जन्म: ज्ञात नाही, आळंदीत १८७४ ला आले
आई/वडील: ज्ञात नाही
वेष: संन्यासी
कार्यकाळ: १८७४ ते १८८६
गुरु: अक्कलकोट चे श्री स्वामी समर्थ
समाधी: पौष शु. १५, १८८६ आळंदी येथे
वाड्ग्मय: आळंदीचे स्वामी - चरित्रग्रंथ
जन्म व पार्श्वभुमी
आळंदीसी नृसिंह सरस्वती यति, कांति जशी नवबालक अति |
विलोभनीय हास्य मुखावरी, अजानुबाहू असे ती मूर्ती ||
नौली धौती क्रिया जाणती, योगाभ्यासी पारंगत अति |
कोणासी नाही ठावठिकाणा, कोठून अवतरले ये क्षिती ||
दत्तसंप्रदायी असे हे यति, कार्य त्यांचे अतिगूढ कुणीही न जाणती |
इंद्रायणी तीरी त्यांची असे समाधी, दर्शना जाता भक्त कृपा अनुभवती ||
दत्तावतारी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच ब्रह्मांडनायक सद्गुरु स्वामी समर्थ यांचे कृपाकींत सत्पुरुष, त्यांचा पूर्व वृत्तांत जन्म, आई, वडिल, बालपण, कुल गोत्र याबाबत कोठलेही माहिती उपलब्ध नाही. स्वामी महाराजांनीही आपल्या कार्यकालात कधीही उल्लेख केला नाही.
श्री स्वामींचे आळंदीत वास्तव्य
श्रीक्षेत्र आळंदी देवाची निवासी श्रीनरसिंहसरस्वती स्वामी महाराज यांना समाधी घेऊन यंदाच्या (शके १९०७) पौष पौर्णिमेस शंभर वर्षे पूर्ण झाली. स्वामी प्रसिद्धिपराङ्मुख होते. त्यांची आज्ञा नसल्यामुळे त्यांना स्वमुखाने सांगितलेला ‘श्रीस्वात्मसौख्य’ हा ग्रंथ किंवा त्यांचे जीवनचरित्र त्यांचेसमोर प्रसिद्ध होऊ शकले नाहीत. पुढे सुमारे ७७ वर्षांनी वै. वा. श्रीभक्त माधवबुवा गोडबोले हे स्वामींच्या गादीवर असताना ‘सार्थ श्रीस्वात्मसौख्य’ आणि ‘श्रीआळंदीचे स्वामी’ हे चरित्र ग्रंथ छापून प्रसिद्ध झाले.
श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात श्रीनरसिंहसरस्वती या नावाचे एक थोर दत्तावतारी सत्पुरुष होऊन गेले. स्वामींनी तेथे एकूण १२ वर्षे वास्तव्य केले व ज्या दिवशी हा १२ वर्षांचा काल पूर्ण झाला त्या दिवशी म्हणजे पौष पौर्णिमा शके १८०७ रोजी श्रीज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे जीवंत समाधी घेऊन आपले अवतार कार्य संपविले. त्यांचा मठ आणि समाधीस्थान आळंदीला गोपाळपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे.
महास्वामी चिदंबर दिक्षीत यांनी गुर्लहोसुरला जो सोमयाग केला तेव्हा आळंदीचे नरसिंह सरस्वती स्वामी उपस्थित होते असा उल्लेख आढळतो. प. पू. गोंदवलेकर महाराज नैमिषारण्यात गुरुच्या शोधार्थ फिरत असता एका गुहेत प्रवेश केला होता तेव्हा तेथे सहा महान तपस्वी योगी होते. त्यापैकी एक श्री नरसिंह सरस्वती स्वामी आळंदी हे होते असा उल्लेख आढळतो.
श्री अक्कलकोट स्वामींचा कृपानुग्रह
इ. स. १८७४ च्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज भ्रमण करीत करीत श्री क्षेत्र आळंदी येथे आले. तेथे त्यांचे वास्तव्य १२ वर्षे होते. आळंदीच्या स्वामी महाराजांवर अक्कलकोट स्वामी समर्थांची पूर्ण कृपादृष्टी होती. त्यांच्या या प्रकट काळात श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज समर्थाना भेटण्यास २ वेळा अक्कलकोट क्षेत्री गेल्याचा उल्लेख गोपाळबुवांच्या बखरीत आढळतो.
प्रथम ते योगमार्गातील मार्गदर्शनासाठी अक्कलकोटला गेल्याचा उल्लेख आनंदभारतीलिखीत श्री गुरुलीलामृत ग्रंथ अध्याय १५ मध्ये आढळतो यातील ओव्या पुढीलप्रमाणे,
स्वामी नी निजयोगाभ्यास । बराच साधला होता खास ।
अनाहुताहुनि द्विदलास । गति होती तयांसी ॥१७९॥
परिद्विदल चक्रभेद । करोनि ब्रह्मरंध्री अभेद ।
प्रवेश करणे अप्रमाद । साध्य होईना तयांसी ॥१८०॥
नृसिंहसरस्वती द्वारात । येताचि सद्गुरु होऊनि सस्मित ।
म्हणु लागले श्लोक अकस्मित । गोविले ज्यांत योगवर्म ॥१८६॥
द्विदल चक्राचा भेद स्पष्ट । तैसीचा ब्रह्मरंध्रा वाट ।
सहस्त्रदली प्रवेश थेट । सकल कूट उलगडले ॥१८७॥
धन्य आजचा सुदिन । म्हणोनि देखिले सद्गुरुचरण ।
तात्काळ अनुग्रह करोनी पूर्ण । आत्मारामा भेटविले ॥१९४॥
श्री समर्थांच्या केवळ दृष्टीक्षेपानेच त्यांची समाधी लागली व ती २ ते २।। तास चालली. श्री स्वामी अक्कलकोट स्वामींना गुरुस्थानीच मानीत असत. स्वामी समर्थ त्यांना खूप सन्मानाने वागवीत असत. आळंदीचे स्वामी हे फार भजन प्रिय होते. ते भजनात इतके तल्लीन होऊन जात की त्या भजनानंदातच त्यांना समाधी लागत असे. श्री ज्ञानेश्वर माउलींच्या मंदीरात रात्रीच्या भजनाची सुरुवात श्री स्वामी महाराजांनी केली. भजनास गर्दी व्हावी म्हणून भजनानंतर सुकामेवा व इतर प्रसाद भक्तांना वाटत असत. त्यांना दर महिन्यास कोणीतरी रु. ५ ची मनीऑर्डर पाठवीत असे त्यातून ते प्रसादाची खरेदी करत. ही मनीऑर्डर कोण पाठवतो यांचा उलगडा शेवटपर्यंत कधीही भक्तांना झाला नाही.
त्यांच्या प्रभावळीत अनेक विभूती शिष्यरुपाने होत्या त्यात वैद्यराज महर्षी आण्णासाहेब पटवर्धन, श्री गोडबोले महाराज, श्री अप्रबुद्ध श्री देव मामलेदार, श्रीपादस्वामी सच्चीदानंद स्वामी होते. त्यांनी अनेक भक्तांवर कृपा करून त्यांना मोक्षाधिकारी बनवले. स्वामी महाराज ज्ञानेश्वरी भागवतावर उत्तम प्रवचन करीत. भक्तगण जिवाचे कान करून त्यांची ओघवती रसाळवाणी ऐकत. त्यांनी रचलेले श्री ज्ञानेदेवाष्टक अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहे. ‘समाधिस्य मूर्ति भजे ज्ञानदेवम्’ असे त्याचे पालूपद आहे.
स्वामींचे कार्य
ज्यावेळी श्रीपांडुरंगाचे आज्ञेवरून स्वामीचे आगमन पंढरपूरहून आळंदीक्षेत्री झाले, त्यावेळी तेथील वारकरी सांप्रदायाची स्थिती मोठी विचित्र होती. भजनमार्ग अगदी मंदावला होता. लोकांना भजनाऐवजी नाच तमाशामध्ये गोडी वाटत होती. ही स्थिती पाहून स्वामींनी तेथील लोकांत भजनाविषयी प्रथम गोडी उत्पन्न केली. तमाशाप्रेमी लोकांना हाती धरून आळंदीचे प्रख्यात भजनी मंडळ तयार केले आणि श्रीविठ्ठल नामाच्या गजराने आळंदी क्षेत्र दणाणून सोडले. भजनाच्या जोडीला, श्रीज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, उपनिषदे, शांकरभाष्य इत्यादि ग्रंथांवर प्रवचने करून लोकांना धर्मज्ञान दिले. भागवत धर्मातील भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचे सिद्धान्त लोकांना पटवून दिले. प्रसंगी योगमार्गातील चमत्कार दाखवून लोकांना मुग्ध केले; यामुळे सामान्य भाविक लोकच काय, पण पुण्या-मुंबईकडील मोठमोठे विद्वान लोकही स्वामींच्या सामर्थ्याने चकित झाले. संन्यासी असून आपल्या वास्तव्यात एखाद्या सामान्य वारकऱ्याप्रमाणे राहून स्वामींनी आळंदीला भक्तिमार्गाचाच प्रसार करण्याचे फार मोठे कार्य केले.
स्वामींचा पूर्व इतिहास कुणालाच माहीत नाही. कुणी त्यांना त्यासंबंधी विचारलेले दिसत नाही, की स्वामींनी आपणहून तो कुणाला सांगितल्याचे आढळून येत नाही. स्वामींचा स्वभाव विनोदी परंतु अतिशय गंभीर आणि वृत्ती कमालीची लीन; त्यामुळे एखाद्यावर कृपा करावयाची म्हटले म्हणजे गुरू, गुरुबंधु किंवा वेळ पडल्यास शिष्यत्वाचे नाते पत्करून त्यांनी त्याला शिकवावे व कृतार्थ करावे, पण आपल्या सत्यस्वरूपाची मात्र कुणाला कल्पना येऊ देऊ नये. स्वामी पूर्णपणे नि:संग व नि:स्पृह होते. मानमरातब, सन्मान या गोष्टींचा त्यांना अत्यंत तिटकारा होता. प्रसिद्धीचे तर त्यांना अगदी वावडे होते. वेष वैचित्र्य व वागण्यातील बहुरंगीपणा यामुळे स्वामींच्या स्वरूपाविषयी अनेक तर्क लोकांच्या मनात होते. कुणी त्यांना विद्वान समजत, तर कुणी त्यांना उत्तम योगी, दांडगे मंत्रशास्त्री असे समजत. कित्येकांच्या मते ते उत्तम भगवद्भक्त होते. जो ज्या श्रद्धेने त्यांच्याकडे येई किंवा पाही तसेच रूप स्वामी त्याला दाखवीत.
ज्ञानेश्वरी, नाथभागवतावर ते नित्य प्रवचने करीत.
‘हे ब्राह्मण आश्वलायन | गोत्र त्यांचें कौंडिण्य |’
असे श्रीदासगणूंनी म्हटले असले तरी निकटवर्तीयांना ही माहिती बरोबर वाटत नाही. स्वामी साक्षात् दत्तावतारी, गुरुचरित्रातील नृसिंहसरस्वतीच अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे.
‘याच आळंदींत | झाले नरसिंह विख्यात | जे साक्षात् श्रीदत्त | नमन माझें तयासी ||’
असे दासगणूही म्हणतात. लोणारच्या सच्चिदाश्रमस्वामींना आळंदीच्या स्वामींनी योगाभ्यास शिकविला. या सच्चिदाश्रमांनी
‘माझा गुरु तोचि दत्त जाण | नरसिंहसरस्वती नामाभिधान | पूर्ण ब्रह्म’
अशी श्रद्धा आपल्या ‘अंतरानुभव’ नावाच्या ओवीबद्ध ग्रंथात प्रकट केली आहे.
‘तारावयां जडमूढां | रूप श्रीपाद धरी | अवतीर्ण दत्तराणा | झाला अलंकापुरीं ||’
असा एक उल्लेख नागपूरचे राजयोगी श्रीअण्णामहाराज आपदेव यांनी आरती मध्ये केला आहे.
‘सद्गुरु ज्ञानाचा सागर I दत्ताचाहि तो अवतार’
अशी श्रद्धा धुळ्याच्या भिकुवाई पुरंदरे यांनी व्यक्त केली आहे. दत्तात्रेय हेच श्रीपादवल्लभ व श्रीपादवल्लभ हेच श्रीनृसिंहसरस्वती व हेच नृसिंहसरस्वती म्हणजे आळंदीचे स्वामी होत ! यांचे आयुर्मान सुमारे पाचशे वर्षांवर असावे ! त्यानंतर त्यांनी श्री क्षेत्र आळंदी येथेच समाधी घेतली अर्थात या मतास कोणताच ठोस आधार देता येत नाही.
अनेक ठिकाणी यांनी अद्भुत चमत्कार करून लोकांना चकित केले. आळंदीत एक तपभर होते. तेथे त्यांनी लोकांना भजनप्रेमाचा अनुभव दिला. गोपाळपुर्यातील विठ्ठलरखुमाईमंदिर, इंद्रायणीचा घाट, ज्ञानेश्वरांचा रथ, मुक्ताबाईचे मंदिर इत्यादी कामे यांच्याच प्रेरणेने झाली. शके १८०३ पासून स्वामीनी आळंदीत रथोत्सव सुरू केला. एकदा ज्ञानेश्वर माऊलींचा रथ इंद्रायणीच्या वाळूत रूतून बसला, रथ हालत नाही असे समजताच हे भावसमाधीतून जागे झाले व ‘पूर्वी कृष्णावतारी आमचे (अर्जुनाचे) सारथ्य करून दमून गेल्यामुळे आपण रुसलेले दिसता. भगवन् ! आपले मनोगत समजतो. हे पाहा आता आम्ही आपले सारथी’ म्हणून महाराजांनी रथाचे चालकत्व स्वीकारले आणि रथ चालू झाला. स्वामी सर्वसाक्षी व त्रिकालदर्शी होते. स्वामींनी शके १८०७ मध्ये जिवंत समाधी घेतली. प्रतिवर्षी पौष शु. पौर्णिमेस त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव होत असतो.
दर गुरुवारी त्यांच्या समाधीवर त्रैमूर्तींचा रजत मुखवटा बसवून नित्यक्रमात धुपारत्यांचे वेळी दत्तप्रभूंची आरती म्हटली जाते. त्यांच्या ‘श्रीस्वात्मसौख्य’, ‘अंतरानुभव’, इत्यादी ग्रंथसंपदा आहे. श्रीपाददेवांना महाराजांनी करून दिलेले पाच अभंग ‘लखोट्याचे अभंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. यांच्या पत्रांतील निवडक उतारे दि. का. गर्दे यांनी संपादित करून प्रसिद्ध केले आहेत. श्रीपादबुवा गांधी यांनी यांच्या आठवणी प्रसिद्ध केल्या असून बाळ पाळकर यांनी ‘श्रीआळंदीचे स्वामी’ या नावाने यांचे चरित्र लिहून भक्तांच्या हाती दिलेले आहे.
आळंदीच्या स्वामींनी स्वत: श्रीअण्णासाहेब पटवर्धनांना असे सांगितले होते की, त्यांचा (स्वामींचा) जन्म, वऱ्हाडातील कारंजा येथे ‘काळे’ यांच्या हवेलीत झाला आहे. गाणगापूर किंवा अन्यत्र, श्रीगुरुंनी ज्या लीला केल्याची वर्णने श्रीगुरुचरित्रात आहेत तशाच लीला स्वामींनी श्रीगुरुंनी आळंदीच्या आपल्या बारा वर्षांच्या वास्तव्यात केल्या. वरील सांप्रदायिक श्रद्धेला धरूनच स्वामींच्या “श्री आळंदीचे स्वामी” चरित्रग्रंथात लेखकाने स्वामींचे प्रदीर्घ आयुर्मान, स्वामींच्या गुरुपरंपरा, स्वामींच्या स्वमुखातील माहिती, स्वामींच्या “स्वात्मसौख्य” या ग्रंथातील स्वत:संबंधीचे सांकेतिक उल्लेख वगैरे बाबींची विस्तृत व सांगोपांग चर्चा करून ‘आळंदीचे स्वामी’ हेच श्रीगुरुचरित्र कथानायक आहेत.
पुण्याचे नाथयोगी जागरनाथ म्हणजेच प.पू. जंगली महाराज यांच्याशी त्यांचा स्नेह होता. त्यामुळे नृसिंह सरस्वती स्वामी पुणे येथे येऊन महिना महिना जंगली महाराजांबरोबर रहात असत. त्यांचे नेहमी एकांतात बोलणे होई.
त्यांचे समाधीमंदीर इंद्रायणीच्या काठावर गोपाळपुऱ्याकडे जाताना आहे. पवित्र महात्म्याच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जुन्या वाड्यातील समाधीवरील प्रसन्न मुखवटा भक्तांना सातत्याने कृपाशिर्वाद देताना दिसतो.
स्वामीशिष्य आळंदीचे नृसिह सरस्वती याना स्वामी समर्थानी केलेले प्रबोधन
धर्म प्रचारकासाठी स्वामींची युक्ती
श्री नरसिंहस्वामी, स्वामींशी संबोधन करतात. धर्मप्रचार करतांना सामोरे जातांना येणाऱ्या अडचणी सांगतात. स्वामी सांगतात- "हे कार्य करणे इतक सोपं नसतं, कधी फुलं तर कधी अंगारे प्राप्त होतात. "स्वामी, नरसिंह स्वामींना प्रेम आणि आपुलकीनी जनसामान्याला समझवत जा असं सांगतात. तिकडे अप्पा आणि अण्णा नावाचे दोन भाऊ नरसिंहस्वामींच्या आगमनाची वाट पाहत असतात. नरसिंहस्वामी आल्यावर त्यांची पाद्यपूजा, आरती करण्यात येते. नरसिंहस्वामी दोन्ही भावांच्या वेदज्ञान, संतवांग्मय ज्ञान व इतर गोष्टी बद्दल कौतुक करतात. दोन्ही भावांवर समाज प्रबोधनाची जवाबदारी दिलेली असते. थोड्या वेळानी नरसिंहस्वामीला एका खोलीत घुंघरं आणि अत्तराच्या बाटल्या दिसतात, त्यांना लगेचच कळतं कि दोन्ही भावांनी पुन्हा लावणी कार्यक्रमाला जाणे सुरु केले आहे. नरसिंहस्वामी त्या बद्दल दोघा भावांची चांगलीच हाजिरी घेतात. दोन्ही भाऊ सुद्धा पुन्हा लावणीच्या कार्यक्रमाला जाणार नाही असा शब्द देतात. नरसिंहस्वामी ताबडतोब तिथून निघतात. संध्या काळी अप्पा आणि अण्णा चे मित्र येतात, त्यांच्या सांगण्या मूळे मनोनिग्रहाला तडा जातो. दोन्ही भाऊ आज शेवटच्या वेळेला लावणी कार्यक्रमाल जाऊ,असं ठरवतात. पण जशी जित्याची खोड मोडत नाही, तशी त्यांची लावण्या पाहायची सवय जात नाही. नरसिंहस्वामीच्या उपायांना काहीही केल्या दाद मिळत नाही. स्वामी, नरसिंहस्वामीना मानसिक संदेशांनी सुचवतात कि हे कार्य सोपे नाही, शिष्य चुकणारच, पण गुरुनी सतर्क राहून त्याचा सांभाळ करावा.
स्वामीकडे मीराबाई नावाची एक रूपस स्त्री भेटायला येते, तिला स्वामीनीच बोलावले असते. ती आदरांनी स्वामींना नमस्कार करते, स्वामी तिला एक कामगिरी सोपवतात, मीराबाई त्यासाठी हामी भरते. तिकडे अप्पा आणि अण्णांना सूचना मिळते कि गावात मीराबाई नावाची एक उत्तम पैकी लावणी कलावंत आली आहे. तिला भेटायला ते जातात, तिथे पाहताच तर काय! नरसिंहस्वामी तिथे आसनस्थ बसलेले दिसतात. त्यांना आश्चर्य होत कि नरसिंहस्वामी इथे काय करत आहे. नरसिंहस्वामी सांगतात कि मीराबाई त्यांची शिष्या आहे. अप्पा-अण्णा बुचकाळ्यात पडतात आणि म्हणतात-कि मीराबाई सारखी नाचणारी-गाणारी बाई तुमची शिष्या कशी होऊ शकते? नरसिंहस्वामी म्हणतात-"का जर खोटं बोलणारी, गुरुचा आदर न करणारी माणसे जर माझी शिष्य होऊ शकतात तर मीराबाई सारखी कलावंत का शिष्या होऊ शकत नाही". अप्पा-अण्णा ओशाळतात. नंतर प्रामाणिक कबुली देतात कि ते तिला भेटायला आले होते. नरसिंहस्वामी सांगतात कि मीराबाईची एक नियम आहे कि मी ज्याला अनुमती देतो तोच तिची कला पाहू शकतो. तुम्हाला जर नृत्य पहायचं असेल तर लावणीच्या चाली वर रोज ज्ञानेश्वरी चा एक अध्याय वाचायचा. या प्रकारे ७ दिवसात ७ अध्याय वाचायचे. इकडे बाळप्पा बरोबर चालतांना स्वामीच्या पायात ७ काटे रुततात, बाळप्पा खूप विनवणी करतात तरी स्वामी काटे काढू देत नाही. स्वामी म्हणतात-: "गुरु चा मार्ग असाच असतो. निघेल ते काटे आपोआप!".
दोन्ही भाऊ पारायणाला बसतात, पण लावणीच्या चाली वर ज्ञानेश्वरी पाठ काही जमत नाही. तरी नरसिंह स्वामींची आज्ञा म्हणून प्रयत्न करतात. पहिला अध्याय वाचल्या वर नरसिंह स्वामीं लावणी पाहायची आज्ञा देतात, पण जातांना त्यांना उत्साह वाटत नाही. इकडे स्वामी समर्थ आपल्या पायातून पहिला काटा काढतात. पाचव्या दिवशी अध्याय झाल्यावर त्यांना घरा बाहेरच जावं अस वाटत नाही. घरीच बसून नामस्मरण करावे असं वाटतं. स्वामीच्या पायातला पाचवा काटा निघतो. सातवा अध्याय झाल्यावर त्यांना लावणीच्या कार्यक्रमाला जायचा सुद्धा तिटकारा येतो. तिकडे स्वामी सातवा काटा काढतात, व म्हणतात या दोघांचे जीवन आता निष्कंटक होवून अध्यात्माला समर्पित झाले आहे. ८ वा अध्याय वाचतांना नरसिंह स्वामी येतात, आणि विचारतात लावणीला का नाही गेले? दोन्ही भाऊ उत्तर देतात कि त्यांना आता लावणीला जावे असं वाटत नाही. लावणीत आता रस वाटत नाही, आता कधीच जाणार नाही. नरसिंह स्वामीं म्हणतात, याचं श्रेय स्वामींना जातं, शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली.
नरसिंह स्वामीं, अप्पा-अण्णा सोबत स्वामींच्या दर्शनाला येतात. स्वामी विचारतात- "काय आता लावणीचा विसर पडला का?" "अरे धर्मप्रचार करणारे शूर शिपाई तुम्ही, तुम्ही अश्या व्यसनात पडाल तर कसं चालेल?" "कोणतीही सवयीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रुपांतर व्यसनात होतं." "व्यसन हे अध्यात्म प्रगतीच्या मार्गात मोठी बाधा आहे, तिच्यावर विजय मिळवायलाच हवा."
आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी संत साहित्य अभ्यासकांचे नजरेतून
राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावळीतील, त्यांचे कृपांकित थोर सत्पुरुष म्हणजे आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे होत. त्यांचा जन्म व पूर्वायुष्य कोणालाच माहीत नाही. श्री चिदंबर दीक्षित महास्वामींच्या सोमयागात आळंदीचे स्वामी उपस्थित होते. श्री गोंदवलेकर महाराज गुरुशोधार्थ भ्रमंती करीत असताना नैमिष्यारण्यातील एका गुहेत गेले होते. त्यात सहा तपस्वी होते. त्यांपैकी एक आळंदीचे स्वामी देखील होते, असे मानले जाते. श्री स्वामींचे सांप्रदायिक मानतात की, द्वितीय दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजच पाचशे वर्षांनी पुढे आळंदीत प्रकटले व प्रचंड कार्य करून समाधिस्त झाले. अर्थात् या मताला कोणताच ठोस आधार देता येत नाही. तरीही आळंदीचे स्वामी भगवान श्रीदत्तप्रभूंचेच अंश होते यात मात्र शंका नाही! इ. स. १८७४ च्या सुमारास स्वामी भरपूर ठिकाणी भ्रमंती करून आळंदीत आले. आळंदीच्या स्वामींवर राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्णकृपा होती. दोनदा स्वामी अक्कलकोटी श्री समर्थांच्या दर्शनास गेल्याचा उल्लेख श्री गोपाळबुवांच्या बखरीत आहे. श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या केवळ दृष्टिक्षेपानेच त्यांची समाधी लागली व ते दोन अडीच तास त्या प्रगाढ समाधीतच होते. त्यामुळे आळंदीचे स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुस्थानीच मानत. श्री स्वामी समर्थ महाराजही आळंदीच्या स्वामींना सन्मानाने वागवत असत. आळंदीच्या स्वामींचे चरित्र अतिशय मनोहर आहे. त्यांचा प्रसन्न चेहरा आणि मनमोहक हास्य पाहून आपणही आनंदित होतो. ते अतिशय प्रेमळ व भक्तवत्सल होते. त्यांच्या चरित्रातील अद्भुत लीला वाचताना खूप आनंद व समाधान लाभते. त्यांनी आळंदीत अनेक कार्ये केली. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा रथोत्सव त्यांनीच सुरू केला. माउलींच्या समाधी मंदिराच्या मागचा मुक्ताई मंडप बांधून श्री मुक्ताईंच्या श्रीमूर्तीची त्यांनीच स्थापना करवली. इंद्रायणीचा घाटही त्यांनीच बांधून घेतला.
आळंदीचे स्वामी भजनप्रिय होते. ते इतके तल्लीन होऊन भजन करीत की, त्या भजनानंदातच त्यांची समाधी लागत असे. भगवान माउलींच्या मंदिरात त्यांनी रात्रीच्या भजनाची पद्धत सुरु केली. भजनाला गर्दी व्हावी म्हणून भजनानंतर सुकामेवा इत्यादी प्रसाद ते वाटत असत. त्यांचीच एक मजेशीर लीला म्हणजे, त्यांना दरमहा रु.५/- ची एक मनिऑर्डर येई. कोण पाठवत असे देव जाणे. पण त्यातून ते प्रसादासाठी वस्तू आणत. त्यांच्या या युक्तीमुळे रात्रीच्या भजनाची गर्दी भरपूर वाढली हे मात्र खरे! आळंदीचे स्वामी भक्तांची परीक्षा मात्र जोरदार बघत. एकदा एका भक्ताला त्यांनी सांगितले की, "वाघोलीच्या तळ्याजवळील शिवमंदिरात रात्री जाऊन पूजा करून ये. काहीही झाले तरी घाबरायचे नाही बरे का!" तो बरे म्हणून पूजेला गेला. ते मंदिर तसे जंगलातच होते. गाभाऱ्यात पणतीच्या प्रकाशात पूजा सुरू केल्यावर त्याला दिसले की, पिंडीच्या मागे एक मोठे अस्वल बसलेले आहे. तो इतका घाबरला की सगळे तिथेच सोडून धावत सुटला. तो जेव्हा आळंदीला स्वामींच्या दर्शनाला आला, तेव्हा त्याला पाहताच स्वामी पोट धरून हसले आणि म्हणाले, "अरे, घाबरू नकोस असे आम्ही सांगितले होते ना तुला आधीच. ते अस्वल म्हणून आम्हीच तर बसलो होतो तिथे. घाबरलास काय एवढा."
आळंदीच्या स्वामींचे एक भक्त होते. त्यांना त्यांनी दररोज पार्थिव पूजा करण्याची आज्ञा केलेली होती. ते नियमाने व अतीव प्रेमाने पार्थिव शिवपूजा करीत असत. एके दिवशी त्यांनी हातावर पार्थिव करून पूजेला सुरुवात केली आणि अचानक एक काळा कभिन्न नाग त्यांच्या हातावर प्रकट झाला. त्याने त्या पार्थिवावर आपल्या फण्याची सावली केली होती. या भक्ताची कमाल पाहा, त्यांनी किंचितही न घाबरता आपली पूजा पूर्ण केली. आपल्याला हे नुसते वाचून सुद्धा धडकी भरते. पण ते अजिबात घाबरले नाहीत. तो नाग जसा प्रकट झाला होता तसाच पूजा झाल्यावर अदृश्य झाला. संध्याकाळी हे गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आले. त्यावेळी स्वामींनी सकाळचा प्रसंग जाणून त्यांना अक्षरश: उचलून घेतले व म्हणाले, "बाळा, जिंकलंस आज आम्हांला. काय हवे ते माग !" त्यावर त्या भक्ताने मागितले, "सद्गुरुराया, जन्मजन्मांतरी आपलीच सेवा घडू देत व आमच्या कुळाकडूनही आपली सेवा अविरत घडू दे !" स्वामी महाराजांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला. असे धैर्य केवळ अमोघ सद्गुरुकृपेने व अनन्य निष्ठा असल्यासच येऊ शकते. तशी तयारी त्या भक्ताची असल्याने स्वामींनी त्याच्यावर पूर्णकृपा केली, यात नवल नाही.
आळंदीचे स्वामी थोर योगाभ्यासी देखील होते. योगशास्त्रातील अनेक अवघड प्रक्रिया ते सहज करीत. आपले आतडे मुखावाटे बाहेर काढून स्वच्छ करताना त्यांना एकाने पाहिल्याचा उल्लेख आहे चरित्रात. त्यांनी अनेक भक्तांवर कृपा करून त्यांना परमार्थाचे दान दिले. लोकमान्य टिळक ज्यांना गुरुस्थानी मानत ते पुण्यातील प्रसिद्ध वैद्यराज महर्षी अण्णासाहेब पटवर्धन हे त्यांचेच शिष्य. श्री नरसिंह सरस्वती स्वामी-महर्षी पटवर्धन-श्री गोडबोले महाराज-श्री अप्रबुद्ध अशी त्यांची शिष्यपरंपरा आहे. या शिवायही अनेक भक्तांवर कृपा करून स्वामींनी त्यांना मोक्षाधिकारी केलेले आहे. स्वामी ज्ञानेश्वरी, नाथभागवतावर उत्तम प्रवचने करीत. त्यांना संस्कृत रचना करण्याचीही आवड होती. त्यांनी रचलेले संस्कृत 'श्रीज्ञानदेवाष्टक' अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहे. 'समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्।' असे त्याचे पालुपद आहे.
पौष पौर्णिमेला, इ.स. १८८६ साली त्यांनी आळंदीत जिवंत समाधी घेतली. त्यांचे समाधीमंदिर इंद्रायणीच्या काठावर, गोपाळपुऱ्याकडे जाताना आहे. समाधीवरील स्वामींचा गोड हसणारा मुखवटा पाहिला की, आनंदाचे भरते येते आणि मनही अगदी शांत होते. आज श्रीस्वामींच्या १३२ व्या पुण्यतिथीदिनी, त्यांच्या समाधीवर साकारलेल्या त्यांच्या मधुरातिमधुर रूपाचे दर्शन घेऊन आपण त्यांच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊया!
लेखक-रोहन विजय उपळेकर