श्री परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते महाराज

Dandawate Maharaj
श्री परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते

जन्म: माघ व. २ गुरुवार ३१/३/१९०७
आई/वडिल: सितामाई / रामराव
कार्यकाळ: १९०७ / १९८५
गुरु: बाळकृष्णानंद (बापूराज)
शिष्य: प्रभुराज
समाधी/निर्वाण: ३१/८/१९८५

जन्म व बालपण 

भगवंत साधुंचे रक्षण, दुष्टांचे पारिपत्य व धर्म संस्थापनेसाठी वारंवार अवतार घेतो. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच कार्यार्थ अवतार धारण केला. कार्याचा भार श्री स्वामी समर्थ व माणिकप्रभूंनी समर्थपणे सांभाळला. याच अवतार परंपरेत माघ वद्य २ इ.स. १९०७ गुरुवारी महाराजांचा जन्म श्री नृसिंहसरस्वतींची लिलाभूमी गाणगापूर येथे झाला.

हैद्राबाद निवासी एक सत्शील दत्तभक्त दांपत्य सीतामाई व रामराव यांनी सिध्दस्थान गाणगापूरात अत्यंत खडतर व कठीण साधना व सेवा केली. इच्छा फक्त एकच पोटी संतान नव्हते त्यामुळे ते दोघेही दु:खी होते. भिमा अमरजा संगमावर श्री रामराव गुरुचरित्र पठणाची सेवा करीत तर सीतामाई सिद्ध कल्पवृक्ष औदूंबरास मध्यान्हीपर्यंत प्रदक्षिणा घालीत. माध्यान्हकाळी रामराव संगमापासून श्री गुरुंच्या निर्गुण मठापर्यंत दंडवत घालीत जात असत. नंतर माधुकरी मागून दत्तप्रसादाचे सेवन करून मठस्थानी असलेल्या अश्वस्थ वृक्षास प्रदक्षिणा घालून सायंकाळी श्रींची पालखी सेवा आटॊपून पुन्हा संगमस्थानी जात असत अशी खडतर सेवा त्यांनी १२ वर्षे केली. जणु श्री चरणी या दांपत्याने साकडे घातले. स्वामी महाराज भक्त प्रतिपालक मग ते शांत कसे राहणार ?

एका शुभदिनी सितामाई सेवेत असताना श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज प्रकट झाले व म्हणाले ‘माते मज समान एक दिव्य बालक तुझ्या पोटी जन्माला येईल. माते तू वांझ नाहीस’ आणि उजव्या हातावर दोन खारकांचा प्रसाद दिला व श्री गुरु अदृष्य झाले. सितामाई भानावर आल्यावर काय उजव्या हातात खरोखरच २ खारका होत्या. त्या साध्वीने सदर घटना आपल्या पतीच्या कानी घातली. दोघांनाही आपल्या सेवेची कृतकृत्यता वाटली. दुपारी निर्गुण मठी दर्शनास गेल्यानंतर तो प्रसाद निर्गुण पादूकांना स्पर्श करून सितामाईंनी भक्षण केला त्यावेळी रामरावांचे वय होते ६२ व सितामाईचे ५९ पण तो प्रसाद भक्तकाम कल्पद्रुम स्वामींचा होता तो व्यर्थ कसा होणार ?

यथावकाश सीतामाईंना माघ व.२ गुरुवार दि.३१ जानेवारी १९०७ रोजी सायंकाळी एका दिव्य बालकाला जन्म दिला. माता पित्यांना त्या दिव्य प्रसाद पाहून अत्यंत आनंद झाला. वयाच्या ५९ व्या वर्षी विटाळ नाही अशा पवित्र अवस्थेत पुत्ररुपी प्रसाद ! गाणगापुरी मिळालेला हा कृपाप्रसाद म्हणून त्या दिव्य बालकांचे नाव ‘गुरुनाथ’ असे ठेवण्यात आले.

गुरु अनुग्रह 

हैद्राबादेतील सिध्दपुरुष श्री बाळकृष्णानंद (हे पांडुरंग भक्त) यांचेकडे या दांपत्याचे जाणे येणे असे. त्यांचेकडे सुर्योदयाच्या वेळी द्वादशीस अन्न संतर्पण असे. त्याठिकाणी दंडवत घालीत जाण्याचा नियम गुरुनाथांनी केला. त्याठिकाणी ते पंगत वाढणे पत्रावळी उचलणे अन्य सेवाही केल्या. त्याकडे पाहून बाळकृष्णानंद प्रसन्न झाले. एका प्रसन्न क्षणी ते म्हणाले, ‘माझ्या मनात देवी गायत्रीची अनुष्ठाने करण्याची तिव्र इच्छा होती ती आता गुरुनाथ पूर्ण करेल.’

वयाच्या २४ व्या वर्षी त्यांना बाळकृष्णानंद म्हणजेच बापूराजांचा अनुग्रह प्राप्त झाला. मरणोत्तर अवस्थेतही ते गुरुनाथांना शोधत होते. त्यांनी आपली नजर गुरुनाथांवर स्थिरावली व बापूरावांच्या मुखातून एक दिव्य ज्योत निघून गुरुनाथांचे मुखात प्रवेश करती झाली व बाळकृष्णानंदांचा आत्मा अनंतात विलीन झाला.

गुरुनाथा (बाबा) हे मातृभक्त. ते आईचे आज्ञेशिवाय ते कोठलेही कार्य करीत नसत. आईच्या हातचा प्रसादच ते अनुष्ठान काळात घेत असत. स्वत:च्या लग्नातदेखील त्यांनी आईच्या हातच्या स्वयंपाकाचेच भक्षण केले. रोज ‘आईवडिलांचे चरणतीर्थ ते प्राशन करीत. एकदा असा प्रसंग आला की आईला पायाला जखम झाली व डॉक्टरांनी पाय कापून टाकण्याचा सल्ला दिला पण पाय कापला तर चरणतिर्थ कसे घेणार ? त्यांनी आपल्या गुरुंना स्मरून पाय न कापण्याचा सल्ला दिला व १३ व्या दिवशी एक चमत्कार घडला. मातोश्रींचा पाय पूर्णपणे बरा झाला. डॉक्टरही चक्रावले. वयाच्या ३१ व्या वर्षी मातृइच्छा पूर्ण करण्यासाठी हैद्राबाद ते पंढरपूर त्यांना कावडीत बसवून प्रवास पायी केला.

गुरुनाथांचे कॉलेजचे शिक्षण चालू असतानाच त्यांचा विवाह गाणगापूर येथील चौडापूर येथील संस्कारसंपन्न व सुस्वरूप पद्मावती बाईंशी १९२२ मध्ये झाला. भाद्रपद व. ७ शके १८५२ गुरुनाथांना पुत्ररत्न प्राप्त झाले तेच व्यंकटेश उर्फ प्रभू. आजोबा आजीच्या आनंदाला पारावार उरला नाही. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचे पितृरत्न हरपले. गुरुनाथांनी मातेचे सांत्वन तर केलेच पण त्यांची खूप सेवा केली. त्यांची सुशीला नावाची मुलगी १२ व्या वर्षी मृत झाली नंतर झालेल्या दोन्हीही मुली अल्पायुषी ठरल्या. अशा अनेक संकटातही त्यांनी बापूराजांनी समाधीची दंडवत सेवा चालूच ठेवली. त्यातच पद्मावती आईसाहेब वयाच्या ३१ च्या वर्षी सोडून गेल्या. त्यावेळी सीताआई खूपच थकलेल्या होत्या. त्यांनाही हे दु:ख सहन झाले नाही. मातोश्रींचे इच्छेखातर लक्ष्मीबाईंशी त्यांचा दुसरा विवाह वयाच्या ३२ व्या वर्षी संपन्न झाला. मुलगा मुलगी झाली पण ती दोन्हीही अपत्ये अल्पायुषी ठरली. दुसरी पत्नीही वयाच्या ४६व्या वर्षी स्वर्गवासी झाली.

उपासना व अनुष्ठाने  

गुरुनाथांनी हैद्राबादचे संस्थानिक राजे शामराज बहादूर यांचेकडे १७ वर्षे व ५ दिवस मानाची नोकरी केली. ते तसे विरक्त पण या समस्यांनी ते अधिकच विरक्त झाले. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व सद्गुरु बापू राजांनी १६व्या वर्षी दिलेल्या गायत्री अनुष्ठानाचा विचार घोळू लागला. एक पूरश्चरण म्हणजे २४ लाख जप. अनुष्ठान काळात आंतरिक तसेच बाह्य विचार आचार नेम व निष्ठा निर्मळ असावी. त्यांनी १११ श्री सत्यनारायण पूजा, १०८ वेळा भागवत सप्ताहा वाचन करून बापूराजच्या समाधीचे दर्शन करून गायत्री पूरश्चरणास प्रारंभ केला. एका अनुष्ठानास ६ ते १० महिने कालावधी लागे, पहाटे ५॥ वाजल्यापासून अनुष्ठान, माध्यान्ह स्नान, गुरुचरित्र वाचन, गोसेवा, प्रसाद व रात्रीचे चक्री भजन असा कार्यक्रम असे. प्रत्येक अनुष्ठानानंतर ते गायत्री यज्ञ करीत असत. सलग २४ अनुष्ठाने पूर्ण झाल्यावर श्री समर्थ रामदासांनी त्यांनी राहिलेली १२ गायत्री अनुष्ठाने पूर्ण करण्यास सांगितले. आयुष्यात १०० गायत्री पुरश्चरणे व १०० गायत्री यज्ञ त्यांनी केले. नदीत समुद्रात तसेच काही तिर्थक्षेत्री त्यांनी ही अनुष्ठाने व यज्ञ केले. एक अनुष्ठान चाफळ, एक सज्जनगड येथेही केले.

dandawate maharaj
.

याच काळात ११ मुखे व २२ हस्त असे मारूतराय २१ मुखे ८४ हस्त असलेले गणराय यांनी त्यांना दर्शन दिले व त्यांची उपासना रूढ करण्याच्या हेतूनेच २१ मुखे असलेली गणेशमूर्ती ठाणे येथे व मारूती रामाची मूर्ती सोलापूर येथे प्रतिष्ठापीत केली. त्यांचे गायत्री अनुष्ठान नागाव, उरण येथे चालू असताना गुरुवर्य  बापूरावांनी  शेषरूपात दर्शन दिले. पू. गुरुनाथांनी शेषाला दूध पाजले व बाबाच्या खोलीत ठेवले. त्या शेषानी रात्री बाबांना मिठी मारली आणि बाबांची छातीची दुखण्याची व्याधी दूर झाली. अनुष्ठानात कोणालाही स्पर्श करायचे नाही असे व्रत असल्यास ते गाडीत न बसता पायीच प्रवास करीत. आईच्या इच्छेनुसार व्यंकटेशास दंडवत घालीत हैद्राबाद ते तिरुपती हे ५३२ मैल दंडवत करीत गेले. यास त्यांना ८ महिने कालावधी लागला. त्यानंतर गाणगापूर धरणी नृसिंह पंढरपूर नंतर बद्रीनारायण पर्यंत दंडवत सेवेनीच पूर्ण केले. ३२ वर्षे पायी प्रवास करून विविध गावे, वाड्या, शहरे येथील असंख्य भक्तजनांशी संपर्क ठेवला व वाढविला. भक्तीमार्गाचा प्रसार केला. गायत्री मातेची स्थापना केली. आपल्या गुरुंचे माता पित्यांचे स्थान पंढरपूर येथे निर्माण केले. गाणगापूर आश्रमात अतिथी सेवा व भिक्षादानाची व्यवस्था केली. विकाररहीत राहण्यासाठी गुहांची निर्मिती करून त्यात अनुष्ठाने केली. श्रीगुरुनाथांवर श्रीसूर्यनारायणाची कृपा झाली व सूर्यही शितल वाटू लागला.  पुण्याचे डॉ. जठार, मुंबईचे डॉ. सरदेसाई यांनी सूर्य उपासनेपूर्वी व नंतर डोळ्याची तपासणी केली व दोन्हीही डोळ्यात काही फरक न जाणवल्याने अलौकीक व्यक्तीमत्व असल्याचा निर्वाळा दिला.

गुरुनाथांचे एकमेव सुपुत्र प्रभुराजा हे अनुष्ठानापासून दूरच होते. त्यांच्या वयाच्या ४२ व्या वर्षी बापूरावांच्या मार्गदर्शनाने श्री गुरुनाथांनी त्यांना गाणगापूरात अनुग्रह देऊन कृतार्थ केले. आणि गायत्री अनुष्ठान व गुरुचरित्र पारायणाची आज्ञा केली. औदुंबराखाली सुर्योदय ते सुर्यास्त उभे राहून गुरुचरित्र वाचनास प्रारंभ केला व केशर कस्तुरीचा सुगंध प्रसृत झाला. अनेकांनी याचा अनुभव घेतला. दुसऱ्या पारायण काळात त्यांच्या शरीरातून सुगंध येऊ लागला व तिसऱ्या व अंतीम एका पारायणापूर्वीच रात्री आवाज आला, “मी तुझी वाट पहात आहे लवकर उठ” “प्रसाद आणलेला आहे” प्रभुराज सुगंधाच्या दिशेने औदूंबरापर्यंत पोहोचले आणि काय आश्चर्य ‘निर्गुण पादुका’ ५१६ वर्षांनी नृसिंहसरस्वती आवताराचीच पुनरावृत्ती. त्यानंतर तिसरे नव्हे तर ६ अनुष्ठाने केली. निर्गुण पादुकांची मिरवणूक काढली. त्यांनाही विष्णु रूपात भगवान दत्तात्रेयांचे दर्शन झाले.

श्री गुरुनाथांनी १९८३ मध्ये १०० गायत्री पुरश्चरणे व गायत्री यज्ञ पूर्ण केले. १९८५ मध्ये अधिक मासात अंतीम सेवा करून ३१/८/१९८५ ला दुपारी ४॥ वाजता सोलापूर मुक्कामी देह दत्तचरणी विलीन केला. अंतीम श्र्वासापर्यंत अखंड गुरुचरित्र सप्ताह लावला. अनुष्ठान विभूती माधूकरी ही सेवा दत्तचरणी अर्पण केली. पुढे पिठाधीश म्हणून प्रभुराज यांनी सेवा व अनुष्ठानाचा वारसा चालविला.

।। श्री गुरु शरणम् ||