श्री गुरुदेव दत्तमंदिर वाकोला मुंबई

श्री गुरुदेव दत्तमंदिर वाकोला
श्री गुरुदेव दत्तमंदिर वाकोला

आज मुंबईत जे एक पुण्यपावन स्थान म्हणून ओळखले जाते ते म्हणजे वाकोल्याचे दत्त मंदीर! वाकोल्याच्या दत्त मंदिराचा इतिहास मोठा रंजक तितकाच प्रासादिक आहे. मंदिराची स्थापना  इ. स. १९२४ मध्ये झाली. या वर्षी उत्तरेकडील एका साधूने दत्तमंदिर व औदुंबर वृक्ष असलेल्या स्थानास भेट दिली. त्या कल्पवृक्षाकडे पाहून व त्या वस्तू कडे पाहून त्या सत्पुरुषाने असे संबोधिले की ही जागा व वस्तू अत्यंत पवित्र असून या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा वास आहे. त्यामुळे या ठिकाणी दत्तमंदिर उभारावे. हे स्थान जागृत म्हणून हे देवस्थान प्रसिद्धीस येईल. या परिसरात ३ कुटुंबे निवासास होती. नाडकर्णी, देसाई व बालवल्ले. या तीन कुटुंबांनी मुख्यत्वेकरून त्या साधूंच्या इच्छेनुसार येथे छोटेसे दत्त मंदिर बनवण्याचा विचार पक्का केला त्यासाठी त्यांनी स्थानिक व त्या भागात राहणाऱ्या नागरिकांचीही मदत घेण्याचे ठरवले. सदर साधू महाराजांच्या मार्गदर्शनानुसार त्या औदुंबर वृक्षाखालीच दगडात बनवलेल्या दत्त पादुका चैत्र शुद्ध १ (गुढी पाडवा) इ.स. १९२४ या दिवशी प्रतिष्ठापित करण्यात आल्या. त्या स्थानापासून २०-२५ फूट अंतरावर दत्त मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि बघता बघता सर्वजण कामास लागले.

सुरवातीलाच एक मोठ्या मंदिराच्या उभारणीस सुरवात केली. त्यात सुरवातीलाच  ७×७ × १२ या आकाराचे तळघर बनवण्यात आले. त्याचा मुख्य उद्देश मंदिरात ध्यानधारणे साठी जागा म्हणून नियोजित करण्यात आली. गोपुर व कळसाची उंची २५' घेण्यात आली. मंदिराचे गर्भगृह जमिनीच्या वरती असले तरीही डाव्या बाजूने ध्यान मंदिरात उतारण्या साठी पायऱ्या  करण्यात आल्या. जमिनी लगत काही खिडक्या ठेऊन ध्यानमंदिरात खेळत्या हवेची सुविधा करण्यात आली. त्यामुळे त्या ठिकाणी ध्यानास प्रसन्न व शांत वातावरण निर्माण केले गेले. त्या मंदिरात बाल स्वरूपातली पद्मसनातली  दत्तमूर्ती, बसलेली श्री गणेशमूर्ती व हात जोडलेली हनुमंताची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या आहेत. या सर्व मूर्तींची ध्याने अत्यंत वैशिष्ठ पूर्ण आहेत. या मूर्ती जयपूर येथे बनवून आणल्या व सांताक्रूझ स्थानका पासून मिरवणुकीने मंदिर स्थानी आणण्यात आल्या. त्यापैकी दोन मूर्ती ३ जुलै १९२४ ला आषाढ शुद्ध १ ला स्थापित करण्यात आल्या. मुख्य स्थान देवता श्री दत्तात्रय यांची मोठ्या तुलसी वृंदावन पद्धतीच्या कट्यावर स्थापना करण्यात आली. उजव्या बाजूस श्री गजाननाची प्रतिष्ठापना करण्यात आली तर हनुमंताची मूर्ती नुसतीच उभी करण्यात आली.

श्री गुरुदेव दत्तमंदिर वाकोला
श्री दत्तमूर्ती, गुरुदेव दत्तमंदिर वाकोला

१९३९ मध्ये श्री नाडकर्णी यांनी श्री दत्ताराम बाल वल्ली याना सर्व जागा मंदिरा सहित विकली त्यामुळे बालवल्ली यांच्यावरच सर्व जबाबदारी आली. दररोजचा दिनक्रम त्यांच्यावरच अवलंबून राहिला. कालांतराने श्री लक्ष्मणराव हे मंदिर परिसरात राहायला येऊन  व्यवस्थापन सांभाळू लागले व नंतर तो सर्वच परिसर त्यांना, ९९९ वर्षाच्या कराराने देण्यात आला. त्यांच्या वर्धक्या ने हि जबाबदारी त्यांचे सुपुत्र श्री भवानिशकर हट्टंगडी यानी स्वखुषीने स्वीकारली. ते स्वातंत्र सैनिक होते. त्यांनी नियमित प्रातः कालची पूजा व सायंपूजा कामावरून आल्यानंतर सुरू केली. त्यांनी  श्री क्षेत्र नारसोबा वाडी प्रथे प्रमाणे आरती करुणा त्रिपदी व भजनास सुरवात केली. श्रीदत्तराम बेलावल्ली यांचे निधनानंतर शंकरराव यांनी जबाबदारी स्वीकारून गुळवंडी यांचे सोबत सर्व दिनक्रम चालू ठेवला. यात दत्तसंप्रदायिक उत्सवही सुरवात केले. या दोघाच्याही तबेतीचे कारणास्तव काही काळ या दिनक्रमात खंड पडला. १९५७ मध्ये प. प. आनंदाश्रम स्वामीजी काही दिवस येथे वास्तव्यास होते. श्री शंकरराव बालवेल्लीच्या पश्चात श्रीमती इंदिराबाई या  देवळाच्या मालक झाल्या. त्याकाळात उत्पन्न व खर्चही मर्यादित होते त्यामुळे उत्सव व मंदिरासाठी जीर्णोद्धार करण्यास लागणारे  अर्थसहाय्य मिळत नसे म्हणून गुलवडींचे सूचनेनुसार ट्रस्ट बनविण्यात आला व इंदिराबाई अध्यक्ष झाल्या व गुळवंडी व्यवस्थापक झाले व त्यांनी ५००/-, २५०/- व १२५/- रुपयांनी निधी जमवला.  अंदाजे तीन लाख रक्कम जमा केली. मुंबइत कुलाबा, विरार, ठाणे तसेच काही इतर भागातूनही निधी उभा केला. व नंतर या रकमेच्या व्याजातून सर्व खर्च होऊ लागले. १९९६ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यात मुक्यत्वेकरून मोठ्या दुरुस्त्या, करण्यात आले काही भक्तांनी उदार अंतःकरणाने अर्थसहाय्य दिले १९९७ च्या दत्तजयंती पूर्वी सादर मंदिर नवीन स्वरूपात भक्तपुढे आले. या मंदिरात दत्तजयंती, गोकुलअष्टमी, रामनवमी, गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी असे उत्सव साजरे होत. त्यात१९७४-७५ मंदिराचा सुवर्ण महोत्सव हिरक महोत्सव १९८४ साली साजरा झाला. १९९५-९६ मध्ये दत्तमूर्ती पादुका व गणेश मूर्तीची पुनरप्रतिष्ठापन करण्यात आली.

श्री गुरुदेव दत्तमंदिर वाकोला
श्री दत्तमूर्ती, गुरुदेव दत्तमंदिर वाकोला

सध्या श्री देवीशंकर तिवारी उमाशंकर तिवारी हे दोन अर्चक आहेत. व ते ६-६ महिने पूजा अर्चा व धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करतात. १९९९ साली रजत जयंती महोत्सव पार पडला. हा सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला. या रजत मोहोत्सवी कार्यक्रमास एक स्मरणिका काढण्यात आली या कार्यक्रमास दीपप्रज्वलन प. प. भाऊमहाराज करंदीकर यांचे शुभहस्ते पार पाडले सर्वच कार्यक्रम अतिशय देखणा होता. प. प. श्रीमद सद्योजत शंकराश्रम स्वामीजी वाकोल्यात ४ दिवस राहिले. त्यांच्या वास्तव्याने पवित्र्यात भरच पडली. २००६ मध्ये जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले. अस्बस्टोस पत्र्याची जागा आर सी सी स्लॅबने घेतली. अश्वथ कट्टा नवीन तयार झाला. या मंदिरात १७ मोठे फोटो लावण्यात आले त्यात मुख्यत्त्वे श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिह सरस्वती, टेम्बे स्वामी, स्वामी समर्थ, साईबाबा, श्रीरंग अवधुत, श्रीमद शंकराचार्य, गजानन महाराज, रामदास स्वामी, गगनगिरी महाराज, पाचलेगावकर महाराज, नित्यानंद स्वामी इ. इ. २००८ मध्ये प. प. सद्योजत शंकराश्रम स्वामीजी यांनी मंदिरास भेट देऊन प्रसन्नतेने भक्तगणास आशीर्वाद दिले. भक्तजन धन्य झाले. त्याच वेळी उपासनेची नित्यपाठ पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या ठिकाणी नित्य उपासना, भजन अर्चन व नित्यपूजा आरती हे ठरलेल्या क्रमाने संपूर्ण वर्षभर चालूच असतात. दर पौर्णिमेस पालखी सेवा असते. येथे गुरुपौर्णिमा व दत्तजयंती हे उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. येथे अन्न दानसेवा करता येते. काही ठराविक रक्कम दान करून खिचडी प्रसाद भक्तांना वाटलं जातो. श्री गुरुचरित्र, श्रीपादश्रीवल्लभ चारितामृत व गुरुलीलामृत परायणची सोय येथे आहे. हे स्थान अतिशय पवित्र व प्रसादिक आहे. या ठिकाणी अनेक भक्त रोज दर्शनासाठी येतात.श्रीगुरु चरणी आपल्या संकट विमोचनासाठी अर्चना करतात व सफलते नंतर नवसपूर्ती साठी पुनः येतात. प्रत्येक दत्तभक्ताने या स्थानी भेट देऊन श्री गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत.

श्री गुरुदेव दत्तमंदिर वाकोला मुंबई
श्री गुरुदेव दत्तमंदिर वाकोला मुंबई