श्रीक्षेत्र सुलीभंजन (दत्तात्रेयांचे साक्षात्कार ठिकाण)

स्थान: औरंगाबाद (महाराष्ट्र) जवळ 
सत्पुरुष: श्री जनार्धन स्वामी 
विशेष: तप ठिकाण, दत्त मंदिर  

श्रीक्षेत्र सुलीभंजन
श्रीक्षेत्र सुलीभंजन दत्त मंदिर 

औरंगाबादपासून ३० किलोमीटर अंतरावर दत्तात्रयाचे साक्षात्कार झालेले निसर्गरम्य सुलीभंजन दत्तधाम ठिकाण आहे. हे ठिकाण फार कमी लोकांना माहिती आहे. धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून सुलीभंजन प्रसिध्द आहे. दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याच्या उत्तरेस वायव्येस सुलीभंजन हे छोटेसे गाव आहे. खुलताबादपासून पाच किलोमीटर अंतरावर श्री.दत्तधाम सूर्यकुंड व चंद्रकुंड पर्वत आहे. हिंदू धार्मिक दृष्ट्या या स्थळाबद्दल अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. हिंदू धार्मिक ग्रंथातील काशीखंड, पद्यपुराण, श्री.दत्त प्रबोध, नाथ चरित्र अशा प्राचीन ग्रंथातून या ठिकाणाचा महिमा वर्णिला गेला आहे. वेरूळ शिवालय महात्म्य संस्कृत ३३ व्या अध्याया मध्ये याचा निर्देश आहे. देवगीरीतील दिशेसूर्यकुंड शिवालय दत्तात्रय मनस्थान तीर्थ त्रिगुण पावन या पर्वताला सुलीभंजन, सुर्यभंजन, शुलीभंजन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. मार्कण्डेय ॠषींचे हे ठिकाण तपारण्य होते. मार्कण्डेय ॠषीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्यांच्यावरील मृत्यूसंकट श्री शिवाने टाळल्याची कथा 'शुलीभंजन' तथा 'सुर्यभंजन' या ग्रंथात आहे. मार्कण्डेय ॠषींनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याचा उल्लेख उपरिनिर्दिष्ट सर्व ग्रंथातून आला आहे.

शिवदेईश्वर सुर्यभंजनासी हे स्थान सिद्धपीठ कशी ये माझा वास अहर्निशीं मान. 

कैवल्येश्वर येथे जवळच हेमांडपंथी शिवमंदिर आहे. या मंदिरात कैवल्येश्वराची आराधना फार पूर्वीपासून होत असल्याची ग्वाही अनेक प्राचीन ग्रंथात आहेत. या मंदिराजवळ सूर्यकुंड व चंद्रकुंड हे दोन कुंड आहे. वेरूळ येथील विनायकबुवा टोपरे रचित 'श्रीक्षेत्र ब्रम्ह सरोवर महात्म्य' मध्ये सूर्यकुंडाचा महिमा वर्णिला आहे. या ठिकाणी सहस्त्रलिंग सरोवर असल्याचे बोलले जाते. परंतु त्या सरोवराचा शोध अद्याप लागलेला नाही. 

श्रीक्षेत्र सुलीभंजन दत्त
दत्त मूर्ती, श्रीक्षेत्र सुलीभंजन 

जनार्दन स्वामी हे पंधराव्या शतकात होऊन गेलेले संत. या काळात यादवांचे राज्य संपवून मुसलमानी अंमल महाराष्ट्रात सुरु झाला होता. जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावर किल्लेदाराच्या पदरी कारभारी होते. संत जनार्दन स्वामीची समाधी देवगिरी किल्ल्यावर आहे. या ठिकाणी भागवत संप्रदायाचे भाविक मोठया भक्तिभावाने समाधीच्या दर्शनाला गर्दी करतात. संत एकनाथ महाराजांना दत्ताच्या दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून एका गुरुवारी त्यांना शुलीभंजन पर्वतावर नेले आणि मलंग वेशात आलेल्या गुरुदत्ताचे दर्शन घडविले. या विषयीची आख्यायिका केशव कृत नाथ चरित्रासह गुरुआज्ञेनुसार संत एकनाथ यांनी साधना केली म्हणून या ठिकाणाला संत एकनाथांचे साधनास्थळ म्हणून देखील ओळखतात. येथील वैशिष्टय म्हणजे ज्या ठिकाणी बसून संत एकनाथांनी साधना केली आहे त्या शिळेवर एका लहान दगडाने आघात केल्यास त्या गोलाकार शिळेतून घंटीप्रमाणे मंजुळ आवाज येतो. मात्र या ठिकाणच्या इतर शिळेवर असा आघात केल्यास त्यातून अशाप्रकारचा आवाज येत नाही.