श्री दत्तावतारी माणिकप्रभु

श्री दत्तावतारी माणिकप्रभु
श्री दत्तावतारी माणिकप्रभु

जन्म: २२/१२/१८१७, मोगलाईत, निजाम राज्यात लाडवन्ती कल्याण गावी,  अश्वलायन देशस्थ ब्राह्मण, 
आई/वडील: बायजाबाई/मनोहर नाईक
कार्यकाळ: १८१७ ते १८६५
संप्रदाय: सकलमत संप्रदाय
गुरु: दत्तावतार
समाधी: मार्गशीर्ष शुद्ध ११, शके १८६५,  २९ नोव्हेंबर १८६५, गिता जयंतीच्या दिवशी माणिक नगर येथे

जन्म व बालपण 

माणिक प्रभू हे कल्याणीच्या मनोहर नाईकांचे पुत्र. आश्वलायनशाखीय देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण. त्यांचा जन्म मार्गशीर्ष शु. १४, श. १७३९ या दिवशी झाला. त्यांची माता-पिता दोघेही परमार्थप्रवण आणि सत्त्वसंपन्न असल्यामुळे ‘शुद्ध बीजापोटी’ या रसाळ फळाचा उद्भव झाला. माणिक प्रभू हे दत्तात्रेयाचे चौथे अवतार समजले जातात.

माणिकप्रभूंचा हा दत्तावतार हिंदू व मुसलमान धर्मात सारखाच लोकप्रिय आहे. दोन्ही धर्माच्या लोकात त्यांचे अनेक भक्त आहेत. हा अवतार मोगलाईत निजाम (हैदराबाद) राज्यात, कल्याण गावी मनोहर नाईक व बायजाबाई या दत्तभक्त दांपत्याच्या पोटी झाला. श्रीदत्त भगवानांच्या आशीर्वादाने त्यांना तीन मुलगे झाले.
१) हणमंत (दादासाहेब
२) माणिकप्रभु व
३) नरसिंह (तात्यासाहेब)

मनोहर नाईकांना दृष्टान्त झाल्याप्रमाणे श्रीदत्तप्रभूंनी माणिकप्रभूंच्या रुपाने या दांपत्याच्या पोटी सन १८१७ मध्ये अवतार घेतला. बारशाच्या दिवशी त्या बालकाचे नाव ‘माणिकप्रभु’ ठेवण्यात आले. त्याचे अनुपम तेज पाहून आजूबाजूचे लोक त्याच्या दर्शनाला येत असत.

कल्याण गावातील अधिकारी नबाब साहेबांची मनोहपंतांच्या कुटुंबावर पूर्ण कृपादृष्टी होती; त्यामुळे माणिकप्रभूंची व्यवस्था लहानपणापासून एखाद्या राजयोग्याप्रमाणे होती. त्यांच्या अंगावर हजारो रुपयांचे हिरे माणकांचे दागिने असत. त्यांच्या रक्षणासाठी पाच सहा अरब रोहिले शिपाई नबाबांनी ठेवले होते. पाचव्या वर्षानंतर श्रीप्रभूंची खेळकर वृत्ती वाढत गेली. कल्याण गावात माणिकप्रभू नावाचा दत्ताचा अवतार झाला आहे अशी बातमी गावभर पसरली. दर गुरुवारी लोक दर्शनाला येऊ लागले. सातव्या वर्षी श्रीप्रभूंची मुंज मोठ्या थाटाने झाली. सर्व ब्रह्मकर्म श्रीप्रभूंना मुखोद्गत होते. हा चमत्कार पाहून शास्त्री, पंडितही थक्क होत असत.

प्रभु कधी शाळेत गेले नाहीत; परंतु लहानपणापासूनच त्यांना तेलगू, कानडी, फारशी, उर्दू, संस्कृत आणि मराठी इतक्या भाषा लिहिता, वाचता व बोलता येत असत. चार वेद, सहा शास्त्रे व उपनिषदे यातही ते पारंगत होते.

हे साक्षात ईश्वरी अवतार आहेत, अशी त्यांच्याविषयीची श्रद्धा त्यांच्या लहानपणापासूनच पसरत चालली होती. त्यांचे दर्शन, स्पर्शन आणि भाषण अमोघ असल्याचा प्रत्यय अनेकांना येत असे. त्यांना कानडी, फारशी, उर्दू, संस्कृत व मराठी या भाषा उत्तम तर्‍हेने अवगत होत्या. शास्त्रचर्चेंत पंडितही त्यांच्यापुढे फिके पडत. ‘जणू वयसेचिया गावां न जातां’ बाळपणीच सर्वज्ञतेने त्यांना वरले होते. अभिजात सिद्धींचा प्रत्यय अगदी लहानपणापासूनच येऊ लागल्यामुळे त्यांच्या साधुत्वाचा डंका लवकरच सर्वत्र झडू लागला. भालकी गावाजवळील एका जंगलांतील गुहेत ते एक वर्षभर समाधी लावून बसले होते. हुमणाबादेजवळील अरण्यात त्यांनी एका बेलाच्या झाडाखाली निवास केला. तिथेच त्यांच्या नावाने ‘माणिकनगर’ वसले.

श्री माणिकप्रभू मंदिर माणिक नगर
श्री माणिकप्रभू मंदिर माणिक नगर

सर्व दत्तावतारांत व दत्तोपासकांत माणिक प्रभू हे फार ऐश्वर्यसंपन्न असे राजयोगी होते. लहानपणापासूनच त्यांच्या अंगावर सोने, मोती, हिरे, माणके यांचे बहुमोल अलंकार असत. माणिक प्रभूंची गादी म्हणजे गायनकलेचे एक श्रेष्ठ पीठ होते. प्रभूंच्या दरबारात संगीताच्या मजलशी नेहमी रंगत असत. स्वत: माणिक प्रभूंनी अनेक रागबद्ध रसाळ पदांची रचना केली आहे.

माणिकप्रभूंचे कार्य  

माणिक प्रभूंच्या दत्तोपासनेच्या परंपरेला ‘सकलमत संप्रदाय’ असे नाव होते. नावावरूनच हे स्पष्ट आहे की, या संप्रदायात समन्वयाचा मोठा प्रयत्न झालेला आहे. या संप्रदायाचा असा सिद्धांत आहे की, जगातील सर्व धर्म व संप्रदाय हे त्यांच्या त्यांच्या अनुयायांना परमेश्वराची प्राप्ती करून देणारे आहेत. तेव्हा प्रत्येकाने अन्य संप्रदायांना विरोधी वा त्याज्य न मानता समन्वयाच्या उदार दृष्टीने त्यांतील सत्त्वांश ग्रहण करावा. या संप्रदायाचे उपास्य श्रीचैतन्यदेव ( आत्मदेव-या विश्वात भरून उरलेले चैतन्यतत्त्व) हे आहे. या संप्रदायांत श्रीदत्तात्रेयाचे स्वरूप मधुमती नामक शक्तिसहित आराधिले जाते. ‘‘हा संप्रदाय अद्वैती व सर्वव्यापी असल्यामुळे अमक्याच एका देवतेचा मंत्र घेतला पाहिजे, असा आग्रह मुळीच नाही. कारण आपले सद्गुरूच नाना वेशांनी या जगात नटलेले आहेत, सर्व स्वरूपे त्यांचीच आहेत; म्हणून बाह्यत: भेद दिसला, तथापि वस्तुत: सर्व देवता एकरूपच आहेत, असा निश्चय ठेवून मंत्र घेतल्यास बाधक होणार नाही.’’

श्री माणिकप्रभू मंदिर माणिक नगर
श्री माणिकप्रभू मंदिर माणिक नगर

श्रीप्रभूंचे आंधळ्या पांगळ्यांवर, गरिबांवर जास्त प्रेम असे. हिंदू-मुसलमान दोन्ही भक्तांवर ते सारखेच प्रेम करीत. एके दिवशी कोणालाही न सांगता प्रभू घराबाहेर पडले. हुमणाबादपासून २० कोस दूर असलेल्या ‘मंठाळ’ गावात ते पोहोचले. हे कळताच श्रीप्रभूंचे वडील व आई तात्यासाहेबांना बरोबर घेऊन श्रीप्रभूंना भेटले. श्रीप्रभु आईवडिलांना म्हणाले की, श्री दत्तात्रेयांच्या साक्षात्काराप्रमाणे आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला. तुमचे मनोरथ पूर्ण केले. व्रतबंध होईपर्यत तुमच्या जवळ राहिलो. आता आम्हास सर्वत्र संचार करून भक्त जनांचा उद्धार करून अवतारिक कृत्ये केली पाहिजेत. तरी आमच्याविषयी दु:ख न करता घरी जाऊन दत्तसेवा करून कालक्रमणा करावी. मंठाळच्या अरण्यात अंबील कुंडाजवळील एका गुहेत ते गुप्तरीतीने राहिले. ही गुहा अद्याप तेथे असून तिला माणिकप्रभूंची गुहा असे म्हणतात.

नंतर श्रीप्रभु घरी आले लोकांना ही बातमी कळताच लोक दर्शनाला येऊ लागले. श्रीप्रभूंपुढे रुपयांचा ढीग पडू लागला. श्रीप्रभू ते सर्व पैसे गोरगरीबांना वाटून टाकत. पुढे पाच वर्षांनी श्रीप्रभूंच्या वडिलांचे मनोहरपंताचे निधन झाले. श्रीप्रभूंनी दादासाहेबांकडून उत्तरक्रिया करविली. नंतर मैलार गावी जाऊन त्यांच्या कुलदैवताची खंडोबाची महापूजा केली, त्याचे दर्शन घेतले व हजारो रुपयांचे वस्त्रालंकार देवास अर्पण केले. मैलारहून पुन: आपल्या गावी कल्याणला आले. त्या वेळी धाकटे बंधू तात्यासाहेब यांचे लग्न लावून दिले.

या उदार समन्वयदृष्टीने माणिक प्रभूंच्या अनुयायी वर्गात हिंदूंबरोबर मुसलमानांचाही मोठा भरणा होता. हिंदूंतील लिंगायत पंथही त्यांना मानीत असे. ‘‘अतिथि-पांथस्थ, तडी-तापडी, पंगु- रोगी या सर्वांना प्रभूंचे संस्थान हे एक विश्रामस्थान झाले होते. गरिबांचे दारिद्र्य जावे, निपुत्रिकांस संततिलाभ व्हावा, रोग्यांना आरोग्य प्राप्त व्हावे, संसारक्लान्त जीव समाधान पावावे,’’ असे त्यांच्या परिसरांतील वातावरण होते. जंगमांचा संक्रांतिमहोत्सव, मुसलमानांचा मोहरम आणि ब्राह्मणांची दत्तजयंती या उत्सवांसाठी त्यावेळी माणिकनगरांत प्रतिवर्षी तीस लाखांवर रक्कम खर्च होई !

असे योगेश्वर कृष्णासारखे दिव्य जीवन व्यतीत करून माणिकप्रभूंनी मार्गशीर्ष शु. ११, श. १७८७ या दिवशी जिवंत समाधी घेतली. त्यांच्या अवतारकार्यामुळे दत्त संप्रदायाच्या प्रसाराला आणि प्रगतीला फार मोठी गती मिळाली. समन्वयाच्या वृत्तींतून निर्माण झालेली दत्तदेवता जणू समन्वयाचे प्रात्यक्षिक आचरण्यासाठी या भूतळावर माणिक प्रभूंच्या रूपाने अवतरली आणि तिने योग व भोग यांचा सुमेळ साधून दाखविला.

श्रीप्रभूंनी पुष्कळ प्रवास केला व चमत्कार केले. मुधोळ गावच्या पहाडातील गुहेत ते समाधी लावून बसत असत. मुधोळ संस्थानात फिरत असता एकदा एका वडार्‍याचा सर्पदंशाने मृत्यु झाला. श्रीप्रभूंनी आपल्या कृपाशीर्वादाने त्याचे प्राण वाचवले. एक ब्राह्मण कुटुंब श्रीप्रभूंच्या दर्शनासाठी येत होते. वाटेत चोरांनी त्यांना लुटले. ते श्रीप्रभूंची प्रार्थना करू लागले. चोरांनी ब्राह्मणाला मारण्यासाठी शस्त्र उगारले. पण त्यांचे हात वरचे वर थिजले. चोरांनी श्रीप्रभूंची प्रार्थना केली. ते श्रीप्रभूंना शरण आले. नंतर त्यांचे हात मोकळे झाले. श्रीप्रभूंनी त्या ब्राह्मण कुटुंबाचे कोटकल्याण केले.

श्रीप्रभु तेथे एका शिवालयात राहू लागले. सरकारी अधिकार्‍यांनी तेथे येऊन शिवालय व आजूबाजूची जागा स्वच्छ केली. श्रीप्रभूंच्या राहण्याची व्यवस्था केली. पाच दिवस मोठा समारंभ झाला. सरकारने कोठी लावून दिली. आलेल्या भक्तांची व्यवस्था केली. अशा रीतीने ‘माणिकनगर’ ची रचना झाली. कल्याणहून मातोश्री व तात्यासाहेब तेथे राहण्यासाठी आले, पण प्रभूंनी त्यांना परवानगी दिली नाही. आठवड्यातून फक्त एक दिवस शनिवारी किंवा गुरुवारी येण्याची आज्ञा दिली. इतर आंधळे, पांगळे, यात्रेकरु, सेवेकरिता राहिलेले रुग्ण यांची व्यवस्था भांडारखान्यातून केली. भक्तांनी श्रीप्रभूंची गादी स्थापन केली. भक्तांच्या आग्रहाखातर श्रीप्रभू त्या गादीवर बसू लागले. जवळच दत्तगादीही स्थापन केली होती. तेथेही नेहमी भजन, कीर्तन, प्रवचन होत असे.

माणिक प्रभूंच्या संप्रदायात, 

‘श्रीभक्तकार्यकल्पद्रुम-गुरुसार्वभौम-श्रीमदराजाधिराज-योगीमहाराज - त्रिभुवनानंद - अद्वैत - अभेद - निरंजन - निर्गुण - निरालंब - परिपूर्ण - सदोदित - सकलमतस्थापित - श्रीसद्गुरूमाणिकप्रभुमहाराज की जय !”

असा जयघोष रूढ आहे. त्यांची गादी त्यांच्या भावाच्या वंशाकडे आजहि चालू आहे. त्यांच्या गादीच्या परंपरेत श्री मनोहर माणिक प्रभू आणि श्री मार्तंड माणिक प्रभू हे दोन पुरुष विशेष प्रसिद्धी पावले. त्या दोघांचीही अनेक मधुर पदे आहेत. माणिक प्रभुंच्या पद-संभारात कृष्णपर पदांचा विशेश भरणा आहे. त्यांची पदे मराठी, हिंदी आणि कानडी अशी तीनही भाषांतील आहेत. त्यांच्या गीतांत मीरेच्या पदांसारखी माधुरी आहे. लोक त्यांना दत्तावतार समजतात, तरी ते मात्र म्हणतात :

श्री दत्तावतारी माणिकप्रभु
श्री दत्तावतारी माणिकप्रभु

श्रीगुरु माझा दत्त दयाघन रे । अंतरचालक त्रिभुवनपालक । 
सकळांसी जीवन रे । अखंडअगोचर व्याप्त चराचर ।  
शाश्वत चिदघन रे ॥ माणिकदासासि मिळविले स्वरूपासी ।
देऊनि उन्मन रे ॥

या उन्मावस्थेत माणिक प्रभू म्हणतात :

आम्ही येथींचे तेथींचे । वेद जाणती नेतीचे ।
आम्हां नाही येणे जाणें । आम्ही पूर्णातीत पूर्ण ।
आम्हां गांव ठाव नाहीं । ठावातींत सर्वांठायीं ॥
आमचें नाम माणिक नोहे । आम्ही आम्हातीत होय ॥

श्रीप्रभूंच्या मनात कोणताही राजकीय हेतू नव्हता. त्यांच्या मनात केवळ परोपकार व दानधर्म करण्याचाच हेतू होता. वडील बंधू दादासाहेब व मातोश्री बयाबाई यांना निर्वाणाच्या वेळी ब्रह्मज्ञान दिले व त्यांना मुक्ती दिली. पुढे तात्यासाहेबांनी स्वत: गुरुचरित्राचे पारायण करून पुष्कळ दानधर्म केला. भजनपूजनादी सत्कर्मे करुन सर्वांचा निरोप घेऊन प्रभूंच्या चरणावर मस्तक ठेवले आणि मग योगासन घालून समाधी घेतली. श्रीप्रभूंनी त्यांचे चिरंजीव अप्पासाहेबांकडून सर्व उत्तरविधी शास्त्रोक्त करविला व हजारो रुपये दानधर्म केला.

श्री समर्थ अक्कलकोट स्वामी एकदा प्रभूंच्या भेटीला आले. प्रभूंची व त्यांची एकांतात भेट झाली, चर्चा झाली. नंतर एकदा शृंगेरीचे जगद्गुरु श्रीशंकराचार्य श्रीप्रभूंच्या भेटीस आले होते. जगद्गुरूंना सिंहासनावर बसवून त्यांची तात्यासाहेबांकडून यथासांग पाद्यपूजा करवली. त्यांना वस्त्रे, भूषणे, हत्ती, घोडे, पालख्या सर्व अर्पण केले. भोजनसमारंभही मोठ्या थाटाने झाला, त्यांना निरोप देताना श्रीप्रभू त्यांना पोहोचवण्यासाठी दोन कोसपर्यंत गेले होते.

श्री माणिकप्रभू समाधी मंदीर
श्री माणिकप्रभू समाधी मंदीर

यानंतर श्रीप्रभूंनी समाधी घेण्याचा निश्चय केला. समाधीचा दिवस मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा निश्चित केला. श्रीप्रभूंनी आपल्या तीन चार विश्वासू भक्तांना सांगितले की, समाधी घेतल्यानंतर चार दिवसांनी ही गोष्ट जाहीर करावी. कारण मुसलमान भक्त भावना विवश होऊन समाधीच्या कामात विघ्न आणतील. श्रीप्रभूंनी अप्पासाहेबांकडून आपली पूजा करवून घेतली. गळ्यात हार घातला. श्रीप्रभूंनी तोच हार अप्पासाहेबांच्या गळ्यात घातला त्यांना आशीर्वाद दिला. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी सन १८६५ सद्गुरू श्रीमाणिकप्रभू समाधिस्थ झाले.

‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ अशी सर्वांनी गर्जना केली व समाधी विवराला चिरा लावून समाधी विवर बंद केले. श्रीप्रभूंच्या विरहाने भक्तांच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. नंतर चार दिवसांची श्रीप्रभूंच्या समाधीची गोष्ट प्रकट करण्यात आली व भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात आले. पुढे सोळाव्या दिवशी अप्पासाहेबांना त्यांच्या गादीवर बसवले.

सकलमताचार्य, अर्थात श्री माणीक प्रभू

ईश्वरी तत्त्वासमोर पंथ-संप्रदाय, जातपात, भेदाभेद, मंगल-अमंगळ, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा सर्व गोष्टी गौण आहेत हे सिद्ध करीत प्रभूंनी प्रमुख व प्रचलित धर्मातील जे जे उत्तम व उदात्त आहे त्यांचा स्वीकार करून त्यायोगे सकलमत संप्रदायाची स्थापना केली. ‘सकल’ म्हणजेच सर्वांच्या मतांना सामावून घेणारा संप्रदाय. कर्म, भक्ती, योग व ज्ञान या चारही मार्गांचा समुच्चय जिथे होतो असा हा संप्रदाय.

माणिकप्रभूंचे ‘ऐश्वर्य’ हा त्या काळी सर्वसामान्यांनाच नव्हे, तर राज्यकर्त्यांनादेखील अचंबित करणारा विषय होता. प्रभूंच्या समग्र अवतारकार्यामध्ये सतत आणि सर्वत्र संपत्तीचा ‘ओघ’ अविरत वाहत असल्याची वर्णने वाचावयास मिळतात. सन १८५७ च्या बंडातील अग्रणी नानासाहेब पेशवे यांना देखील माणिकप्रभूंनी त्यांच्या एका भक्ताकरवी आर्थिक मदत केल्याची घटना विदित आहे.

प्रभूंचे आगमन जिथे होत असे अथवा जिथे त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होत असे तेथील वातावरण ‘नित्यश्री नित्य मंगल’असे. प्रभूंचे आगमन झाले म्हणजे भक्तांची गर्दी उसळत असे. बाप्पाचार्य लिखित ‘माणिकप्रभाकर’ तसेच रामचंद्रबुवा सोलापूरकर-जीवनदास-गणेश टोळे यांनी लिहिलेल्या तत्कालीन ‘श्रीप्रभूचरित्रां’मध्ये वरील वर्णने तपशीलवार आली आहेत. राजेमहाराजांपासून अमीर-उमराव-अंमलदारांपर्यंत बडय़ा हस्ती प्रभूंसमोर नतमस्तक होत असत. प्रभुदर्शनासाठी तिष्ठत राहणाऱयांमध्ये अनेक बडे सरदार आणि धनवंतांचा समावेश असे. या धनिकांकडून प्रभूंसमोर दानस्वरूपात जी संपत्ती येत असे त्या सर्व संपत्तीचा विनियोग प्रभुदरबारात गोरगरीब आणि अडलेल्या-नाडलेल्या लोकांसाठी केला जात असे. दीनदुबळ्यांस आधार, निर्धनास धन, भुकेलेल्यास अन्न आणि ज्ञानार्थीयांस ज्ञान या रीतीने ज्याला जे हवे ते देण्याची ताकद प्रभूंच्या विशाल अंतःकरणात होती.

असे असले तरीही ऐश्वर्य ल्यायलेला हा सत्पुरुष स्वतः मागून आणलेल्या ‘भिक्षेच्या झोळीत’ जे काही मिळेल त्यावर गुजराण करीत असे. लसणाची चटणी आणि भाकर हा त्याच्या तृप्ततेचा परमावधी होता. कुबेरासही हेवा वाटावा अशी श्रीमंती वागविणारा हा उपभोगशून्य स्वामी अंतर्यामी अतिशय विरक्त आणि अनासक्त होता. माणिकप्रभूंचे राजयोगी रूप केवळ बाह्यकळेपुरते सीमित होते. साक्षात निर्विकल्प, निर्विकार, निर्लोभी या शब्दांना अर्थ प्राप्त व्हावा इतकी विरक्तता प्रभूंमध्ये नित्य वास्तव्यास आली होती.

प्रभूंचे अवतारकार्य परमोच्च स्थानी बहरले असताना महाराष्ट्रामध्ये श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट) श्रीदेवमामलेदार (सटाणा), श्रीअण्णाबुवा (मिरज), श्रीकृष्णसरस्वती (कोल्हापूर), श्रीधोंडीबुवा (पळूस) आपापल्या प्रांतात स्थिरस्थावर होते आणि श्रीगजानन महाराज (शेगाव), श्रीपंत महाराज (बाळेकुंद्री), श्रीटेंबेस्वामी, श्रीबीडकर महाराज आदी सत्पुरुषांचे अवतारकार्य घडू पाहत होते. शिर्डीकर बाबासाई आणि ‘ब्रह्मचैतन्य’ गोंदवलेकर या दोघांनाही त्यांच्या कुमारवयात श्रीमाणिकप्रभूंचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. प्रभूंनी समाधीत प्रवेश केल्यानंतर अनेक सत्पुरुष अवतरले अन् स्थिरावले असले तरीही अवधूत संप्रदायाचे ‘राजस’ स्वरूप आणि ‘ऐश्वर्य’ प्रभूंनी ज्या दिमाखाने पुढे आणले तसे श्री नारायण महाराज (बेट-केडगाव) यांचा अपवाद वगळता अन्य कुणाकडूनही झाले नाही.

संतसत्पुरुषांच्या ठायी असलेले दैवी सामर्थ्य, त्यांचे विचार-शिकवण, तसेच त्यांचे लीला-चमत्कार बहुतकरून सारखेच असतात. मात्र त्यांनी स्वीकारलेल्या अध्यात्ममार्गातून त्यांच्यातील वेगळेपण जाणवते. सत्पुरुषांठायी सदैव जागृत असणारं अलौकिक तत्त्व आणि मानवी देह धारण केल्यामुळे येणाऱया मर्यादा माणिकप्रभूंमध्येही दिसणे स्वाभाविक होते. तरीही त्यांचे अवतारकार्य संतमांदियाळीमध्ये उठून दिसते ते ‘सकलमतसंप्रदाय’ स्थापनेतून.

‘सकल’ म्हणजेच सर्वांच्या मतांना सामावून घेणारा संप्रदाय. कर्म, भक्ती, योग व ज्ञान या चारही मार्गांचा समुच्चय जिथे होतो असा हा संप्रदाय. ‘श्रुतीधर्म रक्षुनी सकल मतांते वंदा। सर्वांतरी आत्मा नको कुणाची निंदा।’ असा उत्तुंग आशावाद प्रकट करणारा संप्रदाय प्रभूंनी निर्माण केला. ईश्वरी तत्त्वासमोर पंथ-संप्रदाय, जातपात, भेदाभेद, मंगल-अमंगळ, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा सर्व गोष्टी गौण आहेत हे सिद्ध करीत प्रभूंनी प्रमुख व प्रचलित धर्मातील जे जे उत्तम व उदात्त आहे त्यांचा स्वीकार करून त्यायोगे सकलमत संप्रदायाची स्थापना केली.

श्रीदत्तात्रेय हे श्रीमाणिकप्रभूंचे आराध्य दैवत. श्रीदत्ताने बऱयावाईटाची सांगड घालून अनेकविध गुरू केले, त्याच धर्तीवर श्रीमाणिकप्रभूंनी सकलमत संप्रदायाची स्थापना केली. मधमाशी ज्या सापेक्षतेने अनेकविध फुलांतील मध गोळा करते त्याच पद्धतीने सर्व संप्रदायांतील उत्तमोत्तम गोष्टींचा स्वीकार करून सकलमत संप्रदायाची ध्येयधोरणे निश्चित करण्यात आली. श्रीदत्त आणि मधुमती शक्ती यांना प्रमाण मानून सकलमत संप्रदायाची गादी स्थापन करताना प्रभूंनी त्यावर विशिष्ट देवतेची स्थापना न करता चैतन्यदेवाची स्थापना केली. हा चैतन्यदेव म्हणजे प्रत्यक्ष सगुण स्वरूपातील दैवत नसून तुमच्या-आमच्या आणि प्रत्येकाच्याच मनातील आराध्य देवतेचे चैतन्य आहे. प्रभूंच्या समाधीच्या मागील बाजूस चैतन्यदेवाची गादी स्थापन करण्यात आली आहे. प्रभू समाधीचे दर्शन घेताना आपणांस आपल्या आराध्य दैवतास त्या गादीवर स्थानापन्न करू देण्याइतका ‘उदार’मतवाद हे सकलमत संप्रदायाचे वैशिष्टय़ आहे.

प्रभूंच्या या सर्वसमावेशक संप्रदायाची धुरा पुढे त्यांचे पुतणे श्रीमनोहरप्रभू व श्रीमार्तंडप्रभू या सत्पुरुषांनी चालविली. त्यांच्या पश्चात या संप्रदायाला श्रीशंकरप्रभू व श्रीसिद्धराज प्रभू यांनी जोपासले आणि वृद्धिंगत केले. सध्या ‘सकलमताचार्य’ म्हणून श्रीज्ञानराज यांच्या खांद्यावर सकलमत संप्रदायाची धुरा आहे. श्रीमार्तंड माणिकप्रभूलिखित ‘ज्ञानमार्तंड’ हा संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ आहे.

येणाऱया प्रत्येक भक्ताला ‘माऊली’ रूपाने स्वीकारून, समानतेचा पुरस्कार करून, जगताला स्वतःचा संसार मानून, वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी संजीवन समाधीमध्ये प्रवेश करणाऱया या अलौकिक सत्पुरुषाचा विरह सहन न झाल्यामुळे शेकडो भक्तांनी स्वतःच्या छातीत सुरे खुपसून घेतले. दुःखातिरेकाचा आवेग सहन न झाल्यामुळे शेकडोंनी आत्मघात केला. कित्येकांनी आपली डोकी रक्तबंबाळ होईतोवर भिंतीवर आपटून घेतली. अशा त्या कनवाळू सत्पुरुषाबद्दल किती लिहावं हा प्रश्न आहे. भक्तांच्या प्रपंचासाठी परमार्थाचे शिंपण घालणारा श्रीमाणिकप्रभू नावाचा ‘अवलिया’ प्रातःस्मरणीय आणि वंदनीय होता, आहे आणि यापुढेही नित्य राहील.

‘जय गुरू माणिक’