श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज (प. प. चिन्मयानंद सरस्वती)

श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज
श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज

जन्म: शके १८१४ वैशाख शुद्ध १२. रविवार. हस्त नक्षत्र, चक्रवर्ती घराणे, शुक्ल यजुर्वेदी कश्यप गोत्रीय आई/वडील: चक्रवर्ती.
गुरु: आत्मानंद, दीक्षेनंतर- ब्रम्हचारी योगेश्चंद्र प्रकाश. संन्यास गुरु- नारायण तीर्थ देव, पौष कृ.१२ नंतर लोकनाथ तिर्थ.
महासमाधी:  ९ फेब्रुवारी १९५४.
शिष्य: गुळवणी महाराज, नारायण काका ढेकणे.

पूर्वपिठीका 

ढाकेश्र्वरी म्हणजे ढाक्क्याची ग्रामदेवता. तेथे वर्षातून चार वेळा नवरात्र उत्सव साजरे होत असतात. अशा या जागृत, संपन्न आणि महान मंदिराच्या पूजेचा मान चक्रवर्ती घराण्याकडे वंशपरंपरागत चालत आला. चक्रवर्ती हे शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन शाखेचे काश्यप गोत्राचे ब्राह्मण होत. त्यांच्या अनेक पिढ्यांनी देवीची सेवा भावभक्तीने केली. प्रत्येक पिढीने पुण्याईचा घडा पुढच्या पिढीच्या हवाली केला. या साऱ्या पुण्याईने साकार होण्याचे ठरविले. पुण्याईने घाई केली तरी प्रारब्धाने वेळ गाठली पाहिजे. आता तीही वेळ गाठली होती. चक्रवर्ती बाबूजींच्या पत्नी धर्मानुकूल होत्या. विशाल मंदिराच्या व्यवस्थेत त्यांचा फार मोठा वाटा होता. सारी झाडलोट, सडासंमार्जन, उपकरणी घासणे, पूजेची तयारी करणे, गोशाळेकडे वैरण पाण्यापासून धारा काढण्यापर्यंत सर्व काही करणे, स्वैपाक-नैवेद्य-सण-समारंभ-अतिथी या गोष्टीकडे लक्ष पुरविणे अशा अनेक कामात आईसाहेबांचा वाटा मोठा होता. कर्तृत्व आणि सेवावृत्ती यांचा मधुर सुसंवाद त्यांच्या ठिकाणी झाला होता. या सर्व कामात कौशल्य, टापटीप व उरकशक्ती होती. याखेरीज त्यांची व्रतवैकल्ये, उपासना नित्याची असे ती वेगळीच!

जन्म 

अशा सात्त्विक मातेला सुपुत्राचे डोहाळे न होतील तरच नवल ! त्या समाधी इतक्या शांत बसून रहात. सिद्धासन, पद्मासन सहज घातले जाई. शरीरात कंप सुरू होत असे. या आनंदात कालीमातेची भजने मधुर स्वरात गात असत. या सर्व गोष्टींच्याकडे चक्रवर्तीबाबूंचे बारकाईने लक्ष असे. त्यांची अध्यात्माची बैठक होती. पत्नीच्या या क्रियांचा अर्थ ते समजू शकत होते. कोण्या महान योगीपुरुषाच्या आगमनाच्या या खुणा आहेत अशी त्यांची खात्री झाली. या स्थितीत त्यांनी होईल तेवढे सहकार्य करून पत्नीच्या वृत्ती सांभाळल्या. त्यांना जीवनाच्या कृतार्थतेची जाणीव होऊ लागली.

कृतार्थी पितरौ तेन धन्यो देश: कुलं च तत् ।
जायते योगवान् यत्र दत्तमक्षयतां व्रजेत् ॥

असे होता होता वैशाख महिना सुरू झाला. अत्यंत शुभ्र मुहूर्तावर चक्रवर्तीबाबूंना कुलदीपक सुपुत्र झाला. संवत् १९४८, शके १८१४, वैशाख शु. १२ रविवार, हस्त नक्षत्री, कन्या राशीमध्ये चंद्र असताना सकाळी १०॥ वाजता हा मुलगा झाला. तो अमृतसिद्धीचा दिवस होता. बारशाचे दिवशी अनेक धार्मिक कृत्ये करण्यात आली. अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्यात आले. सायंकाळी समारंभपूर्वक नामकरणविधी झाला. सुपुत्राचे नाव योगेश्र्वरचंद्र ठेवले. साखर, पेढे वाटले. दानधर्म केला.

योगेशचंद्राचे बालपण

योगेश सदा आत्मरत । बसे कालीचे रूप बघत ॥

योगेश अतिशय सुंदर होता. नाक सरळ तरतरीत होते. कुरळ्या केसाचे जावळ चेहऱ्याच्या सौंदर्यात भर टाकीत होते. डोळे मोठमोठे असून कमळाच्या रेखीव पाकळ्यांसारखे होते. सारे सौंदर्य डोळ्यात एकवटले होते. गोबरे गोबरे गाल सुहास्य वदनाची शोभा द्विगुणीत करीत होते. सौंदर्य हा दृष्टीचा विषय आहे. कवटाळण्या चुरगळण्याचा नाही. आनंदाच्या बेहोषातील त्याच्या साऱ्या हालचाली व वाकुल्या पाहणाऱ्यालाही बेहोष करून टाकीत. ज्या मात्यापित्यांचे पोटी योगेशचंद्र जन्माला आला ते पितर धन्य होत.

ढाकेश्र्वरीचे विशाल मंदिर योगेशच्या हिंडण्याला, फिरण्याला व खेळण्याला पुरेसे होई. तो खरा रमून जाई. ढाकेश्वरीच्या समोरच्या सभामंडपात ! त्याला ढाकेश्वरीसमोर नेले की हसू खेळू लागे. वडील पूजा किंवा आरती करीत असले आणि योगेशला तेथे सोडले म्हणजे झाले. तेथून कोठेही तो जाणार नाही, कंटाळणार पण नाही. सारी पूजा, आरती पहात बसणार. मनाशी तसे करीत बसणार. सर्व पुण्याई घेऊन ढाकेश्वरीचा कृपाप्रसाद म्हणून तो आला होता. योगेश तैलबुद्धीचा होता. त्याची ग्रहणशक्ती असाधारण होती. पाहून किंवा ऐकून तो शिके. पाहून पाहून लहानपणीच त्याने पूजेचे तंत्र बिनचूक उचलले. ऐकून ऐकून किती तरी श्र्लोक योगेशने अगदी लहानपणीच मुखोद्गत केले होते. त्याच्या सर्व हालचाली, खेळ स्वत:च्या तंत्राने स्वतंत्र असत. अलीकडे वाढत्या वयाबरोबर खोड्याही वाढत चालल्या होत्या. त्याचा मिष्किलपणा चांगलाच वाढला होता. याबरोबरच लहर लागली की, मंदिराच्या आवारातच रिकाम्या खोलीत जाऊन, स्वारी डोळे मिटून, बसूनही राहत असे. जेवणाच्या वेळी आई जेव्हा मोठ्याने हाक मारी तेव्हा कुठे योगेश ‘आलो’ ‘आलो’ करून बाहेर येई. एकदा तर त्याला आईची हाक ऐकूच आली नाही. इकडे आई हाक मारमारून योगेश ‘ओ’ देईना तेव्हा चांगलीच घाबरली. तिने मुकाट्याने हातातले काम सोडले आणि लागली देऊळभर योगेशला शोधायला. तो कोपऱ्यातील खोलीत बसला असेल ही कल्पना नव्हती. शेवटी निराश होऊन त्या खोलीत आई गेली. तर काय? योगेश नावाप्रमाणे समाधी लावून बसलेला ! आईने त्याला चांगले हलविले, हाक मारली तेव्हा तो ताळ्यावर आला. असा प्रकार मधून मधून होत असे. योगेशला गोसेवेचे बाळकडू आईच्या पोटातूनच मिळालेले होते. योगेश खरा रमून जायचा तो गायींच्या खिलाऱ्यात ! कालवडींशी आणि खोंडाशी अवखळपणे मस्ती करण्यात योगेश दंग होत असे. योगेशचा व्रतबंध आठव्या वर्षी झाला. देवीच्या मंदिरात व्रतबंध लागून योगेश गायत्रीच्या महामंत्राचा अधिकारी झाला. वयाच्या अवघ्या ३२-३३व्या वर्षी बाबूजी देवाघरी निघून गेले. आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी योगेशने एका तागाच्या गिरणीत कारकुनाची नोकरी पत्करली.

त्याच्या हृदयात एकमेव ध्यास लागला होता तो भगवतीच्या दर्शनाचा. जिच्या शक्तीने साऱ्या विश्र्वाची जडण घडण होते, त्या शक्तीची ओळख व्हावी म्हणून तो शोध घेत होता. त्या अनुसंधानाने तो अंतर्मनाच्या विश्र्वकुंजात वावरत होता.

सद्गुरुप्राप्ती आणि शक्तिपातदीक्षा

देवीचा दृष्टांत आणि प्रचिती: या काळात तो देवीपुढे एकांतात जाऊन बसे. आपली प्रार्थना तिच्यापुढे ठेवी. "आई ! आजपर्यंत जे जग दाखविलेस ते खरे नाही. खोटे आहे. मला तुझ्या ऐश्र्वर्याचे खरे अंतर्जगत् दाखव. ते फक्त विवेक, जागृती आणि सत्संगतीनेच दिसू शकते. तुझ्या कृपेने माझ्यात विवेक जागृती झाली आहे. पण सत्संगतीशिवाय हे व्यर्थ आहे. सत्संगतीशिवाय हा रस्ता चालून जाणे अवघड आहे आणि अशक्यही आहे. मला मार्गदर्शक गुरु दाखव. आई ! तूच गुरू दाखवितेस आणि त्या गुरुकडूनच तुझे स्वरूप स्पष्ट करतेस म्हणून माझी ही प्रार्थना पुरी कर."

एके रात्री त्याला देवीने दृष्टांत दिला. मार्ग दाखवला. गावाच्या, घराच्या खुणा दाखवल्या आणि एका व्यक्तीचे दर्शनही दिले आणि तेथेच स्वप्न संपले. योगेश पुढे झोपला नाही. तसाच उठला आणि देवीला साष्टांग नमस्कार केला. आई-भावंडांकडे निर्विकार मनाने पाहिले व हळूच दार उघडून बाहेर पडला.

इ. स. १९११-१२चा काळ होता. योगेशचे वय वीस वर्षांचे झाले होते.

शक्तिपात दीक्षा आणि सत्संग

योगेशला ‘शक्तिपात योग’ आणि ‘कुंडलीनी जागृती’ या विषयाची बरीच माहिती मिळाली. त्याने आपल्या गुरुदेवाना दीक्षेसंबंधी एकदा प्रार्थना केली होती. पण ही दीक्षा इतकी सरळ व सोपी नव्हती. श्रीआत्मानंद म्हणाले, "आजन्म नैष्ठिक ब्रह्मचारी राहण्याची तयारी असेल तर दीक्षेचा विचार करता येईल. या विषयात ज्यांना काही प्रयत्न करण्याची इच्छा असते त्यांना दीक्षा दिली जाते. केवळ मजा पाहण्यासाठी दीक्षा दिली जात नाही." योगेशने क्षणाचाही विलंब न लावता आपली तयारी असल्याचे सांगितले. तेव्हा एक शुभ दिवस पाहून आत्मानंदांनी योगेशला नैष्ठिक ब्रह्मचार्याची विधीपूर्वक दीक्षा दिली. या दीक्षेपासून योगेशचे नाव ‘ब्रह्मचारी योगेशचंद्र प्रकाश’ असे ठेविले. या दीक्षेनंतर हे दोघेजण, गुरुशिष्य, ‘विनिटिया’ गावी आले. ‘विनिटिया’ या गावी श्रीनारायणतीर्थदेव रहात होते. त्यांनी तेथे सर्व साधकांसाठी ‘ज्ञान साधन मठ’ स्थापन केला होता. त्या ठिकाणी श्रीमदात्मानंदप्रकाशब्रह्मचारीजी आणि श्रीमत् योगेशचंद्रप्रकाशब्रह्मचारी हे दोघे आले. श्रीगुरु या नवीन शिष्याला घेऊन आपल्या गुरुदेवांच्या घरी आले.

श्रीमदात्मानंदांनी श्रीयोगेशचंद्राचा परिचय श्रीनारायणतीर्थदेवांना करून दिला. श्रीयोगेशचंद्राची सर्व हकीगत सांगितली. माहिती ऐकून व प्रत्यक्ष पाहून त्यांना मोठा संतोष झाला. त्यांनीही आपल्या अनुपम दिव्य दृष्टीने श्रीयोगेशचंद्राला कृतार्थ केले. परम कल्याणकारी मंगल आशीर्वाद दिला. येथे योगेशचंद्रांना श्रीमदात्मानंदांकडून शक्तिपात दीक्षा झाली.

हरीच्या जंगलात स्वामी चिन्मयानंद स्वामींनी अज्ञात साधना केली.

नंतर स्वामी होशिंगाबादला आले. पुढे बार्शी, पुष्कर, काशी, उज्जैनी, गया येथेही प्रयाण केले. इ. स. १९२५ला स्वामींचा १२वा चातूर्मास बार्शीत पार पडला. स्वामीजी विनोदी स्वभावाचे होते. बार्शीतील चातुर्मासात जीवनमुक्ती ग्रंथावर विवेचन केले. महाराष्ट्रात अंतरंग दौरा स्वामींनी केला.

पौष कृ. १२ वद्य द्वादशीच्या दिवशी स्वामींचे विधीवत दंडग्रहण झाले. व त्यांचे नाव लोकनाथ तीर्थ झाले.

होशंगाबाद येथे नर्मदेच्या उत्तरेला मंगळवार घाटावर प. प. चिन्मयानंद सरस्वती नावाचे एक तरुण बंगाली संन्यासी आले. ढाक्याचे पुजारी चक्रवर्ती यांच्या वंशात जन्मलेल्या पूर्वाश्रमींच्या योगेशचंद्राने वयाच्या विसाव्या वर्षीच घर सोडले आणि जगदंबामातेने दृष्टांतात दाखविलेल्या सद्गुरुंना - चीतलकोट येथील पू. आत्मानंद ब्रह्मचारी यांना शरण गेले. त्यांच्याकडून नैष्ठिक ब्रह्मचर्याची दीक्षा आणि शक्तिपात दीक्षा प्राप्त करून त्यांच्यासह विनोटिया येथील परमगुरू श्रीनारायणतीर्थ स्वामींच्या आश्रमात सेवा आणि साधना करीत राहिले. दोन वर्षांनी सद्गुरू आत्मानंदांसह ढाक्याला परत जाऊन आईची अनुज्ञा घेऊन ढाक्यातीलच मठाधीश त्रिपुरलिंग सरस्वती यांच्याकडून संन्यास घेतला. त्यानंतर चिन्मयानंद स्वामींनी हिमालयात जाऊन एकांतात दीड वर्ष तीव्र तपश्र्चर्या केली. त्या वेळी त्यांना जगदंबेचा "दक्षिण चलो" असा आदेश मिळाला. त्यानुसार यदृच्छेने हथरस स्थानकावर ते बसलेले असता एका भक्ताने त्यांना होशंगाबादचे तिकीट काढून दिले.

न्या. परांडे यांचा कुलार्णवतंत्राचा अभ्यास होता. त्यांनी कुंडलिनीच्या जागृतीसाठी चाललेला वामनरावांचा खडतर अभ्यास पाहिला. त्यांनी तंत्रग्रंथांच्या आधाराने शक्तिचालनाचा आणखी एक सुलभ उपाय असल्याचे वामनरावांना सांगितले. तो म्हणजे वेधदीक्षा. ह्या दीक्षेत अधिकारी गुरु आपल्या संकल्पाने शिष्यांतील सुप्त शक्ती जागृत करू शकतो. पण असा अधिकारी गुरु कुठे भेटणार ? नर्मदाकाठावर सतत जटी-तपी-साधूंचा वावर असतो. तेव्हा इथे कुणी असा योगी भेटू शकेल अशा अपेक्षेने त्यांनी आपल्या मित्रांसह शोध आरंभिला. त्यांचे नारायणप्रसाद नावाचे एक मित्र एकदा एका तरुण बंगाली संन्याशांना भिक्षेला घरी घेऊन आले. भोजनाच्या वेळी त्या यतींजवळ वकीलसाहेबांनी वेधदीक्षेसंबंधी चौकशी केली व ‘अशा प्रकारे कुंडलिनी जागृत करणारे कुणी योगी आपल्या पाहण्यात आहेत का?’ अशी पृच्छा केली. ते संन्यासी म्हणाले, "मी स्वत:च शक्तिपातदीक्षा देतो !" ते संन्याशी अर्थातच स्वामी चिन्मयानंद होते. वकीलसाहेबांनी ही हकीकत न्यायमूर्तींना सांगितली. त्यांनी ह्या दीक्षेचा पडताळा पाहण्यासाठी नारायणप्रसादांनाच दीक्षा घ्यायला तयार केले. स्वामींनीही ईश्वरी संकेत समजून त्यांना दीक्षा दिली. नारायणप्रसादांची साधना सुरू झाली व त्यांना उत्तम अनुभवही येऊ लागले.

न्यायमूर्तींना हा घटनाक्रम वामनराव आणि त्यांच्या मित्रांना कळविला. सर्वांनाच जिज्ञासा वाटली आणि ते चिन्मयानंदस्वामींच्या दर्शनाला गेले. स्वामी तिशीतले असले तरी वंगदेशीय मार्दवाने दिसत विशीतलेच. अगदी पोरगेले वाटत. इतक्या लहान वयात एवढा मोठा अधिकार आहे यावर विश्र्वास बसणेही कठीण. पण तिथे साधनाभ्यासाला आलेल्या साधकांचे साधन सर्वांनी पाहिले आणि थक्क झाले. योगाभ्यासी साधकांना दीर्घकालीन प्रयत्नानेही दु:साध्य असलेली योगासने, क्रिया, प्राणायाम इत्यादी दीक्षित साधक सहज करतात - नव्हे त्यांच्याकडून सहज घडतात हे प्रत्यक्ष पाहिल्यावर सर्वांच्याच मनातील शंकांचे आपोआपच निरसन झाले. स्वामीमहाराजांविषयी आदर वाटू लागला. त्यांचे वैराग्य, साधेपणा आणि निरंतर ध्यानमग्न वृत्ती यांनी वामनरावादि मंडळी फारच प्रभावित झाली. "दर्शने प्रशस्ती पुण्यपुरूष" या ज्ञानेश्वरींच्या उक्तीचा अनुभव आला. हे साधकमंडळ मग रोजच नर्मदा पार करून मंगळवार घाटावर जाऊ लागले. स्वामीमहाराजांनाही त्यांच्याविषयी आत्मीयता वाटू लागली. सदाचार, तीव्र मुमुक्षा आणि प्रखर धर्मनिष्ठा वामनरावांच्या आणि त्यांच्या सोबत्यांच्या वागण्यातून प्रकटत होती. त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात, त्यांच्याबरोबर फिरायला जाण्यात स्वामीमहाराजांना आनंद वाटू लागला.

याप्रमाणे दोन-तीन आठवडे गेले. शंकररावांच्याबरोबर आलेले बाबा महाजन यांचा योगाचा चांगला अभ्यास होता. त्यांना गावी परतणे आवश्यक झाले. जाण्यापूर्वी त्यांनी स्वामिश्रींना दीक्षेबद्दल प्रार्थना केली. "पुढे पाहू" असे उत्तर आल्याने ते थोडे निराश झाले. दुसरे दिवशी गावाकडे निघताना स्वामींचे दर्शन घ्यावे म्हणून ते मंगळवार घाटावर आले. त्याच वेळी स्वामींनी त्यांना आसनावर बसायला सांगितले आणि दीक्षा दिली. लगेच त्यांच्या तीव्र क्रिया सुरू झाल्या. त्यांचे भरदार शरीर घामाने भिजून गेले. आतून एक प्रकारचा आनंद आणि उत्साह वाटू लागला. शरीर हलके झाल्यासारखे वाटले. तासाभराने कसे तरी उठून त्या भारावलेल्या अवस्थेतच ते खर्रा घाटावर आले. त्यांनी आपली दीक्षा झाल्याचे वामनरावांना सांगितले. त्यांनी त्यांच्या अनुभवांविषयी विचारताच ते म्हणाले, "तुम्हीच पहा!" असे म्हणून त्यांनी लगेच तिथेच बैठक घातली. त्या वेळच्या बाबांच्या क्रिया पाहिल्यावर वामनरावांची वेधदीक्षेने होणाऱ्या कुंडलिनी जागरणाबद्दल पूर्ण खात्री पटली. त्यांच्या मनात स्वामीमहाराजांविषयी नितांत आदर उपजला.

वामनरावांच्या घरी स्वामीमहाराज

याच काळात स्वामींची शरीरप्रकृती बिघडली होती. पूर्णानंद नावाच्या एका आर्यसमाजी साधकांना दीक्षा देताच त्यांना जोराची उलटी झाली. पूर्णानंदांना पूर्वाश्रमी विषप्रयोग झाला होता त्याचा हा परिणाम हे स्वामींच्या ध्यानात आले. पूर्णानंदाला विचारताच त्याने ते कबूल केले. धर्मशाळेत राहून आणि मिळेल ती भिक्षा घेऊन प्रकृतीतला बिघाड कसा दूर होणार? पण संन्यासधर्माला अनुसरून ते सर्व सोसणे भाग होते. वामनरावांच्या हे लक्षात आले. त्यांनी आपल्या आईच्या आज्ञेने स्वामींना काही दिवस आपल्या खोलीवरच रहायला आणण्याचा विचार केला. त्यांनी त्याप्रमाणे विनंती केली की, "स्वामीमहाराज! आमच्या आईची अशी इच्छा आहे की काही दिवस आपण आमच्याकडे रहायला यावे." लगेच स्वामीमहाराज उत्तरले, "आमच्याही आईची तशीच इच्छा आहे." स्वामीश्रींची प्रत्येक कृती ही जगदंबेच्या इच्छेने होत असे. तसे एकदा पुढे ते म्हणालेही, "ती मला एके ठिकाणी राहू देत नाही." आज्ञा पाळण्यात थोडीही कसूर झाली तर लगेच शिक्षा होत असे. श्रीथोरल्या महाराजांचे जे श्रीदत्तप्रभूशी नाते होते तसेच श्रीचिन्मयानंदांचे कालीमातेशी होते.

वामनरावांचा निश्र्चय

स्वामींना वामनरावांच्या घरी विश्रांती आणि घरचा नियमित आहार मिळू लागले व त्यांची प्रकृतीही सुधारू लागली. त्यांच्या अनुग्रहीत साधकांचे येणे जाणे इथेही सुरू झाले. त्यांनी वामनरावांचा नित्याचा कार्यक्रम पाहिला. विशेषत: ते शक्तिचालनासाठी करीत असलेला प्राणायामाचा अभ्यासही पाहण्यात आला. वामनरावांनाही आता ही शक्तिपात योगाची दीक्षा आपण घ्यावी असे वाटू लागले. पण त्यांच्या मनात एक किंतु येत होता. "आपण एका महान व श्रेष्ठ सत्पुरुषाचे अनुग्रहीत असून त्यांचे एकनिष्ठ शिष्य आहोत. आपण पुन्हा लोकनाथतीर्थस्वामींना शरण जाण्यात निष्ठा-व्यभिचार तर होत नाही ना? मी ज्यांचा प्रथम अनुग्रह घेतला ते फार थोर महात्मा होते. शिवाय त्यांच्या अनुग्रहामुळे मला ज्वलंत अनुभवही आला होता. त्यामुळे माझ्या मनात ही शंका आली. अशावेळी शक्तिपात योगदीक्षानुग्रहाचा विचार मी का करावा? हा माझ्यापुढे प्रश्नच पडला. या प्रश्र्नामुळे माझ्या मनात खूप आंदोलन झाले व विलक्षण खळबळ माजली. शेवटी एक दिवस मी श्रीगुरुदेवांची प्रार्थना करून निद्राधीन झालो. "उत्तररात्रीचा समय असेल. प्रखर प्रकाशात श्रीगुरुदेव महाराजांचे दर्शन झाले. ते बोलू लागले, ‘अरे ! शक्तिपात दीक्षा घेण्यास काहीही हरकत नाही.’ त्यानंतर जाग आली. स्वप्नसाक्षात्कार होऊन दीक्षा घेण्याची प्रत्यक्ष आज्ञाच झाली होती. त्यामुळे मनाला खूपच समाधान वाटले. श्रीस्वामी महाराजांची ही आज्ञा प्रमाण मानून मी दीक्षा घेण्याचे ठरविले. माझ्या मनातील शंकेचे पूर्ण निरसन झाले होते. त्यानंतर माझ्या मनात असाही विचार आला की यातून काही चांगले घडून येऊन शकेल! त्याकरिताही हा योग घडून आला असेल."

वामनरावांना शक्तिपात दीक्षा

वामनरावांची बुद्धी अशाप्रकारे निश्र्चयात्मक झाली आणि त्यांनी नि:शंक मनाने श्रीचिन्मयानंदस्वामींकडे दीक्षेसाठी प्रार्थना केली. त्यावेळी श्रीस्वामीमहाराजांना प्राणायामाचा अभ्यास चालू असता दीक्षा देणे प्रशस्त वाटले नाही. त्यांनी ‘पुढे पाहू’ असे उत्तर दिले. त्याचवेळी, "वेळ आल्यावर दीक्षा होईलच." असे आश्र्वासनही दिले. परंतू वामनरावांना फार वाट पहावी लागली नाही. ४-५ दिवसांनीच त्यांना आपल्याला चिन्मयानंद स्वामींचा अनुग्रह होऊन क्रिया होत असल्याचे स्वप्न पहाटेच्या वेळी पडले. त्याच दिवशी संध्याकाळी स्वामीश्रींनी त्यांना बसायला सांगितले आणि मस्तकाला स्पर्श करून दीक्षा दिली. पाठीच्या कण्यावरून हात फिरवून भ्रूमध्याला अंगठा टेकून सहस्त्रार चक्रावर हात ठेवला. प्राणायामाने हलके झालेले वामनरावांचे शरीर पद्मासनावरच दीड-दीड फूट उंच उडू लागले. (दार्दुरी गति). तीव्र वेगाने भस्त्रिका होऊ लागली. अंग घामाने भिजून चिंब झाले. मनात आनंद उचंबळत होता. साधारण तासाभराने वामनरावांनी डोळे उघडले तेव्हा स्वामीमहाराज विचारीत होते, "काय वामन! झाली का कुंडलिनी जागृत? धन्य हो ! बहुत अच्छा साधन हुआ !" वामनरावांनी उठून स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि स्वामींच्या चरणी माथा ठेवून बराच वेळ आपली कृतज्ञता मूकपणेच व्यक्त केली. स्वामींनी आपला वात्सल्याने भरलेला हात त्यांच्या अंगावर, डोक्यावर फिरवला आणि म्हणाले, "तुम्हारा कल्याण हो गया!" प. प. श्री थोरले महाराजही हावनूरच्या दर्शनानंतर म्हणाले होते, "कल्याण आहे."

लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज
प. प. श्रीलोकनाथतीर्थस्वामी महाराज

प. प. श्रीलोकनाथतीर्थ यांच्या पुण्याला भेटी

१९२७ साली सद्गुरू चिन्मयानंद स्वामींनी आपले गुरू श्री १०८ प. प. श्रीशंकरपुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराजांकडून दंड घेतला व त्यांचे नाव (योगपट्टू) प. प. श्रीलोकनाथतीर्थ असे झाले. त्यानंतर १९२८च्या उन्हाळ्यात स्वामिश्रींचे आगमन पुण्याला झाले. महाराजांच्या घरीच दोन महिने मुक्काम झाला. भालेराव कुटुंबियांचा परिचय झाला व श्री. भुजंगराव भालेराव यांना दीक्षा झाली. श्रीस्वामी महाराज त्यांच्याबरोबर त्यांच्या डोणजे या गावीही जाऊन आले. पुण्याहून बार्शीला जाऊन स्वामीमहाराज उत्तरेकडे गेले. हरिद्वारला जाऊन तिथेच चातुर्मास केला. तिथे त्यांना हिवतापाने गाठले. दोन आठवडे उपोषण करून स्वामीश्रींनी तापाला हटविले. पण अशक्तपणा खूप आला. चातुर्मासानंतर ऋषीकेशला गेले.

स्वामींनी मृत्यू परतविला

१९५३च्या मे महिन्यात आपल्या देहपाताचा योग असल्याचे सद्गुरू श्रीलोकनाथतीर्थस्वामींना जाणवले. त्यासाठी त्यांनी आपल्या निकटच्या काही शिष्यांना बोलावूनही घेतले. त्याप्रमाणे अमावस्येच्या रात्री दहानंतर स्वामिश्रींची प्रकृती एकदम अस्वस्थ झाली व सर्व गंभीर झाले. स्वामींच्या मुखावर मात्र शांत स्मित विलसत होते आणि नारायणनामाचा मंद उच्चार चालू होता. इतक्यात स्वामींचे डोळे विस्फारले गेले व लगेच घट्ट मिटले गेले. शेजारीच बसलेल्या वामनरावांचा (गुरुमहाराजांचा) हात त्यांनी घट्ट धरून ठेवला होता. स्वामींचा देह थरथर कापू लागला. सगळेजण आतुरतेने पहात होते. स्वामी निश्र्चेष्ट झाले. सर्वांनी आशा सोडलीच. पण तेवढ्यात त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या ओठांची हालचाल पाहून महाराजांनी आपले कान जवळ नेले, स्वामी म्हणाले, "वामन ! वे चले गये." गंडांतर टळले होते.

श्रीलोकनाथतीर्थस्वामींची महासमाधी

यानंतर साधारण नऊ महिन्यांनी दि. ९ फेब्रुवारी, १९५४ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सद्गुरु लोकनाथतीर्थ स्वामी महाराज अत्यंत क्षीण अवस्थेतही शिष्यांच्या मदतीने उठून सिद्धासनावर बसले. गंगाजळ घेऊन भस्मलेपन करविले. रुद्राक्षमाळा धारण केली आणि सर्वांना खोलीबाहेर पाठविले. त्यांनी केलेला ॐकार दोन वेळा बाहेर ऐकायला आला. तिसरा प्रणव बहुधा अंतरातच विलीन झाला. अर्ध्या तासाने शिष्यवर्गाने खोलीत प्रवेश केला तेव्हा स्वामीमहाराजांचा देह अचेतन होता. ह्या वेळी मात्र श्रीगुरुमहाराज जवळ नव्हते. स्वामींनी त्या दिवशी वेळोवेळा त्यांची आठवण काढली होती. काशीहून स्वामींच्या महासमाधीची तार आली तेव्हा श्रीगुरुचरित्राचा सप्ताह पूर्ण करून महाराज अवतरणिका वाचीत होते. त्या काळात क्रियाकर्मासाठी काशीला जाणेही शक्य नव्हते. २२ फेब्रुवारीला महाराजांनी विधिवत श्रीस्वामीमहाराजांची आराधना केली.

स्वामी लोकनाथ तिर्थ म्हणत

सदा श्री दत्तस्मरण करते रहना । सन्मार्ग मे सदा विचरण करना  ।  काठिनाई आनेपर श्री दत्तसे प्रार्थना करना । वही सर्वावस्था मे जी का रक्षक है ।।

प. पू. लोकनाथतीर्थ स्वामीजींनी साधनेसंबंधी, शक्तिपात दीक्षेविषयी बरीचशी माहिती दिलेली आहे. ती अशी,

१. हे शास्त्र फार नाजूक आहे. येथे एकही गोष्ट लपून राहत नाही. एकही दोष शिल्लक राहत नाही. जे काही असेल ते उफाळून बाहेर येईल. ही दीक्षा आहे. ही दिव्यत्व देते. पापक्षालन करते. म्हणून तर साधक शुद्ध होत जातो. साधना करताना काळजी करण्याचे कारण राहत नाही. क्वचित प्रसंगी, धोक्याचे प्रसंग आले तरी दयाघन कुंडलिनी-जगदंबा मातेच्या कृपेने हे सर्व दूर होते. जसा साधकास त्रास भोगावा लागतो. त्याचाच परिणाम म्हणून सद्गुरूंनाही त्रास भोगावा लागतो.
२. शक्तिपात हे एक महान साधन आहे. सर्व साधनमार्गांपेक्षा हा साधनमार्ग प्रखर, गतिमान आणि बिनधोक आहे. अन्य सारे साधनमार्ग कल्पनांतर्गत आहेत, तर शक्तिपात साधनमार्ग 'कल्पनातीत' आहे. 
३. प्रत्येक ग्रहणामध्ये साधकांनी आपले साधन जरूर केले पाहिजे. अशा वेळी शक्तिसंचाराचा उत्तम अनुभव येत असतो. अनेक विक्षेपांचा नाश होण्यास मदत होते. असलेले प्रतिबंध दूर होतात. साधनेची गती वाढते व साधक पुढे पुढे गतिमान होत राहतो.
४. सद्गुरुंना अंत:प्रेरणा झाल्यास अगर होत असल्यासच ही 'दीक्षा' मिळते. अन्यथा काही काळ जावा लागतो.
५. प्रपंचातील अडचणींच्या मागे दडून साधनेकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही. त्या अडचणी प्रत्येक प्रपंच, संसार करणाऱ्यांच्या पाठीमागे लागलेल्या आहेतच. त्यातून सुटण्यासाठीच तर हा मार्ग आहे. आम्ही तुम्हाला संसार सोडायला सांगत नाही, तो आपोआप तुमच्याकडून सहजपणे कसा सुटेल हे पाहात असतो. तुम्ही प्रपंच करा, संसार करा, शिका, पैसे मिळवा. काय इच्छा होईल ते करा, पण घेतलेले दिव्य, अपूर्व महान व दुर्मिळ साधन आहे. ते एकदाही चुकवू नका. एवढे केले की, तुमच्यात काय फरक पडतो ते तुम्हीच पाहा. तुम्ही फक्त साधनेला बसा. तुमच्याकडून हे साधन योग्य ते सर्व काही करवून घेईल.
६. साधनेत निराशेचे विचार येतात ! मुळीच चिंता करू नये. साधना रोज करीत जा. ही निराशा आपोआप निघून जाईल. ही साधना मिळालेला साधक तीन जन्मांच्या आत पूर्ण होऊन मुक्त होतो. साधनेस बसताना, श्रीदत्तगुरु व इष्टदेवतांना नमस्कार करून साधन निर्विघ्नपणे चालावे अशी प्रार्थना करून बसावे. 
७. चित्त आणि प्राणवायू यांची स्थिरता होऊ लागल्यास अनुभव येत राहिला म्हणजे साधना चांगली चालली आहे याची खात्री बाळगा. 
८. आज्ञाचक्राचा भेद होण्यास काही काळ लागतो, लागत असतो. थोडा वेळ जास्त लागतो म्हणून मुळीच निरुत्साहि होऊन चालणार नाही. साधना सतत चालू ठेवावी.
९. आम्ही कुंडलिनी शक्ती जागृत करतो. त्यानंतर तिचे कार्य सुरू होते. शक्ती जागृत होऊन तिचे कार्य सुरू झाले की, ती प्रथम साधकाचे अनंत जन्मीचे पाप जाळून टाकण्यातच्या उद्योगाला लागते. ही शक्ती म्हणजे अग्नीचा स्फुल्लिंग आहे. तो सर्व पापराशी भस्मसात करीत जातो. हे कार्य अनेक दिवस प्रसंगी काही जन्म, चालू राहते. साधक निर्दोष होऊन साधनसंपन्न होता होता त्याच्या चित्तामध्ये स्थिरता येऊ लागते. चित्ताची स्थिरता याच साधनाने वाढत जाते आणि चित्ताला एकाग्रता येऊ लागते. यापुढे तो समाधीचा अनुभव घेऊ शकतो.