अत्यंत जागृत व प्रासादिक साई मंदिर काविल, कुडाळ, गोवा

स्थान: श्री साई मंदिरश्री क्षेत्र कवील, जिल्हा सिंधुदुर्ग, कुडाळ, गोवा.
सत्पुरूष: साईभक्त रामचंद्र उर्फ दादा रावजी माडये
स्थान विशेष: साईभक्तांचे श्रद्धास्थान, साईबाबांनी दिलेला प्रासादिक रुपया पहिला या मंदिरासाठी खर्च केला.    

श्री साई मंदिर श्री क्षेत्र कवील
श्री साई मंदिरश्री क्षेत्र कवील

कोकण रेल्वेच्या कुडाळ रेल्वे स्टेशनच्या जवळच अर्धा कि. मी. अंतरावर झाडाझुडपांनी आच्छादलेल्या जागेवर म्हाडदहकर वाडीत कविलकट्टय़ाचा हा साईदरबार एका अलौकिक भक्ताच्या निस्सीम निर्व्याज प्रेमातून भक्तिरसाची महान गाथा आळवत आहे! कोकणातील एका विशिष्ट घाटणीच्या मंदिरांच्या रचनेसारखी या मंदिराची रचना नाही. प्रथमदर्शनीच ते आपले लक्ष वेधून घेते ते लालचुटूक चिऱ्यातील अर्धगोलाकार कौलारू मंदिर. समोर छोटेसे तुळशी वृंदावन नि गोलाकार मंडलामध्ये कमलपुष्प!मंदिरामध्ये प्रवेश करताच बाबांच्या आसनस्थ सर्वागसुंदर मूर्तीकडे पाहून विशेषत: त्यांच्या जीवितवत् वाटणाऱ्या नेत्रांकडे पाहून आपण इतके भावनाविवश होतो की खरोखरच बाबा आपल्या समोर बसल्याचा आपणाला भासहोतो. त्यांच्या नेत्रांतून ओजस्वी किरणे बाहेर येत असल्यासारखे वाटते. ही किमया घडवली आहे ख्यातनाम मूर्तिकार राष्ट्रपतीपदक विजेते श्री. शाम सारंग यांनी. शंभर फूट लांब, ३० फूट रुंद अशा मंदिरात बाबांची ही साडेसात फूट देहयष्टीची मूर्ती आहे. सभोवती दत्तमूर्ती, साधूसंतांच्या मूर्ती आहेत. शाम सारंग यांच्या वडिलांनी-बाबूराव सारंग यांनी मंदिर स्थापनेच्या वेळी घडवलेली मूर्तीही आहे. समोरच साईभक्त दादा माडय़े यांचे छोटेसे समाधी मंदिर आहे, ज्याची स्थापना १४ जानेवारी १९४७ रोजी झाली.

पहिले साईमंदिर, कुडाळ‘शिर्डी’, एकटय़ा महाराष्ट्राचीच काय पण साऱ्या भारतातील साईभक्तांची पंढरी! वर्षांचे बारा महिने तेरा दिवस साईबाबांच्या दर्शनासाठी, त्यांचे एकवार डोळे भरून दर्शन घेण्यासाठी साईभक्त आसुसलेला असतो. कधी एकदा शिर्डीला पाय लावतो असे त्याला झालेले असते. हाही विरह त्याला अधिक जाणवू लागला आणि त्यातून साईबाबा सतत आपल्यासोबत असावेत या अनिवार प्रेमापोटी बाबांची अनेक मंदिरे मुंबई आणि महाराष्ट्रात आकार घेऊ लागली. परंतु बाबा समाधिस्थ झाल्यानंतर ज्याला भारतातील पहिले साईमंदिर म्हणता येईल असे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कविल गावी उभे आहे! एकोणीसशे अठरा साली साईबाबांनी शिर्डी मुक्कामी देह ठेवला. त्यानंतर कविल गावी बरोबर चार वर्षांनी एकोणीसशे बावीसमध्ये एका झोपडीवजा जागेत बाबांचे निस्सीम भक्त रामचंद्र ऊर्फ दादा रावजी माडय़े यांनी यामंदिराला मूर्तस्वरूप दिले. ‘कविल’ गावातील रामचंद्र रावजी माडय़े हे दत्तभक्त. त्यांनी स्थापन केलेले दत्तमंदिर मुख्य मंदिराच्या शेजारीएका खासगी घरात आहे. गावात असतानाच त्यांना गुरुदत्तांचा साक्षात्कार झाला. त्यांना शिर्डीला येण्यास सांगितले. त्या आज्ञेनुसार दादा माडय़े लगोलग शिर्डीला पोहोचले. तेथे त्यांनी बाबांचा आशीर्वाद घेतला. बाबांनी त्यांना साईस्वरूपात ‘दत्तदर्शन’ दिले. एक रुपयाचे नाणे त्यांच्या हातावर ठेवले. ‘तू पुढे हो मी तुझ्यामागून येतो.’ या बाबांच्या आज्ञेनुसार माडय़े कविल गावी परत आले आणि तिकडे बाबांनी १९१८ साली आपला देह ठेवला. साईभक्त माडय़े यांनी १९१९ साली बाबांची पहिली पुण्यतिथी आपल्या गावात साजरी केली. बाबांनीदिलेला एक रुपया त्यांनी या कार्याकरिता खर्च केला. पुढे साईभक्तांच्या प्रेमातूनच हे मंदिर विकसित होत गेले आणि अखेर आज आपल्याला दिसते ते स्वरूप त्याने धारण केले.

निसर्गरम्य कोकणातल्या कविल गावातील या साई मंदिराला प्रत्येक साई भक्ताने भेट द्यायलाच हवी.

श्री साई मूर्ती, श्री क्षेत्र कवील
श्री साई मूर्ती, श्री क्षेत्र कवील


श्री क्षेत्र कवील