श्री बालमुकुंद अथवा बालावधूत (बालाजी अनंत कुलकर्णी)

नाव: बालाजी अनंत कुलकर्णी
जन्म: ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण (स्मार्त)
वेष: अवधूत
संप्रदाय: अवधूत संप्रदाय (श्री दत्त संप्रदाय)
गुरु: स्वयंप्रकाशी यति
समाधी: इ.स.१८७७, श्रीशैल्यगमन नंतर कोणास दिसले नाहीत.
शिष्य: श्री पंतमहाराज बाळेकुंद्रीकर

श्री बालमुकुंद अथवा बालावधूत हे प्रख्यात दत्तोपासक श्री पंतमहाराज बाळेकुंद्रीकरांचे गुरू होत. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीच्या काठी पार्श्ववाड नावाच्या गावी १८५०च्या सुमारास बाळाजी अनंत कुलकर्णी ऊर्फ बळप्पा नावाचे एक ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण रहात असत. बाळप्पांचे पूर्वज वाईकडील असून ते स्मार्त होते. पार्श्ववाडकडे राहू लागल्यावर त्यांनी वैष्णव पंथाची दीक्षा घेतली. अंगी वैराग्य बाणल्यामुळे त्यांचे संसारातील व व्यवसायातील मन उतरले व त्यांनी तपाचरणास आरंभ केला. निर्जन वनात योगाधारणेचा अभ्यास केल्यानंतर त्यांना श्रीरामचैतन्य नावाच्या एका अवधूताचे दर्शन झाले. या श्रीरामावधूतावर श्रीदत्तात्रेयांचा अनुग्रह झाला होता. हेच बाळप्पा पुढे बालावधूत अथवा बालमुकुंद या नावाने प्रसिद्धीस आले. पुढे कबरीवनात त्यांनी आणखी योगसाधना आरंभिली. पार्श्ववाड गावातील मल्लिकार्जुनांच्या देवालयात ते एकतारीवर सुरेख भजन करीत. 

सुकुमार गात्र मनोहर । उटी सुंदर । भस्माची वरुती । निजशांती झाली । मोहित पाहूनी मूर्ति ॥
मस्तकीं जटाचा भार । भाळीं केशर मुद्रा सुंदर । अनुपम कांति । आरक्त नेत्र उन्मीलित कृपेची दीप्ती ॥
कौपीन कांसें दंडकमंडलू करीं । हो करीं । शिव धन्य शिवशिव गर्जतसे वैखरी । वैखरी । उन्मत्त बालपिशाचस्थिती स्वीकरी ॥
’ असे यांचे वर्णन श्रीपंतांनी केले आहे. 

यांच्या पिशाचवृत्तीमुळे यांना लोकांकडून त्रास होत राहिला; म्हणून हे पार्श्ववाड गाव सोडून बेळगावजवळच्या कर्देगुद्दीच्या डोंगरावरील दाट झाडीत असलेल्या गडदलक्ष्मीच्या देवळात राहू लागले. या स्थानात अस्वलांचा उपद्रव फार असल्याने जंबुनगर, रीसपुरी असेही याचे नाव आहे. कर्डेगुद्दी येथील रामप्पा गोपाळ कुलकर्णी व शंकरप्पा तळकलकर यांनी यांचा अनुग्रह घेतला. बालमुकुंद ही शुद्ध प्रेमाची मूर्ती असून सदा आत्मरंगात रंगलेली असे. एकतारीवरील यांची साठ एक कन्नड पदावर श्रीपंतांनी ‘श्रीबाळबोधामृतसार’ नावाचा एक विस्तृत निबंध लिहिलेला आहे. श्रीपंतांचे यांच्याविषयी प्रथमत: फारसे अनुकूल मत नसले तरी पुढे त्यांचे बालमुकुंदांवर विलक्षण मन जडले. बालमुकुंदांनी त्यांच्यावर अनुग्रह करून अवधूत पंथाची दीक्षा दिली. शके १७९७ मध्ये अश्विन वद्य १२च्या दिवशी झालेल्या अनुग्रहाचे मोठे रेखीव व प्रत्ययकारी वर्णन श्रीपंतांनी ‘ब्रह्मानंद परमाद्वैत शुद्ध बद्ध सद्गुरु’ या पदात केले आहे. या पदात केले आहे.

‘बालावधूत सद्गुरु जनीं आगळा । अद्वैत बोधामृत पाजुनी । चुकवितो भवघाला ।
पिसेपण मिरवीत आपण । खेळवी भक्तमेळा ॥
पूर्णकृपें निज खूण दावुनी । प्रकटवी दत्तकळा ॥’

अशी निष्ठा श्रीपंतांची यांच्याविषयी होती. आपला अवधूतमार्ग चालविण्यास श्रीपंत समर्थ असल्याची खात्री बालमुकुंदांना होती. सन १८७७च्या अखेरीस बालमुकुंद श्रीशैल्यास जाण्यासाठी निघाले; आणि नंतर ते कोणासच देहरूपाने दिसले नाहीत. श्रीपंतांनी म्हटल्याप्रमाणे

‘वेणुनगरीं ब्रह्मज्ञानाचें कोठार । उघडुनियां थोर ख्याति केली ॥
श्रीशैल्य यात्रेचें करूनिया मीस । दत्तह्र्दयी वास गुप्त केला ॥’

बालमुकुंद भक्तोद्धारक। नमितो मी तुजला ।।
सत्यवचन तू सत्यप्रतिज्ञ। परमहंस भला ।।
दूर म्हणो तरी जवळी अससी । ह्दयी प्रेमा भरला।।
आशीर्वाद धन्य तुझा हा । दत्तस्वरुपी रमला।।