श्रीचंद्रलापरमेश्वरी

श्रीचंद्रलापरमेश्वरी
श्रीचंद्रलापरमेश्वरी

दक्षिण भारतात कर्नाटक विभागात गुलबर्गा जिल्ह्यात चितापूर तालुक्यात भीमेच्या काठावर या देवीचे स्थान श्रीक्षेत्र सन्नती येथे आहे. या देवीची माहिती स्कंद पुराणातील क्षेत्र खंडात आलेली आहे. ५१ शक्तिपीठांपैकी एक स्थान कर्नाटकात अज्ञात असे नमूद झालेले आहे. ते पीठ या क्षेत्राचेच आहे.

या पीठाचा दत्त संप्रदायाशी फार घनिष्ठ असा संबंध आहे. भीमेचा आकार या ठिकाणी पूर्व व पश्र्चिमेस धनुष्याच्या दोन्ही भागासारखा असून हे स्थान यष्टीच्या स्थानी आहे. धनुष्याच्या आकृतीच्या दोन्ही टोकास पूर्वेस गुरुद्वीप (कुरवपूर) व पश्र्चिम भागास धनपूर (गाणगापूर) असा उल्लेख आलेला आहे. ही देवी अवधूत कृपावंती लक्ष्मी देवीच्या बिरुदावलीत ‘महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, अवधूत कृपावंती लक्ष्मी चंद्रलांबा’ असा निर्देश आहे. भीमेच्या काठावर पुरातन मंदिर असून गावापासून मंदिर दीड मैलावर अरण्यात आहे. पूर्वी येथे घोर अरण्य होते. आता नव्या व्यवस्थापनेत येथे भाविकांसाठी सर्व सुखसोयी आहेत.

रामाच्या राज्याभिषेक प्रसंगी समुद्रनाथ येतो. त्याला आमंत्रण नसल्याने कोपून रागाने बोलतो. सेतु धारण केला म्हणून रामाला विजय प्राप्त झाला. राम कृतघ्न झाला असे त्याचे रागाचे बोलणे ऐकून त्यास शाप लाभतो. भ्रमराच्यावतीने त्याचा नाश होईल असा शाप असतो. पुढे सेतुराजा म्हणून समुद्रनाथ जन्मतो. त्याच्या शिवभक्तीने त्यास वर लाभतो. त्याचा उन्मत्तपणा वाढल्याने राम व सीतेचा जन्म नारायण व चंद्रवदना नावाने होतो. चंद्रवदनेचे अपहरण त्याने केले. त्यास हिंगुला देवीच्या आशीर्वादाने भ्रमराकरवी मरण येते असा कथाभाग पुराणात आहे. स्कंदपुराण क्षेत्र खंड ५ स्कंधातून हा भाग एक हजार पृष्ठांचा आहे. त्या ग्रंथाचे प्रकाशन पण झालेले आहे. पुढे सेतुराजाच्या वधानंतर योगमायेच्या कृपेने येथे भक्तांकरिता ती पादुकारूपाने वास करून अनेकांची कुलदेवता बनते. चंद्रवदनेच्या वराने अंबिने तथास्त्य म्हटले. उभयतांच्या नावाने ती चंद्रलांबा बनली. या क्षेत्री देवीचे विग्रहपण आहे. तेथेच महाकाली, महासरस्वतीचे स्थान आहे. मंदिरात श्रीचक्र यंत्र आहेच, पण मूळ देवळाचे शिखर श्रीचक्र आकाराचे आहे, अशी वास्तू भारतात दुर्मिळ अशी आहे.

अलीकडच्या काळात या दहा वर्षात विजापूरचे राजयोगी अण्णा महाराज यांनी सुमारे एक कोटी रुपये खर्चुन या देवस्थानाचा कायापालट केला. त्यांची पण ही कुलदेवता आहे. मूळ देवालय दगडी हेमाडपंथी असून त्या विस्तीर्ण आवारात दहा पंधरा हजार लोक सामावतील एवढा भाग प्रशस्त आहे. मंदिरातील दीपमाळ खूप लांबवरून दिसते. या देवीस्थानात आद्य शंकराचार्य, जगन्नाथ, मुद्दरंग, भास्कराचार्य यांनी दर्शन घेऊन स्तुती केली आहे. त्यादृष्टीने विपुल रचना उपलब्ध आहेत. या स्थानात पांडव अज्ञातवासात असता एक महिना वास करुन होते. दमयंती विरहात असता तेथे सेवेस होती, देवीकृपेनेच नलाची भेट घडली. या स्थानी महिष दानाचे महत्त्व आहे. या सर्व गोष्टी पुराणग्रंथात टिपलेल्या आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा प्रांतात देवीचे भक्त विखुरलेले आहेत. शक्तिउपासक व साधन करणाऱ्या भक्तास हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे असे आहे. देवीच्या उत्सवात चैत्र व॥५ला महत्त्वाचा रथोत्सवाचा कार्यक्रम असतो. तो वार्षिक उत्सव असून नवरात्र व अन्य उत्सव होतात. या स्थानात बळी देण्याचा प्रकार नसून शैव आणि वैष्णव या दोघांनाही प्रिय असे हे स्थान आहे.

याच देवीचे आणखीन एक स्थान व्हनगुंठा क्षेत्राचे आहे. ते क्षेत्र भीमेच्या काठावर असून जवळ थोड्या अंतरावर आहे. येथे भीमा व कागिणा या दोन नद्यांचा संगम आहे. येथे पण चैत्रात उत्सव होतो. टेकडीवर देवालय पुरातन असे असून विग्रह आहे. पुराणातील कथेनुसार नाळेचा शोध घेता तिचा अपहार केल्यामुळे योगिनीस शाप मिळाला व ती कायिणरूपाने जलरूप होऊन भूतलावर आली. त्या नाळेपासूनच हळदीची उत्पत्ती झाली. ते चूर्ण देवीने हनुवटीस लावले त्यामुळे व्हनगुंठ नाव या क्षेत्रास पडले. त्या दिवसापासून सौभाग्यलंकार म्हणून हळदीचा वापर प्रचारात आला.

हिंगुला देवीचा वर लाभून नारायण मुनींबरोबर देवी येथे आली. पण नारायणमुनीने नियम पाळले नाहीत. त्यामुळे देवी येथेच वास करून तिने प्रसाद दिला, त्यातूनच भ्रमर निर्माण झाले, असा कथाभाग पुराणात आहे. सेतुराजाच्या वधानंतर सर्व भ्रमर गुप्त झाले. केवळ ५ भ्रमर राहिले. सन्नती येथे ते गुप्त झाले. त्यामुळे पादुकास प्रत्येकी पाच व दोन भोके आहेत. देवीच्या चरणस्थानाची पूजा या क्षेत्री आहे. याप्रमाणे चंद्रला परमेश्वरीची ही दोन्ही स्थाने देवीभक्तीच्या दृष्टीने पूजनीय आहेत. दोन्ही स्थाने एकाच परिसरात थोड्या अंतरावर आहेत.

गुरुचरित्रात देवीचे वर्णन आहे. नंदीनाम हा कुष्ठरोगी प्रथम तुळजापुरी गेला. तेथे तुळजाभवानीने त्यास या सन्नतीक्षेत्री चंद्रलापरमेश्वरीकडे पाठविले. या देवीने त्यास परत गाणगापूरी नृसिंहसरस्वती दत्त महाराजांकडे पाठविले. हा प्रसंग एका अध्यायातून आला आहे. देवीचे मुख्य देवालय श्रीचक्राकार वास्तूचे आहे. ही देवी ब्राह्मणांची कुलदेवता आहे. राजेरजवाडे, वतनदार कुटुंब हे देवीभक्त व उपासक होते व आहेत. या देवीस भ्रामरी देवी पण म्हणतात.