श्री दत्तात्रय

श्री दत्तात्रय- अनादिकालापासून पुजले गेलेले दैवत
श्री दत्तात्रय- अनादिकालापासून पुजले गेलेले दैवत

दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी !
औदुंबरी नित्य वसे, भक्‍तकाम पुरवितसे !
कमलनयन श्याम दिसे, धन्य तो जनी !
अनसूया ज्याची माय, दृढ धरिले ज्याचे पाय !
त्याचे चरित वर्णू काय, सकळ तो जनी !
विनायक दास दीन, जळाविणा जैसा मीन !
ब्रम्हा-विष्णु-महेश तीन आठवी मनी !!
!! ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय !! 

श्री दत्तावताराचे प्रयोजन

श्री दत्तात्रेय ही देवता कशी आहे, तिचे स्वरुप काय आहे, तिचे कार्य काय आहे, हे देवता स्वरुप कशामुळे हृदयात साकारते, या देवतेच्या प्रसंन्नतेचा प्रसाद म्हणुन काय प्राप्त होते; हे श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांनी रचलेल्या श्रीदत्तलीलामृताब्धिसार या ग्रंथातल्या पहिल्या दोन श्लोकात आले आहे. श्रीभगवान दत्तात्रेयांचे वर्णन करतांना श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज  म्हणतात,

ॐकार ज्याचा वाचक | जगध्देतू धीप्रेरक | तोचि देव सच्चित्सुख | एक दत्त || १ ||
दत्त अज निराकार | स्वेच्छामात्रें हो साकार | अव्ययात्मा भक्ताधार | भक्तिगम्य || २ ||

अर्थ:
आत्मानंदा कडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्या बद्दल बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे. || १ ||
हा जन्म रहित निराकार आहे. भक्तांच्या इच्छामात्रे साकार होतो. हा अखंड निराकार आत्मस्वरुप आहे. भक्तांचा आधार आहे. आणि भक्तिने जाणला जातो. || २ ||

श्री दत्तावताराचे स्वरुप 

श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे. दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे. ‘तत् त्वम् असि’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ इ. वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच.                  

श्री दत्तावताराच्या स्वरुपाचे चिंतन  खालील शब्दात करता येईल,

मालाकमंडलुरध: करयस्त्र युग्मे मध्यस्थ पाणि युगुले डमरू त्रिशुले ।
यस्यस्त ऊर्ध्वकरयो: शुभशंखचक्रे वंदे तमत्रिवरदं भुजषट्क युक्तम् ॥

सगुण परमात्म्याची पूजा ध्यानमंत्राने सुरू होते. अर्थात या ध्यानमंत्रामुळेच आराध्य परमात्मा भक्तापुढे साकार होतो. भगवान दत्तगुरूंच्या वरील ध्यानमंत्रामुळेच त्यांचे रूप भक्तांपुढे अभिव्यक्त होते. परमात्मा भगवान श्रीदत्तगुरूंच्या खालच्या दोन हातांत माळ आणि कमंडलु, मधल्या दोन हातांत डमरू, त्रिशुळ आणि वरच्या दोन हातांत शंख आणि सुदर्शनचक्र अशा प्रकारची आयुधे षड्भुजांमध्ये धारण करणाऱ्या, भक्तांना वर देणाऱ्या, मनोरथ परिपूर्ण करणाऱ्या अनंतकोटी ब्रह्मांडनायक, अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेयांना मी नमस्कार करतो.

गुजरातच्या प्रख्यात दत्तभक्त श्री स्वामी रंगावधूतांनीसुद्धा ‘रंग रहस्य’ या स्तोत्रग्रंथामध्ये आपल्या अनुभूतीनुसार भगवान श्री दत्तात्रेयांचा ध्यानमंत्र प्रस्तुत केलेला आहे, तर महानुभाव नाथपंथियांनी स्वानुभावानुसार भगवान श्री दत्तात्रेयांना साकार केलेले आहे. 

“भस्मोद्धलित जराधरं विभुवर” अशा शब्दावलीत शांडिल्य उपनिषदांनी भगवान श्री दत्तात्रेयांची प्रार्थना केलेली आहे तर गुलाबरावांना सुवर्णपात्र हातात घेऊन भिक्षेसाठी देशाटन करणाऱ्या भगवान श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले. प्राय: सर्वत्र भगवान श्री दत्तात्रेय यतिवेषात दिसतात. परंतु ‘दत्तात्रेय सर्वस्व’ या प्राचीन ग्रंथात भगवान श्री दत्तात्रेय राजविलासी आणि ऐश्वर्यशाली असल्याचा उल्लेख आहे. महान तपस्वी अत्रिऋषी आणि श्रेष्ठ पतिव्रता अनुसूया या दांपत्याचे ठिकाणी भगवान श्री दत्तात्रेयांचा आविर्भाव झाला.

महासाध्वी अनुसया माता बालक स्वरूप त्रिमूर्तींना भोजन घालताना
महासाध्वी अनुसया माता बालक स्वरूप त्रिमूर्तींना भोजन घालताना

श्री दत्तजन्म कथा

अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमांत पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवां करित असे. तसेच आश्रमांत येण्याऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदरानें स्वागत करी. वेळीअवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्तहस्तानें गेला नाहीं. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धां तिला भिऊन वागे; अग्नि तिच्यापुढें शीतल होई; पवन तिच्यापुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिचपुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रत्याच्या प्रभाव ! पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ति व लोकांबद्दलअसलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नांव 'साध्वी व पतिव्रता स्त्री' म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात् नारदुमुनींच्या सुद्धा कानांवर गेल्या शिवाय राहिली नाही. नारदांचे नांवच मुळी' कळीचा नारद ' तेव्हां ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला (विष्णूची पत्नी) सांगितली, पार्वतीपुढे (शंकराची पत्नी) अनुसूयेच्या पतिव्रत्याचे गुणगान गाइले, सावित्रीपुढे (ब्रह्मदेवाची पत्नी) तिच्या आदरातिथ्याविषयी धन्योद्गार काढले. तेव्हां साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसूया यःकिंचित् मानव व आपण देवी. तेव्हां या अनुसूयेचे वर्चस्व आपणांवर उपयोगी नाहीं. तेव्हां हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनांत विचार आला आणि हा विचार त्यांनीं आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला. तेव्हां त्यात्रैमूर्ति (ब्रह्मा-विष्णु-महेश) क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या- "ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पहातो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो." अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्युलोकांत यवयास निघाले.त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातांत कमंडलू अशा थाटांत ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमांत आले. भर दुपारची वेळ ! ऊन मी म्हणत होते. अशा वेळीं आपल्या आश्रमांत आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले- "आम्हीलांबून आलो असून, तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हांस इच्छा झाली आहे की, तू नग्न होऊन आम्हांस अन्न वाढावे.

“आसनी बैसतां सत्वर । म्हणती क्षुधा लागली फार ।नग्न होऊनि निर्धार । इच्छाभोजन देइंजे ॥

हे वचन ऐकतांच अनुसूया चिंतन करीत मनांत म्हणाली- 'हे कोणी कारणिक पुरुष माझें सत्त्व पाहाण्याकरिता आले असावे. यांस जर विन्मुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानिहोईल. माझें मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचें तपःसामर्थ्य माझ्यामागे आहे.' असें मनांत आणून सती म्हणाली, - 
"थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेंच करितें.''एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरांत गेली. त्या वेळीं तिचे पति देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यांस ही सारी कथा निवेदन केली. तेव्हां मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रांत गंगोदक देऊन म्हणाले, - "हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छाभोजन दे.त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले

बाल रुप दत्तात्रय
पाळण्यातील बाल स्वरूपातील दत्तमहाराज 

हें जाणोनियां मानसीं । तीर्थगंडी देई कांतेसी । गंगा प्रोक्षूनि तिघांसी । भोजन देई जाण पां ॥

तेव्हां पतीच्या आज्ञेप्रमाणें ती तीर्थाची पंचपात्री हातीं घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली, हातांतील गंगोदक त्या तिघांवर उडविलें. तो काय? त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. लहान बालक! अगदीं लहान! तीं तीन गोजिरीं गोजिरीं बालकें पायांजवळ लोळूं लागलीं. तेव्हां अनुसूयेनें तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतलें आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणें-

कंचुकोसहित परिधान । फेडूनि ठेवी न लगतां क्षण । नग्न होवोनियां जाण । बाळांजवळी बैसतसे ॥
बाळें घेऊनि मांडोवरी । स्तनीं लावी जेव्हां सुंदरी । पान्हा फुटला ते अवसरी । देखोनि सती आनंदे ॥

अशा तर्हेने गंगोदक उडविल्यावर त्या तिघां अतिथींची बालकें झाली ती बालके रडू लागली. तेव्हां त्यांना भूक लागली असेल असें समजुन अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यांत घालून थोपटून निजविलें. असें या पतिव्रत्याचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली. पण हीं तिन्ही बालके. मात्र आहेत त्याच स्वरूपांत राहिली. असें होतां होतां एकदां नारदमुनीचीं स्वारी अत्रिमुनींच्या आश्रमांत आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले तेव्हां त्यांच ठिकाणीं ती तीन बालके ( ब्रह्मा-विष्णु-महेश ) रांगत खेळत असतांना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते कांहीच बोलले नाहींत. अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकीं आले व ही गोष्ट त्यांनीं लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या.

ऐसें सांगता ब्रह्मपुंत्र । तिघी मिळाल्या एकत्र । जोडोनियां पाणिपात्र । नारदासी विचारिती ।

तेव्हां त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की, 'हे मुनिवर, आम्हांला त्या अत्रिमुनींच्या आश्रमांत घेऊन चला. म्हणजे आम्ही आपापले भ्रतार (पति) परत शोधून घेऊन येऊं. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनींचा आश्रम दाखविला. इकडे या तिघी त्या अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकुन झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिनें हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हां अत्रिमुनींनी फिरून गंगोदक देऊन तें त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले.तेव्हा हातांत तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हां तीं बालकेंपूर्ववत् देवस्वरूप झाली. ब्रह्मा- विष्णु- महेश. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनीं देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णु, शंकर, ब्रह्मदेव, प्रसन्न झाले व म्हणाले, "हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग !" तेव्हां अनुसूयेने 'तिघे बालक (ब्रह्मा - विष्णु- महेश) माझ्या घरीं तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाने राहूं देत' असा वर मागितला. तेव्हा 'तथास्तु' असें म्हणून देव अंतर्धान पावले. आणि बालक रूपातील श्री दत्त महाराज अत्रि आश्रमात,

बाल स्वरूपातील दत्तमहाराज अत्रि आश्रमात
बाल स्वरूपातील दत्तमहाराज अत्रि आश्रमात

मासांमाजीं मार्गेश्वर । उत्तम महिना प्रियकर । तिर्थीमाजीं तिथी थोर । चतुर्दशी शुद्ध पैं॥
वार बुधवार कृत्तिका नक्षत्र । ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र । तिघे मिळोनि एकत्र । शुद्ध सत्त्व निवडिलें ॥
त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन । मूर्ति केली असे निर्माण । ठेविते झाले नामभिघान । दत्तात्रेय अवधूत ॥

अशा तर्हेनें मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय ! तेव्हांपासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकालीं दत्ताच्या देवालयांत दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी १२ वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो.

श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत.

दत्त जन्म विषयी आणखी काही कथा

वैकुंठीच्या राणाने अनेक अवतार धारण केले. काही अवतार दैत्यनाशासाठी केले. काही भक्तरक्षणासाठी केले. आणि ते कार्य झाल्यावर भगवंतानी लगेच अवतार समाप्ती केली. पण श्रीदत्तअवतार हा काही वेगळाच, विलक्षण, दिव्य असा अविनाशी अवतार भक्तांना प्रबोधनासाठी धारण केला. या अवतारातही भगवंत शत्रूनाश करीत असतात. पण ते बाह्य शत्रू नव्हेत. 

देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आले. श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.

दत्तावताराची प्रमुख वैशिष्ट्ये

१) साधुंचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सध्दमाचे आचरण हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्ठ होय! इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यँत असाच चालू राहणार आहे.
२) ब्रम्हदेवाचा पुत्र अत्रि व त्याच्या कठोर तपश्र्चर्येचे फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला आणि म्हणूनच तो अयोनीसंभव मानला जातो.
३) या अवतारात ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे व त्यांच्या परंपराचे ऐक्य आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी प्रसिध्द असलेल्या या तीन देवांचे एकरुपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय.
४) दत्तावतार हा ब्राम्हण कुलातील असून सती अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास महत्व आहे.

श्री दत्तात्रेयांचे भ्रमण
श्री दत्तगुरूंचे  भ्रमण

५) राम, कृष्ण इ.अवतार हे गृहस्थाश्रमी होते तर दत्तावतार हा फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमात राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा आहे.
६) हा अवतार म्हणजे साक्षात परब्रम्हमूर्ती श्रीसद्गुरुंचाच अवतार होय आणि म्हणूनच साधक "श्री गुरुदेव दत्त"असायांच्या नावाचा जयघोष करतात.
७) श्रीदत्त हे केवळ गुरुदेव नसून ते "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"या स्वरुपात आहेत।
८) श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेषात व स्वरुपात म्हणजेच अवधूत, फकीर, मलंग, वाघ इ. दर्शने दिली आहेत.
९) दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पध्दतीचा पुरस्कार करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्याच्या उपासनेस कोणताच प्रतिबंध नाही.
१०) दत्त व दत्त संप्रदायाचा नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी इ. उपासना पंथांशी घनिष्ट संबंध आहे. उदा. गोरक्षनाथ हे दत्तात्रेयांचे शिष्य, महानुभाव पंथात एकमुखी दत्ताची पुजा होते. समर्थ रामदासांना श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले होते आणि विशेष म्हणजे स्वत: दत्तात्रेय हे निस्सिम देवीभक्त होते.
११) औदुंबरतळी वस्ती,जवळ धेनु व श्र्वानाचे सान्निध्य हे दत्तावताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य.
१२) "त्रिमुखी" किंवा "एकमुखी" दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच "दत्तपादुका"ची ही पूजाअर्चा अनेक दत्तस्थानांवर केली जाते.
१३) "गुरुवार" हा दत्तांचा वार. याच दिवशी घराघरांतून व दत्तस्थानांतून दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले जाते. मार्गशीर्ष प्रौर्णिमा ही "दत्तजयंती" म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
१४) श्री दत्तात्रेयांचे १६ प्रमुख अवतार आहेत.
१५) श्रीदत्त उपासनेत योगाला अनन्य साधारण महत्व आहे. शाक्त व तांत्रिकांनीही श्री दत्तात्रेयांना आपले आराध्य दैवत मानले आहे.
१६) श्री दत्तात्रेय हे शरणगत वत्सल व भक्तांवर अनुकंपा व दया करणारे आहेत आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच ते भक्ताची आर्त हाक ऐकून धाऊन येतात.
१७) धर्म व अध्यात्मात व्यापक व उदार दृष्टीकोन हा दत्तावताराचा आणखी एक विशेष एक विशेष आहे.
१८) दत्त संप्रदायाचेचतत्वज्ञान उदात्त, दिव्य, भव्य, निर्मळ व सोलीव अव्दैत स्वरुप आहे.
१९) भूत-प्रेत-पिशाच्चे दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी राहात नाहीत.
२०) दत्तात्रेयांच्या व्यापक व उतार दृष्टीमुळे ही उपासना प्रणाली किंवा संप्रदाय कल्पान्तापर्यँत खचितच पथप्रदर्शन करीत राहील.
२१) जोपर्यँत जगामध्ये मानव हा तापत्रयांनी त्रस्त व पीडित असा राहील तोपर्यँत दत्तात्रेय अज्ञानान्धकारात त्यास सदैव मा र्गदर्शन करीतच राहतील.

श्री दत्तात्रय नावाची सार्थकता

अनसूयात्रिनंदन ‘दत्त’ नावाची सार्थकता निवेदन करताना श्रीमत् भागवतकार सांगतात,

अन्नेरपत्यमभिकांक्षत आह तुष्टो । दत्तो मयाऽमिति यद् भगवान स दत्त: ॥

अर्थात (स्वत: श्री भगवान विष्णु सांगतात) मीच स्वत:ला दिले, अत्रिऋषींच्या पुत्राकांक्षेच्या तपस्येवर मी संतुष्ट झालो आहे, मी प्रकट होऊन अत्रिऋषींची अपत्याकांक्षा पूर्ण केली, मीच मला दिले व अशाप्रकारे दिलेला म्हणून ‘दत्त’ नाव सार्थक झाले. 

१) भारत राष्ट्राचा मध्ययुगीन काळखंड चौदावे शतक. या काळखंडात भगवान श्री दत्तात्रेयांचा प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि द्वितीयावतार भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज या दोन्ही युगप्रवर्तक महानुभावानी महाराष्ट्र तथा कर्नाटक प्रांतांत दत्तोपासनेचा प्रसार-प्रचार केला. 

२) त्यापूर्वी म्हणजे बाराव्या शतकात महानुभाव संप्रदायाचा आविर्भाव झाला. हा संप्रदाय केवळ दत्तप्रणितच नव्हे तर या संप्रदायाचे आदिगुरूसुद्धा भगवान श्रीदत्तात्रेय हेच आहेत. 

३) महानुभाव संप्रदायापूर्वी अनेक शतकांच्या आधी नाथसंप्रदाय निर्माण झाला. हा संप्रदाय भगवान श्रीदत्तात्रेयांनाच आदिगुरू मानतो. 
दत्तावताराची औपनिषदिक पृष्ठभूमीवर भगवान श्रीदत्तात्रेयांच्या प्राचीनतेला औपनिषदिक ग्रंथसुद्धा प्रमाणभूत आहेत.       

श्रीदत्तात्रेयांचे  कृपानुग्रहित शिष्य

श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते. सहस्त्रार्जुन कार्तवीर्य, भार्गव परशुराम, यदु, अलर्क, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले जातात. या शिवाय ‘अवधूतोपनिषदा’त आणि ‘जाबालोदर्शनोपनिषदां’त ‘संस्कृती’ नामक आणखी एक शिष्य उल्लेखिलेला आहे. या शिष्यांवर श्रीदत्तात्रेयांनी आपल्या कृपेचा वर्षाव केला आणि त्यामुळे या शिष्यांनी असे विलक्षण कार्य केले की पुराणांना त्यांची दखल घ्यावी लागली.

१) यदुराजा

ययाती राजाची कथा प्रसिद्ध आहे. त्याला दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि दैत्यांचा राजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा अशा दोन पत्नी होत्या. ययाती हा अतिशय पराक्रमी आणि वैभवसंपन्न असा राजा होता. त्यांनी संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकून घेतले होते. आपल्या राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेत त्याने अनेक वर्षे राज्य केले. कालांतराने तो वृद्ध झाला. मात्र तरीही त्याची भोगलालसा काहीं कमी होईना, त्याला शुक्राचार्यांनी आशिर्वाद दिला की जर तुला तुझ्या कोणत्याही मुलाने तारुण्य दिले आणि तुझे वार्धक्य स्वीकारले तर तुला पुन्हा सर्व भोग घेता येतील. त्याला देवयानीपासून यद् व तुर्वस्तु असे दोन आणि शमिष्ठेपासून अनू, द्रह्यु आणि पुरु असे तीन एकुण पाच पुत्र झाले होते. त्याने पाचहीं पुत्रांना आपले वार्धक्य स्वीकारण्याबद्दल विचारणा केली. तेव्हा पुरूने त्याचे वार्धक्य स्वीकारून आपले तारुण्य त्याला दिले. त्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र यदू याने वार्धक्य स्वीकारायला नकार देताना जर मी माझे तारुण्य तुम्हाला दिले आणि तुम्ही देवयानीबरोबर भोग भोगलेत तर तुमच्या रूपाने मीच माझ्या आईबरोबर भोग भोगल्याचे पाप मला लागेल असे सांगितले. तेव्हा संतापून ययातीने त्याला हाकलून दिले आणि त्याला राज्याचा भागही दिला नाही. भविष्यात राजा बनल्यावर पुरू राजाने आपल्या ज्येष्ठ भावाला, यदूला राज्याचा वाटा दिला. हा यदू राजा अत्यंत नीतिमान आणि श्रीदत्तात्रेयांची असीम भक्त होता. वडिलांनी हाकलून दिल्यानंतर तो श्रीदत्तात्रेयांच्या शोधात भटकत होता. एकदा दक्षिण भारतामध्ये कावेरी नदीच्या परिसरात फिरत असताना त्याला श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये दर्शन दिले. तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला, त्याच्या डोळ्यांमधून अश्रुपात सुरू झाला. त्याने श्रीदत्तात्रेयांच्या चरणी परमज्ञान देण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीदत्तात्रेयांनी त्याला संपूर्ण ज्ञानाचा बोध केला आणि त्याच्यावर पूर्ण कृपा केली. यदुराजाने श्रीदत्तात्रेय यांची शेवटपर्यंत उत्कट भक्ती केली. त्याने धर्माच्या अधीन राहून प्रजेचा पुत्राप्रमाणे सांभाळ करून अत्यंत ऐश्वर्यशाली असे राज्य केले. त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला. याच यशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला. यदू हा श्रीदत्तात्रेय यांचा लाडका शिष्य होता आणि त्यांनी त्याला सर्व प्रकारचे ज्ञान आणि ऐश्वर्य प्रदान केले.

२) परशुराम

ऋषिश्रेष्ठ जमदग्नी आणि रेणुका यांचा पुत्र म्हणजे परशुराम. त्यांना एकूण चार पुत्र होते. परशुराम यांना विष्णूचा अवतार मानलेले आहे. जमदग्नी ऋषि हे अत्यंत कोपिष्ट होते. एकदा त्यांची पत्नी रेणुका पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता तिला उशीर झाला म्हणून ते अतिशय रागवले, त्यांनी आश्रमात असलेल्या आपल्या पुत्रांना आपल्या आईचा वध करायला सांगितले. त्यांनी मातृवधाला नकार दिला. थोड्या वेळाने बाहेर असलेला परशुराम आश्रमात आला तेव्हा जमदग्नी ऋषींनी त्याला आपल्या मातेचा वध करायची आज्ञा केली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या परशुने आपल्या आईचे मस्तक धडावेगळे केले. ते पाहिल्यावर जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला. त्यांनी परशुरामाला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा त्याने आपल्या आईला पुन्हा जिवंत करा आणि आपला कोपिष्ट स्वभाव संपवा असे वर मागितले. जमदग्नी ऋषींनी रेणुका मातेला जिवंत केले, परशुराम हे बाह्यवृत्तीने ऋषी असले तरी त्यांचा स्वभाव क्षत्रियाला साजेसा असा होता. त्यांना सर्वसामान्यांबद्दल अतिशय कळकळ होती. त्यांनी सर्व विद्या, कला आणि सिद्धी आत्मसात केल्या होत्या. ते शस्त्र आणि युद्ध विद्येतही निपुण होते. ते ही आपल्या पित्याप्रमाणे थोडे रागीट स्वभावाचे होते. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे ते गुरू होते. तसेच त्यांचे महाभारत काळात भीष्मांबरोबर युद्ध झाले होते. कर्णाला ब्रह्मास्त्र विद्या त्यांनी शिकवली होती. एके काळी संपूर्ण भारतवर्षामध्ये क्षत्रियांनी सर्वत्र अराजक माजवले होते. सर्व क्षत्रिय भोग विलासामध्ये रममाण झाले होते. कोणीही प्रजेची काळजी घेत नव्हते. सर्वत्र अनाचार आणि अनीती यांना उत आला होता. अशावेळी परशुरामाने प्रतिज्ञा केली आणि एकदा-दोनदा नव्हे तर एकवीस वेळा पृथ्वी पूर्णपणे निःक्षत्रिय करुन टाकली, त्यांच्या या अलौकिक कार्याने सर्वजण भयभीत झाले आणि त्यांना शरण गेले. त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर यज्ञ केले आणि सर्वत्र यज्ञसंस्कृती रुजविली. त्यांनी अपार दानधर्म केला. शेवटी सर्व पृथ्वी त्यांनी कश्यपऋषींना दान केली. त्यानंतर त्यांना राहण्यासाठी त्यांनी समुद्राकडे जागेची विनंती केली आणि त्यातून कोकण भूमी निर्माण झाली असे कथानक आहे. याच कोकणामध्ये महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करीत असताना त्यांनी श्रीदत्तात्रेय यांची उपासना केली. श्रीदत्तात्रेय यांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली आणि त्यांना ब्रह्मविद्या आणि श्रीविद्येची उपासना सांगितली. श्रीदत्तात्रेय आणि परशुराम यांचेमधील संवाद "श्री दत्तभार्गव संवाद" म्हणून प्रसिद्ध आहे. 'त्रिपुरारहस्य' नावाच्या ग्रंथामध्ये हा संवाद असून श्रीदत्तात्रय यांनी परशुराम यांना चिरंजिवित्व बहाल केले. आजही परशुरामांचे वास्तव्य श्री दत्तप्रभूबरोबर बद्रिनाथाजवळ बद्रिकाश्रमामध्ये आहे, अशी श्रद्धा आहे.

३) आयुराजा

सोमवंशातील अतिशय प्रसिद्ध असा राजा म्हणजे नहुष हा होता, त्याने अपार पराक्रम गाजविला आणि शेवटी तो इंद्रपदी आरुढ झाला अशी कथा आहे. आयुराजा हे नहुषाचे वडील होते. त्यांची पत्नी इंदुमती ही देखील अत्यंत सदाचरणी आणि सत्त्वशील होती. विवाहानंतर कितीतरी वर्षे लोटली तरी त्यांना संतती नव्हती. यासाठी काय करावे अशा चिंतेत ते असताना त्यांना त्रषिमुनींनी श्रीदत्तात्रेयांना शरण जा अशी सूचना केली. तेव्हा सह्याद्री पर्वतावर जाउन श्रीदत्तात्रेयांचा ते शोध घेऊ लागले. एके ठिकाणी त्यांना एका झऱ्याकाठी श्रीदत्तात्रेय बसलेले दिसले. त्यांच्या मांडीवर एक तरुण स्त्री बसली होती. तिच्याबरोबर त्यांचे मद्यपान सुरू होते आणि ते दोघेही धुंद झाले होते. त्यांच्या बाजूला मांसही शिजवलेले होते. अशा स्थितीत पाहूनही आयुराजाने दत्तप्रभूना विनम्रपणे प्रार्थना केली. तेव्हा हसून दत्तप्रभू म्हणाले, 'अरे, मी तर असा दुराचारी आहे, तुझी कामना मी पूर्ण करू शकणार नाही.' तरीही आयुराजा तेथून हालला नाही. तेव्हा श्रीदत्तात्रेय यांनी त्याचा अपमान केला, त्याची अपशब्दांमध्ये संभावना केली आणि त्याला हाकलून दिले. तरीही विचलित न होता, त्याने अंतःकरणपूर्वक श्री दत्तत्रेयांची उपासना सुरू ठेवली. अशी अनेक वर्षे गेली. शेवटी दत्तप्रभू त्याचेवर प्रसन्न होऊन त्याला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा आयुराजाने श्रद्धापूर्वक वर मागितला की, कर्तव्यदक्ष, पराक्रमी, आध्यात्मिक, उदार, ज्ञानी, अजिंक्य आणि दीर्घायुध असा पुत्र मला द्या. श्रीदत्तात्रेयांनी त्याला 'तथास्तु' असा आशिर्वाद दिला आणि मग चक्रवर्ती नहुषाचा जन्म झाला.

४) पुरुरवा

पुरुरवा राजाचेही गोत्र अत्रि हे होते. कोणत्या तरी शापाने तो जन्मल्यापासून अतिशय कुरुप होता, तो राजपुत्र होता. परंतु त्याचे रूप अतिशय लाजिरवाणे होते. सर्वजण त्याची निर्भत्सना आणि चेष्टा करीत असत. तो युवराज झाला.  त्याचे लग्नाचे वय झाले पण त्याला कोणीही मुलगी देईना, एखादा वधुपिता त्याला मुलगी देण्याची तयारी दाखवी, पण प्रत्यक्षात मुलगी त्याचा स्वीकार करीत नसे. आपल्या रूपामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरुरवा अतिशय निराश झाला. शेवटी त्याने ठरविले की आपण तपश्चर्या करायची. ज्या ठिकाणी अत्रि ऋषिनी तपश्चर्या केली तेथेच आपण जायचे या निश्चयाने तो बाहेर पडला. त्याने तेथे जाऊन तपश्चर्या सुरू केली. त्याला भगवान श्रीदत्तात्रेय यांनी दर्शन दिले. ते म्हणाले की, जीवन म्हणजे मायेचा खेळ आहे. ही योगमायाच आपल्याला जन्माला घालते आणि संसार क्षेत्रामध्ये खेळवते. संसार म्हणजे तिच्याच लिला आहेत. श्रीदत्तात्रेय यांनी पुरुरवाला ज्ञान आणि मंत्र दीक्षा देऊन अनुग्रह दिला. त्याला त्यांनी श्रीदेवीची उपासना करायला सांगितली. पुरुरव्याने श्रीदत्तात्रेयांची आज्ञा मान्य करून देवी उपासना सुरू केली. त्याच्या प्रखर उपासनेमुळे त्याला सुंदररूप प्राप्त झाले आणि त्याने दीर्घकाळ राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेतला आणि शेवटी तो दत्तचरणी मोक्षधामी गेला.

५) कार्तवीर्य सहस्रार्जुन

कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव शीलधारा असे होते. कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजा होता त्याला शंभर पुत्र झाले होते. परंतु एकदा काहीतरी गैरसमजुतीमधुन च्यवनऋषींनी शाप दिला आणि सर्व पुत्र भस्मसात झाले, महाराणी शीलधारा याज्ञवल्य त्रदृषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली, मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी आणि ज्ञानी होती. मैत्रेयीने तिला श्रीदत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली आणि पुत्रप्राप्तीचे व्रत करायला सांगितले. कृतवीर्य आणि महाराणी शीलाधरा यांनी मन:पूर्वक निष्ठेने ते व्रत केले. तेव्हा भगवान श्रीदत्तात्रेय संतुष्ट झाले. त्यांनी पराक्रमी आणि तेजस्वी पुत्र होईल असा आशिर्वाद दिला. हा मुलगा म्हणजे सम्राट कार्तवीर्य सहस्रार्जुन. कृतवीर्याने आपले राज्य त्याला दिले आणि तो अरण्यात निघून गेला. कालांतराने राज्यकारभार करताना धर्मयुक्त राज्य कशा पद्धतीने करावे, राज्याचा विस्तार कसा करावा, राजधर्म आणि प्रजाधर्म यांचे संतुलन कसे राखावे, याबाबत कार्तवीर्य अर्जुन शंकित झाला. तेव्हा त्याने गर्गमुनींना सल्ला विचारला, तेव्हा गर्गमुनींनी त्याला श्रीदत्तात्रेयांना शरण जाण्यास सांगितले, दत्तप्रभूच्या आशिर्वादाने तुला राज्यधर्माचे तर यथार्थ ज्ञान मिळेतच त्याचबरोबर अनेक सिद्धी, सामर्थ्य आणि शक्ती प्राप्त होतील, कारण श्रीदत्तात्रेय म्हणजे विष्णूचाच अवतार आहेत असेही गर्नमुनींनी सुचवले, हे ऐकून कार्तवीर्य अर्जुन श्रीदत्तात्रेयांच्या आश्रमामध्ये गेला. कार्तवीर्य अर्जुन अतिशय निश्चयी आणि महत्त्वाकांक्षी होता. संपूर्ण पृथ्वीचे अधिपती व्हायची त्याची इच्छा होती. त्यासाठी वाटेल तेव्हढे परिश्रम करायची त्याची तयारी होती. तो श्रीदत्तात्रेयांचे आश्रमी पोहोचला तेव्हा श्रीदत्तात्रेयांनी त्याला निरुत्साही केले. मीच पतित आणि वाममार्गाचे आचरण करणारा आहे. मी तुझी इच्छा पूर्ण करू शकणार नाही. तू त्वरित निघून जा असे श्रीदत्तात्रेयांनी त्याला सुनविले. पण तरीही दृढ़ निश्चयाने तो तेथेच सेवा करीत राहिला. काही काळाने दत्तप्रभूंनी  त्याचे दोन्ही हात क्रोधाद्मीने जाळून नष्ट केले. तरीही कार्तवीर्य अर्जुन त्यांची सेवा करीत तेथेच राहिता. त्याची श्रद्धा तसूभरहीं ढळली नाही. त्याचा हा दृढ सेवाभाव पाहून श्रीदत्तात्रेय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला यथार्थ ज्ञान दिले. धर्माचा उपदेश केला. याचबरोबर सर्व प्रकारचे ऐश्वर्य त्याला बहाल केले. योगज्ञान आणि ब्रह्मज्ञानही त्याला दिले. त्याला एक हजार हात प्रदान केले. म्हणूनच कार्तवीर्य अर्जुन हा सहस्रार्जुन म्हणून पुढे विख्यात झाला. याचबरोबर त्याला अनेक सिद्धी, शस्त्रे, अस्त्र प्राप्त झाली. याद्वारे त्याने मोठा पराक्रम गाजविला आणि तो महासम्राट होऊन सप्तद्विप पृथ्वीचा अधिपती झाला. कार्तवीर्यसहस्रार्जुन हा श्रीदत्तात्रेयांचा अतिशय लाड़का शिष्य होता. त्याने श्रीदत्तात्रेयांची कृपा संपादून अदभुत ऐश्वर्य प्राप्त केले आणि शेकडो वर्षे पृथ्वीवर निरंकुश राज्य उपभोगिले.

६) अलर्क 

राजा अलर्क हाही श्रीदत्तात्रेयांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक शिष्य गणला जातो. त्याच्या आईचे नाव मदालसा आणि वडिलांचे नाव ऋतुध्वज असे होते. राणी मदालसा ही श्रीदत्तात्रेयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्त होती राज्यपद प्राप्त झाल्यावर अलर्क राजधर्माप्रमाणे आणि नीतीने राज्य करीत होता. त्याच्या आईचा उपदेश त्याला प्राप्त होत होता. कालांतराने राजा अलर्क ऐषआरामामध्ये गर्क झाला, खाणे, पिणे, नाचगाणे, चैन, विषयोपभोग यात तो इतका गर्क झाला की त्याला राज्यकारभाराचा विसर पडला. प्रजेकडे दुर्लक्ष झाले. सगळीकडे अराजक माजले. त्याला सुबाहू या नावाचा एक मोठा भाऊ होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली. आपला बंधू अशा प्रकारे जीवन वाया घालवत आहे. हे पाहून त्याला अतिशय वाईट वाटले. यावर काहीतरी उपाय करायचा आणि अलर्काला वठणीवर आणायचे त्याने ठरविले. त्याने काशिराजाशी संपर्क साधला. त्या दोघांनी मिळून अलर्क राजावर स्वारी करायचे असे ठरविले आणि मोठ्या सैन्याची जमवाजमव करून ते अलर्क राजावर चालून गेले. इकडे अलर्क बेसावध होता. सुबाहू आणि काशिराजाने राज्याला वेढा दिल्याने अरुया राज्यातील रसद तुटून गेली आणि प्रजेची उपासमार होऊ लागली. अशा वेळी अलर्काला अतिशय दुख झाले, अत्यंत संकटाच्या वेळी उपयोगी पडावी म्हणून अलर्काची आई राणी मदालसाने त्याला एक अंगठी दिली होती. तपाला जातेवेळी तिने सांगितले होते की जीवनात अगदी कोणताही उपाय उरला नाते असे प्राणांतिक संकट आले की तू ही अंगठी उघडून पाहा. त्यामध्ये एक ताईत आहे, तो तुला संकटामधून बाहेर काढेल. अलर्काला त्या अंगठीची आठवण झाली. त्याने अंगठी उघडून तो ताईत बाहेर काढला. त्यावरील संदेश त्याने वाचला. _सर्व संकटाचे मूळ कारण कामना अहे. दुर्जनांची संगत टाळावी आणि सज्जनांची संगत धरावी. सर्वात मोठी कामना मुक्त होण्याची कामना ही आहे यासाठी भगवान श्रीदत्तात्रेय यांना शरण जावे. ते विश्वगुरू आणि सर्व संकट तारक आहेत, तो उपदेश वाचून राजा अलर्क श्रीदत्तात्रेयांना शरण गेला. श्रीदत्तात्रेयांनी त्याला दर्शन दिले. त्यांनी त्याला अनुग्रह देऊन संपूर्ण ज्ञान आणि विवेकबुद्धी प्रदान केली. त्यानंतर तो सुबाहूकडे गेला आणि त्याने आपले सर्व राज्य सुबाहूला अर्पण केले, आपण दोघेही एक आहोत, तेव्हा हे राज्य तूच सांभाळ असे त्याने सुबाहूला विनविले, सुबाहूने ओळखले की त्याच्यावर दत्तप्रभूची कृपा झालेली आहे. त्याने अलर्काला सांगितले की तूच तुझे आणि माझे सर्व राज्य निरपेक्ष बुद्धीने सांभाळ आणि राजधर्माचे पालन करुन प्रजेचा प्रतिपाळ कर, या नंतर सुबाहू हिमालयामध्ये निघून गेला. श्रीदत्तात्रेयांच्या उपदेशाप्रमाणे अलर्काने अतिशय योग्य पद्धतीने राज्य केले आणि शेवटपर्यंत तो दत्तभक्तीमध्ये निरंतर रममाण होऊन राहिला.

७) प्रल्हाद

भक्त प्रल्हादाची कथा सर्वांना माहीत आहे. हिरण्यकशपू या दैत्यराजाचा हा मुलगा विष्णूचा परम भक्त होता. तो सतत 'नारायण नारायण' असा जप करीत असे. प्रल्हादाला विष्णूचे नाव घेण्यापासून परावृत्त करण्याचा हिरण्यकशपूने फार प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीच परिणाम होईना, उलट त्याचे नारायण प्रेम वाढतच होते. हिरण्यकशपूने त्याला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकले, कड्यावरून खाली फेकून दिले, तलावामध्ये पाण्यात बुडविले परंतु प्रत्येक वेळी विष्णूने त्याचे रक्षण केले. शेवटी कुठे आहे तुझा नारायण, या खांबामध्ये आहे का असे म्हणून हिरण्यकशपूने एका खांबावर लाथ मारली तेव्हा त्यातून नृसिंह अवतार प्रकट झाला आणि त्याने हिरण्यकशपूचा अंत केला, विष्णूने नृसिंह अवतारामध्ये प्रल्हादाला दर्शन दिले. त्यानंतर प्रल्हाद दैत्यकुळाचा राजा अनला, त्याने नीतिनियमाने राज्य केले, त्याला विष्णूने दर्शन दिले, पण त्याला ब्रह्मज्ञान झाले नव्हते. त्यासाठी त्याने श्रीदत्तात्रेयांची उपासना केली. श्रीदत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन त्याला यथार्थ उपदेश केला आणि त्याला मुक्तिपदावर अग्रेसर केले,

८) सांस्कृती

सांस्कृती हा सुद्धा श्रीदत्तात्रेयांचा शिष्य होता. तो ब्राह्मण असून विद्यादानाचे कार्य करीत असे, त्याने दत्तप्रभूची उपासना केली आणि त्यासाठी मोठी तपश्चर्या आरंभिली. श्रीदत्तात्रेयांनी त्याची अनेक प्रकाराने परीक्षा घेतली. शेवटी सर्व कसोट्यांना उतरल्यावर त्याला दत्तप्रभूनी दर्शन दिले. त्याने दत्तप्रभूना ब्रह्मज्ञान देष्याची प्रार्थना केली. त्यांना विचारले की अवधूतांची स्थिती, लक्षणे आणि संचारण कसे असते? तसेच त्याने योगमार्गाचे आणि अष्टांग योगाबाबत अनेक प्रश्न विचारले. श्रीदत्तात्रेयांनी त्याला जी उत्तरे दिली त्याला 'अवधूतोपनिषद' आणि ‘जाबालदर्शनोपनिषद' असे म्हणतात. अवधूतोपनिषदामध्ये अवधूतांची लक्षणे आणि जीवनपद्धती यावर भाष्य केले आहे. जाबालदर्शनोपनिषद म्हणजे अष्टांग शास्त्राचे सार आहे. जीवनमुक्तीसाठी अष्टांग योग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. परमहंस पदाचेही वर्णन यामध्ये आले आहे. सांस्कृतीने श्रीदत्तात्रेयांचे वर्णन चतुर्भुज, भगवान, योगसम्राट, सकल ऐश्वर्य पंडित, महाधिराज, महायोगी असे केले आहे. 

श्रीदत्तात्रेयांचे असंख्य शिष्य असून त्यांनी सर्वांवर त्यांच्या पात्रतेनुसार कृपा केली आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये ब्राह्मण, क्षत्रियांपासून अगदी अंत्यजापर्यंत सर्व वर्गाच्या शिष्यांचा समावेश आहे. या प्रत्येक शिष्याचे जीवन म्हणजे एक स्वतंत्र अवतार कथा होईल. प्रत्येक दत्तभक्ताने त्यांच्या प्रमुख शिष्यांची माहिती करून घेतली पाहिजे. कारण श्रीदत्तात्रेयांना त्यांनी ज्या पद्धतीने आणि निष्ठेने प्रसन्न करून घेतले त्यावरून साधकाला त्याच्या दत्तसाधनेसाठी उत्तम मार्गदर्शन मिळू शकेल.

श्री दत्तात्रय एकमुखी कि त्रैमुखी
श्री दत्तात्रयांचे स्वरुप - एकमुखी की त्रिमुखी

श्री दत्तात्रयांचे स्वरुप - एकमुखी की त्रिमुखी 

आज सर्वत्र आढळणारी दत्तमूर्ती त्रिमुखी आहे. उपनिषदे, पुराणे व महाभारत पाहिले, तर त्या सर्व वर्णनात दत्तात्रेय त्रिमुखी नसून एकमुखीच आहेत. इतकेच नव्हे, तर प्राचीन मूर्तिविज्ञानातही दत्तात्रेय एकमुखीच आहेत. भागवतात देवत्रयींनी अत्रिंना “यद् न ध्यायति ते वयम्” “तू ज्या एका तत्त्वाचे ध्यान करीत आहेस त्याचेच आम्ही तिघेजण अंशभूत आहोत.” पुढे तेराव्या शतकापासून ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ती’ असे दत्तात्रेयांचे स्वरूप आहे. अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना दत्तात्रेयांचे दर्शन एकमुखीच झाले आहे. ‘गुरुचरित्रा’तील परंपरेला आदरणीय मानणारे आणि नरसोबाच्या वाडीहून दत्तभक्तीची प्रेरणा मिळविणारे असे सत्पुरुषही एकमुखी दत्तात्रेयांचेच पुरस्कर्ते होते. 

थोर दत्तोपासक दासोपंतांचे उपास्य दैवत एकमुखी व षड्भुज दत्तात्रेय आहेत. या मूर्तीच्या सहा हातांत शंख, चक्र, त्रिशूल, डमरू, कमंडलू व रुद्राक्ष धारण केलेले आहेत. या मस्तकावर जटाभार, मुकुट व कमरेला पितांबर आहे. ही मूर्ती तांब्याची असून तिचेच चित्र दासोपंतांनी पासोडीवर चितारले आहे. 

निरंजन रघुनाथ व त्यांचे गुरू रघुनाथस्वामी यांना साक्षात्कार झाला तो एकमुखी षड्भुज दत्तात्रेयांचा. याच निरंजन रघुनाथांचे शिष्य झाशीचे नारायण महाराजांना गिरनार पर्वतावर दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला. तोही एकमुखी व षड्भुज दत्तात्रेयांचा. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी एकमुखी व द्विभुज अशी दत्तमूर्ती पुरस्कारिली आहे. 
सांप्रताचे ध्यान हे नाथसंप्रदायाच्या प्रभावामुळे जनमानसात रुजलेले आहे. भगवान दत्तात्रेय हे अनादि शक्तीचे रहस्य जाणणारे व आद्य आहेत. नाथसंप्रदायाने दत्तात्रेयांना तंत्रविद्येचे प्रवर्तक मानले आहे. आज मितीला नवनाथांमुळे नाथसंप्रदाय ओळखला जात असला तरी आणि नाथसंप्रदायातील अनेकांची गुरुपरंपरा आदिनाथ म्हणजेच शंकरापर्यंत जाऊन भिडत असली तरी काही नाथांना शंकराच्या आदेशावरून दत्तात्रेयांनी उपदेश केल्याच्या कथा आहेत.  

या त्रिमूर्तीचे आणि दत्तात्रेयाचे एकीकरण कसे आणि केव्हा घडून आले ? असा प्रश्न वाचकांच्या मनात उभा रहाणे स्वाभाविक आहे. इ. स. १२०० पर्यंत दत्तात्रेयाचे स्वरूप एकमुखीच होते; परंतु पुढे पंधराव्या शतकात सरस्वती गंगाधराने लिहिलेल्या ‘गुरुचरित्रा’त मात्र दत्तात्रेयाचे स्वरूप त्रिमूर्ती बनले. हा बदल घडून यायला दत्तजन्माच्या कथेत बराच वाव होता. त्रिमूर्तीत समाविष्ट असणाऱ्या तीनही देवतांचा आशीर्वाद दत्तजन्माला कारणीभूत आहे. 

श्री दत्तात्रय - तांत्रिक गुरू

तंत्रसाधनेतील अलौकिक कर्तृत्वामुळे दत्तात्रेयांना श्रीगुरू हे स्थान प्राप्त झाले. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी योगसाधना व गुरुसंस्थेची महनीयता ही दत्तात्रेयांची दोन प्रमुख वैशिष्ट्ये. नाथसांप्रदायिकांच्या मते दत्तात्रेय ही ‘योगसिद्धी’ प्राप्त करून देणारी देवता आहे. शाक्तपंथाच्या तंत्रसाहित्यात दत्तात्रेयांचे स्थान सर्वश्रेष्ठ असून यांना त्रिपुरसुंदरीच्या उपासनेचे प्रवर्तक मानले आहे. त्रिपुरारहस्याचे विवेचन करणारी अष्टादशसहस्त्री ‘दत्तसंहिता’ दत्तात्रेय प्रणित असून ‘दत्तात्रेय तंत्र’ नामक ग्रंथ शाक्तपंथात प्रमाणभूत मानला गेला आहे. दत्तोपासनेत सर्वत्र प्रचलित असलेले ‘दत्तात्रेय वज्र कवच स्तोत्र’ शाक्तांच्या ‘रुद्रयामल तंत्रा’तील आहे. या सर्व बाबींचा विचार करून काही संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे, की इसवी सनाच्या प्रारंभी त्रिपुरोपासक शाक्त उपासनेच्या क्षेत्रात दत्तात्रेयाची निर्मिती झाली असावी. कदाचित या तंत्रप्रणालीचा प्रवर्तक दत्तात्रेय नामक कोणी महान सिद्धपुरुष असावा आणि त्याचेच पुढे पुराणांच्या अंतिम संस्कारांच्या काळी दत्त दैवतात रुपांतर झाले असावे.

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा

श्री दत्तात्रय - त्रिपुरादेवी उपासना मार्ग

तंत्रसाहित्यातील दत्तात्रेय हा प्राधान्याने त्रिपुरादेवीच्या उपासनेचा प्रवर्तक आहे. त्रिपुरा म्हणजे (त्रि+पुरा-पूर्वी) त्रयीच्या-ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या पूर्वीची, अनादि शक्ती. तिचे रहस्य जो जाणतो तो त्रिपुरारहस्याचा उद्गाता दत्तात्रेय होय! तंत्रसाहित्यात दिसणारे दत्तात्रेयाचे स्वरूप हेच दत्तात्रेयाचे आद्य स्वरूप असावे, असे प्रस्तुत लेखकाला वाटते. इसवी सनाच्या दहाव्या शतकात या तांत्रिक साधनेला जो विकृत, वामाचारप्रधान असे स्वरूप आले तसे स्वरूप येणे स्वाभाविकच होते. दत्तसंप्रदाय ही मराठी भक्तिपरंपरेची एक प्रभावी धारा असून नाथसंप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्तसंप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या पंचगंगांनी प्राचीन मराठी साहित्य व संस्कृती यांचे सर्वांगीण भरणपोषण केले. 

ब्रह्मपुराणात दत्तात्रेयांच्या अवताराचा हेतू सांगितला तो असा – “जो सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा आहे, त्या विष्णूचा दत्तात्रेय नामक अवतार झाला. हा क्षमाप्रधान होता. त्याने वेदांना प्रतिष्ठा मिळवून दिली. यज्ञसंस्थेतील चातुर्वण्यातील प्रजेत विलक्षण सामर्थ्य निर्माण केले. दत्तात्रेयांचे अत्रिऋषि पिता व अनसूया माता होत. अत्रि ऋषींना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जाते. चित्रकूटाजवळ पयस्विनी नदीच्या काठी त्यांचा आश्रम होता. त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे विलक्षण ब्रह्मतेज निर्माण झाले. पृथ्वीतलावरील चारीही वर्णांतील लोकांची काळजी सतत वाहणारे अत्रि ऋषि लोकमान्यता पावले होते. त्यांच्या तप:सामर्थ्यावर लुब्ध होऊन कर्दम प्रजापतीने आपली ‘अनसुया’ नावाची कन्या त्यांना दिली. ती नावाप्रमाणेच असूयारहित होती. तिने तपस्या करून शंभू महादेवाला प्रसन्न करून घेतले होते. याच अत्रि आणि अनसूयेचे पुत्र ‘दत्तात्रेय’, ‘दुर्वास’ आणि ‘सोम’ हे होत. ‘शुभात्रेयी’ नामक कन्याही होती. पतिपरायण अनसूयेच्या तेजामुळे त्रैलोक्यातील लोक प्रभावित झाले. इंद्राचे आसन डळमळीत झाले. इतकेच नव्हे, तर नारदाने केलेल्या सतीत्वाच्या गौरवामुळे ब्रह्मा, विष्णू, महेशांच्या पत्नींच्या मनात अनसूयेविषयी असूया निर्माण झाली. अनसूयेचे सत्त्व हरण करण्यासाठी त्यांनी आपल्या पतींना अतिथिवेषाने अनसूयेकडे पाठविले. आश्रमात अत्रि नव्हते. अनसूयेने अतिथींना विश्रांती घेण्याची विनंती केली; परंतु सत्त्वहरणाच्या हेतूने आलेल्या त्रिदेवांनी तिच्याकडे मागणी केली, की “तू विवस्त्र होऊन भोजन वाढणार असशील तरच ते आम्ही स्वीकारू.” अनसूयेने ते तत्काळ मान्य केले आणि त्रिदेवांच्या मस्तकावर पतिस्मरणपूर्वक तीर्थ शिंपडले. तत्क्षणीच त्या तिघांची बालके झाली. पती गंगेवरून परतताच त्यांच्यापुढे तिन्ही बालके ठेवून “स्वामिन् देवेन दत्त” असे म्हटले. अत्रिंनी त्यांचे नामकर्ण ‘दत्त’ असे केले. 

इकडे आपल्या पतीची वाट पाहून थकलेल्या देवभार्या पतिशोधार्थ अत्रि ऋषींच्या आश्रमात आल्या, त्यांना अनसूयेने आपल्या पतीचे रूपांतर तीन बालकांत केल्याचे आढळून आले. देवभार्यांची ती शोचनीय अवस्था पाहून अनसूयेने क्षणार्धात त्रिदेवांना पुन्हा पूर्वरूप दिले. मग अनसूयेच्या सत्त्व साक्षात्काराने चकित झालेल्या त्रिदेवांनी पुढे यथावकाश तिच्या उदरी जन्म घेण्याचे मान्य केले.आपला पराभव मान्य करून ब्रह्मा महेश तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेले. मग कालांतराने ब्रह्मा ‘चंद्र’ (सोम) झाले आणि महेश ‘दुर्वास’ झाले; परंतु विष्णु ‘दत्त’ रूपाने अत्रि व अनसूयेच्या इच्छेनुसार त्यांच्या आश्रमातच राहिले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक म्हणून त्याने ब्रह्माचा कमंडलू आणि महेशाचा शूल हातात धारण केला.

‘अत्रि’ म्हणजे तिन्ही नव्हे तो. असा हा परमात्मा त्रिगुणातीत आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांच्या देवता अनुक्रमे विष्णु, ब्रह्मा व महेश मानल्या जातात. साधकाची ‘अनसूया’ म्हणजे अनन्य – एक ध्यानवृत्ती होते, त्रिगुणात्मक, त्रिदेवात्मक ही सृष्टी त्याचे बाळ होते. अत्रि म्हणजे त्रिगुण नाही तो आणि अनसूया म्हणजे जिच्या ठिकाणी दोषदृष्टी नाही ती. अशा अत्रि आणि अनसूयेपासून दत्तात्रेयांचा जन्म झाला. हा परमात्म्याचा साधक ज्यायोगे परमात्म्याशी एकरूप होतो ते साधन म्हणजे योग. आत्म्याचा परमात्म्याशी योग साधणे म्हणजे दत्तजन्म होय ! किंवा जेथे अत्रि व अनसूया या महाभावांचा संयोग होतो, तेथे दत्ततत्त्व प्रगट होते. 

दत्तात्रेयांनी अत्रि ऋषींच्या आदेशानुसार गौतमी नदीच्या काठी शिवोपासना करून ‘योगसिद्धी’ आणि ‘ब्रह्मज्ञान’ प्राप्त केले. त्यांचा आश्रम सिंहाचलाजवळ प्रयाग वनात असून ते स्वेच्छाविहारी आहेत. माहूर हे पुरातन दत्तक्षेत्र दत्तात्रेयांचे शयनस्थान समजले जाते. ते पांचाळेश्वरी स्नान करतात आणि कोल्हापुरी भिक्षाटन करतात. एकनाथांनी एका अभंगात दत्तात्रेयांचे वर्णन करताना म्हटले आहे –

“दत्त वसे औदुंबरी । त्रिशूल डमरू जटाधारी ॥
कामधेनू आणि श्वान । उभे शोभती समान ॥
गोदातीरी नित्य वस्ती । अंगी चर्चिली विभूती ॥
काखेमाजी शोभे झोळी । अर्धचंद्र वसे भाळी ॥
एका जनार्दनी दत्त । रात्रंदिन आठवीत ॥”

ब्रह्मा, विष्णू, महेशांचा समन्वय दाखविणारी तीन मुखे, सहा हात, वरच्या दोन हातांत शंख आणि चक्र (विष्णू द्योतक), मधल्या दोन हातांत डमरू आणि कमंडलू (शिवाचे द्योतक) आणि खालच्या दोन हातांत माला चर्चिलेली, पायी खडावा, व्याघ्रांबर परिधान केलेले आणि काखेत झोळी असलेले, मागे गाय आणि आसपास चार श्वान (कुत्री) असलेले दत्तात्रेयांचे ध्यान वाचकांना सुपरिचित आहे. 

श्री दत्तात्रय ध्यानातील प्रतीकात्मकता

तीन मुखे – ही ब्रह्मा, विष्णू, महेशांचे प्रतीक आहेत. 
सहा हात – विविध प्राचीन ग्रंथांत दत्तात्रेयांचे स्वरूप एकमुखी, द्विभुज किंवा चतुर्भुज दाखवले असले तरी दत्तसंप्रदायाने मान्य केलेल्या मूर्तीच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास त्या मूर्तीला सहा हात, ब्रह्मा-विष्णू-महेशाचे प्रतीक असून ब्रह्माच्या हातातील माला व कमंडलू, तपस्व्याचे ‘सत्त्वा’चे प्रतीक म्हणता येईल. विष्णूच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे ‘रजा’चे, तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू ‘तमा’चे म्हणजेच संहाराचे प्रतीक मानले जाते. 
वेष – पुराणातील दत्तात्रेयांचे स्वरूप श्रीमान विष्णूसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा, अंगाला विभूती चर्चिलेली, काखेत झोळी लटकाविलेली, व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती तो अवधूत दिगंबर योगी असल्याची द्योतक आहे. 
धेनु – हे ‘पृथ्वी’चे किंवा ‘माये’चे प्रतीक मानले जाते. 
श्वान – दत्तात्रेयांच्या आसपास असणारे चार श्वान वेदांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. काही विद्वानांनी यावरून ही अवैदिक असल्याचे अनुमान काढले आहे. दत्तसंप्रदायावर प्रारंभी नाथसंप्रदायाचा प्रभाव होता. भिक्षा मागण्यासाठी नाथजोगी जेव्हा गावोगावी सातत्याने संचार करत, तेव्हा त्यांच्याबरोबर गाईंची खिल्लारे आणि त्यांच्या रक्षणासाठी श्वान असत. नाथसंप्रदायात ‘आदिगुरु’चे स्थान पावलेला महायोगी ‘दत्तात्रेय’ आपापत:च हे स्वरूप पावला असावा. 
निवास – दत्तात्रेयांचा निवास सतत औदुंबरतळी असतो अशी श्रद्धा असल्यामुळेच अनेक दत्तभक्त ‘गुरुचरित्रा’चे पारायण तेथे आवर्जून करतात. 

श्री दत्तात्रेयांचे अवतार

एकूण सोळा अवतार दत्तात्रेयांनी घेतले असे भाविक मानतात. दत्तसांप्रदायिक श्रीपादवल्लभांना व नृसिंह सरस्वतींना इतिहासकाळातील अनुक्रमे पहिले आणि दुसरे अवतार मानतात. दासोपंतांच्या परंपरेत दासोपंतांना सतरावा अवतार मानण्यात येते. इतकेच नव्हे, तर अक्कलकोटच्या स्वामीमहाराजांची आणि माणिकप्रभूंचीही दत्तावतारातच गणना होते. श्री गुरुदेव दत्तात्रयांचे सोळा अवतार खालीलप्रमाणे;

योगिराज
योगिराज

१) योगिराज

ब्रम्हदेवाचे मानसपुत्र 'अत्रि' हे पुत्र प्राप्तीसाठी पत्निसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन साक्षात भगवान कार्तिक शुध्द १५ स प्रकट झाले. त्यांचे रुप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते. दत्तात्रेयांचा हा अवतार 'योगिराज' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी योगमार्गाचा पुरस्कार करुन लोकांना सुखी केले. म्हणून वरील नाव पडले. हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता.

श्री ब्रम्हदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली खरी पण या विश्वाच्या निर्मितीनंतर सर्व जिवांना त्यांच्या पूर्वीच्या कर्मांप्रमाणे जे दुःख सहन करावे लागले ते पाहून ब्रह्मदेव चिंतित झाले आणि म्हणून ते विश्वाच्या प्रभूला श्रीविष्णु यांना शरण आले. *"दत्तोsहम् दत्तोsहम्"*(मी स्वत: देतो- समर्पित करतो - शरण आलो आहे) अशी प्रार्थना केली. सृष्टीच्या कल्याणासाठी श्रीहरी विष्णू ब्रह्मदेव यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी ब्रम्हदेवांना योग आणि अात्मतत्त्वाचे ज्ञान करून त्यांना चिंतामुक्त केले आणि मनःशांती देऊन त्याचा प्रचार करण्यास उद्युक्त केले. "दत्तोsहम् दत्तोsहम्" चा जप करणार्यांनाही समान फळ मिळेल असा आशिर्वादही दिला. हा अवतार कार्तिक शुद्ध पौर्णिमेला, कृत्तिका नक्षत्रावर बुधवारी, पहिल्या प्रहरी, सूर्योदयाच्या वेळी झाला.

या अवताराने योगाचा (योग म्हणजे संपूर्ण अष्टांग योग / युज् म्हणजे जोडणे - स्वतःला परमेश्वराशी) प्रचार केला, म्हणून त्याला 'योगेश्वर' किंवा 'योगीराज' म्हणून ओळखले जाते. ह्या अवतारात श्रींचे स्वरूप सर्वात आकर्षक, नाजूक आणि बर्फासारखे शुभ्र होते. श्रीकृष्णाप्रमाणे, त्याला एकमुखी आणि चतुर्भूज होते. 

'दत्तोsहम्' प्रबोधकाय
श्रीकृष्णा जगदीश्वरा
योगेश्वरावताराय 
दत्तात्रेयाय नमो नम: |

"दत्तोsहम्" या मंत्राचा उपदेश करणाऱ्या (मी स्वतःला देतो म्हणजे माझे सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण करतो - ही समर्पणाची भावनाच भक्तिमध्ये सर्वात महत्वाची आहे. तरच भक्त सद्गुरूकृपेस प्राप्त होतो.) श्रीकृष्णस्वरूप संपूर्ण जगाचे ईश्वर असणाऱ्या, योगीराज अवतार धारण करणाऱ्या, श्रीदत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.

प्रकट:- कार्तिक शुध्द १५

अत्रिवरद
अत्रिवरद

२) अत्रिवरद

अत्रिऋषीनी ऋक्ष पर्वतावरील पर्वतावरील परमतीर्थावर १०० वर्षे तप केले. तेव्हा त्यांना वर देण्याकरता 'अत्रिवरद' या नावाने हा योगिराज अवतरला. ब्रम्हा, विष्णू व महेश हे तिन्ही देव या तपाच्या वेळी अत्रिपुढे प्रकट झाले. आपण एकाचेच ध्यान करतो आहोत. मग हे तिघेजण कसे प्रकट झाले याचे आश्चर्य अत्रीना वाटले. तेव्हा ते म्हणाले,"तू ज्या एकाचे ध्यान करीत आहेस, तोच आम्हां तिघात आहे.' या अत्रिवरदाचे रुप तप्त सुवर्णकांन्तीप्रमाणे तेजस्वी, हसतमुख व षङभुज होते. 

अत्री ऋषी असले तरी गृहस्थाश्रमीही होते. त्यामुळे आपल्या वंशामुळे लोककल्याणाचेही काम व्हावे अशी त्यांची मनिषा होती. ते विद्वान होते; त्यामुळे आपल्या पोटी असा पुत्र यावा जो सर्व तीन लोकामध्ये प्रसिद्ध होईल आणि लोकांच्या आयुष्यातील सर्वोच्च ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करेल या हेतूने त्यांनी ऋष्य पर्वतावर तीव्र तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येचे तेज एवढे प्रखर होते की त्याची झळ तीनही लोकांना पोहोचू लागली आणि सर्व जीवसृष्टी अस्वस्थ झाली. तेव्हा सर्व देव आणि ऋषी-मुनींनी ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांना विनवणी केली. मग ब्रह्मदेव , हंसवर, गरुडावर श्री विष्णु आणि नंदीवर भगवान जाश्र्वनीळ आरूढ झाले आणि ऋषी अत्रीसमोर हजर झाले व त्यांनी अत्रीऋषींना तपातून जागे केले. अत्रींऋषींनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि आश्चर्यचकित होऊन विचारले, "मी फक्त एकाच परमात्म्याची आराधना केली होती. कृपा करून आपण तिघे कोण आहात हे मला सांगावे जेणेकरून माझ्या चित्तास संतोष प्राप्त होईल." तेव्हा त्रिदेव म्हणाले, "आपण ज्याचे लक्ष्य केले आहे त्या प्रमाणेच आम्ही आहोत. आम्ही तीन रूपांत दिसतो; पण आम्ही एक आहोत. माया (भ्रम) त्रिगुणात्मक आहे - सत्व, रज आणि तम. रज तत्वाने उत्पत्ती होते, सत्वगुणामुळे पालनपोषण व संरक्षण होते आणि तमोगुण संहारास कारणीभूत होतो. या तीन शक्ती प्रमुख आहेत. परमात्म्यामध्ये या तिन्ही शक्ती विद्यमान आहेत आणि त्याचीच तीन स्वरूपे आम्ही आहोत परंतु तत्वतः आम्ही एकच आहोत." असे म्हणून तिघेही एकरूप झाले. आता अत्री ऋषींच्या समोर परमेश्वराचे सोन्यासारखे तेजःपूंज रूप दिसत होते. त्यांना तीन मुखे होती, सहा हात होते. सहा हातांमध्ये शंख, चक्र, त्रिशूळ, डमरू, पद्म, कमंडलू अशी आयुधे होती. ह्या सुंदर अवतारातील तिनही श्रीमुखांवर मंद हास्य होते. देवाने या रूपात अत्रिऋषिंना "तुझि ईच्छा पूर्ण होईल" असे वरदान दिले म्हणूनच या अवतारला 'अत्रिवरद' म्हणून ओळखले जाते. हा अवतार कार्तिक वद्य प्रतिपदा, रोहिणी नक्षत्रावर, गुरुवारी, पहिल्या प्रहरी आणि पहिला मुहूर्तावर झाला.

रज-सत्व-तमात्मका 
त्रैमूर्ती परमेश्वरा 
अत्रिवरदावताराय
दत्तात्रेयाय नमो नम: |

रज, सत्व आणि तम हे मायेचे तीन गुण असले तरीही त्यांचे आत्मक म्हणजे मूळस्वरूप एक असलेल्या, त्रैमूर्तीरूप परमेश्वराला, अत्रिवरद हा अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो . 

जन्म:- कार्तिक कृष्ण प्रतिपदा

दत्तात्रेय
दत्तात्रेय

३) दत्तात्रेय

भगवती श्री हरी कार्तिक वद्य द्वितीयेच्या दिवशी, मृग नक्षत्रावर, शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळी प्रथम मुहूर्तावर लहान मुलाच्या रूपात अत्रीऋषींसमोर प्रकट झाले. त्यांची प्रभा रंगीत इंद्रनील मण्यासारखी होती. ते नीलवर्ण असून त्यांचा चेहरा चंद्रासारखा आनंददायी होता. ते चतुर्भूज असून त्यांच्या चार हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म होते. विभूती त्यांच्या शरीरावर विलेपित होती आणि त्यांच्या कपाळावर केसांचा बटा होत्या. अशा स्वरूपात ते अत्रीऋषींसमोर आले आणि म्हणाले, "दत्तोsहम्" (ज्या परमात्म तत्वाची तुम्ही पुत्र म्हणून ईच्छा केलीत तो मी तुमच्यासमोर पुत्र म्हणून उभा आहे.) यावर ऋषीदांपत्य अत्री व अनसूया म्हणाले, "जगदीश्वरा जोपर्यंत तू आमच्यापोटी जन्म घेत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी होऊ शकणार नाही." त्यांच्या या प्रार्थनेला प्रसन्न होऊन, श्री हरींनी ज्योतीरूपाने अत्रीऋषींच्या हृदयांत प्रवेश केला आणि त्यानंतर अत्रि-अनसूयेच्या पुत्राच्या रूपाने जन्म घेतला.

इंद्रनीलसमाभासा | भस्माोद्धूलितविग्रहा ||
दत्तात्रेयावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||

इंद्रनील मण्यासारखी आभा असलेल्या, भस्मविलेपित विग्रह (म्हणजे रूप) असलेल्या, दत्तात्रेय अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो

हाच दत्तात्रेयांचा 'दत्तात्रेय' नामक तिसरा अवतार. 

श्री दत्तात्रयांचा हा अवतार याच नावाने ओळखला जातो. अत्रिवरद अवतारात श्री दत्तात्रेयप्रभू ने अत्रिऋषींना, मी तुम्हाला स्वतःला अर्पण करून घेवून तुमच्या येथे पुत्ररुपाने अवतार घेईन असा वर दिला असल्यामुळे ते अत्रिवरद झाले. अत्रिवरद या अवतारात परमेश्वराने अत्रिमुनींना त्रिमूर्तीच्या रुपाने दर्शन देऊन फक्त वरच दिला. पुत्ररुपाने अवतार घेऊन मी तुमच्या वंशाला भूषविन एवढेच सांगून ते अंतर्धान पावले. त्यानंतर अत्रिमुनि व सती श्री अनसूया यांनी त्रिमूर्ती या रुपाने परमेश्वराचे सतत चिंतन केले. काही काळाने परमेश्वराने अत्रिऋषींना व अनसूयेला प्रत्यक्ष दर्शन दिले. “मी तुम्हा उभयतांच्या तपश्चर्येने व अनन्य भक्तीने प्रसन्न होऊन तुम्हांला इष्ट वर दिलेला आहे. त्याप्रमाणे आज मी तुमच्यापुढे स्वत:ला अर्पण करुन दत्तारुपाने तुमच्या सानिध्यात अवतरत आहे”. तोच हा अवतार संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेय नावाने प्रसिध्दीस आला. दत्तात्रेय यांचा हा अवतार कार्तिक वद्य व्दितीयेच्या दिवशी झाला. त्या दिवशी शुक्रवार असून मृग नक्षत्र होते.

जन्म:- कार्तिक कृष्ण २

कालाग्निशमन
कालाग्निशमन

४) कालाग्निशमन

यानंतर आपणांस औरस पुत्र असावा म्हणून अत्रि ऋषी पुन्हा तप करु लागले. या उग्र तपाने त्यांच्या शरिरात कालाग्नी प्रकट झाला व त्याचा दाह होऊ लागला. तेव्हा याचे शमन करण्यासाठी भगवान शीतल रुप घेऊन प्रकट झाले. म्हणूनच यास 'कालाग्निशमन' हे नाव पडले. 

जन्म:- मार्गशीर्ष शुद्ध १५

श्री दत्तात्रेय यांनी अत्रिमहर्षि व सती अनसूया यांच्या उदरी प्रत्यक्ष औरसरुपाने जो चौथा अवतार घेतला तो कालाग्निशमन या नावाने ओळखला जातो. दत्तात्रेयांच्या सोळा अवतारातील श्री कालाग्निशमन भगवान दत्तात्रेयांचा हा प्रमुख अवतार मानला जातो. अत्रि आणि अनसूया यांच्या तपश्चर्येचे हे मूर्तिमंत फल असल्यामूळे त्याला स्वाभाविक प्राधान्य प्राप्त झालेले आहे.

ऋक्ष पर्वतावर केलेल्या खडतर तपश्चर्येने अत्रिऋषींच्या शरीरामध्ये एक प्रकारचे प्रखर तेज निर्माण झाले. त्या तेजाने अत्रिमुनींच्या अंतरंगाचा दाह होऊ लागला. सर्वज्ञ भगवान श्रीहरि यांनी ही गोष्ट जाणली आणि ते अत्रिमुनींच्या शरीराचा दाह शमविण्याकरिता श्रीहरिने अत्रिमुनींच्या अंतरंगात प्रवेश केला. या वेळी परमेश्वराचे तेज कोटिचंद्राप्रमाणे अत्यंत शीतल व आल्हादायक होते.अत्रिमुनींच्या हृदयाच्या पोकळीत प्रवेश करुन अत्रिमुनींच्या देहाला नखशिखान्त शांत व शीतल केले. अत्रिमुनींचा ताप निवाला. याप्रमाणे कालाग्नीचा ताप शमविल्यामूळे अत्रिमुनींच्या पोटी जन्मास आलेल्या पुत्राला कालाग्नीशमन असे नाव देण्यात आले.

दत्तात्रेयांनी घेतलेला हा कालाग्नीशमन नावाचा प्रधान अवतार मार्गशीर्ष महिन्यात झाला. सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष श्रेष्ठ मास मानला जातो. कारण तो प्रत्यक्ष परमेश्वराचाच अंश आहे. तो परमात्मस्वरुपच आहे. शिवाय हा महिना अन्नधान्याने समृद्ध असतो. दत्तात्रेय अवतरले त्या दिवशी पोर्णिमा होती, शुक्ल पक्ष होता, बुधवार होता. मृग नक्षत्र होते. 

कालाग्निशमन हा श्री दत्त महाराजांच्या सोळा अवतारांपैकी हा चौथा अवतार सर्वात प्रमुख म्हणून ओळखला जातो. अत्री ऋषींची साधना चालूच होती. (ऋष्यकूल पर्वतावर केलेल्या अतिशय कठोर तपस्येमुळे अत्री ऋषी अतिशय तेजस्वी दिसू लागले आणि त्यांचे शरीर खूप गरम झाले. तेव्हा भगवान श्री हरि अत्री ऋषींचा दाह कमी करण्यासाठी आले हे आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या अवतारात पाहिले. यामुळे अवतारला 'कलाग्निशमन' असे म्हटले जाते. कारण कलियुगाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी परमेश्वराने केलेली ही योजना होती.) जेव्हा अत्री ऋषींनी डोळे उघडले, तेव्हा त्यांच्यासमोर प्रेममूर्ती अनसूया माता उभ्या होत्या. जे तेज अत्री ऋषींच्या हृदयात प्रविष्ट झाले होते ते आता त्यांच्या नेत्रांद्वारे अनसूया देवींच्या शरीरात प्रवेशले. हे सर्व मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला झाले. हीच तेज रूप गर्भधारणा होती. भगवंताची लीला एवढी अगाध आहे की पुढे नऊ महिन्याचा कालावधी नऊ दिवसांत पूर्ण झाला आणि दैवी स्वरुपात मार्गशीर्ष पौर्णिमेला परब्रह्म अनसूया मातेसमोर प्रकट झाले. पण मातेची वात्सल्याची हौस फिटली नव्हती. त्यांनी देवाला विनम्रतेने विनवणी केली की, "जोपर्यंत माझ्या गर्भापासून मनुष्य म्हणून आपण जन्म घेत नाही येऊ तोपर्यंत माझे समाधान होणार नाही. तेव्हा कृपा करून आपल्या बाललीलांनी आम्हा उभयतांना मात्यापित्याचे सुख देऊन संतुष्ट करावे." त्याविनंतीवरून श्री हरींनी नवजात बालकाचे रूप घेतले आणि  अनसूया मातेच्या मांडीवर खेळत राहिले. यावेळी मृग नक्षत्र होते. परमेश्वरी अवतार हे तेज रूप असतात. मनुष्य जगताचे प्रत्येक नियम त्यांना लागू होतातच असे नाही आणि झाले तरी त्यात योग्य ते बदल ईश्वरी योजनेनुसार होतात.

अत्रिअनसूयामोदकाय | शशीवर्णा श्रीहरी ||
कालाग्निशमनावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||

ऋषी अत्री आणि माता अनसूया यांना मोद म्हणजे आनंद देणाऱ्या, शशी म्हणजे चंद्रासारखे शीतल पण तेज युक्त वर्ण असणाऱ्या (यामुळेच अत्री ऋषींचा दाह शांत झाला), कालाग्निशमन हा अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.

योगिजनवल्लभ
योगीजनवल्लभ

५) योगीजनवल्लभ

या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषि, गंधर्व, यक्ष व किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयानी आपल्या बालरुपाचा त्याग करुन योगीजनांना प्रिय असे रुप धारण केले. हे अवतार 'योगिजनवल्लभ' या नावाने प्रसिद्ध आहे. 

जन्म:- मार्गशीर्ष शुद्ध१५

अनसूया मातेच्या आश्रमात जेव्हा श्री दत्तात्रेय अवतरित झाले, तेव्हा प्रभूंचे रूप पाहण्यासाठी इंद्रादी देव, ऋषी-मुनी, गंधर्व, चरण, योगी आणि संत त्यांना भेटायला आले. त्या सर्वांची ती उत्सुकता पाहता, श्री दत्तात्रेय एका कुमाराचे रूप धारण केले आणि त्यांना योगाचे मार्गदर्शन केले. "मी शरीररूप (स्थूल) नाही, मी समयघटिका ही नाही. मी जन्म आणि मृत्यू रहित आहे. (मी या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक परीमाणीत गोष्टींच्या च्या अंतर्भूत असलो तरी या सर्वांच्या पलिकडील आहे.) भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मी विविध स्वरूपात अवतरतो आणि माझी ही स्वरूपे तात्कालिक किंवा समयोचित असली तरी ही यामुळे माझ्या तात्विक अवस्थेवर काही प्रभाव पडत नाही." हे अवतार योगाच्या प्रचारासाठी तसेच योगाभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी आणि योगाच्या अनुयायांना आशीर्वाद देण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच या अवतारला 'योगिजन वल्लभ' म्हणून ओळखले जाते. (योग म्हणजे केवळ योगासने नव्हेत.)

हीच दत्तजयंती म्हणून आपण साजरी करतो.

सुरगणादिवंदिताय | बालरूपा निरंजना ||
योगिजन-वल्लभावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||

सुरगण म्हणजे देव - ऋषिंद्वारे वंदिल्या गेलेल्या, बालरूप आणि निरंजन म्हणजे ज्यात कुठलेही अंजन किंवा अशुद्धी नाही (जे निर्मळ, शुद्ध, परम पवित्र आहे). अशा योगिजन-वल्लभ अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.

लिलाविश्वंभर
लिलाविश्वंभर 

६) लिलाविश्वंभर

दत्तात्रेयांचा सहावा अवतार 'लिलाविश्वंभर' ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्नान्न दशेस लागले होते तेव्हा दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला.  

जन्म:- पौष शुद्ध १५

या अवतारात श्रीदत्तात्रेयांचे मुलांसाठीचे प्रेम आणि प्रखर दयाळूपणा पाहण्यासारखा आहे. त्या काळात देशात एक भयंकर दुष्काळ पडला होता. प्राणी अन्न आणि पाण्याविना पार सुकून गेले होते. चोर आणि दरोडेखोर यांनी लोकांना अन्नपाण्यासाठी लुटणे चालू केले होते. ऋषी-मुनी त्यांची उपासना करू शकत नव्हते आणि यज्ञव्यवस्था जवळपास मोडकळीस आली होती. तेव्हा सगळे ऋषी मुनी ब्राह्मण इत्यादींनी श्री दत्तप्रभूंना शरण गेले. मार्गशीर्ष पौर्णिमेला जन्म घेतलेले श्रीगुरू जेमतेम एक महिन्याचे होते आणि माता अनसूया यांच्या मांडीवर स्तनपान करीत होते. 

भक्तांची प्रार्थना ऐकून श्री दत्तप्रभू त्यांच्यासमोर "लीला विश्वंभर" म्हणून प्रकट झाले आणि सर्वांना अन्न, वस्त्रे आणि धनधान्ये दिली आणि त्या सर्वांना संतुष्ट केले. हे सर्व त्यांनी लीलया केले आणि म्हणून या अवताराला 'लीला विश्वंभर' म्हणून ओळखले जाते.

श्री दत्तात्रेयांनी भक्तांना नंतर संबोधित केले की, "हे जीवन एका घनदाट जंगलासारखे आहे. ज्यात अहंकार हा एक मोठे वृक्ष, वेली व वनस्पती यांनी सभोवती वेढलेला एक मोठा पर्वत आहे. काम म्हणजे भयानक सिंह, क्रोध म्हणजे (क्रोधाचा) एक संतापलेला साप आहे, वासना (इच्छा) एक गहिरा तलावाच आहे. जे लोक हे पार करू शकत नाहीत, ते खोल गर्तेत बुडतात." श्री दत्तात्रेयांनी नंतर हे दृश्य बोलता बोलता अचानक अदृश्य केले. मग, भक्तांनी विचारले, "स्वामी, हे भयंकर जंगल कुठे गेले?" स्मितहास्य करीत श्रीगुरू म्हणाले, "ज्यातून निर्माण झाले आहे, त्यातच विसर्जनही झाले आहे. अज्ञानामुळे हे अस्तित्वात येते आणि जेव्हा ज्ञान प्राप्त होते तेव्हा ते नष्टही होते. म्हणूनच जे माझे स्मरण करतील ते संसार कर्दमातून मुक्त होतील. हे संपूर्ण जग असेच नश्वर आहे आणि केवळ मूळ आत्मतत्त्वच अविनाशी आहे, जे मुळ आहे, तेच फक्त टिकणारे आहे." यावर भक्तांनी विचारले, "स्वामी, हे आत्मतत्त्व कसे आहे?" श्री दत्तात्रेय म्हणाले, "मीच ते आत्मतत्त्व आहे. चांगले कर्म आणि शुद्ध भक्तीच्या द्वारे मला जाणता येते"

सर्वसंकटविमुक्ताय | कामक्रोधादिवर्जितः ||
लीला विश्वंभराय स्वामी | दत्तात्रेयाय नमो नम: ||

सर्व संकटांपासून विमुक्त करणाऱ्या, काम-क्रोधादी षड्रिपूंच्या पलिकडे असणाऱ्या, लीला विश्वंभररूप श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो

सिध्दराज
लिलाविश्वंभर 

७) सिद्धराज

भ्रमंतीत एकदा दत्तात्रेय बद्रिकावनात गेले. तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले. दत्तात्रेयांनी कुमार रुप धारण केले आणि अनेक चमत्कार करुन सिध्दांचे गर्वहरण केले, व त्या सर्वांना योगदीक्षा दिली. हा दत्तात्रेयांचा 'सिध्दराज' नावाचा सातवा अवतार. 

जन्म:- माघ शुद्ध १५

सद्गुरु भगवान श्री दत्तात्रेय यांचा सातवा अवतार म्हणजे सिध्दराज या नावाने प्रसिध्द आहे. लीलाविश्वभंर दत्त या नावाने अवतरुन अपेक्षित असलेले सर्व कार्य पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रेयप्रभूंनी सिध्दराज या नावाचा अवतार घेतला. सदगुरु श्री लीलाविश्वंभर देव हे एकदा स्वत:चे रुप लोकाच्या लक्षात येऊ न देता बालरुपाने प्रकट झाले व भूतलावर इतस्तत: पर्यटन करीत करीत हिमाचल प्रदेशातील बदरिकावनात एकटेच प्रविष्ट झाले. तेथे अनेक सिध्द् लोक वास्तव्य करीत होते. त्यांनी खडतर तपश्चर्या करुन कष्टसाध्य अशा सिध्दि मिळविलेल्या होत्या. त्या सिध्दिंच्या जिवावर ते अनेक प्रकारचे सुखे भोगीत व चैन करीत काळ कंठीत होते. सिध्दिंच्या बळावर ते खूपच कामाक्रोधदि विकारांच्या आहारी गेलेले होते. कोणी लंगोटी परिधान करुन तर कोणी नग्न अवस्थेतहि राहत होते. कोणी मौन धारण करुन बसलेले होते, तर कोणी आत्मप्रौढींचे वर्णन करण्यात गर्क झालेले होते. कोणी आस्तिकांचा पक्ष घेऊन तर कोणी नास्तीकांचा पक्ष घेऊन निरनिराळया विषयांवर वादविवाद करीत बसलेले होते. एकदा त्या सिध्दांचा मेळावा एका ठिकाणी जमला होता. त्या मेळाव्यात लीलाविश्वंभर दत्तात्रेय हे बालरुप धारण करुन सर्वांच्या मागे जाऊन बसले. सर्व सिध्दांच्या स्वभावाची परीक्षा पाहणे व त्यांच्या गर्वाचा परिहार करणे हा उद्देश्य दत्तात्रेयांनी मनात ठेवलेला होता. दत्तात्रेयांचे ते अत्यंत तेजस्वी व दिव्य बालरुप पाहून सर्वांची दृष्टी त्यांच्याकडे आकृष्ट झाली. अत्यंत मनोहर असलेले बालयोगी भगवान दत्तात्रेय योगमूद्रेने बसलेले होते. दत्तात्रेयांना ऐटीत बसलेले पाहून सर्वांनी त्यांना प्रश्न केला,
 
“बाळ तु कोण आहेस?” त्यांचा हा प्रश्न ऐकून दत्तात्रेय म्हणाले, “ माझे स्वरुप कोणाच्याही प्रतीतीला येणारे नसल्यामूळे मला अप्रतितस्वरुप म्हणतात”
“तूझा आश्रय कोण आहे ते तरी सांग!” दत्तात्रेय म्हणाले, “मला कोणी आश्रय नाही व माझा कोणी आश्रय अथवा संरक्षकहि नाही.
“तुझा योग कोणता व त्याच्या अभ्यासाची रीत कोणती?” दत्तात्रेय म्हणाले “माझ्या योगाला मी चित्रयोग हे नाव दिलेले असून त्याच्या अभ्यासाची काही प्रक्रिया नाही.” 
यावर सिध्दांनी विचारले, “तुझा गुरु तरी कोण आहे?” त्यावर दत्तात्रेयांनी उत्तर दिले की, "मला कोणी गुरु नाही." 
पुन्हा सिध्द म्हणाले, “तुझी मुद्रा कोणती, वैष्णवी की शांभवी?” सिध्दराज म्हणाले "माझी ही करुणात्मक मायेच्या पलीकडची निरंजनी मुद्रा आहे”
“अरे ती कशी असते?” सिध्दराज म्हणाले “जसा मी आहे तशीच ती असते”
“अरे या मूद्रेत तुला काय दिसत आहे” सिध्दराज दत्तात्रेय म्हणाले, “ध्यानातील अवस्थेत जे प्रचीतीला येते अर्थात ध्याता, ध्यान आणि ध्येय या त्रिपुटीच्या पलीकडचे जे काही तत्व आहे तेच माझे ध्येय होय”

याप्रमाणे ती सिध्दमंडळी व भगवान श्री दत्तात्रेय यांचा वादविवाद चालला असताना आकाशमार्गाने जात असलेले अकरा रुद्रा, बारा आदित्य, अष्ट वसू आणि त्याचप्रमाणे एकोणपन्नास मरुद्रगण तसेच महर्षि, साध्यदेव, यक्ष, गंधर्व व किन्नर हे जात असता त्यांची गति कुंठित होऊन ते सर्व भूतलावर त्या ठिकाणी अवतरले. त्यांना पाहून ती सर्व सिध्दमंडळी आश्चर्यचकित झाली. सिध्द लोकांना वाटले हे त्यांच्या सिध्दीचे फळ आहे व त्यामूळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यांचा तो परस्परांमध्ये चाललेला कलह पाहून श्री दत्तात्रेय त्यांना म्हणाले, 

"सिध्दजनहो तुम्ही आपसात हे भांडण का करीत आहात तुम्ही सर्वच श्रेष्ठ आहात, पण तुमच्यात अधिक श्रेष्ठ कोण आहे याचा निर्णय घेण्याची सोपी युक्ती मी तुम्हांला सांगतो. गति कुंठित होऊन भूमंडलावर या ठिकाणी उतरलेले हे सर्व देव आणि इतर लोक ज्याच्या शब्दाने पुन: वर जातील तो तुम्हा सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असे समजा." 

त्यांचे भाषण ऐकून सर्व सिध्दजनांनी प्रयत्न केले पण एकाच्याही शब्दाचा उपयोग झाला नाही. कोणीही देव अथवा ऋषि मुनी आपआपल्या स्थानी हलूहि शकले नाही. यामुळे आपण खूप मोठी सिध्दी मिळवलेली आहे असे मानणारे ते सर्व सिध्दलोक अत्यंत लज्जित झाले. त्यांचा क्रोध मावळला. अहंकार पार गळाला. ते सर्व सिध्द निस्तब्ध झाले. त्यानंतर सिध्दराज श्री दत्तात्रेय म्हणाले

"देव हो, ऋषि-मुनिजनहो तुम्ही सर्व आपआपल्या स्थानाला सत्वर जाऊन पोहोचावे. मी तुमचा प्रतिबंध दूर केला आहे. तुम्ही तिळमात्रही चिंता न करता आनंदाने आपआपल्या स्थानाला जावे. माझा तुमच्यावर अनुग्रह आहे."
 
हे शब्द ऐकल्याबरोबर सर्व मंडळी एका क्षणात आपापल्या स्थानाला जाऊन पोहोचली. हे पाहून बदरिकाश्रमातील सर्व सिध्द महात्मे आश्चर्यचकित झाले व म्हणू लागले, खरोखर हा प्रत्यक्ष परमात्माच बालरुपाने आपल्यापुढे आवतरला आहे. सर्व सिध्दांनी दत्तात्रेयांच्या चरणी सादर प्रणिपात केला. देव व सिध्द यांनी त्या ठिकाणी दत्तात्रेय यांची मुक्त कंठाने स्तुति केली. सर्व सिध्दांना सिध्दी देणाऱ्या दत्तात्रेयांना सिध्दराज असे नाव देण्यात आले.

रहस्य, न्यास, कवच इत्यादि सर्व तांत्रिक पध्दतींचाही उपदेश त्यांनी केला. सिध्दराजांनी स्वत:च हि शास्त्रपध्दत सांगितलेली असल्यामुळे या पध्दतीला सिध्दराजगम असे म्हणतात. हि सिध्दराज पध्दत श्री दासोपंत यांनीही उपदेशीली आहे. दासोपंतानी ती लिहूनही ठेवलेली आहे. हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ सिध्दराजगम या नावाने प्रसिध्द आहे.

श्री दत्तगुरू बद्रीवनात विश्वंभर नावाच्या बालक रुपात अवतरीत झाले, जिथे अनेक सिद्धपुरूष विविध प्रकारच्या तपांचे आचरण करीत होते. काही जण सिद्धी प्राप्त करून मूळ उद्देश बाजूला ठेवून अनेक सुखांचा आनंद घेत होते. काहीजण देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्याच्या ध्यानात मग्न होते, तर काही जण त्याच्या शोधात मग्न होते. विश्वंभर स्वामी सिद्धांच्या या सभेत एका कोपऱ्यात बसले होते. श्रीमुखमंडलावरील ती अद्वितीय आभा पाहून पाहून त्या सिद्धांनी श्रीगुरूंना विचारले की;

प्र. "तू कोण आहेस?"
उ. श्री दत्तात्रेय "मला बाह्यरूपाने किंवा उपाधीने जाणता येत नाही".
प्र. "तुझे निवासस्थान कोणते आहे?"
उ. "माझ्याकडे निवास नाही व माझे आश्रयदाते गुरुही नाहीत."
प्र. "तुमचा योग कोणता आहे? आपल्या अभ्यासाची पद्धत काय आहे?"
उ: "माझा चित्रयोग आहे आणि माझ्या अभ्यासाचा कोणताही विशेष प्रकार नाही."
प्र. "तुमची मुद्रा कोणती आहे?"
उ. "माझी अत्यंत दयाळू अशी निरंजनी मुद्रा आहे."
प्र. "या मुद्रेमध्ये आपण काय पाहत आहात?"
अ. "मी ध्यानावस्थेच्याही पलिकडे पाहतो आहे. माझे लक्ष्य असे तत्त्व आहे जे ध्याता, ध्यान आणि ध्येय या तीनही गोष्टींच्या पलीकडे आहे."
प्र. "आपला मार्ग कोणता आहे?"
उ. "माझे मार्ग म्हणजे शिवत्त्व (शाश्वत तत्त्व) ची पूर्तता आहे."

श्रीगुरूंचा त्या सिद्धांशी हा संवाद चालू असताना ११ रुद्र, १२ आदित्य, ४९ रुद्रगण, ऋषी, मुनीस, देवगण, गंधर्व, यक्ष, किन्नर इत्यादी आकाशमार्गे जात होते. अचानक त्यांच्या हालचालीत अडथळा निर्माण झाला, ते सर्व बद्रीवनात उतरले. तेव्हा प्रत्येक सिद्धपुरूष आपले महत्त्व सिद्ध करण्यासाठी बोलू लागले की त्यांच्या तपश्चर्येचे बलाने त्यांच्या हालचालीमध्ये अडथळा निर्माण झाला आणि ते पृथ्वीवर खाली उतरले. एवढ्यात अवतार धारण केलेले श्रीदत्तराज, म्हणाले, "तुम्ही सगळे व्यर्थ संघर्ष का करता? जो त्यांच्या हालचालीतील अडथळा दूर करून, त्यांना आकाशातून जाण्यास परवानगी देऊ शकेल तोच सर्वोत्तम सिध्द असेल असे आपण मानूया.'' श्रीगुरूंचा हा युक्तिवाद सर्वांनी मान्य केला आणि प्रत्येकजण पुढे येऊन आपापल्या परीने प्रयत्न करू लागला. परंतु कोणीही त्या देवगणांना पुन्हा आकाशमार्गाने पाठविण्यात यशस्वी झाले नाही. शेवटी श्री दत्तात्रेय म्हणाले, "हे सुरगणांनो आपण आपल्या ईच्छित स्थळी प्रस्थान करू शकता, तुमच्या हालचालीतील अडथळा काढून टाकण्यात आला आहे." गुरूदेवदत्तांच्या मुखातील हे उद्गार ऐकून, सर्व गण श्री दत्तप्रभूंना अभिवादन करून तेथून निघून गेले आकाश. झाला प्रकार पाहताच सर्व सिद्ध पुरूषांना कळून चुकले की मुलगा सामान्य नसून परमात्मयोगी आहे. म्हणून अहंकार त्यागून ते त्यांना शरण गेले.

कुमारयोगी श्री दत्तप्रभू म्हणाले, "मी सिद्धराज, योगीराज आहे. कालाग्निशमन करणाऱ्या आणि दुःखाचे निर्मूलन किंवा हरण करणारा असल्यामुळे मला 'हरी' असेही संबोधले जाते. आत्मज्ञानाचा विचार करताना आणि त्यायोगे मला प्राप्त करण्यासाठी, मंत्रांचा अभ्यास करावा. मीच मंत्रराज, अमर आणि परब्रह्मरूप आहे. सर्व विश्वाचा मी नियंता आहे; पण मी स्वतः मात्र मंत्रांच्या अधीन आहे.  योग्य प्रक्रियेनुसार साधना केल्यास मंत्रांद्वारे तुम्हाला त्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात ज्या मिळविण्याचा तुम्ही प्रयास करत आहात." हे सांगून त्यांनी त्यांना काही मंत्र आणि त्यांची कार्यपद्धती सांगितली. त्या सर्व मंत्रउपदेशांना एकत्रितपणे 'सिद्ध राजआगम' असे म्हटले जाते. 

सुमारे ५०० वर्षांपूर्वी, श्री दत्तात्रेय यांनी हे अंबेजोगाई (महाराष्ट्र) च्या आपल्या महान आवडत्या भक्त दासोपंत यांना पुन्हा एकदा हे रहस्य कथन केले. त्यांनी लिखित स्वरूपात ते जतन केले आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेला, मघा नक्षत्रावर हा अवतार झाला.

ध्यान-ध्यातृ-ध्येयरूपा | चित्रयोगादीसंस्थितः ||
सिद्धराजावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||

ध्यान-ध्याता-ध्येय या तीनही अवस्थारूप (आणि तरीही त्याच्याही पलिकडे) असणाऱ्या, चित्रयोगावस्थेत राहणाऱ्या, सिद्धराज अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.

ज्ञानसागर
ज्ञानसागर

८) ज्ञानसागर

सिध्दीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी दत्तात्रेयांनी रुपातीत, गुणातीत, ज्ञानयोगमुक्त असे सहजस्थितीतील 'ज्ञानसागर' नावाचे रुप धारण केले.
जन्म:- फाल्गुन शुद्ध १०

श्रीदत्तात्रेय यांचा आठवा अवतार ज्ञानराज हा होय. एकदा विश्वगुरु भगवान श्रीदत्तात्रेय एकांतामध्ये बसले असता विचार करु लागले की. हे सिध्द लोक माझ्या उपदेशाने सिध्द झाले खरे पण जोपर्यंत कामक्रोधादि विकार समूळ नष्ट होत नाहीत तोपर्यंत खऱ्या शांतीचा व सुखाचा त्यांना लाभ होणार नाही. काम हा सर्व दु:खांचे मूळ आहे व कामामूळेच जीव हा सतत संसारामध्ये धडपड करीत असतो. काम हाच कर्ता व करविता आहे. कामाच्या जोडीला क्रोधहि पाठोपाठ धावत येतोच, हे सर्व जगच कामाच्या आधिन आहे. काम म्हणजे इच्छा. मनात इच्छेचा अंकूर निर्माण झाला की त्या इच्छेतून दूसरी इच्छा, दुस-या इच्छेतून तिसरी इच्छा  निर्माण होते. अशा रीतीने हे सर्व जग विषयाभिलांषांच्या जाळयात सापडतं व चिंतेने त्रस्त होते, तेंव्हा सिध्दराज दत्तात्रेय मनाशी विचार करतात की, मला या सर्वांना या कामाच्या जाळयातून सोडविले पाहिजे. या लोकांना ज्ञानानेच सायुज्याचा लाभ होईल व ते पूर्ण सुखी होतील, असा विचार करुन परमदयाळू भगवान श्रीदत्तात्रेय ते पूर्वीचे त्रिगुणातीत आणि नित्य शुध्द, बुध्द, मुक्ता असे आपले स्वाभाविक रुप व आपली सहजावस्था क्षणभर बाजूला ठेवून पुन्हा कौमाररुप धारण करुन प्रकट झाले. हा दत्तात्रेयांचा आठवा अवतार होय. या अवताराला ज्ञानसागर असे अनुरुप नाव देण्यात आले.

ज्ञानसागर हा दत्तात्रेयांचा आठवा अवतार फाल्गुन शुक्ल पक्षातील दशमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाच्या वेळी झाला. त्यावेळी पुनर्वसू नक्षत्र होते. बद्रीकाश्रमातील सिध्दांचा समुदाय ज्या ठिकाणी बसला होता तेथे डोक्याइतक्या उंच स्थानावर आकाशात अधांतरी विराजत असलेल्या दत्तात्रेयांना पाहून त्याचा प्रभाव सहन न झाल्यामुळे दत्तात्रेयांच्या त्या सिध्दीचा अथवा शक्तीचा पराभव करण्याचा विडा उचलला. सर्वांनी आपापल्या परीने दत्तात्रेयांना खाली आणण्याचा प्रयत्न केला पण ते काही दत्तात्रेयांना स्वस्थानापासून तिळमात्रहि हलवू शकले नाहीत. त्यांच्या त्या प्रयत्नाने दत्तात्रेयांची मुद्रा तिळमात्र ही ढळू शकली नाही. तेव्हा सर्व सिध्दांची खात्री झाली की हा कोणी सामान्य सिध्द नसून साक्षात परमात्माच आहे. असे समजून त्यांनी दत्तात्रेयांना नमस्कार केला.  

बद्रीवनात श्रीगुरूंचे भ्रमण चालूच होते. एकदा भगवान श्री दत्तात्रेयांनी विचार केला की, "या लोकांनी योग सिद्धी प्राप्त केली, परंतु काम, क्रोध, लोभ इत्यादी षड्रिपूंवर त्यांनी विजय मिळवले नाहीत आणि तोपर्यंत त्यांना मनाची खरी शांती मिळणार नाही आणि त्यांना कधीच शाश्वत आनंद मिळणार नाही. काम म्हणजे इच्छा, वासना ह्याच सर्व दुःखांच्या मुळाशी आहेत आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जीवनात लढत आहे. क्रोध सुद्धा या ईच्छांच्या अपूर्णतेतूनच जन्म घेतो. संपूर्ण जग या संघर्षात ओढले आणि व्यापिले गेले आहे आणि त्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक आणि अध्यात्मिक अशा तिन्ही प्रकारचे भोग त्यांना भोगावे लागत आहेत. म्हणून सर्व लोकांनी काम, क्रोध, लोभ इत्यादिंच्या बंधनांच्या पलिकडे जायला हवे म्हणजे मग ते ज्ञान प्राप्त करतील आणि माझ्याशी एकरूप होतील." म्हणून श्री दत्तात्रेय 'ज्ञानसागर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुमार स्वरूपात अवतरीत झाले. हा अवतारात प्रभू अवकाशात साधारण एक मनुष्य उंचीवर हवेत अधांतरी दिसू लागले. सहाजिकच त्या सिद्धांचे लक्ष वेधले गेले आणि ते ह्या कुमाराला जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी अथक प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. त्यांना कळून चुकले की हे तेच परमात्मा आहेत आणि ते त्या कुमाररूप श्रीगुरूंना शरण गेले आणि त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली.

त्यावर प्रसन्न होऊन श्री दत्तात्रेय म्हणाले, "कामामुळे क्रोध वाढीस लागतो, क्रोधामुळे सद्सद्विवेकबुद्धीचा लय होतो आणि अयोग्य कृती होतात. षड्रिपूंवर विजय मिळवण्याऐवजी जे केवळ सिद्धींच्या पाठी लागतात त्यांच्या बाबतीत सुद्धा हेच होते. जे सिद्धींच्या पाठी जातात, ते मझ्याशी एकरूपता न पावता शाश्वत आनंदाला मुकतात." "म्हणूनच तुम्ही मला अनन्यभावाने शरण जा, मंत्रांचे पुरश्चरण करा (नाम घ्या) आणि शाश्वत तत्त्व जाणून घ्या आणि नैतिक जीवन जगा. मला बुद्धी किंवा तर्काने मला जाणता येत नाही. त्यामुळे आपण काम-क्रोधादींवर विजय मिळवावा व माझी भक्ती चालू ठेवावी." हा उपदेश ग्रहण करून नंतर सिद्धांनी श्री दत्तप्रभूंनी दर्शविलेल्या मार्गाचे अनुसरण केले आणि शाश्वत आनंद मिळविला. सिद्धांच्या कल्याणाकरिता बद्रीवनात हा अवतार फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी झाला.

कुमारप्रभवे तुभ्यं | सिद्धजनप्रबोधका ||
ज्ञानसागरावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||

कुमाररूपात आपली प्रभा प्रकट करणाऱ्या, सिद्धजनांना ज्ञानाचा उपदेश करणाऱ्या, ज्ञानसागरावतार धारण केलेल्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो 

विश्वंभरावधूत
विश्वंभरावधूत

९) विश्वंभरावधूत

पुढे आणखी एकदा सिध्दांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी 'विश्वंभरावधूत' या नावाचा नववा अवतार घेतला व योगीजनांना बीजाक्षर मंत्रांचा (द्रां) उपदेश केला.

जन्म:- चैत्र शुद्ध १५

श्री अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी बदरिकाश्रमांतील सिध्दजन व भक्तजनांच्या कल्याणासाठी श्रीविश्वंभरावधूत या नावाचा अवतार घेतला. बरिकाश्रमी राहून खडतर तपश्चर्येने सिध्दिसंपन्न झालेल्या भक्तजनांवर अनुग्रह करण्याकरिता ज्ञानसागर रुपाने प्रकट होऊन त्यांच्या अहंकाराचा परिहार करुन व सदुपदेशाने त्यांच्या अज्ञानरुपी तिमिराचा नाश करुन त्यांना सदाचाराचे वळण लावले. यानंतर बराच काळ निघून गेल्यावर दत्तात्रेय यांना त्यांचे स्मरण झाले. ते सर्व सिध्दजन माझ्या उपदेशाप्रमाणे बागून उत्तम गति प्राप्त करुन घेण्याच्या स्थितीत आले आहेत की नाहीत, हे पाहण्याची दयासागर दत्तात्रेयांना इच्छा झाली. 

सद्गुरु केवळ उपदेश करुन थांबत नसतात तर आपण केलेल्या उपदेशाप्रमाणे वागून साधक हे उत्तम गतीच्या दिशेने उत्तरोत्तर प्रगमनशील वाटचाल करीत आहेत की नाहीत हे परीक्षूण पाहण्यासाठी भक्तजनांना वारंवार भेटी देतात व त्या भेटीतून पुन:पुन: सदुपदेशाचा लाभ देऊन साधकाला ते कृतार्थ करतात.
 
श्री दत्तात्रेय यांनी बदरिकाश्रमांतील सिध्दजनांची परीक्षा घेण्याचे ठरविले. निर्मळ ब्रम्ह देखील भक्तजनांची परीक्षा पाहण्याकरीता मळकट रुपाने अवतरले. या सर्व भक्तांना पूर्वी आपण मंत्रानुष्ठानाचा मार्ग दाखवला होता. बदरिकाश्रमातील आपल्या भक्तांच्या हातून ही सर्व अनुष्ठाने व्यवस्थित पार पडत आहेत की नाहीत, ते पाहण्यासाठी मंगलमय अवधूत अमंगल रुपात अवतरले.  त्यांनी एक विचित्र वेष धारण केला व बदरिकाश्रमात प्रवेश केला. म्लेच्छारुपाने अवतरलेल्या दत्तात्रेय यांनी मात्र सर्व सिध्दांचे निरीक्षण केले आणि त्या सिध्दांच्या समाजात ध्यानमुद्रेने ते शांतपणे एका बाजूला बसले. त्या वेळेला काही लोक चित्ताचा स्वरुपी लय करुन बसले होते, तर काही चंचल चित्ताने थटटामस्करी करीत बसलेले होते. काही एकमेकांवर संतापलेले होते तर काही दु:खित व कष्टी होऊन बसलेले होते. काही ग्राम्य गोष्टींच्या चर्चेत दंग होते, तर काही लोकांना कामक्रोधादि विकारांनी ग्रासून टाकलेले होते. काही लोक पूर्वी अभ्यासलेल्या ध्यानयोगाच्या बळावर ध्यानसमाधीमध्ये निमग्न होऊन बसलेले होते.

दयानिधी दत्तात्रेयांनी हा प्रकार पाहिला. त्यांचे मन कृपेने कळवळले. त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी दत्तात्रेयांनी त्या सर्वाची मने आपल्याकडे वळवून घेतली तेव्हा ते सिध्द महात्मे आपापली कर्मे सोडून निश्चलपणे व एकटक दृष्टीने दत्तात्रेयाकडे पहातच राहिली. दत्तात्रेय पूर्वीप्रमाणे आपल्याला सोडून जातील या भितीने त्यांची मने घाबरुन गेली होती, त्यामूळे दत्तांत्रेय बसले की ते बसत व दत्तात्रेय उठले की ते ही उठत. अशा रितीने ते दत्तात्रेयांचे अनुकरण करु लागले. त्या सर्व सिध्दांनी दत्तात्रेयांना प्रश्न केला की, "तुम्ही कोण आहात?" यावर दत्तात्रेयांनी मागील अवताराप्रमाणे उत्तरे देण्यास प्रारंभ केला. दत्तात्रेयांचे उत्तर ऐकूण सिध्दलोक आपआपसात बोलू लागले की, हा पूर्वीच आपल्याला दर्शन देणारा व उपदेश देणारा दत्तात्रेय तर नसेल ना यावर काही सिध्दलोक भानावर येऊन म्हणाले की, हा खरोखर तो सिध्दराज ज्ञानसागर भगवान श्री दत्तात्रेयच आहे.

आता सिद्धांची पुनः परीक्षा घेण्याची वेळ होती. सिद्धांनी किती प्रगती केली आहे हे श्रीगुरूंना पहायचे होते. श्री दत्तप्रभूंनी यांनी म्लेंच्छाचे (क्रूर मांसाहार करणारा - खाटिक /कसाई) रूप धारण केले. त्याचा चेहरा राकट होता. त्याने गळ्यामध्ये ताईत बांधला होता, त्याच्या हातात एक वाकडीतिकडी काठी होती आणि एक काळा कुत्रा त्याच्या मागे मागे चालत होता. अशा अवतारात हा म्लेंच्छ त्या सिद्ध लोकांजवळ पोहोचला. त्याने पाहिले की काही सिद्ध ध्यान करीत होते, तर काहीजण विनोद करीत होते आणि इतर काही दुःखाने ग्रस्त होते. सहाजिकच त्याकडे सिद्धांचे लक्ष गेले परंतु यावेळी प्रभूंची लीलाच वेगळी होती. ह्यावेळी ते तेजोमय कुमार नव्हते आणि अचंबित करण्यासाठी हवेतही नव्हते. त्यामुळे केवळ हे विचित्र बाह्यरूप पाहून सिद्ध नेहमीप्रमाणे त्यांना प्रश्न विचारू लागले पण श्रीगुरूंनी त्यांस त्यांच्या पहिल्या शैलीत उत्तर दिले. ती उत्तरे ऐकून त्या सर्वाना कळून चुकले की हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात दत्तात्रेयच आपली परीक्षा पाहण्यासाठी पुन्हा आले आहेत. पश्चात्तापदग्ध ते सर्व दत्तगुरूंना शरण गेले. मग मात्र दत्तात्रेय त्यांच्या नेहमीच्या रूपात प्रकट झाले आणि बाह्य स्वरूपावर न जाता त्याच्या तत्व स्वरूपावर ध्यान करण्याचे मार्गदर्शन त्यांनी सर्वांना केले. हा अवतार चैत्र शुद्ध पौर्णिमेला, मंगळवारी, चित्रा नक्षत्रावर, दुसऱ्या प्रहरावर झाला.

म्लेंच्छरूपा महावदना | सर्पकरदंडधारका ||
विश्वंभरावधूताय | दत्तात्रेयाय नमो नम: ||

म्लेंच्छरूप धारण केलेल्या, अक्राळ विक्राळ तोंड असलेल्या, हातात (सापासारखा) वाकडीतिकडा दंड धरलेल्या विश्वंभरावधूत श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो. 

(विश्वरूप अवतारात सुद्धा अर्जुनाला श्रीकृष्णांचे असेच काहीसे रूप दिसत होते - ती अक्राळ विक्राळ तोंडे सर्व सृष्टीचा घास करून भक्षण करीत होती. त्याला काळाचे परीमाण नव्हते. प्रत्यक्ष कालसर्पच त्याने धारण केला होता. मायेने नटलेला माझा गुरू विश्वंभर ही आहे आणि मायेच्या पलिकडचा अवधूतसुद्धा आहे. त्यांचे करावे तेव्हढे वर्णन कमी आहे) 
 

१०) मायामुक्तावधूत

मायामुक्तावधूत
मायामुक्तावधूत

भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम व श्रध्दा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी 'मायामुक्तावधूत' या नावाचा दहावा अवतार घेतला.

जन्म:- वैशाख शुद्ध १४

श्री दत्तात्रेयांचा दहावा अवतार- मायामुक्तावधूत

वैशाख शुद्ध चतुर्दशी च्या दिवशी, मध्यान्हीच्या वेळी श्रीगुरू एका भिक्षुकाच्या रूपात, आपल्या प्रिय भक्त शील च्या घरासमोर प्रकट झाले. त्यांचे हे अवताररूप फार सुंदर आणि तेजस्वी होते. त्यांच्या गळ्याभोवती रूद्राक्षांच्या माळा होत्या. त्यांच्या हातात एक भिक्षा पात्र होते आणि उजव्या हातात एक दंड होता. शीलच्या घरात त्यावेळी श्राद्धकार्य चालू होते आणि त्यासाठी त्यांनी ब्राम्हणांना आमंत्रित केले होते. ब्राम्हणांना या भिक्षुकाला पाहून राग आला. त्यांनी त्या भिक्षुकाला विचारले, "तु कोण आहेस?" "मी अजिंक्य, अविनाशी, सर्वावस्थांच्या पलिकडे असलेला अवधूत आहे!". त्यांचे हे उत्तर ऐकताक्षणीच शीलला कळून चुकले की हे गेल्या अवतारातील सिद्धराज ज्ञानसागर आहेत. तथापि शाश्वती होण्यासाठी, शीलने त्यांना विचारले, "आपण कोठे आश्रय घेता आणि आपले गुरू कोण आहेत हे कृपा करून सांगावे?" 

यावर भिक्षुकाच्या रूपातील श्रीगुरू म्हणाले, "माझे निश्चित निवासस्थान कोण्या विशिष्ट जागी नाही. माझा कोणीही गुरू नाही उलट मीच या त्रैलोक्याचा स्वामी आहे." हे उत्तर ऐकताच शील ची हेच आपले सद्गुरू दत्तमहाराज असल्याची खात्री झाली. तो त्यांना मनोभावे शरण गेला. त्याने श्रीगुरूंना यथोचित आसनावर बसवून, पाद्यपूजादी करून योग्य सन्मान केला. त्यांना उत्तम नैवेद्य अर्पण केला.

हे सर्व जमा असलेले ब्राम्हण पाहत होते. श्राद्धाचे भोजन त्या भिक्षुकाला दिल्याचे पाहून त्यांना अधिकच राग आला. शीलने केलेले हे कार्य धर्मसंमत नाही असे सांगून त्यांनी शीलला दुषणे दिली. यावर श्रीगुरूंनी त्या ब्राम्हणांना विचारले, "ब्रम्ह म्हणजे काय हो?". "हे विचारणारा तु कोण? ॐ हेच परब्रह्म आहे आणि त्यानेच वेदांचे रूप धारण केले. पण तु अपवित्र आणि अ़धर्मी आहेस. त्यामुळे तुला वेद ऐकण्याचा पण अधिकार नाही." अहंकारी ब्राह्मण उत्तरले. संन्यासी यावर बोलले, "मी मायेच्या प्रभावाच्या पलिकडला आहे, म्हणूनच सामान्य जगतातील कुठलेही नियम मला लागू पडत नाहीत. वेदात विषद केलेली कर्मे ही तीन प्रकारची आहेत आणि हे जग सुद्धा त्रिगुणात्मक आहे आणि हे सर्व माझ्यासोबतच्या ह्या काळ्या श्वानाच्या रूपातच आहे. माझा हा कुत्रा सर्वच वेद-शास्त्रांमध्ये पारंगत आहे, हाच तुमचे समाधान करेल." असे बोलून त्यांनी कुत्र्यास वेद बोलण्याची आज्ञा दिली. आज्ञा होताच तो कुत्रा शिकलेल्या पंडितासारखा वेद बोलू लागला. सर्व उपस्थित ब्राह्मण हा चमत्कार पाहून स्तब्ध झाले. अवधूतांनी मग शीलच्या पितरांनाही पाचारण केले आणि ते सर्व ज्योतिरूपाने श्रीगुरूंमध्ये समाविष्ट झाले. झाला प्रकार पाहून ब्राम्हणांचा वृथा अभिमान पूर्ण गळून पडला आणि ते सर्व श्रीगुरूंना शरण गेले. श्रीगुरूंनी त्यांना भक्तिमार्गाचा उपदेश केला.

पाणीपात्रधराय त्वं |
श्वानसहिता शीलरक्षका ||
मायामुक्तावधूताय |
दत्तात्रेयाय नमो नम: ||

पाणी (संस्कृत शब्द - अर्थ - हात) म्हणजे हातात भिक्षा पात्र धारण केलेल्या, सोबत श्वान असलेल्या, शील नावाच्या भक्ताचे (ब्राह्मणाच्या क्रोधापासून तसेच संसारगर्तेत बुडण्यापासून) रक्षण करणार्‍या, मायामुक्तावधूत अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.

मायायुक्तावधूत
मायायुक्तावधूत

११) मायायुक्तावधूत

दत्तात्रेयांच्या अकराव्या अवताराचे नाव 'मायायुक्तावधूत' असे असून याचे रुप सावळे व सुंदर होते. मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मांस यांचे भक्षण सुरु होते. ही योगमाया होती.
जन्म:- जेष्ट शुद्ध १३

श्री दत्तात्रेयांचा अकरावा अवतार - मायायुक्तावधूत।  

जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला, स्वाती नक्षत्रावर, शुक्रवारी, सूर्योदयाच्या वेळेस हा अवतार झाला.
श्रीप्रभू एका तरूण तपस्व्याच्या रूपात प्रकट झाले. त्यांचे सोबत त्यांच्या डाव्या मांडीवर एक तरूण युवती बसली होती. त्यांचे हे रूप पाहून, साक्षात लक्ष्मी नारायणच प्रकट झाले आहेत असे समजून सर्वजण त्यांना शरण गेले आणि आपापल्या सांसारिक विवंचना त्यांचापुढे विषद करू लागले. परंतु एकाही दर्शनार्थीने अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी रूचि दाखवली नाही. श्रीगुरूंनी मग एक लीला केली, ते सोबत असलेल्या तरूणीसोबत नृत्य गायन करू लागले. परंतु हे तर श्री दत्तात्रेय आहेत आणि ते आपल्या मायेसोबत खेळत आहेत, असे समजून लोकांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. श्रीगुरूंनी मग मद्य, मदिरादि विषयसेवन त्या तरूणीसोबत सुरू केले आणि ते म्हणाले, "मी हे असे विषयसेवन करत आहे त्यामुळे तुमच्या समस्यांचे निराकरण करण्याची पात्रता आणि सामर्थ्य आता माझ्यात नाही." त्यांचे हे वचन ऐकताच उपस्थितांपैकी बरेच लोक निराश झाले आणि परत माघारी फिरले. पण काही शिष्य मात्र श्री गुरूंच्या त्यारूपातसुद्धा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिथे तसेच थांबले. त्यांची ती निष्ठा पाहून श्री दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या उपस्थित भक्तगणांना उपदेश केला, "श्रद्धा, भक्ति, ध्यान - धारणा, शमदमादि नियमांचे पालन आणि षड्रिपूंवर विजय मिळवूनच संसारबंधनातून मुक्ति मिळू शकते!"

यानंतर मायायुक्तावधूत नमर्देच्या उत्तर तटाने फिरत फिरत माहूरगडापर्यंत पोहोचले. येथे त्यांना जंभासूरापासून त्रस्त झालेले देवगण, कार्तवीर्य सहस्त्रार्जुन आणि परशुराम भेटले. श्रीगुरूंनी मग परशुरामांना क्षत्रिय वधाच्या दोषापासून मुक्त होण्यासाठी आणि मनःशांतीसाठी 'त्रिपुरा रहस्य' विषद केले.

अनघालक्ष्मीसहिताय |
मायारूपप्रदर्शका ||
मायायुक्तावधूताय |
शार्दुलाय नमो नम:||

श्रीगुरंसोबत असलेली त्यांची ही शक्ति मायारूपिणी देवी अनघाच होती. ह्या अनघालक्ष्मींच्या सोबत नित्य असलेल्या, आपले मायारूप दाखवणाऱ्या, मायायुक्तावधूत अवतार धारण करणाऱ्या श्री शार्दुलांना माझा नमस्कार असो 

आदिगुरु
आदिगुरु

१२) आदिगुरु

सद्गुरु श्रीदत्तात्रेय भगवान यांचा बारावा अवतार आदिगुरु या नावाने ओळखला जातो. मदालसेचा धाकटा पुत्र जो अलर्क, त्याला योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकरिता दत्तात्रेयांनी जो अवतार घेतला, त्याला आदिगुरु असे म्हटले आहे.

जन्म:- आषाढ शुद्ध १५

राजा म्हणून राज्य करताना, मदालसेचा पुत्र अलार्क हा अनेक संसारिक सुखांमध्ये तल्लीन झाला होता. त्याचा मोठा भाऊ, सुबाहू हा ज्ञानी होता. आपला भाऊ या वासंनांच्या पाठी आपले जीवन व्यर्थ घालवत आहे असे सुबाहूस वाटले. त्याला आध्यात्मिक दृष्टीने जागृत करण्याच्या उद्देशाने तो त्याच्या नगरात आला आणि संपत्तीमध्ये त्याने आपल्या वाटा मागितला. अलार्कने जेव्हा ते नाकारले तेव्हा सुबाहूने काशी राजाच्या मदतीने त्याच्या नगरावर हल्ला केला आणि त्याचे राज्य चहू बाजूंनी घेरले. परिणामी नगरात येणाऱ्या तरतुदी थांबल्या. यामुळे प्रजाजनांना अन्नधान्य मिळू शकले नाही आणि ते उपासमारीने ग्रस्त झाले. ही प्रतिकूल परिस्थिती पाहता अलार्क निराश झाला. तेव्हा त्याला त्याच्या आईने मदालसेने त्याला लिहिलेल्या पत्राची आठवण झाली जे त्याच्या आईने त्याला आणीबाणीच्या प्रसंगी वाचण्यास सांगितले होते. अलार्कने कसेबसे नगर सोडले, जंगलात प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जवळची पेटी उघडून त्यातील आपल्या प्रिय आईचे पत्र पाहिले. त्यात असे लिहिले होते की,' संकटांच्या काळात इतर विचारांचा त्याग करावा आणि संत शरण जावे आणि आत्मकल्यानाचा विचार करावा. माहूरगडावर पवित्र वास्तव्य करणाऱ्या परमगुरू श्री दत्तात्रेयांना शरण जावे.' आध्यात्मिक मार्गदर्शनापर्यंत त्याला श्री दत्तावर जायला हवे.

अलार्कने माहूरला जाऊन श्री दत्तात्रेयांची शरणागती पत्करून आपले दुःख सांगितले. श्री दत्तात्रेयांनी त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि विचारले, "हे दुःख तुझे आहे का? फक्त त्याआधी तु कोण आहेस याचा विचार करावा". या एका प्रश्नामुळे अलर्कच्या बुद्धीत प्रकाश पडला. त्याने स्वत: चा विचार करण्यास सुरवात केली. त्याच्या अज्ञानाचा नाश झाला आणि त्याचा अहंकार आणि लोभ देखील नाहीसा झाला तसेच शत्रुत्वाची भावना देखील विलुप्त झाली. ज्या अवतारात श्रीगुरूंनी अलार्कला उपदेश केला तो हा आदिगुरू अवतार आषाढ शुद्ध पौर्णिमेला, मंगळवारी, पहिल्या प्रहरी, पहिल्या मुहूर्तावर झाला.

मदालसात्मजवरदा | शाश्वतज्ञानप्रदायका ||
आदिश्रेष्ठा अभयहस्ता | दत्तात्रेयाय नमो नम:||

मदालसेच्या आत्मज म्हणजे मुलाला वरदान देणाऱ्या, त्याला शाश्वत ज्ञान देणाऱ्या, सर्वश्रेष्ठ अशा अभय प्रदान करणार्‍या (आदिगुरू अवतार धारण करणाऱ्या) माझ्या दत्तगुरूंना माझा नमस्कार असो. 

मदालसेचा पुत्र अलर्क राज्यकारभार पहात असता राज्यवैभवामध्ये त्याचे मन गुंतून गेले. त्याला आईने उपदेशिलेल्या ध्यान, धारणा, तत्वज्ञान व वैराग्य या सर्व गोष्टींचा विसर पडला. अलर्काचे जीवन कुत्र्या-मांजरा प्रमाणे विषयभोगात वाया जाऊ नये या पवित्र हेतुने अलर्काचा भाऊ सुबाहु याने काशिराजाचे साहाय्य घेऊन अलर्कावर स्वारी केली. अलर्काच्या राजधानीला वेढा दिला व बाहेरची रसद बंद केली. अलर्क राजा मोठा दयाळू व धार्मिक होता. तो धर्माने पैसा मिळवीत होता व पैशाचे धर्माचे आचरण करीत होता. पैसा आणि धर्म या दोहोच्या समन्वयातून तो संपूर्ण राज्यवैभवाचे सुख भोगीत होता. तो प्रजाजनांचे पित्याप्रमाणे परिपालन करीत होता.
 
रसद थांबल्याने आपल्या प्रजाजनांची आपल्या डोळयांदेखत हात असलेली उपासामार पाहून त्याला अत्यंत दु:ख झाले. संकटाच्या वेळी उपयोगाला यावी म्हणून त्याच्या मातेने त्याच्याजवळ गुप्तसंदेश पेटी ठेवलेली होती व सांगितले होते की, अगदी अपरिहार्य संकटाच्या वेळी ही तू उलगडून पहा म्हणजे तुला संकटांतून मुक्त होण्याचा मार्गहि दिसेल. या गोष्टीची आठवण होताच अलर्काने ती उघडून पाहिली व तीमध्ये मातेने लिहिलेला उपदेश एका सदाचारसंपन्न अशा अधिकारी ब्राम्हणाकडून वाचून घेतला. त्यात लिहिले होते की,

"दुसऱ्यांची संगति सर्वस्वी टाळावी. ती टाळता येत नसेल तर सज्जनांची संगति करावी. संत हे दुर्जनांच्या संगतीचा दुष्परिणाम टाळण्याचे उत्तम औषध होय. कोणत्याहि गोष्टीची इच्छा करु नये. अर्थात सर्व कामना सोडून द्याव्यात. त्या जर सोडून देता येत नसतील तर मुक्त हेाण्याची कामना अंत:करणात ठेवावी. मुक्त होण्याची कामना ही सर्व कामनांच्या दुष्परिणामांचे उत्तम औषध होय." 

उत्तम संत कोण भेटेल व कोठे भेटेल याचे उत्तर त्या सहृदय मातेने देऊन ठेवलेलेच होते. हा सर्व मातेचा हार्दिक म्हणजे कळवळयाचा संदेश ऐकून राजा अलर्क दत्तात्रेयांचा शोध करण्याकरिता सहयाद्री पर्वताच्या परिसरात आला व उत्तम संत भगवान श्रीदत्तात्रेयांचा शोध करु लागला. भक्तवत्सल भगवान श्रीदत्तात्रेय यांनी मायायुक्तअवधूत रुपाचा त्याग करुन आदिगुरुंचे रुप धारण केले, व त्याच रुपाने अवतरुन राजा अलर्काला दर्शन दिले. आदिगुरु दत्तात्रेय यांना पाहताच त्यांच्या चरणी अलर्काने साष्टांग प्रणिपात केला व करुणापूर्ण वाणीने अनुग्रहाची प्रार्थना केली.

आषाढ शुध्द पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीदत्तात्रेय हे आदिगुरुच्या रुपाने अवतरले. तो दिवस शनिवारचा होता. त्या दिवशी पहाटे पहिल्याच प्रहरातील दुसऱ्या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीदत्तात्रेय आदिगुरुंच्या रुपाने प्रकट झाले. दयासागर श्रीदत्तात्रेय यांनी अलर्काच्या मुखातून सर्व दु:खाची कहाणी ऐकली. हा आपला अनन्यभक्त असलेल्या मदालसेचा पुत्र आहे. कयाधूच्या उदरी प्रल्हादासारखे जसे पुत्ररत्न निर्माण झाले त्याचप्रमाणे मदालसेच्या उदरी जन्माला आलेले हे एक पुत्ररत्नच आहे असे समजून आदिगुरु श्रीदत्तात्रेय यांनी अलर्काचे सांत्वन केले. त्यांनी अलर्काला उपदेश केला. त्यांचा आशीर्वाद घेऊन राजा अलर्क आपल्या राजधानीला परत आला. सर्व राज्य त्याने सुबाहूच्या स्वाधीन केले. साष्टांग नमस्कार करुन तो एकांतामध्ये आनंदाने आत्मस्वरुपाचे चिंतन करण्यासाठी निघाला. अलर्काची ही वैराग्याची व आत्मज्ञानाची परिपक्वावस्था पाहून सुबाहूला अत्यंत संतोष वाटला. त्याने ते सर्व राज्य परत अलर्काच्या स्वाधीन केले. निरपेक्ष बुध्दीने अनासक्त राहून तूच हे सर्व राज्य नीट संभाळ असे सांगून व अलर्काला आशीर्वाद देऊन आपला हेतु सफल झाल्याचे समाधान मानीत काशीराजासह तो आपल्या मार्गाने परत गेला. अशी ही आदिगुरु दत्तात्रेय यांच्या बाराव्या अवताराची कथा आहे.

शिवरुप
शिवरुप

१३) शिवरुप

एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रगट झाले. हा दत्तात्रेयांचा 'शिवरुप' नावाचा तेरावा अवतार.

जन्म:- श्रावण शुद्ध ८

भगवान श्रीदत्तात्रेयप्रभु यांचा तेरावा अवतार शिवगुरु अथवा शिवदत्त या नावाने ओळखला जातो. 

पिंगळांग नावाचा एक वेद-शास्त्रांमध्ये पारंगत असलेला ब्राह्मण माहूर येथे राहत होता. एकदा त्याने पाहिले की एक तेजस्वी दिगंबर युवक कृष्णाम्लाच्या वृक्षाखाली पाहिला. त्याच्यासोबत एक दिगंबर तरूणीदेखील होती आणि तो वेदांचे उच्चारण करत होता. ते पाहून पिंगळांग अचंबित झाला. त्याने त्या युवकाला प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. "तू कोण आहेस? तू सुसंस्कृत दिसत नाहीस पण तुला वेद येत आहेत. तू ब्रम्हचाऱ्यांसारखा दंडधारी नाहीस किंवा तुझ्याकडे गृहस्थ माणसे ज्याचे आचरण करतात ते अग्निहोत्र देखील नाही. संन्यासधर्म धारण करण्याचे तुझे वयही दिसत नाही. मग नक्की तुझा आश्रम तरी कोणता?" यावर तो युवक म्हणाला," हे संपूर्ण जगच आत्मरूप आहे. माझा पंचाश्रम आहे, जो सर्वत्र आत्मस्वरूपच पाहतो." त्याचे हे उत्तर ऐकताच पिंगळांगाला कळून चुकले की हे तर साक्षात अनसूया नंदन श्री प्रभू दत्तात्रेय आहेत. त्याने विनम्रतेने श्रीगुरूंना वंदन केले आणि आत्मकल्याणासाठी उपदेश करण्याची विनंती केली. हा अवतार सोमवारी, श्रावण शुद्ध अष्टमीला झाला.

आत्मरूपनिदर्शकाय | पञ्चाश्रमविधायिने ||
दत्तात्रेय शिवरूपाय | शार्दुलाय नमो नम:||

आपल्या सहज बोधाने आत्मरूपाची अनुभूती घेण्याचा निर्देश करणाऱ्या, सामान्य माणसाच्या चार आश्रमव्यवस्थेंच्या पलिकडे असणाऱ्या (जेथे सामान्य मनुष्याचे नियम लागू पडत नाहीत कारण तेथे केवळ आत्मरूप दृष्टी असते), शिवरूप दत्तात्रेयांना माझ्या शार्दुलांना माझा नमस्कार असो.

देवदेवेश्वर
देवदेवेश्वर

१४) देवदेवेश्वर

दत्तात्रेयांचा 'देवदेवेश्वर' नावाचा चौदावा अवतार आहे.

जन्म:- भाद्रपद शुद्ध १४

भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला, शततारका नक्षत्रावर, शुक्रवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस श्रीगुरू, नर्मदा नदीच्या तीरावर माहूरच्या जंगलात अवतरीत झाले. ब्रम्हदेवादी सर्व देवता, गौतम ऋषींचे पुत्र शतानंद महर्षी इत्यादी सर्व श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी येथे आले. याकाळात श्रीगुरूंनी नर्मदा नदीमध्ये तसेच आसपासच्या अनेक तीर्थांमध्ये स्नान केले आणि इतर अनेक ऋषी-मुनींना दर्शनही दिले. कृष्णाम्लाच्या वृक्षांनी हा परिसर परिपूर्ण असल्याने या स्थानाला 'कृष्णाम्लाकी तीर्थ' असे नाव पडले.

कृष्णाम्लाकीनिवासाय | सर्वकल्याणकारका ||
देवदेवावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||

कृष्णाम्लाकी तीर्थाच्या परिसरात निवास करणाऱ्या, सर्वांचे कल्याण करणाऱ्या, देवदेवावतार धारण केलेल्या माझ्या श्रीगुरू दत्तात्रेयांना नमस्कार असो.

सदगुरु भगवान दत्तात्रेय यांचा चौदावा अवतार देवदेव अथवा देवदेवेश्वर या नावाने ओळखला जातो. मार्कडेय ऋषिंनी सांगितलेली कथा आहे. माहूर क्षेत्राच्या परिसरात विशेषत: शतानंदाला दर्शन देऊन अनुगृहित करण्यासाठी भगवान श्रीदत्तात्रेय हे देवदेवेश्वराच्या रुपाने प्रकट झाले. याच अनुषंगाने स्वर्गातील इंद्रादि देव आणि सत्य लोकातील ब्रम्हदेव यांनाही दर्शन देऊन अनुगृहित करण्याचे कार्य देवदेवेश्वर प्रभूंनी केल्याचे पहावयास सापडते. भगवान श्रीदत्तात्रेय नर्मदेच्या दक्षिण तीरावरील अरण्यातून दक्षिण दिशेने प्रवास करीत करीत अतिप्राचीन अशा व सर्व पर्वतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या सहयाद्री नावाच्या पर्वताजवळ आले. प्रवासामध्ये अनेक ऋषिमुनींचे आश्रम पाहात पहात त्यांनी तेथील ऋषिमुनींना आपल्या दर्शनाने पावन केले. अनेक नदया, तीर्थे व इतर जलाशय यांच्यामध्ये अवगाहन करुन त्यांना ते पवित्र करीत होते. ऋषिमुनींच्या आश्रमात जाऊन सर्वाच्यादक्षेमकल्याणाची विचारपूस करावी, कोठे स्नानसंध्यादी अनुष्ठान करुन क्षणभर विश्रांती घ्यावी तर कोठे भोजन करुनही भक्तजनांच्या मनाला संतोषीत करावे. अशा थाटात दत्तात्रेयमुनींची स्वारी तो सर्व रम्य प्रदेश अवलोकन करीत करीत सहयाचलाच्या रम्य परिसरात येऊन पोहोचली. सहय पर्वताचा तो परिसर त्यांना फारच रम्य वाटला. या भागातील पर्वतश्रेणीला काही ठिकाणी सिंहाद्री असेहि नाव दिलेले आढळते. दत्तात्रेयप्रभूंची ही तर जन्मभूमीच असल्यामुळे या परिसरात त्यांचे मन रमणे हे स्वाभाविकच आहे. तशी तर संपूर्ण सहयाद्रीची सर्व शिखरे त्यांना प्रिय वाटत होती पण त्यातल्या त्यात माहूरगडाच्या परिसरातील अनसूयेच्या शिखराजवळ असलेले एक शिखर दत्तात्रेयांना फारच आवडले. तेथेच ते बराच काळ आश्रम करुन राहिले. हे सर्व शिखर आज दत्तपादुकाशिखर अथवा दत्तशिखर या नावाने ओळखले जाते. 

दिगंबर
दिगंबर

१५) दिगंबर

दत्तात्रेयांचा हा पंधरावा अवतार 'दिगंबर' या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या २४ गुरुंपासून काय काय ज्ञान घेतले याचा त्याला बोध केला.

जन्म:- आश्विन शुद्ध १५

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, सूर्योदयाच्या वेळेस हा अवतार झाला. श्रीप्रभूंनी या अवतारात सोमवंशी राजा यदु आणि हिरण्यकश्यप आणि कयाधूचा पुत्र भक्त प्रल्हाद यांचे कल्याण केले.

कावेरी नदीच्या परिसरातील अरण्यात भटकत असताना यदु राजाला एक दिगंबर यती दिसला.  त्याने या यतींना वाकून नमस्कार केला आणि विचारले की, "आपण तरूण आहात, तेजस्वी आहात, निरोगी सुद्धा दिसत आहात मग आपण अशा घनदाट अरण्यात का राहत आहात? आणि येथे असूनही आपण आनंदी आणि निश्चिंत आहात! हे कसे काय हे कृपा करून मला सांगा!" 

दिगंबरयती म्हणाले, "उदात्त अशा या प्रकृतीपासून मी चोवीस गुरू केले आहेत आणि आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकलो आहे. त्याद्वारेच मला विवेक, वैराग्य, मनःशांती आणि समाधान प्राप्त झाले आहे." हे ऐकताच यदु राजा त्यांना शरण गेला. पुढे यदुराजाचे कल्याण झाले. त्याची वंशावळ वाढत गेली. श्रीविष्णूंचा पूर्णावतार - श्रीकृष्ण याच वंशात झाला. भक्त शिरोमणी प्रल्हादावरही श्रीगुरूंनी अशीच कृपा केली. हिरण्यकश्यपूच्या मृत्यूनंतर शुक्राचार्यांनी प्रल्हादाचा उपनयन विधी केला आणि त्याला राज्यकारभाराचे अधिकार मिळाले. एक आदर्श राजा म्हणून त्याने हजार वर्षांपर्यंत उत्तम प्रकारे राज्यकारभार पाहिला. परंतु ब्रम्हज्ञान झाले नसल्याने आत कुठेतरी प्रल्हाद अस्वस्थ होते. अखेरीस, ते कावेरी नदीच्या परिसरातील अरण्यात निघाले आणि तेथे त्यांना एक तेजस्वी दिगंबर यती जमिनीवर पहूडलेले दिसले. त्यांच्या सर्वांगाला धूळ लागली होती. 

प्रल्हादांनी त्यांना प्रणाम केला आणि विचारले, "आपण इतक्या घनदाट अरण्यात येथे कसे काय? आणि तेही शांत आणि समाधानी? कृपया मलाही सांगावे" श्रीगुरूंनी पुन्हा त्यांनाही आपल्या चोवीस गुरूंबद्दल आणि त्यांपासून घेतलेल्या बोधाबद्दल माहिती दिली. हे ऐकताच प्रल्हादांच्या मनाचे समाधान झाले आणि गुरूबोधाने त्यांना ब्रम्हज्ञानही प्राप्त झाले.

वैराग्याज्ञानयुक्ताय | आत्मविवेकप्रदायका ||
दिगंबरावधूताय | दत्तात्रेयाय नमो नम:||

ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण असलेल्या, हे संपूर्ण जग परमात्म्याचाच अंश आहे असा आत्मविवेक प्रदान करणार्‍या, दिगंबरावधूत अवतार धारण करणाऱ्या ज्ञानमूर्ती श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो 

कमललोचन
कमललोचन

१६) कमललोचन श्रीकृष्णश्यामनयन

'कमललोचन' नावाने सोळाव्या अवतारात दत्तात्रेय प्रकट झाले.

जन्म:- कार्तिक शुद्ध १५

भगवान सद्गुरु श्रीदत्तात्रेय यांचा सोळावा अवतार श्रीकृष्णश्यामनयन या नावाने ओळखला जातो. आदिगुरु श्रीदत्तात्रेय अवधूत यांनी योगिराज, अत्रिवरद इत्यादि अनेक अवतार घेवून या भूतलावर ज्ञान, भक्ती आणि वैराग्य त्याचप्रमाणे अष्टांगयोग या सर्व साधनांचा अधिकारपरत्वे भक्तजनांना उपदेश करुन कृतार्थ केले. त्याला उत्तम पदाला पोहचविले. आता भगवान श्रीदत्तात्रेय हे स्वत:ला कृतकृत्य समजून ज्ञानरुपी पर्यंकावर पहूडले आणि योगनिद्रेचा अवलंब करुन विश्रांती घेऊ लागले. इतक्यात अनेक भक्त व अनेक शिष्य दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी येऊ जमले. ते सर्व आदिगुरु कृपेने कृतार्थच झालेले होते. त्या सर्वांनी गुरुदेवांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला. ते सर्वांगसुंदर असलेल्या दत्तप्रभूकडे पाहत आहोत तोच पाहता पाहता श्रीकृष्णश्यामकमललोचन या स्वरुपात त्यांना दत्तगुरुंचे दर्शन झाले. भगवान श्री दत्तात्रेयांचा हा अवतार कार्तिक शुध्द व्दादशीच्या दिवशी बुधवारी रेवती नक्षत्रावर भगवान सुर्यनारायण उदयाला येत असतानांच झाला. सर्व विश्वाचे अधिष्ठान असलेला तो परमात्मा अवधूत श्रीकृष्णश्यामकमललोचन या रुपाने प्रकट होताच सर्वांनी जयजयकार करुन पुष्पवृष्टि केली. 

श्री दत्तात्रेयांनी योगीराज, अत्रिवरद इत्यादी अनेक अवतार धारण केले आणि ज्ञान, भक्ती, वैराग्य, अष्टांगयोग साधना इत्यादींनी आपल्या भक्तांना प्रबोधन केले. असेच एकदा भगवान श्री दत्तात्रेय ज्ञानशय्येवर स्थित होते (परात्परयोग्याची कुठलीही मुद्रा ही ज्ञानमयच असते) आणि योगनिद्रेत होते. त्यावेळी काही भाविक आणि शिष्य त्यांचे दर्शन घेण्यासाठी आले. त्यांना श्रीगुरू सच्चिदानंद स्वरूप दिसले. श्रीकृष्णासारखे ते रूप पाहून सर्व धन्य झाले.  श्री दत्तात्रेय त्यांना म्हणाले, "सर्व शास्त्रांचा अभ्यास केल्याने जे सार म्हणून प्राप्त होते, ते मूळ तत्व मी तुम्हाला सांगतो ज्याचा अभ्यास केल्याने तुम्हाला लवकरच शाश्वत ज्ञानाची प्राप्ती होईल. वैदिक धर्म हा चिरंतन आहे. वेदच त्याचे मूळस्वरूप आहेत. म्हणूनच धर्म हा मुख्य आणि कायम आहे. मी केवळ अत्रीऋषींसाठीच 'दत्त' आहे असे नाही तर, ज्यांनी अनन्यभावाने माझे चिंतन केले त्यांना मी स्वत:ला दिले. (ते मत्स्वरूपच झाले) अशा भाविकांना मी सायुज्यता प्रदान केली आणि ते माझ्यातच विलीन झाले."

ज्ञानशय्यास्थिताभगवन् |
नित्यसायुज्यदायका ||
श्रीकृष्णश्यामकमलनयना |
दत्तात्रेयाय नमो नम:||

ज्ञानशय्येमध्ये स्थित असलेल्या (नित्य पराज्ञानस्वरूप असणाऱ्या), (सर्वसमर्पणभावाने आपली भक्ती करणाऱ्यांना) नित्य सायुज्य प्रदान करणार्‍या, श्रीकृष्णश्यामकमलन अवतार धारण करणाऱ्या परब्रह्म स्वरूप श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.

श्रीगुरूंचे हे सोळावे अवतार!

पूर्णराते दत्तात्रय

श्री दत्तात्रेयांना एक विशेषण वापरतात ते आहे 'पूर्णराते'. या एकाच शब्दात श्री स्वामी महाराजांनी शेकडो व्याख्या सांगितल्या आहेत. पूर्णरात शून्याला म्हणतात किंवा अमावसेलाही म्हणतात. अमावस्येला आकाशात प्रकाश देणार अस काही नसत।केवल शून्य असत. शून्य असत याचा अर्थ तिथे काहीच नसत अस नाही; परन्तु जे काही असत त्याच्या अस्तित्वाला काहीतरी आहे अस म्हणता येत नाही. त्याच प्रमाणे हा पूर्णराते सुद्धा स्वतः 'शून्य' आहे. ईशावास्य उपनिषदातील 

'पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण मुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते |' 
याचा अर्थ असा आहे की पूर्णातुन पूर्ण काढल तरी तिथे पूर्णच शिल्लक उरत.

काहीच नसलेल्या या 'शून्य' शब्दाची कीमत महाप्रचण्ड आहे. या शुन्याने कशालाही गुणल किंवा भागल असता उत्तर शून्यच येत किंवा जे येत ते सांगता येत नाही.  हेच तत्व उपनिषदांनी 'पूर्णमदः' वाक्याद्वारे सांगितल आहे. हेच शून्य इतर कोणत्याही संख्येपुढे ठेवले, तर त्याची किंमत दहापट वाढते. याचाच गुढ़ार्थ असा की, तुम्ही किती होता, त्यावर अत्रिनन्दनाच्या अनुग्रहाचा परिणाम ठरतो. म्हणजेच सदगुरूतत्वाने अनुग्रह केल्यानंतर, भक्ताची किंमत किती वाढेल हे त्या भक्तावरच अवलंबून आहे. कमतरतेचा दोष हा सदगुरूतत्वाचा नसतो. भक्त जर १०० बनला नाही,तर सदगुरू त्याला १००० बनवु शकणार नाही आणि तो जर एकच राहिला तर फक्त १०च बनु शकेल.
याच्याही पलीकडे गणितातील एक सिद्धान्त आहे, तो म्हणजे शून्यामध्ये असंख्य राहतात. याप्रमाणे शून्य स्वतः काही नसतानासुद्धा अनन्त शक्तीच् सामर्थ्य ठेवतो. जसा हा गणितातला पूर्ण तसाच आत्रेय हा अध्यात्मातला पूर्ण. 'पूर्णराते' इतका समर्पक शब्द सदगुरूतत्वासाठी दूसरा नाहीच. देणारा हा पूर्ण असल्याने अगणित पटीत देतो आहे, घ्यायच किती हे घेणार्याच्या कुवती वरच अवलंबून आहे. या पूर्ण नावाच्या शून्याचा उपयोग कसा करायचा, हे ज्याने त्याने ठरवायचे. या शून्याचा उपयोग करण्याच् कौशल्य म्हणजे पूर्ण विश्वासासह पूर्ण शरणागती. आपण घोरकष्टोद्धरण स्तोत्रामध्ये "पूर्णराते" हा शब्द म्हणतो.

श्री दत्तावतार हजारो वर्षापासून पूज्य आहे
श्री दत्तावतार हजारो वर्षापासून पूज्य आहे

'दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा' या श्री दत्तात्रेयांच्या महामंत्राचा गर्भितार्थ 

या मंत्रा मध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी- त्याचे अनुसंधान. मी  देह नाही. मी आहे आत्मा.तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम्. तो साक्षी आहे. निर्विकार आहे. अनंदरूप आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहम् ला हाक मारली आहे.

दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रम्हाचे अनुसंधान केले आहे. आपल्या भोवती जे सर्वही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे. वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रम्हच आहे. परब्रम्हानेच ही अनेक भासणारी रुपे धारण केली आहेत. त्या परब्रम्हाला दुसऱ्या दिगंबरा शब्दाने हाक मारली आहे.

श्रीपादवल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपादवल्लभांना हाक मारली आहे. श्रीपादवल्लभ भगवंताचे सगुण  साकार रूप आहेत. ते भगवंताचेच अवतार आहेत. त्यांना संबोधन केले आहे.

चौथ्या दिगंबरा या शब्दाने प्रार्थना केली आहे.माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा. मला लवकर आपल्या जवळ न्या. आपले स्वरुप मला प्राप्त होऊ दया. मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे.तो भ्रम नाहीसा करा. अहं ब्रम्हास्मि हा अनुभव मला येऊ दया. आपल्या सारखी दिगंबर स्थिति मलाही दया. अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दात आहे.

।। दिगंबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा ।।  

श्री दत्तात्रेयांचे चोवीस गुरू - यदुअवधूत संवाद

भगवान श्रीकृष्ण ह्यांनी आपले अवतारकार्य संपविण्याचा मानस उद्धवाला सांगितला व त्यावर उद्धवाने मला ज्ञान सांगावे अशी विनंती केली. तेव्हा माझा पूर्वज यदू याला अवधूतरूपात श्रीदत्तात्रेयाने मी २४ गुरूंपासून घेतले ते ज्ञान तुला सांगतो असे म्हणत हे ज्ञान सांगितले. त्या त्या गुरूचे गुण व त्यापासून घेतलेला बोध हे सर्व उद्धवाला सांगितले.

सदर उपदेशाचा श्रीमद्भागवत पुराणात अकराव्या स्कंधात अध्याय सात ते नऊमध्ये उल्लेख आलेला आहे. प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रचित दत्तमहात्म्यातही याचा उल्लेख आढळतो. ‘जो जो म्या जयाचा घेतला गुण तो तो म्या तया गुरू केला जाण’ याप्रमाणे व्यक्ती, वस्तु, पंचमहाभुते, प्राणी, पक्षी यासर्वांकडून श्रीदत्तगुरूंनी गुण ग्रहण करून त्यांना गुरू केले. सर्वच गोष्टी भक्तांना अभ्यास करण्याजोग्या आहेत.

१) पृथ्वी

पृथ्वीपासून सहनशीलता हा गुण घेण्यासारखा आहे. कारण पृथ्वी सर्व प्राणिमात्रांचे आश्रय स्थान असून कितीही आघात झाले तरी मातेप्रमाणे त्या सर्वांचा सांभाळ करते. खोदणे, नांगरणे, कचरा, घाण यांसारखे आघात साहून सर्व प्राणिमात्र व वृक्षसंपत्ती यांचे पोषण करते.
पृथ्वीचेच अंग वृक्ष हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत. मुळापासून शेंड्यापर्यंत फळे, फुले देऊन सर्वांना सुखी करतात. ते वाळून गेल्यावरही त्याचा उपयोग होतो. परोपकाराय तिष्ठंति वृक्षा: । परोपकाराय इदं शरीरम् । त्याप्रमाणे मनुष्याने आपल्या देहाचा परोपकारासाठी उपयोग करावा.
पृथ्वीचा अंग असलेले पर्वत हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्यामध्ये असलेल्या सर्व खनिज संपत्तीचा उपयोग परोपकारार्थच करतात. त्याचप्रमाणे साधु-संन्यासी यांना आश्रय देतात. याप्रमाणे मनुष्यानेही संग्रही असलेल्या विद्यांचा परोपकारासाठी उपयोग करावा.

२) वायू

वायू दोन प्रकारचे. शरीरातील प्राणवायूमुळे मनुष्याचे जीवन चालते. म्हणून आहार प्राणवायू चालण्यापुरताच घ्यावा. दुसरा वायू बाहेरचा. हा कुठेही आसक्त होत नाही. सुगंध दुर्गंध (पृथ्वीचा गुण) दूर करून पवित्र होऊन राहतो, म्हणून संतोष, पवित्रता व अनासक्ती हे गुण वायूपासून घ्यावे.

३) आकाश

आकाश सर्वत्र आहे. याची मर्यादा आजपर्यंत कळली नाही. ही चराचर सृष्टी आकाशात राहते. त्याचप्रमाणे आत्माही सर्वव्यापक आहे. शरीरे भिन्न असली तरी देहामध्ये वास करणारा किंवा बाहेर असलेला आत्मा एकच अखंड स्वरूपाचा आहे. या सृष्टीत कितीही बदल झाले तरी आकाश निर्विकार राहते.

४) जल (उदक)

जलावरच सर्व जीवन अवलंबून आहे. जल स्वभावत: स्वच्छ, पवित्र, मधुर व समसमान असते. त्याचप्रमाणे सर्वांशी आपले संबंध मधुरपणे ठेवावे, कुणाच्याही दोषाकडे लक्ष ठेवू नये. जलाप्रमणे शिक्षण घेऊन वर्तन करणाऱ्या मनुष्याच्या दर्शनाने सर्वांना पवित्रता येते.

५) अग्नी

अग्नीला आकार नाही. जळणाऱ्या वस्तूचा आकार त्याला येतो. पूर्णपणे वस्तू जळल्यावर तो गुप्त होतो. कोणत्याही वस्तूचा संग्रह तो करीत नाही. तेजस्वीपणा त्याचा प्रख्यात आहे. अग्नीच्या ज्वाला क्षणभंगूर आहेत. तसेच मनुष्याचे जीवनही क्षणभंगूर आहे. आपण असेपर्यंत ह्या देहाचा सदुपयोग करून घ्यावा, अर्थात मोक्षप्राप्ती करता.

६) चंद्र

चंद्रावरील कला वाढत असतात. पौर्णिमेला पूर्णचंद्र दिसतो. पुढे कला कमी कमी होऊन अमावस्येला पूर्णपणे दिसेनासा होतो. हे सर्व सूर्याच्या प्रकाशातील भागामुळे होते. चंद्र जसाचा तसाच असतो. त्याप्रमाणे शरीरावर बालपणापासून मृत्यूपर्यंत भिन्न भिन्न अवस्था येतात. पण ही फक्त शरीरावस्था असते. आत्मा हा जसाचा तसाच असतो.

७) सूर्य

सूर्य समुद्रातील पाण्याची वाफ करून यथायोग्य काळी वर्षा करून सर्व वृक्ष, प्राणी व मनुष्य यांना सुखी करतो. त्याचप्रमाणे मनुष्याने परोपकार बुद्धीने कर्म करावे. पण त्यात आसक्त होऊ नये.

८) कपोत पक्षी (कबुतर)

कपोत पक्षी व कपोतीण एका घरट्यात प्रेमाने व आनंदात राहत होते. पुढे त्यांना पिल्ले होऊन त्यांना पंख फुटल्यावर ती बाहेर जाऊ लागली पण ती एकदा पारध्याच्या जाळ्यात अडकली. त्यांना सोडवायला गेलेली कपोती तीही अडकली. पुढे कपोतही अडकला. याप्रमाणे सर्वच जाळ्यात सापडले. तसेच मनुष्याने केवळ आपल्या कुटुंबातच मग्न होऊ नये. हे शरीर मोक्षद्वार असल्यामुळे योग्यवेळी संसाराचा मोहत्याग करावा.

९) अजगर

आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानुसार घडत असतात. निर्वाहाकरिता कधी मिळेल, कधी मिळणार नाही अशा अवस्थेत अजगराप्रमाणे निश्चिंतपणे आपला जीवनयोग करीत राहावे.

१०) समुद्र

समुद्रात सर्व नद्या पाणी घेऊन येतात. अथांग आहे तरी आपली मर्यादा सोडीत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने खूप प्राप्ती झाली तरी खूप प्रफुल्लीत होऊ नये. आपल्या ध्येयाकडे सतत लक्ष ठेवावे.

११) पतंग

दिव्याच्या ज्योतीच्या रूपावर भाळून पतंग स्वत:ला जाळून घेतो. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या रूपावर भाळून आपला नाश करू नये. संयम राखावा.

१२) भृंग

निरनिराळ्या फुलांवरून भृंग मकरंद सेवन करतो. त्याप्रमाणे लहान - मोठ्या सगळ्या ग्रंथांचे सार लक्षात ठेवावे, व त्याप्रमाणे आचरण असावे.

१३) मातंग

मातंग म्हणजे हत्ती. हा बलवान, बुद्धिवान व आकारानेही मोठा आहे. पण त्याला पकडण्याकरता मोठ्या खड्ड्यात नकली हत्तीण करून त्याला आकर्षित करतात व तो खड्ड्यात पडतो. मग त्याला पकडतात. यापासून स्त्रियांच्या मोहात पडू नये हे शिक्षण मिळते.

१४) मधुमाशी

मधुमाश्या फुलांवर जाऊन मध गोळा करतात व ते पोळ्यात जमा करतात. परंतु त्या पोळ्याला आग लावून मनुष्य ते पोळे मधासाठी हस्तगत करतो. म्हणून धनाचा संग्रह करणाऱ्या लोकांची अशीच गत होते. दरोडे - डाके पडून प्राणहानीही होते. म्हणून धनाचा संग्रह वर्ज्य करावा.

१५) मृग

हरिण हे चपळपणासाठी प्रसिद्ध आहे. परंतु त्याला पकडण्यासाठी पारधी लोक बासरीसारखे वाद्य वाजवून त्याला स्थिर करतात व नंतर त्यावर जाळे टाकून त्याला पकडतात. म्हणून ग्रामगीते म्हणजे श्रृंगारिक लावण्या वगैरे श्रवण करू नये. भगवंताच्या गुणगानाचेच श्रवण करावे. 

१६) मत्स्य

मत्स्य पकडण्यासाठी पद्धती म्हणजे एका दोरीला गळ लावतात. त्याला खाद्य म्हणून मासांचा तुकडा लावतात. दोरी काठीला बांधून ती पाण्यात सोडतात. माशाने ते तोंडाने धरताच त्याच्या टाळूला गळ अडकून पडतो व तो प्राणास मुकतो. म्हणून भोज्य पदार्थांच्या आवडीवर रसना (जीभ) ताब्यात ठेवावी.

१७) पिंगला

विदेह नगरामध्ये एक पिंगला नावाची सुंदर देखणी वेश्या राहत होती. धनाच्या लोभामुळे तिच्याकडील पुरुषांचे येणे पुढे बंद झाले. एके दिवशी घरात- बाहेर येणे- जाणे सुरू होते. तरी कुणीही पुरूष तिच्याकडे आला नाही. तेव्हा तिला एकदम आपल्या व्यवसायावर उपरती / वैराग्य प्राप्त झाले व पुढे ती आत्मानंदात राहू लागली. निव्वळ आशेवर जगू नये. त्यामुळे दु:ख प्राप्त होते. परंतु वैराग्य आल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही.

१८) कुरर पक्षी

याला टिटवी म्हणतात. हे मांसपक्षी पक्षी आहेत. असाच एकदा मासाचा गोळा प्राप्त झाल्यावर तो सर्व पक्ष्यांनी सारखा वाटून घेतला. काही पक्ष्यांनी लवकर खाऊन संपविला पण एक पक्षी हळूहळू खात होता. त्याच्याजवळ बरेच मांस उरले म्हणून बाकीचे पक्षी त्या पक्ष्यावर मांस खाण्यासाठी तुटून पडले. जेव्हा त्या पक्ष्याने मांसाचा तुकडा फेकून दिला त्यानंतर त्याला कोणीही त्रास दिला नाही. तात्पर्य असे की परिग्रह (संग्रह) हा दु:खाला कारणीभूत होतो म्हणून धनादिकाचा संग्रह करू नये.

१९) बालक

लहान बालक कोणतीही चिंता न करता आपल्या आनंदात मग्न असते. मान-अपमान, पाप-पुण्य इ. चिंता त्याला असतात. ते आपल्या आनंदात क्रीडा करीत राहते. ती त्याची अंतर्वृत्ती आहे. याप्रमाणे मनुष्याला अंतर्वृत्तीने सुख मिळते हे शिक्षण बालकाला गुरू करून मला मिळाले.

२०) कुमारी कंकण

एका उपवर मुलीला पाहण्याकरता काही पाहुणे तिच्या घरी आले. त्यावेळी घरचे सर्व लोक बाहेर गेले होते व तिला गायीसाठी म्हणून घरीच ठेवले होते. ऐनवेळी त्यांच्या जेवणाची सोय करावी म्हणून तिने साळी कुटण्यास घेतली. परंतु तिच्या कंकणांचा आवाज होऊ लागला. त्या आवाजाचे मात्या-पित्यांना दूषण येईल म्हणून एक-एक कंकण काढत गेली. जेव्हा एकच कंकण राहिले तेव्हा आवाज बंद झाला म्हणून कोणत्याही साधनेसाठी एकांतच असावा हे शिक्षण मला मिळाले.

२१) सर्प

सर्प हा समूहाने राहत नाही. ते एकटेच फिरतात. त्यांना दुखावल्याशिवाय कोणाला डंख करीत नाही. त्याप्रमाणे संन्याशाने सतत फिरत राहावे. पण मठ, आश्रम बांधू नये.

२२) शरकार

शरकार म्हणजे बाण बनविणारा लोहार. हा बाण बनविण्याच्या वेळी कोणत्याही दुसऱ्या आवाजाकडे लक्ष देत नाही. जवळून राजाची मिरवणूक गेली तरी त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या कामात एकाग्रता ठेवावी. जप, तप, योग साधन इ. करणाऱ्यांना अशी एकाग्रता आवश्यक आहे. हे शिक्षण मला शरकाराकडून मिळाले.

२३) कुंभारीण माशी

ही माशी पावसाळ्यात एका अळीला आपल्या घरट्यात आणून ठेवते. त्या अळीला प्रत्येक वेळी जाता - येता तिच्याजवळ असलेल्या काट्याचा डंख करणाऱ्या माशीतच असते. पुढे समयानुसार त्या अळीला डंख करीत असलेल्या जागी नवा काटा निघतो व ती अळी कुंभारीण माशी बनते. तात्पर्य ज्याचे आपण नित्य ध्यान करू त्यातच आपले रूपांतर होईल (हा किटकन्याय म्हणून ब्रह्मचिंतनात प्रसिद्ध आहे)

२४) कोळी

हा आपल्या नाभीतून सूत्र काढून त्याचे जाळे बनवितो. त्यात तो यथेच्छ क्रीडा करून ते जाळे स्वत:मध्ये सामावून घेतो. त्याप्रमाणेच ईश्वरही हे जग निर्माण करतो व यथाकाळ राहून आपल्यामधे सामावून घेतो. त्याला बाहेरची आणखी सामग्री लागत नाही. नरदेह प्राप्त झाल्यावर या जन्मात जे लोक मोक्ष साधन करून घेत नाही त्यांचा पुनर्जन्म होत राहतो.

अशाप्रकारे यदूला श्रीदत्तात्रेयांनी ज्ञान सांगून कृतार्थ केले, तेच ज्ञान मी तुला सांगितले, असे श्रीभगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात.

दत्ताउपासना व पादुका
दत्ताउपासना व पादुका

दत्ताउपासना व पादुका

पादुकांना नमस्कार कसा करावा?

पादुका हे शिव आणि शक्ति यांचे प्रतीक असणे अन् नमस्कार करतांना त्रास होऊ नये; म्हणून पादुकांच्या खूंटयांवर डोके नठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करणे.

'डावी पादुका ही शिवस्वरुप आणि उजवी पादुका ही शक्तिस्वरुप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ति आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ति होय. पादुकांच्या अंगठयातून पादुकांच्या खूंट्या आवश्यकते प्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ति बाहेर पडत असते. ज्या वेळी आपण पादुकांच्या अंगठयावर डोके टेकवून नमस्कार करतो,त्या वेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ति न पेलवल्याने त्रास होऊ शकतो यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठयावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर (जेथे संतांच्या पायांची बोटे येतात), तेथे टेकवावे.

श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्व आहे. 

श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त सांप्रदायात गुरूपेक्षा गुरु चरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त पंथीयात श्रीगुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्व आहे. श्री गुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर भाव दर्शविला होता.

अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्ती विषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की, श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवशक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण-स्पर्शाने कंपनाद्वारा तीशक्ती भक्तांत संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानांत दत्त मूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे.

गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे. नृसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजाकेली जाते. देवगिरीवर जनार्दनस्वामींच्या समाधी स्थानी पादुकाच आहेत. विष्णूचाजसा शाळीग्राम तसे दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्वाचे स्थान आहे. या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच

'मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥'

असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते.

सत्यसंध दत्तमहाराज 

दत्त महाराजांना सत्यसंध असं म्हटलेलं आहे, संध किंवा संधा म्हणजे काय तर प्रतिज्ञा! दत्त महाराजांची प्रतिज्ञा काय आहे तर माझा जो भक्त आहे त्याचा मी उद्धार करणारच. आता उद्धार कसा तर या मायामय संसाराचा फोलपणा क्षणोक्षणी पटवून देऊन. भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी अशी त्यांची बिरुदावली आहे. आता भक्तवत्सल असल्याने अगदी ममतेने भक्ताला काय हवे काय नको ते पाहतात. जे जे मनी इच्छावे ते ते भगवद कृपे पावावे असे वचन आहे. पण सर्व काही दिल्यावर जर या मायामय संसारात भक्त गुंतला तर उध्दार कसा होईल तेव्हा पाहिजे ते किंवा मागितलेले दिल्यानंतर त्या मागणीचा व्यर्थपणा दत्त महाराज अगदी सहज पटवून देतात, कार्तवीर्य सहस्त्रार्जुन हे याचे एक उदाहरण. परचित्त ज्ञान, मनोवेगें गमन, स्मरण करताच नष्ट वस्तूचा आगम वगैरे सर्व सिद्धी हात जोडून उभ्या होत्या पण एके दिवशी विचार करता हे सर्व दत्त महाराजांकडे मागून आपण फार मोठी चूक केली हे त्याला कळून चुकले आणि तो दत्त महाराजांना शरण गेला. दत्त महाराज म्हणाले, अजून काही इच्छा आहे का? काही आणखी सिद्धी वगैरे हवी असल्यास ...... राजा अगदी गहिवरला, साश्रू लोचनाने म्हणाला काही नको. मोक्षोपाय दाखवा. हा जन्महि नको आणि मृत्यूही नको, पुरे झालं सगळं.

श्री दत्ताची आरती एक चैतन्य आविष्कार

दत्ताची आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन'च्या भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल.
दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ० ।।
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।
पराही परतली तेथे कैंचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। २ ।।
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। ३ ।।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।। ४ ।।

- संत एकनाथ

आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ

आता आपण या आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ समजून घेऊया. अर्थ समजल्याने देवतेचे श्रेष्ठत्व समजण्यास आणि तिची भक्ती वाढण्यास साहाय्य होते.

१. ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।’ याचा अर्थ दत्त हा (कार्यानुरूप) त्रिगुणात्मक आहे, त्रैमूर्ती आहे. श्री दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या अंशापासून झालेला आहे. हे तीन देव उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित असल्यामुळे हे देव वस्तुतः त्रिगुणातीत असूनही कार्यानुसार गुणाश्रयी आहेत, म्हणजे अनुक्रमे रज, सत्त्व आणि तम या त्रिगुणांना ते आश्रय देतात.

२. ‘नेति नेति शब्द न ये अनुमाना ।’ याचा भावार्थ वेदांनी श्री दत्ताचे स्वरूप वर्णन करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना काहीच अनुमान न करता आल्याने ‘नेति, नेति’ म्हणजे ‘असे नाही, असे (ही) नाही’, एवढेच ते सांगू शकले.

३. ‘सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त।’ म्हणजे आत-बाहेर पूर्णपणे तू एक दत्त केवळ गुरुतत्त्वरूप, ईश्वरतत्त्व असलेला आहेस.

४. ‘अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।’ म्हणजे आम्हा अभागी, दुर्दैवी लोकांना तुझे माहात्म्य कसे कळणार?

५. ‘पराही परतली तेथे कैंचा हेत ।’ म्हणजे श्री दत्ताचे वर्णन करायला गेलेली परावाणीही परत फिरली त्यात कोणता हेतू असावा बरे? दत्ताचे स्वरूप तुर्यावस्थेच्या पलीकडे असल्याने परावाणीही तिथे पोहोचू शकत नाही. यामुळे ती काही न बोलताच परत फिरली.

६. ‘जन्ममरणाचा पुरलासे अंत ।’ याचा भावार्थ आहे, श्री दत्ताचे स्वरूप नित्य आणि अनादी-अनंत असे आहे. तिथे जन्ममरण हे शब्दच संपतात.

७. ‘जन्ममरणाचा फेरा चुकविला ।’ याचा भावार्थ जन्ममरणाच्या फेर्‍यातून माझी सुटका केली. मला मोक्ष (टीप) दिला, असा आहे.

८. ‘मीतूपणाची झाली बोळवण ।’ याचा भावार्थ आहे, अद्वैतावस्था प्राप्त झाल्याने मी-तू हा आपपरभाव संपला आहे.

‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो आणि भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्री दत्ताच्या चरणी प्रार्थना आहे.

dattayaag
दत्तयाग

दत्त यागाचे फल

आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मात गुरु परंपरेला फार महत्व आहे. दत्तमहाराजांपासुन हि परंपरा आरंभ झाली असे मानले जाते. याग या शब्दाची व्याख्या पाहु मग आपण दत्तयागचे फला विषयी जाणुन घेउ.

देवतांच्या उद्देशाने केलेला हविर्द्रव्यांचा त्याग याला याग म्हटले जाते. दत्तमहाराजांचा अवतार का झाला? हे कऴले कि मग बरेच सुलभ होईल. राम कृष्ण नरसिंह वगैरे अवतार हे दुष्टांचे राक्षसांचे निर्दालन करण्याकरता झाले मग दत्तांनी अवतार घेउन कोणत्या राक्षसाचा वध केला? दत्तचरीत्रात याचे उत्तर नाहि असेच मिऴेल. मग अवताराचे कारण काय? तर स्वत:च्या शरीरातील काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ दर्प अभिमान हे सर्व रिपु नष्ट करावेत या करता हा अवतार झाला. बाकीच्या अवतारात देवतांनी राक्षस दुराचारी मारुन सज्जन भितीमुक्त केले. पण या दत्त अवतारात लोकांमधील दुर्गुण नष्ट व्हावे हा हेतु होता.

आधिदैविक आधिभौतिक आध्यात्मिक तापत्रय निवारण होण्याकरता कामक्रोधादि रिपुंचा नाश होउन. असाध्य ते साध्य, वाग्मित्व, सर्वप्राणीमात्र वश व्हावेत, संपत्ती, भूमंडलाचे अधिपत्य सर्व भय चिंता परीहार व्हाव्यात या करता व दत्तप्रभुंच्या कृपेने आध्यात्मिक गती प्राप्त होउन पुढे सद्गुरुंची कृपा व्हावी व त्यायोगे मोक्षमार्ग वाटचाल सुलभ व्हावी या हेतुने जे स्मर्तृगामी आहेत केवऴ स्मरणमात्राने संतोषले जातात, महाभयांचा परीहार करतात, ज्ञान देतात, नेहमी चिदानंदात मग्न असतात, बालोन्मत्तपिशाच्च कोणत्याहि अवस्थेत असतात व माता अनुसयेस आनंद देतात त्या दत्तमहाराजांची कृपा व्हावी या करता दत्त याग करतात.

उपासना- अनंत जन्माची पुण्याई

दत्तात्रेय हे उपास्य दैवत असणे हि भाग्याची गोष्ट आहे, मात्र त्यांच्या पूजनात पावित्र्याचे पालन हि गोष्ट अत्यावश्यक ठरते. त्या पालनात काही त्रुटी राहिल्यास दंड ठरलेलाच. त्यात काही सूट नाही, पण ह्या पावित्र्याच्या कक्षा रुंदावत जर तुम्ही ह्या उपासनेत यशस्वी झालात तर मात्र तुमच्या एव्हडा भाग्यवान कोणी नाही, उपास्य दैवत असणं म्हणजे तुम्हाला दत्त महाराज प्रिय असणं आणि ह्या उपासनेत यशस्वी होणं म्हणजे दत्त महाराजांना तुम्ही प्रिय होणं हा फरक आहे. दत्त महाराजांची काय प्रतिज्ञा आहे? माझा जो भक्त आहे त्याचा उद्धार मी करणारच, सत्यसंध म्हटलं आहे त्यांना. नाना रुपधर असे ते आहेत, कधी कोणत्या रूपात तुम्हाला सामोरे येतील ते कळणार हि नाही, पण भेट देऊन जातील हे निश्चित. भक्तांसाठी अत्यंत कनवाळू आणि अभक्तांसाठी कठोर असे ते आहेत. इतक सगळं असताना दत्त भक्तांची संख्या फार मर्यादित दिसते याचे काय कारण असावे? तर दत्त भक्तीचे दुर्लभत्व, म्हणून आपण सगळे पाहत असतो कि बऱ्याच मंडळींना सांगून सुद्धा दत्त दत्त म्हणावेसे वाटत नाही. हे योग प्रारब्धात असावे लागतात. अनंत जन्मांची पुण्याई असली तरच दत्त भक्ती वाट्याला येते अन्यथा नाही.

॥सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त॥

श्रीदत्तावतार अन्य अवतारांप्रमाणे दुष्टांचा नाश करून विसर्जीत होणारा नाही. लोकोद्धाराकरिता चिरंजीव राहिलेला हा अवतार आहे. याशिवाय एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, या देवतेमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवता व त्यांच्या परंपरेचे ऐक्य आहे. सृष्टीची उभारणी, जोपासना आणि संहार यासाठी कार्यरत असलेल्या या तीन देवांचे एकरूपत्व म्हणजेच श्रीदत्तात्रेयाचा अवतार असे मानले जाते. 

‘तीन शिरें सहा हात’ अशा स्वरूपातील श्रीदत्तात्रेयांची ओळख आपल्याला अनेक सुबक रंगीत चित्रांमधून तसंच दत्तमंदिरांतील त्यांच्या साजिऱ्यागोजिऱ्या मूर्तीमधून आजवर घडत आली आहे. त्रिमुखी अथवा एकमुखी दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच दत्तपादुकांची पूजाअर्चाही अनेक ठिकाणी होत असते. प्रामुख्याने, महाराष्ट्रातील अनेक गावांमधून तसंच अगदी शहरातून देखील दर गुरुवारी श्रीदत्तात्रेयांची उपासना, भजन-पूजन व कीर्तनादी कार्यक्रमांची रेलचेल उडालेली दिसते. मार्गशीर्ष मास तसंच दत्तजयंतीच्या निमित्ताने श्रीगुरुचरित्र, श्रीगुरुलीलामृत, श्रीदत्तप्रबोध, श्रीदत्तमाहात्म्य अशा सांप्रदायिक ग्रंथांची पारायणे तसेच प्रसादाच्या सुंठवडय़ामधूनही श्रीदत्तमहाराज आपली ओळख टिकवून आहेत. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर, माहूर, कारंजा इत्यादी श्रीदत्तक्षेत्रांतून आजही दत्तभक्तांची गर्दी उसळलेली आपण पाहतो. ‘गुरुमहाराज गुरू। जयजय परब्रह्म सद्गुरू’, ‘दिगंबरा दिगंबरा। श्रीपादवल्लभ दिगंबरा’, ‘दत्तात्रेय गुरू माझे आई। मजला ठाव द्यावा पायी’, ‘श्रीगुरुदेवदत्त’ असा नामगजर आणि जयघोष या दत्तस्थानांतून होत असल्याचेही आपण पाहतो.

लोकोद्धाराकरिता चिरंजीव राहिलेला हा अवतार आहे. तो अयोनिसंभव आहे असेही सांगितले जाते. दत्तावताराचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, या देवतेमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवता व त्यांच्या परंपरेचे ऐक्य आहे. सृष्टीची उभारणी, जोपासना आणि संहार यासाठी कार्यरत असलेल्या या तीन देवांचे एकरूपत्व म्हणजेच श्रीदत्तात्रेयाचा अवतार असे मानले जाते. दशावतारातील प्रसिद्ध असे श्रीरामकृष्णादी अवतार क्षत्रियकुलात तर दत्तात्रेयावतार ब्रह्मकुलात जन्म घेता झाला. अवधूतावस्थेत सर्वत्र संचार करून वैराग्याचा पुरस्कार करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांनी भक्तांना त्यांच्या श्रद्धेनुसार विविध वेषांत आणि रूपांत दर्शन दिल्याचे सांगितले जाते. दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पद्धतीची पुनस्र्थापना करणारा व मुख्यत: ब्राह्मणधर्माचा पुरस्कार करणारा असला, तरी इतर जातीजमातींना दत्तोपासनेसाठी प्रतिबंध नाही. श्रीदत्तात्रेय तसेच दत्तसंप्रदायाचा नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी, सकलमत व देवी आदी उपासनापंथांशीही संपर्क असल्याचे दिसून येते. दत्तप्रभूंच्या उपासनेत योगमार्गाला महत्त्वाचे स्थान असून शाक्त व तांत्रिक यांनीही दत्तात्रेयांना आपले दैवत मानले आहे. दत्त हे दैवत अविनाशी आहे, भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी संचारी आहे. सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा म्हणजे विष्णूचा हा ‘दत्तात्रेय’ नामे प्रसिद्ध अवतार आहे. हा अवतार क्षमेने युक्त असून त्याने वेदांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, यज्ञसंस्थेचे पुनरुज्जीवन केले, चातुर्वण्र्यातील शिथिलता दूर केली, आणि अधर्म व असत्याचा नाश करून क्षीण होऊ घातलेल्या जनमानसात सामथ्र्य निर्माण केल्याचे मानले जाते.

दत्त महाराजांचे राजयोगी रूप
१९७० साली वर्तमानपत्रात आलेले हे दत्त महाराजांचे राजयोगी रूप. हा संग्रह पाहात असता दत्त महाराजांची रूपे पाहून भान हरपून जाते.

श्रीदत्तदैवताची प्राचीनता

शिवपुराण, शतरुद्रसंहिता, विष्णुधर्मोत्तर पुराण, विष्णुपुराण, वायुपुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांडपुराण, कूर्मपुराण, मरकडेयपुराण या व अशा विविध पुराणांतून दत्तात्रेयांचे उल्लेख आलेले आहेत. शांडिल्योपनिषद्, भिक्षुकोपनिषद्, अवधूतोपनिषद्, जाबालदर्शनोपनिषद्, दत्तात्रेयोपनिषद् आदी उपनिषदांतून दत्तात्रेयांच्या कार्यमहतीचे गुणगान गायले गेले आहे. दत्तसंप्रदाय इ. स. १००० पासून कार्यरत असल्याचे दिसत असले, तरी महाभारतात मात्र दत्तात्रेयांचा उल्लेख असल्याचेही दिसून येते. भगवान विष्णूने अत्रीपत्नी अनुसयेच्या पोटी अवतार घेतल्याचा उल्लेख महाभारतात आलेला आहे. दत्तात्रेयांनी सहस्रार्जुनास उपदेश केल्याचा उल्लेखही वनपर्वात (११५-१२), शांतीपर्वात (४९.३६-३७), अनुशासन पर्वात (१५२.५ व १५३.१२) आल्याचे दिसून येतो.

श्रीदत्तात्रेयांची आयुधे व परिवार

श्रीदत्तांच्या नित्य सहवासात असलेली धेनू अर्थात गाय हे पृथ्वीचे प्रतीक, तर चार श्वान म्हणजेच कुत्री ही चार वेदांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. दत्तावतार हाच मुळी एक रूपकाचा आविष्कार असल्याची कल्पना आहे. श्रीगुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे दत्तात्रेयांच्या हातात असलेल्या रुद्राक्षमाळेतील मण्यांची संख्या बावन्न आहे. बावन्न मणी म्हणजे बावन्न अक्षरे असून त्यांना बीजमंत्राचे सामथ्र्य असल्याचे सांगितले जाते. श्रीदत्तांच्या हातातील जलव्याप्त कमंडलू हा संसारस्थितीला कारणीभूत अशा कर्माचे प्रतीक म्हणून ओळखला जातो तसेच त्रिशूळ हे आयुध असले तरीही त्याची तीन टोके आचार, व्यवहार व प्रायश्चित्त यांची, तसेच धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थाची प्रतीके असल्याचे मानले जाते. दत्तांच्या हातातील डमरू वेदशास्त्रावरील प्रभुत्वाचे द्योतक असून दुसऱ्या हातातील सुदर्शनचक्र ज्ञानस्वरूप आणि अज्ञानजनक भ्रांती दूर करणारे आहे. त्यांच्या हातातील शंख हा वेदातील विधी, नियमविधी व परिसंख्याविधी या त्रिविध कर्माचे प्रतीक आहे. 

जो आपल्या भक्तांना सर्वस्व देतो तो म्हणजे दत्त, असाही अर्थ सांगितला जातो. सुप्रसिद्ध संतसत्पुरुष श्रीरंग अवधूतांनी मात्र श्रीदत्ताला एका आदर्श शेतकऱ्याच्या रूपात उभे केले आहे! शेतकऱ्यास कधीही विश्रांती नसते त्याचप्रमाणे दत्तही नेहमीच उभा आणि संचारी असतो. शेतीसाठी बल पाहिजे, खतासाठी गोमूत्र व शेण पाहिजे म्हणून शेतकरी रूपातील दत्तात्रेयाजवळ गोमाता असते. या गायीचा म्हणजे गायत्रीचा विस्तार म्हणजे चार वेद होत. चोरादिकांपासून संरक्षण व्हावे म्हणून दत्तांना चार भौतिक कुत्रे राखणदार म्हणून आवश्यक वाटतात. या भौतिक व शेतकरीस्वरूप दत्ताची आयुधेही शेतीप्रधान आहेत. पाखरे उडविण्यासाठी डमरू. भयप्रसंगी कोणास मदतीला बोलावता यावे म्हणून नाद करणारा शंख, पशुपक्ष्यांना हाकारण्यासाठी आद्यचक्ररूपी गोफण, नांगराच्या प्रतीकासारखे त्रिशूळ, शेतातील मातीची ढेकळे फोडण्यासाठी कुदळीसारखी गदा, भर उन्हात काम करताना तृषा शमविण्यासाठी जलकमंडलू, तसेच धान्य राखण्यासाठी ‘दत्त’ शेतकऱ्याच्या काखेत झोळी आहे. शेतीची कामे करताना ईशचिंतनही व्हावे याकरता जपाची माळही आहे. थोडक्यात, या ‘दत्त’ शेतकऱ्याला भौतिकसुखाच्या प्राप्तीसोबतच आध्यात्मिकतेची जोड दिल्याचे दिसून येते. 

दत्त उपासना

उपासना हा शब्द उप + आस - जवळ बसणे किंवा प्रवेशणे ह्या अर्थाच्या धातूपासून बनला आहे. इष्टदेवतेच्या शक्य तितके जवळ जाण्याचा प्रयत्न यातून अभिप्रेत आहे. ही संकल्पना प्राचीन आहे. 'उपवास' म्हणजे जास्तीत जास्त देवाच्या सानिध्यात राहाणे, तसेच 'उपासना' ही देखील देवाच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचण्यासाठी केली जाणारी क्रिया मानली जाते. 'शुश्रूषा' असा याला समानार्थी शब्द अमरकोशात आढळतो. आणि जेंव्हा आपण एखाद्याची शुश्रूषा म्हणजे सेवा करतो तेंव्हा आपण त्याचा सर्वात जवळ असतो हे लक्षात घेतले तर अमरकोशाकारांनी नेमके उपासनेची गुरुकिल्लीच आपल्या पुढे ठेवले असे जाणवते.

असा हा नित्यउपासनाक्रम भक्ताने स्वाधिकारी पुरुषाकडून ठरवून घ्यावा व उपासना करीत रहावे. असे लोकं नाही भेटल्यास प. पु. श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी प्रकट केलेली भक्ततत्वे आचरणात आणावी. सिद्धपुरुषांच्या चरित्रापासून होणारा बोध निजबोधास कारणीभूत होतो व त्याने आत्मवैभवसंपन्नतेचीही प्राप्ती होते  म्हणूनच डोळ्याने श्री दत्तात्रयांचे रूप पहावे, त्याचे गुणअवलोकन करावे जे अक्षर आहे त्याचे अवलोकन करावे. सुखाने नाम घ्यावे. आचरण शुद्ध असावे, अंतःकरणात गुरुप्रेमाची भरती यावी, देहभावाशी संबंधित असलेल्या वासनांचा क्षय व्हावा, चराचरातील चैतन्याची जाणीव व्हावी, आकाशाशी मनोमिलन व्हावे, सहृदयता, विनयभाव, शरणागती या सर्वांची विस्मृती न व्हावी. उपासनेत रुढाचारापेक्षा योगाचाराला महत्व यावे. हे सर्व तर उपासनेचे फलित असते.

श्री दत्तात्रय
श्री दत्तात्रय

उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया 
जो अनसूयेच्या भावाला भुलूनिया सुत झाला,
दत्तात्रेय अशा नामाला मीरवी वंद्य सुरांना,
तो तू मुनीवर्या निज पाया स्मरता वारीसी माया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ||१||

जो माहुरपूरी स्नान करी, निवसे सह्याद्रीचे शिरी
गंगेचे स्नान करी, भिक्षा कोल्हापूरी
स्मरता दर्शन दे वारी भया, तो तू आगमगेया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ||२||

तो तू वांझेसी सुत देसी सौभाग्या वाढविसी
मरता प्रेतासी जीववीसी सद्वरदाना देसी
यास्तव वासुदेव तव पाया दरत्या तारी सदया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ||३||

श्री दत्तात्रय दैवताविषयी, दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ

१] दत्त: दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’ याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देवआहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही. आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव जागृत करण्याचा आपण निश्चय करूया.
२] अवधूत: जो अहं धुतो, तो अवधूत! अभ्यासकरतांना आपल्या मनावर ताण येतो ना? खरेतर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्टकरण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे.’
३] दिगंबर: दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहेअसा! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर! जरही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्यजिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच आपल्यावर त्याची कृपा होईल. 

दत्ताच्या परिवाराचा भावार्थ

४] गाय: दत्ताच्या मागे असलेली गायही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनूआपणाला जे हवे, ते सर्व देते.पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…
५] ४ कुत्रे: हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४वेदांचे प्रतीक आहेत.
६] औदुंबर वृक्ष: दत्ताचे पूजनीय रूप! या वृक्षात दत्त तत्त्वअधिक आहे.
७] मूर्तीविज्ञान: दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे आहे,
८] कमंडलू आणि जपमाळ: हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.
९] शंख आणि चक्र: श्री विष्णूचे प्रतीक आहे.
१०] त्रिशूळ आणि डमरू: शंकराचे प्रतीक आहे.
११] झोळी: ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.

श्री दत्तात्रय उपासनेची फलनिष्पत्ती

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत होत असतो.

दत्ताचा नामजप: श्री गुरुदेव दत्त।

फायदे

१. दत्त या देवतेकडून जिवाला अधिक प्रमाणात सात्त्विक शक्ती मिळत असल्याने त्याच्या आधारे जीव वाईट शक्तींशी लढू शकतो.
२. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्ती मिळते.
३. दररोज किमान १५ ते २० मिनिटे एकाग्र चित्ताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्तींचा त्रास अल्प होतो.
४. पूर्वजांना गती मिळते आणि त्यामुळे घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते. 

लिंगदेहाला गती देण्याच्या संदर्भात दत्ताच्या नामजपाचे होणारे फायदे

१. पूर्वजांना गती देणारी देवता दत्त आहे. दत्ताचा नामजप केल्याने नामजपातून प्रक्षेपित होणार्या आघातजन्य तेजोमय लहरींमुळे लिंगदेहाभोवती असलेल्या वासनात्मक लहरींची कार्य करण्याची तीव्रता अल्प होऊन त्यातील रज-तम नष्ट होऊ लागल्याने लिंगदेहाचे जडत्व अल्प होऊन त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते.
२. लिंगदेह आणि त्याच्या प्रत्यक्ष देहाभोवती संरक्षककवच निर्माण होते. यामुळे त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.
३. पृथ्वीवरील वासनात्मक आसक्तीही अल्प होण्यास साहाय्य झाल्याने त्याला अल्प वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाता येणे शक्य होते.
४. दत्ताचा नामजप केल्याने वायूमंडलात चैतन्य कणांची निर्मिती होऊन त्याचा लिंगदेहाला फायदा होतोच.
५. नामजप करणार्या इतर जिवांचेही दूषित झालेल्या वायूमंडलातील त्रासदायक लहरींपासून रक्षण होते.

पूर्वजांच्या त्रासांच्या निवारणार्थ दत्तोपासना

दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या सगुण रुपांचे प्रत्यक्ष एकत्व!
विवाह न होणे, विवाह झाल्यास पती-पत्नींचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्ये बालपणातच मृत्यूमुखी पडणे वगैरे त्रास असलेले समाजात आपल्याला दिसतात. या गोष्टी पूर्वजांच्या त्रासामुळे होतात. दारिद्र्य, शारीरिक आजार यामागेही पूर्वजांचे त्रास असू शकतात. मात्र आपल्याला पूर्वजांचा त्रास आहे किंवा नाही, हे केवळ उन्नतच सांगू शकतात.

हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धपक्ष वगैरे करत नाहीत. तसेच साधनाही करत नाहीत. त्यामुळे बहुतेकांना पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो. मात्र तो त्रास आहे किंवा नाही, हे सांगणारे उन्नत न भेटल्यास येथे दिलेले काही तर्हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे समजून साधना करावी.

समंधबाधा दूर होण्यासाठी दत्तोपासना

समंधबाधांना (वेगवेगळया पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणार्यांना) ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्त होत नसल्याने (कोणत्याही योनीची प्राप्ती होत नसल्याने) त्यांना पाताळवास प्राप्त होतो. पाताळवासात पोहोचण्यापूर्वी त्याच्या कर्मगतीचा प्रवास त्याला भुवलोकात राहून पूर्ण करावा लागतो, उदा. जसे हलक्या वजनाच्या थोड्या बिया (मिरची, तुळस, सब्जा वगैरे) किंवा थोडे वाळूचे बारीक कण भरून फुगवून हवेत सोडलेला फुगा आतील बियांसहित किंवा वाळूच्या कणांसहित हवेत तरंगतो.

त्याची शक्ती क्षीण होऊन तो फुटल्यानंतर त्यातील बिया आणि कण यांसहित फुग्याचे जे व्रतडे हवेत वर तरंगत होते किंवा विहार करत होते ते आतील दाण्यांसहित खाली येते. याप्रकारेच भुवलोकातील कर्मगती संपल्यानंतर उरलेले तम (कातडे) त्याच्या तमाच्या वजनानुसार त्याला प्राप्त झालेल्या लोकात स्थीर होते. मात्र प्राप्त कर्मगती असेपर्यंत भुवलोकातील समंधबाधा इतर वाईट शक्तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाइकांना प्रचंड प्रमाणात त्रास देत राहतात. अशा प्रकारे समंधबाधांमुळे साधकांना साधना करण्यात प्रचंड अडथळे निर्माण होतात. दत्ताच्या नित्य उपासनेने अशा समंधबाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्तमहाराज आपल्यातील योगसामर्थ्याने सातत्याने आपल्या ताब्यात ठेवून साधनामार्गातील अडथळे दूर करतात.

श्री दत्तात्रेयांच्या स्वरूपांची बाबतची माहिती
श्री दत्तात्रेय

श्री दत्तात्रेयांच्या स्वरूपांची बाबतची माहिती

(दक्षिणांग) आदिगुरू
1 सुदर्शनचक्र - ज्ञानशास्त्र
2 डमरु - शब्दशास्त्र
3 माला - मंत्रशास्त्र.
( वामांग ) ईश्वर
1 शंख - धर्मशास्त्र
2 त्रिशूळ - आचारव्यवहार प्रायश्चित्त शास्त्र
3 कमंडलु - जीवनकर्म जीवन.
एवमीश्वरभागो यं जगत्स्थित्यै परेशितु:  |
तथान्य गुरुभागश्च माया भ्रमनिवर्तक:  ||
अर्थ - श्री दत्तात्रेयांच्या एकाच शरीरात दोन स्वरूपांची कल्पना केलेली आहे. त्यांचे उजवे अंग हे आदिगुरुस्वरूप असून,  ते मायाभ्रमाचे निवर्तक आहे  व डावे अंग हे जगाची सुस्थिति चालवणारे ईश्वरस्वरूप आहे.  श्रीगुरू टेंबे स्वामी महाराज हा असा खुलासा करतात,  स्वभक्तांवर अनुग्रह करण्याकरिता प्रभूंनी यथानुक्रम चक्रादिक आयुधे धारण केली आहेत.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

भक्तकाम कल्पद्रुम  भगवान दत्तात्रय

शरणागत वत्सल अशी दत्त महाराजांची ख्याती आहे, जो मला अनन्य भावाने शरण येईल त्याला मी सहाय्य करेन. आता दत्त महाराजाना शरण येणाऱ्यात भक्त मंडळी तर कायम होती, आहेत आणि भविष्यातही असतील पण अभक्ताने जर शरण येऊन प्रार्थना केली तर? भक्त हा प्रीतीने अर्थात प्रेमाने प्रार्थना करतो पण त्याच बरोबर द्वेष अथवा भीतीने एखाद्या अभक्ताने प्रार्थना केली तरी दत्त महाराज कृपा करतातच. कैक उदाहरणे यास्तव देता येतील. गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायात वल्लभेश ब्राह्मणाला तीन चोर मारावयास येतात, तात्काळ श्रीपाद श्रीवल्लभ रुपी दत्त महाराज प्रकट होऊन त्यातील दोन चोरांना ठार करतात पण तितक्यात तिसरा चोर पाया पडून मारू नका असे विनवतो. हि विनवणी किंवा प्रार्थना भीतीने केली आहे, मारू नका. आता शरण आला म्हटल्यावर महाराजांनी नाही मारलं त्याला. पुढे दोन मदोन्मत्त ब्राह्मण जयपत्र घेण्यासाठी वाद विवाद करायला येतात. एका साधारण अशा माणसाने सात रेषा ओलांडताच तो विद्वान होतो आणि वाद करायला सिद्ध होतो हे पाहून त्या दोघा ब्राह्मणांची मती गुंग होते. आता यातून शरण जाण्याखेरीज दुसरा मार्ग नाही हे पा हून ते तात्काळ महाराजांना शरण येतात आणि गुरुमहाराज केवळ बारा वर्षांच्या शिक्षेवर त्यांची मुक्तता करतात. कोल्हापूरचा विप्र पुत्र असाच जीभ कापलेल्या अवस्थेत शरण येतो, त्याला कुठे दत्त महाराज ठाऊक असतात? पण शरण आला म्हटल्यावर उद्धार निश्चित आहे. केवळ गुरुचरित्रात नव्हे तर आपल्या आयुष्यात देखील कैक उदाहरणे अशी पाहण्यात येतात. शेवटी मला तारा म्हणून हात जोडले आणि घेतलं सांभाळून महाराजानी मात्र यात दत्त महाराज एका अटीवर उद्धाराचे वचन देत आहेत आणि ती अट म्हणजे विश्वास किंवा श्रद्धा!

निर्धार असे ज्याचे मनीं । त्यासी वर देती तत्क्षणीं । एकोभावें याकारणीं । भक्ति करावी श्रीगुरुची ॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । भजा भजा हो श्रीगुरु । सकळाभीष्टु लाधे तुम्हां ॥
जो भजेल श्रीगुरुसी । एकोभावें भक्तींसीं । त्यासी दैन्य कायसी । जें जें मागेल तें देईल सत्य ॥
गुरुभक्ति म्हणजे कामधेनु । अंतःकरणीं नको अनुमानु । जें जें इच्छीत भक्तजनु । समस्त देईल परियेसा ॥

धान्य मज केले
प. पू. पंतमहाराज बाळेकुंद्रीकर

श्री दत्तात्रय / श्रीपाद श्रीवल्लभ नावाचा मतितार्थ

श्री दत्तगुरु दिगंबरा विश्वंभर औदुंबरा. दयाघना हे करूणाकरा!
सकल पालनहारा. भक्त वत्सल सुखकरा. अनुसया पुत्रा..ब्रह्मा विष्णु महेश्वरा!
नाथांच्या नाथा. सिद्ध समर्थ शुभंकारा. नमितो तुज देवा. शरण आलो कृपा करा!
 
अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः।
स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भवसंकटात् ।।

दत्तात्रय
१. अर्थ
१) दत्त म्हणजे (निर्गुणाची अनुभूती) दिलेला: दत्त म्हणजे `आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत', अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा. जन्मापासूनच दत्ताला निर्गुणाची अनुभूती होती, तर साधकांना ती यायला कित्येक जन्म साधना करावी लागते. यावरून दत्ताचे महत्त्व लक्षात येईल. 

२) दत्त म्हणजे `चैतन्यदायी लहरींचा दाता':
`उच्च किंवा कनिष्ठ देव-देवतांच्या सगुण, तसेच निर्गुण लहरी कमी कालावधीत जिवाला प्रदान करणारे व उत्कृष्ट दातृत्वाचे दर्शक असे तत्त्व म्हणजे दत्त. दत्त याचा अर्थच असा आहे, `चैतन्यदायी लहरींचा दाता.\' 

दत्ताच्या काही नावांचा भावार्थ

१) दत्तगुरु (जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी झटणारा):
`दत्त हे तत्त्व जिवाकडून कोणत्याच सगुण-निर्गुण भावाची अपेक्षा न ठेवता जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी झटत असते; म्हणूनच ते सर्व लोकांत `दत्तगुरु' या नावाने ओळखले जाते.
२) अवधूत (दत्त म्हणजे सगुण व दत्तात्रेय म्हणजे निर्गुण, या दोन रूपांना जोडणारा) :
`अवधूत' म्हणजे जिवाच्या देहातील अष्ट अवधाने नियंत्रित करून त्याला सगुणातून निर्गुणाची दिशा दाखवणारा. अवधूत हे दत्त व दत्तात्रेय या दोन रूपांना जोडणारे माध्यम आहे. दत्त (ब्रह्मा, विष्णु व महेश यांचा मूर्त-स्वरूप आविष्कार) हा सगुण, तर दत्तात्रेय (ब्रह्मा, विष्णु व महेश या तत्त्वरूपी त्रयींचा प्रकाशरूपी आविष्कार) हा निर्गुणाशी संबंधित आहे. `अवधूत' हे दत्ताच्या तेजाची प्रभावळ घेऊन जन्माला येणारे तत्त्व आहे.
३) दिगंबर (मोक्षात विलीन होईपर्यंत साथ देणारा):
`दिगंबर' म्हणजे अंबररूपी व्याप्त प्रकाशात, म्हणजेच मोक्षात विलीन होईपर्यंत, म्हणजेच गंतरात जाईपर्यंत निरंतर साथ देणारे तत्त्व.
४) श्रीपाद (`श्री' तत्त्वाच्या चरणांपर्यंत नेणारा):
`श्री' म्हणजे ईश्वराचे अविनाशी तत्त्व. अशा ईश्‍वररूपी अविनाशी तत्त्वाच्या, म्हणजेच `श्री\' तत्त्वाच्या चरणांपर्यंत नेणारे तत्त्व, म्हणजे श्रीपादरूपी दत्ततत्त्व.
५) वल्लभ (अभय देणारा):
भय निर्माण करणार्‍या वलयांकित त्रासदायक लहरींपासून ब्रह्मांडाचे रक्षण करून जिवांना अभय देणारे तत्त्व, म्हणजे वल्लभरूपी दत्ततत्त्व.'

गुरु व गुरुचरण सेवा हि जन्मोजन्मीचे पुण्याईचे फलित

गुरुचरणांकडे वळण्यासाठी दैवगती ही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही. त्या टिकविण्यासीठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात. कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत रहावे. नाव वल्हविण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोहोचविण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्रीगुरूंची कास धरून ठेवावी. ते पैलतीरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरुंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुग्धशर्करा योगच समजावा.

श्री दत्तात्रय
योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांनी स्वत: रेखाटलेले भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंचे मनोहारी षड्भुज श्री दत्तात्रय

वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् 

भगवान श्रीदत्तप्रभू हे साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत. जगन्नियंत्या श्रीभगवंतांचे अभिन्न गुरुस्वरूप म्हणजे श्रीदत्तप्रभू. म्हणूनच त्यांना ' जगद्गुरु ' म्हणतात. आज मार्गशीर्ष पौर्णिमा हे भगवान श्रीदत्तात्रेय जयंतीचे पावन पर्व आहे. 
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अवताराचे रहस्य सांगताना प. पू. योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीदत्तात्रेय अवतार' हा चिरंजीव का आहे? तर, 'अज्ञान' नावाचा राक्षस मारल्याशिवाय श्रीदत्तगुरूंना जाता येणार नाही; व अज्ञान हे अनंत काळापर्यंत राहणार. म्हणून हा अवतार चिरंजीव आहे." अज्ञान नष्ट करणे हेच श्रीगुरुतत्त्वाचे प्रधान कार्य आहे. या अज्ञानामुळेच जीव आपले मूळचे ब्रह्मस्वरूप विसरून मायेच्या कचाट्यात सापडून दु:ख भोगत असतो. दु:खी कष्टी जीवांचा कळवळा येऊन श्रीभगवंतच श्रीदत्तप्रभूंच्या रूपाने प्रकट होतात व योग्य वेळ आलेल्या जीवांवर कृपा करून त्याना आत्मबोध करतात. या कार्यासाठी श्रीदत्तप्रभूंचेच अंश विविध गुरुपरंपरांच्या माध्यमातून श्रीगुरु म्हणून पुन्हा पुन्हा अवतरित होतात. ही परंपरा आजही अक्षुण्ण चालूच आहे. श्रीभगवंतांचे अवतार ज्या कार्यासाठी होतात, ते कार्य पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात विलीन होऊन जातात. पण श्रीदत्तप्रभूंच्या अवताराचे तसे नाही. जोवर माया आहे तोवर अज्ञान आहेच व तोपर्यंत श्रीदत्तप्रभूंचे कार्य पूर्ण झालेले नसल्याने ते कार्यरत राहणारच. म्हणूनच प. पू. श्री. मामा श्रीदत्तप्रभूंना' चिरंजीव अवतार' म्हणतात. आज याच चिरंजीव अवताराचा प्रकटदिन होय!

भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अलौकिक स्वरूपाची काही विलक्षण वैशिष्ट्ये आहेत. श्रीदत्तप्रभू हे भगवान ब्रह्मा, विष्णू व महेशांचे एकत्रित स्वरूप आहेत. त्यांच्या सहा हातांमध्ये तिघांची प्रत्येकी दोन आयुधे मिळून सहा आयुधे आहेत. त्यांच्या हातांचे व त्यातील शस्त्रांचे मार्मिक रहस्य सांगताना प. पू. श्री. मामा म्हणतात, "भगवान श्रीदत्तात्रेयांचे सहा हात हे सहा शास्त्रांचे निदर्शक आहेत. हातातील माळ - जपासाठी, डमरू - व्याकरण आदी शास्त्रे शिकवण्यासाठी, शंख - ज्ञान देण्यासाठी."
श्रीदत्तप्रभूंचे तीन हात भक्तांसाठी आहेत तर तीन हात अभक्तांसाठी, शत्रूंसाठी आहेत. भक्तांसाठी असलेल्या उजवीकडील तीन हातांपैकी, सर्वात खालच्या हातात त्यांनी ब्रह्मदेवांचे आयुध असणारी जपाची 'माळ' धारण केलेली आहे. आपल्या भक्तांना सतत नामस्मरण करण्याचा त्याद्वारे श्रीदत्तप्रभू बोध करतात. 

मधल्या हातात 'डमरू' हे शिवांचे आयुध आहे. त्याचा वापर व्याकरणादी शास्त्रे शिकवण्यासाठी होतो. व्याकरण शास्त्राची मूळ सूत्रे भगवान शिवांनी डमरूच्या नादातूनच निर्माण केलेली आहेत. 
सर्वात वरच्या हातात भगवान विष्णूंचे 'शंख' हे आयुध आहे. या शंखाच्या स्पर्शाने भगवंत शिष्यांना ज्ञानदान करतात. ध्रुवबाळाच्या गालाला आपल्या हातातील शंखाचा स्पर्श करून श्रीभगवंतांनी ज्ञान दिल्याचा उल्लेख भागवतात व श्री ज्ञानेश्वरीत आहे. 
या तिन्ही हातांचा व त्यातील आयुधांचा, जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभू आपल्या शरणागत शिष्यांवर कृपाप्रसाद करण्यासाठीच उपयोग करतात.  
जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभूंचे सहा हात हे सहा शास्त्रांचे, षड्दर्शनांचे प्रतीक आहेत. कपिलमुनींचे सांख्य, कणादांचे वैशेषिक, पतंजलींचे योग, न्याय, मीमांसा व वेदान्त ही सहा दर्शने अथवा शास्त्रे आहेत. साक्षात् परब्रह्म भगवान श्रीदत्तप्रभू हे जगद्गुरु असल्याने ही सर्व शास्त्रे जणू त्यांच्या पावन देहाचे अवयवच आहेत. 

या सहा हातांपैकी, उजवीकडील तीन हात हे भक्तांसाठी अाहेत. उजवी बाजू आपल्याकडे पवित्र मानली जाते. तसे भक्तांना देवांकडे प्रथम मान आहे, म्हणून त्यांना उजवी बाजू दिलेली आहे. तर डावीकडील तीन हात हे अभक्तांसाठी, दुष्टांसााठी आहेत. या तिन्ही हातांतील शस्त्रे ही दुष्टांना शासन करण्यासाठी आहेत. यांचे रहस्य सांगताना प. पू. श्री.मामा म्हणतात, " भगवान श्रीदत्तात्रेयांचे डावीकडील तीन हात अभक्तांसाठी, दुष्टांसाठी आहेत. कमंडलू - पाणी मारून वैरी नाशासाठी, त्रिशूळ - दूर असलेल्‍या शत्रूला मारण्यासाठी, चक्र - फारच दूरच्या दुष्ट शक्तींना मारण्यासाठी."
 
श्रीदत्तप्रभूंनी डावीकडील सर्वात खालच्या हातात ब्रह्मदेवांचे 'कमंडलू' हे आयुध धारण केलेले आहे. यातील पाणी मारून ते धर्माचे व सज्जनांचे तसेच भक्तांचे  वैर करणारे, त्यांना अकारण त्रास देणारे शत्रू मारून टाकतात. मधल्या हातात त्यांनी भगवान शिवांचे 'त्रिशूल' हे आयुध धारण केलेले आहे. हे त्रिशूल फेकून दूरचे शत्रू ते नष्ट करतात. सर्वात वरच्या हातात त्यांनी भगवान श्रीविष्णूंचे 'चक्र' हे आयुध धारण केलेले आहे. फारच दूरच्या दुष्ट शक्तींचा नि:पात करण्यासाठी त्या चक्राचा ते उपयोग करतात. 
भगवान श्रीदत्तप्रभू हे भक्तवत्सल भक्ताभिमानी व दुष्टनिर्दालन करणारे आहेत. 

श्रीदत्तप्रभूंच्या ब्रीदांचे द्योतक असणा-या त्यांच्या या सहा हातांचा व त्यांतील आयुधांचा हा विलक्षण गूढार्थ, आजवर पहिल्यांदाच, प. पू. श्री. मामांनीच सर्वांना समजेल असा शब्दांमध्ये प्रकट केलेला आहे. हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे ऋण आहे. या रहस्याचा अभ्यास करण्याने आपल्याला श्रीदत्तप्रभूंच्या अवतारामधील अज्ञात असणारा विलक्षण भाग नीट समजून येईल. आजच्या श्रीदत्तात्रेय जयंतीच्या पावन पर्वावर या प. पू. श्री.मामांच्या या मार्मिक बोधाचे चिंतन करून आपणही भगवान श्रीदत्तप्रभूंच्या श्रीचरणी ही स्मरणांजली सादर समर्पूया व धन्य होऊया !

श्री दत्त तीर्थक्षेत्री कोठे जाल व फलप्राप्ती काय? समस्या काय व सिद्धी काय ?                                           .  

१) जर संतानिछुक असाल, मुल होऊ घातले असेल, झाले असेल तर कारंजा गाठून आनंद लहरी येऊ द्या. जिथे जन्मस्थान आहे तिथे सर्व विसरून शांत बसा आणि तुमचा थोडासा अंश आमच्या घरात येऊ द्या असे मागा.                                       
२) जर उद्योग भरभरटीला यायचा असेल, आला असेल तर अमरापूर करा.   
३) लहान मुलाला सद्बुद्धी यावी वाटत असेल तर औदुंबर करा.                                                                                    
४) अहंकार येऊ नये असे वाट्त असेल किंवा आला असेल तर शिरोळ ला भिक्षाटन करा, कुमशी करा.                               
५) जर आपले अजाणता काही झालेले दुष्कृत्य दूर करायचे असेल, भक्ती मार्गात जाताना मन भरकटत असेल तर नृसिंहवाडी करा.                                                             ६) जर देवादेवात भेद मनात येत असतील तर हिप्परगी कल्लेश्वर करा.   
७) जर कुठलाही मानसिक धक्का अथवा कोलमडून पडण्यासारखे झाले असेल तर उपाय एकच. गाणगापूर संगमावरचे अश्वत्थ औदुंबर भोवती मन निराकार करून आत्मचिंतन, आत्मशुद्धी, स्वत:च्या चुका मान्य करून नवसुरुवात, जे गमावले ते आपले नव्हतेच आणि जे मिळाले किंवा मिळेल तेही आपले नसेल ही भावना ठेवून मन कोरे करून अध्याय वाचावे. न नशिबाला दोष द्यावा न मनुष्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचे, शनी महाराजांनी दिलेला दणका गुरुमहाराज तशच्या तसा भरून काढत नाहीत. ते दु:ख हलके करून प्रसंग तरून जायला मदत करतात. म्हणतात ना "चोरून पोळी वाढली असेल, तर ओरडून तूप मागू नये" पण संगम स्थानी वेळ देऊन अपराध मान्य करा.

श्री दत्तात्रय एक सर्व समावेशक दैवत

दत्तात्रेय उपनिषदाची सुरुवात दत्तात्रेय हा विष्णूचा अवतार आहे, असे सांगून होते, तर शेवट ‘ॐ नम: शिवाय:’ या शिवाच्या प्रार्थनेने होते. नाथपंथीय दत्तात्रेयाला शिवाचा अवतार मानतात.मध्ययुगीन काळातील हरिहर भक्तीचा हा पंथ आहे. विष्णू आणि शिव या दोन देवतांचा व वैष्णव आणि शैव पंथांचा समन्वय करण्याचे काम या पंथाने केले. भक्ती आणि योग यांचाही समन्वय या पंथाने केला. हा पंथ भारतभर कधीच पसरला नाही. तो नर्मदेच्या दक्षिणेला असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि गुजरात या राज्यांतच प्रामुख्याने आहे, पण वैदिक धर्म, तंत्र, योग आणि भक्ती यांचा समन्वय असलेल्या या संप्रदायाला मध्ययुगीन धर्मसंकल्पनांच्या विकासप्रक्रियेत किंवा उत्क्रांतप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे.

वैदिक दत्तात्रेय

दत्तात्रेय हा आद्य देवतांपैकी एक आहे. त्याचा उल्लेख वेदात आहे. रामायण-महाभारत या दोन महाकाव्यांतपण त्याचा उल्लेख आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीकरण करून दत्तात्रेयाचे दैवत झाले असल्याचे समजले जाते. त्रिमूर्ती कल्पनेचे ते आद्य प्रतीक आहे. दत्तात्रेय हा विष्णूचा सहावा (कदाचित चौथा किंवा सातवा) अवतार समजला जातो. दत्तात्रेय उपनिषदाची सुरुवात दत्तात्रेय हा विष्णूचा अवतार आहे, असे सांगून होते, तर शेवट ‘ॐ नम: शिवाय:’ या शिवाच्या प्रार्थनेने होते. नाथपंथीय दत्तात्रेयाला शिवाचा अवतार मानतात.

दत्तात्रेय हा अत्री ऋषी आणि अनसूया यांचा पुत्र असून, त्यांनी आदिनाथांकडून दीक्षा घेतल्याचे नाथपंथ सांगतो, तर भागवत पुराणात त्याला २४ गुरू असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या शिष्यांत सहस्रार्जुन कार्तवीर्य, भगवान परशुराम, यदु, आलार्क, आयु आणि प्रल्हाद असल्याची नोंद भागवत पुराणात आहे, तर परंपरेप्रमाणे नवनाथ सार या धुंडिसुत मालू या कवीने लिहिलेल्या ग्रंथात दत्तात्रेयाने मत्स्येंद्रनाथांना व इतर नाथांना दीक्षा दिल्याचे सांगितले आहे. श्रीगुरू दत्तात्रेय आणि भगवान शंकर यांच्या कृपाप्रसादाने व प्रेरणेने मच्छिंद्रापासून नाथ संप्रदायाचा प्रारंभ झाला. ऋषभदेव हा विष्णूचा कृष्णासमान अंश होता (? जैनांचे ऋषभदेव) त्याच्या शंभर पुत्रांपैकी नऊ जण हे वैराग्यसंपन्न, तेजस्वी, ज्ञानी व परमहंस स्थितीला पोहोचलेले होते. या आर्षभांची (ऋषभपुत्रांची) नावे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविहरेत्र, द्रुमिल, चमक व करभाजन अशी होती. कलियुगात भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने त्यांनी पुन्हा अवतार घेतले. या वेळी ते अनुक्रमे मच्छिंद्र, गोरख, जालंदर, कानीफ, चर्पटी, वटसिद्ध नागनाथ, भर्तरी, रेवण व गहिनी असे नवनाथ झाले. वैष्णव नवनारायणाचे रूपांतर शैव नवनाथात झाले.इस्लाम प्रभावामुळे समाज सुन्न झाला होता. या नवीन संकटाला प्रतिक्रिया कशी द्यावी, हे त्याला समजत नव्हते. त्या पाश्र्वभूमीवर नृसिंह सरस्वती यांचे कार्य पाहिले पाहिजे.भागवतात नवनारायणाची कल्पना आहे. नारायणाचा अंश असलेले व नारायणाप्रमाणे कार्य करणारे म्हणून त्यांना नवनारायण म्हणतात.

तांत्रिक दत्तात्रेय

वेद-पुराणानंतर मध्ययुगीन काळात तंत्रानेही हे दैवत स्वीकारल्याचे दिसते. दत्तात्रेय हा औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, दाढी वाढलेल्या नग्न अवस्थेत ध्यानस्थ बसलेला दिसतो. त्याचे चार कुत्री हे वेद मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो तंत्रातील स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते. त्याची जटाजूट आणि नग्न अवस्था ही त्याने जगाशी संबंध तोडल्याचे द्योतक आहे. त्याच्या समोरील अग्निकुंड हे तंत्रातील अग्नीचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. त्याच्याबरोबर असलेली गाय हे संप्रदायावरील वैदिक परिणाम दर्शविते. एकंदर हे चित्र समाजात निषिद्ध मानलेल्या कृती करणाऱ्या तंत्रातील योग्याचे आहे.तंत्रात दत्तात्रेयांना गुरूचा गुरू मानले आहे. सातव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मरकडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात तांत्रिक दत्ताची आपली गाठ पडते. त्यातील दोन गोष्टी तंत्राचा प्रभाव लक्षात येण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

१. एका सरोवराकाठी आपल्या शिष्यांची नजर चुकवून आणि सर्व बंध तोडून सरोवराच्या तळाशी मुनी दत्तात्रेय जातात. त्यांचे शिष्य काठावर त्यांची वाट पाहात बसतात. मुनी वर येतात, तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत एका सुंदर स्त्रीसमवेत वीणा वाजवत असलेले दिसतात. शिष्यांना आश्चर्य वाटत नाही. कारण तंत्रातील बंधनाच्या पलीकडे गेलेल्या तांत्रिकांची त्यांना माहिती असते.
२. सहस्रार्जुन कार्तवीर्य अर्जुनाला त्याचे गुरू गर्ग दत्तात्रेयाची उपासना करण्यास सांगतात आणि दत्तात्रेयाची महती सांगतात. देव-दानवांच्या भांडणात देव पराभवाच्या छायेत येतात आणि ते ब्रह्मदेवाकडे मार्गदर्शनासाठी जातात. ब्रह्मदेव त्यांना दत्तात्रेयांकडे पाठवतात. देव दत्तात्रेयाकडे येतात, तर दत्तात्रेय मद्यधुंद अवस्थेत स्त्रीसमवेत गाणे ऐकत असताना दिसतात. असे हे दैवत शत्रूचा कसा बरे नाश करू शकेल, असे देवांना वाटले आणि त्यांनी हा प्रश्न ब्रह्मदेवाला विचारला. तेव्हा ब्रह्मदेवांनी ही स्त्री लक्ष्मी आहे आणि दत्तात्रेय आपल्या नेत्रकटाक्षाने शत्रूचा नि:पात करतील, असे सांगितले आणि पुढे झालेही तसेच.असे अनैतिक आणि समाजनिषिद्ध व्यवहार करणाऱ्या देवतेबद्दल सांगण्याचा उद्देश उघडच तंत्राचे समर्थन करण्याचा आहे. वामाचार हा फक्त दिव्य साधकांसाठी असतो. दिव्य साधक हा जीवनमुक्त असतो. तो चांगले-वाईट, भले-बुरे, ज्ञान-अज्ञान इत्यादी द्वैतांच्या पलीकडे गेलेला असतो. जे कर्म पशू किंवा वीर साधकांकरता बाधक होऊ शकते, ते दिव्य साधकाकरता बाधक ठरत नाही, हेच दाखवावयाचा उद्देश त्यात असावा.

हा तांत्रिक दत्तपंथ सातव्या-आठव्या शतकातला असावा. यातील दत्तात्रेय हा वेदात असलेल्या दत्तात्रेयाप्रमाणे मिथॉलॉजिकल नसावा. तो ऐतिहासिक असण्याची शक्यता आहेत. त्याच्यासंबंधी आपण पुढे पाहणारच आहोत.तंत्रात दत्ताला अत्रीचा पुत्र न मानता अत्री गात्रोतील व्यक्ती मानलेले आहे. पुराणातील अर्जुन कार्तवीर्य, परशुराम यांच्याशी मिथकांच्या साहाय्याने जोड घालण्यात आली आहे. ‘त्रिपुरारहस्य’ नावाने एक गं्रथ दत्तात्रेयांशी संबंधित आहे. ‘दत्तसंहिता’ किंवा ‘दक्षिणामूर्ती संहिते’चा हा भाग असावा आणि हा दत्तात्रेयांनी लिहिला असावा. परशुरामाने त्रिपुरारहस्य नावाने त्याचे संक्षिप्त रूप केले असावे. दत्तात्रेयाने परशुरामाला निरनिराळ्या कथांद्वारे अद्वैत तत्त्वज्ञान सांगितले आहे. मंत्र, यंत्र इत्यादींची माहिती त्यात आहे. ‘त्रिपुरापद्धती’ हा आणखी एक ग्रंथ दत्तात्रेयांच्या नावाने आहे.तंत्रातील दत्त हा एकमुखी दत्त आहे. दत्ताची मंदिरे आजही भुताखेतादीपासून त्रस्त झालेल्यांसाठी व आजारापासून मुक्त होण्यासाठी वापरली जातात. उदा. गाणगापूर. हा तंत्राचाच परिणाम दिसतो.

योगिक दत्तात्रेय

यानंतर दत्तपंथातील उत्क्रांतीचा टप्पा हा योगी दत्तात्रेयाचा. गोरखनाथांनी अकराव्या शतकात आपला संप्रदाय स्थापन केला आणि त्यात अवधूत हे नाव जीवनमुक्त पुरुषाला दिले. अवधूत ही दत्तपंथातील शब्दावली गोरखपंथाने उचललेली दिसते. दत्तात्रेय या गुरूचा गुरू मानून दत्तात्रेयाला महायोगी ठरविलेले आहे. ‘अवधूत गीता’ हा गोरखनाथ पंथाचा महत्त्वाचा ग्रंथ दत्तात्रेयाशी संबंधित आहे. जीवनमुक्त स्थितीचे- अवधूत स्थितीचे- सविस्तर विवेचन त्यात आहे. हा दत्तात्रेयाच्या शिष्यांपैकी कोणी लिहिला असावा.नाथपंथातून भक्तिपंथात दत्त या देवतेचा प्रवेश बाराव्या शतकात झालेला दिसतो. महानुभवाच्या पंचकृष्णात दत्तात्रेयाचा समावेश आहे. मूळ विष्णूचे रूप असलेला दत्तात्रेय नाथपंथात शिव झाला; पण त्यानंतर मात्र तो हरि-हर स्वरूपात भक्तिपंथात आल्याचे दिसते. बाराव्या-तेराव्या शतकात निर्माण झालेले पंथ हे हरिहर समन्वयाचे दिसतात. नाथपंथातील गहिनीनाथांनी कृष्णभक्तीची दीक्षा निवृत्तिनाथ-ज्ञानदेव यांनी दिली.

श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती व गुरुपरंपरा

ज्ञानेश्वर-नामदेवांनंतर एकनाथांपर्यंत म्हणजे १३ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जवळजवळ २००-२५० वर्षे कोणीही मराठी संत झालेला दिसत नाही. नामदेवांचा मृत्यू इ.स. १३५० साली झाला. त्यानंतर एकनाथांपर्यंत म्हणजे इ.स. १५५० पर्यंत म्हणजे जवळजवळ दोन शतके महाराष्ट्रात नृसिंह सरस्वतींशिवाय एकही संत झाला नाही. इस्लाम प्रभावामुळे समाज सुन्न झाला होता. या नवीन संकटाला प्रतिक्रिया कशी द्यावी, हे त्याला समजत नव्हते. त्या पाश्र्वभूमीवर नृसिंह सरस्वती यांचे कार्य पाहिले पाहिजे. श्रीपाद वल्लभ व त्यांचे शिष्य नृसिंह सरस्वती या दोन महान व्यक्तींनी केलेले कार्य म्हणूनच अद्वितीय म्हणावे लागेल. नृसिंह सरस्वती हे इ. स. १३७८ साली जन्मले व त्यांचा मृत्यू इ.स. १४५८ साली झाला.स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना करण्याचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त संप्रदाय हा सगुणोपासक राहिला. एकमुखी दत्त आणि त्रिमुखी दत्त अशा दोन रूपांत त्याची पूजा केली जाते. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती या दोघांनी दत्तपंथाची पुनस्र्थापना केली असे म्हणावयास हरकत नाही. यांचा मार्ग नाथपंथाप्रमाणे योगप्रधान होता; पण वर्णाश्रमधर्म मानणारा होता. नाथ संप्रदायात जे जातिव्यवस्था न मानण्याचे धोरण होते, त्याच्या विपरीत कदाचित त्याची प्रतिक्रिया म्हणून असेल हा संप्रदाय अधिक कर्मठतेकडे वळला. स्त्रियांच्या बाबतीतही तो अनुदार राहिला. आचारधर्मावर व अनुष्ठानावर त्यांचा अतिरिक्त भर होता. कदाचित तत्कालीन मुसलमानांच्या प्रभावापासून आपल्या धर्माचे रक्षण करावे म्हणून अशी मूलतत्त्ववादी भूमिका त्यांनी घेतली असावी. हे दोघेही महापुरुष दत्ताचे अवतार समजले जातात आणि त्याच्यातूनच त्यांच्याविषयी भक्तिभावना बाळगणारा भक्तिमार्गी दत्त संप्रदाय सुरू झाला. सरस्वती गंगाधर नावाच्या त्यांच्या शिष्याने ‘गुरुचरित्र’ नावाचा ग्रंथ लिहिला. ‘सरस्वती गंगाधर विरचित गुरुचरित्र’ नावाचा हा ग्रंथ या पंथाचा प्रमाणग्रंथ ठरला म्हणूनच याला गुरुचरित्र परंपरा म्हणतात. त्यात त्यांच्या चरित्राशिवाय तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची माहिती मिळते. गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली. महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्रात दत्त संप्रदायाचा प्रभाव वाढला व त्याच्या अनेक परंपरापण निर्माण झाल्या. त्यांच्या सविस्तर विवेचनात जाण्याचे कारण नाही. जिज्ञासूंनी डॉ. रा.चिं. ढेरे यांचे तत्संबंधातील लेखन पाहावे.

श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती या दोघांनी दत्तपंथाची पुनस्र्थापना केली असे म्हणावयास हरकत नाही. यांचा मार्ग नाथपंथाप्रमाणे योगप्रधान होता; पण वर्णाश्रमधर्म मानणारा होता.बाराव्या शतकात वर्णाश्रम मानणाऱ्या कर्मठांचा एक व अब्राह्मण लोकायतिक धर्माचा वर्णाश्रमधर्म न मानणारा असे दोन तट पडले. कर्नाटकात वडगलई आणि तेनगलई अशी त्यांची नावे पडली. पुढे दक्षिणेत मुस्लीम धर्माचा प्रसार झाल्यानंतर हिंदू धर्म संरक्षणासाठी दोघांनीही कंबर कसली. भक्तिमार्गी दत्तपंथातही दोन तट पडले असावेत. पहिला वर्णाश्रमधर्म, आचारधर्म न मानणारा हा महानुभाव पंथाकडे वळला, तर दुसरा कर्मठ वर्णाश्रमधर्म मानणारा, आचारधर्म पाळणारा आणि परंपरेचे पालन करणारा पंथ नृसिंह सरस्वती यांनी स्थापन केलेला दत्त पंथाच्या रूपाने स्थिरावला. स्त्रियांसंबंधातही या दोन्ही गटांची दृष्टी भिन्न होती.

इस्लाम आणि दत्तपंथ

तेराव्या शतकानंतर दक्षिणेत इस्लामने आपले पाय रोवले. समाजातील कनिष्ठ वर्गीयांना- नाथ सांप्रदायिकांना इस्लाम धर्म जवळचा वाटणे स्वाभाविक होते. त्यात राजाश्रयामुळे इस्लामचा प्रभाव वाढत होता. सुफी पंथाचाही प्रसार होत होता. त्यामुळे इस्लाम धर्म स्वीकारलेल्या कनिष्ठ वर्गातील काहींनी दत्तात्रये पंथाला इस्लामी रूप दिले. मलंग, पीर स्वरूपात त्याला पाहिले जाऊ लागले. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा होती. हा प्रभाव एकनाथांच्या काळापर्यंत दिसून येतो. चांद बोधले परंपरा आपल्याला माहीत आहेच. भूतखेतादीपासून सुटका करून घेण्यासाठी तांत्रिक दत्ताची ठाणी जशी विकसित झाली, तशीच मलंग-पीर यांचीही ठाणी विकसित झाली. शिवाय इस्लामशी तडजोड म्हणूनही सकलमत संप्रदाय नावाची माणिकप्रभू यांची समन्वयवादी परंपरा निर्माण झाली.

ऐतिहासिक दत्तात्रेय

तंत्रातील दत्तात्रेय ऐतिहासिक असण्याची शक्यता मी वर व्यक्त केली आहेच. खालील मिथकांकडे आणि ऐतिहासिक घटनांकडे आपण लक्ष दिल्यास त्यातून सलग इतिहास उलगडू शकेल.
१. अभिनवगुप्त (दहावे शतक- इ.स. ९६०-१०२०) हा अगस्त्य गोत्राचे अत्रिगुप्त आपले पूर्वज असल्याचे सांगतो. मध्य प्रदेश किंवा अंतर्वेदी (उत्तर प्रदेश) मधून कनौज राजाकडे राजाश्रयाकरिता तो आल्याचे लिहितो. आठव्या शतकाच्या मध्यात हे स्थलांतर झाले असावे.
२. अत्रिगुप्त व त्याची पत्नी अनसूया यांना दत्तात्रेय, दुर्वास आणि चंद्र अशी तीन मुले झाली, असे परंपरा मानते.
३. शिवाने श्रीकंठरूपाने दुर्वासाला आगमांचे पुनरुज्जीवन आणि प्रसार करण्यास सांगितले. त्याने द्वैत, अद्वैत आणि द्वैताद्वैत असे वर्गीकरण करून त्यांची पीठे स्थापन केली असे एक मिथक आहे.
४) गोरखनाथाने अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली.
५) धुंडिसुत मालू याने लिहिलेला ‘नवनाथ सार’ हा प्रमाणग्रंथ नसला तरी परंपरा विवेचन करणारा ग्रंथ आहे. दत्तात्रेयाच्या व भगवान शिवाच्या प्रेरणेने मच्छिंद्रनाथांनी नाथपंथाची सुरुवात केल्याचे तो सांगतो. मच्छिंद्राला तसेच सर्व नाथांना दत्तात्रेयाने दीक्षा दिल्याचे सांगतो. यातून दत्तपंथ आणि नाथपंथ यांच्यातील जैविक संबंध लक्षात येतो.

वरील ऐतिहासिक घटनांचा व मिथकांचा विचार केला, तर खालील इतिहास आपल्या लक्षात येतो. अत्रिगुप्ताला दत्तात्रेय, दुर्वास व चंद्र अशी तीन मुले होती. ८ व्या शतकाच्या मध्यापासून ते नवव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हा दत्तात्रेयाचा काळ असावा. सर्व कुटुंब आगमप्रणीत तंत्रमार्गी होते. त्यामुळे दुर्वासाने आगमांच्या वर्गीकरणाचे काम केले, तर दत्तात्रेयाने आपला संप्रदाय सुरू केला असावा. अर्थातच, तो तंत्रमार्गी असावा. त्याच्यानंतरही संप्रदाय चालला असावा. त्यांच्यावर काश्मिरी शैवपंथाचा व तंत्राचा परिणाम होता. अभिनवगुप्तही काश्मिरी शैवपंथी व तांत्रिक होते. दत्तात्रेयाचा वामाचारी पंथ गोरखनाथाच्या काळात नाथपंथात विलीन झाला असावा. त्याची ओळख कायम ठेवण्यासाठी नाथपंथाने शिवाला अघोर हे नाव व पंथाला अवधूतपंथ हे नाव दिले असावे.

एकूणच दत्त संप्रदाय हा समन्वयाचे द्योतक दिसतो. वैदिक आणि तांत्रिक याचा समन्वय, कर्म, योग व भक्ती या तिन्ही मार्गाचा समन्वय, यात दिसतो. तंत्राप्रमाणे व पुढे चालू राहिलेल्या गुरुपरंपरेला या पंथात अपरंपार महत्त्व आहे. हिंदू-मुस्लीम यांच्या समन्वयाची भूमिकाही काहींनी घेतली. शैव व वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय दत्तपंथात दिसतो. संगीत प्रसाराचे मोठे कार्य या पंथाने केले आहे. गुरुपरंपरेचे महत्त्व या संप्रदायामुळेच नाथपंथात आणि त्यातून भक्तिपंथात आले आहे. अंधश्रद्धा आणि चमत्कार, भूतखेतांवर विश्वास, मंत्र-तंत्रावरचा विश्वास या गोष्टी तंत्राचा पंथावर असलेला प्रभाव दाखवतात.

परशुराम-रेणुका संप्रदायाचा दत्तात्रेय संप्रदायाशी संबंध जोडला जातो. जमदग्नी आणि रेणुकापुत्र परशुराम यांनी गुरू दत्तात्रेयांकडे दीक्षा घेतली होती, असे गोपीनाथ कवीराज त्रिपुरारहस्याचा हवाला देऊन सांगतात. या दोन्ही संप्रदायांचे तीर्थक्षेत्र माहूर आहे हे आपणास माहीत आहेच. तसेच ‘ज्ञानदीप बंध’ या ग्रंथाद्वारे मध्ययुगात दत्तात्रेय आणि गोरखनाथ दोघेही एकमेकांबद्दल आदर बाळगून होते, असेही ते सांगतात. दत्तात्रेय कोणी अमानवी मिथक न मानता ती एक ऐतिहासिक व्यक्ती असावी या म्हणण्याला पुष्टीच मिळते.

दसनामी नागांचे ६ मुख्य आखाडे हे शैवपंथाचे आखाडे असून ते सर्वात जुने समजले जातात. त्यातील जुना आखाडा म्हणून ओळखला जाणारा आखाडा हा भैरव आखाडा म्हणूनही ओळखला जातो. या आखाडय़ाची देवता पूर्वी भैरव असावी त्यावरूनच हे नाव पडले असावे. आज मात्र दत्तात्रेय ही या आखडय़ाची प्रमुख देवता आहे. या आखाडय़ाची सुरुवात इ.स. ११४६ ला झाली असावी असे मानले जात असले तरी ती त्या आधी कापालिकांपासून सुरू झाली असावी असे घुर्ये मानतात. (लोरेन्झन) यावरून असे वाटते की, कापालिकांपैकी दत्तात्रेय ही ऐतिहासिक व्यक्ती या आखाडय़ाची प्रमुख झाली असा.

अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ह्या महामंत्राचा अर्थ व फलित

मुळात आपण 'अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त' असे का म्हणतो? तर आपण जेव्हा संकटा मधे असतो आणि इतर सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आपण श्री दत्त महाराजांचे स्मरण करतो. आता दत्त महाराजांचेच् स्मरण का? तर दत्त महाराज स्मर्तृगामी आहे. स्मर्तृगामी म्हणजे काय? तर स्मरण करताच तत्काळ आपल्या मदती साठी धावून येणारे तत्व म्हणजे स्मर्तृगामी. जगात अन्य कुठल्याही तत्वाला स्मर्तृगामी म्हणत नाही. आणि म्हणून दत्त महाराज हे लवकर पावणारे दैवत आहे. काहि जण विचारतील की आम्ही कुणाची सेवा करु? तर याचे उत्तर खुप सोप्पे आहे ज्या देवतेचे स्मरण करताच, तुम्हाला शहारे आले., डोळ्यात अश्रु आले तुमच्या अपूर्णतेला एक प्रकारची पुर्णत्वचि जाणीव झाली तर समजून घ्या की त्या देवतेची आराधना तुम्ही करावी.

दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज एकच आहेत.

श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत किंवा स्वामी चरित्र सारामृत मधे याचा उल्लेख आहेच पण आताच्या काळात् सुद्धा त्याची प्रचिती पदोपदी येते. पण सद्गुरु प. पु. मोरे दादा यांनी एकदा सांगीतले की स्वामी महाराजांना समजून घेण्याआधी दत्त महाराजांना समजून घ्या.
आपल्या सारख्या सामान्य सेवेकऱ्याला ह्या महवाक्यचा अर्थ कळणार नाही पण ज्या प्रमाणे भगवान परशुराम आणि प्रभु श्री रामचन्द्र हे भगवान विष्णु यांचा अवतार असून सुद्धा त्यांचे कार्य क्षेत्र वेगळे होते, कार्यपद्धती वेगळी होती. ज्या प्रमाणे ताक दही लोणी, तूपहे दूधापासून तयार होतात त्या प्रमाणे दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे एकच आहे.

आपण जेव्हा 'अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त' किंवा 'श्री स्वामी समर्थ' म्हणतो आपण तेव्हा दत्त महाराजांचे स्मरण करतो, चिंतन करतो आणि जेव्हा आपण दत्त प्रभूंचे चिंतन करतो तेव्हा कुठलीच चिंता आपल्याला भेड़सावत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने सर्व देवी देवतांच्या सेवेचे फळ मिळते. पावसाचे पाणी सर्व नद्यांद्वारे हे समुद्रात जाऊन् मिळतेत्या प्रमाणे सर्व देवी देवतांची केलेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू होते पितृ दोष असेल, कुंडली मधे दोष असेल, वास्तू दोष असेल, जगातले कुठलीही समस्या महाराजांच्या सेवेने दूर होते. एवढेच नाही प्रपंच्या मधल्या अडचणी दूर करण्यासाठी आत्मिक प्रगति साठी दिवसातून एकदा तरि 'अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त' अंतःकरण पूर्वक म्हणावे.

दत्तमहतीची तीन तोंडे

उच्च आकाश. भूतलावरील व्यवहार आणि वैराग्यदेही वर्तन अशा तिन्ही तोंडांनी, तिन्ही पातळ्यांवर दत्ताची श्रेष्ठता गाजते आहे. त्यांनी चोवीस गुरू केले म्हणतात. थोडक्यात, सृष्टीमध्ये जिथं चांगलं मिळालं, त्याचा दत्तांनी आदर केला. इतरांच्यातले चांगले गुण गुरूपदी मानल्यामुळे, दत्त स्वत:च परमगुरू झाले. तेवढी सोपी युक्ती करून दत्ताची शक्ती कोणीही मिळवू शकतं.

दत्ताने केलेल्या गुरूंची यादी पाहाण्याजोगी आहे. पृथ्वी, पर्वत, वृक्ष, वायु, आकाश, देह, पाणी, अग्नी, सूर्य, कपोत, पतंग, अजगर, समुद्रमाशी, मधमाशी, कुरर, सर्प, पिंगला, कुमारी, मासा, इषुकार, भिंगुरटी, कोळी, कातीण, बालक. जडापासून अजडापर्यंत सूक्ष्मापासून भव्यापर्यंत, जिथं जिथं चांगलं आढळलं, तिथं तिथं दत्तांनी ते आदरणीय मानलं. नीचातल्या थोड्याश्या चांगुलपणालाही त्यांनी 'गुरू' म्हणजे मोठं मानलं, आणि स्वत: लघुत्व पत्करलं. लघुंचेही लघु होण्यामुळे, ते गुरूंचेही गुरू झाले.

 दत्ताचं तिसरं वैभव म्हणजे वर्तनाचं. स्वत:च्या अंगावर लोकांच्या लाजेपुरती लंगोटी, आणि समोरच्या लायक मागणार्‍याला, लंगोटीपासून थेट लक्षाधीश, कोट्याधीश यापर्यंत हवं ते मिळणार. स्वत:ला काहीच नको, याचं अक्षरश: मूर्तीमंत प्रतीक म्हणजे दत्त. अंगावर लंगोटीशिवाय चिरगुटही नाही. अशा निरिच्छपणानं इतरांची न्याय्य इच्छापूर्ती करता न येईल, तरच आश्चर्य. म्हणजेच त्रिमुखी दत्ताच्या पहिल्या दोन महामुखाएवढं, वर्तनाचं हे तिसरं महामुख महत्वाचं आहे, दत्ताजवळ मागणार्‍यानं एकच विवेक ठेवावा, की "दत्त" म्हणजे देणारा. त्याचा भक्त अनुचर, म्हणजे त्याच्यासारखा चालणारा म्हणजे देणारा, हाच खरा दत्तभक्त होऊ शकतो. देण्याचे पथ्य हा दत्तकृपेचा महामंत्र आहे. कोणीही अनुभव घेऊन पाहाण्याजोगा.

महासिद्ध  श्री दत्तात्रेय यंत्र
महासिद्ध  श्री दत्तात्रेय यंत्र

श्री गुरू दत्तात्रय, उद्भव आणि उगम

श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे, असे मानले जाते. त्या मुळे त्यांचा नेमका असा कालावधि सांगणे कठिन आहे' या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू . संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे. दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे.

खरा दत्तभक्त, एक मार्गदर्शक तत्व!

उच्च आकाश. भूतलावरील व्यवहार आणि वैराग्यदेही वर्तन अशा तिन्ही तोंडांनी, तिन्ही पातळ्यांवर दत्ताची श्रेष्ठता गाजते आहे. त्यांनी चोवीस गुरू केले म्हणतात. थोडक्यात, सृष्टीमध्ये जिथं चांगलं मिळालं, त्याचा दत्तांनी आदर केला. इतरांच्यातले चांगले गुण गुरूपदी मानल्यामुळे, दत्त स्वत:च परमगुरू झाले. तेवढी सोपी युक्ती करून दत्ताची शक्ती कोणीही मिळवू शकतं. दत्ताने केलेल्या गुरूंची यादी पाहाण्याजोगी आहे. पृथ्वी, पर्वत, वृक्ष, वायु, आकाश, देह, पाणी, अग्नी, सूर्य, कपोत, पतंग, अजगर, समुद्रमाशी, मधमाशी, कुरर, सर्प, पिंगला, कुमारी, मासा, इषुकार, भिंगुरटी, कोळी, कातीण, बालक. जडापासून अजडापर्यंत सूक्ष्मापासून भव्यापर्यंत, जिथं जिथं चांगलं आढळलं, तिथं तिथं दत्तांनी ते आदरणीय मानलं. नीचातल्या थोड्याश्या चांगुलपणालाही त्यांनी 'गुरू' म्हणजे मोठं मानलं, आणि स्वत: लघुत्व पत्करलं. लघुंचेही लघु होण्यामुळे, ते गुरूंचेही गुरू झाले. दत्ताचं तिसरं वैभव म्हणजे वर्तनाचं. स्वत:च्या अंगावर लोकांच्या लाजेपुरती लंगोटी, आणि समोरच्या लायक मागणार्‍याला, लंगोटीपासून थेट लक्षाधीश, कोट्याधीश यापर्यंत हवं ते मिळणार. स्वत:ला काहीच नको, याचं अक्षरश: मूर्तीमंत प्रतीक म्हणजे दत्त. अंगावर लंगोटीशिवाय चिरगुटही नाही. अशा निरिच्छपणानं इतरांची न्याय्य इच्छापूर्ती करता न येईल, तरच आश्चर्य. म्हणजेच त्रिमुखी दत्ताच्या पहिल्या दोन महामुखाएवढं, वर्तनाचं हे तिसरं महामुख महत्वाचं आहे, दत्ताजवळ मागणार्‍यानं एकच विवेक ठेवावा, की दत्त म्हणजे देणारा. त्याचा भक्त अनुचर, म्हणजे त्याच्यासारखा चालणारा म्हणजे देणारा, हाच खरा दत्तभक्त होऊ शकतो. देण्याचे पथ्य हा दत्तकृपेचा महामंत्र आहे. कोणीही अनुभव घेऊन पाहाण्याजोगा आहे

श्रीदत्त अथर्वशीर्ष

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय अवधूताय दिगम्बरायविधिहरिहराय आदितत्त्वाय आदिशक्तये ॥ १॥
त्वं चराचरात्मकः सर्वव्यापी सर्वसाक्षी त्वं दिक्कालातीतः त्वं द्वन्द्वातीतः ॥ २॥
त्वं विश्वात्मकः त्वं विश्वाधारः विश्वेशः विश्वनाथः त्वं विश्वनाटकसूत्रधारः त्वमेव केवलं कर्तासि त्वं अकर्तासि च नित्यम् ॥ ३॥
त्वं आनन्दमयः ध्यानगम्यः त्वं आत्मानन्दः त्वं परमानन्दः त्वं सच्चिदानन्दः
त्वमेव चैतन्यः चैतन्यदत्तात्रेयः ॐ चैतन्यदत्तात्रेयाय नमः ॥ ४॥
त्वं भक्तवत्सलः भक्ततारकः भक्तरक्षकः दयाघनः भजनप्रियः त्वं पतितपावनः करुणाकरः भवभयहरः ॥ ५॥
त्वं भक्तकारणसम्भूतः अत्रिसुतः अनसूयात्मजः त्वं श्रीपादश्रीवल्लभः त्वं गाणगग्रामनिवासी श्रीमन्नृसिंहसरस्वती त्वं श्रीनृसिंहभानः अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थः त्वं करवीरनिवासी परमसद्गुरु श्रीकृष्णसरस्वती त्वं श्रीसद्गुरु माधवसरस्वती ॥ ६॥
त्वं स्मर्तृगामी श्रीगुरूदत्तः शरणागतोऽस्मि त्वाम् । दीने आर्ते मयि दयां कुरु तव एकमात्रदृष्टिक्षेपः दुरितक्षयकारकः ।
हे भगवन्, वरददत्तात्रेय, मामुद्धर, मामुद्धर, मामुद्धर इति प्रार्थयामि । ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ७॥
॥ ॐ दिगम्बराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् ॥

श्री दत्तात्रय दैवत व दत्तपादुका

हे शिव आणि शक्ति यांचे प्रतीक असतात अन् नमस्कार करतांना त्रास होऊ नये; म्हणून पादुकांच्या खूंटयांवर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करणे.
'डावी पादुका ही शिवस्वरुप आणि उजवी पादुका ही शक्तिस्वरुप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ति आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ति होय. पादुकांच्या अंगठयातून (पादुकांच्या खूंट्या) आवश्यकते प्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ति बाहेर पडत असते. ज्या वेळी आपण पादुकांच्या अंगठयावर डोके टेकवून नमस्कार करतो, त्या वेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ति न पेलवल्याने त्रास होऊ शकतो यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठयावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर (जेथे संतांच्या पायांची बोटे येतात), तेथे टेकवावे.
श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्व आहे.
श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त संप्रदायात गुरूपेक्षा गुरु चरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त पंथीयात श्रीगुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्व आहे. श्रीगुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर भाव दर्शविला होता.
अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्ती विषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की, श्रेष्ठ सत्पुरुषांची सर्व दैवी शक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण-स्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तांत संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानांत दत्त मूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे.
गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे. नृसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजा केली जाते. देवगिरीवर जनार्दनस्वामींच्या समाधी स्थानी पादुकाच आहेत.
विष्णूचा जसा शाळीग्राम तसे दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्वाचे स्थान आहे. या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच 'मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥' असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते.

श्रीपाद प्रभूंचे चिदम्बर रहस्य

श्रीपाद प्रभूंच्या वाम भागात शक्तीसंचार असतो आणि उजव्या भागात शिवसंचार असतो. या कारणाने ते शिवशक्ती स्वरूप आहेत. त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा निवास असतो. ह्र्दय हे दयेचे तसेच अनाहत चक्राचे स्थान आहे. येथून शक्ती ऊर्ध्वचक्राकडे तसेच अधोचक्राकडे म्हणजे मूलाधार चक्राकडे प्रवाहित होते. या कारणानेच ते अजून एका दिव्य चैतन्यमय शरीराने श्रीपद्मावती आणि श्री वेंकटेश स्वामी स्वरूपात आहेत. श्रीपाद प्रभू वाणी हिरण्यगर्भाचे सुद्धा स्वरूप आहेत. परा, पश्यन्ति, मध्यमा, आणि वैखरी स्वरूपी वाणी देवीचा त्यांच्या जिभेवर वास असतो. वाणी मातेचे दिव्यमानस आणि हिरण्यगर्भाचे दिव्य मानस हे अव्दैत स्थितीत असते. वास्तविक पहाता चिदम्बर रहस्य म्हणजे, ते तीन प्रकारचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करतात. त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याही दृष्टीने पाहिल्यास स्पर्श नसतो. ते वाणी हिरण्यगर्भाचे चैतन्य शरीर, शिव-पार्वतीचे चैतन्य शरीर, पद्मावती-वेंकटशाचे चैतन्य शरीर याना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अतीत, श्रीपाद श्रीवल्लभ असे आणखी एक दिव्य शरीर धारण करतात. याचे वैशिष्टय असे की एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो. हीच प्रभूंची योगमाया, वैष्णवीमाया आणि हेच त्यांचे चिदम्बर रहस्य. श्रीपादाना व्दैत, विशिष्ठ अव्दैत, अव्दैत आणि या सर्वांचे अतीत असे म्हटले तरी योग्यच होईल कारण योगमाया अगाध आहे.

श्री दत्तात्रय कवच स्तोत्र

मराठी अनुवाद- प. पू. वेदमूर्ती जेरें शास्त्री.                                                              

श्रीमद प. प. वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांच्या अनेक श्रीदत्तात्रेयांच्या स्तोत्रांपैकी श्री दत्तात्रेयकवच हे एक सुंदर स्तोत्र आहे. एका मधुर तालात श्रीगुरूंनी हे रचिले आहे.

श्रीदत्तात्रेय कवचम्

श्रीपादः पातु मे पादावूरु सिद्धासनस्थितः । पायाद्दिगंबरो गुह्यं नृहरिः पातु मे कटिं ॥ १ ॥

श्री म्हणजे लक्ष्मी ज्याच्या पायाचा आश्रय निरन्तर करुन राहते तो श्रीपाद दत्तात्रय माझ्या पायांचे रक्षण करो. सिद्धासनस्थ असलेला दत्त माझ्या मांड्यांचे रक्षण करो. दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असा दत्तात्रेय माझ्या गुद व जननेंद्रिय यांचे रक्षण करो. माझ्या कंबरेचे रक्षण नृहरि दत्तात्रेय करो.

नाभिं पातु जगतस्त्रष्टोदरं पातु दलोदरः । कृपालुः पातु हृदयं षड्भुजः पातु मे भुजौ ॥ २ ॥

सर्व जगाला निर्माण करणारा म्हणजे ब्रह्मदेव हे रुप धारण करणारा दत्तात्रेय माझ्या नाभीचे रक्षण करो. पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ उदर असलेला दत्तात्रेय माझ्या उदराचे रक्षण करो. कृपाळू दत्तात्रेय माझ्या हृदयाचे रक्षण करो. सहाभुजा असलेला दत्तात्रेय माझ्या भुजांचे रक्षण करो.

स्त्रक्कुंडी-शूल-डमरु शंख-चक्र-धरः करान् । पातु कंठं कंबुकंठः सुमुखः पातु मे मुखम् ॥ ३ ॥

माला, कमंडलु, त्रिशूल, डमरु, शंख व चक्र धारण करणारे दत्तात्रेय माझ्या हातांचे रक्षण करोत. कंबू म्हणजे शंख त्याच्याप्रमाणे ज्यांचा कंठ आहे असे दत्तात्रेय माझ्या कंठाचे रक्षण करोत. सुंदर मुख असलेले दत्तात्रेय माझ्या मुखाचे रक्षण करोत.

जिह्वां मे वेदवाक् पातु नेत्रे मे पातु मे दिव्यदृक् । नासिकां पातु गंधात्मा पातु पुण्यश्रवाः श्रुती ॥ ४ ॥

सर्व वेद ज्या विराटस्वरुप दत्तात्रेयाचे वागिंद्रिय आहे असे दत्तात्रेय माझ्या जिभेचे रक्षण करोत. ज्यांची दृष्टी दिव्य आहे असे दत्तात्रेय माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करोत. ज्यांचे शरीर सर्वदा व स्वभावतःच सुगंधी आहे आणि जे गंधरुप आहेत असे दत्तात्रेय माझ्या नाकाचे रक्षण करोत. ज्याच्या स्वरुपाचे व गुणांचे श्रवण पुण्यकारक आहे असे दत्तात्रेय माझ्या कानांचे रक्षण करोत.

ललाटं पातु हंसात्मा शिरः पातु जटाधरः । कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥ ५ ॥

हंसरुप दत्तात्रेय माझ्या ललाटाचे रक्षण करोत. जटा धारण करणारे दत्तात्रेय माझ्या मस्तकाचे रक्षण करोत. सर्वांचा ईश असलेला दत्तात्रेय माझ्या वाणी,जननेन्द्रिय, गुद, हात व पाय अशा पांच कर्मे्द्रियांचे रक्षण करो. ज्याला जन्म नाही असा म्हणजे जन्मानंतरचे विकार नसलेला दत्त डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा या पांच ज्ञानेद्रियांचे रक्षण करो.

सर्वान्तरोन्तः करणं प्राणान्मे पातु योगिराट् । उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ॥ ६ ॥

सर्वांच्या आंत राहणारा दत्त माझ्या अंतःकरणाचे रक्षण करो. सर्व योग्यांचा राजा माझ्या प्राणापानादि दशवायूंचे रक्षण करो. वरती, खाली, पाठीमागे, डाव्या उजव्या दोन्ही बाजूंना व पुढच्या बाजूला अशा दश दिशांना दत्तात्रेय माझे रक्षण करोत.

अन्तर्बहिश्च मां नित्यं नानारुप धरोऽवतु । वर्जितं कवचेनाव्यात्स्थानं मे दिव्यदर्शनः ॥ ७ ॥

नानारुप धारण करणारा दत्त आत-बाहेर म्हणजे घराच्या किंवा शरीराच्या आत व बाहेर माझे रक्षण करो. ज्या स्थानांना कवच लागले नाही त्या स्थानांचेही दिव्यदृष्टी असणारा दत्तात्रेय रक्षण करो.

राजतः शत्रुतो हिंस्त्राद्दुष्प्रयोगादितोऽघतः । आधि-व्याधि-भयार्तिभ्यो दत्तात्रेयः सदावतु ॥ ८ ॥

राजापासून, शत्रूपासून, हिंस्त्र प्राण्यांपासून जारण-मारणापासून दुष्ट प्रयोगांपासून, पापांपासून, मानसिक व्यथेपासून, शारीरिक व्यथेपासून तसेच इतर भयांपासून व पीडांपासून गुरु दत्तात्रेय माझे सदा रक्षण करोत.

धन-धान्य-गृह-क्षेत्र-स्त्री-पुत्र-पशु-किंकरान् । ज्ञातींश्च पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः ॥ ९ ॥

माझ्या पैशाचे, धान्याचे, घराचे, शेताचे, स्त्रीचे, मुलांचे, पशुंचेसेवकांचे व इतर सर्व कुटुंबाचे अनसुयेचा आनंद वाढविणार्या मुलाने म्हणजेच श्रीदत्तात्रेयाने रक्षण करावे.

बालोन्मत्त पिशाचाभोद्युनिट्संधिषु पातु माम् । भूत-भौतिक-मृत्युभ्यो हरिः पातु दिगंबरः ॥ १० ॥

केंव्हां केव्हां लहान मुलासारखा वागणारा केंव्हां केव्हां उन्मत्त होणारा श्रीगुरुदेव दत्त दिवसा, रात्री व दिवसरात्रीच्या संधीत पंचमहाभूते व त्यापासून उत्पन्न झालेल्या पदार्थापासून व मृत्यु पासून माझे रक्षण करो.

य एतद्दत्तकवचं संनह्याद्भक्तिभावितः । सर्वानर्थविनिर्मुक्तो ग्रहपीडाविवर्जितः ॥ ११ ॥

हे दत्तकवच जो कोणी भक्तीने युक्त होऊन जपेल व पाठ करेल तो सर्व अनर्थांतून मुक्त होईल. तसेच सर्व ग्रहांच्या पीडेपासून मुक्त होईल.

भूतप्रेतपिशाचद्यैर्देवैरप्यपराजितः । भुक्त्वात्र दिव्य भोगान् स देहांतेतत्पदंव्रजेत् ॥ १२ ॥

भूत, प्रेत व पिशाच्च यांचे हे कवचधारण करणारापुढें काहीही चालणार नाही. देवसुद्धा त्याला पराजित करु शकणार नाहीत. या लोकांत स्वर्गांत असलेल्या सुखांप्रमाणे सर्व सुखे मिळतील. देहान्ती कवच जपणारा दत्तस्वरुपास प्राप्त होईल.

॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीदत्तात्रेय कवचं संपूर्णम् ॥

अशारीतीने हे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीनीं रचिलेले श्रीदत्तात्रेय कवच संपूर्ण झाले.

श्री  दत्तात्रेय. दैवताची काही असाधारण वैशिष्ठे

१. दत्त या देवतेकडून जिवाला अधिक प्रमाणात सात्त्विक शक्ती मिळत असल्याने त्याच्या आधारे जीव वाईट शक्तींशी लढू शकतो.
२. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्ती मिळते.
३. दररोज किमान १५ ते २० मिनिटे एकाग्र चित्ताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्तींचा त्रास अल्प होतो.
४. पूर्वजांना गती मिळते आणि त्यामुळे घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते. 

लिंगदेहाला गती देण्याच्या संदर्भात दत्ताच्या नामजपाचे होणारे फायदे

१. पूर्वजांना गती देणारी देवता दत्त आहे. दत्ताचा नामजप केल्याने नामजपातून प्रक्षेपित होणार्या आघातजन्य तेजोमय लहरींमुळे लिंगदेहाभोवती असलेल्या वासनात्मक लहरींची कार्य करण्याची तीव्रता अल्प होऊन त्यातील रज-तम नष्ट होऊ लागल्याने लिंगदेहाचे जडत्व अल्प होऊन त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते.
२. लिंगदेह आणि त्याच्या प्रत्यक्ष देहाभोवती संरक्षककवच निर्माण होते. यामुळे त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.
३. पृथ्वीवरील वासनात्मक आसक्तीही अल्प होण्यास साहाय्य झाल्याने त्याला अल्प वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाता येणे शक्य होते.
४. दत्ताचा नामजप केल्याने वायूमंडलात चैतन्य कणांची निर्मिती होऊन त्याचा लिंगदेहाला फायदा होतोच.
५. नामजप करणार्या इतर जिवांचेही दूषित झालेल्या वायूमंडलातील त्रासदायक लहरींपासून रक्षण होते.

पूर्वजांच्या त्रासांच्या निवारणार्थ दत्तोपासना

दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या सगुण रुपांचे प्रत्यक्ष एकत्व!
विवाह न होणे, विवाह झाल्यास पती-पत्नींचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्ये बालपणातच मृत्यूमुखी पडणे वगैरे त्रास असलेले समाजात आपल्याला दिसतात. या गोष्टी पूर्वजांच्या त्रासामुळे होतात. दारिद्र्य, शारीरिक आजार यामागेही पूर्वजांचे त्रास असू शकतात. मात्र आपल्याला पूर्वजांचा त्रास आहे किंवा नाही, हे केवळ उन्नतच सांगू शकतात.

हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धपक्ष वगैरे करत नाहीत. तसेच साधनाही करत नाहीत. त्यामुळे बहुतेकांना पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो. मात्र तो त्रास आहे किंवा नाही, हे सांगणारे उन्नत न भेटल्यास येथे दिलेले काही तर्हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे समजून साधना करावी.

समंधबाधा दूर होण्यासाठी दत्तोपासना 

समंधबाधांना (वेगवेगळया पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणार्यांना) ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्त होत नसल्याने (कोणत्याही योनीची प्राप्ती होत नसल्याने) त्यांना पाताळवास प्राप्त होतो. पाताळवासात पोहोचण्यापूर्वी त्याच्या कर्मगतीचा प्रवास त्याला भुवलोकात राहून पूर्ण करावा लागतो, उदा. जसे हलक्या वजनाच्या थोड्या बिया (मिरची, तुळस, सब्जा वगैरे) किंवा थोडे वाळूचे बारीक कण भरून फुगवून हवेत सोडलेला फुगा आतील बियांसहित किंवा वाळूच्या कणांसहित हवेत तरंगतो.

त्याची शक्ती क्षीण होऊन तो फुटल्यानंतर त्यातील बिया आणि कण यांसहित फुग्याचे जे व्रतडे हवेत वर तरंगत होते किंवा विहार करत होते ते आतील दाण्यांसहित खाली येते. याप्रकारेच भुवलोकातील कर्मगती संपल्यानंतर उरलेले तम (कातडे) त्याच्या तमाच्या वजनानुसार त्याला प्राप्त झालेल्या लोकात स्थीर होते. मात्र प्राप्त कर्मगती असेपर्यंत भुवलोकातील समंधबाधा इतर वाईट शक्तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाइकांना प्रचंड प्रमाणात त्रास देत राहतात. अशा प्रकारे समंधबाधांमुळे साधकांना साधना करण्यात प्रचंड अडथळे निर्माण होतात. दत्ताच्या नित्य उपासनेने अशा समंधबाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्तमहाराज आपल्यातील योगसामर्थ्याने सातत्याने आपल्या ताब्यात ठेवून साधनामार्गातील अडथळे दूर करतात.

श्री दत्तात्रेयांच्या स्वरूपांची बाबतची माहिती

(दक्षिणांग) आदिगुरू
१ सुदर्शनचक्र - ज्ञानशास्त्र
२ डमरु - शब्दशास्त्र
३ माला - मंत्रशास्त्र.

(वामांग) ईश्वर
१ शंख - धर्मशास्त्र
२ त्रिशूळ - आचारव्यवहार प्रायश्चित्त शास्त्र
३ कमंडलु - जीवनकर्म जीवन.

एवमीश्वरभागो यं जगत्स्थित्यै परेशितु:  |
तथान्य गुरुभागश्च माया भ्रमनिवर्तक:  ||

अर्थ- श्री दत्तात्रेयांच्या एकाच शरीरात दोन स्वरूपांची कल्पना केलेली आहे. त्यांचे उजवे अंग हे आदिगुरुस्वरूप असून, ते मायाभ्रमाचे निवर्तक आहे  व डावे अंग हे जगाची सुस्थिति चालवणारे ईश्वरस्वरूप आहे. श्रीगुरू टेंबे स्वामी महाराज हा असा खुलासा करतात,  स्वभक्तांवर अनुग्रह करण्याकरिता प्रभूंनी यथानुक्रम चक्रादिक आयुधे धारण केली आहेत.

सिद्ध मंत्र 

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

भक्तकाम कल्पद्रुम भगवान दत्तात्रय 

शरणागत वत्सल अशी दत्त महाराजांची ख्याती आहे, जो मला अनन्य भावाने शरण येईल त्याला मी सहाय्य करेन. आता दत्त महाराजाना शरण येणाऱ्यात भक्त मंडळी तर कायम होती, आहेत आणि भविष्यातही असतील पण अभक्ताने जर शरण येऊन प्रार्थना केली तर? भक्त हा प्रीतीने अर्थात प्रेमाने प्रार्थना करतो पण त्याच बरोबर द्वेष अथवा भीतीने एखाद्या अभक्ताने प्रार्थना केली तरी दत्त महाराज कृपा करतातच. कैक उदाहरणे यास्तव देता येतील. गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायात वल्लभेश ब्राह्मणाला तीन चोर मारावयास येतात, तात्काळ श्रीपाद श्रीवल्लभ रुपी दत्त महाराज प्रकट होऊन त्यातील दोन चोरांना ठार करतात पण तितक्यात तिसरा चोर पाया पडून मारू नका असे विनवतो. हि विनवणी किंवा प्रार्थना भीतीने केली आहे, मारू नका. आता शरण आला म्हटल्यावर महाराजांनी नाही मारलं त्याला. पुढे दोन मदोन्मत्त ब्राह्मण जयपत्र घेण्यासाठी वाद विवाद करायला येतात. एका साधारण अशा माणसाने सात रेषा ओलांडताच तो विद्वान होतो आणि वाद करायला सिद्ध होतो हे पाहून त्या दोघा ब्राह्मणांची मती गुंग होते. आता यातून शरण जाण्याखेरीज दुसरा मार्ग नाही हे पा हून ते तात्काळ महाराजांना शरण येतात आणि गुरुमहाराज केवळ बारा वर्षांच्या शिक्षेवर त्यांची मुक्तता करतात. कोल्हापूरचा विप्र पुत्र असाच जीभ कापलेल्या अवस्थेत शरण येतो, त्याला कुठे दत्त महाराज ठाऊक असतात? पण शरण आला म्हटल्यावर उद्धार निश्चित आहे. केवळ गुरुचरित्रात नव्हे तर आपल्या आयुष्यात देखील कैक उदाहरणे अशी पाहण्यात येतात. शेवटी मला तारा म्हणून हात जोडले आणि घेतलं सांभाळून महाराजानी मात्र यात दत्त महाराज एका अटीवर उद्धाराचे वचन देत आहेत आणि ती अट म्हणजे विश्वास किंवा श्रद्धा!

रामदास स्वामीना श्री दत्तात्रयांचे दर्शन

एकदा रामदास समर्थ मातापुरी गेले. तेथे देवीचे दर्शन घेऊन, श्रीदत्तात्रयांचे स्थान आहे, तेथे ते गेले.तोच अनुष्ठान करीत बसलेले दहापाच ब्राह्मण दिसले. त्यांस विचारले की, 'तुम्ही येथे का बसला?' तेव्हा त्यांनी उत्तर केले की, "श्रीदत्तात्रयांच्या दर्शनाकरिता अनुष्ठान करीत आहोत." ते ऐकून समर्थ बोलले की, "उत्तम आहे. तुमच्या समागमे आम्हांसही दर्शन घडेल." असे म्हणून आपणही तेथे बसले. एक मुहूर्तानंतर श्रीदत्तात्रयांनी मलंग फकिरचा वेष धारण केला व एक बायको, तीन मुले, पंचवीस कोंबडी, सहा बकरी, एक रेडा, यांसह देवालयाजवळ आले आणि चांगली जागा पाहून स्त्रीयेला बोलले की, "यहा खाना खानेका इरादा हैं। इस वास्ते हंडी पकाना।' असे म्हणताच त्या स्त्रीने रेड्यावरून ओझे उतरवले. तीने चूल मांडून तिजवर एक घागर पाणी मावण्याइतकी हंडी चढवली. तिने विचारले, "हंडीमे क्या डालना?" तेव्हा फकीर बोलला की,"मुर्गी काटके डाल।" असे म्हणताच तिने पंचवीस कोंबडी होती ती कापून हंडीमध्ये टाकली. तथापि हंडी रिकामी पाहून त्या मलंग स्त्रीने सांगितले की, "हंडी भरी नही।" असे म्हणतात मलंग फकीर म्हणाला, "छोरे काटकर डालो।" हे ऐकून तिने तिन्ही मुले कापून हंडीत घातली आणी म्हणाली, "अबतक हंडी भरी नही।" असे बोलताच त्याने सांगितले," बकरिया काटकर डाल ।" ह्याप्रमाणे बकरीही कापून हंडीत घातली व पुनःबोलली," इससे भी हंडी भरी नहीं।" तेव्हा त्याने पुनःसांगितले की," रेडा काटकर डाल।" असे बोलताच तिने रेडा कापून हंडीत घातला. परंतु हंडी भरली नाही, असे बायकोने सांगितले. तेव्हा फकीर बोलला की, "इन बमनोको काटकर डालो।" असे म्हणताच बाई सूरी घेऊन ब्राह्मणांकडे धावली. ब्राम्हणांनी पूर्वीचे तिचे सर्व कृत्य पाहिल्यामुळे ही आपणास कापील खरी, असा निश्चय करून आसन जपविधी, माळा, व गोमुखी वगैरे अवघे टाकून ते सर्व पळाले. रामदासस्वामी आणि कल्याण व उद्धव हे दोघे राहिले. हे पाहून बाई फकिरास म्हणाली की," सब बम्मन भाग गये ।" फकीर बोलला, "अच्छा, बहुत बेहत्तर हुआ। हंडी भरी नही, इस वास्ते जो एक बैठा हैं और दो खडे हैं, उनको काटकर डालो।" ते ऐकून 'जी हुकून' म्हणून बाई हाती सूरी घेऊन हसतच कापायला आली हे पाहून समर्थानी हास्यवदन होऊन मान पुढे केली. असे पाहून त्यांच्याकडे न जाता बाई प्रथम कल्याण व उद्धव यांच्याकडे गेली. त्या समयी त्यांनीही मान पुढे केली.

हे दत्तात्रयांनी पाहिले. प्रसन्न होऊन त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले. हंडी, बाई वगैरे सर्व गुप्त झाले. तेव्हा'रामदासा, आंत ये असा शब्द मंदिरातून आला. त्या समयी स्वामींनी आंत जाऊन साष्टांग नमस्कार केला. तेव्हा श्रीदत्तात्रयमहाराजांनी मस्तकी हात ठेवून समर्थांस उठवले. स्वामींनी श्रीदत्तांची पूजा करून बहुत प्रकारे स्तवन केले. तेणेंकरून श्रीदत्तात्रयस्वामींस बहुत संतोष झाला व त्यांनी समर्थांस विचारले कीं, "श्रींची आज्ञा तुम्हास आहे, त्याप्रमाणे करतां कीं नाहीं?" समर्थ बोलले "श्रींची जी आज्ञा तीच आपली आज्ञा. त्याप्रमाणे सर्व करीत आहे." तेव्हा श्रीदत्तात्रेय बोलले की, "तुम्ही येऊन दर्शन घेऊन जावे, ते न करता ब्राह्मणांजवळ बसण्याचें कारण काय?" समर्थ उत्तरले, "गरीब ब्राम्हण दर्शनाकरितां बसले होते. त्यांची इच्छा पूर्ण होईल म्हणून मीही त्यांच्याजवळ बसलों होतों. पुढें पाहतों तों आपण प्रत्यक्ष येऊन दर्शन न देतां उलट भय दाखवून सर्व ब्राह्मणांस पळविलें. हें स्वामींस योग्य कीं अयोग्य?" ते ऐकून दत्तात्रयांनी हास्य करून उत्तर दिलें की, "अनअधिकारी ब्राम्हण दर्शनास योग्य नव्हेत, म्हणून त्यांस भय दाखविलें. तुमच्या समागमे उद्धव कल्याण होते. त्यांस भय कां प्राप्त झाले नाही? तस्मात माझ्या दर्शनास अधिकारी पाहिजेत." अशी आज्ञा होताच स्वामींनी पुन्हा विनंती केली कीं," ब्राम्हणांस दर्शन दिलें पाहिजे." तेव्हा श्रीदत्तांनी सांगितले कीं, "तू त्यांना अधिकारी कर, म्हणजे दर्शन देऊं." त्यानंतर दत्तात्रय अदृश्य झाले.

नंतर स्वामींनी उद्धवास सर्व ब्राह्मणांस बोलवायला पाठवले. तेंथे इतर मंडळी होती, त्यांनाहि कल्याणच्या हाती बोलावून आणले आणि स्वयंपाकास प्रारंभ करविला, ब्राम्हण अर्धा कोस अंतरावर गेले होते. त्यांना उद्धव गोसावी यांनी माघारी आणले. उध्दवमुखाने समर्थांचे सविस्तर चरित्र ऐकल्यावर "आम्ही दुर्दैवी आहोंत. स्वामी, आपण समर्थ आहांत, हें न कळतां गेलों. आतां श्रीदत्तात्रय आपणच आहांत. तरी आम्हांवर कृपा करावी." अशी त्या ब्राम्हणांनी विनंती केली. हे पाहून स्वामींनी ब्राम्हणांस दयापूर्वक मंत्रानुग्रह दिला. नंतर श्रीदत्तात्रयमहाराज यांचे स्मरण करतांच पायीं पादुका, हातीं दंडक मंडलू अशी त्रिगुणात्मक मूर्ती पुढें उभी राहिली. त्या वेळीं ब्राम्हणांस व आपल्या शिष्यमंडळीसहि श्रीदत्तांचे दर्शन घडवले. समर्थांच्या हातून पूजा करवून नैवेद्य समर्पण केला व नंतर समर्थानी' विधी हरी हर सुंदर दिगंबर झाले' ही दत्तात्रयांची आरती केली.