श्री क्षेत्र पाथरी, जिल्हा परभणी महाराष्ट्र

विशेष: श्री साई बाबा जन्मस्थान

श्री साई बाबा जन्मस्थान
श्री साई बाबा जन्मस्थान

थोर अवतारी पुरुष श्री संत साईबाबा यांचे शिर्डी हे जगप्रसिद्ध आहे. साईबाबांचे मूळ जन्मगाव जन्मस्थान हे गूढ होते. ते गूढ कुतूहल साईबाबांचे परम भक्त श्री विश्वास बाळासाहेब खेर यांनी सतत २५ वर्ष संशोधन करून सातत्याने पुराव्याचा पाठपुरावा करून अनुभूतीने श्री साईंच्या आशीर्वादाने पाथरी ता. पाथरी जि. परभणी श्री साईंचे मूळ जन्मस्थान आहे हे सिध्द केले. 

मराठवाडा ही संतांची भूमी आहे याच पवित्र भूमीत परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या पवित्र काठावरती पाथरी ही पुण्यभूमी आहे. पाथरीला प्राचीन काळात पार्थपूर या नावाने ओळखले जात होते. पाथरी गावातच एका "भुसारी" असलेल्या ब्राह्मण कुटुंबात श्री साईंचा जन्म झाला. श्री साईंचे मूळ नाव "हरी" असे होते. जुन १९७८ मध्ये हि मुख्य जन्मस्थानाची जागा श्री खेर आणि श्री चौधरी यांनी हदेराबाद येथे असलेल्या. प्रो. श्री रघुनाथ भुसारी यांच्याकडून विकत घेतली. मंदिराच्या बांधकामाच्या वेळी बाबांच्या राहत्या घरात उत्खननात त्यांच्या घरच्या वस्तू सापडल्या जसे श्री हनुमांची मूर्ती बाबांचे हे कुलदैवत आहे व पुरातन हनुमांचे मंदिर पाथरी गावाच्या बाहेर पंचबावडी चा हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय पाण्याचे मडके, जाते, पणत्या बाळंतरूम इ. वस्तू ध्यानमंदिरात घरासाहित भक्तांच्या दर्शनासाठी ठेवल्या आहेत. श्री साई यांनी त्यांचे परम भक्त महाल्सापती यांना सांगितले की "माझा जन्म पाथरी येथील ब्राह्मण कुटुंबात झाला व लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना एका फकिराचे स्वाधीन केले. शिर्डीत साईबाबा पाथरीच्या रहिवाशांची चौकशी त्यांच्या नावानिशी करीत. या सर्व बाबींचे सखोल संशोधन केल्यावर आणि साक्षात श्री स्वामी साई शरनानंद व श्री बल्वबाबा यांच्या आशिर्वादाने श्री साई बाबाचे जन्मस्थान पाथरी आहे हे निश्चित झाले.  

पाथरी हे पांडवाच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षेत्र असून जुने गाव, पार्थपूर श्रीसंत साईबाबा यांचे जन्मस्थान आहे. जन्मस्थानाच्या वास्तूवर भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. पाथरी या गावास पुरातन इतिहास आहे.

श्री साईबाबाची साडेपाच फुटाची ब्राँझच्या सोनेरी रंगाच्या मूर्ती
श्री साईबाबाची मूर्ती, पाथरी

१९ ऑक्टोबर १९९९ च्या विजयादशमीस श्री साईबाबाची साडेपाच फुटाची ब्राँझच्या सोनेरी रंगाच्या मूर्ती स्थापन केली असून बाबाच्या चांदीचे अवर्ण असलेल्या संगमरवरी पादुका पूजेसाठी बसवण्यात आल्या आहेत.

गाभा-याचे पुढे विस्तीर्ण सभामंडप आहे. मंदिराच्या तळघरात बाबाच्या घराण्याच्या पुरातन वास्तूतील काही शेष भाग होता, तो भाग जशाच्या तसा बंदिस्त व सुरक्षित ठेवलेला आहे. यात जुनी दगड मातीची इमारत असून हा भाग बाळंत खोली व अन्य भाग, या उत्खननात सापडलेली पुजेची साधने व मारुतीची मूर्ती मातीची घागर, इत्यादी वस्तू त्याच भागात एका ठिकाणी व्यवस्थित ठेवल्या आहेत. तळघरात भव्य ध्यानमंदिर बांधलेले आहे. बाबाचे सहाफुट उंचीचे याथारूप तैलचित्र ठेवले असून त्याच्या एका बाजूस स्वामी साईशर्नानंद व दुसर्या बाजूस बल्वबाबा यांची तैलचित्रे आहेत. मंदिरापासून पूर्वेस दोन कि. मी. अंतरावर श्री साईबाबा घराण्याचे कुलदैवत (पंचबावडी) हनुमान मंदिर आहे. शेजारीच प्राचीन पुष्करणी बारव तीर्थ आहे.

श्री साई मंदिरा जवळच प्राचीन सोमेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, श्री प. पु. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी स्थापन केलेले दत्त मंदिर दर्शनीय, योगेश्वरी मंदिर, साई मंदिराच्या दक्षिण भागात साधारण दोन कि. मी. अंतरावर किल्ला, पांडवाचे वटे प्रसिद्ध आहेत. तसेच शहरातील लिंगायत मठात श्री संत कांच बसवेश्वर महाराज यांची ३०००० वर्षापूर्वी जीवंत समाधी घेतली असे मानले जाते. इतर मंदिरे, प्राचीन बालाजी मंदिर, गणपती मंदिर, योगेश्वरी मंदिर, विठ्ठल मंदिर, आहे.

साई मंदिरात दर गुरुवारी अन्नदानाचा कार्यक्रम होतो, तसेच साई बाबाचे आवडते पिठले आणि भाकर हा प्रसाद असतो. तसेच येथे मोफत दवाखान्याची व्यवस्था केली असून बऱ्याच गरीब लोकाना याचा लाभ होत आहे.

श्री साई मंदिरा
श्री साईबाबा मंदिर, पाथरी

कसे पोहोचाल ?

विमानाने

पाथरी च्या सर्वात जवळील विमानतळ नांंदेड आहे. पाथरी नांंदेड पासुन १२१ कि. मी. अंतरावर आहे.

रेल्वेने

पाथरीच्या सर्वात जवळील रेल्वे स्थानक 'मानवतरोड' आहे. मानवतरोड हे रेल्वे स्टेशन परभणी-औरंगाबाद रेल्वे मार्गावर आहे. परभणी हे हैद्राबाद आणि औरंगाबाद ह्या शहरांना दक्षिण-मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वेद्वारे जोडलेले आहे.

रस्त्याने

पाथरी हे निर्मल-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर परभणीपासून ४० कि. मी. अंतरावर आहे.

बस स्थानकापासून श्री साई मंदिर १ कि. मी. अंतरावर आहे 

प्रतिवर्षी मंदिरामध्ये साजरे होणारे उत्सव, पुण्यतिथी व सण

हनुमान जयंती, साई शरणानंद जयंती, श्रीकृष्ण जन्माष्ठ्मी, बल्व्बाबा पुण्यतिथी, दत्तात्रय जयंती, श्री रामनवमी, व्यास गुरुपोर्णिमा, विजयादशमी, दीपोत्सव (दीपावली पाडवा), शिर्डी पाई यात्रा.