शिरोळचे भोजन पात्र

स्थान: शिरोळ जिल्हा कोल्हापूर (महाराष्ट्र राज्य), नृसिंहवाडी पासून ६ किमी अंतरावर
सत्पुरूष: श्री नृसिंहसरस्वती स्वामी
विशेष: श्री स्वामी महाराजांची हाताची दगडावर उठलेली बोटे

श्री दत्तगुरू भोजनलय मंदिर, शिरोळ
श्री दत्तगुरू भोजनलय मंदिर, शिरोळ

श्री कृष्णा नदीच्या उत्तरेस कोल्हापूर संस्थानात शिरोळ नांवाचे गांव आहे. व्दितीय दत्तावतारी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज तेथे भिक्षेसाठी गेले. तेथे एक दत्तभक्तीपारायण परंतु (अतिशय) दरिद्री ब्राम्हण राहात असे. त्याची भार्या (पत्नी) दत्तभक्त होती. त्यांच्या उद्धारासाठी श्री नृसिंह सरस्वती महाराज भिक्षेच्या हेतूने तेथे गेले. यतीला भिक्षा हेच उपजीविकेचे साधन लक्ष्मीपती असूनही भिक्षेसाठी गांवात गेले. उजव्या हातात ब्रह्म, धेनू, नाग, शंख, आणि परशु मुद्रा या पांच मुद्रा बांधलेला दंड व डाव्या हातात भिक्षापात्र घेऊन, हळुहळू शांतपणे ब्राम्हणाच्या घरी गेले. (संन्याशाच्या नियमानुसार) ॐ३ऱ्हीं असा उच्चार केला. तो शब्द ऐकल्यावर ब्राम्हणी बाहेर आली. यतीच्या दर्शनाने वर येणारे प्राण पुन्हा मिळविणेसांठी (तात्पर्य श्रीमहाराज आलेले पाहून धांदलीने लागलेली धाप सावरून) म्हणाली.

आपण ‘यावे ! यावे ! आपले स्वागत असों’. ह्या दर्भासनावर बसावे. हे पाद्य (पवित्रपाणी) पाय धुण्यासाठी... याचा स्वीकार व्हावा !. श्री यतिमहाराजानी पाय धुतले. पवित्र पाण्यानी कमंडल भरले. यथा विधी आचमन केले व दर्भासनावर बसले. त्या सतीने श्रींचेचरणतीर्थ घेतले. त्यांची पूजा केली. आपल्या अंगावर तीर्थ शिंपडून व प्राशन करून ती कृतार्थ झाली. त्या ब्राम्हणीने श्रीगुरुंचे त्रैलोक्य सुंदर स्वरूप तटस्थतेने बराच वेळ निरखून पाहिले. तरीसुद्धां तिचे समाधान झाले नाही. ती बोलू लागली... साधुंच्या आगमनाने आमच्या सारख्या पामरांचे कल्याण होते. आपणासारखे साधू घरदाररुपी अंधकुपात गुरफटलेल्या आम्हांवर अनुग्रह करीत असतात. गृहस्थाश्रमीच्या घरी सदा संतुष्ट असलेल्या साधूंचे अगदी थॊडावेळही (गाईची धार काढणेस जितका वेळ लागतो तितका) वास्तव्य आश्रमांस पवित्र करणारे असते. दीनवत्सल माहात्म्यें, देवापेक्षाही फार श्रेष्ठ असतात. साधुंच्या ठिकाणी देव वास्तव्य करतात. म्हणून ते साधूंच्या पूजेने संतुष्ट होतात. सत्पुरुषांच्या दर्शनाने पापराशी नष्ट होतात त्यांना नमस्कार केल्याने कल्याण होते. त्यांच्या पूजनाने अविनाशी ब्रम्हपदाची प्राप्ती होते. सत्पुरुषांची पायधूळ मानसिक व शारिरीक दु:ख दारिद्र्याचा नाश करते. संपत्ति देते जन्ममरण नाहिसे करते, व मनोरथांची परिपूर्ती करते., मानव प्राण्यामध्ये ब्राम्हण श्रेष्ठ, त्यांत कर्मनिष्ठ श्रेष्ठ, त्यापेक्षा उपासक श्रेष्ठ, त्याहून आपणासारखे साक्षात् विष्णू स्वरूप आत्मज्ञानी श्रेष्ठ असतात. संन्यासी म्हणजे साक्षात् विष्णूचीच चालती बोलती मूर्ती. आपण भोजन केल्याने त्रैलोक्यातील सर्व प्राण्यांनी भोजन केल्याचे श्रेय प्राप्त होते. संन्यासी ज्या घरातून भिक्षा न मिळाल्यामुळे पराङ्मुख होतात ते घर म्हणजे साक्षात अरण्यच ज्याच्या घरी संन्याशी उपाशी राहील त्या गृहस्थाचा सर्वस्वी घात होतो.

shirol datta mandir
शिरोळ दत्त मंदिर

शिजविलेल्या अन्नाची भिक्षा मागणाऱ्यामध्यें ब्रम्हचारी व संन्यासी मुख्य समजावेत. त्यांना अगदी थोडी भिक्षा वाढली तरी अधिक पुण्यकारक असते. ब्रम्हचारी व यति या दोघाना भिक्षा दिली नाहीतर गृहस्थाश्रमी माणसाला पाप लागते, हे सर्व माहित असून सुद्धा मज मंदबुद्धीची आपणास अशी विनंती आहे की....पतिराजांचे कांही कारणास्तव बाहेर जाणे झाले आहे अतिथींचे ते पूर्ण भक्त आहेत. ते लवकरच परत येतील ते परत येईपर्यंत कृपाळू महाराजांनी येथे थांबावे. यति आल्याबरोबर भिक्षा घालणे योग्य तथापि माझी विनंती आहे की.... आपणाकडे पाहिल्यावर माधुकरी हेच साधन आपले असेल असे वाटत नाही. म्हणून मी आपणांस थांबण्याची विनंती केली. यातून आपली इच्छा असेल तसे सांगावे ते (पति) घरी येण्यापूर्वी भिक्षा घाल अशी आज्ञा झाल्यास तसे मी करीन.

श्री नी या प्रमाणे प्रेमळ व उदार असे साध्वीचे बोलणे ऐकून व हिच्या पतीला माझ्या दर्शनाची योग्यता अजून आलेली नाही असा विचार करून लोकांच्या हृदयांत वास करणारे प्रत्यक्ष श्री हरिरूप व भगवान दत्तमहाराज त्या पतिव्रतेला पुढीलप्रमाणे म्हणाले -

दुपारच्या वेळेला भुकेची व्याधी आम्हांसही उपद्रव देते. त्याच्या वैद्य म्हणजे गृहस्थाश्रमाचे घर आहे. म्हणून दैवाने मिळालेली भिक्षा हेच याचे औषध आहे. हे साध्वी, शरीर हे व्रणासारखे आहे. भिक्षान्न हाच त्याचा लेप आहे. मी रसना जिंकली असल्याने अन्नविषयी हे नीरस, हे मिष्ट, हे थोडे इ. विचार ही मी करीत नसतो मी भुकेलेला आहे. तुझ्या घरात कांहीतरी स्वयंपाक तयार आहे. म्हणून तूं मला लवकर भिक्षा घाल आम्ही शिजवलेल्या (पक्वान्न) अन्नाचे अधिकारी आहोत. असंतोषी यतिने एखाद्या गृहिणीने वाढलेले अन्न अगर इतर कोणताही पदार्थ जर टाकला तर तो यति, संन्यासीधर्माचे उल्लंघन करणारे होते, व त्यामुळे तो अधोगतीला जातो. साध्वी श्री गुरूना म्हणाली कांडणे, दळणे, चूल पेटविणे, पाणी आणणे व केर काढणे या पांच कारणांनी घडणाऱ्या ज्या पांच हिंसा आहेत त्यांचा दोष घालविण्यासाठी वैश्वदेव केला पाहिजे. पण तो झाला नाही तथापि वैश्वदेवाकरितां वेगळे अन्न काढून आपणास भिक्षा वाढते. मी जोंधळ्याच्या (ज्वारीच्या) कण्या शिजविल्या आहेत पण घरात पत्रावळ सुद्धां नाही आपण क्षणभर थांबावे. मी लवकर पत्रावळी घेऊन येते ते साध्वीचे शब्द ऐकताच, श्री महाराजांनी अंगणातून एक मोठी शिळा घरात आणली, पाण्यानी धुवून स्वच्छ करून ठेवली, त्याखाली चौकोनी मंडळ करवून घेतले. त्या मंडळावर प्रोक्षण केलेली शिळा ठेवली. तिच्यामध्ये ॐकार युक्त आठ पाकळ्यांचे कमळ काढले व ब्राम्हणीला म्हणाले....

श्री गुरूंची दगडावर उमटलेली हस्त मुद्रा
श्री गुरूंची दगडावर उमटलेली हस्त मुद्रा

“ह्या पवित्र पात्रात भिक्षा वाढा” सतीने त्यांची आज्ञा ऐकून शिळापात्रात जोंधळ्याच्या कण्या वाढल्या. अपोशन घेऊन संन्यासीरूपात आलेल्या साक्षात भगवान श्री दत्तात्रेयानी पात्रात वाढलेल्या कण्या खाण्यास प्रारंभ केला. श्रीहरी भिक्षा भक्षण करून तृप्त झाले. त्यांनी हात-पाय धुतले. आचमन केले व तेथेच ते अंतर्धात पावले. वेदांनासुद्धा ज्यांच्या लीला समजत नाहीत (मग त्या ब्राम्हण पत्नीस कशा कळतील ?) त्या भक्तांचे मनोरथ तत्काळ पुरविणाऱ्या व अरिष्टें हरण करणाऱ्या त्या श्रीहरींचा त्रिवार जय जयकार असो. प्रत्यक्ष श्रीहरिच अतिथी, भोजन करून संतुष्ट झाले यांत सर्व प्रकारचे कल्याण आले. मग स्वतंत्र आशीर्वाद देणेची आवश्यकता ती काय ? जसे एखाद्या सहनशील शांत साधूला पीडा दिली असता त्याचा पडताळा येतोच. मग शापवाणीच्या रूपाने त्याचा कोप प्रकट करण्याची जरुरी असते काय ? नंतर त्या साध्वीचे पति (गृहेश:) घरी आले, त्यांनी सर्व वृत्तांत ऐकला. भगवान दत्तप्रभुंची बोटे उमटलेले ते महाशिळापात्र पाहतांच प्रत्यक्ष श्रीदत्तच आपल्या घरी येऊन भिक्षा घेऊन गेले याचा त्यांना हर्ष झाला तरीपण त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला नाही म्हणून “मी करंटा आहे माझा धिक्कार असो” असे म्हणू लागले. काय आश्चर्य हे ! स्त्रियांना स्नानसंध्यादि कोठे आहे ? वेदाध्ययन कोठे आहे ? तप इत्यादी तरी कोठे आहे ? इतके असून माझ्या पत्नीवर ईश्वराची कृपा झाली. मला जरी ईश्वर दर्शन घडले नाही तरी माझ्या पत्नीला भगवान दत्तप्रभूंचे दर्शन झाल्यामुळे मी सुद्धा तिच्या योगाने धन्य झालो. ते सांप्रत - तरी आनंद देणारेच आहेच, पण या नंतरच्या काळी सुद्धा आमचे कल्याण होणारे आहे. कारण संतांचे- भगवंताचे जे दर्शन होते ते भूत, भविष्य, वर्तमान काळी सर्वदा आपले मंगल आहे याचे द्योतक (सूचक) असते. मारणाऱ्या, शाप देणाऱ्या, निष्टूर बोलणाऱ्या व जळफळणाऱ्याही अतिथींचा, “तो परमेश्वर आहे”. असे समजून सत्कार करावा. त्यांच्या सत्काराने सुद्धां ईश्वर संतुष्ट होतो असे ते ब्राम्हण म्हणाले. त्यानंतर त्या ब्राम्हणानी दररोज आपल्या घरी त्या भोजनपात्राची पूजा केली व कृतकृत्य झाले.

शिरोळ भोजन पात्र
श्री दत्त भगवान- शिरोळ भोजन पात्र 

सांप्रत भगवान दत्तमहाराज अर्थात श्री नृसिंहसरस्वतींची बोटे उमटलेली ती भोजनपात्ररुपी शिळा त्या ब्राम्हणांच्या वंशजाकडे आहे. तेव्हापासून त्या ब्राम्हणाच्या वंशावर श्रीलक्ष्मीची कृपा आहे. निष्कामी सेवा करणाऱ्या भक्तांना श्रीदत्तमहाराज दर्शन देत आहेत. अंतर्यामीस्वरूप श्रीदत्तानी बुद्धीला प्रेरीत केल्यानुसार प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराज यानी “शिक्षात्रयी” नावाच्या ग्रंथातील पहिला “कुमार शिक्षा” नांवाचा ग्रंथ श्री कार्तिक स्वामींच्या पर्वतावर रचला.

प.प. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराजांच्या कृपेने शिरोळ गावातील भिक्षापात्राचे महत्त्व “कुमारशिक्षा” या ग्रंथात सविस्तरपणे आलेले आहे. आपणही ६०० वर्षानंतरही प्रत्यक्ष श्री दत्तमहाराजांची बोटे उमटलेले भिक्षापात्राचे दर्शन घेऊन धन्य होऊया कृतकृत्य होऊया.   

नुकतेच शिरोळच्या भोजनपात्र मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे. नृसिंहवाडी प्रमाणेच मंदिराच्या भिंतीस रौप्य पत्र्यावर भिक्षा घालणाऱ्या ब्राह्मणीची प्रतिमा व श्रीगुरु भिक्षा घेत असताना दिसत आहेत. या ठिकाणी श्री गुरु तृप्त होउन आशिर्वाद देउन गेले त्यामुळे येथे मागितलेली कोठलीही संसारीक, भौतिक, अध्यात्मिक भिक्षा श्री गुरु देतातच अशी दत्तभक्तांची ठाम श्रद्धा आहे. त्यामुळे भक्त येऊन श्रीगुरुचरणी कामनेचे दान मागतात. 

धनधान्ये ना सदनी ना भोजनपात्र । जाड्या भरड्या कणिका आधार मात्र ।।
आरे पाती त्या प्रेमे अमृत सती हस्त । प्रकटे करतल ठसे पाषाणी दत्त ।।

कोल्हापूर जिल्हातील शिरोळ या तालुक्याच्या गावी श्री सद्गुरू दत्तात्रयांचा द्वितीय अवतार श्री नृहसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे भोजन पात्र मंदिर आहे.
कृष्णा प्रयाग संगमी स्वामी तरूतळी एके दिवशी आले.

भाक्षे शिरोळी कर्णिकद्वारी जावूनी माध्यांनकाळी भीक्षा म्हणवूनी बोले गुरू चंद्र मौळी.

असे महान शिरोळ दत्त महाराजांचे पवित्र व पावन क्षेत्र गुरूचरित्र या महान ग्रंथामध्ये यांचे वर्णन शिरोळ नाम ग्रामाशी विप्र एक परियेशी गंगाधर नामेशी वेदरत होता जाण अशा प्रकारे आलेले आहे. या गंगाधर ब्राम्हणाच्या पत्नीने आपल्या गृहद्वारी स्वामी महाराज भिक्षेस आलेले पाहिले व त्यांनी प्रेमाने व भक्तीने जोंधळ्याच्या शिजविलेल्या कण्याची भिक्षा वाढली. घरी पात्र नसल्यामुळे स्वामी महाराजांनी त्यांच्या अंगणातील एका पाषाणावर अतिप्रेमाने मिटक्या मारून त्या कण्या खाल्या व त्या पाषाणावर आपल्या हाताची शंक, चक्र, पद्य चिन्हानी युक्त अशी पाच बोटे उमटविली ती आजही पाषाणावर दुध घातल्यावर पूर्णपणे दिसतात. स्वामी महाराजांनी त्या साध्वी स्त्रीस या पाषाणाची नित्य त्रिकाळ पूजा अर्चा करण्यास सांगितले. हा काळ शके १३६४ ते १३७६ चा तेव्हा पासून आजतागायत ही पूजा अर्चा सुरू आहे. याकाणी श्री नृहसिंह सरस्वती स्वामींनी माध्यांन काळी भोजन केले. म्हणून या मंदिरास भोजन पात्र मंदिर म्हणतात. त्यामुळेच इथला दत्त जन्मकाळ माध्यांन काळी करण्याची प्रथा आहे. सांगलीमार्गे श्री क्षेत्र नृहसिंहवाडी या दत्त क्षेत्रास जातांना रस्त्यात शिरोळ हे क्षेत्र लागते. नृहसिंहवाडीपासून हे क्षेत्र ६ किमी अंतरावर आहे.