श्री हरिबाबा मंदिर, पणदरे

सद्गुरू श्री हरिबाबा महाराज मंदिर पणदरे
सद्गुरू श्री हरिबाबा महाराज मंदिर पणदरे

श्री सदगुरू हरिबाबा महाराज

श्रीसद्गुरु हरिबाबा हे सन १९३८ साली पणदरे गाव आणि परिसरात वावरत असत. इथे वावरताना अनेकांनी त्यांना पाहिलं, परंतु ‘वरुनी वेष बावळा । परि अंतरी नाना कळा‘ या उक्तीप्रमाणे वावरणार्‍या हरिबाबांचे थोरपण फारसं कोणाला कळालं नाही. कधीतरी कुणाकडे खायला भाकरी मागावी आणि कधी कुणाच्या ओसरीत, तर कधी मंदिरात झोपी जावं असं वागणार्‍या हरिबाबांना आदर आणि भक्ती मिळणं तर सोडाच, पण घरातून हाकलून देणं, जेवणाच्या पंगतीतून उठवून लावणं अशी अपमानकारक वागणूकही सहन करावी लागली. अशा वाईट वागणुकीमुळे हरिबाबांना काही फरक पडला नाही, पण अशी वागणूक देणार्‍यांना मात्र फरक पडला. काही कुटुंबीय व वास्तू शापित झाल्या.

’चमत्कार तिथं नमस्कार’ या नियमाप्रमाणे श्री हरिबाबांनी स्वतःच्या सामर्थ्याची प्रचिती द्यायला सुरुवात केल्यानंतर मात्र त्यांच्या चरणाशी येणार्‍यांची संख्या वाढू लागली. पणदरेनिवासी श्री. बापूजी उंडे यांच्या वाडयाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या कमानीवर श्री हरिबाबा तीन दिवस सलगपणे उभे राहिले होते. त्यावेळी श्री. बापूजी उंडे यांनी त्यांना कांदा, भाकरी आणि पिठलं हं अगत्यपूर्वक खायला दिलं आणि हाच तो अमृत योग होता उंडे घराण्याला श्री हरिबाबांचा कृपाप्रसाद प्राप्त होण्याचा. श्री. बापूजी उंडे यांचे नातू श्री. शंकररावजी उंडे यांनी अतिशय श्रध्देनं आणि भक्तीनं आपल्या आजोबांनी दिलेला, श्री हरिबाबांच्या भक्तीचा वारसा सांभाळला आणि वाढवलाही. श्री. शंकररावजी उंडे यांचे सुपुत्र श्री. श्रीपाद उंडे हेही बाबांचे परमभक्त. एका अधिकारी सत्पुरुषाला झालेला दृष्टांत प्रमाण मानून त्यांनी आपल्या वाडयापासून जवळच असलेल्या आपल्या मालकीच्या भूखंडावर श्री हरिबाबांचं मंदिर उभारण्याचा मानस बोलून दाखवताच गावकरी‍यांनी आणि उंडे परिवारातल्या काही सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि सहकार्य करण्याची इच्छाही व्यक्त केली. अनेकांनी सक्रिय हातभारही लावला. पाहता पाहता मंदिर आकार घेऊ लागले. आज श्री उंडे परिवारातील सदस्य व प्रामुख्याने श्रीपाद उंडे यांचे कुटुंबीय व बंधु भगिनी वत्यांचे कुटुंबीय यांचे फार मोठे योगदान आहे. आजच्या बांधकाम दरानुसार सादर प्रकल्प फार मोठ्या खर्चाचा आहे पण अनेक ग्रामस्थ यास मदती साठी सरसावले, अनेक परिवार सदस्याने तन मन व धनाने हातभार लावला.

’सत्यसंकल्पाचा वाली परमेश्‍वर असतो’ या न्यायाप्रमाणे २ फेब्रुवारी २००४ रोजी मंदिराचं भुमिपूजनही झालं. मात्र मंदिर उभारणीसाठी आर्थिक नियोजन ही सगळयात मोठी बाब होती. त्यादृष्टीनं जनजागृती करुन आणि हळूहळू भाविकांकडून देणगीचा ओघ सुरु झाल्यानंतर २९ ऑक्टोबर २०१४ रोजी मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. परमेश्‍वरी कार्य हे परमेश्‍वराच्या कृपेनंच सिध्दीला जात असलं तरी भक्तांच्या श्रध्देची कसोटी पाहिली जाणं हा त्यातला अविभाज्य भाग असतो. त्याप्रमाणे मंदिर उभारायचं ठरल्यापासून वेगवेगळया प्रकारच्या अडचणी येत राहिल्या. परंतू श्री हरिबाबांच्या कृपेनं त्यातून मार्ग निघत गेला. सन २०१७ मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं तेव्हा त्यासाठी वेगवेगळया स्वरुपात योगदान देणार्‍या असंख्य भक्तांना अतिशय समाधान वाटलं.

१८ जानेवारी २०१७ रोजी पुण्याच्या श्री. अवधूत उंडे व श्री. माधव उंडे यांनी चिंचवडचे मूर्तिकार श्री. चेतन हिंगे, यांचेकडून सर्वांग सुंदर श्रींची मूर्ती, श्रींच्या पादुका, गोमुख शिवलिंग करून घेतली. सदर मूर्तिकार यांच्याकडून करवून घेतलेली श्री हरिबाबांची संगमरवरी साधारणपणे सव्वा दोन फूट उंचीची मूर्ती प्रथम फलटणच्या श्री हरिबाबांच्या मंदिरात नेऊन, मग पणदरे गावी घेऊन आले. बाबांच्या स्वागतासाठी पणदरे‍ येथून श्री. श्रीपाद उंडे व श्री. शाम आगरवाल हे भक्त प्रतिनिधी फलटणला आले होते. गावकरी‍यांनी बँडच्या घोषात व शोभेच्या दारुसह  बाबांच्या मूर्तीचे अतिशय भव्य स्वागत केलं. भक्तगणांच्या उत्साहाला पराव।रच नव्हता. आनंद सागरच जणू पणधरे गावी प्रगट झाला होता.

श्री हरिबाबांच्या मूर्तीचा भक्तांच्या सहकार्यातून उभ्या राहिलेल्या मंदिरातच प्राणप्रतिष्ठा समारंभ दि. २५ व २६ नोव्हेंबर २०१७ रोजी संपन्न झाला श्री हरिबाबांच्या आगमनानं पणदरे हे यापुढे पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिध्दीला येईल हे नक्की. श्री हरीबाबांचा लोभच पणधरे गावावर व ग्रामस्थांवर तसेच उंडे परिवारावर! आजपर्यंत बरीच कामे झालेली आहेत पण अजूनही काही कामे निधीअभावी बाकी आहेत ग्रामस्थ, श्री हरीबाबांचे भक्तगण व श्री उंडे परिवाराचे सदस्य व दानशूर व्यक्ती यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की सर्वानी सढळ हाताने मदत करून सदर पवित्र कार्य पूर्णत्वास पोहोचवावे हि नम्र विनंती. श्री हरिबाबा महाराजांच्या या मंदिर उभारणीच्या मंगल कार्यात सढळ हातानं मदत आणि कार्यात अनेक भक्तांनीपुढाकार घेतलेला आहे. हरीबाबा पणधरे गावी १७५ वर्षांनी परत आल्याची भावनाच सर्व भक्तांच्या चेहऱ्यावर होती. 

पणधरे हरीबाबा मंदिर 
संपर्क: 
श्री श्रीपाद शंकर उंडे  
मोबाईल: ९४२१८८६६७९, ९४२१७६३६६४   

आता प. पू. हरीबाबांचे  संक्षिप्त चरित्र पाहू या;

पणधरे हरिब।बा महाराज नयनमनोहर मूर्ती
पणधरे हरिब।बा महाराज नयनमनोहर मूर्ती

सदगुरू श्री हरिबाबा

जन्म:  ज्ञात नाही. फलटण येथे प्रकटले तेव्हा वय अंदाजे ४० वर्षे.
प्रकट दिन: शके १७९७ अश्विन शुद्ध द्वादशी.
आई/वडील: ज्ञात नाही.
गुरु: विशेष प्रभाव श्री स्वामी समर्थ.  
समाधी: माघ शुध्द एकादशी शके १८२० (सन १८९८) रोजी सायंकाळी साडेचार वाजता
शिष्य: लाटे. आईसाहेब मोरे
पणदरे येथील श्री हरिबाबा मंदिर‘

हरीबाबा फलटणला प्रगटले 

फलटणची भूमी अनेक सत्पुरूषांच्या वास्तव्याने पूनीत झाली त्यात सद्गुरू श्री हरिबाबा हे शालिवाहन शक १७९७ आश्विन व्दादशीला प्रथम फलटणच्या मारूती मंदिरात प्रकट झाले. त्याआधी ते काही दिवस पणधरे गावात व काही दिवस शिंगणापुरात होते. परंतु हा ईश्वरी अवतार फलटणच्या लोकांच्या उध्दारासाठी प्रकट झाला. वय असावे अंदाजे चाळीस. हा विदेही पुरूष दिगंबर अवस्थेत हिंडत असे. लोकांनी यांना ओळखले नाही. हरिबाबा आले की लोक दारे लावून बसत. एकदा काही मुले खेळत होती. त्यात एक पांगळा मुलगा होता. हरिबाबा आलेले पाहून सर्व मुले भिऊन पळून गेली. पण या पांगळ्या मुलाला पळता येईना. हरिबाबा त्याच्याजवळ आले. प्रेमाने त्याच्या पायावरून हात फिरवला. तो मुलगा ‘पळत’ घरी गेला. संत हरिबाबांना सर्व सिध्दी प्राप्त होत्या. फलटण संस्थानाचे अधिपती मालोजीराजे नाईक-निंबाळकर हेही बाबांचे भक्त होते. तेही कित्येक वेळा रथातून हरिबाबांना राजवाडयात नेत. पण हरिबाबांसारखा अवलिया राजवाडयात थोडाच राहणार. लोकांचे कल्याण करण्यासाठी बाबा सतत हिंडत असत.

श्री सद्गुरुंचे काही चमत्कार 

संत हरिबाबा महान योगी होते. एकदा शिष्यांनी विचारल्यावरून त्यांनी संपूर्ण योगमार्गाची माहिती लोकांना सांगितली होती. ज्ञानमार्ग व भक्तिमार्गाचाही उपदेश ते लोकांना करीत असत. फलटणमधील बऱ्याच लोकांना संत हरिबाबांची योग्यता समजली नव्हती. ते त्यांना वेडा समजत. ते दारात येऊन उभे राहिले तर त्यांना हाकलून देत. पणधरे गावात परमचंद नावाचा एक व्यापारी राहात होता. एकदा चैत्रातील रणरणत्या उन्हात, संत हरिबाबा त्यांच्या घरी आले. त्याने बाबांचे स्वागत करण्याऐवजी धक्के मारून हाकलून दिले. जाताना बाबा ‘बुधवार-बुधवार’ म्हणत होते. संताला छळण्याचे फळ लौकरच परमचंदाला मिळाले. बुधवारी त्याची गाय गेली. गुरूवारी स्वत: परमचंद गेला. नंतर त्याचा मंदबुध्दी मुलगा व मुलगी गेली. त्याच्या संपूर्ण घराचा नाश झाला. त्याच गावात धोंडी वाणी नावाचा अत्यंत दांभिक गृहस्थ होता. संत हरिबाबांनी त्याला कर्त्वव्यकर्म करण्याचा उपदेश केला. पण धोंडीवर त्याचा काही परिणाम झाला नाही

संत हरिबाबांनी अनेकांचे रोग दूर केले. कुणाचा गजकर्ण दूर केला. बापूच्या मुलाच्या अंगावरील छिद्रे नष्ट केली. फलटण मधील सुताराच्या बायकोचा-गिरिजेचा हाडयावर्ण नष्ट केला. सद्गुरू हरिबाबांच्या स्पर्शाने फलटणच्या मृत आबा गोसावींच्या मृत शरीरात चैतन्य स्फुरू लागले. तो जिवंत होऊन संत हरिबाबांना शरण गेला. संत हरिबाबांच्या कृपेने एका वांझ स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली. 

फलटणजवळील नांदल गावात बळीरम नावाचा वाणी राहात होता. पोटी पुत्र नसल्याने तो दु:खी होता. त्याची बायको वांझ होती. एकदा त्याची बायको त्याला म्हणाली की, “फलटणला हरिबाबा नावाचे संत आहेत. मी त्यांची महिन्याची वारी करते. ते कल्पवृक्षाप्रमाणे आहेत. ते आपली इच्छा पूर्ण करतील.” तिने संत हरिबाबांची महिन्याची वारी सुरू केली. दर महिन्याला हरिबाबांच्या दर्शनाला ती जात असे व पुत्रासाठी प्रार्थना करीत असे. भक्तिभावाने तिने तीन वर्षे वारी केली. एकदा हरिबाबांनी तिला सांगितले की, “तुझ्या भक्तीने मी खुश झालो आहे. तुझी इच्छा पूर्ण होईल. संत हरिबाबांची ही अमृतवाणी तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. आश्चर्य म्हणजे संत हरिबाबांच्या कृपेने त्या वांझ स्त्रीला गर्भ राहिला. यथावकाश तिने एका सुंदर बालकाला जन्म दिला. त्याचे नाव ‘विष्णू’ ठेवले. सद्‍गुरू हरिबाबा म्हणजे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे फलटणमधील कल्पवृक्षच होते.

सदगुरू श्री हरिबाबांचे निर्वाण व समाधी 

शरीर हे नाशवंत आहे. संतांनासुध्दा हे नश्वर शरीर सोडून जावे लागते. श्री संत हरिबाबांना आपला अंतकाळ जवळ आल्याचे कळले. त्यावेळी त्यांचा मुक्काम मलठणाला होता. एके दिवशी त्यांचा शिष्य पाय चेपीत होता. त्याला पाय थंडगार लागले. त्याने इतरांना सांगितले. डॉक्टरांनी येऊन तपासले पण बाबा कधीच निजधामाला गेले होते. ही बातमी हळूहळू सर्वत्र पसरली. बाबांनी अनेकांवर उपकार केले होते. बाबांचे अनेक भक्त दर्शनाला येऊ लागले. खुद्द मालोजीराजे निंबाळकर दर्शनाला येऊन गेले. त्यांच्या आज्ञेने पर्वतराव निंबाळकर यांनी बाबांचे समाधिमंदिर बांधले. संत हरिबाबांची पंचोपचारे पूजा करून त्यांना फुलांनी सजवलेल्या विमानात बसवून मिरवत समाधिस्थानी नेण्यात आले. त्यांना समाधिस्थानी ठेवून समाधिस्थान बंद करण्यात आले.

माघ शुध्द एकादशी शके १८२० इ.स. १८९८ला दु. ४.३० वाजता फलटणचे सद्गुरू संत हरिबाबा समाधिस्थ झाले.

संत हरिबाबांचे चरित्र उपलब्ध नाही. परंतु पं. रघुनाथशास्त्री दाणी यांचे आपण आभार मानले पाहिजेत. त्यांनी अत्यंत प्रासादिक भाषेत अठरा अध्यायात संत हरिबाबांच्या लीला वर्णन केल्या आहेत. संत हरिबाबांच्या परमशिष्या ‘आईसाहेब मोरे’ यांचे चरित्र पुढील तीन अध्यायांत प्रा. म. अ. कुलकर्णी यांनी लिहिले आहे. अशी ही २१ अध्यायांची पोथी संत हरिबाबांच्या भक्तांमध्ये पूजनीय मानली जाते.

या समाधिमंदिराच्या व्यवस्थेसाठी फलटण संस्थानचे अधिपती मालोजीराजे निंबाळकर यांनी एक ट्रस्ट स्थापन केला. या ट्रस्टतर्फे समाधिमंदिराची सर्व व्यवस्था पाहिली जाते. या ट्रस्टने समाधिमंदिर व परिसरात धार्मिक उत्सव, पारायणे आयोजित केली. सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे “श्री’ चा समाधि सप्ताह” हा माघ शुध्द पंचमी या दिवशी श्री अवधूत भजनीमंडळातर्फे सुरू होतो. एकादशी हा संत हरिबाबांचा समाधिदिन. त्या दिवशी ट्रस्टतर्फे लघुरूद्र, अभिषेक इत्यादि कार्यक्रम केले जातात आणि व्दादशीस महाप्रसादाचे वाटप होते. वसंत पंचमी ते एकादशी पोथीचे पारायण केले जाते. सद्गुरू हरिबाबांच्या भक्तांची अशी श्रद्धा आहे की या पोथीच्या पारायणाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

श्री सदगुरू हरिबाबा चरित्र चिंतन 

असे अवतरले फलटणात सदगुरु !

आश्विन शुध्द व्दादशी शके १७९७ (सन १८७५) या दिवशी फलटणच्या बाजारपेठेतील उघडया मारूतीच्या देवळाचे दक्षिण कट्ट्यावर भर दुपारच्या रखरखीत उन्हात सिध्दासन घालून एक चाळीस वर्षाचा अवलिया प्राणी दिगंबर अवस्थेत बसला होता. सूर्याची उन्हे टळून गेली तरी सिध्दासन घालून बसलेला हा योगी एकाच जागेवर बसून होता.  त्याला पाहण्यास बघ्यांची बघता बघता गर्दी जमू लागली तेव्हा –

लोक म्हणती हा आहे खुळा । वटारतो सारखा डोळा ॥
हा नागवा त्यास मारा बडवा । हा ढोंगी आहे साधू खुळा ॥

असे वाचे उच्चार एकीकडे सुरू असताना दुसरीकडे ते साधू जिथे सिध्दासनाची मांड घालून बसले होते तिथे त्यांचे सभोवती स्वयंप्रकाशाचे तेजोवलय दिसू लागले. एकीकडे रूद्रावताराची मारूती मूर्ती तर दुसरीकडे साधूंची चैतन्यशील वैष्णव मूर्ती, एक हर तर दुसरा हरी, दोन भिन्न मूर्ती पण अंतर्यामी प्रकृती एकच. दोन्हीही साक्षात परमेश्वराची रूपेच. त्यामुळे या आगळ्या चमत्कारिक घटनेची वार्ता फलटण शहरात पसरताचे शेकडो लोकांनी तेथे दर्शनास एकच गर्दी केली. तेवढयात फलटणचे पुण्यशील राजे श्री. मुधोजी नाईकनिंबाळकर महाराज तेथे आले. त्यांनी त्या योगी हरिबुवांचे दर्शन घेऊन आपल्याबरोबर राजप्रासादात येण्याची विनंती केली आणि बघता बघता हरिबुवा महारज हे मुधोजीराजांच्या बरोबर राजप्रसादात आले, महाराजांनी हरिबुवांचे चांगले आदरातिथ्य केले, परंतु चंचल मनाचे व ब्रह्मांडाच्या चिंतेने सदैव व्यग्र असलेले हरिबुवा राजप्रासादात कधीही राहणे शक्य नव्हते. त्यांनी त्यावेळी एकदा चांदीच्या भांडयात पाणी पिण्यास दिले, परंतु त्यांनी ते भांडे भिरकावून फेकून दिले. त्यांना नेसण्यास चांगली वस्त्रे दिली तर त्याचा त्यांनी कधीच स्वीकार केला नाही. एकदा बैठकीत हरिबुवांनी आपले पायाची तंगडी थेट मुधोजीराजांच्या अंगावर पसरली, पण राजांना या योग्याची योग्यता माहित असल्याने त्यांनी हरिबुवांवर न रागावता उलट त्यांचा पाय रगडून त्यांची भक्तीभावाने सेवा केली. या घटनेपासून श्री हरिबुवांच्या लीला फलटणकरांना अधिक परिचित होऊ लागल्या.

विचित्र लीला

हरिबुवा कोणाच्याही घरी कधीही जात असत आणि तेथे जाऊन तेथील भांडी, कपडे भराभर घराबाहेर फेकून देत. घरातल्या बागडणा-या आणि विशेषत: पाळण्यातील लहान मुलांचे ते पटापट मुके घेत असत. कधी ते रखरखीत उन्हातील तापलेल्या वाळूवर निवांत झोपत असत. कधी बाणगंगा नदीच्याकडेला असलेल्या दगडी उंच तटावर रात्री अपरात्री चढून हातात दगड घेऊन एकटेच ‘विठ्ठल विठ्ठल’ असे भजन करीत असत. कधी मध्यरात्री उठून भर रस्त्यावर मध्यभागी बसून ते भजन करीत बसायचे, कथी स्वत:च्या लिंगावर विक्षिप्तपणे बिबा घालीत तर कधी आपल्या डोळ्यात शेराचा चीक घालून भटकत असायचे. पण त्यांना केव्हाही इजा झाली नाही. केव्हा ते हातात साप घेऊन ध्यानधारणा करीत बसायचे. याला लहान पोरे फार भीत; हरिबुवा दिसले रे दिसले की पोरे आपापल्या घरी उधळलीच म्हणून समजा आणि अशी ही पोरे हरिबुवांच्या भितीने आपल्या घराची दारे लावून आतून कडी लावून घेत असत. कधी कुणाच्याही घरी जाऊन ते भाकरी मागत असत. कोणी कसल्याही प्रकारचे अन्न दिले तर ते सर्व अन्न एकत्र करून त्याचा घास करून खात व वर पाणी पिऊन तेथून निघून जात. त्यांना कोणी नमस्कार केला तर त्यांच्या डोक्याचे पागोटे काढून आपल्या स्वत:च्या डोक्यावर घालीत आणि नंतर खदाखदा हसत राहावयाचे, अशा वैचित्र्यपूर्ण अवस्थेत वावरणारे हरिबुवा लोकांना ‘भक्तिमार्ग सोडू नका’ असे सांगत असत आणि ते स्वत: विठ्ठलाच्या नामघोषात सदैव तल्लीन होत असत.

हरिबुवा – हे एक गूढ कोडे

शोक, मोह, तृषा, क्षुधा व मृत्यू यांची तमा न बाळगता सर्वत्र संचार करून चमत्काराने वागणारा महान कर्मयोगी श्रीहरिबुवा महाराज हे एक न उलगडलेले गूढ कोडे आहे –

हरिबुवा महाज्ञानी । असोनी वेडयापरी करणी ॥
ऎसे पुरूष विरळ । हे अमूर्ताचे मूर्त निवळ ॥
नवल सकलांना भासले ॥

हरिबुवा यांचे गाव कोणते, जन्म कोठे झाला, त्यांचे माता-पिता कोण? त्यांचे खरे नाव काय? यांची आजअखेर कधीच ठावठिकाणा लागला नाही.  पण त्यांचे गाव कर्नाटकात पोटमल्ली हे असावे. मात्र हरिबुवांना त्याबद्दल कोणी विचारले तर ते भलतीच उत्तरे देत. त्यांना मराठी, कानडी, द्राविडी व तेलगू भाषा सफाईदारपणे बोलता येत. त्यामुळे ते मूळ कोठले याचा थांगपत्ता अखेरपर्यंत लागला नाही.

ऋध्दिसिध्दी

काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ व लोभ या षड्विकारांवर मात करणारे सदगुरू हरिबुवा महाराज म्हणजे लोकांना एक चमत्कारिक गूढ वाटत होते. त्यांना ऋध्दिसिध्दी अनुकूल होती. त्या ऋध्दिसिध्दीच्या जोरावर त्यांच्या हातून ज्या सहजरित्या कृती झाल्या त्यास चमत्काराचे स्वरूप प्राप्त झाले. सर्वसामान्य माणसांना या चमत्काराचे कोडे उलघडणे अगदी अशक्य होते. या त्यांच्या चमत्कारी कृतीत ढोंग थोतांड कधीही आढळून आल्याची कोणास प्रचीती नाही. योगी महापुरूष चमत्कार दाखवितात. ते समाजाला सद्भावनेकडे खेचण्यासाठी आणि समाजाच्या प्रकृतीत सद्भावना निर्माण करण्यासाठी ! देव, दैव, पूर्वजन्म व पुनर्जन्म यावर माणसाचा विश्वास असो वा नसो पण घडणा-या चमत्काराने माणसाची मती गुंग होऊन जाते आणि मग त्याला देवाचे अस्तित्व मान्य करावे लागते. सदगुरू हरिबुवामहाराज यांच्या दैनंदिन जीवनात जे शेकडो चमत्कार लोकांना त्यावेळी पाहाण्यास मिळाले तेच चमत्कार शब्दरूपाने काही थोड्या प्रमाणात येथे मुद्दाम दिले आहेत.

पांगळ्यास पाय

फलटणमध्ये एकदा रस्त्यावर लहान मुले खेळाच्या अगदी रंगात आली होती. इतक्यात कुठून तरी तेथे हरिबुवा येत असल्याचे पाहताच पोरे भीतीने घरोघर धूम पळत गेली परंतु त्यात दगडू नावाचा सहा वर्षाचा पांगळा पोरगा पळून न जाता आल्याने भीतीने बसून राहिला. तेव्हा हरिबुवा त्या पोरापाशी आले व त्या पांगळ्या पोराचे डोक्यावर हात ठेवून म्हणाले, ‘ऊठ बाळ ! आणि खरोखरच दगडू पळू लागला. त्या पांगळ्या पोरास पाय आले. आपल्या पांगळ्या पोरास पाय आलेले पाहून त्याच्या माता-पित्यांचे अंत:करण हेलावले व त्यांनी सदगुरू हरिबुवांचे दर्शन घेऊन आपले जीवन कृतार्थ केले.

बंदिवासातून गुप्त

हरिबुवा फलटणात लोकांना फार त्रास देतात, लोकांच्या सामानांची नासधूस करतात तेव्हा त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा म्हणून लोकांनी श्रीमंत बापूसाहेब महाराजांकडे तक्रारी केल्या तेव्हा महाराजांनी हरिबुवांना बंदिशाळेत ठेवून दिले. रात्री पहारेकऱ्याने त्यांच्या कोठडीस कुलूपे ठोकली. तो आपले पहाऱ्याचे काम करू लागला. दुसरे दिवशी पहारेकऱ्याने पाहिले तो कोठडीला कुलूप तसेच पण हरिबुवा तेथे नाहीत. ते कुठे गेले कसे गेले, म्हणून सगळीकडे धावाधाव, शोधाशोध सुरू झाली. तेव्हा कळले हरिबुवा शिंगणापूरात प्रकटले.

शिंगणापूरात हरहर महादेव। तेथे चाले काठया कावडयांचा भार ।
म्हणूने झाला हरिबुवांचा जयजयकार ॥

कानफाडाच्या फटक्याने भूत पळाले

उंडवडी (बारामती) येथील शिवराम नावाच्या माणसास भूत-पिशाच्चाने झपाटले. खूप आषधे, देवऋषी झाले, देणी उतारे झाले, पण त्यास काडीचाही गुण येईना. उलट त्याचे वेडगळ चाळे अधिक त्रासदायक होऊ लागले. तेव्हा त्याचे घरातील माणसांनी शिवरामला हरिबुवांकडे आणले. यावर हरिबुवांनी उठून शिवरामाच्या चार-पाच कानफाडात मारताच पिशाच्च शरण आले. ‘मला मारू नका. मी निघालो.’ म्हणून ते निघून गेले व शिवराम लगेच खडखडीत बरा झाला.

हरिबुवा हे साक्षात गिरिजापती

बारामती तालुक्यातील गुणवडी येथे हरिबुवांचा मुक्काम असताना एके रात्री तेथील पाटलांच्या घरातील तुळईचे खांडावर एक भला मोठा सर्प निघाला. सर्प दिसताचे तेथे एकच गोंधळ उडाला आणि मग त्याला मारण्यासाठी लोक काठया आदी सापडतील त्या वस्तू हातात घेऊन त्याठिकाणी धावत गेले. तेव्हा हा गोंधळ गडबड ऎकून हरिबुवा त्या पाटलांच्या घरात आले आणि म्हणाले,

नका नका याला मारू । आहे हे माझे लेकरू ॥
बोलोनी ऎसे करूणा करू । हस्त पसरोनी वदे ये ॥

आणि मग लगेच त्या सर्पाने उडी मारली व हरिबुवांनी तो सर्प हाती धरून गावाच्या बाहेर लांब सोडून दिला.

ज्यांनी धरला सर्प हाती । तो हा साक्षात गिरिजापती ॥

पोट एकदम साफ 

जावली येथील बाळाबाई गुरव नावाची स्त्री पोटातील नळगुंद विकाराने भयंकर आजारी होती. त्या आजाराने बेजार झालेल्या स्त्रीने खूप औषधोपचार केला पण काहीच उपयोग होईना तेव्हा ती नाथाच्या देवळाच्या दगडी कट्टयावर बसलेल्या हरिबुवांकडे येऊन आपल्या आजाराची कर्मकहाणी सांगून त्यातून वाचविण्याची विनंती केली. तेव्हा हरिबुवांनी आपल्या पायाखालची मूठभर माती बाळाबाईस देऊन ती अंगास लावण्यास सांगितले. नंतर तिने ती माती अंगास व पोटास लावताच तिचा पोटाचा नळगुंद पार कुठे पळून गेला.

गाईला पान्हा फुटला

फलटण येथील माधव मोरेश्वर पतकी यांची गाय वासरास कधीच स्तनपान करून देत नसे. पण हरिबुवांनी त्या गाईचे अंगावरून हात फिरवताच ती मोठया प्रेमाने वासरास पाजू लागली.

नवसाचा मलिदा

नातेपुते येथील पर्वतराव आनंदराव देशमुख नावाचे एक गृहस्थ पोटदुखीच्या आजाराने व्याकूळ झालेले होते. एकदा तर देशमुख पोटदुखीच्या वेदनेने जमिनीवर गडबडा लोळू लागले. तेव्हा त्याचे वेळी हरिबुवा तेथे अचानक आले आणि पर्वतरावांना म्हणाले, ‘अरे ! तुझ्या घरी देवाला मलिदा देण्याचा पूर्वी नवस केला होता तो मला अत्ताच्या अत्ता खाण्यास दे, ऊठ तूच आण, लवकर आण.’  आणि मग पर्वतरावांच्या बायकोने ताबडतोब मलिदा तयार करून त्यांना देताच हरिबुवांनी तो मलिदा खाण्यास प्रारंभ केला आणि त्यातील एक घास पर्वतरावांना खाण्यास दिला. त्यांनी तो मलिद्याचा घास खाताच त्यांच्या असाध्य असलेला पोटदुखीचा रोग बघता बघता नाहीसा झाला. या चमत्काराने पर्वतराव देशमुख अगदी चकित झाले आणि त्यांनी महाराजांना वंदन केले.

गुडघ्याची व्याधी गेली

बारामती येथे चंद्रा नावाची एक वेश्या होती. ती नेहमी महाराजांची टिंगळ-टवाळी करीत असे. एकदा ती ठेच ला्गून दगडावर जोरात पडली आणि त्यात तिच्या गुडघ्याची वाटी बाजूला सरकून तिला वेदना होऊ लागल्या. त्याचवेळी हरिबुवा तेथून जात होते. त्यांना पहाताच चंद्राने हात जोडले. तेव्हा हरिबुवांनी तिच्या गुडघ्याला हात लावला. तो गुडघा संपूर्ण बरा झाला.

चिंताजनक भागूबाई सुरक्षित

शिंगणापूर येथे शंकर महार नावाचा इसम होता. त्यांची बायको भागूबाई ही तीन दिवस आडल्यामुळे मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. शंकरने अनेक उपाय केले पण त्यांचा काही उपयोग होईना. पण त्याचवेळी शिंगणापूरात आलेल्या हरिबुवांचे शंकरने पाय धरताच त्यांची पत्नी भागूबाई अगदी सुरक्षितपणे प्रसूत झाली. या आनंदाच्या भरात त्या मातापित्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘हरी’ असे ठेवले.

मध्यान्ह रात्री निवडुंगाचे झुडुपात

पणदरे येथे हरिबुवा मुक्कामास असता एकदा मध्यान्ह रात्री झोपेतून उठून ते घराबाहेर पडले आणि अंधारात गावाच्या बाहेर सरळ चालू लागले. परंतु हरिबुवांच्या जाण्याच्या चाहुलीने जागे झालेले तुकाराम जगताप आदी लोक त्यांच्या मागे जाऊन एका निवडुंगाच्या दाट झुडपात शिरून ते दिसेनासे झाले. तेव्हा महाराजांच्या मागे गेलेले लोक परत आपल्या घरी आले. तुकाराम जगताप हाही परत येऊन आपल्या घरातल्या दाराला आतून कडी लावून झोपला. तो पहाटे उठून पाहतो तोच हरिबुवा त्यांच्या शेजारी खुशाल झोपलेले. हे पाहून सर्व लोक चकितच झाले.

घे हा पाऊस

एका वर्षी पाउसाने ओढ धरल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा फलटणमधील एका इसमाने महाराजांना विचारले,‘ भाद्रपद महिना संपत आला तरी अद्याप पाऊस नाही? आता केव्हा हा पाऊस पडणार आहे?’ तेव्हा हरिबुवांनी जवळ असलेला खलबत्ता हाती घेऊन त्या प्रश्न विचारणाऱ्यावर फेकून मारला. तेव्हा तो आपल्या घरी पळत जाऊन दाराला कडी लावून बसला. यावर हरिबुवांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या दारावर थाप मारून ‘अरे ! तुला पाऊस पाहिजे ना, हा घे पाऊस !’ असे बोलू लागले.  तोच आकाशात काळेभिन्न ढग जमले, विजा चमकू लागल्या आणि थोडयाचे वेळात मुसळधार पावसाने धरणीमाता ओलीचिंब झाली.

हरिबुवा – साक्षात परमेश्वर

गुणवडी येथे एकदा हरिबुवा रात्री एका घराच्याबाहेर ओटयावर झोपले होते. मध्यरात्री घरातील प्रमुखाने दार उघडून पाहिले तो हरिबुवा झोपलेले होते आणि त्यांच्या मुखचंद्रमाजवळ तेजस्वी प्रभा प्रकाशित झालेली पाहून ते आश्चर्यचकित झाले. तेव्हा हा योगीपुरूष आहे म्हणून लोकांनी त्यांना वंदन करून त्यांचा योग्य आदरसत्कार केला. कारण हरिबुवा म्हणजे साक्षात परमेश्वर, हे त्यांनी अनुभवले.

मृताला संजीवनी

फलटणच्या जुन्या पोस्टाजवळ राहणारे दत्तात्रय गोपाळ कुमठेकर हे गृहस्थ हरिबुवांचे भक्त होते.
त्यांचा तिसरा मुलगा हरी हा अपस्माराने आजारी पडून मृत्युपंथाला लागला होता. तेव्हा दत्तोबांनी वैद्याला आणून मुलाची प्रकृती दाखविली पण गुण नाही. वैद्यांनी त्या मुलाचा कारभार बहुधा थोडयाच वेळात संपेल असा अभिप्राय दिला. यावर कुमठेवर मलठणात हरिबुवांच्याकडे गेले आणि त्यांचे दर्शन घेतले आणि मुलाच्या चिंताजनक परिस्थितीची कल्पना दिली. तेव्हा हरिबुवांनी आपल्या पायाखालची मूठभर माती हातात घेऊन ती त्या आजारी मुलाच्या अंगास चोळण्यास सांगितले. दत्तोबा माती घेऊन घरी आले तो मुलगा मेला म्हणून घरात सर्वत्र रडारड सुरू झाली होती. तरी दत्तोबांनी दिलेली माती त्या म्रूत मुलाचे सर्वांगास चोळली. हरिबुवांच्या पायधुळीने मातीने त्याच्या रोमारोमात संजीवनी आली आणि तो मुलगा पटकन डोळे उघडून बघू लागला व नतर तो उठून बसला. आपला मृत मुलगा हरिबुवांच्या कृपेने पुन्हा जिवंत झाल म्हणून त्याच्या मातापित्याचा आनंद काय वर्णावा? मृत मुलगा जिवंत होण्याची किमया ही केवळ हरिबुवांचीच !

धन्य धन्य हरिबाबा । सकल अद्रृष्टांचि सकाम जीवा ॥
परी संकटी करता धावा । भक्ता संकटासी निवारी ॥

विहिरीत बुडाले

एकदा पणदरे येथे असताना हरिबुवांनी एका खोल विहिरीत उडी घेतली. त्याबरोबर ते पाण्याचे तळाला गेले, ते पुन्हा वर आलेच नाहीत, तेव्हा काही लोकांनी विहिरीत भराभर उडया घेऊन हरिबुवांचा पाण्यात सर्वत्र शोध केला; पण व्यर्थ ! अखेर लोक हताश होऊन आपापल्या घराकडे आले तोच हरिबुवा एका घरात बसून गप्पा मारीत असलेले दिसले.

रोग असे पळाले

पणदरे येथील बापू जगताप नावाच्या माणसास नेहमी घुरे येत असल्याने त्यांच्या घरातील माणसे सदैव काळजीत असत. परंतु हरिबुवांनी त्यांचे अंगावरून हात फिरविताच त्यांचे घुरे कायमचे निघून गेले. त्याच गावात गिरिजा सुतारीण नावाची एक बाई राहात होती. तिला हाडयाव्रण झाल्याने ती जन्माला अगदी कंटाळली होती म्हणून तिला हरिबुवांकडे नेली. तेव्हा त्यांनी तिचे अंगावर लघुशंका करताच तिचा तो रोग नाहीसा झाला.

सदगुरूंचे महानिर्वाण

जगात जो जो मनुष्य प्राणी जन्माला आला त्या प्रत्येकाच्या गळयात जन्मताच त्याच्या मृत्यूची तारीख लिहिलेले तिकीट असते. मृत्यु म्हणे न भूपती । मृत्यु म्हणेना श्रीपती । ऎसी ही करणी मृत्युची । माघ शुध्द एकादशी शके १८२० ( सन १८९८ ) या देवशी हरिबुवांचे मलठण येथे महानिर्वाण झाले. त्यांच्या मृत्युची वार्ता वा-यासारखी सर्वत्र पसरताच हजारो स्त्री-पुरूषांचे लोंढे त्यांच्या अंत्यदर्शनास आले. महाराजांचे महानिर्वाण पाहून सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले. शेकडो व्याधीग्रस्त लोकांना आपल्या योग सामर्थ्याच्या अदभूत चमत्काराने मुक्त करून त्यांचे जीवन सुखी व आनंदी केले ते हरिबुवा गेले म्हणून कोणास वाईट वाटणार नाही? सदगुरू हरिबुवा महाराज हे फलटण नगरीचे भूषण होते, पण ते आज संपले. हरिबुवांच्या निर्वाणाची वार्ता श्रीमंत मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांना कळताच तेही त्वरीत महाराजांचे दर्शनास येऊन गेले आणि नंतर त्यांची समाधी बांधण्याचा आदेश देण्यात आला. पर्वतराव निंबाळकर यांनी त्रिजटेश्वरांच्या व पुंडलिकाच्या देवळाच्या मध्यभागी जागा निवडून तेथे समाधी बांधून घेतली. तोपर्यंत महाराजांचे अचेतन देहाला सुगंधी तेले लावऊन ऊन पाण्याने स्नान घालण्यात आले. स्नान घालण्याचे काम श्री. गोविंदराव कानडे यांनी केले. नंतर सदगुरुंच्या डोक्यास टोपी, अंगावर कफनी, कपाळावर केशराचा टिळा, त्यात अक्षता, गळ्यात फुलांच्या माळा, टोपीवर तुळशीपत्र ठेवण्यात आले. नंतर पूजा-अर्चा होऊन आरती झाल्यावर वाद्यांच्या गजरात सदगुरूंची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पुंडलिकच्या मंदिरास त्रिजटेश्वर मंदिरात उजवी घालून समाधीस्थानी आली. समाधीच्या आत चांगले आसन करण्यात आले त्यावर हरिबुवा महाराजांना बसविण्यात आले. त्यावेळी तेथे दोन नंदादीप जळत होते. शेवटी सर्व विधी पूर्ण झाल्यावर ती समाधी बंदीस्त करण्यात आली तेव्हा हजारो लोकांनी‘सदगुरू हरिबुवा महाराज की जय।’ अशा गगनभेदी घोषणा देऊन त्यांना अखेरचा निरोप दिला. नंतर समाधीवर सदगुरूंच्या पादुका कोरण्यात आल्या आणि त्या पादुकांचीही नंतर पूजा करण्यात आली. अशा रीतीने सदगुरू हरिबुवा महाराज माघ शुध्द एकादशी शके १८२० (सन १८९८) रोजी सायंकाळी साडेचार वाजता समाधिस्त झाले.

संपर्क: 

श्री सद्गुरू हरिबुवा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट
फलटण, जिल्हा सातारा.

फोन: ०२१६६-२२०३३४.

अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज श्री सद्गुरु हरिबाबा महाराज की जय !