स्थान: चिकुर्डे ता. वाळवा जि. सांगली
सत्पुरुष: श्री समर्थ दत्तमहाराज / श्री पंत महाराज
विशेष: दत्त पादुका
सदरचे श्रीदत्तपादुका - निवास देवस्थान हे सांगली जिल्ह्यातील मौ. चिकुर्डे, देवर्डे (ता. वाळवे, जि. सांगली) या गावच्या पूर्वेस मालती ओढ्याच्या दक्षिण किनाऱ्यावर आणि चिकुर्डे-इस्लमपूरच्या हमरस्त्यावर एका आम्रवृक्षाच्या शीतल छायेखाली, पाठीशी औदुंबराचा वृक्ष घेऊन विसावले आहे. हे नावापुरतेच निवास असून खाली धरती व वर आकाश अशा निसर्गमय मंदिरातच उघड्यावर उभे आहे. परंतु मालती ओढ्याचा निसर्गमय परिसर त्याची खुलावट अधिकच करीत आहे.
श्रीदत्तपादुकांची स्थापना ही अलीकडचीच आहे. मात्र श्रीदत्तसंप्रदाय हा ताटे यांच्या घराण्यात पूर्वापार चालत आलेला आहे. रावजी महाराज करंजेकर यांचा अनुग्रह घराण्यावर होता. श्रीविष्णू महाराज बिसूरकर यांचे शिष्य व बंधू श्रीसमर्थसद्गुरू दत्तमहाराज यांच्या सहवासाने नव्याने पुन्हा दत्तसंप्रदाय जोम धरू लागला. दत्तभक्तीचे कार्यक्रम नित्यनियमाने सुरू झाले. महाराजांनी सर्वांना अनुग्रह दिला. श्रीदत्तमहाराज बरीच वर्षे गावी संप्रदाय चालवीत होते. महाराजांचे वयही झाले होते. दिनांक १७-५-१९६० रोजी महाराज दत्तवासी झाले. त्याच दिवशी बाळेकुंद्रीचे पंतमहाराजांचे पुतणे श्री. बाबुराव वकील यांचे पत्र आले.
त्यांनी लिहिले होते, "श्रीसमर्थ दत्तमहाराज हे दत्तचरणी विलीन झालेत; तरी त्यांचा जेथे अंत्यविधी केला असेल. तेथेच विधियुक्त श्रीदत्तपादुका स्थापन करा."
पत्राप्रमाणे दिनांक ७-५-१९६१ रोजी श्रीदत्तपादुकानिवास स्थापन झाले. पादुकांच्या खाली महाराजांची समाधी आहे.
वर्षातून पंतजन्मकाळ, दत्तजयंती, श्रीसमर्थ दत्तमहाराज पुण्यतिथी इत्यादी उत्सव होतात. भजन, कीर्तन, प्रवचन, दत्तफेरी, प्रसाद इत्यादी सोहळा होतो.
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।।