श्री अनंत व्रत (श्री अंनत चतुर्दशी व्रताची माहिती)

अनंत चतुर्दशी व्रत
अनंत चतुर्दशी व्रत 

भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते.

अर्थ 

अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती.

गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीविष्णु देवतेला अनुसरून केल्या जाणार्‍या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास केल्या जाणार्‍या या व्रताविषयीची अधिक माहिती या लेखातून जाणून घेऊया.

उद्देश 

मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे याकरिता केले जाते.

व्रत करण्याची पद्धत

‘या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू रहाते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते.

अनंत व्रत
अनंत व्रत

अनंतव्रताच्या दिवसाचे महत्त्व, तसेच या व्रतात दर्भाचा शेषनाग करून त्याचे पूजन करण्याचे कारण

अ. अनंताचे व्रत करण्याच्या दिवसाचे महत्त्व

१. ‘अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतनास्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस.
२. ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी, आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात.
३. श्री विष्णुतत्त्वाच्या उच्चाधिष्ठीत लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरींचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदु धर्मात योजना केली आहे.

आ. शेषाचे कार्य

शेषनाग
१. शेषदेवता श्री विष्णुतत्त्वाशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज या लहरींचे उत्तम वाहक समजली जाते; म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आढळते.
२. या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणार्‍या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या पूजाविधानाने या लहरी त्याच रूपात जिवाला मिळणे शक्य होते.

इ. क्रियाशक्तीचे मानवी देहाशी संबंधित कार्य

१. देहातील क्रियाशक्ती चेतनेच्या रूपात सजीव म्हणून पृथ्वीतत्त्वाच्या स्तरावर स्थूलदेहाचे जडत्व सांभाळत असते.
२. आपतत्त्वाच्या स्तरावर ती स्थूलदेहाचे आकारमान सांभाळते.
३. तेजाच्या स्तरावर हीच शक्ती चेतनेतील वेगात सातत्य ठेवते.

शेषरूपी देवता ही मानवी देहातील चेतनेला त्या त्या लहरींच्या रूपात क्रियेच्या स्तरावर संरक्षित करणारी असल्याने तिला या विधीत प्राधान्याने महत्त्व दिले जाते.

ई. दर्भाचे वैशिष्ट्य

दर्भाचे शेषरूपी प्रतीक

१. दर्भात क्रियेच्या स्तरावर तेजाच्या रूपातील शक्ती कार्यमान रूपात भ्रमण करत असते.
२. दर्भाच्या शेषरूपी प्रतीकातून ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या स्तरावरील विष्णुरूपी सर्पिलाकार लहरी दर्भाकडे आकृष्ट होऊन पूजास्थळी पसरण्यास साहाय्य होते.
३. या लहरींच्या स्पर्शामुळे, तसेच देहातील संक्रमणामुळे क्रियेच्या स्तरावर देह कृती आणि कर्म करण्यात संवेदनशील बनतो.’

अनंतव्रतातील १४ गाठींच्या दोर्‍यांचे महत्त्व

अनंतव्रतातील १४ गाठींचे दोरे

अ. ‘मानवी देहात १४ प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोर्‍याला १४ गाठी असतात.
आ. प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठींवर आवाहन केले जाते.
इ. दोर्‍यांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसर्‍या ग्रंथीपर्यंत वहाणार्‍या क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे.
ई. १४ गाठींच्या दोर्‍याची मंत्रांच्या साहाय्याने प्रतीकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्त्वाची दोर्‍यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारीत होतो.
उ. यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास साहाय्य मिळते.
ऊ. जिवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबळ टिकण्याचा कालावधी अल्प-अधिक होतो.
ए. त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारीत नवीन दोरे बांधले जातात.
ऐ. अशा रितीने जीवनात चेतनेला सतत श्री विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्यसंपन्न, तसेच प्रत्येक कृती आणि कर्म करण्यास पुष्ट बनवले जाते.’

अनंतपूजनात भोपळ्याचे घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवण्याचे कारण

अ. भोपळ्याचे वैशिष्ट्य

‘भोपळ्यातील आपतत्त्वात्मक रसात्मकता ही क्रियाशक्तीला चालना देणारी असते. तसेच भोपळ्यात बद्ध असणारे सूक्ष्म वायूकोष हे ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या लहरींना स्वतःत घनीभूत करणारे असतात.

आ. अनंतपूजनात भोपळ्याचे घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवण्याचे कारण

भोपळ्याच्या साहाय्याने बनवलेले घारगे आणि वडे यांत पूजास्थळी कार्यमान असणार्‍या क्रियाशक्तीच्या लहरी अल्प कालावधीत स्थानबद्ध होऊ शकतात. असा क्रियाशक्तीने भारित नैवेद्य ग्रहण केल्याने देहातही त्याच पद्धतीचे बलवर्धकतेला पूरक असे वायूमंडल निर्माण होण्यास साहाय्य मिळते.’

श्रीअंनत चतुर्दशी या व्रता बद्दल श्रीगुरु चरित्र मधील ४२ आ. मध्ये पुर्ण माहिती दिली आहे ती पाहू,

श्रीगुरू सायंदेवाला म्हणाले, "तू मला अनंतव्रताविषयी विचारले होतेस. या अनंतपूजेचे माहात्म्य काय आहे व ही अनंतव्रतपूजा पूर्वी कोणी केली होती ? या व्रतपूजेचे फळ काय याविषयी मी तुला सांगतो, ते ऐक. हे अनंतव्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते. त्या व्रतप्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. त्याचे असे झाले, कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते. त्या द्यूतक्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. युधिष्ठीर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता. पांडव वनसात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठविले; परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण केले. पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले. त्याची यथासांग पूजा केली. मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली -

"हे भक्तवत्सला, कृष्णनाथा, तुझा जयजयकार असो. हे कृष्णा, तूच या विश्वाचे उत्पत्ती-स्थिती-लय यास कारण आहेस. तूच ब्रम्हा-विष्णू-महेश आहेस. दृष्ट-दुर्जनांचा नाश व संतसज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस. पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस, मग आमची उपेक्षा का करतोस? तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग. तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहेत? आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल?"

सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, "तुमचे गेलेले वैभव परत मिळविण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल. सर्व व्रतांमध्ये अनंतव्रत अतयंत श्रेष्ठ व प्रभावी आहे. ते व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशायी विष्णू तेच माझे मूळ रुप आहे. मीच तो नारायण. दृष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेवकुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला. 

मीच जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे. मीच सर्वकाही आहे. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे. त्या अनंताची, म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा. या व्रताने तुमचे सर्वतोपरी लाक्यान होईल." "हे व्रत कोणत्या दिवशी करावे? कसे करावे? हे आम्हाला सविस्तर सांग" अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला, "भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षातील चतुर्दशीला ही व्रतपूजा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा कृतयुगातील आहे.

वसिष्ठगोत्री सुमंतु नावाचा एक ब्राम्हण होता. भृगकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती. त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव सुशीला. दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली. सुशीला अगदी नावासारखीच होती. ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे. घरातील केरवारा, सडासारवण करणे, अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे, देवपूजेची तयारी करणे, घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनःपूर्वक करीत असे. सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी श्रौतकर्मे थांबली होती, म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली. तिचे नाव कर्कशा. ती अगदी नावासारखी होती. ती अत्यंत दृष्ट बुद्धीची होती. ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे. सुशीला तिची सावत्र मुलगी. ती सुशीलेचा छळ करीत असे. सुशीला आता उपवर झाली. सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. सावत्रआई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते. यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे. आपल्या कन्येचा विवाह लौकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते. आणि तसा योग जुळून आला. एके दिवशी कौंडीण्य नावाचा एक  तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला. त्याने सुशीलेला पहिले व तिला मागणी घातली. सुमंतूला कौंडीण्य जावई म्हणून पसंत पडला.एका शुभमुहूर्तावर सुशीला आणि कौंडीण्य जावई यांचा विवाह झाला. सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशीला व कौंडीण्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले.

आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले. कौंडीण्याला सासुरवाडीस राहणे पसंत नव्हते. आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरविले. मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली. जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला, "कन्या आणि जावई जात आहेत. त्याच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर." हे ऐकताच ती कर्कशा संतापली. काही एक न बोलता ती. घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघांना मोठे आश्चर्य वाटले. सुमंतूला तर फार वाईट वाटले. त्याने स्वयंपाक घरात शोधाशोध केली. एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले. तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या-जावयाला निरोप दिला. 

सुशीला आणि कौंडीण्य एका रथात बसून निघाले. दुपारच्या वेळी कौंडीण्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबविला. कौंडीण्य अनुष्ठानासाठी गेला. सुशीला रथातच बसून राहिली. तिने सहज नदीच्या तीराकडे पहिले. तेथे काही स्त्रिया एकत्र जमून कसलीही पूजा करीत होत्या. त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या. निरनिराळ्या कलशांची पूजा करीत होत्या. सुशिलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले, "तुम्ही ही कसली पूजा करीत आहात ? या पूजेचा विधी कसा असतो ? ही पूजा केली असता काय फळ मिळते, हे सर्व मला सांगाल का?" त्या स्त्रिया म्हणाल्या, "बस. आम्ही तुला सर्व काही सांगतो. आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करावयाची असते. याला अनंतचतुर्दशी व्रत असे म्हणतात. ही अनंतपूजा दरवर्षी केली असता सर्वप्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंतस्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते. ही पूजा कशी करावयाची याचा थोडक्यात विधी असा : भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरुपी श्रीविष्णूची पूजा करावयाची असते.

हे एक कौटुंबिक व्रत आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवावयाचे असते. या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असेलेला एक रेशमाचा दोरा असतो. पूर्वी ज्याने हे व्रत चालविलेले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवावयाचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करावयाची असते. चौरंगावर दर्भाच्या बनविलेल्या सात फण्यांच्या शेषरुपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवावयाचा. त्याची पूजा करावी. चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण कलश ठेवावेत. त्यांची पूजा करावी. चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची 'अनंत' म्हणून मनात धारणा करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशांवर ठेवून पुरुषसूक्त मंत्रांनी त्यांची पूजा करावी. या अनंतपूजेत १४ या संख्येला फार महत्व आहे. अनंत दोरकाला चौदा गाठी असतात. नैवेद्याला १४ लाडू, करंज्या, अपूप इत्यादी पदार्थ असावेत. हे व्रत किमान चौदा वर्षे करावयाचे असते. चौदा वर्षे झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे. या व्रतामुळे सर्वप्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुखसमृद्धींची प्राप्ती होते. अनंतस्वरुपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते.

अनंतव्रताची अशी माहिती सांगून त्या सुशीलेला म्हणाल्या, "आजच अनंत चतुर्दशी आहे. तू आजच आमच्या बरोबर ही व्रतपूजा कर, त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझे मनोकामना पूर्ण होईल." सुशिलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांच्यासमवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली.

सुशीला आणि कौंडीण्य रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावतीसमान नगर लागले. हे कोणते नगर? हे कोणाचे नगर आहे? त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. "स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात! या नगराचे राज्य तुमचेच आहे." असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभवसंपन्न राजप्रसादात नेले. अनंतपूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते. एके दिवशी कौंडीण्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले, "हे हातावर तू काय बांधले आहेस?" सुशीला म्हणाली, "हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्यामुळे आपल्याला ही सुखसमृद्धी प्राप्त झाली आहे." हे ऐकताच कौंडीण्याला राग आला. तो म्हणाला, "आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानामुळे. मी केलेल्या खडतर तश्चर्येने. त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही." असे म्हणून त्याने तो अनंतदोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकला.

अनंताचा कोप झाला. अनंतव्रताचा अपमान झाला. कौंडीण्याची सगळी संपत्त्ती नष्ट झाली. चोरांनी सगळी संपत्ती चोरून गेली. त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले. सुशिलेला अतिशय दुःख झाले. ती शोक करू लागली. प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला. सुशीला आणि कौंडीण्य एकवस्त्रानिशी वनात भटकू लागली. कौंडीण्याचे डोळे उघडले. त्याचा गर्व नाहीसा झाला. पश्चातापदग्ध झालेला तो शोक करीत, अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला. जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला,"तुम्हाला अनंत कोठे दिसला का?" प्रत्येकजण 'नाही' असे उत्तर देत असे. त्या वनात कौंडीण्याला एक आम्रवृक्ष दिसला. त्या वृक्षावर खूप फळे होती, पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता. कौंडीण्याने त्या वृक्षाला विचारले, "तू भगवान अनंताला पाहिलेस का ?" वृक्ष म्हणाला, "नाही. मी पाहिला नाही. तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा." पुढे त्याला एक बैल दिसला. त्याच्यापुढे भरपूर चारा होता, पण त्याला तो खाताच येत नव्हता. "तू अनंताला पाहिलेस का ?" असे कौंडीण्याने त्याला विचारले. त्याने 'नाही' असे सांगितले. कौंडीण्य पुढे गेला. त्याला दोन सरोवरे दिसली, पण त्यातले पाणी कुणीच पीत नव्हते. त्यांनीही "आम्ही अनंत पाहिला नाही. तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत ही परिस्थिती देवाला सांगा." असेच सांगितले. पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला. ते दोघे नुसतेच उभे होते. कोणी काही बोलत नव्हते. काही सांगत नव्हते. तेव्हा कौंडीण्य दुःखी, कष्टी झाला. जमिनीवर पडून शोक करू लागला. 'अनंत, अनंत' अशा हाका मारू लागला. त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तो वृद्ध ब्राम्हणरूपाने तेथे प्रकट झाला. कौंडीण्याने त्याच्या पायांवर डोके ठेवून विचारले, "तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का?" त्यावेळी 'मीच तो अनंत' असे तो ब्राम्हण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले. त्यांनी कौंडीण्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले. भगवान अनंत विष्णूने कौंडीण्याला वर दिला. तू धर्मशील होशील. तुला कधीही दारिद्र्य येणार नाही. तू शाश्वत वैकुंठलोकात राहशील." श्रीकृष्ण म्हणाला, "भगवान अनंत विष्णूने कौंडीण्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष, बैल, दोन सरोवरे, गाढव, हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का?" असे विचारले असता तेव्हा विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले.

भगवान विष्णू म्हणाले, "तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राम्हण होता; परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्याने कुणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली. त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले. तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता. त्याने बरेच दान केले होते; पण त्याला त्या दानाचा गर्व होता, त्यामुळे आता त्याच्यापुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते. तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या. दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकीनांच दान देत असत. त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग नाही झाला, म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पीत नाही. तुला जो गदर्भ दिसला तो तुझा क्रोध होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला. तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व. तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला. तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास. सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस, गर्व, अहंकार, देवाधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले. आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा व अनंतव्रत कर, म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल. मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसु नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील." कौंडीण्याला सगळे पटले. त्याचा गर्व नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशीलेसह अनंतचतुर्दशीचे व्रत केले. त्याला अनंत वैभव प्राप्त झाले.
  
ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, "अनंत व्रताचा महिमा हा असा आहे. या व्रतामुळे कौंडीण्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल."

ज्या अर्थे श्रीगुरुंनी हे वृत करण्यास सांगितले त्यानुसार हे किती प्रासादिक आहे याची दत्तभक्तांना खात्री पटेल.