श्री महिपतिदास योगी (सन १६११ – १६९८)

जन्म: इ.स.१६११, रंगभट्ट काथवटे यांचे नातू
कार्यकाळ: १६११-१६९८
समाधी: १६९८ श्री चरणी विलीन  

सतराव्या शतकात बागलकोटहून येऊन विजापूरला स्थायिक झालेल्या रंगभट काथवटे यांचे हे नातू, हा मोठा योगी होईल असे भविष्य प्रल्हाद कृष्णाचार्यांनी वर्तविले होते. ते लहानपणीच सर्व शास्त्रांत पारंगत झाले. गोलघुमटाच निर्माता महमद आदिलशहा गादीवर असताना यांनी विजापूर येथील नृसिंहमंदिरात प्रवचने करून लौकिक संपादन केला. बादशहा व त्याचे सरदार यांनाही यांच्या प्रवचनाची गोडी असे. अनेकांना दीक्षा दिल्यानंतर ते काखंडकीस येऊन स्थायिक झाले. त्यांना मराठी, कन्नड, तेलगु, संस्कृत, उर्दु, पारशी इत्यादी भाषा येत असत. विविध भाषांतून त्यांची पदरचनाही आहे. गृहस्थाश्रमी महिपतीदासांनी आपल्या वडिलांकडूनच उपदेश घेतला होता. यांचे आठवे वंशज श्रीपतय्या सोमय्या हरिदास यांनी यांची माहिती प्रथम उजेडात आणली. यांचे एक मराठी पद देण्यासारखे आहे.

दत्तदिगंबरु तूंचि माझा गुरु । जाणा तो निर्धारु स्वामी माझा ॥ धृ॥
दत्त द्वित्ताक्षर नाममंत्र थोर । दत्त हो संचार तारीयेला ॥ १॥ 
दत्त दत्त म्हणता अदत्तपण गेला । दत्त हे लाधला दत्तपण ॥ २॥ 
दत्त आत्माराम दत्त देवोत्तम । दत्त भवश्रम निरसियेला ॥ ३॥ 
दत्त पाहतां जेथ, आहेच तो तेथ । दत्तावीण रिता ठाव नाहीं ॥ ४॥
दत्त माझा प्राण सद्गति साधन । बाह्यांतर परिपूर्ण देव माझा ॥ ५॥
दत्त माझी माता दत्त माझा पिता । महिपतीचा दाता दत्त एकु ॥ ६॥