थांगपत्ता कधी कुणास लागत नसे.

पुढे किसनचे वय वाढते झाले, शरीर काटक बनले. दिवसभर शेतात ढोर मेहनत करूनही तो थकत नसे. उलट रात्री नदीकाठी जाऊन मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करणे, ध्यानस्थ बसणे हे त्याच्या उपासनेचे तसेच विश्रांतीचे साधन झाले. मातीच्या शिवलिंगापुढे उदबत्त्या म्हणून लाकडाच्या काडय़ा खोचणे, नदीचे पाणी आणून शिवलिंगास स्नान घालणे यात तो तासन्तास व्यग्र राहत असे. नदीचे पाणी घातल्यावर शिवलिंग विरघळत असे. मग पुन्हा नवी पिंड तयार करणे आणि पुन्हा त्यावर पाणी घालणे असा प्रकार जोवर ती पिंडी विरघळत नाही तोवर चालू राहत असे. बऱ्य़ाच वेळाने असे शिवलिंग तयार झाले की, तिथे नुसत्याच रोवून ठेवलेल्या काडय़ा एकाएकी पेट घेत आणि सर्वत्र अलौकिक व अपरिचित सुगंध पसरत असे. हा प्रकार गावातील अनेकांनी अनेकदा पाहिलेला असल्यामुळे त्यांच्या लेखी किसन एकतर ‘मांत्रिक’ होता किंवा ‘वेडा’ होता. शिवलिंग पूजनाचे हे व्रत किसनने सुमारे बारा वर्षे चालविले. याचदरम्यान गावामधील औदुंबराचे एक संपूर्णपणे वाळलेले झाड किसनने नियमित पाणी घातल्यामुळे फुलून आलं.

एकदा किसन ज्या पाटलांच्या घरी कामासाठी जात असे त्या पाटील बुवांनी किसनसोबत महिनाभर लिंबाचा पाला खाण्याची पैज लावली. त्यांच्या दृष्टीने ही गमतीची गोष्ट असली तरी किसनने मात्र खरोखरीच लिंबाच्या पाल्यावर संपूर्ण महिना काढला. अर्थातच याचा त्याला कसलाही त्रास झाला नाही. मात्र त्याची देहकांती तेजस्वी दिसू लागली. किसनमधील असामान्यत्व हळूहळू लोकांच्या नजरेसमोर येत होते. मात्र तरीही त्याच्या हातून घडणाऱ्य़ा या अविश्वसनीय लीला पाहून गावातील मंडळी घाबरली व त्याला काम देईनाशी झाली. कामधाम नसल्याने किसन घरी बसून कंटाळला आणि त्याने चारधाम यात्रेला जाण्याचा निश्चय केला. किसन एकाएकी प्रवासाला निघालेला पाहून आईवडिलांना काहीच सुचेना. हातखर्चाला उपयोगी येतील म्हणून वडिलांनी त्याच्या हाती बळेबळे चार रुपये ठेवले. पैसे घेऊन किसन निघाला. मात्र पंधराव्या दिवशीच घरी परतला. आईवडिलांनी चौकशी केली असता त्याने चारधाम यात्रा व्यवस्थित पार पडल्याचे सांगितले आणि निघतेवेळी दिलेले चार रुपये त्याने वडिलांच्या हाती ठेवले. हे वृत्त समजल्यावर ग्रामस्थ किसनची थट्टा करते झाले तेव्हा किसनने त्यांना चारधाम यात्रेतील प्रत्येक स्थळाचे इत्थंभूत वर्णन ऐकविले. किसनने सांगितलेला यात्रा वृत्तांत जेव्हा गावातील चारधामास जाऊन आलेल्या मंडळींनी ऐकला तेव्हा ती मंडळीदेखील थक्क झाली. कारण किसनने सांगितलेला शब्दन्शब्द खरा होता.

कोणतेही काम चुटकीसरशी करणे, एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणे या अशा कृत्यांमुळे तसेच किसनच्या हातून घडणाऱ्य़ा शेकडो उपकारक घटनांमुळे त्याच्यातील देवत्वावर ग्रामस्थांचा विश्वास बसला. ‘श्रीदत्त’महाराजांचा अंश म्हणून सर्वत्र ‘किसनबाबा’ प्रसिद्धीस आले. दिवस हळूहळू सरत होते. किसनबाबांना नेवाशातील सिद्धसत्पुरुष श्रीनाथबाबा यांचे गुरुत्व लाभले आणि त्यातूनच पुढे प्रवरा नदीच्या तीरावरील एका औदुंबराच्या वृक्षाखाली किसनबाबा त्यांच्या नित्य साधनेत आणि श्रीदत्तप्रभूंच्या सेवेत मग्न राहू लागले.

दरम्यान, किसनबाबांच्या सहवासात आलेल्या अनेक भक्तांच्या आधीव्याधी निमाल्या, समस्या दूर झाल्या, सुखसमाधान व समृद्धी लाभली. पुढे या भक्तांच्याच सहकार्याने किसनबाबांनी त्यांच्या साधनास्थळी ‘श्रीक्षेत्र देवगड संस्थान’ उभारण्याचा संकल्प केला. किसनबाबांनी ही जागा लिलावातून विकत घेतली. भक्तजनांचे श्रमदान आणि माधुकरीतून हे संस्थान उभे राहिले. निष्णात कारागीरांच्या कलाकौशल्यातून अतिशय विस्तीर्ण, प्रशस्त, विलक्षण देखणे आणि स्वच्छतेचा पुरस्कार करणारे ‘श्रीक्षेत्र देवगड संस्थान’ उभे राहिले.

रूढार्थाने अशिक्षित असलेले किसनबाबा, श्रमदान करणाऱ्या मजुरांच्या पै-पैशांचा हिशेब ठेवत आणि त्यांना वेळच्या वेळी मजुरी देत असत हादेखील एक चमत्कार म्हणावा लागेल. प्रापंचिकाला स्थैर्य व साधकाला मार्गदर्शन करणाऱ्य़ा किसनगिरी बाबांनी ‘श्रीक्षेत्र देवगड संस्थान’ ही भव्य वास्तू उभारून श्रीदत्त संप्रदायाला व येथे येणाऱ्य़ा दत्तभक्ताला ‘अमूल्य’ भेट दिली आहे असेच म्हणावे लागेल.

सन १९७५ मध्ये नेवासे येथील ‘श्रीक्षेत्र देवगड संस्थाना’मध्ये समाधिस्थ होण्याआधी किसनगिरी बाबांनी त्यांचा उत्तराधिकारी या नात्याने ‘श्रीक्षेत्र महंतनगर, मेहूण’च्या श्रीभास्करगिरी महाराजांची निवड केली. आज महंत श्रीभास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे ‘संस्थान’ श्रद्धा आणि भक्तियुक्त अध्यात्माचा प्रचार व प्रसार ज्या सेवावृत्तीने करीत आहे, त्याचा अनुभव प्रत्येक दत्तभक्ताने अवश्य घेतला पाहिजे.