स्थान: भिलवडी स्टेशन पासून ६ कि. मी. अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर आहे.
सत्पुरूष: श्री नरसिंह-सरस्वती यांनी चातुर्मास केला.
स्थानमहात्म्य: श्री ब्रम्हानंद स्वामींनी तप केले. मठ व समाधी औदुंबर येथे आहे. श्री नारायणानंद संन्यास दीक्षा व वास्तव्य.
विशेष: विमल पादुका, औदुंबर.
नरसिंह-सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजे वऱ्हाडातला; परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे व पैलतीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे. सांगलीकडून बसने थेट औदुंबरात पोहोचता येते. तेथे रहाण्या-जेवण्याची व्यवस्था होऊ शकते. शिवाय गावात धर्मशाळाही आहेत.
श्री नरसिंहसरस्वती हे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय सर्वत्र प्रसार पावला. त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की, लोक त्यांनाच दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक मानतात. त्यांनी सन १४४१मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले, त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले. कृष्णेच्या पैलतीरावर अंकलखोप नावाचा गाव आहे आणि ऐलतीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे. भुवनेश्वरी हे शक्तिपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असे. कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते. या निसर्गसिद्ध तपोवनात, औदुंबराच्या दाट शीतल छायेत नरसिंह्सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करुन दिले.
या पवित्र वातावरणात कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून आपणास श्रीदत्तपादुकांचे दर्शन घ्यावयाचे आहे. हा स्नानाचा घाट प्रशस्त आहे.
तुझ्या जळानें मनें आमुची तूं धवळित राही, कृतज्ञभावें तुला वंदिता श्रीकृष्णामाई !
अशी कृष्णामाईची मनोमन प्रार्थना करुन आणि शुचिर्भूत होऊन दत्तदर्शनाला जावयाचे. घाटावरून सरळ पादुकांपर्यत जाता येते. हा घाट येथील ब्रम्हानंदस्वामींचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी दत्तभक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून विसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधविला आहे.
दत्तचरणांचे दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा करू लागला की, बाजूच्या ओवऱ्यांतून दत्तभक्त गुरूचरित्राचे पारायण करीत असताना दिसतील. दत्त संप्रदायात कठोर तपाचरणाला फार मह्त्व आहे. अत्यंत काटेकारपणाने आचारधर्माचे पालन करणाऱ्याला दत्तसाक्षात्कार सुलभ होतो, अशी सांप्रदायिकांची श्रद्धा आहे. गोरक्षनाथ, चांगदेवराऊळ, जनार्दनस्वामी, एकनाथ, दासोपंत, निरंजन रघुनाथ इत्यादि थोर दत्तभक्तांची नावे आठवताच त्यांच्या निग्रही तपाचरणाचा इतिहास आपणाला नतमस्तक बनवितो.
या ठिकाणी स्वत: नरसिंहसरस्वती चार महिने एकांताचा आनंद लुटीत राहिले होते, त्या ठिकाणी त्यांच्या चरित्राचे आणि उपदेशाचे चिंतन करीत राहण्यात औचित्य आहे. त्यामुळे आपोआपच तपाला अनुकूल मानसिक बैठक लाभते.
मंदिराच्या परिसरांत औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे. आकाशात सूर्य तळपत असताना जमिनीवर छाया - प्रकाशाची जाळीदार रांगोळी तरळत राहते. या औदुंबरांच्या छायेतून मंदिरप्रदक्षिणा करुन, वरच्या ’आजोबा’ वडाखालच्या वाटेने गेले की, ब्रम्हानंदस्वामींचा मठ लागतो. हे सत्पुरुष १८२६च्या सुमारास गिरनारहून औदुंबरक्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. या शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. त्यांच्याबरोबर मेरूशास्त्री नावाचे एक विद्वान गृह्स्थ होते. त्यांनी ब्रम्हानंदांच्या सहाय्याने ‘हठयोगप्रदीपिका’ या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ’ज्योत्स्ना’ नावाची टीका लिहिली.
ब्रम्हानंदांचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी भक्त-भाविकांकडून वर्गणी गोळा करुन औदुंबरचा प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले. या ब्रम्हानंद मठातच श्रीवासुदेवानंदसरस्वती (दत्तसंप्रदायातील एक अर्वाचीन सत्पुरूष) यांनी आपल्या जीवनसाधनेची पहिली पावले टाकली होती. पु़ढे या मठात श्रीनारायणानंदतीर्थ या नावाचे एक सत्पुरुष राहात असत.
औंदुबरक्षेत्री चैत्रात कृष्णमाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात. ह्या अत्यंत रमणीय दत्तक्षेत्राला अवश्य भेट द्यावी.
कृष्णातिरीच्या वसणाऱ्या । ये औदुंबरीं बसणाऱ्या ।। धृ ।।
काष।यांबर घेणाऱ्या । पायी पादुका घालणाऱ्या ।। १ ।।
भस्मोद्धलन करणाऱ्या । दंड कमंडलू घेणाऱ्या ।। २ ।।
स्वभक्त संगे असणाऱ्या । भक्त।भिप्सीत करणाऱ्या ।। ३ ।।
स्मरता दर्शन देणाऱ्या । वासुदेवाच्या कैवाऱ्या ।। ४ ।।
या क्षेत्री असे जावे
औदुंबर (सांगली, महाराष्ट्र)-
सांगली जिल्ह्यातकृष्णा नदी काठी वसलेले औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्तक्षेत्रआहे. श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते. कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली. ही कथा गुरुचरित्राच्या १७ व्या अध्यायात आलेली आहे. याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी, श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले. याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला, व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील, व त्यावृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या वृक्षाखालीगुरुचरित्र पारायण करणारया भक्तास त्याने केलेल्या पुजेचे अगर पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल, त्याभक्ताला माझा आशिर्वाद राहील; असे वचन दिले.
औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमीत बस सेवा आहे. सांगली-अंकलखोप या बसने इथे जाता येते. तासगाव-कोल्हापूर या बसमार्गावर हे क्षेत्र आहे. रेल्वेमार्गांनी प्रवास करणारया भक्तांसाठी पुणे, कोल्हापूर मार्गावर भिलवडी स्टेशन लागते. त्या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने (७ किमी) अंतरावर असलेल्या औदुंबर या क्षेत्रास जाता येते. या ठिकाणी राहण्यासाठी जोशी अगर पुजारी यांचेघरी सोय होऊ शकते .
श्री दत्त संस्थान,
औदुंबर, तालुका पलूस, जिल्हा सांगली,
महाराष्ट्र, पिनकोड- ४१६३२०.
फोन: रामभाऊ पुजारी (०२३४६) २३००५८, (मो.) ९९७०१२९७१३,
सद्गुरु स्वामी नारायणानंद तिर्थ सेवा ट्र्स्ट,
औदुंबर, तालुका पलूस, जिल्हा सांगली,
महाराष्ट्र, पिनकोड- ४१६३२०.
फोन: ०२३४६ - २३०८४८
इमेल: ssntsttrust@yahoo.com