श्री मुक्तेश्वर, श्री संत एकनाथांचे नातु (इ. स. चे सतरावे शतक)

जन्म: गंगामाई, एकनाथांची कन्या यांचे पोटी तेरवाड येथे, १७ वे शतक
आई/वडिल: गंगामाई (गोदावरी) / चिंतामणी  (लीला विश्वंभर) उपनाम मुदगल  
संप्रदाय: दत्त संप्रदाय
विशेष: तेरवाड येथे दत्तमंदिर स्थापना  

कवि मुक्तेश्वर म्हणजे पैठणच्या संत एकनाथांचा दोहींत्र. एकनाथांच्या मुलीचा मुलगा. त्यांचा जन्म इ. स. १५७३ मध्ये झाला. त्यांचे वडील, चिंतामणी उर्फ लीला विश्वम्भर हे एकनाथांचे अनुग्रहित व मुक्तेश्वरांचे अध्यात्मिक गुरुही होते. त्यांचे उपनाम  मुदगल. वयाच्या १० व्या वर्षापर्यंत ते मुके होते. मौजीबंधानानंतर  त्यांना बोलता येऊ लागले. मुक्तेश्वरांचा कुलस्वामी सोनारीचा भैरव व कुलदेवी कोल्हापूरची महालक्ष्मी होती. श्री दत्त हे त्यांचे उपास्य दैवत होते. पूर्वयुष्याचा बराचसा काळ पैठणात आजोळीच गेल्याने ते पैठणच्या विद्वतभूमीत विविध शास्त्रात पारंगत झाले. संस्कृत व ललित वाङ्मय यांचा खूप अभ्यास केला. खेरीच महाभारतावरील नीळकंठी तसेच अन्य भारती टिकांचाही त्याने व्यासंग केला. त्याच्या जीवनातील गोष्टीविषयी तो स्वतः काधीही बोलले नाही. परंतु त्यांच्या ग्रंथांच्या विविधांगी अभ्यासावरून तो अतिशय टापटीपीचा, सूक्ष्मदृष्टीचा, विचक्षण, रसिक, चविष्ट भोजनभोक्ता स्पष्ट व सडेतोड वृत्तीचा, सत्वाशील, परमार्थप्रवण व  कुटुंबवत्सल गृहस्थ होता. संस्कृत भाषेचा अभ्यास  प्रचंड होता आणि मराठी भाषेवर प्रभुत्व होते. महाराष्ट्र देश, व मराठी भाषेचा इतका अभिमान ज्ञानेश्वरानंतर फक्त मुक्तेश्वरानाच आढळतो. प्रसंग वर्णनांची सूक्ष्मता, संभाषणे, हालचाली, हावभाव, अविर्भाव यांचे रुपकांनी सजीव चित्रण, विविध अलंकार आणि उत्कृष्ट रासाविर्भाव, गुणावती, नादवती, ओघवती, प्रासादिक, मधुर, ओजस्वी, प्रसंगी कोमल वा कठोर शैली, सहजवाणी आणि परिणामकारक अर्थ साधण्याची क्षमता हि त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत.

मुक्तेश्वरांचे ग्रंथकर्तृत्व अफाट आहे. महाभारताची आदी, सभा, वन, विराट  व सौप्तीक ही ५ पर्व, रामायण, गरूड गर्व परिहार, हरिश्चंद्र आख्यान, भगवद्गीता, मूर्खलक्षणे, गजेंद्र मोक्ष, शुकरंभा संवाद, विश्वामित्र भोजन, एकनाथ चरित्र इ. ग्रंथ काही पदे आरत्या भूपाळ्या एवढी ग्रंथरचना उपलब्ध आहे. भाषासौंदर्य, वर्णनशैली, निसर्गवर्णन इत्यादी बाबतींत मुक्तेश्वरांच्या हात धरणारा कवी प्राचीन काळात कोणी दुसरा नाही. त्यांना रामायणरचनेची स्फूर्ती नरसोबाच्या वाडीस झाली असावी.

साहित्यसारितेचा हा मानदंड इ. स. १६४६ मध्ये तेरावाड येथे शरदावासी झाला

मुक्तेश्वरांच्या कुटुंबात पारंपारिक विठोबा व लिला विश्वंभराची उपासना होती. एकनाथांचा हा नातू  आपल्या आजोबाप्रमाणेच दत्ताचा उपासक होता. याच्या वडिलांचे नाव चिंतामणी, आईचे सासरचे गोदावरी व माहेरचे गंगामाई होते. याचा कुलदेव सोनारीचा भैरव असून कुलस्वामिनी कोल्हापूरची महालक्ष्मी होती. मुक्तेश्वरांच्या कुळात दत्तात्रेयांची उपासना त्यांच्या ‘लीलाविश्वंभर’ या अवताराची होती. ‘ॐ नमोजी विश्वंभरु । तो देव दत्तात्रेय जगद्गुरू’, ‘पुराण पुरुषेश्वरा गुरुमुर्ती दातारा लीलाविश्वंभरा दत्तात्रेया’ असे याने म्हटले आहे. कोणी लीलाविश्वंभर हे मुक्तेश्वरांचे गुरूही मानतात.  

‘पवित्र सरिता कृष्णवेणी पंचगंगा समस्थानीं । नृसिंहसरस्वतींचे चरणीं । ग्रंथप्रसाद लाधला ॥’

असे यांनी  म्हटले आहे. तेरवाड येथे मुक्तेश्वरांचे दत्तमंदिर असून तेथे त्यांच्या पूजेतील दत्तात्रेयांच्या पादुका आहेत.

‘विश्वेश लीलाविश्वंभरु । दत्तात्रय जगद्गुरु । तत्प्रसादें मुक्तेश्वरु । निरोपीं तें परिसावें ॥
चिन्मूर्ती लीलाविश्वंभरु । दत्तात्रय जगद्गुरु । त्याचेनि नामें मुक्तेश्वरु । कथा बोले भारती ॥’

अशा अनेक ठिकाणी त्याने उल्लेख केलेले आढळतात. 

मुक्तेश्वर हे शिवाचे उपासक असल्यामुळे यांनी शिवरूप दत्ताची आराधना केलेली दिसते. ‘कां नाभिपादांत कमळासनु । मध्यकंठांत रमारमणु । स्कंधावरुता त्रिलोचन । अंगयत्रीं जो येकु’ अशी त्रिमूर्ती शिवाची म्हणजे दत्तात्रेयांची कल्पना त्यांनी केलेली आहे. 

पैठणच्या नाथांचा हा प्रतिभाशाली नातू काही काळ तेरवाड सारख्या दूरच्या आणि ५००-६०० वस्तीच्या खेड्यात असावा याचे आश्चर्य वाटते. कदाचित त्यांचे पूर्वज्यांच्या वास्तव्यामुळे असेल असे वाटते. दत्तभक्त मुक्तेश्वर फिरत फिरत नरसिंह वाडीच्या परिसरात आले असता पंचगंगेच्या काठी असलेल्या  निवांत व निसर्गरम्य खेड्याचे आकर्षण वाटून ते येथेच स्थिरावले. तेरावाड  जवळ पंचगंगा उत्तरवाहिनी झाली आहे. यामुळे हि नदी एक तिर्थ मानले जाते. येथे मुक्तेश्वरांच्या पूजेतील दत्तपादुकांवर एक छोटेशे छप्पर उभे आहे तरीही ते दुर्लक्षित आहे. मुक्तेश्वरांच्या दाहनभूमीवर त्याचवेळी एक वृन्दावन बांधलेले होते, परंतु आता त्याचा पत्ता नाही. महाराष्ट्राच्या या कवीची व सत्पुरुषाची  महत्ता  छत्रपतींना पटली पण त्याच्या वंशजांनी त्यांचे महत्व व वैभव वाढविले नाही हे एक दुर्दैव आहे.

श्री नृसिंहवाडीपासून जवळच तेरवाड येथे मुक्तेश्वर स्थापीत दत्तमुर्ती व पादूका आहेत.