जन्म: ज्ञात नाही पण अश्वलायन शाखेच्या देशस्थ कुळात
आई/वडील: यमुना/ज्योतिपंत
वेष: संन्यासी
संप्रदाय: चैतन्य संप्रदाय
गुरु: शिवाजी पंत
संन्यास: इ. स. १८४०
समाधी: मार्गशिर्ष कृ. १३, इ. स. १८४३
सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात विटे हे गांव आहे. तेथे सुमारे १५० वर्षापूर्वी हे सत्पुरुष कवी होऊन गेले. कवींचे चिरंजीव दिगंबर चैतन्य यांनी यांचे आर्यात्मक चरित्र लिहिले आहे. यावरून प्रस्तुत चरित्रलेख लिहित आहे.
सुमारे ३०० वर्षांपूर्वी ‘उद्धव चिद्घन’ नामक प्रसिद्ध सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे गुरू चिद्घन स्वामी. त्यांच्या भगिनीच्या वंशात भैरव अवधूत हे जन्म पावले. भैरवास अप्पाजी बुवा असेही म्हणत असत. त्यांच्या वडिलांचे नाव ज्योतिपंत व आईचे यमुना. यांस गोविंद व गोपाल असे दोन बंधू होते. भैरवबुवांच्या आजोबांचे नाव मुकुंदपंत व आजीचे नाव नीराबाई. ही नीराबाई अद्वैत चैतन्य नामक सत्पुरुषाची कन्या होती. व चिद्घनस्वामी हे तिचे बंधू होत. भैरवस्वामींचे पूर्वज विटे येथील वतनदार जोशी व कुलकर्णी होते. भैरवबुवांचे पितामह मुकुंदपंत व चुलते शिवाजीपंत हे विरक्त सत्पुरुष होते. शिवाजीपंतास मुलगा नव्हता. म्हणून त्यांनी भैरवबुवांस पित्याचे आज्ञेवरून दत्तक घेतले होते आणि हेच त्यांचे दीक्षागुरू होते. येथे राहणारे लक्ष्मीनाथ नावाचे नाथपंथी साधू भैरवअवधूतांचे मित्र होते. त्यांच्या प्रेरणेने भैरवांनी पैठणास दत्तोपासना आचरली. या उपासनेचे आत्मिक फळ प्राप्त झाल्यावर पैठणहून दत्तमूर्ती घेऊन ते स्वग्रामी परत आले. विट्यास मूर्ती आणल्यानंतर (श. १७३३) त्यांनी दत्तमंदिर बांधले. आणि श. १७४५ पासून दत्तजयंतीचा महोत्सव सुरू केला.
शके. १७३३ प्रजापती संवत्सर आषाढ शुद्ध सप्तमी, शुक्रवारी, उत्तरानक्षत्री दत्तमूर्ती विटे येथे आली, असे त्यांचे चिरंजीव दिगंबरबुवांनी लिहिले आहे. त्यांनी काही काळ आळंदीस ज्ञानेश्वरांच्या चरणाजवळ निवास केला होता. श. १७६२ मध्ये अगदी उतारवयात त्यांनी संन्यास स्वीकारला आणि त्यानंतर तीनच वर्षांनी (श. १७६५ मार्गशीर्ष कृ. १३) ते समाधिस्थ झाले. विटे येथे अद्याप त्यांचा वंश नांदत आहे. त्यांचे चिरंजीव दिगंबरचैतन्य यांनी त्यांचे आर्यात्मक चरित्र लिहिले आहे.
आपल्या वृद्धपणी भैरवबुवा काशीयात्रेस गेले होते. भैरवबुवांचे आडनाव ज्ञानसागर होते व ह्या उपनावाप्रमाणे ते खरोखरच ज्ञानसागर होते. त्यांचे चिरंजीव ह्यांनी त्यांस वेदान्तवक्ते व परब्रह्मनिष्ठ असे म्हटले आहे व त्यांची कविता पाहिली म्हणजे ही विशेषणे त्यांच्या ठायी अगदी अन्वर्थक होती असे वाटल्यावाचून राहात नाही. मागे सांगितल्याप्रमाणे भैरवबुवांनी शके १७६२ प्लव संवत्सर कार्तिक शु. एकादशी या दिवशी संन्यास घेतला. त्यावेळी ते फार तेजस्वी दिसू लागले. व चिमण्या वगैरे पक्षी त्यांच्या अंगावर येऊन बसू लागले. ‘सर्व खल्विदं ब्रह्म’ या महावाक्याचा उपदेश भैरवस्वामी करीत असत. तो उपदेश स्वत:च्या ठायी कितपत ठसला आहे हे सामान्य जनांस दाखविण्यासाठी स्वामींनी हा चमत्कार करून दाखविला. त्या चिमण्या भैरवस्वामींच्या अंगावर किती निर्भयपणे बसल्या होत्या, हे पुढील आर्येवरून समजेल.
द्विज उडवितां न उडती,
अद्वय प्रत्यय जनांस दाखविला ।
स्वामिमहाराजांनी ब्रह्मपणें
ब्रह्मरसचि चाखविला ॥
भैरवस्वामींनी संन्यासदीक्षा ग्रहण केल्यावर श्रीवासुदेवस्वामी यांनी त्यांचे नाव ज्ञानसागरदेवेंद्रस्वामी असे ठेवले. स्वामींच्या पुण्यतिथीचा उत्सव विटे येथे त्यांच्या वंशजांकडून प्रतिवर्षी साजरा केला जातो. भैरवबुवांची गुरुपरंपरा येणेप्रमाणे –
भैरवबुवांनी विटे येथे दत्तमंदिर बांधून मठस्थापना केली. या मठास धार व देवास येथील श्री. पोवार यांजकडून मठाच्या खर्चासाठी दरसाल ३०० रुपये मिळतात. ते अद्याप चालू आहेत; याशिवाय काही इनाम जमिनी आहेत. त्यांच्या उत्पन्नातून मठाचा व उत्सवाचा खर्च चालतो.
भैरवअवधूत ज्ञानसागर हे आश्वलायन शाखेचे देशस्थ ब्राह्मण. यांचे गोत्र विश्वामित्र, भैरवअवधूत यांस दिगंबर नामक एक पुत्र होता. तो रूपाने फार सुंदर असून अप्रतिम वक्ता, उत्कृष्ट कीर्तनकार व संगीतकलेत केवळ प्रतिगंधर्व होता.
भैरवअवधूत ह्यांची एकंदर कविता हजाराच्या आत आहे. त्यांचा ‘ज्ञानसागर’ ह्या नावाचा एक अध्यात्मपर ग्रंथ आहे. त्याच्या १४ रेषा असून, ओवीसंख्या ३१५ आहे. याशिवाय त्यांची अभंग व पदे मिळून सुमारे ३०० कविता आहेत. भैरवअवधूत यांची वाणी प्राय: शुद्ध, गंभीर, सुसंस्कृत, स्वानुभवयुक्त, अधिकारवती व प्रासादिक अशी आहे. यांनी हिंदुस्थानी भाषेत पण पदे लिहिली आहेत. त्यांची बहुतेक कविता वेदांतपर, भक्तिपर, उपदेशपर व अध्यात्मपर असल्यामुळे, खऱ्या कवित्वास त्यात वाव सापडला नाही. तथापि क्वचित् स्थळी हे कवित्व अत्यंत उज्जवल्तेने चमकत असल्याचे दृष्टोत्पत्तीस आल्याशिवाय राहात नाही. भैरवबुवांनी आपल्या कवितेत ‘ज्ञानसागर शिवगुरु अवधूत’ या शब्दांनी आपला व आपल्या गुरूंचा उल्लेख सर्वत्र केला आहे, आता भैरवअवधूत यांनी केलेले काही अभंग येथे देता येण्यासारखे आहेत.
अभंग १
दत्त परब्रह्म केवळ । नित्य पवित्र निर्मळ ॥
अरूप रूप हें चांगलें । ध्यानीं मानस रंगले ॥
भव्य प्रसन्न वदन । पाहतां निवाले लोचन ॥
जटा मुकुट आणि गंगा । भस्म लावियेलें अंगा ॥
अनुहात निगम ध्वनी । श्रुतीं कुंडलें श्रवणी ॥
रूळे वैजयंती कंठीं । केशर कस्तुरी लल्लाटीं ॥
कासे पीतांबर पिवळा । उभा षड्भुज सांवळा ॥
चरणीं पादुका शोभती । सुरवर त्रिकाळी वंदिती ॥
ज्ञानसागर शिवगुरु स्मरणीं । अवधूत प्रकटे अंत:करणीं ॥
अभंग २
निर्मळासी मळ शुद्धी । नाहीं मुळीच उपाधी ॥
पारा खावोनियां सोनें । राही आपुल्या वजनें ॥
तैसा देव तेजोराशी । नाहीं मळमूत्र त्यासी ॥
प्रेम भक्तीचा भुकेला । निराकार आकारला ॥
ज्ञानसागर निवासी । शिवगुरु अवधूत अविनाशी ॥
अभंग ३
पायीं ठेविता कपाळ । नयनीं वाहे प्रेमजळ ॥
तेणें चरण प्रक्षाळिले । अंगी रोमांच उठले ॥
मनीं मनचि विरालें । चंद्रामृत तें चांगलें ॥
तेंचि घेऊनिया करीं । मुख प्रक्षालन करी ॥
धूप संशय जाळीला । ज्ञानदीप उजळीला ॥
दूध नैवेद्य साखर । भक्षी नवनीत सार ॥
भक्त प्रसाद सेविती । गाती आनंदें नाचती ॥
शिवगुरु ज्ञानाचा सागर । बोले अवधूत जयजयकार ॥
अभंग ४
विश्वपट परिधान ।
करी अनसूयानंदन ॥१॥
दिगंबराचें अंबर ।
बरवें शोभे चराचर ॥२॥
नाना रत्नें वसुंधरा ।
घेऊनी आली अलंकरा ॥३॥
लेवविले अंगोअंगीं ।
रंग रंगले निजरंगीं ॥४॥
ज्ञानसागराची शोभा ।
शिवगुरु अवधूत उभा ॥५॥
अभंग ५
प्रेमभावें संतोषलें ।
दत्त स्वमुखें बोलिले ॥१॥
अत्री अनसूयेचे पोटीं ।
जन्मा आलों तुम्हांसाठी ॥२॥
चिंता न करावे सर्वथा ।
तुमचा भार माझे माथां ॥३॥
स्वस्थ साम्राज्य ते करा ।
पिटा भक्तीचा डांगोरा ॥४॥
ज्ञानसागराच्या कुळा ।
मीच प्रेमाचा जिव्हाळा ॥५॥
परमवरद वाणी ।
शिवगुरु अवधूत तारणी ॥६॥