स्थान: सोलापूर- गुलबर्गा स्टेशनमध्ये गाणगापुर रोड रेल्वे स्टेशन. तेथून २० कि. मी. आहे. भीमा -अमरजा संगमकाठी.
सत्पुरूष: श्री नृसिंह सरस्वती.
विशेष: जागृत स्थान, अनेक भक्तांचे व्याधी निरसन, बाधा निरसन, प्रत्यक्ष दत्त दर्शन, श्रीगुरुंची अनुष्ठान व लीला भूमी.
पादुका: निर्गुण पादुका
गाणगापूरचे महात्म्य श्री गुरुचरित्रात पुढीलप्रमाणे वर्णन आढळते.
श्री गुरुनृसिंह सरस्वती । अवतार असे त्रिमूर्ती
गाणगाग्रामी असे ख्याती । जे जाती तया स्थाना
तात्काळ होती मनोकामना । काही न करो हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे ||
गाणगापूर ग्रामी श्रीदत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वत: गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे. गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्तरुपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे.
वास निरंतर गाणगाभुवनासी । भक्तजन तारावयाची राहू तेथे निर्धार
आम्ही असतो याचि ग्रामी । नित्यस्नान अमरजा संगमी
वसो माध्यान्ही मठाधामी । गुप्तरुपे अवधरा ||
प्रत्यक्ष देव गाणगापूरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत. येथे देव आहेत व येथेच थांबले आहेत. कोणीही श्रद्धेने या व कृपाशिर्वाद प्राप्त करुन घ्या असा महाराजांचा संदेश आहे. याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा-अमरजा संगमावर करुन दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्तरुपाने कोणत्याही वेषात उपस्थित असतो असे महाराज सांगतात. अज्ञानामुळे शेजारी असूनसुद्धा श्री गुरुंना आपण ओळखू शकत नाही. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्र्वास ठेवला तर देव दर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे.
चराचरात देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे. परंतू गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे. हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात. त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करुन घेत नाहीत. ‘नित्य जे जन गायन करिती । त्यावर माझी अतिप्रीती’ माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात हे श्रीगुरुदत्तांनी सांगितले आहे.
मठी ठेवीतो निर्गुण पादुका । पुरवीतील कामना ऐका
संदेह न धरावा मनात । ही मात आमची सत्य जाणा||
श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगापूरातून निघताना आपल्या पादूका शिष्याकडे दिल्या व सांगितले या निर्गुण पादुका आहेत. परंतू निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रुपाने वास राहील. निर्गुण पादुका मठात ठेवतो. येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मनात कोणतीही शंका ठेवू नका आमचा आशीर्वाद आहे त्यावर विश्वास ठेवा. गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीचा भावार्थ मार्गदर्शक आहे.
श्रींक्षेत्र गाणगापुर दर्शन
गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार "श्री नृसिंह सरस्वती" महाराज यांनी २२ ते २३ वर्ष वास्तव्य केले. या संपूर्ण क्षेत्रामध्ये, संगम स्थान (भीमा +अमरजा नदी संगम), निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्म्य आहे, या दिव्य स्थानाचे दर्शन भाविकांना व्हावे. तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात. कल्लेश्र्वर हे मुक्तीस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे.
भीमा व अमरजा संगमस्थान
भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्ती पीठावर झाला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून २ ते ३ किलोमीटर आहे. या संगम स्थानी "भगवान श्री नृसिंह सरस्वती" नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकाचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित. निर्गुणमठाच्या पादुकादर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात. पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते.
गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्य वास आहे. ही अष्टतीर्थे पुढीलप्रमाणे होत –१) षट्कुल तीर्थ, २) नृसिंह तीर्थ, ३) भागीरथी तीर्थ, ४) पापविनाशी तीर्थ, ५) कोटी तीर्थ, ६) रुद्रपाद तीर्थ, ७) चक्रेश्र्वर तीर्थ व ८) मन्मथ तीर्थ. भागीरथी तीर्थालाच ‘काशीकुंड’ असे म्हणतात. एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले. त्या भक्ताच्या इच्छेने श्रीमहादेवांनी काशीची गंगा तिथे आणली. श्रीपापविनाशी तीर्थावर श्रीमत्परहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते. याच तीर्थांवर श्री नृसिंहसरस्वतींनी आपल्या भगिनीला-रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली.
श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन नृसिहसरस्वती स्वामी महाराजांनी भक्त जनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्य पावन दिवस होता नरक चातुर्दशीचा! याबाबत सविस्तर माहिति "श्री गुरु चरित्र" ह्य पवित्र ग्रंथात ४९ व्या अध्यायात आली आहे.
श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ
- "षट्कुळ व नृसिंह तिर्थ" (१-२) ह्या तीर्थात् स्नान केल्याने (भक्ती पूर्वक) काल मृत्यु व अप मृत्यु नाहीसा होवून शतायुष्य प्राप्त होते. ह्या तीर्थात् स्नान केल्याने प्रयाग येथील त्रीवेणि संगम् नद्यांचा स्नानचा फळ मिळते.
- "भागिरथी" (३) तीर्थात् स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होवून् काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचा पुण्य मिळते.
- "पाप विनाशी" (४) 'तीर्थात् स्नान मात्रें पाप राशी जैसे तृण अग्नि लागे', म्हणून इथे स्नान केल्याने समस्त पूर्व जन्मांचे पाप जळून राख होतो. ह्याच तीर्थात् स्नान केल्यांने स्वयं महराजांचे भगिनि "रत्नाई" चे श्वेत कुष्ठ नाहिसा झाला.
- "कोटि तीर्थ" (५) ह्या तीर्थात स्नान केल्याने आत्म शुद्धी होवून् मोक्ष प्राप्त होतो व जंबू द्वीपा मध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थांचे महिमा ह्या तीर्थात् आहे. येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळते व येथे यथा शक्ति दान केल्याने कोटि दान केलेले पुण्य मिळते.
- "रुद्र पाद" (६) हे तीर्थ "गया" समान आहे. गया क्षेत्रातिल सर्व आचरण येथे करून् रुद्र पादाला पूजल्यास् कोटि जन्मांचे दोष नाहीसा होवून् मोक्ष प्राप्ति होते.
- "चक्र तीर्थ" (७) हा तीर्थ द्वारावति तीर्थ समान आहे. येथे स्नान करून् येथील केशव मंदिरात् पूजल्यास द्वारावतिचे चौपट् पुण्य मिळते व अज्ञानिला ज्ञान प्राप्ति होते.
- "मन्मथ तीर्थ" (८) येथे स्नान करून कल्लेश्वराला पूजल्यास वंश वृद्धि होवून अष्टैश्वर्य प्राप्त होते.
।। भीमातटि असे गाणगा भुवन । पुण्यभूमि असे या त्रिभुवन ।।
श्रीगुरुचरित्रातील चाळीसाव्या अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचेही इथे दर्शन घडते. श्रीनरहरी नामक ब्राह्मण श्रीगुरुआज्ञेने शुष्ककाष्ठाला नेहमी पाणी घालीत असे. पुढे श्रीगुरुकृपेने त्या वाळलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी आली.
इथला श्रीनृसिंह सरस्वतींचा ‘विश्रांतीचा कट्टा’ ही सुप्रसिद्ध आहे. श्रीमत् नृसिंह सरस्वती स्वामीमहाराज संगमावरून गाणगापूर ग्रामात जात येत असताना या कट्ट्यावर बसून विश्रांती घेत असत. श्रीमहाराजांच्या कृपामृत दृष्टीने फुलून आलेले त्या भाग्यवान शेतकऱ्याचे शेत याच विश्रांती कट्ट्याजवळ आहे.
श्रीगुरुचरित्रातील गाणगापूर माहात्म्य
नामधारकाने सिद्धयोग्यांना वंदन करून विचारले, "श्रीगुरूनृसिंहसरस्वती हे त्रैमूर्तीचा अवतार आहेत. या भूमीवर अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे असताना ते गाणगापुरास येउन का राहिले? या गाणगापुर क्षेत्राचे काय माहात्म्य आहे? ते ऐकण्याची माझी फार इच्छा आहे. ते मला सविस्तर सांगा."
नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना आनंद झाला. ते म्हणाले, "नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास. मी त्याचे उत्तर देतो. लक्षपूर्वक ऐक. एकदा अश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीचा पर्वकाल होता. त्यावेळी श्रीगुरु शिष्यांना म्हणाले, "गया-प्रयाग-वाराणसी या त्रिस्थळी स्नान करणे पुण्यकारक असते, तेव्हा आपण सर्वजण यात्रेला जाऊ या. तुम्ही तुमच्या बायकामुलांनाही बरोबर घ्या. सर्वांनाच मोठा पुण्यलाभ होईल." शिष्य म्हणाले, "ठीक आहे. आम्ही घरी जातो व सगळी तयारी करतो." त्यावर श्रीगुरू म्हणाले, "अरे, तयारी कसली करता ? सगळी तीर्थे तर आपल्या गावाजवळच आहेत. त्यासाठी तयारी करण्याची काहीच गरज नाही. चला माझ्याबरोबर. मी तुम्हाला सर्व तीर्थे दाखवितो." असे सांगून श्रीगुरू सर्व शिष्यांना बरोबर घेऊन भीमा-अमरजा संगमावर गेले. तेथे सर्वांनी स्नान केले. त्यावेळी श्रीगुरू सर्व शिष्यांना म्हणाले, "या संगमाचे माहात्म्य फार मोठे आहे. येथे स्नान केले असता प्रयागस्नानाचे पुण्य लाभते. येथे भीमा नदी उत्तरवाहिनी असल्याने ती गंगेपेक्षा अधिक पवित्र आहे. येथे अष्टतीर्थे आहेत. त्यामुळे येथे आले असता काशीक्षेत्रापेक्षा शतपट पुण्यलाभ होतो."
श्रीगुरुंनी सांगितलेले हे रहस्य ऐकून सर्व शिष्यांना मोठा आनंद झाला. ते म्हणाले, "स्वामी, 'अमरजा' नदीविषयी आम्हाला सविस्तर सांगा. तिला 'अमरजा' असे नाव का मिळाले हे जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे." श्रीगुरू म्हणाले, "पुराणात या नदीच्या उत्पंत्तीची कथा आली आहे. पूर्वी जालंधर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्याने देवांशी युद्ध करून त्यांना देशोधडीला लावले. त्याने त्रैलोक्य पादाक्रांत केले. त्याने इंद्राशी युद्ध करून स्वर्गलोकही जिंकला. त्या जालंधराच्या सैन्येतील जे दैत्य जखमी होत असत त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत. त्यामुळे युद्धात त्याला जिंकणे अशक्य झाले. त्यामुळे काळजीत पडलेला इंद्र शंकरांना शरण गेला. त्यांना त्याने सर्व परिस्थिती सांगितली व आता तुम्हीच काहीतरी करा व दैत्यांपासून देवांना वाचवा." अशी विनंती केली. इंद्राने असे सांगताच अत्यंत क्रुद्ध झालेल्या शंकरांनी रौद्ररूप धारण करून ते दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त झाले. त्यांनी अमृतमंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राला दिला. शंकरांनी जालंधराचा पराभव केला. इंद्राने घटातील मंत्रोक्त जल देवगणांवर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले. त्या जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर पडले. ते ज्या ठिकाणी पडले तेथे नदी उत्पन्न झाली. ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली. तिलाच 'अमरजा' असे म्हणतात. या नदीत जे स्नान करतात. त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही. ब्रह्महत्यादी महापातके नाहीशी होतात. या अमृतनदीचा भीमानदीशी संगम झाला आहे. तो संगम प्रयागातील त्रिवेणीसंगमासमान आहे. कार्तिक-माघ महिन्यात या संगमात स्नान केले असता इहलोकांत सर्व सुखांचा लाभ होतो व अंती मोक्षप्राप्ती होते. सोमवारी, सूर्यग्रहणाच्या दिवशी, संक्रातीला, सोमवती अमावास्येला तसेच एकादशीच्या दिवशी स्नान केले असता अनंत पुण्याचा लाभ होतो. या पर्वदिवशी जमले नाही तर अन्य कोणत्याही दिवशी येथे स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात. ऐश्वर्ययुक्त दीर्घायुष्य लाभते. या संगमाजवळच अश्वत्थवृक्षासमोर नदीच्या तीरावर 'मनोरथ' नावाचे तीर्थ आहे. त्या तीर्थात स्नान केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. तेथेच माझे नित्य वास्तव्य असते. तेथे 'गरुडपक्षी' दिसतात ही त्याची खूण आहे. जे लोक त्या अश्वत्थाची सेवा करतात त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. याविषयी संदेह बाळगू नये. प्रथम अश्वत्थाची पूजा करावी व नंतर शिवमंदिरात जावे. तेथे संगमेश्वर आहे. त्याची भक्तिभावाने पूजा करावी. श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुनाप्रमाणेच हा संगमावरील रुद्र आहे. त्याला भक्तिपूर्वक प्रदक्षिणा घालावी. तेथील नंदीला वंदन करून चंडीला वंदन करावे. पुन्हा नंदीला सव्य प्रदक्षिणा घालून सोमसूत्रास जावे. अशा तीन प्रदक्षिणा घालाव्यात. मग नंदीमागे उभे राहून शिवदर्शन घ्यावे. असे केल्याने सर्वप्रकारचे वैभव व पुत्रपौत्रांदीचा लाभ होतो. त्यानंतर नागेशी गावी जावे. तेथे 'वाराणसी' नावाचे तीर्थ आहे. तेथे प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे. त्या नागेशी गावात भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण होता. त्याने सर्वसंगपरित्याग केलेला होता. तो सदैव शिवध्यान करीत असे. त्याच्या भक्तीने भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले होते. त्याला सतत समोर साक्षात शंकर दिसत असत. त्यामुळे तो देहभान विसरून गावात वेड्यासारखा फिरत असे. गावातले लोक त्याची 'वेडा' म्हणून टिंगलटवाळी करीत असत. त्याला 'ईश्वर' आणि 'पांडुरंगेश्वर' नावाचे दोन भाऊ होते. एकदा ते सर्व तयारी करून काशीयात्रेला निघाले. त्यांनी त्या वेड्यालाही 'आमच्याबरोबर काशीयात्रेला चल' असे म्हटले. तेव्हा तो शिवभक्त ब्राम्हण त्यांना म्हणाला, "तुम्ही काशीला कशाला जाता? तो काशीविश्वनाथ माझ्याजवळ आहे. मी तुम्हाला तो दाखवीन." हे ऐकताच सर्व लोक आश्चर्यचकित झाले. "आम्हाला तो काशीविश्वनाथ दाखव. तो येथेच दिसणार असेल तर त्याच्या दर्शनासाठी इतक्या दूर जाण्याचा त्रास तरी वाचेल." असे त्याचे भाऊ म्हणाले. त्याचवेळी तो ब्राह्मण नदीत स्नान करून शिवध्यान करीत बसला. त्याचक्षणी प्रत्यक्ष शंकर त्याच्यापुढे प्रकट झाले. तेव्हा तो ब्राह्मण महादेवना म्हणाला, "भगवंता, आम्हाला येथेच आपले नित्यदर्शन व्हावे अशी माझी प्रार्थना आहे." महादेव त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन 'तथास्तु' असे म्हणाले . त्याचक्षणी तेथे मणिकर्णिका तीर्थ उत्पन्न झाले. काशीविश्वनाथाची मूर्तीही प्रकट झाली. ती नदीच्या उत्तरदिशेला आहे. भीमा-अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिराची व कुंडाची रचना झाली.
काशीतील सर्व खाणाखुणा लोकांना दिसू लागल्या. ते पाहून तो ब्राह्मण आपल्या दोघा भावांना म्हणाला, "आता यापुढे आपल्या वंशातील कोणीही काशीला जाण्याची गरज नाही. यानंतर तुमचे नाव 'आराध्ये' असेल. आता येथेच पांडुरंगाची सेवा करावी. यापुढे तुम्ही काशीयात्रेला म्हणून येथे गाणगापुरास यावे." श्रीगुरुंनी भीमा-अमरजा संगमाचे माहात्म्य सांगितले असता शिष्यांची व भक्तांची श्रद्धा वाढली. तेव्हापासून सर्वजण येथेच स्नानदानादी करू लागले.
सिद्धयोगी म्हणाले, "त्यानंतर श्रीगुरू 'पापविनाशी' तीर्थांकडे गेले. त्या तीर्थात केवळ स्नान केल्याने मनुष्याची सर्व पातके नाहीशी होतात. तेथे श्रीगुरूंची पूर्वाश्रमीची रत्नाबाई नावाची बहिण होती. ती श्रीगुरुंचे दर्शन घेण्यासाठी आली. श्रीगुरुंनी तिला विचारले, "तू पूर्वी अनेक पातके केली होतीस. ती तुला आठवतात का ?" त्या पापकर्माची फळे तुला भोगावी लागत आहेत. तुला कुष्ठरोगही झाला आहे." श्रीगुरुंनी असे विचारले असता ती श्रीगुरुंच्या पाया पडली व शोक करीत म्हणाली, "मी केवळ अज्ञानी आहे. मला काहीच आठवत नाही. तुम्ही जगदीश्वर आहात. माझ्या हातून कोणते पापकर्म घडले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी." ती असे म्हणाली असता श्रीगुरुंना तिची दया आली. ते तिला म्हणाले, "तू पूर्वजन्मी चुकून केवळ अनवधानाने नुकत्याच प्रसूत झालेल्या मांजरीच्या पाच पिल्लांना ठार मारलेस. आणखीही काही पापकर्मे केलीस. त्या पापकर्माचे फळ म्हणून तुला या जन्मी अनेक दुःखे भोगावी लागत आहेत . तुला श्वेतकुष्ठ झाले आहे हेही त्या पातकांचे फळ आहे. श्रीगुरुंनी असे सांगितले असता रत्नाबाई श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाली, "मला आता पुनर्जन्म नको. हे सर्व भोग भोगण्याची माझ्यात शक्तीच नाही, म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे. माझा उद्धार करा." त्यावर श्रीगुरू म्हणाले, "तू पापविनाशी तीर्थात स्नान कर. तेथे स्नान करताच तुझा कुष्ठरोग जाईल. याविषयी संदेह बाळगू नकोस." श्रीगुरुंनी असे सांगितले असता तिने पापविनाशी तीर्थाजवळ राहून स्नान केले. त्यामुळे तिचा कुष्ठरोग नाहीसा झाला." सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, " आम्ही त्यावेळी तेथेच होतो. आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलेले आहे."
श्रीगुरुंनी आपल्या शिष्यांना अमरजा नदीच्या तीरावरील कोटीतीर्थ, रुद्रपादतीर्थ, गयातीर्थ, चक्रतीर्थ, कल्लेश्वर देवस्थान अशा आठ तीर्थाचे व पवित्र स्थानांचे माहात्म्य सांगून सर्व पातके नष्ट होतात व सर्व सुखांचा लाभ होतो हे विस्तारपूर्वक सांगितले. ते ऐकून सर्व शिष्यांची खात्री पटली की, काशी, प्रयाग, गया सर्वकाही येथेच आपल्याजवळ आहे. मग अष्टतीर्थे माहात्म्य सांगून मठात परत आले. त्यावेळी मोठी समाराधना करण्यात आली.
गाणगापूर येथील औदुंबर वृक्षाचा महिमा
संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्याआहेत. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झालेले आहेत. आपणास कधीहि गाणगापूर येथे जाण्यास योग आल्यास संगमी स्नान करून औदुंबरास -११,२१,१०८ प्रदक्षिणा नक्की घाल्याव्यात. आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान प्राप्त आहे. या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक "गुरुचरित्र" या जागृत ग्रंथाचे पारायण करतात.
"भस्माचा डोंगर"
भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे. सदरील भूमीमध्ये अनेक ऋशी मुनींनी केलेली तप साधना यामुळे या तपोभूमितील “विभूती” अनेक भाविक घरी घेऊन जातात, त्याच प्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासठी येथील पाषाणा द्वारे रचना तयार करायची एक पद्धत येथे प्रचलीत आहे.
श्रीक्षेत्र गाणागापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद असतो. हजारो वर्षांपासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते. त्याच यज्ञातील विभूती साचून तिथे भस्माची एक प्रचंड टेकडीच निर्माण झालेली आहे. आजपर्यंत लक्षावधी श्रीदत्तभक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेउनही ही भस्माची टेकडी आहे तशीच आहे.
श्रीक्षेत्र गाणगापूरच्या भस्माने पिशाच्च बाधा हटते. दृष्टिबाधा नाहीशी होते. रोगराई नाहीशी होती. हे भस्म संकटनाशक, दुरितहारक आहे. परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात. संन्यासीवृंद भस्मस्नानासाठी याच भस्माचा उपयोग करतात.
निर्गुण पादुका
दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी मधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहल्या नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी "श्री नृसिंहसरस्वती" महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही. या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपाचारांसाठी ताम्हणांत ‘उदक’ सोडतात.
"प्रसिद्ध आमुचा गुरु जगी । नृसिंह सरस्वती विख्यात ॥
ज्याचे स्थान गाणगापूर । अमरजा संगम भीमातीर ॥"
श्रीक्षेत्र गाणगापुराला ‘दत्तभक्तांचे पंढरपूर’ म्हटले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे द्वितीयावतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. ‘निर्गुण पादुका’च्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे.
आज श्री क्षेत्र गाणगापुरला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिह सरस्वती निवासास होते. तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत आज ती गुफा बंद केलेली आहे. पण पूर्वीचे पुजारी सांगत की, त्या ठिकाणी भगवान श्री नृसिंह स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केलेली होती. तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र, स्वामींनी श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत. पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिणून बंद करण्यात आली.
श्रीनृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्च विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते. तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करुन श्रीदत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवीत आहेत.
श्रीनिर्गुण पादुका मंदिर (अथवा श्रीगुरूंचा मठ) हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे. या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे. मंदिराच्या पूर्वेस व पश्र्चिमेस दोन महाद्वारे आहेत. पश्र्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजविला जातो. नव्यानेच बांधण्यात आल्याने अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे.
श्रीनिर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर व त्या खाली गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्र्चिमेस अश्र्वत्थ वृक्ष आहे. वृक्षाभोवताली नागनाथ, मारुती व तुलशीवृंदावन आहे. मठात मंदिर सेवेकऱ्यांच्या अनुष्ठानासाठी एकूण तेरा ओवऱ्या आहेत. त्यांपैकी पाच पूर्वेस, सात उत्तरेस व एक पश्र्चिमेस आहे. मठाच्या दक्षिणभागी श्रीगुरुपादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे. त्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. गाभाऱ्याला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे.
आत पश्र्चिमेकडील कोनाड्यात विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वत: श्रीनृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे. या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्र्चिमाभिमुख आहे. या दरवाज्यातून ओणव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो. या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रैमूर्तींचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्र्चिमाभिमुख आहे. या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्रीगुरुंच्या ‘निर्गुण पादुका’ ठेवलेल्या आहेत. या पादुका सुट्या व चल असून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून तांबूस, काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत.
श्रीगुरुचरित्रात श्रीगुरू आपल्या निर्गुण पादुकांची व गाणगापूर माहात्म्याची ग्वाही देताना म्हणतात -
“मठी आमुच्या ठेविती पादुका । पुरवितील कामना ऐका ।
अश्र्वत्थ वृक्ष आहे निका । तो सकळिकांचा कल्पतरू ॥
कामना पुरविल समस्त । संदेह न धरावा मनात ॥
मनोरथ प्राप्त होतील त्वरित । ही मात आमुची सत्य जाणा ॥
संगमी करूनिया स्नान । पूजोनी अश्र्वत्थ नारायण ।
मग करावे पादुकांचे अर्चन । मनकामना पूर्ण होतील ॥
विघ्नहर्ता विनायक । आहे तेथे वरदायक ॥
तीर्थे असती अनेक । पावाल तुम्ही सुख अपार ।
श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्या वेळेस श्रीशैल यात्रेस निघाले त्या वेळी सर्व भक्तांच्या, शिष्यांच्या आग्रहावरून, हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या ‘निर्गुण पादुका’ इथे ठेवल्या. या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. त्याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्या वेळेस श्रीदत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरीत्या या पादुकांद्वारा करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण, निराकार असते. म्हणून या पादुकांना ‘निर्गुण पादुका’ म्हणतात. भक्तकल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य-दु:खे व अटळ संकटे निवारण झालेली आहेत.
श्रीनृसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा-अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्येस साधारणत: ३ कि.मी.वर आहे. श्रीगुरू ज्या अश्र्वत्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो पडून गेल्यावर त्याच स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. याच मंदिरात अश्र्वत्थवृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे.
श्रीगाणगापूर क्षेत्राच्या पूर्वभागात श्रीकल्लेश्र्वर मंदिर आहे. हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे. इथला पुजारी नरकेसरी कल्लेश्र्वराशिवाय अन्य कुणाला मानत नसे. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडविला.
श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते.
इथल्या देवस्थानचे पुजारी सत्त्वगुणी आहेत. ते यात्रेकरूंची धार्मिक कृत्ये, अभिषेक, पूजा, माधुकरी, नैवेद्य, ब्राह्मणभोजन वगैरे व्यवस्था चांगल्याप्रकारे करतात.
श्रीक्षेत्र गाणागापुराला आलेले सर्व भक्त माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात. स्वत: श्रीनृसिंह सरस्वती भिक्षा मागत असत.
‘वसती रानी संगमासी । जाती नित्य भिक्षेसी ॥
तया गाणगापुरासी । माध्यान्हकाळी परियेसा ॥’
असा श्रीगुरुचरित्रात उल्लेख आहे. दररोज बारा ते साडेबाराच्या सुमारास श्रीमहाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात. परंतु साक्षात परमेश्र्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यशाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. श्रीदत्तमहाराजांच्या दरबारात पाच घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते. श्रीक्षेत्र गाणागापूर म्हणजे श्रीनृसिंह सरस्वतींची लीलाभूमी. अनेक भक्तांची दु:खे, संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले. त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्त्व आलेले आहे. भीमा-अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. गाणगापूरचा परिसरही श्रीक्षेत्र नरसोबावाडीप्रमाणे नितांत रमणीय आहे.
नित्त्यक्रम
श्रीक्षेत्र गाणगापूर येथील नित्यक्रम पुढीलप्रमाणे असतो – रोज पहाटे तीन वाजता काकड आरती होते. त्यानंतर साडेपाच ते सहाच्या सुमारास कर्पुरारती होते. साडेसहा वाजता तीर्थारती होते. इथे पादुकांवर पूजेचे उपचार होत नाहीत. पादुकांवर पाणी घातले जात नाही. केवळ अष्टगंध व केशरी गंध लावतात. इतर उपचार ताम्हणात पाणी सोडून करतात. साडेबाराच्या सुमारास श्रीदत्तप्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो. नंतर भक्तमंडळी माधुकरी मागावयास जातात.
सायंकाळी सहा-साडेसहा वाजता दिवे लागतात. रात्रौ साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत श्रीदत्तप्रभुंच्या पालखीचा सोहळा चालतो. प्रथम पूजा, आरती झाल्यानंतर अलंकाराने सुशोभित अशी श्रीदत्तप्रभूंची मूर्ती पालखीत बसवतात. मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घालतात. याच काळात पालखीसमोर भजनसेवाही होते. त्यानंतर श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीकृत करुणा त्रिपदी, पदे, अष्टके आणि शेजारती म्हणण्याचा कार्यक्रम होतो. नंतर तीर्थप्रसाद दिला जातो.
श्रीक्षेत्र गाणगापूरला साजरे होणारे उस्तव
श्रीक्षेत्र गाणगापूरला पुढील उत्सव साजरे केले जातात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला (श्रीगुरुपौर्णिमेला) श्रीव्यासपूजा साजरी करतात. संपूर्ण श्रावण महिनाभर भक्तमंडळी श्रीगुरुचरित्राचे पारायण करतात. मठात रोज शिवलिंगावर रुद्राभिषेक होतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी (गणेश चतुर्थीच्या दिवशी) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा करतात. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी श्रींची पालखी भक्तमंडळींसह सायंकाळी श्रीकल्लेश्र्वर मंदिरात जाते. रात्रौ आठ वाजता परत येते.
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतारसमाप्तीचा उत्सव आश्र्विन वद्य द्वादशीला म्हणजे गुरुद्वादशीला मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्या वेळेस महाप्रसाद वाटला जातो.
नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्व भाविक भक्त अष्ट तीर्थ स्नान करण्यासाठी जातात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्रीदत्तप्रभूंची पालखी संगमावर जाते. त्याच रात्री भजनाच्या व नामस्मरणाच्या गजरात ती परत मठात येते. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी श्रीदत्तजयंतीनिमित्त येथे मोठा उत्सव होतो. दुपारी बारा वाजता दत्तजन्म साजरा करण्यात येतो. या उत्सवाला बाहेरगावची माणसे फार मोठ्या प्रमाणावर आलेली असतात. पौष शुद्ध द्वितीयेला श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.
माघ वद्य प्रतिपदा हा श्रीक्षेत्र गाणगापूर येथे साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव होय. प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी श्रीमहाराज श्रीशैल्यगमनास निघतात. चतुर्थीच्या दिवशी श्रीदत्तप्रभूंची पालखी रुद्रपाद तीर्थांहून पुनश्र्च मठात येण्यास निघते. हा सर्व सोहळा अत्यंत आनंदमय, मनाला स्फूर्ती देणारा असतो.
भक्तांच्या निवासाची सोय इथल्या वेगवेगळ्या धर्मशाळांतून अत्यंत माफक दरात केली जाते. या सर्व धर्मशाळा देवस्थान कमिटीच्या मालकीच्या आहेत. श्रीवासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा अलीकडेच उभारण्यात आली आहे. प. पू. श्रीदत्तात्रेयशास्त्री कवीश्र्वरांच्या हस्ते या धर्मशाळेच्या वास्तूचे पूजन झालेले आहे. श्रीविश्र्वेश्र्वर मठ, श्री दंडवते स्वामीमहाराजांचा मठ, श्रीशंकरगिरी महाराज मठ वगैरे मठांतूनही भक्तांच्या राहण्याची सोय होऊ शकते.
श्रीगुरुचरित्र ग्रंथात, गाणगापुरात घडलेल्या बऱ्याच लीला आलेल्या आहेत. पूर्वावतारात भेटलेल्या रजकाला स्वामींनी या अवतारात श्रीक्षेत्र गाणगापूरला दर्शन देऊन त्याच्या मांडीचा फोड बरा केला. विश्रांती कट्ट्यावर विश्रांती घेत असताना शेतकऱ्यावर कृपा करून त्याला अमाप धान्याची प्राप्ती करून दिली. दीपावलीच्या दिवशी ते एकाच वेळी आठ ठिकाणी गेले. नरहरी कवीश्र्वराला परमेश्र्वराचे दर्शन घडविले तर विणकरास एका क्षणात श्रीशैल मल्लिकार्जुनाचे दर्शन झाले. औदुंबराच्या शुष्क काष्ठास पालवी आणली. साठ वर्षांच्या वांझेस पुत्रप्राप्ती घडविली. गरीब भास्कराच्या पाच जणांना पुरेल एवढ्या सिद्धान्नात हजारो लोकांना भोजन घातले. या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अशा अनेक लीला सांगता येतील.
मुंबई-चेन्नई रेल्वेच्या मार्गावर गाणगापूर हे स्टेशन (स्थानक) लागते. पुणे-रायचूर मार्गावर गुलबर्गा स्टेशनपूर्वी गाणगापूर स्टेशन आहे. पुण्यापासून या स्टेशनचे अंतर ३२७ कि.मी आहे. तेथून पुढे २१ कि.मी श्रीक्षेत्र गाणगापूर आहे. तेथे जाण्यासाठी कर्नाटक राज्याच्या एस. टी. गाड्यांची सतत ये - जा चालूच असते. मणीगिरी तथा मणिचलच्या पायथ्याशी हे पवित्र तीर्थक्षेत्र वसलेले आहे.
अमूल्य अप्राप्य व प्रासादिक
गाणगापूरला संगमस्थानी आढळणारे गरुड सदृश्य पक्षी
इ.स. १४५८ साली, भगवन् श्रीदत्तात्रेयांचा कलियुगातील दुसरा अवतार श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी महाराज, यवन राज्य आल्यानं (कठिण दिवस युगधर्म! म्लेंच्छराज्य क्रूरकर्म! प्रगट असता घडे अधर्म! समस्त म्लेंच्छ येथे येती! - श्रीगुरुचरित्र अ. ५०, ओ. २५८) आणि आपली अपार ख्याती झाल्यानं भक्त-अभक्त सगळेच वरदान मागायला येतील या कारणास्तव (प्रगट झाली बहु ख्याती! आता रहावे गौप्य आम्ही! - श्रीगुरुचरित्र अ.५०, ओ.२५४), अवतारकार्य समाप्तीसाठी पाताळगंगेतून कदलीवनात जायला निघाले.
त्यावेळी गाणगापूरातील समस्त जनसमुदाय स्फुंदूनस्फुंदून रडायला लागला. "स्वामी आमुते सोडून! केवी जाता यतिराया!" (श्रीगुरुचरित्र अ. ५१, ओ.९) अशी आर्त विनवणी त्यांनी श्रीगुरूंना केली. त्यावेळी परमदयाळू श्रीगुरुंनी "आम्ही या ठिकाणीच आहोत!" (आम्ही असतो याचि ग्रामी! नित्य स्नान अमरजासंगमी! वसो मठी सदा प्रेमी! गौप्यरुपे अवधारा! - श्रीगुरुचरित्र अ. ५१, ओ. १४) असं आश्वासन त्या दुःखी जनांना दिलं.
त्याची साक्ष पटविण्यासाठी, श्रीगुरुंनी सांगितलं, "आम्ही वसतो सदा येथे! ऐसे जाणा तुम्ही निरुते! दृष्टी पडती गरुत्मते! खूण तुम्हा सांगेन!" (श्रीगुरुचरित्र अ. ४८, ओ. ३८) अर्थात्, "आम्ही विष्णूअवतार असल्याने त्याची खूण म्हणून आमचं प्रिय वाहन गरुडासारखे दिसणारे पक्षी या ठिकाणी दिसतील."
आज ५०० वर्षांनंतरही हे पक्षी गाणगापूरात दिसतात. यावेळेस ३ ऑगस्टच्या गाणगापूर भेटीदरम्यान संगमावर असलेल्या श्रीगुरूंच्या अनुष्ठानस्थानासमोर असलेल्या अश्वत्थ वृक्षावर या पक्षांचं घरटं आढळलं. त्यांचा आवाजही ऐकला. झाडाच्या दाट पानातून तो पक्षी जसा दिसला तसा त्याप्रमाणे त्याचं प्रतिमा घेण्याचा प्रयत्न छायाचित्रात केलेला आहे. श्रीदत्तप्रभूंनी सांगितलेली गाणगापुरातील आपल्या निरंतर वास्तव्याची ही खूण गवसल्याच्या आनंदात यावेळेस पक्षांचा तो आवाज ध्वनीमुद्रित करायचा राहून गेला. पुढच्या वेळेस करता येईल. या सगळ्याचा मतितार्थ काय तर श्रीगुरुचरित्र हा ग्रंथराज 'कालातीत अक्षरसत्य' असल्याचीच ही खूण आहे. मातृभाषा कानडी असूनही 'श्रीगुरुचरित्र' मराठीत शब्दबद्ध करुन श्री. सरस्वती गंगाधरांनी महाराष्ट्रावर अपार कृपा करुन ठेवली आहे.
गाणगापूर हेच गांव नरसिंहसरस्वती स्वामीं का निवडले ते लक्षात आले
तालुका अफजलपूर (म्हणजे अफझल खानाचे जहागिरीचे गाव) विजापूर (आदिलशाहीची राजधानी) बिदर (बेरीदशाहीची राजधानी) हैद्राबाद (मूळनाव भागानगर, कुतुबशाहीची राजधानी) या गावांच्या मध्यभागी तथा या सर्व शाह्यांसह मोगलाई व निजामशाही यांच्या सीमा गाणगापूरच्या आजुबाजूला एकमेकाला मिळतात ! असे केंद्रस्थान कार्यासाठी निवडून सुमारे ८०० वर्षं या ठीकाणी राहून हिंदू तथा सनातन वैदीक धर्माला ग्लानी येऊ दिली नाही व परकीय आक्रमक शक्तिंपासुन धर्माचे रक्षण केले, सर्वसामान्यांना आधार दिला.
या क्षेत्री असे जावे
गाणगापूर (गुलबर्गा, कर्नाटक)
गाणगापूर हे क्षेत्र मनुष्य रूपी दत्तात्रेयाचा द्वितीय अवतार असलेले श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांनी आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदिर्घ वास्त्वयासाठी का निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे. भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमाच्या आसपासचा २ ते ३ मैलाचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाला आहे. या ठिकाणी पौराणिक काळातील विभूतींनी तपश्चर्या करून, यज्ञ करून आणि काही काळवा स्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र आणि मंगलकारक केला आहे. या क्षेत्री माधुकरी मागण्याचे फार महत्त्व आहे. दत्त भक्तांची अशी भावना आहे की, आज ही दुपारी १२ वाजता श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागण्यास गाणगापूरला येतात. येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केलेली आहे. हे क्षेत्र दत्त संप्रदायामधे फार महत्त्वपूर्ण आहे.
मुंबई-हैद्राबाद (व्हाया सोलापूर) किंवा मुंबई-बंगलोर या रेल्वे मार्गावर गाणगापूर रोड स्टेशन लागते. तिथे उतरून बस किंवा ऑटोने २० कि. मी. अंतरावर गाणगापूर या क्षेत्रास जाता येते. बसमार्गाने सोलापूर-गाणगापूर अशी थेट बस सेवा आहे. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत व भोजनासाठी अन्नछ्त्र मंडळात सोय होऊ शकते.
श्री दत्त संस्थान गाणगापूर
श्रीक्षेत्र गाणगापूर, तालुका अफझलपूर,
जिल्हा कालबुर्गी, कर्नाटक राज्य.
फोन- (०८४७२) २७४३३५, २७४७६८
श्री नृसिहसरस्वती देवस्थान
श्रीक्षेत्र गाणगापूर, तालुका अफझलपूर,
जिल्हा कालबुर्गी, कर्नाटक राज्य.