गुरुद्वादशी

गुरुद्वादशी
गुरुद्वादशी- श्रीपाद श्रीवल्लभ यांनी निजानंदी गमन केले तो दिवस

अश्विन वद्य द्वादशी अर्थात गुरू द्वादशी! शिष्य या दिवशी गुरूंचे समर्पण भावनेने पूजन करतात म्हणून या दिवसाला गुरुद्वादशी म्हणतात. गुरुद्वादशीच्या दिवशी ब्रह्मांडात गुरुतत्व १०० पटीने जास्त प्रक्षेपित होते. प्रत्येक साधक व शिष्य यांच्यासाठी गुरुद्वादशी हा दिवस दीपावली व इतर दिवसांपेक्षा अतिशय महत्वाचा दिवस आहे.

या दिवशी शिष्याने त्याच्या गुरूंना तळमळीने हाक मारल्यास ती गुरू पर्यंत पोहोचते, कारण त्यादिवशी वातावरण गुरुतत्वमय झालेले असते. शिष्यपदाच्या जवळ पोहोचलेला प्रत्येक साधकाला या दिवशी गुरू शिष्यत्व प्रदान करतात. गुरु द्वादशी हि सर्व दत्तभक्तांसाठी एक अद्वितीय पर्वणीच. खालील काही प्रसंगाने गुरुद्वादशी हि दत्तभक्तात विशेष प्रासादिक मानली जाते.

१) श्री गुरुचरित्र अध्याय ९ मध्ये श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी निजानंदी गमन केले तो दिवस म्हणजे अश्विन वद्य द्वादशी हिच तिथी होय. श्री गुरु चारित्रातली उल्लेख असा;

अश्विन वद्य द्वादशी  । नक्षत्र मृगराज परियेसी  ॥  श्रीगुरु बैसले निजानंदेेसी । अदृश्य झाले गंगेत ॥                                       
लौकिकी दिसती अदृश्य । आपण कुरवपुरी असती जण।। श्रीपाद राव निर्धारी जाण। त्रिमूर्तींचा अवतार ।।
                                     

श्रीक्षेत्र गाणगापूर, श्रीक्षेत्र कुरवपूर, श्रीक्षेत्र पिठापूर व अनेक दत्त क्षेत्री हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

श्री नरसिंह सरस्वती महाराज
गुरुद्वादशी- श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी नरसोबाची वाडी येथे मनोहर पादुकांची स्थापना करून गाणगापूर येथे प्रस्थान केले

२) दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी नरसोबाची वाडी येथे मनोहर पादुकांची स्थापना करून गाणगापूर येथे प्रस्थान केले तो दिवस म्हणजे गुरु द्वादशी! हा प्रसादिक प्रसंग श्री नृसिह वाडी महात्म्यात वर्णन केला तो असा;

श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री भैरव भटांना प्रसादश्रीफल त्या द्विजपत्नीचे ओटीत घातले व आशीर्वाद दिला, "अखंड सौभाग्यवती भव! पुत्रवती भव!" त्या तेजपुंज स्वामींचे दर्शनाने ते दाम्पत्य भारावून गेले होते. तरीही तिने थोड्या धिटाईनेच विचारले, 'महाराज आता माझी साठी झालेली आहे व यांचेही वय आता ८० आहे. आता पुत्रप्राप्ती कशी व्हावी?' त्यावर कृपासिंधु स्वामी महाराज म्हणाले. आमचा हा आशीर्वाद याच जन्मी फलद्रुप होणार आपणास लवकरच एक पुत्र होईल व त्याला पुढे चार पुत्र होतील. त्या चारीही पुत्रांचे वंश औदुंबरास फळे येतात त्याप्रमाणे बहरतील. एका शिळेवर पादुका प्रकट होतील व त्या पादुकांचे यावतचंद्रादिवाकरो पिढ्यानपिढ्या पूजन करावे. आता आम्हास गंधर्वनगरी (गाणगापूर) येथे प्रयाण करायचे आहे परंतु मनोहर पादुकांचे रूपाने अहर्निश माझे येथे वास्तव्य राहील. यास्थानी तुम्हास याची वारंवार प्रचिती येईल. येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील'. एवढे बोलून स्वामींनी औदुंबर वृक्षा खालील काळ्या पाषाणावर कमंडलूतील कृष्णाजल शिंपडले. त्यावर ओंकाराची आकृती बोटांनी रेखली आणि त्याच अंगुलीने मानवी पावलांच्या मुद्रा रेखाटल्या. त्याचे सभोवती शंख, चक्र, पद्मा, गदा, जंबुफळअशी स्वस्ति चिन्हेही रेखाटली आणि आश्चर्य बघता बघता या शुभ चिन्हांसह मनोहर पडयुगुल या शिळेवर प्रकट झाले. हे पाहून भैरवदाम्पत्य व सोबत असलेले आप्तेष्ट भावविभोर झाले. नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले आणि उपस्थित वारंवार स्वामीमहाराज अ।णि मनोहरपादुकांचे दर्शन करते झाले. धन्य ते भाग्यवान जे या प्रसंगाचे प्रत्यक्षदर्शी होते. काही वेळाने स्वामीजी भटजींना म्हणाले आपण आणलेली शिधा सामुग्री पादुकासमोर ठेवा. साक्षात अन्नपूर्णा अवतरणार आहे. तिचे पूजन करा. तुम्हालाच काय पण तूमच्या पुत्र पौत्रादी वंशजांना या क्षेत्री राहणाऱ्या ग्रामस्थांना आणि भक्तजनांना यापुढे येथे अन्न व उदकाची  चिंता राहणार नाही. अन्न पूर्णेची पूजाही पर पडली. सर्वत्र सुगंध दरवळला. भटजींना एक पर्णकुटी बांधून दिली. एकादशी दिवशी ब्राम्ह मुहूर्ती भटजी व स्वामीजी स्नानास गेले. द्विजपत्नी सडा समार्जन करू लागली. त्यावेळी तेथे आणखीन वावर जाणवला तो ६४ योगिनींचा. त्यांनी तिला दर्शन दिले व काशी क्षेत्रींच्या योगिनी श्री सेवे साठी कृष्णेच्या पूर्व तीरी असल्याचे सांगितले. स्वतः अन्नपूर्णा माता येथे महाराजांना भिक्षा देत असे. येथेच भैरवभताने स्वामींच्या अंगावरून येणाऱ्या जलात स्नान केले व अन्हीकही केले. माध्यान्हीस महापूजा केली. श्री नृसिंह स्वामी येथे वास्तव्यास येणार म्हणून प. प. रामचंद्रयोगी येथे वास्तव्यास येऊन राहिले होते. त्यांनी भैरव भटास त्यांचे भाग्याची सलाहाना केली. व त्यांना श्रीपादश्रीवल्लभ व नृसिह सरस्वती आवतारांची माहिती दिली. भैरवदाम्पत्यास आप्तेष्ट व भक्तवृन्दानी वस्त्र, पात्र, प्रवरणे आणली. फळे दूध साखर आणले. सर्वांनी श्रीगुरु व मनोहर पादुकांना वंदन केले. तेथे महाराजांनी भैरव भटांना पुजाविधांन सांगितले. विधिवत पुण्याह वाचन, नंदीश्राद्ध झाल्यावर विधिवत श्रींचे पादुका पूजनाचा संकल्प सोडला. आवाहन मंत्रानंतर पादुकांवर श्रींच प्रत्यक्ष दिसू लागले व सर्वाना पादुका व श्री यांच्यामधील अभिन्नत्व पटले.

भैरव भटजींनी प्रार्थना केली, "महाराज केवळ आपल्या आशीर्वादाने आणि कृपेमुळे आपल्या या दिव्य पादुकांचे पूजन आमच्याकडून घडले आहे. आपणच दिलेल्या अशीर्वाचनानुसार पुढील वंशजांकडून यावचचंद्रदिवाकरो अशीच पूजा अखंड करून घ्यावी. सर्वाना शुद्ध बुद्धी द्यावी, धन-धान्य, यश, कीर्ती संतति, समृद्धी याचा लाभ व्हावा. मानवी स्वभावानुसार काही अपराध घडलेतर मातृहृदयाने उदार अंतःकरणानी सर्वाना क्षमा करावी व आपले कृपाछत्र अखंड लाभावे. आपल्या मनोहर पादुकांची सेवा करणाऱ्या सर्व भक्तांची मनोरथे पूर्ण करावीत." हि प्रार्थना ऐकतानाच सर्वांची हृदये हेलावली. या क्षणी प्रत्येक जण पुनः पुनः श्री महाराजांच्या दिव्य मूर्तीचे व मनोहर पादुकांचे अवलोकन करीत ते रूप अंतःकरणात साठवून ठेवत होते. काही क्षण असेच गेले. महाराजांनी दंड कमंडलू हाती घेतले. भैरव भटजींनी श्रींचे चरणकमल घट्ट धरून ठेवले. तेव्हा स्वामी म्हणाले मी पादुकारूपाने येथेच राहणार आहे. स्वामी पूर्वाभिमुख झाले, कृष्णा प्रवाहा जवळ आले प्रवाह दुभंगला दुतर्फा फुलांचे पुष्करणी दिसली. त्यावरून पुढे जात महाराज महाराज गणगापुराकडे मार्गस्थ झाले. हा दिवस होता गुरु द्वादशीचा !

प. पू. योगीराज गुळवणी महाराजां
गुरुद्वादशी-  प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या हातात गुरुव्दादशी दिवशी चांदीच्या पेटीत घालून एक यंत्रसंरक्षक कवच बांधले

३) प. पू. टेंबेस्वामी महाराजानी नृसिंहवाडी मुक्कामी प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या हातात गुरुव्दादशी दिवशी चांदीच्या पेटीत घालून एक यंत्रसंरक्षक कवच बांधले असल्यामुळे गुरुकृपेची आठवण सतत राहण्यासाठी प. पू. गुळवणी महाराजानी प्रत्येक गुरुव्दादशीस नृसिंहवाडीस येण्याचा संकल्प सोडला. मनोमन ठरवले. त्या नुसार ते प्रत्येक गुरुव्दादशीस न चुकता येत असत. त्या पवित्र दिवशी नृसिंहवाडीतील माता- भगिनी परंपरेनुसार प्रथम देवाला ओवाळून मग प. पू. गुळवणी महाराजाना देखील ओवाळत असत. प. पू. गुळवणी महाराज प्रत्येक सुवासिनीस एक रुपया ओवाळणी घालत. एका गुरुव्दादशीस ओवाळणीसाठी प. पू. गुळवणी महाराजांकडील पाचशे रुपये खर्च झाले. याचाच अर्थ त्या दिवशी सुमारे पाचशे सुवासिनीनी महाराजांना ओवाळले, औक्षण केले! या पवित्र दिवशी नृसिहवाडीतही फार मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होतो. श्री महाराजांचे भक्त परंपरेतही हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.