श्री दत्तमंदिर, कसबे डिग्रज

स्थान: सांगली पासून ८ कि. मी. अंतरावर कसबे डिग्रज गाव
सत्पुरूष: गोविंदभट्ट सावळंभट्ट जोशी
विशेष: श्री गुरूंचे स्वप्न दृष्टांतानुसार श्री पादुकांची स्थापना

सांगली शहरानजीक ८ किलो मीटर अंतरावर उत्तर बाजूस कसबे डिग्रज हे ८००० वस्तीचे गाव आहे.

डिग्रज येथे सन १८३० ते १९२० पावेतो कै. ती. गोविंदभट्ट सावळंभट्ट जोशी या नावाचे वेदान्तामध्ये निष्णात, उत्तम ज्योतिषी, सदाचारसंपन्न श्रीदत्तभक्त होऊन गेले. त्यांनीच आपल्या गावी श्रीदत्तात्रेयांचे मंदिर बांधून श्रींच्या पादुकांची स्थापना सन १८७५च्या सुमारास केली.

जोशी हे प्रत्येक शनिवारी व पौर्णिमेस श्रीक्षेत्रऔदुंबरी श्रीदत्तप्रभूंच्या दर्शनास जाऊन तेथे स्नान पूजा-वगैरे यथासांग करून परत सायंकाळी गावी येत असत. असा हा त्यांचा कार्यक्रम अव्याहत १२-१५ वर्षे चालला होता. काही कालाने त्यांना वृद्धापकाळ येऊ लागल्याने ती सेवा त्यांना करता येईना. त्यांनी आपल्या कडक उपासनेने व सेवेने श्रीदत्तगुरूंना प्रसन्न करून घेतलेच होते. आता श्रीदत्तप्रभूंनीच त्यांना औदुंबरास न येता तुझेच (डिग्रज) गावी माझ्या पादुकांची स्थापना करून सेवा चालू ठेव, असा दृष्टांत व साक्षात्कारही दाखविला. श्रींची ही आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी आपल्या (डिग्रज) गावी श्रीमारुतीच्या देवालयानजीक पश्र्चिम बाजूस लहानसेच मंदिर बांधून श्रींच्या पादुकांची स्थापना केली.

श्रींची नित्य नैमित्तिक पूजाअर्चा, नैवेद्य, आरती, प्रत्येक पौर्णिमेस पालखीची सेवा आणि श्रींचे मुख्यत्वेकरून असलेले गुरुपौर्णिमा, गुरुद्वादशी, श्रीदत्तजयंती, गुरुप्रतिपदा वगैरे उत्सव मोठ्या श्रद्धेने सुरू केले. आज दत्ताची सेवा गोविंदभट्टजींच्या घराण्यातच आहे.