श्री क्षेत्र दत्ताश्रम जालना

श्री क्षेत्र दत्ताश्रम - जालना
श्री क्षेत्र दत्ताश्रम

स्थान: दत्ताश्रम जालना जिल्हा 
सत्पुरुष: सौ. प. पू. ताईमहाराज काजळेकर (चाटुपळे)
विशेष: राममंदीर, श्री. दत्तपादूका संतधाम, श्री शिव मंदीर

श्री दत्तधाम  स्थापनेची पार्श्वभुमी 

महाराष्ट्राला संतभूमी असे मानले जाते. या पूण्यभूमीत अनेक साधू, सत्पुरुष जन्माला आले. त्यांनी समाजाला विविध धर्म व संप्रदायांमार्फत आध्यात्मिक व सामाजिक उन्नतीचे मार्गदर्शन केले. दत्तसंप्रदाय, नाथसंप्रदाय, रामदासी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय इ. त्यांनी एकमेकांच्या ईश्वर प्राप्तीच्या कल्पनांचा आदर करीत आत्मिक व सामाजीक उन्नती घडवून आणण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. समाज प्रबोधन व अध्यात्मिक प्र्गती यांची उत्तम सांगड यांनी घातली. 

महाराष्ट्रातील मराठवाड्यात सौ. ताई महाराज काजळेकर यांनी दत्ताश्रमाच्या रूपाने अशा अनेक संप्रदाय, पंथ व परंपरा यांचा सुरेख मिलाप साधलेला आढळतो. दत्ताश्रमात राघवधाम (श्री रामलक्ष्मण व सितामाई यांचे मंदीर), संतधाम (श्री धुंडीराज शास्त्री कविश्वर, श्री दत्तमहाराज कविश्वर व श्री ज्ञानदेव दत्तात्रेय काजळेकर महाराज यांचे फोटो) श्री पादुका मंदीर (श्रीगुरुच्या पादुका) श्री महादेवांचे अभिरामेश्वर मंदीर अशी मंदीरे आहेत. ही सर्व मंदिरे पाहिल्यानंतर परमेश्वराच्या एकत्त्वाची साक्ष मिळते.

राघवधाम (श्री रामलक्ष्मण व सितामाई यांचे मंदीर)
राघवधाम (श्री रामलक्ष्मण व सितामाई यांचे मंदीर)

अध्यात्मात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले गेले ते म्हणजे नामस्मरण व अन्नदान. या दोनीही गोष्टी दत्ताश्रमात विशेषत्वाने सर्वोच्च मानल्या जातात. या आश्रमातील वातावरण अत्यंत पवित्र व परिसर नयन मनोहर आहे. या मंदीरात पहाटे होणाऱ्या काकड आरतीपासून सर्व मंदीरातील होणारी नित्यपुजा उपासना हे मंदीराचे वेगळेपण दाखवते. या दत्ताश्रमात संतांच्या जन्मतिथी, पुण्यतिथी, नामस्मरण सप्ताह, विशेष उत्सवाच्या निमित्ताने प्रभातफेरी यज्ञयाग, गोसेवा तसेच एकादशी वारी हे सर्व सण समारंभ व उत्सव फार शुचीता, प्रेम व उत्साहात पार पाडले जातात. येणाऱ्या प्रत्येक भक्ताची अध्यात्मीक उन्नती होऊन मनुष्याच्या जीवनाची कृतार्थता साधते.  

श्री दत्ताश्रमाची स्थापना एप्रील १९९४ ला रामनवमीला जालन्यात झाली. श्री राम लक्ष्मण सीता मूर्तीची स्थापना गुरुद्वादशी ऑक्टोबर २००८ या दिवशी झाली. शिवालयात लिंग प्रतिष्ठापना पंडितरत्न श्रीराजेश्वरशास्त्री यांचे हस्ते झाली. श्री दत्त पादुकांची स्थापना २५ ऑक्टोबर २००८ ला औदूंबर वृक्षाखाली झाली. या दत्ताश्रमाची संकल्पना अध्यात्मातील अधिकारी विभूती सौ. प. पू. ताईमहाराज चाटुपळे यांची आहे. त्या धुंडामहाराज कविश्वरांच्या शिष्या व दत्तमहाराज कविश्वरांच्या गुरुभगिनी पण त्या दत्तमहाराजांना आपल्या गुरुस्थानीच मानत असत. समाजात ईश्वराबद्दल, सद्गुरुंबद्दल भक्ती व प्रेम निर्माण व्हावे व त्याचाच परिणाम स्वरूप लोकांमध्ये सत्प्रवृत्ती वाढीस लागावी हा विचारच दत्ताश्रमाबाबत असलेल्या संकल्पनेचा केंद्रबिंदू आहे.     

श्री पादुका मंदीर (श्रीगुरुच्या पादुका)
श्री पादुका मंदीर (श्रीगुरुच्या पादुका)

प.पू.दत्तमहाराज कविश्वर या दत्ताश्रमाचे उद्घाटनाच्यावेळी म्हणाले होते, "प.पू.सौ.ताई महाराज यांच्या तपसामर्थ्याने हे स्थान निर्माण झाले असून येथे सर्व देवतांचा निवास आहे. हे पुढे परमार्थाचे मोठे केंद्र होणार आहे.” आज हे पूर्णत: सत्य झाल्याचे दिसते. 

स्थान विशेष 

श्री दत्ताश्रमात प्रवेश केल्यावर नगारखान्याच्या उजव्या बाजूस पादूका मंदीराची पूर्वाभिमूख वास्तु आहे. या मंदिरास एक मोठा दरवाजा व दोन लहान दरवाजे आहेत. मंदीरात प्रवेश केल्यानंतर सुमारे ३०० माणसे बसतील असा हॉल असून पुढे मुख्य मंदीर आहे. गुरुद्वादशी २५ ऑक्टोबर २००८ रोजी श्री दत्त पादुकांची स्थापना करण्यात आली. पादुकांच्या समोरील भाग काचेचा असून श्री जगदंब श्री पादुका व औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग आहे. सकाळी ठराविक वेळेत सोवळ नेसून पादुकांना पाणी घालू शकतो. येथील उपासना पद्धती श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील परंपरेनुसारच आहे. सकाळ संध्याकाळ पुजा आरती असते.

नगारखान्याच्या उजव्या बाजूला ओवरीतून गेल्यानंतर संतधाम आहे. या मंदीरात एक प्रमुख व दोन्ही बाजूस १-१ असे तीन गाभारे आहेत. त्यात श्री रामचंद्र, श्री काजळेकर महाराज व श्री धूंडा महाराज प्रतिमारूपाने विराजमान आहेत. येथे हा साधारण ३०० माणसे बसतील असा हॉल आहे. या संतधामाखाली तळघर असून याला श्री प्रभुधाम असे नाव असून ध्यानधारणा, जप, पारायणास ही जागा राखीव आहे.

सौ. प. पू. ताईमहाराज काजळेकर
सौ. प. पू. ताईमहाराज काजळेकर (चाटुपळे)

श्री दत्ताश्रमाच्या प्रांगणातच राघवालय आहे हे कौलारू दिसत असले तरी आर.सी.सी. बांधकाम आहे. सदर रामलक्ष्मण व सीता मातेच्या मूर्ती जयपूरहून आणलेल्या आहेत. त्या सर्वांग सुंदर मूर्ती विविध पोषाखांनी अधिकच सुंदर दिसतात. अभिरामेश्वर शिवालयात शिवपिंडी प्रतिष्ठापना पंडीतरत्न राजेश्वरशास्त्री उप्पेनबेरगिरी यांचे शुभ हस्ते २०११ मध्ये महाशिवरात्री दिवशी करण्यात आली. श्रीदत्ताश्रमातील प्रांगणाच्या उत्तरेला एक प्रशस्त यज्ञशाळा असून त्यास पूर्व पश्चिम दक्षीण उत्तर असे चार दरवाजे असून १२ खांब आहेत त्याचे रंगकामही शास्त्रानुसार करण्यात आलेले आहे. यज्ञशाळेच्या पश्चीमेला विस्तृत गोशाळा असून आश्रमाच्या ५० गाई आहेत. श्री दत्ताश्रमाचे मणिद्वीपवाटीका असून येथूनच पूजा समारंभास लागणारी पुष्प व्यवस्था होते. या दत्ताश्रमात भक्त निवास असून खोल्या, गरम पाणी, नाश्ता, जेवण यासाठी कोठलीही रक्कम आकारली जात नाही. श्री दत्ताश्रमाच्या भांडारात येथून प्रकाशीत सर्व साहित्य उपलब्ध आहे. 

सदर दत्ताश्रम हा अत्यंत पवित्र परिसर असून उच्चकोटीच्या आध्यात्मिक स्पंदनांनी भारलेला आहे. जीवनात शांतता व अध्यात्मिक विकास करायचा असेल तर या स्थानास दत्तभक्तांनी अवश्य भेट द्यावी व आपले जीवन कृतकृत्य झाल्याचे समाधान घ्यावे. येथे श्रीगुरुपौर्णिमा, श्री दत्तजयंती, रामनवमी, श्रीगुरुद्वादशी व श्री प.पू. दत्तमहाराजांचे पूण्यस्मरण हे उत्सव साजरे केले जातात तसेच संप्रदायातील सत्पुरुष वसंत यांचा जन्मदिन व पूण्यतिथी उत्सव साजरे केले जातात.

जालना हे जिल्ह्याचे ठिकाण असून मध्य रेल्वेच्या हैद्राबाद मार्गावरील स्टेशन आहे.

श्री दत्ताश्रम संस्थान
श्री दत्ताश्रम संस्थान जालना


श्री दत्ताश्रम संस्थान, 
सद्गुरुनगर, न्हावा रोड, जालना, महाराष्ट्र, पिनकोड- ४३१२०३.

फोन नं. ०२४८२  २३६८०५/२४०१०२
Email:- shridattashramjalna@gmail.com