श्री क्षेत्र पवनी (दत्तभक्तांची पंढरी)

स्थान: नागपूर पासून ५० कि. मी. अंतरावर, वैनगंगा नदीच्या किनारी पुराणात पद्मावती पुरी असे नाव, (महाराष्ट्र राज्य) 
सत्पुरूष: श्री वासुदेवानंद सरस्वती, यांचा १९ वा चातुर्मास शके १८३१, या स्थानावर संपन्न झाला.   
विशेष: वज्रेश्वर शिव मंदिर, मुरलीधर मंदिर, दत्तमंदिर, गणेशमूर्ती

श्री दत्त मंदिर पवनी
श्री दत्त मंदिर पवनी  व श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज 

पवनी हे नागपुरपासून फक्त ५० मैलांवर (कि. मी.) वैनगंगा नदीचे तीरावर बसलेले ठिकाण. पुराणात याला पद्मावतीपुरी असे म्हणतात. काही शतकांपूर्वी येथे पावन नावाचा राजा होऊन गेला. म्हणून या नगरीला पवनी असे म्हणतात. ६० ते ७० वर्षांपूर्वी वैदिक ब्राह्मण, वेदघोष करणारे ब्राह्मण येथेच सापडत. 

नागपूरच्या अग्नेय दिशेस निघून उमरेड भिवापूर ओलांडून दाट झाडीतून मार्ग काढून पुढे जाताच उंच दणकट किल्ला व त्यावरील बुरुज दिसायला लागतात, दगडी सिंहद्वारातून गावात प्रवेश होतो. 

रेशमी, जरीकाठी उपरणे, लुगडी, विड्याच्या पानांचे मळेही येथे भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे हे गाव सुशोभित झाले आहे. (प्रसिद्धीस आले आहे.) 

भरपूर देवालये, नदीवरील घाट वज्रेश्वराचे शिवमंदिर दत्तमंदिर, मुरलीधर मंदिर नदीचे काठी आहे. मुरलीधर मंदिराच्या लागूनच खाली उतरले की एक फूट उंचीची ९-१० गणेशाची रेखीव मूर्ती आहे. मुरलीधर मंदिराच्या गच्चीवरून वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र व नयनरम्य परिसर बघून वेगळाच आनंद होतो. तीनही बाजूंनी ६ मैल लांबीच्या डोंगरवजा टेकड्यांनी वेढलेला व थोर साधुसंतांच्या वास्तव्याने पुनीत झालेला नितांत सुंदर परिसर विदर्भात पवनी शिवाय कुठेच बघायला मिळत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहानपणी येथे बरेच दिवस वास्तव्यास होते. 

श्री क्षेत्र पवनी
श्री क्षेत्र पवनी

अशा या पावन भूमीत अखंड भारतात प्रसिद्ध पावलेले महान संत दत्तावतारी श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) इ. स. १८३९ ते १९०९ या काळात पवनी येथे विठ्ठल मंदिर व मुरलीधर मंदिरात मुक्कामाला होते. उज्जैनला प्रथम संन्यास घेतल्यावर गंगोत्रीपासून रामेश्वर व द्वारकेपासून त्यांनी राजमहेंद्री पायी प्रवास केला. आयुष्यात ते कुठल्याही वाहनात बसले नाहीत. तूर्या अवस्थेत असताना त्यांना नेहमी दत्तप्रभूंकडून संदेश मिळत. दत्तप्रभूंच्या आज्ञेने धर्मप्रसारासाठी २४ चातुर्मास देशाच्या विविध भागात त्यांनी केले. त्यात महाराष्ट्रात पवनी येथेही केला. चातुर्मास चालू असताना नरसोबाची वाडी, पुण्याहून लोक येत असत. चातुर्मास चालू असताना अनंतचतुर्दशीच्या दिवशी पुण्याचे प्रसिद्ध संत योगिराज श्रीगुळवणी महाराज यांना स्वामींचा अनुग्रह झाला. (मिळाला) 

महाराजांसोबत संपूर्ण चातुर्मास सीताराम महाराज (झीरी) बडनेरा. परभणीजवळील गुंज संस्थानचे श्री योगानंद सरस्वती यांचेही वास्तव्य काळीकरांच्या वाड्यात पवनी होते. पवनी येथील विठ्ठल मंदिरात औदुंबर वृक्षाखाली महाराज समाधी लावत असत. बऱ्याच लोकांना येथे महाराजांनी अनुग्रह दिला व त्यांचा उद्धार केला.  

परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती ज्या पाटावर बसत तो पाटही येथे जतन करून ठेवला आहे. मुरलीधर मंदिराच्या कळसावर असलेले विशाल सोन्याचे चक्र त्यांच्या गत वैभवाची साक्ष देते.

सर्व दत्तसंप्रदायी मंडळींनी निदान एक पावन क्षेत्र म्हणून तरी नागपूरजवळच असलेल्या या पवनी दत्तभक्तांच्या पंढरीला आवर्जून भेट द्यावी.

पवित्र भूमी असेही दतभक्तांची पंढरी 
वसतीला असती येथे वासुदेवानंद सरस्वती 
निमित्य दर्शनाचे करून जाऊ या पावन स्थळी 

श्री क्षेत्र पवनी
श्री क्षेत्र पवनी

संपर्क:

प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्व।मी सेवा मंडळ, पवनी
द्वारा भालचंद्र चिंचालकार, विठ्ठल गुजरी वॉर्ड,
पवनी, तालुका पवनि. जिल्हा भंडारा. ४४१९१०.

दूरध्वनी: ०७१८५ -२५५६४२.