श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार)

जन्म: १८४४ सरंजाम शाहीतील सधन कुटुंबात 
आई/वडिल: ज्ञात नाही 
कार्यकाळ: १८४४ - १९२५
अनुग्रह: श्री नृसिंहसरस्वती 
संप्रदाय: दत्त संप्रदाय
निर्वाण: १८/२/१९२५

विदर्भमहाकोशलकडे एक महान विभूती मोतीबाबा जामदार या नावाची होऊन गेली. त्याकाळी इंग्रजी राजवट सुरू झाली होती. सरंजामशाहीतील एका संपन्न कुटुंबात मोतीबाबांचा जन्म झाला. त्यांचे संस्कृत शिक्षण एका शास्त्र्यांच्या देखरेखीखाली झाले. त्यांनी पारशी भाषेचाही अभ्यास केला. हिस्लॉप नावाच्या धर्मोपदेशकाने स्थापन केलेल्या इंग्रजी शाळेत त्यांचे अध्ययन झाले. कलकत्ता विश्र्वविद्यालयातून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली.

नंतर त्यांची नेमणूक तहसीलदार म्हणून झाली. वऱ्याड, मध्यप्रदेश येथे त्यांनी काम केले. याच काळात गुरुचरित्राचे अनुष्ठान त्यांनी केले. अनेकदा ते समाधीसारख्या अवस्थेत असत. अशाच एका समयी श्रीनरसिंहसरस्वतींनी त्यांना उपदेश केला. पुढेही मोतीबाबांनी आपली साधना वाढविली. त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा प्रभाव लोकांच्या ध्यानात आला. ते मोतीबाबांकडे येऊ लागले. ज्ञानेश्वरी, योगवासिष्ठ, पंचदशी, अद्वैतसिद्धी इत्यादी ग्रंथांचा त्यांचा अभ्यास सखोल होता.

मधून मधून मोतीबाबा गाणगापूर येथे जात असत. लोकांच्या विविध प्रकारच्या पीडा त्यांनी दूर केल्या. अनेक प्रकारचे चमत्कारिक अनुभव त्यांना व त्यांच्या भक्तांना येत गेले. इंग्रज अधिकाऱ्यांनाही त्यांचे महत्त्व पटले. गुरुपौर्णिमा व दत्तजयंती ते मोठ्या भक्तिभावाने साजरी करीत. पुण्यात रँडचा वध करणाऱ्या दामोदर चाफेकर यांनाही मोतीबाबांनी आश्रय दिला होता. त्यांना दोन पुत्र झाल्यावर त्यांची पत्नी निधन पावली. तरी मोतीबाबांनी आपला प्रपंच निष्कलंक अवस्थेत सांभाळला.

मोतीबाबा १८९९ साली सेवानिवृत्त झाले. आणि नागपूरला स्थायिक झाले. साधना आणि स्वाध्याय त्यांनी चालूच ठेविला. घरीच त्यांची प्रवचने होत असत. केशवराव ताम्हन, भटजीशास्त्री घाटे इत्यादी लोक त्यांच्या प्रवचनास येत असत. १९२२ मध्ये त्यांच्या दत्तजयंतीच्या उत्सवास अलोट गर्दी झाली. मोतीबाबा लवकरच समाधी घेणार ही वार्ता त्यांना कळली होती. मोतीबाबा दत्तजन्माच्या वेळी ध्यानमग्न अवस्थेत होते. १९२४ साली ‘अहंब्रह्मास्मि’ या महावाक्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. गाणगापूरला आपण देह सोडावा, या हेतून त्यांनी ऐंशीव्या वर्षी गाणगापूरचा प्रवास केला. त्यावेळी नागपुरास परत जा असा संदेश त्यांना मिळाला. तो त्यांनी मानला. आणि १८ फ्रेब्रुवारी १९२५ मध्ये त्यांनी दत्तचरणांचा आश्रय घेतला.

ब्रह्मीभूत मोतीबाबा यांचा चरित्रग्रंथ बाबासाहेब जामदार व काकाजी जामदार यांनी लिहून प्रसिद्ध केला. या ग्रंथात मोतीबाबांच्या कवितांचा संग्रह आहे. कालियामर्दन, नरसिंहसरस्वतीप्रार्थना, श्रीपांडुरंगस्तुती, श्रीकृष्णतारक, ज्ञानदेव दशक, सद्गुरुप्रार्थना, श्रीगुरुवंदना, कुट पदे इत्यादींचा त्यात समावेश आहे.

श्री गुरूंचा संकटमुक्ती साठी प्रभावी मंत्र 

अनसुयात्री संभुतो दत्तात्रेयो दिगंबर: ।
स्मर्तु गामि स्वभक्तानां उधर्ता भवसंकटात ||