श्री क्षेत्र पैठण

श्री एकनाथ महाराज पादुका श्रीक्षेत्र पैठण
श्री नाथ दर्शन पैठण

स्थान: श्री क्षेत्र पैठण
कोठे आहे: औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र  राज्य

सत्पुरूष संत श्रेष्ठ एकनाथ महाराज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. औरंगाबादेपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.

कसे याल 

औरंगाबाद हून अनेक वाहने उपलब्ध आहेत. पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरुन पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष स्वतःचे वेगळेपण राखून आहे. हे गाव प्राचीन कालापासून 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. पूर्वी (मूळ नाव "प्रतिष्ठान") ही सातवाहन राजाची राजधानी होती. त्या काळापासून अगदी आतापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे.

एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असं गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे.

फाल्गुन वघ षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो.

गोदावरीच्या काळावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. झानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे.
ब्रिटिश अंमलात पैठण हे शहर हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते.

श्री एकनाथ महाराज पादुका श्रीक्षेत्र पैठण
श्री एकनाथ महाराज पादुका श्रीक्षेत्र पैठण 

थोडे एकनाथ महाराजांविषयी

संत एकनाथ(१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला.

शांतिब्रह्म, ‘संत’पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक,महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे *संत एकनाथ*.आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल.

एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव.

एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. 

एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रेय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी एका सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.

नाथ महाराजांच्या आयुष्यात घडलेले काही महत्वपुर्ण चमत्कार 

ईश्वर हा संताचे ब्रीद राखण्यास सदैव तत्पर असतो त्यामुळेच् संताच्या जीवनचरित्रात असामान्य असे काही चमत्कारिक प्रसंग आपल्याला पहायला मिळतात. त्यातील काही प्रसंग आपल्यापुढे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.

श्री एकनाथ महाराज श्रीक्षेत्र पैठण
श्री एकनाथ महाराज, श्रीक्षेत्र पैठण 

१) पितरांस श्राद्धान्न 

एकदा नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची वाट पाहत नाथ दारात उभे होते. गिरिजाबाईंचा स्वयंपाक तयार होता. नाथवाडयाबाहेरुन जाणाऱ्या तीन चार हरिजनांस त्या स्वयंपाकाचा सुवास आला. आपल्याला असे अन्न मिळाल्यास किती बरे होईल ही त्यांच्यातील चर्चा नाथांनी ऐकली. ते अन्न हरिजनांस मिळावे असा विचार नाथांच्या मनात उत्पन्न झाला. त्यांनी गिरिजाबाईस ते अन्न हरिजनांस वाटण्यास सांगितले. हरिजनांना श्राद्ध भोजन घातल्याचे पैठणस्थ ब्राह्मणास समजले. नाथांच्या घरी श्राद्धान्न घेण्यास त्यांनी नकार दिला. वास्तविकत: इकडे नाथांनी शुचिर्भूत होऊन गिरिजाबाईं करवी पुन्हा स्वयंपाक करवून घेतला. तथापि ब्राह्मणांनी नकार दिला. श्राद्धविधी वेळेत होणे महत्वाचे होते तेव्हा वाट पाहुन नाथांनी पितृत्रयींच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णु महेश रुपी पितरांस जेवू घातले व आपले श्राद्ध कार्य पूर्ण केले.*

२) एकच नाथ दोन ठिकाणी 

पैठणास राणु नावाचा एक हरिजन गृहस्थ राहत असत. तो व त्याची पत्‍नी नित्य नाथांच्या प्रवचनास येत. त्यांचे आचरण शुद्ध होते. नाथांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. एकेदिवशी त्यांच्या मनात विचार आला कि आपण नाथांना आपल्या घरी जेवण्यास बोलवावे. त्यांनी नाथांना आमंत्रण दिले ते नाथांनी स्वीकारले. संपूर्ण पैठणभर चर्चेचा एकच विषय कि नाथ हरिजानाकडे जेवणार. ठरलेल्या दिवशी नाथ घरातून बाहेर पडले. काही जण टप्याटप्याने नाथांवर नजर ठेवून होते. नाथ राणूच्या घरी गेले. उभयतांनी नाथांचे मनोभावे पूजन केले. नाथ जेवायला बसले. चमत्कार असा झाला कि, एकाच वेळी लोकांनी नाथांना राणूकडे जेवतांना आणि आपल्या वाडयात प्रवचन सांगताना दिसले. नाथ एकच, वेळ एकच परंतु दोन ठिकाणी दोन भिन्न कार्य हे बघून लोकांनी नाथांचा जयजयकार केला.

३) नाथांकडे अनेक परीस 

पैठणास एक सावकार राहत असे. त्याच्याजवळ एक परिस होता तो त्यास खूप जपत असे. एकदा त्या सावकारास तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली. परंतु परीस घेवून आपण प्रवासात सुरक्षित राहू शकत नाही हे जाणुन नाथांसारख्या निष्काम श्रेष्ठ भक्‍ताजवळ तो परीस सुरक्षित राहील या भावनेने तो नाथांकडे आला. नाथ देवांची पूजा करीत होते. त्या सावकाराने परीस नाथांकडे दिला; तीर्थयात्रा झाल्यानंतर तो घेण्यासाठी मी परत येईन असे त्याने नाथांना सांगितले. नाथांनी तो परीस देव्हाऱ्याखाली ठेवून दिला. बऱ्याच दिवसानंतर तो सावकार परीस घेण्यासाठी नाथांकडे आला व परीसाची मागणी केली तेव्हा तो परीस देण्यास नाथांनी उद्धवास सांगितले. परीस काही सापडेना, नाथ म्हणाले कदाचित निर्माल्यासोबत तो गोदावरीत अर्पण झाला असावा. असे म्हणताच तो सावकार नाथांना भलतेसलते बोलू लागला. आपण निस्वार्थ असाल असा विचार करुन आपणाजवळ परीस ठेवण्यास दिला मात्र आपण तो चोरला. नाथांनी त्यास गोदावरीत नेले, तळात हात घालून ओंजळभर दगडे उचलली व म्हणाले, "तुझा परीस यातुन निवडून घे." त्या सावकाराने लोखंडाचे गोळे काढले. प्रत्येक दगडास त्याचा स्पर्श होताच सोने होऊ लागले. नाथांनी त्यापैकी एक देवून बाकी सर्व नदीत टाकुन दिले. परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते हे ठीक परंतु नाथांच्या स्पर्शानं दगडाचे परीस होतात हे मात्र विशेष.

४) पत्रावळी खाली पत्रावळी

नाथांचे पुत्र हरिपंडीत हे विद्‍वान; परंतु नाथांचे संस्कृतातील ज्ञान प्राकृतात सांगणे त्यांना आवडत नसे. यास कंटाळुन ते काशीस निघून गेले. काही वर्षांनी नाथांनी त्यांची समजुत काढुन त्यांस पैठणास आणले. हरिपंडीत नाथांऐवजी प्रवचन करु लागले. श्रोत्यांची संख्या रोजच्यारोज कमी होऊ लागली. नाथांप्रमाणे आपल्यावर लोकांची श्रद्धा नाही हे जाणुन त्यांचा अभिमान कमी होऊ लागला. परंतु तो संपूर्ण निरभिमान व्हावा असे नाथांना वाटे.

एका वृद्ध स्त्रीने नवरा हयात असताना सहस्त्र ब्राह्मण भोजनाचा संकल्प केला होता. परंतु तो काही कारणाने पूर्ण होऊ शकला नव्हता. तो पूर्ण व्हावा असे त्या स्त्रीस वाटे. तिने नाथांच्या प्रवचनात एकवाक्य ऐकले कि, एक ब्रह्मवेत्‍ता जेवू घातल्यास हजारो ब्राह्मणास भोजन घातल्याचे पुण्य मिळते. तिने नाथांनाच जेवणाचे आमंत्रण दिले. त्या स्त्रीच्या घरी जाऊन स्वयंपाक करण्याचे नाथांनी हरिपंडीतास सांगितले. हरिपंडीताने स्वयंपाक सिद्ध केला. नाथांची पत्रावळ मांडली, त्यांना पोटभर जेवू घातले. नाथ जेवण करुन उठले, ’पत्रावळ तूच उचल’ असे नाथांनी हरिपंडीतास सांगितले. हरिपंडीताने पत्रावळ उचलली, परत येवून पाहतो तर पत्रावळ जशीच्या तशी पुन्हा दुसरी उचलली तिसरी आली तिसरी उचलली चौथी आली, अशा हजार पत्रावळी हरिपंडीताने उचलल्या. त्या स्त्रीस सहस्त्रब्राह्मण भोजन घातल्याचा आनंद झाला व हरिपंडीतासही आपल्या वडीलांची महती कळली, अभिमान नष्ट झाला. पुढे हरिपंडीतांनी नाथांप्रमाणेच पारमार्थिक आचरण ठेवले.

मूकं करोति वाचालं 

गावोबा हा गोदाकाठच्या कुलकर्ण्याचा मुलगा. पुरणपोळी आवडते म्हणुन रोज दे, असा आईजवळ हटट्‍ करीतअसत. रोज पुरणपोळी देणेआईला परिस्थितीमुळे शक्य नसल्याने तिने त्यास नाथांकडे पाठविले. हरिपंडीताप्रमाणे गावोबासही सांभाळावे असे नाथांनी गिरिजाबाईस सांगितले. गावोबास नाथांघरी रोज पुरणपोळी मिळु लागली. तो तिथे पडेल ते काम करीत असत. तो थोडा वेडसर होता तरीही नाथांच्या कीर्तनप्रवचनात बसत. त्यास गायत्रीमंत्रही नीट येत नसे. याला नाथांनी मंत्रोपदेश देवू केला तेव्हां "एकनाथ" याशब्दाशिवाय मी दुसरा मंत्र म्हणणार नाही असे त्याने नाथांस सांगितले.

नाथांचा भावार्थरामायण नावाचा ग्रंथ युद्धकांडाच्या ४४ व्या अध्यायापर्यन्त आल्यावर समाधी घेण्याचे नाथांनी जाहीर केले. श्रोत्यांना वाईट वाटले. श्रीकृष्णदास लोळे नावाचा रामायणकर्ता एकदा नाथांकडे आला होता तेव्हां त्यास युद्धकांडाचे लिखाण संपविण्यासाठी अकरा दिवस हवे होते. तेव्हां नाथांनी त्याचे मरण अकरा दिवस पुढे ढकलले होते याची आठवण करुण देत लोकांनी नाथांना ग्रंथ समाप्त करुन जावे असे विनविले. परंतु नाथांनी सांगितले ’मी जरी गेलो तरी राहीलेले रामायण गावोबा पूर्ण करील. नाथांनी विनोद केला असे समजुन लोक हसू लागले. परंतु नाथ जे बोलतात ते खरे होणारच नाथांनी गावोबाच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य गावोबाने नाथांसमोर ४५ वा अध्याय लिहून काढला. नाथनिर्याणानंतर तो ग्रंथ गावोबानेच तडीस नेला नाथांचे लिखाण कोणते व गावोबाचे कोणते हा फरक लक्षात येत नाही एवढी नाथकृपा गावोबावर झाली.

कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत

संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती.यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तव्यच्युत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता.भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे (व्यासकृत) काव्य अतिशय प्रासादिक आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. नाथांची दत्ताची आरती "त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण" प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते.दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

श्री गजानन महाराज पालखी सोहळा, पैठण
श्री गजानन महाराज पालखी सोहळा, पैठण 

श्री क्षेत्र पैठण, श्री एकनाथ महाराज व श्री एकनाथषष्ठी विशेष महत्व.

श्रीएकनाथष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्रीएकनाथमहाराज जलसमाधी दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. विशेषत: पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक ह्या सोहळ्यास उपस्थित असतात. पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या ४७५ दिंडया, "भानुदास-एकनाथ" चा गजर हयामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो.

फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी (साधारणत: मार्च महिना) ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यन्त श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते.

षष्ठी - षष्ठीच्या दिवशी पहाटे २ वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो. नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्रीएकनाथमहाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात नाथवंशजांच्या वतीनं वारकरी व हरिदासी कीर्तनं करण्यात येतात. गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते. सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंडया नगर प्रदक्षिणा करुन गोदाकाठी आपापल्या फडात/मठात विसावतात.

सप्तमी - सप्तमीच्या दिवशी रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यास छबिना असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते, भारुड सादर केली जातात. सकाळी ७ वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तनादींचे आयोजन करण्यात येते. वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते.

अष्टमी - अष्टमीच्या दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते. उदासीमठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात. हे दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो. समाधी मंदिरात पोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळमृदुंगाच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लिन होऊन जातात. मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गुळ आणि लाह्या यांचे मोठेमोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात.

त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकविलेली असते. सूर्यास्तासमयी ’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्यानं ती हंडी फोडण्यात येते. प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. परंपरेचे अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो. या तीनही दिवसांमध्ये श्रीएकनाथमहाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात. शिवाय इतरही दिंड्‍या आपआपल्या पध्दतीनं सोहळ्याचा आनंद लुटतात. सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोकण, मुंबई, कर्नाटक आदी परिसरातून दिंडया घेवून येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने येथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडत आहे. नाथषष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असुन अनेक विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठी पैठणास येतात.

उत्सवाचा इतिहास

फा. व. ६ ह्या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्रीएकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला.

पंचपर्व 

१) नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म 
२) स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह 
३) नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह 
४) श्री जनार्दनस्वामी पुण्यतिथी 
५) श्रीएकनाथमहाराज जलसमाधी