श्रीमद नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जयंती, पौष शुध्द २

श्रीमद नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जन्म
श्रीमद नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जन्म 

महाराजांचा जन्मकाळ दुपारी १२ वाजता, जन्म स्थान: कारंजा, कारंजा येथील नृसिंह स्वामींचे जन्मस्थान, "काळे वाडा". पौष शुक्लपक्ष द्वितीयाला श्री जगद्गुरू अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री श्रीगुरू नृसिंहसरस्वती स्वामी महारा. यांचा जन्म करंज नगरीत झाला. कारंजा हे पौराणिक आणि ऐतिहासिक नाव श्री करंज ऋषींनी ठेवले. पूर्वी या गावाला करंजनगरी म्हणून ओळखत. या गावांत पाण्याचे दुर्भिक्ष होते. म्हणून या करंज ऋषींनी हातात कुदळ घेवून तलाव खोदण्यास सुरूवात केली. त्याच वेळी उत्तरेतून एक ऋषींचा संघ येथे आला. त्यांनी आपआपल्या कमंडलूतील जल तेथे ओतले आणि एक मोठा जलाशय तयार झाला. हा जलाशय आजही ऋषी तलाव या नावाने ओळखला जातो. वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) या गावी देवी अंबाभवानी आणि देव माधव काळे यांच्या पोटी श्रीगुरु नृसिंह सरस्वतींनी याचा जन्म झाला. श्री महाराजांचा शततारका नक्षत्रावर जन्म झाला व जन्म नाव शाळिग्रामदेव हे होते. नंतर मोठ्या थाटाने त्याचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यावहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले. समकालीन ग्रंथात असा उल्लेख आढळतो.

माधवशास्त्री स्त्री अंबिका कारंज सती थोर । पूर्वजन्मी तिजसि श्रीवल्लभ वर ।।
पुढील जमनी तव कुशि धरीन अवतार । म्हणवूनी आंबे कुशि आलेऐका तिथिवार ।।
द्वितीया पौष शुध्द शततारावरी, । माध्यान्ही अवतरले नरहरि शनिवारी ।।
आदौ माघ कृष्ण शुभ तिथी भृगुवारी । पुष्पासनी आरुढले त्रिगुण यतिधारी ।।

जन्मताच ते ॐचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले. हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप, ताप, दैन्य हरण करणारा होईल म्हणून याचे नाव ‘नरहरी’ असे ठेवावे असे त्यांनी सुचवले. 

याच्या स्पर्शाने आईच्या स्तनांतून अमाप दूध स्रवत असे. कौतुकात बाळ वाढू लागले. पण वय वाढत चालले तरी ॐकाराखेरीज कोणताच शब्द त्याला बोलता येत नसे. हा मुलगा मुका निघणार की काय ? अशी शंका आली. सात वर्षांपर्यंत बाळाने दुसरा शब्दच कधी उच्चारला नाही. त्याच्या मुंजीचा बेत ठरला. पण हा कुमार मंत्रोच्चार कसा करणार, म्हणून सर्वांना काळजी होती. बाळाने नाना चमत्कार करून दाखविले. लोखंडाला हात लावताच त्याने बावन्नकशी सोने करून दाखविले. मुलाचे समार्थ्य प्रत्ययास येऊन

‘तूं तारक शिरोमणी । कारणिक पुरुष कुळदीपक ॥ तुझेनि सर्वस्व लाधलें । बोलतां आम्हीं नाहीं ऐकिलें । अज्ञानमायेनें वेष्टिलें । मुकें ऐसें म्हणों तुज ॥’ (११.५७-५८) अशी कबुली मातेने दिली.

यथाविधी नरहरीचा व्रतबंध करण्यात आला. गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला. या वेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला, ‘अग्निमीळे पुरोहितं’ या मंत्राचा उच्चार ऐकताच सर्वांना नवल वाटले. यजुर्वेद, सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना चकित केले. हा कुमार अवतारी पुरुष असल्याची खात्री सर्वांना पटली. मातेला बाळाने एक भिक्षा मागितली, 

‘निर्धार राहिला माझिया चित्ता । निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थे आचरावया ॥’ (११.८३) 

वेदाभ्यास करण्यासाठी सर्वत्र संचार करण्याचा बाळाचा मानस पाहून मातापित्यांस दु:ख झाले. पुत्र रक्षक होईल, या आशेवर जगलेल्या मातेची निराशा झाली. आईचे दु:ख ओळखून मुलाने तिला ब्रह्मज्ञान सांगितले. तिला आणखी चार पुत्र होतील असे आश्वासन दिले आणि पूर्वजन्माची स्मृती करून दिली. त्याबरोबर, 

‘श्रीपादश्रीवल्लभ स्वरूपता । दिसतसे तो बाळक ॥’ (११.९३)  या श्रीपादरूपी नरहरीला ओळखून मातेने बालकाचे चरण धरले.

मुंजीनंतर ते लवकरच तीर्थयात्रेला निघाले. पण वत्सल मातेच्या आग्रहास्तव ते एक वर्ष करंज ग्रामातच राहिले. मातेला आणखी दोन सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर ते श्री क्षेत्र काशीला निघाले. प्रयाणकाली त्यांनी मातेला त्रैमूर्ती दत्त-स्वरूपात दर्शन देऊन पूर्वावतारातील श्रीपाद श्रीवल्लभ आपणच असल्याचे दाखवून दिले. स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईन असे आश्वासन देऊन ते श्री क्षेत्र काशीला निघाले. वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) या गावी देवी अंबाभवानी आणि देव माधव काळे यांच्या पोटी श्रीगुरु नृसिंह सरस्वतींनी याचा जन्म झाला. 

श्री नृसिंह सरस्वती जन्म सोहळा कारंजा
कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती जन्म सोहळा

श्री क्षेत्र नृसिहवाडी येथे साजरा होणारा जन्मोत्सव

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता ‘श्री नृसिंहसरस्वती स्वामी’ महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो . सात दिवस चालू असलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यात येथील दत्त देव संस्थानचे वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.येथील कृष्णा- पंचगंगा नदीच्या संगमावर श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या करून ‘मनोहर पादुकांची’ स्थापना केलेने त्यांच्या या तपसाधनेनेच या गावाला नृसिंहवाडी हे नाव मिळाले असलेने सदर जन्मोत्सवास येथे अनन्य साधारण महत्व आहे.

येथील दत्त मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा झालेवर श्री चरणावर रुद्राभिषेक करणेत येतो.उत्सव काळात सुरु असलेल्या श्रीमद गुरुचरित्र पारायणाची आज सांगता करणेत येते. सकाळी अकरा वाजता वेदमूर्ती ब्राम्हवृदांकडून जन्मख्यान व पुराण व दुपारी बारा वाजता ‘श्री गुरुदेव दत्त’ च्या गजरात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. जन्मकाळ प्रसंगी भाविकांनी आकर्षक फुलांनी सजविलेल्या श्रींच्या चांदीच्या पाळण्यावर अबिर गुलाल व फुलांची मुक्त हस्ताने उधळण केली. मानकरी ब्राम्हवृंद श्रींची विधिवत पूजा करतात व पाळणा म्हणतात आणि प्रार्थना करतात. महिलां मोठ्या भक्तीने श्रींचा पाळणा जोजवितात व मंगल आरतीने ओवाळले जाते. यानंतर भक्तांना सुंठवडा वाटप करणेत येते. अशाच स्वरूपात अनेक दत्तस्थानी नृसिह सरस्वती जन्मोत्सव साजरा होतो. श्रीक्षेत्र गाणगापूर, कारंजा व कुरवपूर येथे हजारो भक्त श्रीचरणी नतमस्तक होऊन या आनंद सोहोळ्यात सहभागी होतात.

श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय स्वामी महाराजांच्या जन्मतिथी बाबत आख्यायिका

महाराजांच्या जन्म तिथीचा उल्लेख गुरुचरित्रात देखील नाही. सुमारे ३०० वर्षापूर्वी नरसोबा वाड़ीला नारायण स्वामी नावाचे थोर अधिकारी पुरुष होते. देवांच्या सेवेत असलेल्या पुजारी कुटुंबात गुरभक्त पुजारी नावाचे सेवक होते. फार काही उद्योग व्यवसाय त्यांना जमला नाही पण नारायण स्वामींच्या सहवासात बसुन रहायचे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची त्यांच्यावर कृपादृष्टी होती. गुरुभक्त पूजाऱ्यांच्या घरी एक तळघर होतं. रोज संध्याकाळी देव त्यांच्या घरी दूध घ्यायला येत. स्वामी आलेले केवळ गुरुभक्त पुजारी आणि त्यांच्या मोठ्या सुनेला समजत असे. देवांना तळघरात दुधाचा नैवेद्य दाखवल्यावर धूपाचा सुगंध येई आणि महाराज तिथून अदृश्य होत. 

एकदा नारायण स्वामींनी गुरुभक्त पुजाऱ्यांना म्हटलं की रोज देव तुमच्या घरी दूध घ्यायला येतात त्यांना त्यांची जन्म तिथी तरी विचारा. एकदा गुरुभक्त पूजाऱ्यांनी देवांना सन्ध्याकाळी दूध घ्यायला आल्यावर त्यांची जन्मतिथी विचारली. देवांनी गुरुभक्ताना त्यांची जन्म तिथी सांगितली पौष शुद्ध द्वितीया. गुरुभक्तानी येऊन नारायण स्वामींना सर्व हकीकत सांगितली. नारायण स्वामी आनंदित झाले. पण जन्माचं साल कोणतं हे मात्र समजलं नाही. गुरुभक्त पुजारी ते विचारायचं विसरले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देव घरी आल्यावर विचारू असा विचार करून गुरुभक्त घरी गेले पण त्यानंतर देव गुरुभक्तांच्या घरी दूध घ्यायला यायचे बंद. ह्या गोष्टीचं खुप वाइट वाटलं. गुरुभक्त बुद्धिने थोडेसे मंद होते पण देवाच्या कृपेने त्यांनी देवांच्या स्तुतिपर शेकडो पदं स्तुतिपर श्लोक आरत्या रचल्या. ज्या आजही वाड़ी गंधर्वपुर कारंजा इथे नित्यक्रमात गायल्या जातात. देवांचा जो कृपाप्रसाद गुरुभक्त पूजाऱ्यांना लाभला तो अमूल्यच!

श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मख्यान, श्री गुरुचरित्र अध्याय अकरावा

"श्रीगुरूंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा." असे नामधारक म्हणाला असता सिद्ध म्हणाले,"श्रीपाद अवतारात मतीमंद ब्राम्हण गुरुकृपेने विद्वान झाला ही कथा मी तुला पूर्वी (आठव्या अध्यायात) सांगितली. श्रीपादांनी त्या मुलाच्या आईला शानिप्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले. त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले. काही दिवसांनी तिला मृत्यू आला. त्यानंतर ती कारंजा गावात (लाड कारंजा) वाजसनीय शाखेच्या एका ब्राम्हणाची कन्या म्हणून जन्मास आली. तिच्या आई-वडिलांनी तिचे चांगल्याप्रकारे पालनपोषण केले. तिचे नाव अंबाभवानी असे ठेवण्यात आले. ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त 'माधव' नावाच्या ब्राम्हणाशी तिचा विवाह झाला. आंबा आणि माधव दोघेही भगवान शंकराची मोठी भक्ती करीत असत. ते दोघेही नित्यनेमाने प्रदोषसमयी शिवपूजन करीत असत. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेषप्रकारे यथासांग शिवपूजा करीत असत. आपल्याला श्रीदत्तात्रेयांसारखा पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती.

काही दिवसांनी अंबाभवानीला पुत्र झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला. अत्यंत तेजस्वी होता.तो जन्माला येताच ॐ काराचा उच्चार करू लागला. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले. विद्वान ज्योतिषांनी त्याचे नाव जातक वर्तविले. ज्योतिषी म्हणाले," हा अवतारी पुरुष आहे. सर्वांचा गुरु होईल. याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल. अष्टसिद्धी नवनिधींचा हा स्वामी त्रैलोक्यात वंदनीय, पूजनीय होईल. याच्या क वळ दर्शनाने महापातकी लोक पावन होतील. याचे केवळ स्मरण केले असता दुःख दारिद्र्य नाहीसे होईल.हा इच्छा पूर्ण करील. मात्र हा विवाह करणार नाही. हा संन्यासी होईल. तुम्ही दोघे मोठे भाग्यवान, पुण्यवान आहात, म्हणूनच तुम्हाला हा पुत्र लाभला. याचा नीट सांभाळ करा. याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका."

ब्राम्हण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला. ज्योतिषाने वर्तविलेले ऐकून आंबा आणि माधव यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्रालंकार दिले. माधव ब्राम्हणाचा नवजात पुत्र ॐ कार जपतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. गावातील असंख्य स्त्री-पुरुष हे माधवाच्या घरी गर्दी करू लागले.आपल्या या पुत्राला आल्यागेलेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती.दृष्ट काढीत असे. त्याच्या गळ्यात गंडादोरा बांधत असे. अहो, केवळ लोकोद्धारासाठी ज्या परत्म्याने अवतार धारण केला, त्याला दृष्ट लागणार? पण आईची. ती काळजी घेणारच. मुलगा दहा दिवसांचा झाल्यावर त्याचे मोठ्या थाटात बारसे करण्यात आले.

"शालग्रामदेव' असे त्याचे जन्मनाव व 'नरहरी' असे पाळण्यातले नाव ठेवण्यात आले. नरहरी दिसामाजी वाढू लागला. पण तो ॐ काराशिवाय काहीच बोलत नसे.आई -वडिलांनी त्याला बोलावयास शिकविण्याचे खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे कि काय अशी त्यांना भीती वाटू लागली. नरहरी सात वर्षांचा झाला. आठव्या वर्षी यांची मुंज करावयास हवी. पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची? याला गायत्रीमंत्र कसा शिकवावयाचा? भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला पण तो मुका दिला. या विचाराने दुःखी झालेली अंबाभवानी रडू लागली. आपल्या लागली. नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले. मग त्याने केली. त्याने घरातली एक लोखंडी पहार हाती घेतली. त्याचक्षणी ती पहार सोन्याची झाली. मग नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला. त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या.

तो चमत्कार पाहून नरहरीच्या आई-वडिलांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्याला जवळ घेऊन म्हणाले, "बाळा, महात्मा आहेस. तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस; पण तू बोलत का नाहीस ? तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे. तू आमची इच्छा पूर्ण कर." नरहरी हसला. त्याने शेंडी, जानवे, मेखला यांच्या खुणा करून 'तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन' असे खुणेने सुचविले. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांना अतिशय आनंद झाला.त्यांनी नरहरीची मुंज करायचे ठरविले. मग एका शुभमुहूर्ताला नरहरीची मुंज केली. माधवाने त्या निमित्ताने खूप दानधर्म केला. भोजन, दक्षिणा, मानपान यासाठी भरपूर खर्च केला. ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले, "माधवाने इतका खर्च कशासाठी केला? मुलाची मोठ्या थाटात मुंज केली; पण तो गायत्रीमंत्र कसा शिकणार? या मुक्याला संध्या कोण शिकविणार? आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार? दुसरे टवाळखोर म्हणाले, "काही का असेना, या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले. दक्षिणा मिळाली हा मुलगा शिको नाहीतर न शिको. "नरहरीची मुंज यथासांग पार पडली. माधवाने नरहरीला गायत्री-मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य! नरहरीने गायत्री-मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. गायत्री मानतच दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली. मातेने पहिले भिक्षा घालताच नरहरी खणखणीत स्वरात ऋग्वेद म्हणून लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणून लागला. सात वर्षांचा मुलगा सगळे वेद अस्खलित म्हणतो आहे हे ऐकून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले. ते म्हणून लागले. "अहो, हा मुलगा प्रत्यक्ष श्रीगुरू दत्तात्रेयांचाच अवतार दिसतो!" सगळे लोक नरहरीचा जयजयकार करू लागले. त्याच्या चरणांना वंदन करू लागले. हा मुलगा मनुष्यरूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली.

आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाच्या डोही डुबू लागले. मग नरहरी आपल्या आई-वडिलांच्या पाया पडून म्हणाला, "मी आता तीर्थयात्रेला जातो. मी सन्यास घेणार आहे. मला परवानगी द्या." मग तो आईला म्हणाला, "माते, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस. मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन." नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली. ती म्हणाली, "माझी शिवपूजा फळास आली म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मिळाला. तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार देणार?" असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली. नरहरीने तिला सावध केले. तो तिला समजावीत म्हणाला, "माते, मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला गृहत्याग करावाच लागेल. पण तुम्ही शोक करू नका.तुम्हाला चार पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील. माझे बोलणे खोटे ठरणार नाही." असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्याचक्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. तिला हेही कळले कि, आपला नरहरी म्हणजेच श्रीपादश्रीवल्लभ. नरहरी तिला म्हणाला, "माते, मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे. हे गुप्त ठेव. मी संन्यासी आहे. संसारापासून अलिप्त आहे.आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे. मला निरोप दे." नरहरीने इतके सांगितले तरीसुद्धा अंबा त्याला म्हणाली."नरहरी, आत तू गेलास कि मला कधीही दिसणार नाहीस. तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू? इतक्या लहानपणी सन्यास घेण्याची काय आवश्यकता? धर्म- शास्त्रानुसार मनुष्याने चारी आश्रम क्रमाक्रमाने आचरावे. ब्राम्हचर्याश्रम वेदपठण करावे, मग गृहस्थाश्रम स्वीकारावा. सर्व इंदिये तृप्त करावीत. यज्ञादी कर्मे करावीत. मग तपाचरणास जाऊन शेवटी सन्यास घ्यावा." सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नरहरीने मातेला जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे. ते ऐक." अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीगुरू नरहरीच - बालचरित्र लीलावर्णन' नावाचा अध्याय.

नरहरी आपल्या आईला म्हणाले, ''आई, मला आता निरोप दे. तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे. घरोघरी भिक्षा मागून, ब्रह्मचर्याचे पालन करून, वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे.'' हे ऐकून आईला फारच दुःख झाले.''जेव्हा माझे चिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठा वाटेल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन.'' असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आई-वडिलांनी त्याला संन्यासदीक्षा घेण्यास मान्यता दिली. नरहरी प्रथम काशीक्षेत्र या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी अध्ययन केले. कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिध्द झाले. श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निरनिराळ्या तीर्थांना भेट दिली. नरसोबाची वाडी येथे बारा वर्षे राहून त्यांनी लोकोद्धाराचे प्रचंड कार्य केले. पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रगट झाले. त्यांचे असंख्य शिष्य होते. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले की, ''आम्ह्ची प्रसिद्धी फार झाली आहे. यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे. मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरुरुपाने येथे राहणार आहे.

जे जे असती माझ्या प्रेमी lत्यांते प्रत्यक्ष दिसे नयनी । लौकिकमते अविद्याधर्मी lजातो श्रीशैल्ययात्रेसी ।।

श्री गुरु म्हणाले, ''जे लोक माझी भक्ति करतील, मनोभावे माझे गुणगान करतील, त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू. त्यांना व्याधी, दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी, सुख व शांति लाभेल, असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले. ते आसन नावेसारखे पाण्यात सोडले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या. ''लौकिकमताने मी जात आहे. तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सान्निध्य सदैव राहील.'' असे श्री गुरूंनी सांगितले. नंतर ते पोचल्यावर प्रसादाची खूण म्हणून फुले वाहत आली.

श्रीपाद श्रीवल्लभ हा श्रीदत्तप्रभूंचा दुसरा अवतार. ‘कलौ श्रीपाद श्रीवल्लभ:’ अशी या अवताराची ख्याती आहे. श्रीनृसिंह सरस्वती हे श्रीदत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्धी पावले. 

श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराणप्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्रीनृसिंह सरस्वतींनी केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले. श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे. श्रीगुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत. श्री नृसिंह सरस्वती. श्री गुरूचरित्रात अध्याय ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. श्री नृसिंह सरस्वती संन्यासधर्माचे सर्वोत्तम आदर्श होते. 

तू भक्तजना कामधेनु । मनुष्यदेही अवतरोनु । तुझा पार न जाणे कवणू । त्रैमूर्ती तूच होसी ।।

श्री गुरूंच्या लीलाकथा श्रीगुरूचरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत. भक्तांना ते दर्शन देतात.
                                                                                                                                                 
औदुंबरा तळवटी नरसिंहयोगी।
कृष्णातटी परम शांत सुखास भोगी॥
ध्यानस्त होऊनि समस्त चरित्र पाहे।
अन्यन्य जो शरण इच्छित देत आहे॥

त्रैलोक्याचा राजा नरहरि माझा

लेखक-रोहन विजय उपळेकर.

आज पौष शुद्ध द्वितीया, कलियुगातील द्वितीय श्रीदत्तावतार, भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती!

भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराजांनी, कुरवपूरच्या कृष्णानदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला, पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. तीच पुढच्या जन्मी वाशीम जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली. पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला. पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार, भगवान श्रीदत्तप्रभूंनी श्री नरहरी रूपाने तिच्या पोटी, शके १३०० अर्थात् इ.स. १३७८ मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला मध्यान्ही कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला. 

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्रीगुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून, श्रीदत्तसंप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई-वडिलांना वाटले की, बालक मुके आहे की काय? पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. त्यानंतर ते एक वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शास्त्रे शिकवत होते.  नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली व पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंज्याला आले. तेथून मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. तेथून कृष्णामाईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले. तेथे एक चातुर्मास्य राहिले. तेथे त्यांच्या स्मरणार्थ पुढे 'विमल पादुका' स्थापन करण्यात आलेल्या आहेत. औदुंबरहून पुढे ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य झाले. तेथे श्रींनी आपल्या 'मनोहर पादुका' व अन्नपूर्णामातेची स्थापन केली व मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तेथे त्यांचे चोवीस वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतर अंदाजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी, गाणगापुरात  'निर्गुण पादुका' स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. श्रींचा जो अपार्थिव, दिव्य-पावन श्रीविग्रह अशाप्रकारे स्थूलरूप धारण करून कार्यरत होता, तोच आजही गुप्तरूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करीत आहे व पुढेही करीत राहीलच.

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्याकाळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनर्स्थापना केली. लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला. ते स्वत: अत्यंत कडक आचरण करीत असले तरी, त्यांनी कृपा करण्यात भक्तांचा जात-धर्म कधीच पाहिला नाही. जसे चारही वेदांचे ज्ञानी ब्राह्मण, श्रेष्ठ संन्यासी त्यांचे शिष्य होते, तसेच भक्तराज तंतुक, पर्वतेश्वर शूद्र व बिदरचा मुसलमान बादशहा असे अन्य जाती-धर्मातील हजारो भक्तही त्यांच्या कृपेने धन्य झालेले होते. ते अकारणकृपाळू व परमदयाळूच आहेत. जगाच्या कल्याणासाठी आलेल्या अवतारांना, संतांना जात-धर्म यांच्या चौकटीत बसवणे हा वेडगळपणाच नव्हे काय?भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्मर्तृगामी व स्मरणमात्रे संतुष्ट होणारे परमदयाळू व भक्तवत्सल आहेत. प्रेमभराने व निर्मळ अंत:करणाने त्यांना घातलेली साद त्यांच्यापर्यंत पोचतेच पोचते, असा लाखो भक्तांचा आजवरचा रोकडा अनुभव आहे. श्रीदत्तसंप्रदायातील थोर विभूतिमत्व  प. पू. श्री.शिरीषदादा कवडे यांच्याकडून ऐकलेले आहे की, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अत्यंत ऋजू अंत:करणाचे परमशांत असे अवतार आहेत. त्यांच्या दयाकृपेला ना अंत ना सीमा. त्यांच्या भक्तवात्सल्य ब्रीदाचे यथार्थ वर्णन करताना श्री गुरुभक्तही हेच म्हणतात,

अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे । संकटिं भक्ता रक्षी नानापरी ।
रुतूं देईना पायी कांटा रे ॥ शरणांगता जना पाठिसी घालुनी ।
कळिकाळासी मारी सोटा रे ॥ अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी आहे. तेथे ते निरंतर राहून भक्तकल्याण करीत असतात. त्यांचेच प्रत्यक्ष अधिष्ठान आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथेही आहे. "वाडी-गाणगापूर प्रमाणे आम्ही दत्तधाम येथेही निरंतर वास्तव्य करू", असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वत: प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांना दिला होता. त्यांच्या त्या अमृतशब्दांची आजही सतत प्रचिती येत असते. प. प. श्री. नारायणस्वामी महाराजांचे शिष्योत्तम, वाडीतील ढोबळे पुजारी उपनावाचे व श्री गुरुभक्त ही नाममुद्रा धारण करणारे थोर भक्तवर, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांविषयीचा आपला दृढ प्रेमभाव व्यक्त करताना म्हणतात, 

त्रैलोक्याचा राजा । नरहरि तो माझा तो माझा ॥ध्रु.॥
नांदे अमरापूर ग्रामीं । कृष्णातीरीं यतिवरस्वामी ॥१॥
नृसिंहसरस्वती करुणामूर्ति । त्रिभुवनिं गाती ज्याची कीर्ति ॥२॥
श्रीधरविभु निजकैवारी । भावें भजतां भवभय वारी ॥३॥

या अखिल ब्रह्मांडांचे नायक असणा-या, भक्तांचे भवभय वारण करणा-या, कृष्णातीरी नित्य नांदणा-या, त्रिभुवनात ज्यांच्या कीर्तीचा डंका सदैव वाजत असतो. त्या परमदयाळू परमकनवाळू महाराजाधिराज श्रीमत् नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं, आज जयंतीदिनी प्रेमभराने साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचेच परमपावन नाम घेत त्यांना कृपाप्रसादाची प्रार्थना करूया!